अनंतभट्टाच्या निमित्ताने

पराग पाटील

अनंतभट्ट अभ्यंग हे चोखोबांचे लेखनिक होते असं जनाबाईंचा एक अभंग सांगतो. आठशे वर्षांपूर्वी एक ब्राह्मण एका अस्पृश्याचे अभंग नोंदवून ठेवतो, हे आश्चर्यच. या अनंतभट्टाच्या निमित्ताने एक मुक्तचिंतन नव्या जुन्याला सामावून घेणारं.

अनंतभट्ट नावाचा संदर्भ येतो तो चोखोबाचे अभंग लिहून घेणारे लेखनिक म्हणून. संत चोखामेळा जातीने कथित हीन कुळातले तर अनंतभट्ट कथित कुलीन ब्राह्मण. त्यामुळे चोखोबांचे लेखनिक म्हणून अनंतभट्टांकरवी झालेल्या पूरक कार्याचं फार वेगळं मोजमाप करण्याची आवश्यकता नसली तरी आधुनिक जातीय अभिनिवेशामुळे डायनॅमिक्स थोडं वेगळं होतं.

खरं तर जनाबाईंच्या एका ओवीमध्येच अनंतभट्टाचा संदर्भ येतो. बाकी इतिहासानं त्यांची फारशी दखल घेतलेली नाही. पण आधुनिक काळात चोखोबांवरील सिनेमा आणि नाट्यप्रयोगांमध्ये मात्र अचानक अनंतभट्ट या पात्राला असंदर्भीय महत्त्व दिल्याचं जाणवतं. अनंतभट्टांनी लिहूनच ठेवले नसतं तर आज अडाणी आणि कथित हीन चोखोबांचे अभंग कुणाला वाचायला मिळाले असते, असा पवित्रा या सादरीकरणांमधून जाणवतो.

जनाबाईंनी आपल्या ओवीत म्हटलंय…
चोखामेळ्याचा अनंतभट्ट अभ्यंग | म्हणोनी नामयाचे जनीचा पांडुरंग ||

जनीनं तर पांडुरंगालाच आपला लेखनिक करून पुढच्या ऐतिहासिक ब्लंडर्सना पूर्णविराम दिला. पण जनाबाईंनी तर कोण कुणाचा लेखनिक याची जंत्रीच ओवीत देऊन ठेवली आहे.
ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दा | चिदानंद बाबा लिही त्यास |
निवृत्तीचे बोल लिहिले सांगावे | मुक्ताईची वचने ज्ञानदेवे |
चांग्याचा लिहिणार शामा तो कासार | परमानंद खेचर लिहित असे |
सावत्या माळ्याचा काशीबा गुरव | कर्म्याचा वासुदेव काईत होता |

म्हणजे चोखोबांचे अभंग अनंतभट्टांनी लिहिले, तसे ज्ञानेश्वरांचे अभंग लिहिणारे सच्चिदानंद बाबा, चांगा वटेश्वरांचा शामा कासार, जोगा परमानंदांसाठी विसोबा खेचर, सावता माळींचा काशिबा गुरव, कर्ममेळ्याचा वासुदेव कायस्थ हे सगळेच लेखनिक. या लेखनिकांची नावं जनाबाईंनी आवर्जून घेऊन त्यांना अजरामर केलं. पण याचा अर्थ लेखनिक असणं ही एक सर्वसाधारण गोष्ट होती. काही संत स्वतः इतरांसाठी लेखनिक बनले. ते एक लिप्यंतराचं वा डॉक्युमेंटेशनचं काम होतं. इतर सार्‍याच लेखनिकांप्रमाणं चोखोबांसाठी अनंतभट्टांनी ते इमानेइतबारे केलं. आता चोखोबांची जात आणि अनंतभट्टांची जात यांचा त्या यादवकाळातला परस्परसंबंध बिकट असू शकतो. त्यामुळे चोखोबांचे अभंग अनंतभट्टांनी लिहिणं हे एकप्रकारे धाडस असू शकतं. कदाचित अनंतभट्ट मंगळवेढ्याचे असल्यामुळे त्यांनी अतिशय प्रेमानं चोखोबांसाठी लेखनिकाचं काम केलेलं असू शकतं. पण त्याबाबतीत फारसे ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध नाहीत.

मात्र लेखनिक ब्राह्मण असल्याकारणानेच चोखोबांची अभंगरचनाही व्याकरण, रचना आणि विवेचन या तिन्ही दृष्टीनं उत्कट आहे, असा प्रयत्न अभावितपणे जरी कुणाकडून होत असेल तर तो योग्य होणार नाही. कारण चोखोबांच्या रचनेतील सामाजिक आशय आणि अंगभूत वाङ्मयीन गुणयासाठी त्यांची स्वतःची प्रज्ञाच देदीप्यमान आहे. त्याची प्रचिती त्यांच्या आध्यात्मिक उंचीत आणि त्यांनी संतांच्या सान्निध्यात स्वीकारलेल्या जीवनशैलीत लक्षात येतं. लेखनिकाला काही त्याचं श्रेय देता येत नाही. नामदेव आणि ज्ञानेश्वर या संतद्वयीच्या प्रभावामुळे इतके संत त्या काळात निर्माण झाले आणि त्यांनी इतकी विपुल रचना केली की आज त्याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. हा मोठाच बंडखोर आध्यात्मिकतेचा प्रवाह या संतांनी निर्माण केला. स्वतः ज्ञानेश्वर आणि त्यांची सर्व भावंडे या संतपरंपरेचं नेतृत्व करीत होते. नामदेवांच्या कुटुंबातली माणसंही या प्रभावापासून लांब राहिली नाहीत. नामदेवांचं शिष्यत्व तर अनेकांनी स्वयंप्रेरणेनं स्वीकारलं.
चोखोबांच्या घरातले सर्वच या संतपरंपरेत सहभागी झाले. पत्नी सोयराबाई, मुलगा कर्ममेळा, बहीण निर्मळा आणि मेहुणा बंका हे सर्वच संतपदाला पोहोचले आणि सर्वांनी अतिशय सुंदर अभंगरचना केल्या आहेत. अनंतभट्टांनी चोखोबांच्या पत्नी सोयराबाई यांचेही अभंग लिहून घेतले का, याची काही माहिती नाही.

खरं तर समकालीन सर्व संतांच्या अभंगांचं संकलन करण्याचं मोठं श्रेय नामदेवांनाच जातं. नामदेवांनी या संतांची चरित्रंही रचली आहेत. संतांनी जे प्रचंड मोठं वाङ्मय निर्माण केलं ते संकलित करणं, लिहून ठेवणं आणि नंतर त्याचं संपादन करून ठेवणं हे मोठंच काम अनेकांनी केलं आहे. त्यामुळे या लेखनिकांचं आणि संपादकांचं महत्त्व केव्हाही नाकारता येणारं नाही. पण त्यामुळे मूळ संतांच्या प्रतिभेला झाकोळून टाकण्यासाठी लिप्यंतर वा डॉक्युमेंटेशनच्या कामाला फार मोठी झळाळी देता येत नाही. त्या काळात लिहिण्याचं काम करणार्यांीपैकी ब्राह्मण बहुतांश होते. मौखिक रचनेचं शब्दस्वरूप कागदावर उतरवण्यापेक्षा अधिक प्रतिष्ठा नव्हती. माणसाला लिहिता येतं म्हणजे तो विद्वान, हा अहंगंड अलिकडच्या काळात निर्माण केला गेला. बामण झाला तर लिकूलिकू मरशील, वाणी झाला तर विकू विकू मरशील आणि कातोडी झाला तर जंगलचा राजा होशील, ही म्हण आजही कातकर्यांलमध्ये प्रचलित आहे. त्यामुळे एकूणच लेखनिकाविषयीची लोकांची दृष्टी लक्षात येते. त्यामुळे हिशेबाचं वा लेखनिकाचं काम मूळ प्रतिभावंताच्या प्रतिष्ठेच्या तोडीचं करणं हा कावा म्हणून दुर्लक्षित करता येईल. अगदी विसाव्या शतकापर्यंत अनेक लेखक आणि कादंबरीकारही लेखनिकांची मदत घेत असत. त्यामुळे या लेखकांचं महत्त्व कमी झाल्याची नोंद नाही.

कावा म्हणजे बामणी कावा असंच उमजून घेण्याची सवय आपल्याला आहे. मात्र बामणी कावा ही संज्ञा टोकदार जातीय अर्थानं वापरली जाते. ‘ब्रॅहमिनकल ऑर्डर’ असा शब्दप्रयोग व्यापक अर्थानं घेता येईल. मराठी इतिहासात ब्राह्मण ज्ञातीच्या व्यक्तीची आणि त्यायोगे एकूणच ब्राह्मण समाजाची भूमिका ही महत्त्वाची होती, हे अधोरेखित करण्यासाठी अनेक ब्राह्मण पात्रांना लार्जर दॅन लाइफ पद्धतीनं रंगवणं, ऐतिहासिक संदर्भांमध्ये प्रक्षेप करणं असे उद्योग लेखनकामाठी करणार्यांधकडून झालेत. बहुजन समाजातील अनेक नवे संशोधक तसंच नव्यानं अधिक व्यापक ऐतिहासिक साधनं उपलब्ध होत गेल्यामुळे हे उद्योग लक्षात येत गेले. ते आवर्जून दुरुस्तही केले गेले. त्यामुळे मग सोशल इंजिनीअरिंग माहीत नसलेल्या आणि डॉक्युमेंटेशनपुरतीच कूपमंडुक वृत्ती असलेल्या अनेक कथित अभ्यासकांचे अहंकार डिवचले गेले आणि मग या सगळ्या ऐतिहासिक दस्तावेजांचा रिव्ह्यू करण्याच्या जेन्यूइन प्रयत्नांमध्ये अचानक जातीय अभिनिवेशांची लढाई सुरू झाली. दुर्दैवानं या अभिनिवेशांच्या लढाईत समाजांमधली दरी कमी करण्यासाठी प्रस्थापित माध्यमांमधले विचारवंत कमी पडले. त्यांची प्रगल्भता कमी पडली आणि त्यांचा अप्रत्यक्ष जातीय अभिनिवेशच बिलोरी शब्दफुलांच्या आड वकिली मुद्दे फेकत राहिला.

दरम्यानच्या काळात या प्रस्थापित माध्यमांना समांतर अशी एक सोशल मीडियाची निर्मिती होत होती. ज्यांना प्रस्थापित माध्यमांमध्ये व्यक्त होण्यास वाव मिळत नव्हता असे लोक या सोशल मीडियाचा आधार शोधू लागले. सामाजिक दरी वाढवणारा ब्राह्मणविरोधी विखार सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागला. हे ध्रुवीकरण झपाट्यानं होऊ लागलं आणि ते घडताना बहुजन समाज त्याचा साक्षीदार राहिला. प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेतला मीडिया त्याच्या कोषात मात्र आत्ममग्न राहिला. या दोन्ही माध्यमांचा उमेदवार म्हणून काम पाहिल्यामुळे अर्थात मी हे सांगू शकतो.

सोशल मीडिया हाताळणार्याह एजन्सीत सध्या कार्यरत आहे. परवा अध्यापक असणार्याय माझ्या पत्नीलाही वर्गात सोशल मीडियावर बोलताना अडचण आली. तिनं माझ्याकडूनच सोशल मीडिया नेहमीच्या मीडियापेक्षा वेगळा कसा, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रवासात त्याविषयी बोलताना पटकन बोलून गेलो… सोशल मीडिया हे ‘ब्रॅहमनिकल ऑर्डर’ला छेद देणारं समाजाच्या हातातलं अतिशय खुलं स्वातंत्र्य आहे. खरं सांगायचं तर ‘ब्रॅहमनिकल ऑर्डर’ सहज तोंडातून निघून गेलं. पण माझा मुद्दा पटवण्यासाठी मग जस जसं पुढे बोलू लागलो तसतसं मग माझं मलाच अधिक पटत गेलं.

प्रस्थापित माध्यमं ही अभावितपणे ‘ब्रॅहमनिकल ऑर्डर’चा भाग बनत गेली. माध्यमांमध्ये काय छापून यावं हे ठरवणारी मूठभर माणसं गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झाली. ही माध्यमं कुणाच्या हातात राहावीत हे ठरवणारे मठाधीशही निर्माण झाले. कुणाला टारगेट करायचं आणि कुणाला नाही, हेही काही माणसंच ठरवू लागली. आणि आपण न्याय्य आणि संतुलित भूमिका घेतो हे दाखवण्यासाठी काही अप्रस्थापितांना कुंपणावर बसवून दिखावाही होऊ लागला. सांप्रत माध्यमं ही हस्तीदंती मनोर्याखत बसणार्यां ची झाली. टीआरपीची काळजीवाहू झाली. त्यामुळे अर्थातच माध्यमांची पीठं तयार झाली. आणि मग या पीठांवर अधिराज्य गाजवणारे मंबाजीही निर्माण झाले.

सोशल मीडियानं या अधिराज्यांना सुरुंग लावायला सुरुवात केली. वारकर्यां च्या भाषेत सांगायचं तर ज्ञानोबामाऊलींनी नामदेवांसह धर्मपीठांच्या अधिसत्तेला शह देण्यासाठी भागवत धर्माची उंच धरलेली पताका हे एकप्रकारे त्या काळच्या सोशल मीडियाचंच रूप होतं. कर्मकांडाला छेद देत सर्व जातिपातींना सामावून घेत नामसंकीर्तनाच्या आधारे वारीतला सहभाग हा एका अर्थानं सोशल मीडियाच. या वारीनं प्रस्थापित पीठांना शह दिला. आधुनिक सोशल मीडियाही प्रस्थापित माध्यमांतली ब्राह्मणी व्यवस्था मोडीत काढतो.

अर्थात आधुनिक इतिहासात ब्राह्मणी व्यवस्थेत जसे मंबाजी होते तसेच अनेक अनंतभट्टही होतेच. ब्राह्मणी व्यवस्थेनं मराठी मातीतल्या सामाजिक आणि सांस्कृतिक सुधारणांमध्ये मोलाचं योगदान केलं आहे. त्याविषयी महाराष्ट्राचं भान कधीच सुटलं नाही. महात्मा फुलेंसोबत परांजपे, गोवंडे यांच्यासारखी मंडळी होती. शाहू महाराजांच्या लढाईत राजारामशास्त्री भागवतांसारखे काही ब्राह्मण होते, तर आंबेडकरांसोबत नानासाहेब सहस्रबुद्धेंसारखे लोक होते. ब्राह्मणांच्या योगदानाबद्दल शंका घेण्याचं काहीच कारण नाही. मात्र ज्ञातिनिष्ठ दृष्टीनं इतिहास लिहिण्याच्या प्रथेबद्दल मात्र त्यांना फारसे गुण देता येत नाहीत. त्र्यं. शं. शेजवलकरांचं एक विधान आहे. ते म्हणतात, ‘संशोधक ब्राह्मण, इतिहास लेखक व विवेचक ब्राह्मण, व्याख्याते ब्राह्मण, विषय ब्राह्मणांच्या अभिमानाच्या राज्याचा, संपादक ब्राह्मण, शिक्षक ब्राह्मण, चळवळी त्यांनीच काढलेल्या आणि सर्वांचे श्रोते, वाचक व अनुयायी तेही ब्राह्मणच. यांत क्वचितच कोठे अपवादात्मक ब्राह्मणेतर असेल. या सर्व बनावाचा दुष्परिणाम असा की, ब्राह्मणांची कर्तबगारी, अगदी गागाभट्ट-रामदासांपासून आरंभ करून तो अप्रबुद्ध गोळवलकरांपर्यंत, अशा तर्हेमने फुगविण्यात, सोज्वळ करण्यात, चुकीची व म्हणूनच खोटी करून सांगण्यात शक्य तेवढी जास्त कोशिश करण्यात आली आहे. याचा परिणाम मुख्यतः ब्राह्मणांवरच जास्त वाईट तर्हे चा झालेला आहे.’

अर्थात सोशल मीडियानं आज शेजवलकरांची ही भीती निराधार ठरवली. सर्व समाजाला नवं स्वातंत्र्य दिलं. पण धोका हा आहे की, आज बहुजन समाजातील लेखकही अशीच ब्रॅहमनिकल भूमिका घेऊन लिहू लागला आहे किंवा मग व्यवस्थेला प्रत्युत्तर देण्यासाठी अभिनिवेश जपू लागला आहे. मात्र याचा परिणाम म्हणून ऐतिहासिक दाखल्यांचं भांडवल करून संपूर्ण ब्राह्मण समाज अनाठायी टारगेट केलं जातंय. संतांनी गेली सातशे वर्षे सिंचन करून घडवलेला मराठी समाज त्यामुळे काही सनातनी मंडळी पुन्हा मध्ययुगीन करण्याचा प्रयत्न करू लागली आहेत. ‘ब्रॅहमनिकल ऑर्डर’मध्ये केवळ जातीनं ब्राह्मण असलेली मंडळीच आहेत असं नाही, तर आता नव्याने अॅब्सलूट पॉवर आणि आर्थिक सत्ता भोगणारे सगळेच यात तीच भूमिका वठवू लागले आहेत.

म्हणूनच अनंतभट्टांच्या निमित्तानं लिहिताना लक्षात येतं, की जातीनं महार संत चोखोबा आणि जातीनं ब्राह्मण लेखनिक अनंतभट्ट यांच्यातले त्या काळच्या सामाजिक आणि जातीय पटलावर जुळलेले अनुबंध एखाद्या लेखकाला नव्यानं मोहित करू शकतीलही. पण त्यात जोखीम खूप आहे. कारण गेल्या सातशे वर्षांत अभिनिवेशांमध्ये काहीच बदल झाला नाही. चोखोबांच्या काळातली शिवाशिव एकविसाव्या शतकात संपली असली तरी आज नवनव्या जातीय आरक्षणामुळे भेदाचं नवं कुसू उभं राहिलं. जातिपातीची कुसवं पाडून स्वतःला त्यात गाडून घेणार्यान चोखोबांच्या मातीत हे आज पुन्हा घडतंय. आज जातीय अभिनिवेशांच्या राजकारणाचं कोंदण समाजकारणाला मिळतंय. सातशे वर्षांपासून सर्वधर्मसमभावाची आणि आध्यात्मिक बंडखोरीची सवय संतांनी आपल्याला लावली आहे. पण समाजातील अभिनिवेशांचं काय करायचं हा मोठाच प्रश्न आहे.

इंग्रजांची सत्ता या देशात आल्यानंतर सर्वच जातींची तथाकथित शस्त्रं हातून गेली. धार्मिक सत्ता, क्षात्रतेज आणि व्यापारउदीमही नाहीसा झाला. फुले, शाहू आणि आंबेडकरी चळवळींचा परिणाम म्हणून वर्णव्यवस्थेनं लादलेली शुद्रांची कामंही संपली. मात्र जातीय अभिनिवेश कायम राहिले. शैक्षणिकदृष्ट्या विकसित होत चाललेला बहुजन समाज बौद्धिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होण्यातला मोठा अडसर हा अभिनिवेशाचा आहे. आणि हा अभिनिवेश आधुनिक सोशल मीडियावर ठळकपणे दिसतोय. आषाढी वारीची रचना अशी आहे की तिथे तुमचे अभिनिवेश गळून पडावेत. मात्र नव्या सोशल मीडियात ते फणा उभारून फुत्कार टाकत आहेत. एखादा आक्रमक पवित्रा राजकारणासाठी सोयीचा ठरू शकत असेल, पण त्यामुळे होणारं सामाजिक ध्रुवीकरण चांगली फळं देणारं नाही. दुर्दैवानं आज अखंड महाराष्ट्राला याबाबत सजग करेल, असं सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय क्षेत्राला कवेत घेणारं व्यक्तिमत्व दृष्टीपथात नाही.
संतपरंपरेच्या या सातशे वर्षांचा हवाला देऊन सांगावसं वाटतं, की इतकी वर्ष विठ्ठलनाम गाणार्याा चोखोबांच्या अस्थी तशाही आपण विठ्ठल मंदिराच्या बाहेरच आरक्षित करून ठेवल्या आहेत. सर्वसहभागानं आणि सर्वानुमते त्या आत घेण्याचं धाडस आपण दाखवू शकलो, तरच या अभिनिवेशांवर आपल्याला उत्तर मिळालं असं म्हणता येईल.

0 Shares
अश्रूंची कहाणी समानधर्मा