वेदनेचा कॅथार्सिस

विवेक पंडित

या एकादशीला ठाणे जिल्ह्यातल्या वाडा येथे विठ्ठलाचं देऊळ उभं राहतंय. विशेष म्हणजे या मंदिरात पांडुरंगासोबत चोखोबांच्या मूर्तीचीही प्राणप्रतिष्ठा होतेय. पायरीवरचे चोखोबा गाभार्या्त पोहोचत आहेत. हे आगळंवेगळं मंदिर उभारण्याची ही आगळीवेगळी कहाणी.

पावसाचे दिवस होते. पायाखालचंही नजरेस पडू नये इतक्या अंधार्याद रात्री मुसळधार पाऊस बरसत होता. अंबादास सावणे या १८-२० वर्षांच्या युवकाच्या डोकीवरचं इरलं पूर्ण भिजून गेलं होतं. घरी रखमा, मुलं जेवायला वाट पहात असतील, रस्ता कापावा तरी कसा? पावसाच्या उभ्याआडव्या थपडा तोंडावर येत होत्या. डोळे मिचमिचत अंधारात पुढं जावं तरी कसं? म्हणून तो मारुतीच्या देवळाच्या पायरीशी आडोशाला उभा राहिला. मंदिराचं कवाड खुलं होतं. हुडहुडणार्याड शरीराला उब मिळावी म्हणून मंदिरात जावं तर जात आडवी येत होती. मंदिराचं कवाड सवर्णांसाठी खुलं आहे. अजून आम्ही पायरीशीच आहोत. पायरी कशी ओलांडायची?

अंबादास हा परभणीतल्या पिंपरी देशमुख ह्या गावचा कोतवाल. गावात दवंडी पिटवण्यापासून सांगाव्यापर्यंतची सर्व कामं करणारा. त्यामुळं काळोखातली सावलीही ओळखू यावी इतका गावातल्या प्रत्येक उंबरठ्याला परिचित. पायरीशी आडोशाला उभ्या असलेल्या अंबादासला गावातल्या काही तरुणांनी पाहिलं आणि लाठ्या-काठ्यांनी जीव जाईस्तोवर बदडलं. दगडांनी डोकं ठेचलं. रक्ताच्या चिळकांड्या मंदिराच्या भितींवर अंबादासवरल्या अत्याचाराची मूक साक्ष देत होत्या. मी तर पायरीशी उभा होतो. मंदिरात जाऊन धर्म नाही बुडवला हो, मला सोडा, असा आक्रोश करीत अंबादासने मंदिराच्या पायरीशी प्राण सोडले. त्याचा आक्रोश मुसळधार पावसाच्या आवाजात देवाच्या मूर्तीपर्यंतही पोचला नाही.

ही बातमी २-३ दिवसांनी एका वर्तमानपत्रात मी वाचली. तेव्हा मी ‘मानवी हक्क अभियान’ चालवित होतो. महाराष्ट्रभर फिरून मानवी हक्कांच्या रक्षणासाठी ‘मानवी हक्क अभियान’चे कार्यकर्ते रान उठवत होते. मी अंबादासच्या गावी गेलो. गावात कुणी अंबादासविषयी बोलतही नव्हतं, इतकी सवर्णांची दहशत होती. पुढं आम्ही अंबादासला न्याय मिळवून देण्यात यशस्वी ठरलो. पण कधी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो की, मी चोखोबांच्या पायरीशी अस्वस्थ व्हायचो. मला तिथं अंबादास सावणे आठवायचा.

माझा मंदिराशी, देवाशी फारसा संबंध आला नाही. सुरुवातीच्या काळात वडिलांसोबत वंशपरंपरेनं आलेली भिक्षुकी मी काही वर्ष पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून केली. राष्ट्र सेवा दलाच्या शाखेतील संस्कारांवर पोसलेला माझा समाजवादी पिंड. त्यामुळे माझी तशी देव, मंदिरं यांच्याशी कधी सोयरीक नव्हती. मी नास्तिक नाही पण गेली ३०-३५ वर्ष आदिवासींना संघटित करणं, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणं यातून आदिवासी, कष्टकर्यांहमध्येच माझा ईश्वर आजवर शोधत आलो. त्यामुळं मंदिरात खास जाऊन दर्शन घेणं तर दुरापास्तच. कधी मूर्ती स्थापून मंदिर बांधावं हे माझ्या गावीही नव्हतं. माझ्या डोक्यात सर्वधर्मीय समाज मंदिराची कल्पना मात्र सतत असायची. ज्या दिवशी माझ्या वाडा येथील शेतात चार ते साडेचार फूटी शाळीग्राम पाषाणातली विठ्ठलाची पुरातन देखणी मूर्ती सापडली, तेव्हापासून मंदिराची कल्पना माझ्या मनात रूजू लागली आणि या आषाढीला तब्बल दोन वर्षांनी ही कल्पना पूर्णत्वास येतेय. हे मंदिर बांधताना चोखोबाला विठ्ठलाच्यासोबत गाभार्यासत स्थान देण्याचं मी ठरवलं.

यामागं कोणतीही सामाजिक क्रांती करायचं मनात नव्हतं. अंबादास सावणेच्या मृत्यूची आणि चोखोबाच्या पायरीशी युगानुयुगे तिष्ठत असलेल्या विठ्ठलभक्तीविषयीची वेदना समोर होती. कुठंतरी तो माझ्यातल्या आंतरीक वेदनेचा ‘कॅथार्सिस’ होता. जन्मानं ब्राम्हण, वंशपरंपरागत व्यवसायानं भिक्षुकी करणार्या. पण समाजवादी विचारसरणीच्या माझ्या वडिलांनी डहाणू तालुक्यातील वरोर या माझ्या जन्मगावी मंदिर प्रवेशासाठी केलेल्या कडव्या संघर्षाचा संस्कार मला कुठंतरी खुणावत होता. चोखोबाला गाभार्याचत स्थान देऊन फार मोठी सामाजिक क्रांती नाही तरी आदिवासी धर्माच्या कोणत्याही मध्यस्थांना न घाबरता निर्भयतेनं विठ्ठलापाशी जाऊन बसेल. चोखोबोशी साधर्म्य साधणारे माझे आदिवासी आणि कुठलाही अंबादास सावणे आता पायरीवरून दर्शन घेणार नाही. चोखोबाला गाभार्या त विठ्ठलासोबत प्रतिष्ठापित करून दलितांवरचे अन्याय थांबतील, इतका भाबडेपणा माझ्यात राहिलेला नाही. या निमित्तानं माझ्यावर निस्सीम प्रेम करणार्या माझ्या आदिवासींना हक्कांसाठीच्या संघर्षाची ताकद मिळावी हाच या मंदिरामागचा हेतू आहे.

दरवर्षी १५ ऑगस्टला गणेशपुरीला श्रमजीवी संघटनेच्या मेळाव्या वेळी ठाणे जिल्ह्यातील ६०-७० हजार आदिवासी एकत्र जमतात. ती एक प्रकारची संघटनेची पायी वारीच असते. संघटनेचे झेंडे खांद्यावर धरीत हे आदिवासी खेड्या-पाड्यातून दरवर्षी येतात. मैलोनमैल पायपीट करून येणारा, मला हात मिळवण्यासाठी आसुसलेला माझा आदिवासी मी गेली पस्तीस वर्ष पाहतोय. तेव्हा वाटतं मी इतका मोठा नाही. पण त्यांच्या माझ्यावरल्या प्रेमाचं, विश्वासाचं ऋण माझ्यावर आहे. विठ्ठलाबरोबरचा हा चोखोबा माझ्यावर निस्सीम प्रेम करणार्या. माझ्या आदिवासींसोबत निर्भयपणा आणि आत्मविश्वायसाची प्रेरणा देत राहील.

विशेषत: चोखोबाला आणि तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव या संतांना स्थान दिल्यानं माझ्यावर काही जणांनी टीकाही केली, यापुढंही होईल. पण समाज निर्भय आणि समताधिष्ठित बनण्यासाठी असे प्रयोग व्हायलाच हवेत. कारण विठ्ठल युगे अठ्ठावीस समाजपरिवर्तनाची प्रेरणा देत उभा आहे. विठ्ठलाची प्राणप्रतिष्ठाही ९ जुलै २०१४ रोजी अनुसूचित जातीच्या तसंच ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मीय असलेल्या माझ्या कार्यकर्त्यांकडून होतेयं. माझं हे पाऊल निश्चितच सामाजिक एकात्मतेचा संदेश देणार्या आणि मागासवर्गीय ठरलेल्या समाजघटकाला सन्मान देणार्या काळ्या पांडुरंगाला नक्कीच प्रिय असेल.

0 Shares
एक गाव एक हातभट्टी एक ग्लोबल संत