समाजाला घडवणारे संत

बाबुराव उपाध्ये

संत गोरा कुंभार फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरातल्या कुंभार समाजाचं दैवत आहे. त्यांच्या बरोबरीनं गुजरातचे राका कुंभार आणि राजस्थानमधील कुबा कुंभार या संतांची नावं आदरानं घेतली जातात. महाराष्ट्रातही त्यांच्या भक्तीचा आदर्श महत्त्वाचा मानला जातो.

कुंभार समाजामध्ये संत गोरा कुंभार, संत राका कुंभार आणि संत कुबा कुंभार यांचं विशेष महत्त्व आहे. त्यांची चरित्रंही स्फूर्तीदायक आहेत. त्यात आघाडीवर महाराष्ट्रातील कुंभार समाजाचं आराध्य दैवत म्हणजे संतशिरोमणी गोरोबा काका यांचं चरित्र आहे. त्यांचं भक्ती मार्गातलं, वारकरी संप्रदायातलं आध्यात्मिक, वाङमयीन कार्य मौलिक आहे.

संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात आध्यात्मिक लोकशाहीची स्थापना केली. त्यातून अठरापगड जातींना भक्तीचा अधिकार मिळाला. त्यामध्ये गोरा कुंभार यांना महत्त्वाचं स्थान होतं. त्यांची महती सर्वांनाच माहीत असल्यामुळं ते संत परीक्षक ठरले. ‘अनुभवाचं थापटणं’ त्यांच्या हाती होतं. त्यांच्या अभंगात तत्त्वचिंतन आणि अद्वैत भक्तीचा उत्कट आविष्कार आहे. त्यांचं चरित्र भक्ती, वृत्ती आणि संस्कृतीची आदर्श वाटचाल आहे. जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणार्‍या गोरा कुंभारांचं चरित्र आणि

अभंग मध्ययुगीन मराठीचं अमरप्रेरक लेणं आहे.

संत राका कुंभारही गोरा कुंभारांचे समकालीन असावेत. कारण संत नामदेवांनी या दोघांविषयीही आपल्या अभंगांतून लिहिलंय. नामदेवांनी त्यांच्याविषयी लिहिलंय,

कुंभार तो रांका, कांता त्याची बंका ।
कन्या नाम रंका तिघे जन ।
पंढरी क्षेत्रांत राहता आनंदे ।
वाचे गोविंद आळविती ॥

राका आणि बंका यांची कन्या रंका हिचा उल्लेख काही ठिकाणी बंका, देऊबाई असा होतो. हे सर्व कुटुंब अभंगरचना करत, असा उल्लेख आहे. परंतु राकांचे अभंग उपलब्ध नाहीत. गुजरातकडून आलेलं हे कुटुंब पंढरपूर निवासी झालं. विठ्ठलभक्त बनलं. अशा राका कुंभारांचं चरित्र नामदेवांनी अभंगरूपात सांगितलंय.

कुंभारकाम करता करता राका आणि त्यांचं कुटुंब विठ्ठलभक्ती करत. त्यांच्या कुटुंबात एक मांजर होती. तिच्यावर राकांचा भारी जीव होता. एके दिवशी मांजर मडक्यात बाळंतीण झाली. ते मडकं आव्यात म्हणजे भट्टीत भाजण्यासाठी ठेवलं. आवा आगीच्या स्वाधीन झाला. त्यावेळी मांजर आव्याभोवती फिरत होती. राका यांनी देवाकडे नवस केला, ‘पांडुरंगा, या माझ्या मांजरीच्या पिल्लांचं रक्षण कर. असं केलंस तर मी संसार सोडून देईन आणि भक्तीमार्गात रमेन.’

आव्यातील मांजरीची पिल्लं सुखरूप आहेत, हे पाहून राका यांनी आपलं घरदार लोकांना देऊन टाकलं. सर्व कुटुंब रानावनात राहू लागलं. नामदेवांच्या सांगण्यावरून पांडुरंगानं राकांचं वैराग्य परीक्षेद्वारे सिद्ध केलं. रानात सोन्याचं कंकण सापडलं, तरी ते या कुटुंबानं घेतलं नाही. राकांची भक्ती नामदेवांनाही समजली. पांडुरंगानं राका आणि त्याच्या कुटुंबाला साक्षात दर्शन दिलं.

महपतीबुवा ताहराबादकर यांनी ‘संतलीलामृत’मध्ये संत कुबा कुंभार यांचं चरित्र लिहिलंय. त्यातून त्यांचं चरित्र, विचारांचं, भक्तीचं महात्म्य नजरेत भरतं. ते विष्णू भक्त होते. राजस्थानातील सितडे हे त्यांचं गाव. ते एक विरक्त, हरिनामात गुंग राहणारे संत होते. निष्काम बुद्धीचे, सदैव दुसर्‍याला उपयोगी पडणारे, कर्तव्यतत्पर, अन्नदान करणारे, विष्णू भक्तीची शुद्धता जपणारे, संसारात असूनही मोहमायेपासून स्वतःला दूर ठेवणारे अशा अनेक गुणवैशिष्ट्यांनी त्यांचं चरित्र गुंफलंय. संत महिपतींनी नामदेव, कबीर यांच्याशी कुबा कुंभारांची तुलना केलीय.

जैसा पंढरीस नामा प्रेमख भक्त ।
वाराणशीत कबीर विख्यात ।
तैसाचि कुबा वैष्णव विरक्त ।
सीतड्यात अवतरला ॥

या वर्णनातून कुबा कुंभारांचा मोठेपणा स्पष्ट होतो. सावकारानं विहीर खोदण्यास सांगितलं तेव्हा ते विहिरीतील ढिगार्‍याखाली गाडले गेले. लोकांना वाटलं कुबा कुंभार मृत झाले. पण एकदा तिथं आलेल्या साधूंना विहिरीच्या ढिगार्‍याखालून हरिनामाचं भजन ऐकू येऊ लागलं. स्वतः राजा तिथं आला. विहिरीतला मातीचा ढिगारा काढण्यात आला. तिथं विष्णू मूर्तीसमोर संत कुबा भजन म्हणत होते. लोकांना आश्चर्य वाटलं. पुढं कुबा यांनी अन्नछत्र उघडलं. विष्णूचं मंदिर बांधलं आणि विष्णूभक्तीचा प्रसार केला.

कुबा कुंभारांच्या जीवन चरित्रातील ही दंतकथा त्यांच्या उत्कट भक्तीचा प्रत्यय देते. पण त्यांच्या अन्नदानाच्या व्यापक सामाजिक कार्याला ती दृष्टीआड करते. कुबा यांनी अन्नछत्र चालवून सेवाभाव दाखवलाय. त्याचं वास्तव दुर्लक्षित राहतं.

संत गोरा कुंभार, संत राका कुंभार आणि संत कुबा कुंभार या तीन संतांचं चरित्र आणि कार्य लक्षात घेतलं तर अनेक वैशिष्ट्य जाणवतात. गोरा, राका आणि कुबा हे तिन्ही संत छोट्या गावांतून आले होते. त्यांच्या आयुष्यातील प्रसंगांमध्ये भक्ती उत्कटपणे व्यक्त झालीय. तिघांनाही देवाचा साक्षात्कार झालाय. तिघंही वेगवेगळ्या प्रांतातले असले तरी वारकरी संप्रदायाचा या तिन्ही भक्तांवर मोठा प्रभाव आहे. तिघांच्या जीवनातील

वैराग्य प्रकर्षानं नजरेत भरणारे आहे. संत नामदेवांनी राकांविषयी तर महिपतींनी कुबांविषयी मराठी भाषेत लिहिलंय.

या तीन संतांबरोबरच कुंभार समाजातील उत्तर भारतातील लोककवी असणारे डाका कुंभार, तेलुगू रामायण लिहिणार्‍या सोळाव्या शतकातील कवयित्री मोल्लांबा, कर्नाटकातले लिंगायत कवी संत सर्वज्ञ, कुंभावत संप्रदायाचे संस्थापक संत कुंभावत यांचंही कर्तृत्व उल्लेखनीय आहे. समाजाला आदर्श विचारांची, भक्तीची आणि जीवनमूल्यांची जाणीव निर्माण झाली, अशी अनेक व्यक्तिमत्त्वं कुंभार समाजात झालीत. देशाच्या विविध प्रांतांत या संतांनी केलेल्या कार्याचा, भक्तीचा प्रभाव आहे. इतरही काही संत कुंभार समाजाचे असल्याचा फक्त उल्लेख मिळतो. त्याचे पुरावे सापडत नाहीत. त्यामुळं त्यांचा अभ्यास होणं गरजेचं आहे. कुंभार समाजातील नवी पिढी आता कुठं संशोधनाकडं वळू लागलीय. त्यामुळं भविष्यात यावर अधिक प्रकाश पडू शकेल.

0 Shares
अद्वैताचा मार्गदर्शक सत्यशोधक पंडित