जनाबाई कोण होत्या?

सचिन परब

आम्हाला फक्त संत जनाबाईंचं नाव माहीत आहे. पण त्यापलीकडे काही माहीत नाही, असं नवी पिढी सर्रास सांगते. आधीची पिढी तसं फक्त बोलत नाही. त्यांची परिस्थितीही फारशी निराळी नाहीच. म्हणून ‘रिंगण’च्या या विशेषांकात जनाबाईंची थोरवी वाचण्याआधी असा त्यांच्या आयुष्याचा हा थोडक्यात परिचय.

जन म्हणजे लोक. सर्वसामान्य माणसं. जन या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप जनी. जनी म्हणजे सर्वसामान्य बाई. प्रत्येक बाईची प्रतिनिधी जनी. दुसरीकडे जनी म्हणजे ज्ञानी. जिला जाण आहे ती. ज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर पोचली ती जनी. सामान्य ते सर्वोच्च. जनीच्या नावातच जनीचा प्रवास.

सामान्य ते सर्वोच्च हा संत जनाबाईंचा प्रवास कुणीच लिहून ठेवलेला नाही. कुणीच नाही. जनाबाईंनी आपल्यासोबतच्या संतांविषयी भरभरून सांगितलंय. पण स्वतःबद्दल फारसं नाही. इतर कुणी त्यांच्याविषयी काही लिहिलं असेल तर आज आपल्यासाठी ते उपलब्ध नाही. काही पाऊलखुणा इथंतिथं सापडतात. पण त्यात आयुष्याची संगतवार कहाणी नाहीच. त्यामुळं या ‘ओंकाराच्या रेखे’चं चरित्र एका रेषेत नाही सापडत. सांगण्यासारखी गोष्ट नसेल तर माणसाची ओळख टिकत नाही. तरीही साडेसातशे वर्षांचा अवाढव्य कालखंड भेदून जनाबाई ‘त्रिभुवनाची सोयरीक’ करण्याचा जागतिक विचार घेऊन उभ्या आहेत.

कुणीही नसलेल्या अनाथ लेकरांना पांडुरंगाच्या भरवशावर पंढरपुरात सोडण्याची परंपरा आजही आहे. पुराव्यासाठी पंढरपुरात दगडी पुलाजवळचा सव्वाशे वर्षं जुना अनाथ बालकाश्रम आहे आणि रितेश देशमुखचा ‘लय भारी’पण. आज आहे म्हणजे साडेसातशे वर्षांपूर्वी ते असणारच. सातव्या वर्षी जनाबाईंना असंच चंद्रभागेच्या तीरावर सोडलं होतं. सातव्या वर्षी हे थोडं ठामपणे म्हणायचं कारण तसा उल्लेख जनाबाईंनंतर जवळपास चारशे वर्षांनी झालेल्या शिर्डीजवळच्या ताहराबाद गावच्या महिपतीबुवा कांबळेंनी करून ठेवलाय. त्यांच्या ‘भक्तविजया’ची पारायणं आजही गावोगाव होतात. त्यातल्या एकविसाव्या अध्यायात जनाबाई येतात. त्यात चमत्कारांचं भाविकतेनं केलेलं रसाळ वर्णन आहे. चरित्र फारसं नाहीच. महिपतीबुवांनाही ते माहीत नसावं. त्यांना नाही म्हणजे आपल्या कुणालाही नाही.

जनाबाईंचं जन्मगाव गंगाखेड. मराठवाड्यातल्या आजच्या परभणी जिल्ह्यातलं जुन्या वस्तीच्या खुणा जपलेलं तालुक्याचं ठिकाण. महिपतीबुवा सांगतात तसं जनी आपल्या आईवडिलांसोबत कार्तिकी एकादशीला पंढरपुरात आली होती. देवाशिवाय जगात काहीच नाही, त्यामुळं आता मी पंढरीतच राहीन, असं सांगून तिनं घरी परतायला नकार दिला. अगदीच निरुपाय झाल्यामुळं आईवडील तिला सोडून गावी परतले. आणखी एक आख्यायिका आहे. गंगाखेडच्या दमा आणि करुंड या जोडप्याला मूल होत नव्हतं. त्यांनी पांडुरंगाकडे मुलाचं मागणं केलं. पांडुरंगानं दमा यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की मुलगी होईल. ही दैवी मुलगी संत नामदेवांच्या अवतारकार्यात सहभागी होईल. त्यामुळं तिला नामदेवांच्या वडिलांकडे म्हणजे दामाशेटींच्या घरी नेऊन द्यावं लागेल. लहानग्या जनीला आईवडिलांनी पंढरपुरात सोडण्याच्या अमानुषतेची ही चमत्कारी सारवासारव असावी. दामाशेटी हे देवमाणूस आणि आपल्यासारखेच विठ्ठलभक्त आहेत, त्यामुळं ते आपल्या मुलीचा चांगला सांभाळ करतील, असा निष्कर्ष दमा यांनी काढला असावा, असा अर्थ या दृष्टांताच्या गोष्टीतून फारतर शोधता येईल.

विठ्ठल हे आपल्या वडिलांचं दैवत असल्याचं जनाबाईंनीच सांगून ठेवलंय. पत्नीचा मृत्यू, आजारपण, दुष्काळ, गरिबी यापैकी किंवा अन्य कुठल्या कारणामुळे दमा यांना लेकीला सांभाळणं शक्य नव्हतं. त्यानुसार दमा यांनी ओळखीच्या दामाशेटींच्या घरी छोट्या जनीला सोडलं असेल. कदाचित श्यामसुंदर मिरजकर सांगतात तसं दमा आणि दामा या नावांमधल्या सारखेपणामुळे कुणीतरी चंद्रभागेच्या वाळवंटात फिरणार्‍या पोरक्या जनीला दामाशेटींच्या घरी आणून सोडलं असेल. छोट्या जनीला नामदेवांनी लहानाचं मोठं केलं, असं ‘भक्तविजय’ सांगतो. पण ते खरं नाही. कारण जनाबाईंनीच एका अभंगात नामदेवांच्या जन्माचं वर्णन केलं आहे. त्यानुसार नुकत्याच जन्मलेल्या नामाचं या जगात ओवाळून स्वागत करण्याइतपत तेव्हा जना मोठीही झालेली होती.

नामदेवांचा जन्म १२७० सालातला. त्याच्या आधी आठ-दहा वर्ष जनाबाईंचा जन्म पकडायला हरकत नाही. कापडं विकणार्‍या आणि कपडे शिवणार्‍या शिंपी दामाशेटींचा कुटुंबकबिला मोठा होतं. चौदा जणांच्या संसारात पंधरावी जनी असा त्याचा आकार जनाबाईंनीच कागदावर मांडून ठेवलाय. पण ते पुढचं. या कुटुंबात जनाबाईंना हीन जातीच्या म्हणून दाराबाहेर ठेवलं, असंही वर्णन त्यांनी केलंय. दुसरीकडे त्यांना नामदेवांच्या मुलाच्या बारशात नाव ठेवण्याचा आत्येपणाचा मानही दिला गेलेला आहे. त्याचं खरं खोटं आता करता येत नाही. पण या संसारासाठी आश्रित जनाबाईंना काबाडकष्ट करत आयुष्यभर राबावं लागलं, हे मात्र खरंच. धुणीभांडी, दळणकांडण, केरवारा अशी सगळी कामं त्यांनी इमानेइतबारे केली. मोलकरणीची होते तशी त्यांची अवहेलनाही झाली असावी. नामदेवांदेखत तरी जनाबाईंना मान मिळत असावासा वाटतं. पण नामदेव पायाला भिंगरी लावून फिरणारे. ते घरी कितीसे असणार? त्यामुळं पुढं कधीतरी त्या पंढरपुराशेजारच्या गोपाळपुरा नावाच्या कष्टकर्‍यांच्या वस्तीत राहायला गेल्या असाव्यात.

बालभक्त नामदेवांची विठ्ठलभक्ती सुरुवातीला घरात कौतुकाचा विषय होता. पण घरातला एकुलता एक मुलगा चंद्रभागेच्या तीरावर ‘कीर्तनाचे रंगी रंगत जगी ज्ञानदीप लावण्यासाठी’ लष्कराच्या भाकर्‍या भाजू लागला, तेव्हा या व्यापारी घरातली घडी विस्कटली असावी. दामाशेटींच्या घरचे सगळेच वैतागले होते. एकटी ‘वेडीपिशी जनी’ नामदेवांची पाठराखण करत ठामपणे उभी राहिली. ‘सुंभाचा करदोटा आणि रकट्याची लंगोटी’ लावून किशोरवयीन नामदेव वाळवंटात कीर्तनाला उभे राहत होते, त्याचं महत्त्व घरात एकट्या जनाबाईंना कळलं होतं. नैवेद्याच्या पलीकडची भक्ती कळण्याइतकं शहाणपण त्यांनी कमावलं होतं.

संत, भक्त, संघटक, प्रचारक, अभ्यासक, संवादक म्हणून नामदेवांचा झपाटा विलक्षण होता. कमी वयात त्यांनी स्वतःच स्वतःच्या केलेल्या जडणघडणीला देशाच्या इतिहासात तोड क्वचितच सापडते. असा स्वाध्याय करताना त्यांचं सहाध्यायी कुणी असेल तर फक्त जनाबाईच, दुसरं कुणी नाही. त्या नामदेवांच्या जीवनाच्या फक्त साक्षीदारच नाही तर सहप्रवासीदेखील होत्या. नामदेवांच्या जीवनध्येयाशी त्या एकरूप झाल्या होत्या. महिपतीबुवा सांगतात त्याप्रमाणं त्या काम करताना सतत नामस्मरण करायच्या आणि रात्री हरिकीर्तन ऐकून चिंतन, मनन करत राहायच्या. पहाटे काकडा गाताना नामदेवांच्या पाठीशी त्या उभ्या असत आणि रात्री उशिरा कीर्तनालादेखील. धर्म, अध्यात्म, तत्त्वज्ञानावर दोघांच्या तासनतास चर्चा चालत असतील. सद्गुरूनं मला लिहायला शिकवलं, असं जनाबाई म्हणतात. त्याची आवश्यकता यातूनच निर्माण झाली असेल. नामदेवांबरोबर जनाबाईंनीही सगळी दर्शनं पालथी घातली असतील. नामदेवांमुळंच त्यांना खरी भक्ती कळली आणि त्या भक्तीच्या जोरावर त्यांनी देव जिंकून घेतला. म्हणून त्यांनी स्वतःला अभिमानानं ‘नामयाची दासी’ म्हणवून घेतलं. वयानं धाकटे असले तरी नामदेवच त्यांचे गुरू झाले आणि मायबापही.

नामदेव आणि ज्ञानेश्‍वर यांची भेट ही महाराष्ट्राच्या, कदाचित भारताच्या इतिहासाला वळण लावणारी घटना होती. त्यातून ते दोघे स्वतःच आमूलाग्र बदलून गेले आणि त्यांच्यासोबत मराठी माणसाचं जगणंही. या भेटीत खर्‍या अर्थानं वारकरी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यामुळंच पंढरपुरात संतांचा मेळा जमला. त्यात जनाबाई सर्वात सीनियर मंडळींपैकी एक होत्या. सर्व संतांच्या एकत्र कीर्तनाचं संचलन त्या करत असत. कीर्तनात नामदेव आणि ज्ञानेश्‍वरांनी कधी काय करायचं, हे त्या ठरवत. कीर्तनात महिलांना टाळ धरण्याचा अधिकार नाकारणं खूप नंतरचं आहे. जनाबाई तर त्यांच्या मैत्रिणी मुक्ताबाई, सोयराबाई, निर्मळाबाई आणि नामदेवांच्या घरातल्या लेकीसुनांसोबत या क्रांतिलढ्यात अग्रभागी होत्या. ‘स्त्रीजन्म म्हणवूनी न व्हावे उदास’, हे जनाबाईंनी दिलेलं आश्‍वासन महाराष्ट्राच्या लेकींना शेकडो वर्षं पुरलं आहे. जगातील सर्वात जुन्या स्त्रीमुक्तीच्या हुंकारांपैकी तो एक होता.

जनाबाईंनी नामदेवांचं संघटनकौशल्य चांगलंच घोटवून शिकून घेतलं होतं. ज्ञानेश्‍वर तर त्यांचे सखा बनले होते. पुढच्या जन्मी ज्ञानदेवांनी आपल्या पोटी जन्म घ्यावा, असं माऊलींची माऊली बनायचं अद्भुत मागणंच त्यांनी मागितलं आहे. नामदेव आणि ज्ञानेश्‍वर यांच्यातलं अद्वैत त्यांना फारच नीट कळलं होतं. त्यामुळंच ‘पंढरीचा चोर धरण्या’चं कौशल्य त्यांना आत्मसात झालं होतं. त्यांनी नामदेवांच्या सगुण भक्तीमधला थोर अधिकार मिळवला होता, तितकीच ज्ञानेश्‍वरांच्या योगमार्गावरही हुकमत मिळवली होती. मूलाधार चक्र जागृत करण्याविषयीचं या मोलकरणीनं मांडलेलं गणित वाचलं तर आजचे जागतिक योगदिनवालेही तोंडात बोटं घालतील.

आमच्यामुळंच तू आहेस, असं त्यांनी पांडुरंगाला ठणकावून सांगितलं होतं. विठ्ठल हा मुलखावेगळा देव संतांच्या कर्तृत्वानं निर्माण झाला आहे, याचं त्यांना भान होतं. त्यामुळं त्यांनी सोबतच्या महत्त्वाच्या संतांच्या कामाचं थोडक्यात डॉक्युमेंटेशन मांडलं आहे. त्यात चोखोबांचं कुटुंब, गोरोबा, सावता माळी, परिसा भागवत, सेना न्हावी असे सगळे आहेत. त्यांनी पार आधीच्या गोरक्षनाथांचा पाळणा जोजवण्याची जाणीव ठेवली. संत कबिरांसारख्या उत्तरकालीनांनाही नंतर कुणीतरी जनाबाईंच्या अभंगात मिसळवून टाकलं. ज्ञानदेवादी भावंडांच्या जन्मतारखाही त्यांनी नोंदवून ठेवल्यात. संतांच्या लेखनिकांची यादीही त्या देतात. ‘विठू माझा लेकुरवाळा’ हे वर्णन जनाबाईच करू जाणोत. सर्व संतमेळा कायम एकत्र असायला हवा, हे त्यांना पक्कं माहीत आहे. त्यामुळं अनेक संतांचं एकत्र वर्णन करणारे अभंग त्यांच्या नावावरच प्रामुख्यानं आहेत. नामदेवांच्या अनुपस्थितीत संतांना एकत्र बांधणारा जिव्हाळ्याचा धागा बनायचं काम जनाबाईंनी केलं असावं.

औंढ्या नागनाथाच्या देवळात कीर्तन करताना नामदेवांचा केवळ शूद्र म्हणून पुरोहितांनी अपमान केला. त्यानंतर नामदेवांनी देऊळ फिरवायला सुरुवात केली. खरा देव आणि खरा धर्म याविषयी लोकांची डोकं फिरवणं त्यांच्या अजेंड्यावर आलं. वारकरी चळवळीतल्या सामाजिक भानाचा अग्रक्रम अधोरेखित झाला. खोट्या धर्माविरुद्ध खर्‍या धर्माचं भांडण सुरू झालं. शूद्र आणि स्त्री म्हणून खोट्या धर्मानं नाडलेल्या जनाबाईदेखील या बंडखोरीच्या आंदोलनात विजेसारख्या कडाडून उठल्या. खोट्या धर्माच्या सौदागरांचं त्यांनी केलेलं वर्णन आहे,

बांधोनिया हात गयावळ मारिती|
दंड ते करिती मोक्षालागी|
गेले ते पितर मोक्षालागी तुझे|
आतां देई माझे दक्षिणेंसी|…

दक्षिणेसाठी सर्वसामान्यांची स्थिती ‘भांबावले जन धांवे आटाआटी’ अशी करणार्‍यांविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. मोक्षाचं गाजर दाखवणार्‍यांना खुशाल ‘देवा देई गर्भवास’ असं आव्हान दिलं. कुत्र्यामांजरांचे जन्म मिळाले तरी चालतील, असं सांगून देवाच्या नावानं घाबरवणार्‍यांना उत्तर दिलं. ‘सुखे संसार करावा’, असा मंत्र देत संन्यासाचं अवडंबर माजवणार्‍यांना जागा दाखवून दिली.

वर्णव्यवस्थेनं शूद्रांवर सेवेचं काम लादलं होतं. त्याला हलकं मानलं जात होतं. ते पुसून काढण्यासाठी या कामांना जनाबाईंनी आपल्या भक्तीच्या जोरावर देवाशी जोडलं. जनाबाईंसाठी पांडुरंग शेणी थापू लागला. जातं चालवू लागला. धुणीभांडी करू लागला. त्यातून कष्टाच्या कामांना प्रतिष्ठा उभी राहू लागली. हलकी मानली जाणारी कामं करणारेही अध्यात्माची सर्वोच्च उंची गाठू शकतात हे सिद्ध झालं. म्हणूनच चोखोबांनी देव बाटवल्यावर ‘जनी हसून गाणी गाऊ’ लागली. देव हा आपला सखा आहे. त्याला घाबरण्याचं कारण नाही. त्याची भक्ती मनोभावे करता येते, ‘अचडे बचडे छकुडे’ म्हणत त्याचे लाड करता येतात आणि त्याला अंगणात उभं राहून शिव्याही देता येतात, असं जनाबाई आपल्या भक्तीच्या शक्तीनं लोकांमध्ये जिरवत होत्या. मी देव खाते, पिते आणि त्याच्यावर निजतेपण, त्यामुळं तुम्ही देवाच्या गोष्टी मला सांगू नका, असं त्या ‘श्‍वानसमची पंडितां’ना बजावत होत्या. देवाचं वलय संपवून मध्यस्थांची दुकानं बंद करत होत्या. मूर्ख कर्मकांडांची स्वार्थी बजबजपुरी नाकारून खर्‍या धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी एक शूद्र स्त्री सरसावली होती.

त्यामुळं पुरोहितशाही चवताळून उठली नसती तरच नवल. तिनं जनाबाईंना देवळात जाण्यापासून रोखण्याचा बहुधा अपयशी प्रयत्न केला. नंतर जनाबाईंवर देवाचा दागिना चोरल्याचा आरोप ठेवला. जनाबाईंच्याच शब्दात सांगायचं तर ‘जनीवरी आली चोरी| ब्राह्मण करिती मारामारी| धाविन्नले चाळीस गडी| जनीवरी पडली उडी|’ जनाबाईंना दोषी ठरवून त्यांना सुळावर चढवण्याची तयारी झाली. पण पांडुरंगाच्या कृपेनं त्या सुळांचं पाणी झालं, असा चमत्कार जनाबाईंनीच सांगून ठेवलाय. जनाबाईंच्या आर्त हाकेमुळं क्रूरकर्म्यांचं कठोर अंतःकरणही द्रवून गेलं, असा सुळाचं पाणी झाल्याचा अर्थ दा. वा. भिंगारकर यांनी काढला आहे. हा तर्क मान्य करण्याजोगा आहे, फक्त आर्त हाकेला जनाबाईंचा प्रामाणिकपणा, लोकप्रियता आणि चारित्र्याची जोड दिली की पुरे.

जनाबाईंचा विरोध करणारे ‘मनगटावर तेल घासत’ बसले आणि ‘डोईचा पदर खांद्यावर’ घेऊन त्या संघर्ष करत राहिल्या. दीर्घ आयुष्यात त्यांनी वारकरी परंपरेचं सत्त्व वाढवत नेलं. १३५० साली नामदेवांबरोबर त्यांच्या संपूर्ण कुटुंबानंही इहलोकाची यात्रा संपवली. त्यात जनाबाईदेखील होत्या. आज त्याला सातशे वर्ष उलटूनही जनाबाईंचा प्रभाव टिकून आहे. कोणत्याही एका जातीची ओळख नसताना हा प्रभाव टिकला आहे, हे विशेष. सतत इतकी शतकं एक साधी दासी म्हणून जगलेल्या बाईची महती महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये गायली जाते आहे. लोकगीतांतून, ओव्या, कहाण्यांमधून आजही बायका जनाबाईंशी आपली सुखदुःखं वाटत आहेत. आजही त्यांचे अभंग जिवंत आहेत. जनाबाईंची पदं गाणार्‍याच्या पायी खुद्द पांडुरंगच डोकं ठेवून वंदन करेल, असं त्यांनीच लिहून ठेवलंय. आपल्या शब्दांवर इतका विश्‍वास असलेल्या कवयित्रीची कविता टिकणार नाही तर आणखी कुणाची टिकणार?

आजही पंढरपुरात जाणार्‍या सर्व पालखी सोहळ्यांचा शेवट जनाबाईंच्या गोपाळपुर्‍यातच होतो. शेकडो कोस चालून आल्यानंतर वारीचं उद्यापन होतं ते विठ्ठलाच्या देवळात नाही तर कष्टकर्‍यांच्या, दलितांच्या वस्तीत. तिथं सर्व भेदाभेद भ्रम अमंगळ ठरवणारा काला केल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही. तिथं जावंच लागतं, भेदाभेद विसरावेच लागतात. कुणी कितीही सोवळ्याओवळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, तरी विठ्ठलाच्या भक्तांची खर्‍या धर्माची परंपरा जपण्यासाठी सोवळं फेकून देत काल्यात सहभागी व्हावंच लागतं. आध्यात्मिक लोकशाहीचा हा दंडक मोडता येणारा नाही. कारण त्यासाठी जनाबाई खडा पहारा देत उभ्या आहेत.

0 Shares
आदरणीय कॉम्रेड स्वरूपाची खाणी