जनी गाय गाणे

विधात्री कीर्तने

लिखित असूनही मौखिक गीतांप्रमाणं संतांच्या अभंगांचा मोठ्ठा प्रसार झाला. याचं एक प्रमुख कारण म्हणजे, सोपी रचना असलेले हे अभंग अतिशय सुस्वर चालीत गायले जायचे. स्वत: संत नामदेव आणि संत जनाबाई उत्कृष्ट गायक होते. त्यामुळं त्यांचे अभंग सर्वोतोमुखी झाले. त्यांचीच अभंगगायनाची परंपरा चालवणार्याो पाईकांची ही अनुभूती.

एकलीच गाणे गासी| दुजा शब्द उमटे पाशी|

कोण गे तुझ्याबरोबरी| गाणे गाय निरंतरी||, असं खुद्द संत नामदेवांनी जनाबाईंना विचारलं होतं. जनाबाई एकट्याच गाणं गात असल्या तरी त्यांच्यासोबत दुसरं कुणी तरी गात असल्याचा भास होई. अर्थात सुरात सूर मिसळून आलेलं हे गाणं ऐकणार्‍याला स्वर्गीय अनुभूती देई. कारण प्रत्यक्ष पांडुरंगच तिच्यासोबत गाणं गात असे. मिथक काहीही असो, गायनात जनाबाई एवढ्या तल्लीन होत की, त्या पांडुरंगाशी तादात्म्य पावत. भक्तीभावानं मनाच्या तळापासून गायलेलं गाणं परमेश्वर भेटीचीच अनुभूती देतं, असा अनुभव जनाबाईंचे अभंग गाताना अनेक गायकांना आलाय. त्यापैकी जनाबाईंच्या गावच्या अर्थात गंगाखेडच्या गोदावरीबाई मुंडेंचं गाणं वारकर्‍यांमध्ये मान्यता पावलंय. त्यांनी गायलेल्या जनाबाईंच्या भजनांच्या हजारो कॅसेट्स, सीडींची धडाक्यात विक्री झालीय. आज महाराष्ट्रातल्या अनेक गावांत धार्मिक कार्यक्रमांच्या प्रसंगी त्यांचे अभंग वाजत असतात.

त्यांचे वडील भजन-कीर्तन करायचे. त्यामुळं गोदावरीबाईंना भजनाचं बाळकडूच मिळालं. वयाच्या १२व्या वर्षापासूनच त्यांनी वडिलांसोबत भजन म्हणायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, ‘समोर जमलेल्या लोकांकडं पाहून भजन म्हणण्यापेक्षा मन एकाग्र करून आणि डोळे बंद करून म्हटलं तर जनाबाईच डोळ्यासमोर दिसू लागतात. डोळ्यांपुढं कधी कृष्णाची प्रतिमा येते तर कधी नामदेवांची. काशीवरून आलेल्या संत कबिरांना जनाबाईंच्या गोवर्‍यांमधून ‘विठ्ठल विठ्ठल’ ऐकू आलं. एवढ्या जनाबाई भजनगायनाशी एकरूप झाल्या होत्या. तशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न अभंग गाताना मी करते.’

गोदावरीबाईंनी जनाबाईंच्याच अभंगांवर आपली ‘ऐकूनी वेणूचा नाद’ ही पहिली कॅसेट काढली. जनाबाईंच्या जन्मभूमीचं ऋण व्यक्त करण्याची त्यामागं त्यांची भावना होती. त्यानंतर गोदावरीबाईंच्या आणखी २४ कॅसेटस् निघाल्या. रमेश महाराज शेणगावकर यांनी त्यांना गायनातील रागदारीची ओळख करून दिली. मात्र शास्त्रीय गायनात त्या पडल्या नाहीत. त्यांनी गायलेल्या अत्यंत साध्या सोप्या ओघावत्या चाली ऐकताना वारकरी तल्लीन होऊन जातात. विशेष म्हणजे दक्षिण भारतातातील केरळ, तमिळनाडू या राज्यांमध्ये गोदावरीबाईंचे चाहते आहेत. त्यांना मराठी भाषा कळत नाही. पण अभंग तोंडपाठ आहेत.

जनाबाईंच्याच परभणी जिल्ह्यातले दांपत्य प्रा. अशोक जोंधळे आणि त्यांच्या पत्नी आशा जोंधळे यांनी जनाबाईंच्या निवडक अभंगांवर नुकतीच ‘सुंदर माझे जाते गं’ नावाची एक ध्वनिफीत प्रकाशित केली. प्रा. जोंधळे यांनी जनाबाईंचे निवडक ९० ते १०० अभंग त्यासाठी निवडले. जोंधळे सांगतात, ‘जनाबाईंच्या अभंगांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की जनाबाईंच्या अभंगात विद्रोह भरला आहे. विठ्ठलभक्त जनाबाईंच्या अभंगांमधून स्त्रीविद्रोहाची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. स्त्रियांची बाजू मांडणार्‍या १५ ते २० अभंगांची अंतिम निवड करून त्यातील १२ अभंगांचे ‘सुंदर माझे जाते गं’ ही ध्वनिफीत तयार झाली.’

जनाबाईंनी तेराव्या शतकात रचलेले अभंग आजच्या परिस्थितीतही कसे लागू आहेत, हे पाहून आपण थक्क होतो. आज स्त्रीभृण हत्या आणि वाढते महिला अत्याचार पाहून निराश व्हावं, अशी परिस्थिती असताना ‘स्त्रीजन्म म्हणवूनी न व्हावे उदास’, हे जनाबाईंचे शब्द कितीतरी आधार देतात. जन्माला येणार्‍या मुलीचा तिरस्कार करू नका, असा संदेशही जनाबाई यातून देतात. पुरुषप्रधान संस्कृतीनं स्त्रीसाठी चूल आणि मुलाची सीमारेषा आखून दिली. तिनं उंबरठा ओलांडू नये, डोक्यावरचा पदर खाली येऊ देऊ नये अशी आजही अपेक्षा असताना ‘डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी’, असं त्या ठणकावतात आणि हल्लीच्या स्त्रीनंही मुक्त व्हावं, स्वतंत्र व्हावं असा संदेशही देतात. जनाबाईंचाच हा क्रांतिकारी संदेश आम्ही आमच्या ‘सुंदर माझे जाते गं’ या ध्वनिफीतीच्या माध्यमातून देतो, असं जोंधळे दाम्पत्यानं सांगितलं.

आळंदीची कार्तिकी गायकवाड टीव्हीवरच्या ‘सारेगमप’मधून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली. तिच्या वारकरी ठसक्यातल्या चाली लोकांनी अगदी डोक्यावर घेतल्या. विशेषत: तिनं गायलेल्या संत जनाबाईंच्या अभंगांनी तिला विशेष लोकप्रियता मिळवून दिली. कार्तिकीचं घर वारकरी सांप्रदायिक आहे. त्यामुळं अडीच-तीन वर्षांची असल्यापासून तिनं गाणं शिकायला सुरुवात केली. संतांच्या गौळणी आणि अभंग ती वडिलांसोबत जाहीर कार्यक्रमांत गाऊ लागली. तिचे बाबा त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवायचे ते कार्तिकीच आधीच शिकायची. ‘सारेगमप’च्या वेळी आपल्या वारकरी गायकीचा ठसा उमटवायचा निश्चय तिनं केला होता. त्यानुसार ‘नवलाची गोष्ट ऐक सखये बाई, कुंभारानी बाळ तुडविले पायी’ हा संत जनाबाईंचा अभंग कार्तिकीनं गायला आणि लोकांनी तिला डोक्यावर घेतलं. ‘सारेगमप’चं ते ‘लिटिल चॅम्प पर्व’ कार्तिकीनंच गाजवलं. पहिल्या पर्वात ‘इवलेसे रोप’ आणि दुसर्‍या पर्वात जनाबाईंचं ‘माझे अचडे बछुडे’ हा अभंग तिला विजेतेपदापर्यंत घेऊन गेला.

कार्तिकी सांगते, ‘गाण्यापूर्वी कोणत्याही अभंगाचा भावार्थ समजून घ्यावा, असं बाबा सांगतात. ते आधी मला अभंगाचा अर्थ समजून सांगतात. मग त्यांनीच लावलेली चाल गाताना अभंगातला भाव त्या चालीत कसा येईल, हे शिकवायचे. अशा पद्धतीनं अर्थ समजून घेऊन गायल्यानंच हे अभंग लोकांना आवडत असावेत.’ जनाबाईंचे अभंग अस्सल वारकरी चालींतून ‘सारेगमप’च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरात पोहोचवल्याचा मला खूप अभिमान आणि समाधान आहे, असं कार्तिकी सांगते.

0 Shares
जना जगण्याचा आधार अभंगांची गाणी