लोककहाणी जनाईची

इंद्रजित भालेराव

जन म्हणजे लोक. जनता. या जनताजनार्दनाची लेक म्हणजे जनाबाई. या अनाथ लेकीला जनतेनंच सांभाळलं. तब्बल साडेसातशे वर्षं. मोठ्या लाडाकोडानं. आजही महाराष्ट्रातील गावाखेड्यात निरक्षर बायका जनाबाईंचे अभंग, ओव्या गहिवरून म्हणतात. अशा ओव्यांमधून आयाबायांनी जपलेली जनाबाईची विलक्षण लोककहाणी शब्दबद्ध करणारा हा लेख.

जनी माझी हजारात

अभावात खाई गोता| बुडताना झाडी लाथा
लाथा लागल्या देवाला| काही संतांच्या नावाला
नाही कुणा जुमानत| जो तो होई अवनत
बडव्याला धक्का देई| तिचे नाव जनाबाई
दासी नाम्याची असून| टाकी पदाला पुसून
विठू जिचा सांगकाम्या| काय करील तो नाम्या
मनासारखे वागून| घेई हवे ते मागून
तिच्या मनाचा मालक| नव्हता कोणीही एक
देव खाते देव पिते| असे जिचे धैर्य होते
देवावर निजण्याची| होती हिंमत मनाची
चाले पदर पाडून| काही नव्हते आडून
उभी होती बाजारात| जनी माझी हजारात

(‘वेचलेल्या कविता’ या काव्यसंग्रहातली इंद्रजित भालेराव यांची कविता)

संतचरित्रकार महिपतीबोवा ताहराबादकर यांनी लिहिलेल्या नामदेव चरित्रात एक आख्यायिका सापडते. मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीच्या काठी गंगाखेड नावाचं गाव आहे. तेथे भगवत्भक्त दमा आणि त्याची पत्नी करूंड राहत असे. एकदा त्याला दृष्टांत झाला, ‘तुला एक कन्या होईल. ती तुझ्या कुळाचा उद्धार करेल. आधीच्या जन्मात तीच पद्मिनी, मंथरा आणि कुब्जा होती. तिचे नाव जनाबाई असे ठेव. दामाशेटी तिचा सांभाळ करील.’

संत जनाबाईंच्या चरित्राविषयी एवढीच माहिती उपलब्ध आहे. ‘माय मेली बाप मेला| आता सांभाळी विठ्ठला’ असं स्वतः जनीनंच आपल्या अभंगात लिहून ठेवलं आहे. आठशे वर्षांपूर्वी गंगाखेड सारख्या दुर्गम भागात जन्मलेली ही मुलगी पूर्वाश्रमीच्या महार जातीतली होती, असं राजा ढाले यांनी आपल्या संशोधनात सिद्ध केलं आहे. ती शूद्र होती हे तर सर्वांनीच मान्य केलेलं आहे.

आठशे वर्षांपूर्वी आपल्या समाजाची काय स्थिती होती हे आपण जाणतोच. स्त्रिया आणि शूद्र निबिड अंधारात होते. जनी तर स्त्रीही होती आणि शूद्रही होती. एवढ्या प्रतिकूल परिस्थिती जन्म घेऊनही जनाबाईनं जी थोरवी प्राप्त केली, हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.

संतांची दासी म्हणून आयुष्याची झालेली सुरुवात, शेवटी ती स्वतःच संतपदाला पोचते. ‘स्त्री जन्म म्हणवूनी न व्हावे उदास’ असं ती आपल्या भोवतीच्या स्त्रियांना सांगते. शिवाय स्त्रीला गुलामीत ठेवणारे सर्वच नियम ती मोडून टाकते, ‘डोक्यावरून पदर घेणार नाही, घरात बसून राहणार नाही, भर बाजारात जाईन, स्वतःचं पाल मांडून बसेन, माझ्या या गोष्टी तुम्हाला आवडणार नसतील तर तुम्ही मनगटावर तेल घालून खुशाल बोंबलत बसा. तुम्ही मला वेश्या आणि ‘घररिघी’ म्हणालात तरी चालेल, मी जाणूनबुजून विठ्ठलाचं घर रिघालेलीच आहे’, असं ती आपल्या अभंगातच ठणकावून सांगते.

ती अभंगातून विठ्ठलाला शिव्या देते. आपला हट्ट पुरा करून घेते. नामदेवाला अभंग लिहिण्याचे आदेश देते. ज्ञानदेवांना लेकरू होऊन आपल्या पोटी यायला सांगते. देव खाण्याची, देव पिण्याची आणि देवावर निजण्याची भाषा करते. जनाबाईचं हे विद्रोही रूप पाहिलं की अजूनही आपली स्त्रीवादी कविता जनाबाईंच्या पुढे गेलेली नाही असाच निष्कर्ष आपणाला काढावा लागतो.

जनाबाईचं हे रूप सामान्यांना अत्यंत भावणारं आहे. ग्रांथिक तत्त्वज्ञानापेक्षा अनुभवाचे रोकडे बोल ती बोलते म्हणून इतर संतकवयित्रींपेक्षा जनाबाई लोकांना अधिक भावते. तिचे अभंग जवळचे वाटतात. जनाबाईचे अनुभव लोकांना आपलेच वाटतात. म्हणून ते इतर पुरुष संतांपेक्षाही लोकप्रिय होतात. निरक्षर जनीचे अभंग आणि आयुष्य अक्षर होऊन जातं.

जनीनं आपलं आयुष्य नामदेवांच्या कुटुंबाला वाहून टाकलेलं आहे. नामदेवांच्या जन्मापूर्वीच दामाशेटींनी जनाबाईंना स्वीकारलेलं आहे. त्यामुळं जनीनं नामदेवांना कडेवर खेळवलेलं आहे. नामदेवांची जडणघडण तिनं पाहिलेली आहे. नामदेवांच्या चौदा जणांच्या कुटुंबातली जनाबाई ही पंधरावी सदस्य आहे. एका अभंगात तिनं या सर्वांच्या नावांची यादीच दिलेली आहे आणि या कुटुंबाची दासी म्हणून स्वतःचं पंधरावं नाव तिथं नोंदवलेलं आहे.

विठ्ठल-नामदेव-जनाबाई यांचं एकमेकांशी असलेलं नातं विलक्षण आहे. या नात्याविषयी स्वतः नामदेव, जनाबाईनं तर आपल्या अभंगात लिहून ठेवलंच आहे, शिवाय लोकप्रतिभेनं या नात्याभोवती जी काव्यगुंफण केलेली आहे ती विलक्षण आहे. विद्वानांनी तरी जनाबाईंच्या आयुष्याची नोंद केलेली नसली जरी या लोकप्रतिभेनं जनाईला मानाचा मुजरा केलेला आहे. जात्यावरच्या ओव्यांमध्ये शेकडो ओव्या अशा सापडतात की ज्यात जनाबाईंच्या आयुष्यातल्या प्रसंगांची अत्यंत कलात्मकतेने गुंफण केलेली आहे. त्यावर कल्पनेची पुटं चढवली असली तरी लक्षणेने मूळ भाव आपल्या सहज लक्षात येतो. विद्वान झाकत असलेल्या गोष्टी लोकप्रतिभा कशी जपते त्याचं एक उत्कट आणि उत्कृष्ट उदाहरण म्हणजे संत जनाबाईंची ही लोककहाणी होय.

मी शाळेत असताना गावातल्या काही स्त्रियांकडून जात्यावरच्या ओव्या गोळा केलेल्या होत्या. त्याचं पुढं पुस्तकही प्रकाशित झालं. त्यात जनाबाईवरच्या काही ओव्या मी घेतल्या होत्या. पुढं जनाबाई माझ्या अभ्यासाचा आणि आकर्षणाचा विषय झाली. तिच्या निवडक अभंगांचं संपादनही मी पंधरा वर्षांपूर्वी केलं होतं. पुस्तक प्रकाशित झालं तरी जनाबाई काही पिच्छा सोडत नव्हती. मराठीत प्रकाशित झालेली लोकसाहित्याची संकलनं चाळताना मधेच जनाबाई खुणवायची. मीही भेटेल त्या म्हातार्‍या बायांना जनाबाईंची गाणी म्हणायला लावत होतो आणि लिहून ठेवत होतो.

जे संत ज्या भागात होऊन गेले त्या भागात त्या त्या संतांवरच्या ओव्या अधिक प्रमाणात सापडतात. जनाबाई याला अपवाद निघाली. जनाबाईवरच्या ओव्या कोकणापासून दख्खनापर्यंत सर्वत्र मला आढळून आल्या. तीनचारशे ओव्या माझ्याजवळ जमा झाल्या. त्यातल्या ब-याच ओव्यांमधला आशय सारखा होता. अशा ओव्या वगळून १३२ निखळ ओव्या माझ्या हाताशी आल्या त्यातूनच मी जनाबाईंची ही लोककहाणी साकार केलेली आहे. असा प्रयत्न या आधी डॉ. ना. गो. नांदापूरकर यांनीही त्यांच्या ‘मराठीचे माहेर’ या ओवी संकलनात केलेला होता. त्यांच्या हाताशी उपलब्ध असलेल्या ओव्या त्यांनी त्यासाठी उपयोगात आणल्या होत्या. त्यानंतर पुष्कळ ओव्या मला उपलब्ध झाल्या होत्या.

ओव्या सांगताना स्त्रिया आठवेल तशा सांगत असतात. त्यातला क्रम नक्की नसतो. आपण आपल्या पद्धतीनं तो क्रम जुळवून घ्यायला हरकत नसावी. तसं स्वातंत्र्य मी घेतलं आहे आणि प्रकरणशः जनाबाईंची लोककहाणी सिद्ध केलेली आहे. ती आपल्यासमोर आहेच. ती किती विलक्षण आहे ते आपल्या लक्षात येईल.


रुकमिन मनिती विठ्ठल मव्हा कोठं गेला
दासी जनीनं गोविला शेनापाव्याला लाविला
रुकमिन मनिती विठ्ठल कोठं नाही
धोतराचा चोळ खोची जनीसंगं शेन लावी
रुकमिन मनिती उभी राहून गल्लीत
झळकला पितांबर देव जनीच्या खोलीत
रुकमिन हाका मारी कमानी दरोज्यात
पिरतिचा पांडूरंग देव जनीच्या कब्जात
रुकमिनिनं पती आडविला आडभिती
खरं सांग देवा जना तुही कोन व्हती
रुकमिनिनं पती आडविला आंगनात
खरं सांग देवा जनीचं काय नातं
विठ्ठलाच्या पाया रुकमिन लाविती लोनी
खरं सांग देवा जनी वाटते मेहुनी


राऊळापासून गोपाळपुर्‍याला सुरुंगयेरझारा घाली जनीसाठी पांडूरंग
जनी जाती गोपाळपुर्‍या ऊन लागतं ठाई ठाई
देवा माझ्या विठ्ठलानं लाविली आंबेराई
गोपाळपुर्‍या जाया जनीला झालं ऊन
देवा माझ्या विठ्ठलानं लाविलं तुळशीबन
गोपाळपुर्‍या जाया जनीला झाली रात
तुळसीच्या पानावरी देव लावी चंद्रज्योत
गोपाळपुर्‍यात जनाबाईची झोपडी
देव ईसरला तिथं नवालाखाची पासोडी
गोपाळपुर्‍यात जनाबाईची वाकळ
सख्या मह्या विठ्ठलाला झोप लागली शितळ
गोपाळपुर्‍यात जनाबाई सुगरन
लाटिती पापड चंद्रा सूर्याची घडन
गोपाळपुर्‍यात जनाबाई सुगरन
देवाच्या परसादाला साखरचं ईरजन
पंढरपुराला येढा घातीला कशापाई
हारीच्या नामासाठी येडी झाली जनाबाई
आसा विठ्ठल पुसितो जनाबाई कोठं गेली
सभामंडपाच्या खाली कीर्तनाला उभी केली
हातात टाळईना जनी चालली रावळा
रथ देवाचा पिवळा हासे विठ्ठल सावळा


गोपाळपुर्‍याला हाय जनाईचा वाडा
जनाईच्या संसाराला देव झाला येडा
गोपाळपुर्‍यात जनाबाईची झोपडी
हाती धोतराचा विळा देव निघाले तातडी
गोपाळपुर्‍यात जनी नामयाची दासी
कामधंदा करताना सदा हारी तिच्यापाशी
गोपाळपुर्‍यात जनी हाती टाळ ईना
पंढरीचा राया पाठीमागं उभा कान्हा
गोपाळपुर्‍यात जनाबाई कुनबीन
विठ्ठलाच्या संगतिनं आलं तिला भाग्यपन
गोपाळपुर्‍यात संगतिला नाही कोनी
संगतिला नाही कोनी पुढं विठ्ठल मागं जनी
पंढरपुरात बाई चौदा येशी चौदा मोर्‍या
रुकमिन न्हाली पानी गेलं गोपाळपुर्‍या


पंढरपुरात कशाचा गलबला
जनाबाईच्या चोळीसाठी नामदेव चाटी झाला
विठ्ठल घेतो चोळी रुकमिन गेली पाह्या
सोन्याचे बाजुबंद दोन्ही जरतारी बाह्या
विठ्ठल घेतो चोळी रुकमिन गेली पाह्या
पाठपंखे जडीताचे दोन्ही सोनियाच्या बाह्या
पंढरीरायाची जनाबाई ती बहीन
दिवाळीच्या सणासाठी देली आळंदी लिहून
पंढरपुरात चोळी घेती माझी आई
सोनीयाचा सुईदोरा टीप घाली जनाबाई
रुसली रुकमिन जेवंना दूधपोळी
सावळा पांडूरंग जनीची शिवे चोळी


पंढरपुरात जनीला नाही कोनी
पांडूरंग घाली येनी हाती लवंगाची फनी
पंढरपुरात जनीला नाही कोनी
पांडूरंग घाली येनी हाती घुंगुराची फनी
पंढरपुरात जनीला नाही कोनी
पांडूरंग घाली येनी हाती त्याच्या नाडाफनी
पंढरपुरात जनाला नाही कोनी
पांडूरंग घाली येनी हाती त्याच्या तेलफनी
देव इठ्ठल मनितो जनीला नाही कोनी
सावळे रुकमिनी सोड बुचुडा घाल वेनी


विठ्ठल मनितो जनी माझी परदेशी
चंद्रभागच्या काठी हाती धोंडा पाठ घाशी
विठ्ठल मनितो जनी माझी वनवासी
हाती सोन्याची वजरी मागं बसून पाठ घासी
विठ्ठल मनितो जनीला नाही कोनी
जने उकल तू येनी रुकमिने घाल पानी
विठ्ठल मनितो जनीला नाही कोनी
तिच्या आंघोळीला देव हांडे इसानितो दोन्ही
जनी बसली नाह्याला फनी हत्तीच्या दाताची
उजवन करी देव जनाबाईच्या केसाची
जनी बसली नाह्याला पाणी जळतं पोळतं
देवा आंतरी कळतं भरली घागर भिवरेत
जनी बसली नाह्याला पानी नाही इसानाला
विठ्ठलानं तिच्या सटी झरे फोडले माळाला
गोपाळपर्‍याची वाट वल्ली कशीयानं झाली
विठ्ठलाची जनी न्हाली केस वाळवीत गेली


देव बसले जेवाया पोळी ठुती मागं मागं
बोलली रुकमिन जनापासी जीव लागं
देव बसले जेवाया पोळी ठेविती ताटा आडं
बोलली रुकमिन देवा जनीचं किती येडं
देव बसले जेवाया पात्रं ठेविलं मांडूनी
जाय जाय नामदेवा आन जनाला धुंडूनी
देव बसले जेवाया पोळी ठेवली काढून
बोलली रुकमिन देते जनीला धाडून


साळीच्या भाताची मठी आवड देवाला
बारस सोडाया जातो जनीच्या गावाला
विठ्ठल पाहुना जनाबाईला तातडी
साळीचे तांदूळ उभ्या उभ्यानं पाखडी
साळीच्या तांदळाचा वास येतो दूरवरी
जनाबाईच्या घरात देव करीतो न्याहारी
रुकमिन जेवू घाली निरशा दुधामधी केळं
देवाला आवडतं जनाईचं ताक शिळं
रुकमिन जेवू घाली फराळाला दूधफेन्या
देवाला आवडती जनाईच्या ताककन्या
रुकमिन जेवू घाली निरशा दुधामधी काला
देवाला आवडतो जनीचा भाजीपाला
रुकमिन जेवू घाली निरशा दुधामधी पेढा
देवाला आवडतो जनीचा शिळा वडा
विठ्ठलाचे पाय रुकमिन दाबी रागं रागं
खरं सांग देवा जनी तुही कोन लागं


विठ्ठलाचे पाय रुकमिन मर्जिती लोन्यानं
खरं सांगा देवा मही आन जना तुमची हो कोन
विठ्ठल मनितो रुकमिनी नको राग धरू
आपुल्या आसर्‍याला जनी सुखाचं पाखरू
रुकमिन मनिते देवा तुम्हा लाज थोडी
गादी फुलांची सोडून वाकळाची काय गोडी
रुकमिन मनिते देवा तुमचा येतो राग
तुमच्या धोतराला जनीच्या काजळाचे डाग

१०
सोळा सहसरा नारी भोगून आला देव
उठ जने दिवा लाव आंघोळीला पाणी ठेव
रुकमिन मनिती देवा रुसून जाईन
नवलाखाची पंढरी तुम्हा धुंडाया लावीन
विठ्ठल मनितो मितं धुंडायाचा नाही
मनाला तनील आस्तुरी केली नाही
रुसली रुकमिन गेली पदम तळ्याला
सावळा पांडूरंग हात घालितो गळ्याला
रुसली रुकमिन जावून बसं वाळवंटी
देवा विठ्ठलानं धरलं तिला मनगटी
रुसली रुकमिन कशी न्हाईना धुइना
पंढरीचा सारंगधर कसा आजून येईना
रुसली रुकमिन तिचं रुसनं वंगाळ
देवा ईठ्ठलाला गार पाण्याची आंघोळ

११
जनी करी झाडलोट पांडूरंग केर भरी
पाटी घेवूनिया शिरी नेवून टाकी दूरवरी
जनी भरी पानी जनाला काम भारी
सावळा पांडूरंग देतो आडव्या घागरी
विठ्ठलाचा शेला काशियानं वला झाला
देव भावाचा भुकेला जनीसंगं पाण्या गेला
जनाबाई धूणं धुती विठ्ठल गोळा करी
रुकमिन बोलती आल्या पावसाच्या सरी
रुकमिन मनीती आवघी पंढरी धुंडिली
जनीच्या मंदिरी भोई फुगडी मांडली
साधू पुसतो साधूला ईठ्ठलाचा कोनता वाडा
मानीक चौकामधी जनाबाई टाकी सडा
बाई इथून दिसती पंढरीची लाल माती
जनाबाई सारविती राऊळाच्या आडभिती

१२
भरली चंद्रभागा पानियाचा पडं येढा
जनी दिसना कोठंशी देव झाला पिसा येडा
जनाबाई धूनं धुती विठ्ठल दरडीवर उभा
दोघाच्या पिरतिला दंग झाली चंद्रभागा
विठ्ठल मनितो जना माझी का सुकली
पदम तळ्यावरी धूनं धुतसे एकली
विठ्ठल मनितो नाही जना करमत
कर धुन्याचं निमित्त तुला दाखवितो गोत
विठ्ठल मनितो चल जना माडीवरी
नाही रुकमिन घरी दोघं बोलू घडीभरी
रुकमिनीच्या चोळीवरी हैत अभंगाच्या धारा
सावळ्या विठ्ठलानं वरी काढीला गोपाळपुरा

१३
विठ्ठल मनितो नको करू राग राग
बिना आई ना बापाची जनी आली माह्या मांग
विठ्ठल मनितो नाही रुकमिनिला ग्यान
आपुल्या दारावून जनी गेली आबोल्यानं
विठ्ठल मनितो का गं रुकमिन बोलंना
गोपाळपुरी जाताना रथ जागंचा हालना
रुकमिन रागात देव बोलले हासून
गोपाळपु-या जाया चाल रथात बसून
भरली चंद्रभागा पानी चालतं वाहून
जनीला भेटाया देव जाती रुकमिन घेवून

१४
विठ्ठल मनितो चल जने गवताला
चंद्रभागेच्या वताला लई पवना मातला
सोन्याची मोरकी नामदेवाच्या गाईला
घुंगराचा साज जनाबाईच्या रईला
सोन्याचं घुंगरी नामदेवाच्या गाईला
तीनशे साठ मोती जनाबाईच्या रईला
रुकमिनीनं पती आडविले आडभिती
खरं सांगा देवा जना तुमची कोन होती

१५
एकलिचं जातं दोघावाणी कसं वाजतं
परतिचा पांडूरंग जनीला दळू लागतं
विठ्ठल विठ्ठल मोठा भावारती गडी
जनीला दळू लागं जातं फेराखाली वढी
जनीला दळू लागं पांडूरंग जातं झाडी
एका पाया घाली आढी दुस-याला घाली मुडी
विठ्ठल मनितो जनी करावं दळण
साधूसंत आले दारी त्यांच्या पायाचं वळण
पहाटच्या पा-यामधी खुटा उपटला जात्याचा
खांद्यावर वाकस हरी आला पंढरीचा
विठ्ठल मनितो जना माझी सासरवासी
जना माझी सासरवासी उसं दिलं जात्यापासी
पहाटचं दळून राती निसून ठेविलं
विठ्ठल मनितो उठ जने उजाडलं
विठ्ठल मनितो जनी दळायला उठ
काकड आरतीला भक्त पाहातील वाट
पहाटच्या दळनाला रुकमिन देती कान
परतिचा पांडूरंग जनीसंगं गातो गानं
जातियाच्या तळी चूड भरली गव्हाची
ऊठ रुकमिनी जनी दळती कव्हाची
दळता कांडीता हालती मव्हन माळ
दळू लागतो जनीला कसा यशोदेचा बाळ
दळीता कांडीता देवा हाती आले फोड
जनाबाई बोलं केली वैकुंठाची जोड
जनीच्या दळानाचा विठ्ठलाला आला शिन
जनी मनी देवा तुह्या पाठंची बहीन

१६
भरली चंद्रभागा धोंडे बुडाले लहानथोर
देवाचा पितांबर जनी धुती पायावर
चंद्रभागेच्या काठाला वाळूचं केलं आळं
देवा विठ्ठलाचं जनी धुविते सोवळं
जनी धुनं धुती देवा विठ्ठलाची कळी
आबीर बुक्यानं चंद्रभागा झाली काळी
जनी धुनं धुती रुकमिनीची साडी
आबीर बुक्क्याचा वास गेला झाडोझाडी
जनी धुनं धुती नामदेवाचं मुंडासं
भीमा चालली वाहत तिला आबीराचा वास
जनी धुनं धुती पाणी दिसतं पिवळं
देवा विठ्ठलाचं जनी धुविती सोवळं
रुकमिनीची चोळी जनाबाईच्या धुन्यात
आसे गळालेत मोती चंद्रभागेच्या पाण्यात
जनी धुनं धुती पांडूरंग पिळे करी
चाल जने लवकरी सासुरवास व्हईल घरी
जनी धुनं धुती पांडूरंग पिळे करी
आरतिची येळ झाली चल जने लवकरी
जनी धुनं धुती पांडूरंग गोळा करी
चल जने लवकरी नामदेव हाका मारी
जनी धुनं धुती देवा विठ्ठलाचा झगा
याहिया दर्शनाला डळमळे चंद्रभागा
जनी धुनं धुती विठ्ठल पुढं बसं
दोघाईच्या पिरतिचं चंद्रभागेला आलं हासं

१७
विठ्ठल मनितो जनी माझी ती धाकटी
गोपाळपुर्‍यात शेन येचिती एकटी
गोपाळपुर्‍यावरी जनी येचितिया शेन
चित पाही पांडूरंग उचलू लागतो कोन
गोपाळपुर्‍यावरी जनी येचिती गव-या
हात लाव जरा माझ्या विठ्ठला सोय-या
गोपाळपुर्‍यावरी जनी येचितिया शेन
पितांबराचे देवानं कोचे खवलेत दोन
गोपाळपुर्‍यात कशाच्या कलागती
जनाबाईच्या गवर्‍या विठ्ठल विठ्ठल मनिती

१८
जनी मनी आता उजाडलं उठा हरी
घाई घाई गेला देव वाकळ घेवून खांद्यावरी
काकड आरतीला बडव्याची पडे उडी
सावळा पांडूरंग विसरला शालजोडी
राती पडले सपन बडवे सांगती सकळा
पांडूरंग पांघरला जनाबाईच्या वाकळा
सकाळी उठून बडवे हासती मनाला
जनाबाईची वाकळ देवा शोभती तुम्हाला
सकाळी उठून बडवे सांगती नक्कल
राती पांघरले देव जनाबाईची वाकळ
काकड आरतीला आंगावर शाल नाही
देव बाटविला तुम्ही खरं सांगा जनाबाई

१९
देवाच्या मंदिरात कशाची हाना मारी
देवाच्या पदकाची जनीवर आली चोरी
देवाच्या मंदिरात कशाचा गलबला
बडवे मारिती जनीला देव कैसा भुलविला
देवाच्या मंदिरात पदक जनीच्या गळ्यात
कुभांड जनीवरी देव भक्ताच्या गळ्यात
बडव्याला आला राग कोनी धरी कोनी मारी
एका मुखानं बोलती जनी द्यावी सुळावरी
चंद्रभागाच्या काठाला सूळ रोविला आनीचा
देव माझा पांडूरंग आहे कैवारी जनीचा
रुकमिन धुनं धई विठ्ठल करी पिळं
चंद्रभागे खाली सूळ जनाईला आलं मूळ
विठ्ठल विठ्ठल जना मारतिया हाका
पांडूरंग मायबाप कोठं गुंतलाय सखा
पदक चोरल्याचा आळ आला जनावरी
देवाशपथ घालीते दोन्ही हात इन्यावरी
जनाबाई पाहे सूळ सुळाचं झालं पानी
जनाबाईच्या पाठीशी उभा होता चक्रपाणी
सुळाचं झालं पानी बडवे घाबरले फार
जनाबाईला घालिती साष्टांग नमस्कार.

0 Shares
लव्ह ट्रँगल मनगटावर तेल घाला