सेवा करीन मनोभावे

नारायणबुवा सरोदे

देवापेक्षा त्याच्या संतांचा महिमा गावा. देवाला त्याचा फार आनंद होतो, असं वारकरी मानतात. त्याच श्रद्धेनुसार विठुरायाच्या लाडक्या संत जनाबाईंचं मंदिर ज्ञानदेवांच्या गावात अर्थात आळंदीत उभारण्यात आलं आहे. ते उभारणारे भाविक हभप नारायणबुवा सरोदे यांच्याच शब्दांत महाराष्ट्रातील जनाबाईंच्या या तिसर्याा मंदिराची कहाणी.

माझ्या माहितीप्रमाणे संत जनाबाईंची आपल्याकडे तीनच मंदिरं आहेत. पहिलं आहे, त्यांच्या जन्मगावी अर्थात मराठवाड्यातील गंगाखेड येथे. दुसरं, त्यांची कर्मभूमी पंढरपूरमध्ये. आणि तिसरे आहे, संत ज्ञानेश्‍वरांच्या आळंदीत. जे मी उभारले आहे. ‘मरोनिया जावे| बा माझ्या पोटी यावे’, अशी संत ज्ञानदेवांना आपल्या पोटी जन्म घेण्याची विनंती करणार्‍या संत जनाबाईंचं मंदिर आपण माऊलींच्याच आळंदीत उभारावं, अशी खूप दिवसांची इच्छा होती. शाळेतून शिपाई म्हणून रिटायर झाल्यानंतर १९९६-९७ला आळंदीत जागा घेतली आणि तिथं जनाबाईंचं मंदिर उभारण्यास सुरुवात केली. त्यासाठी पेन्शनचे पैसे खर्च केले. ते पुरे पडेनात म्हणून मग लोकांना विनंती केली आणि लोकसहभागातून जनाबाईंचं मंदिर उभं राहिलं. आज मंदिरात दर कार्तिकी वारीला गावोगावहून आलेले वारकरी माऊलीसोबत संत जनाबाईंचा गजर करतात, तेव्हा भरून पावतो. जनाबाईंची नित्यपूजा, नैवेद्य केल्याशिवाय आमचा दिवस सुरू होत नाही.

जनाबाईंचं मंदिर उभारण्यामागचं मोठं कारण असं की, संत जनाबाई आमच्या म्हणजे मातंग समाजाच्या आहेत. गंगाखेड या त्यांच्या जन्मगावी मंदिराशेजारी मातंग समाजाची मोठी वस्ती आहे. संशोधकांनीही त्या मातंग समाजाच्या आहेत, असा निर्वाळा दिला आहे. त्यामुळं जनाबाईंचे आणि समाजाचे ऋण फेडण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून मी आळंदीत जनाबाईंचं मंदिर उभारलं.

आमचं घर वारकरी. मी मूळचा नांदेड जिल्ह्यातील राहाटी गावचा. आम्ही पाच भाऊ. थोरले भाऊ विठ्ठल सरोदे आळंदी पंढरीची वारी नित्यनियमानं करायचे. ते आमच्या समाजाच्या अजामेळा दिंडी क्रमांक २६मध्ये हंडेवाले म्हणून सेवा बजावायचे. दिंडीप्रमुख हभप निवृत्तीबुवा गायकवाड यांच्यासोबत त्यांनी निष्ठेनं सुमारे ३० वर्ष वारी केली. त्यांच्या पत्नी इंदिराबाई सरोदे याही भाविक वारकरी होत्या. या भाऊ-भावजयीनं मला देवाची गोडी लावली. भावजयीनंच मला वारकरी शिक्षण संस्थेत मी दहा वर्षांचा असताना शिकायला पाठवलं. मी आळंदीत येऊन जोगमहाराजांच्या वारकरी शिक्षणसंस्थेत चार वर्ष कीर्तन, भजन, प्रवचन, वादन शिकलो. त्यानंतर गावोगावी मुलांना कीर्तन, प्रवचन, भजन, पखवाजवादन करण्यासाठी फिरत राहिलो.

भिवंडीला एका सप्ताहात पारमार्थिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष वैकुंठवासी हभप गंगाराम नारायण दुबे सर यांची भेट झाली. त्यांना माझं पखवाजवादन खूप आवडलं. त्यांच्या संस्थेची सात-आठ हायस्कूल आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे येथील संगमेश्‍वर विद्यालयात त्यांनी मला शिपायाची नोकरी मिळवून दिली. शिंगवे पारगावात मी तब्बल ३० वर्ष राहिलो. अर्थात नोकरी करत असताना अवतीभोवतीच्या किमान २५ गावांमध्ये जाऊन मी विद्यार्थ्यांना भजन, प्रवचन, कीर्तन शिकवत राहिलो.

२००६मध्ये रिटायर झालो. त्याआधी आळंदीत जागा घेतलेली होती. जनाबाईंच्या मंदिराचं डोक्यात घाटत होतंच. त्यासाठी पेन्शनचे पैसे कमी पडत होते. मग मी ज्या ज्या गावांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला जायचो तिथले गावकरी मदतीला धावले. त्यांनी मला पैसे गोळा करून दिले. लाखभर रुपयांमध्ये मंदिर उभं राहिलं. धार्मिक कार्यासाठी सढळ हातानं मदत करणारे ठाणे येथील नानजीभाई खिमजीभाई ठक्कर यांनी जनाबाईंची सुंदर मूर्ती दिली. आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी येथील हभप सोपानकाका वाळुंज यांनी विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती दिल्या आणि २००६-०७मध्ये या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना झाली. त्यानंतर आंबेगाव तालुक्यातीलच पोंदेवाडी गावचे हभप अर्जुनमहाराज दादाभाऊ वाळुंज आणि श्रीयुत शिणारे यांनी जनाबाईंच्या मंदिरात बसवण्यासाठी संत ज्ञानेश्‍वर माऊलींची मूर्ती दिली. तर लातूरमधील अहमदपूरच्या वंजारवाडीतील ओंकार मोरे यांनी संत तुकोबारायांची मूर्ती अर्पण केली.

आज परिसरातील भाविक आणि वारीसाठी आळंदीला येणारे वारकरी आवर्जून या संत जनाबाईंच्या मंदिरात येऊन नतमस्तक होतात. मुक्काम करतात. भजन, कीर्तन करतात. प्रसाद घेतात आणि मार्गस्थ होतात. ज्ञानेश्‍वर माऊलींच्या समाधीसोहळ्यानिमित्त दरवर्षी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. त्यासाठी शेकडो वारकरी येतात. मंदिरासमोरच्या सभामंडपात त्यांच्या मुक्कामाची सोय होते. कार्तिक वद्य एकादशीला भजन, कीर्तन होते. कीर्तनकार जनाबाईंचं चरित्र सांगतात. सर्व संतांचं भजन होतं. दर महिन्याच्या वद्य एकादशीला इथं वारकरी येतात, राहतात. आम्ही त्यांची सेवा करतो. त्यांच्या राहण्याची, फराळाची व्यवस्था करतो. परिसरातील ‘आवड असलेले लोक सवड’ काढून येतात.

जनाबाई आमच्या कुटुंबातील एक सदस्यच बनल्या आहेत. त्यांचं रोजचं स्नान, उटणं, गंधाक्षता, पूजाअर्चा, दिवाबत्ती माझी पत्नी लक्ष्मीबाई करते. माझी मुलगी महानंदा संजय गायकवाड जनाबाईंच्या माहेरी म्हणजे मराठवाड्यातील उस्मानाबादमध्ये दिली आहे. ती ग्रामसेवक आहे. तीही जनाबाईंच्या प्रेमात पडली आहे. तिनं तिच्या गावचे थोर संत गोरोबा काका यांची प्रतिमा मंदिरावर चितारून दिली आहे. तिनंच जनाबाईंसाठी सोन्याचं मणीमंगळसूत्र घडवून दिलं आहे. वारकर्‍यांच्या स्वयंपाकासाठी भांडी दिली आहेत. भजनासाठी डझनभर टाळ दिले आहेत. माझी पत्नी अनेक वर्ष पक्षाघातानं आजारी होती. त्या काळात मी तिची सेवा केली. मुलांना भाकर्‍या करून खाऊ घातल्या. आता मुलं मोठी झालीत. पत्नीच आता जनाबाईंची सेवा करत असते. त्यांच्या कृपाशीर्वादानं ती ठणठणीत झाली आहे. जनाबाईंची कृपा आमच्या घरादारावर आहे. तशीच सर्वांवर राहो. शेवटपर्यंत हातून जनाबाईंची सेवा घडत राहो, हीच संतचरणी प्रार्थना.

0 Shares
मज सांभाळी विठ्ठला पताकेखाली अंधार