ठायीठायी जनाई

शर्मिष्ठा भोसले

एक पुरोगामी विचारांची पंचविशीची तरुण मुलगी जनाबाईंच्या जन्मगावी जाते. मुक्काम गंगाखेड, जिल्हा परभणी. तिथं जनाबाईंचं बोट धरून चालताना विचारांचा नवा साक्षात्कार होत जातो. ती म्हणते ‘अवघ्या अभावातही आपल्या जगण्याला रसरशीत असोशीनं सामोरं जाणारी, स्त्रीत्वाची मिराशी कौतुकानं मिरवणारी जनाबाई आता अशी ठायीठायी दिसू लागते!’

सकाळच्या शताब्दी एक्सप्रेसनं औरंगाबादहून निघाले तेव्हा नुकतंच उजाडलं होतं. कोवळं, झिरमिळ ऊन आणि मखमली उजेड. या उजेडात मात्र नजर जाईल तिथवर नुसतं वैराण उजाडपण भरून राहिलेलं. सारा सवयीचा, ओळखीचा मुलूख. मागचे तीनेक दुष्काळी हंगाम एखाद्या सोशिक बाईगत मुकाट वागवत होरपळलेली, नुकतीच नांगरलेली कोळपलेली वावरं. येत्या बरसातीकडून आबादानीचा कौल मागत आसुसलेली अखंड तहानलेली माती. या आगजाळीत खुपसे पेटलेले लालभगवे गुलमोहर, एखाददुसरा कडुलिंब तेवढा गार हिरवी झिलई मिरवणारा, लांबरोक उनवाटा चालणार्‍याच्या चतकोर सावलीचा आधार बनून उभा. बाकी अवघा रस्ता मुक्या, निष्पर्ण बाभळींशी मनोगत बोलत संपणारा…

परभणीला उतरून गंगाखेडची एसटी धरेस्तोवर ऊन तापलेलं. एसटीतून रस्त्यावरचं चमचमणारं मृगजळ निरखत गाव जवळ केलं. तसं उतरल्यावर एका रिक्षावाल्याला विचारलं, ‘अभंग गाणार्‍या गोदावरीताई मुंडेंच्या घरी सोडताल का?’ तर त्यानं उत्तर देण्याऐवजी बाजूच्याला म्हणलं, ‘जावेद, इनको वो गोदावरीजीकन छोडके आ.’ जावेदच्या रिक्षात बसले तशी एका अनावर कुतूहलानं प्रश्‍नांची सरबत्तीच सुरू केली. ‘क्या तुम इसी गाव के रहनेवाले हो? तुमको पता है के ये तुम्हारा गाव जनाबाई का गाव कहलाता है? बोहोत इन्कलाबी कलम थी उनकी!’ तेवढ्यात शांत समजूतदार स्वरात जावेद विचारता झाला, ‘वही ना, जिन्होने लिखा के, डोईचा पदर आला खांद्यावर?’ मी एकदम गपच झाले. वयाची अवघी पाचच वर्ष या गोदेकाठच्या गावात राहिलेली नेणती जनाबाई कशी जातधरमाचे चिरेउंबरे ओलांडत, वरीसकाळाच्या वेशीपल्याड लहानथोर मनाकाळजात घर करून बसलीय. समवयीन समकालीन झालीय याचा तो पहिला साक्षात्कार झाला.

मग तिशीतला जावेद गाव, पंचक्रोशीतली त्यांची ख्याती या सगळ्याचं अपार कवतिक बोलत राहिला. गावातून जातानाही जनाबाईंचं नाव अनेक लहानमोठ्या दुकानांच्या पाट्यांवर दिसत राहिलं. या बोलाचालीत गोदावरीबाईंच्या घरासमोर आलो, तसा अभंगाचा खणखणीत, धारदार स्वर कानी पडला, ‘येगं येगं विठाबाई, माझे पंढरीचे आई…’ कुतूहलानं अंगण ओलांडून आत गेले तर संगमरवरी देव्हार्‍यातल्या साजर्‍या कृष्णमूर्तीपुढं तंबोरा छेडत मगन झालेल्या शुभ्रवस्त्रांकित गोदावरीताईच नजरेला पडल्या. सोबत अवघं घरच हाती टाळचिपळ्या घेऊन रंगलेलं. त्यातलीच एक होत ताल धरला. बाईंचा सूर देहमन ओलांडत कुठतरी आत खोल झिरपलेला. अर्ध्या तासानं हा सोहळा आटपला तसा तंबोर्‍यासकट आपला भरजरी स्वरवावराही सहज गवसणीत ठेवत बाई साध्यासोप्या, प्रसन्न हसल्या. अगदी सहज बोलत्या झाल्या, ‘आमचं मूळगाव गंगाखेडजवळचं बडवणी. इथं स्थायिक झाल्याला चौदा साल झाले. वडील बापूराव दगडूबा मुंडे वारकरी पंथाचे. त्याअर्थानं घरात गाता गळा होताच. वडिलांचा हात धरून गाणारी वाट धरली तेव्हा मी अवघ्या दहा वर्षांची होते. पुढं रमेशमहाराज सेनगावकरांसारखे गुरु मिळाले. माझ्या आवाजाची जातकुळी नेमकी ओळखत त्यांनी मला घडवलं. त्यांना साथसंगत करत मी शिकले. मंचावर कुण्या स्त्रीचा वावर, मग तो भक्तिमार्ग पुढे नेण्यासाठी का असं ना, त्याकाळी अनेकांच्या भुवया उंचावणारा होता. मोठाच अवघड काळ होता. इतर अनेक प्रस्थापित महाराजगणही मला त्यांची स्पर्धक म्हणून पाहायचे. वेगवेगळ्या मार्गांनी अटकाव करायचे. पण वडील आणि सेनगावकरबुवा दोघं पाठीशी ठामपणे उभे राहिले. महाराष्ट्रासकट मद्रास, केरळ, बंगळूरलाही मैफली केल्या.त्यातच ९६ साली माझी ‘धरिला पंढरीचा चोर’ ही कॅसेट आली. गावोगावच्या देवळात, कीर्तनासप्त्यात त्यातले अभंग वाजायचे. माझं नाव झालं. आता ही पालखी अशीच बहिणीच्या पोरींच्या, शारदा अन् राधिकाच्याही खांद्यावर द्यायचीय. त्याही ती पेलतील अशी खात्री आहे.’

बाजूलाच बसलेले रमेशमहाराजही बोलते होतात तेव्हा आपल्या शिष्येसाठीचा अभिमान त्यांच्या डोळ्यात वाचता येतो. ते सांगतात, ‘माझा जन्मच झाला पंढरपुरात. आमच्या तीन पिढ्यांनी हाती टाळचिपळ्या घेतलेल्या. पोटच्या पोरांनी हा वारसा नाकारला. मात्र गोदावरीची शिकायची तळमळ होती. मी तिच्याहाती हे धन सोपवलं. आजवर हिच्यासह जवळपास पाचशे शिष्य घडवले. गोदावरीकडही अनेक पोरी शिकत आहेत. आता उषाताई बीडकर, ज्ञानेश्वरी घुले, मीराताई मीरीकर अशा भजनगायिका आणि कीर्तनकारही समोर यायलेत. पण १९८९ साली मात्र माझी ही शिष्या आळंदीला माऊलीसमोर सप्ताह करणारी पहिली महिला ठरली. खुद्द गोपीनाथ मुंडे ही मैफल ऐकायला होते.’

आजवरच्या या सुरेल पायपिटीचं साफल्य विचारल्यावर भक्तीसंप्रदायाच्या सागरातली मी एक अनाम नदी असल्याची नम्र कबुली देत गोदावरीताई म्हणतात, ‘हा प्रवाह असाच अखंड वाहता रहावा यासाठीच माझा श्वास चालो, जीव राहो, हेच मागणं मागत असते. कालौघात न भंगणार्‍या म्हणूनच अभंग म्हणवतात या रचना. आज गंगाखेड तालुक्यातली ७५ टक्के गावं माळकरी आहेत. ही मोठीच मिळकत न्हाय का?’

या गुरुशिष्यांशी बोलून बाहेर पडले तशी जनाबाईंच्या मंदिरात पोचले. आत गेले तर हाती तंबोरा घेऊन तल्लीन झालेल्या एक बाई माझ्या नजरेला पडल्या. नऊवारी नेसलेल्या, तजेलदार केतकी वर्ण, नाजूक अटकर बांधा, कपाळी कुंकवासह काळ्या बुक्क्याचा टिळा आणि विसरलेलं देहभान. मी कुतूहलानं विचारलं. त्या म्हणाल्या ‘मी तशी विदर्भातली, पण जनाबाईंनी बोलावलं अन आले इथंच!’ कुतूहल अजूनच वाढलं. त्या ओघातच बोलत राहिल्या, ‘माझं गाव विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यातलं बोळगाव. आमच्या घराण्यात वारी आहे. मी अन् माझी चुलत बहीण दोघींनी सलग चाळीस वर्स वारी केली. मग एक डाव मन लईच उचंबळून आलं आन परतीची वाटच नको झाली. आता इथंच असते. मंदिरामागं राहाते. हे जनीचं आवतन आलं त्याला चार वर्स उलटली. बहिणीचा नवरा आलता तसा तिला वापस घेऊन गेला. मी मातर नकोच म्हणले. यांना म्हणले तुमचा संसार आजवर जीव लावून केले. लेकरं मोठी झाली. आता घातली शपथ सुटली म्हणा अन् मला जाऊ द्या. त्यावर हे काहीच म्हणले नाहीत. आणि तेव्हापासून हा वीणा हाती धरलाय. जनाबाईंनी सारवण-दळण करताना देव हुडकिला. तिचं नाव घेता घेताच माझ्यासारख्या साध्याभोळ्या बाईलाही मोठाच हुरूप आलाय विठ्ठल गवसंल म्हणून!’ नजरेत अपार भाबडा भक्तिभाव मावंना तसे बाईंचे डोळे काठोकाठ भरून आले. जाता जाता नाव विचारलं तर म्हणाल्या रेखा पानपटे.

मी पुढे निघाले तो गंगेचा घाट लागला. सोबत जावेद आणि त्याचा एक मित्र होता. म्हणाला, वरून वाहत येणार्‍या या गोदावरीला सगळे गंगाच म्हणतात. कुठलंही निर्मळ, पवित्र पाणी म्हणजे गंगेचंच या भाबड्या समजुतीतूनच हे आलं असावं. तापलेलं ऊन. मृगजळागत चकाकणारा, बर्‍यापैकी आटलेला प्रवाह. बरीच जलपर्णी अस्ताव्यस्त वाढलेली. दोघं म्हणाले गावातले लोकप्रतिनिधी अनेकदा सांगूनही नदीस्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात. आजूबाजूला अनेक घाटदार दगडी देवळं. त्यातल्या काही सौम्य तर काही उग्र चेहर्‍याच्या कोरीव मूर्ती. घाटाच्या आसपास सगळा काळा कातळ. तोल सांभाळत चालताना जावेदचा मित्र अचानक थांबला. खाली वाकून त्यानं दगडाखालून झुळझुळणारा एक झरा दाखवला. म्हणाला, ‘हा अखंड वाहता प्रवाह आहे. कुठून उगम पावतो नाही माहीत. पण आजरोक कधी आटला नाही न आटणार नाही. हे दिव्य पाणी आहे.’ बाजूला अनेक बायामाणसं स्नान करत होते. लांब दशक्रिया विधीचा घाट होता. त्या घाटालगतच एक खोपटं दिसलं. हे मसनजोग्याचं  घर. त्याच्या बिर्‍हाडाबरुबर तो हितं असतोय, मला दोघांनी माहिती पुरवली.

आधी नको नको म्हणत माझ्या आग्रहाखातर आम्ही त्यांच्या घरासमोर जाऊन उभे राहिलो. मात्र त्यांच्याकडं बाहेरच बसायचं आणि चहा तर दूरच, पाणीही प्यायचं नाही असं जातीनं मराठा असलेल्या मित्रानं पुन्हापुन्हा बजावलं. ‘गंगाराम अवं गंगाराम,’ त्यानं आवाज दिला तसं एक साठीचे म्हातारबुवा बाहेर आले. डोक्याला भगवं मुंडासं, लांब वाढलेली पांढरी दाढी, अंगावर ठिकठिकाणी भस्म, गळ्यात रुद्राक्षमाळा आणि सुरकुतलेला अनुभवी, जाणता चेहरा. दोघांना पाहून अदबीनं वाकले. म्हणाले, ‘कोण आल्याती या पाव्हणीबाई?’ मी येण्याचं कारण सांगितलं. तसं बायको गंगाबाई, मुलगा यल्लप्पा अन् सून शामला यांना आवाज देत बाहेर बोलावलं. गंगारामबुवा बोलू लागले, आम्ही मसनजोगी लोक. मूळचे नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर गावचे. वडील भिक्षा मागत आले अन् इथंच राहिले. अंत्यविधीचं काम करणं हाच पारंपरिक कामधंदा. मुलगाही तेच करतो. आता नातवांना मातर यात पडू देणार न्हाय. शाळा शिकवणार.’ गावातल्या जनाबाईच्या देवळात तुम्ही लोक कधी जाता का, भजन हरिपाठात सहभागी होता का, यावर मात्र सगळं कुटुंब नाही म्हणालं. पुन्हा पुन्हा कारण विचारल्यावर मात्र कुणीच काही बोललं नाही. त्याचं या प्रश्‍नावरचं हे मौन, सोबतच्या कथित वरच्या जातीच्या मित्रानं पाणी न पिण्याबाबत दिलेली ताकीद, या बाबींचे अर्थ लावत मी तिथून निघाले.

पुढे जुनं गाव लागलं. ऐटदार चिरेबंदी वाडे, कोरीव दिंडी दरवाजे, गढ्या अन बुरूज. अशाच एका भव्य नक्षीदार दरवाज्यापाशी थबकायला झालं. सोबतचे बोलले हे दीडशे वर्ष जुनं मध्व मंदिर. आत गेलो तर तिथल्या पुजारी कुटुंबातील मंगल अध्यापक आणि ऊर्मीला जोशी भेटल्या. जनाबाईंबाबत विचारताच कसलेही आढेवेढे न घेता एक भुलई गायली. विठ्ठल देव आणि जनाबाईंमधला गाढ स्नेहबंध प्रकट करणारी.

‘दोन प्रहर रात्र झाली
स्वारी विठ्ठलाची आली
जनी पाहे दाराकडे
दारी उभा कोण आहे…’

थोड्या अंतरावरच बालाजी मंदिर. हे पण असंच काळ्या कातळात घडवलेलं, प्राचीन. तिथले पुजारी गोपाळराव आणि त्यांच्या पत्नी शांताबाई खारकर सांगतात, जनाबाई रंगारी समाजाच्या होत्या. शांताबाई म्हणतात, ‘जनाबाईंच्या घरी माहुरची रेणुकादेवी पूजली जायची. त्या इथं वयाची केवळ पाचच वर्ष राहिल्या. मात्र इथं अजूनही त्यांचं नाव श्रद्धेनं घेतलं जातं. त्यांच्यावर गाणी, आरत्या रचल्या जातात. आम्ही मैत्रिणी आजही एकत्र बसलो की एकमेकींच्या शब्दाला शब्द जोडत गाणी रचतो.

मनामध्ये हौस माझ्या एक खरी
जनाबाई जागा द्या हो तुमच्या घरी
जनाबाई तुझी किती कीर्ती महान
तुझ्यासंगे बोलू लागे घन:श्याम
दळण दळीले तुमच्या जात्यावरी
जनाबाई जागा द्याहो तुमच्या घरी’

गावात जनाबाईंचं सुसज्ज मंदिर आहे. या भागातले प्रसिद्ध संत मोतीराम महाराज यांनी आपलं जीवनच जनाबाईंची समाधी आणि मंदिर उभारणीसाठी समर्पित केल्याचं गावकरी सांगतात. गंगाखेड त्यांचं आजोळ होते. आजन्म ब्रम्हचारी असलेल्या या महाराजांचे अनेक चमत्कारही भाविकांमध्ये चर्चिले जातात. त्यांनी ही अडीचशे वर्षापूर्वी स्थापलेली समाधी मंदिरात आहे. मंदिरात जनाबाई आणि त्यांना दळण दळू लागणारा पांडुरंग अशी एक सुबक संगमरवरी मूर्ती मंदिरात आहे. ती गेल्या दहा वर्षांपूर्वी संत जनाबाई भजनी मंडळाने जयपूरहून आणलीय. गेल्या दोन वर्षांपासून मंदिराच्या जीर्णोद्धाराचंही काम सुरू आहे. मनोहर महाराज केंद्रे, ज्ञानोबा भोसले आणि मारोती काकडे या कामात जातीनं लक्ष घालत असतात. कामासाठीचे पैसे लोकवर्गणीतून उभे केल्याचं सांगताना केंद्रे म्हणतात, ‘माझं गाव पिंपळदरी. आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेत माधुकरी मागून शिकलो. शिकून आलो आणि इथं मंदिरातच रमायला लागलो. दरम्यान नगरसेवक झालो. एवढ्या वर्षात सोबत्यांना घेऊन कामं केली. शासनाकडून दोन कोटी रुपये पर्यटन निधी मंजूर करून घेतला. त्यातून भक्तनिवासासह अनेक सुविधा उभारल्या. आठ वर्षांपासून कार्यरत असलेल्या संत जनाबाई वारकरी शिक्षण संस्थेत साठ मुलं शिकतात. त्याना गायन, वादन, कीर्तन शिकवलं जातं. सर्व सोय विनाशुल्क केली जाते. शिवाय मंदिराशेजारीच दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावे उद्यानही होतं आहे.’

पंढरपूरला जाणार्‍या विदर्भ मराठवाड्यातील दिंड्या मंदिरातील जनाईच्या पादुकांचं दर्शन घेऊनच पुढं जातात. जनाबाईंनी आषाढ वद्य त्रयोदशीला संत नामदेव आणि त्यांच्या कुटुंबीयांसह समाधी घेतली. दरवर्षी हा मुहूर्त साधून आम्ही पंधरा दिवसांचा सप्ताह साजरा करत असल्याचं कृष्णा महाराज आवलगावकर सांगतात. दर एकादशीला गावात पादुकांची प्रदक्षिणा होते. आषाढीला पालखी जातेच. महाराष्ट्रातील सर्व संतगणांच्या जयंती आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम वर्षभर सुरू असतात. त्यात भजन, नामस्मरण आणि अन्नदान होतं. गेल्या ७० वर्षांपासून रामायणकथेची परंपरा सुरू आहे. गावातला दसराही मोठाच देखणा असल्याचं जावेद सांगतो. दोनशे वर्ष जुना भव्य लाकडी रथ मिरवणुकीला बाहेर काढला जातो.

मंदिरात गेल्या साठ वर्षांपासून वीणेची अखंड खडी सेवा सुरू आहे. हा वीणा एकदाही जमिनीवर टेकवला नाही. मी गेले तेव्हा सत्तरीच्या ध्रुपदाआजी वीणा घेऊन उभ्या असतात. बाहेर सूर्य उतरणीला लागलेला. फिकुटली, सौम्य उन्हं. इकडे देवळात मात्र ‘रामकृष्ण हरी’चा व्याकूळ कल्लोळ तीव्र झालेला. साताठ आजीबाई हाती टाळ घेऊन भजन करत बसलेल्या. एकजण आसनावर उभ्यानं एकतारी छेडत होत्या. सार्‍यांच्या लालहिरव्यानिळ्या जरतारी नऊवारींची एक उजळ रंगमहिरप मोठीच देखणी, नजरबंदी करणारी. बाजूलाच दोघे आजोबा बसलेले. एकाहाती मृदंग तर दुसर्‍याहाती दिमडी. तल्लीन होत सूर धरलेला. शब्दांचा फेर भरात आला. गाभार्‍यातल्या फुलांचं आता निर्माल्य झालेलं. धूप, चंदन, ओल्या हळदीकुंकवासह भाबड्या भक्तीचाही गंध आसपास भरून राहिलेला. गेल्यागेल्या या आयाबायांनी आलाबला घेत जवळ बसवून घेतलं. जनाबाईला भेटायला आले सांगितल्यावर म्हणाल्या, ‘ती तर आमची माय लागती. आम्हाला तिनं गुटी पाजली तवा कुठं अशा खंबीर झालो. या संसारातून तरून जाण्याचं बळ अंगी आलं. आजही तिचे शब्द सार्‍यांच्या ओठांवर खेळतात. काळजात रुजतात. मात्र आता या गावी जनाबाईंच्या कुळातलं कुणीच नाही. देवाजीनं दमा आणि त्याची पत्नी कुरुंद या दोघांना दृष्टांत दिला. दोघांनी अपत्य मागितलं होतं. मात्र देव म्हणाले, तुम्हाला मुलगा नाही मात्र एक मुलगी होईल. मोठीच बहुगुणी, बहुतांचा उद्धार करणारी. तीन वर्ष तिचा निगुतीनं सांभाळ करा. मात्र पुढं तिला नामदेवाकडे नेऊन सोडा. तर अशी दमा आणि कुरुंदच्या पोटी जनाई आली. ती देवाचाच अवतार. जशी रामाबरोबर मंथरा, कृष्णाबरोबर कुब्जा, अंगदाबरोबर पद्मिनी होती तशी नामयाबरोबर जनी झाली!’ आयाबाया अनावर उल्हासानं बोलत असतात. त्यात निव्वळ दुसरीपर्यंत शिकलेल्या प्रयागबाई मोरे आहेत. त्यांनी चार वर्षांपूर्वी जनाबाईंचं ओवीबद्ध चरित्र लिहिलंय. बाकीही सगळ्याजणी अशा कमीच शिकलेल्या, अभावाचंच जगणं जगणार्‍या. मात्र शब्दसुरांच्या कणग्या सार्‍याजणींकडं भरभरून वाहत असतात. गयाबाई दहिफळे, कुसुम शिंदे, बहिणाबाई पवार, शकुंतलाबाई शिंदे, पार्वताबाई मरगीळ, लक्ष्मीबाई शिंदे, सरूबाई जाधव, नर्मदाबाई मुंडे, सरूबाई शिंदे अशा मिळून सार्‍याजणी मग सूर धरतात. मात्र ‘प्रयाग गाते आणि आम्ही झेलतो’ म्हणत मैफलीचं सारं श्रेय प्रयागबाईंना देतात.

‘भावभक्तीच्या फुलपाकळ्या फुलू लागल्या
विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गवर्‍या बोलू लागल्या’

माधवराव कुलकर्णींच्या दिमडीचा खुमासदार ठेका मनात मुरवत आपण निघू पाहतो तो समोर सायंकाळच्या आरतीचा स्निग्ध कापूर तेजाळतो. निरोप घेता या आयाबाया अक्षय आशीर्वादाची ओसंडती मापं रिती करतात. आजन्म ‘वारी न चुको दे हरी’ इतकंच दान मागणार्‍या या निर्मोही विरागिनींना ‘येते’ म्हणताना नकळत डोळे पाणावतात.

जनाबाई कधी मंदिरात जाऊन ध्यान करत बसल्या नाहीत. त्यांनी देवालाच आपल्याकडे बोलावलं. प्रसंगी देवालाच खडे बोल सुनावले. आल्या दिवसाला हसतमुखानं तोंड देत, दैवाला न जुमानणार्‍या या आयाबायाही मला तितक्याच बाणेदार वाटल्या. मात्र गावच्या राजकारणात ही स्त्री अजूनही पुरेशी समोर आली नाही.

गंगाखेडच्या संत जनाबाई महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य आणि हिंदीचे प्राध्यापक प्रा. डॉ. सतीश फुलवाडकर यांच्यासाठीही जनाबाईंच्या रचना आणि जीवन हा सततच्या आस्थेचा, कुतूहलाचा विषय आहे. सध्या जनाबाईंच्या रचनांचा हिंदी अनुवाद करण्याच्या प्रकल्पावर ते काम करत आहेत. ते जनाबाईंना आध्यात्मिक लोकशाहीचं नेतृत्व करणारी क्रांतिकारी स्त्री मानतात. ते एका नव्याच साक्षात्कारानं दीपून गेल्यागत बोलू लागतात, ‘जनाबाई तेराव्या शतकातल्या विद्युल्लता होत्या. अवघं आयुष्यच श्रमसाधनेत घालवलं. देवाला मदतीसाठी सोबत घेत श्रम हलकं केलं. ‘श्रमभक्ती’ची संकल्पना मूर्त केली. ती शूद्र, नीचवर्णीय असल्याचं बोललं जातं. मात्र ही जातीय शूद्रता तिनं तावून सुलाखून निघण्यासाठीची अग्निपरीक्षा म्हणून वापरली. तिची भक्ती सुवर्णकांतीनं उजळून निघाली. आध्यात्मिक उंची तर समाजाच्या सर्व स्तरांना स्पर्शणारी. आदर्श समाजपुरुषाच्या निर्मितीसाठी ती अखंड झटली. तिच्यात वैश्विकतेच्या खुणा दिसतात.’

मूळ पूर्णा गावचे असलेले फुलवाडकर १९७२ साली गंगाखेडला आले.या गावाच्या आजवरच्या प्रवासाबाबत निरीक्षणं नोंदवताना ते सांगतात, की ‘पूर्वी वस्तीइतकं लहान असलेलं गाव आता बर्‍यापैकी विस्तारलंय. दळणवळणाची साधनं वाढलीत. जगणं गतिमान होतंय. मात्र इथं शांतता, समाधान भरभरून वाहते, गुन्हेगारी नाही. तेराव्या शतकात दळण दळताना प्रपंचाचा खुंटा अध्यात्माच्या दगडावर रोवणारी जनाबाईच मला या सामाजिक सांस्कृतिक समृद्धीमागे दिसते. आमच्या  शिक्षणसंस्थेनं २५ वर्षांपूर्वी जनाबाईंवर ‘संत जनाबाई : चरित्र आणि कार्य’ असा ग्रंथ प्रकाशित केलाय. मात्र जनाबाईंची थोरवी महाराष्ट्र पातळीवर अजूनही नीटशी ओळखली गेली नाही. वास्तविक नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीच्याच दिवशी जनाबाईंचाही स्मरणदिन. तोही व्यापकतेनं साजरा व्हायला हवा.’ अशी अपेक्षा ते नोंदवतात.

भारतीय मनोवृत्ती ही सामान्य माणसापासून ते संतपदापर्यंत पोचलेल्या महात्म्यालाही बहुतेकदा ‘जात’ नावाच्या फुटपट्टीनंच मोजण्याचा अट्टहास करणारी आहे. गावात हिंडताना जनाबाईंच्या जातीबाबतही लोक अनेक मतमतांतरं बोलून दाखवतात. मंदिरासमोरच्या धनगर गल्लीत गेल्यावर कुणी आजोबा दावा करतात की त्या आमच्या धनगर समाजाच्याच होत्या. याच गल्लीत त्या राहायच्या. रंगार गल्लीतले लोक त्यांना रंगार्‍याच्या होत्या म्हणत जातीय मालकी सांगतात. आणि दलित वस्तीतही त्या शूद्र असल्याचं खात्रीनं सांगितलं जातं. फिरताना डॉ. आंबेडकर नगरात आरपीआय – आठवले गटाचे विद्यमान पदाधिकारी आणि माजी नगराध्यक्ष अॅड. गौतम भालेराव यांचा गढीवजा बंगला दिसतो. कुठलेही आढेवेढे न घेता ते भेटायला तयार होतात. सोबत त्यांचे जुने कार्यकर्ते चिंतामणी साळवे असतात. दोघंही बोलताना जनाबाई उपेक्षितच राहिल्याची खंत सुरवातीलाच बोलून दाखवतात. सांगतात, ‘जनाबाई जातीनं महार होत्या. साळवे त्यांचं आडनाव. तुलनेनं प्रचंड बंदिस्त, सनातनी असलेल्या समाजव्यवस्थेत त्यांनी वेगळा सूर लावत विद्रोह केला. त्यांच्या रचनाच व्यक्ती म्हणून स्वतंत्र विचाराचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍या आहेत. मात्र आज इथल्या सामाजिक, धार्मिक व्यवस्थेनं आपले हितसंबंध डोळ्यासमोर ठेवत जनाबाईंचा देव करून टाकलाय. भक्ती बुद्धीला खीळ घालत केवळ लीन व्हायला सांगते. तिथं अभ्यास, चिकित्सा, अनुसरणाचा मार्गच बंद होतो. आणि हे तथाकथित भक्त, कीर्तनकार आणि हभप तर जनाईंचं मानवी रूप, संघर्ष, विद्रोही जीवनधारणा न सांगता त्यांच्या नावे सांगितल्या जाणार्‍या चमत्कारांचंच उदात्तीकरण करतात. महिलांना स्वतंत्र विचार करण्याचं आवाहन ते कधी करत नाहीत. केवळ टाळ चिपळीच्या लयतालात गुंगवून ठेवतात. बाबामहाराज सातारकरांसारखे काही सन्माननीय अपवाद आहेत. संतसाहित्यही बहुतेकदा चातुर्वर्ण्याच्या कोंदणातच सादर केलं जातं. विचारांचीच पेरणी अशी चुकीची झाल्यावर उगवन ती काय होणार? आमचं गाव संतपरंपरा मिरवणारं असलं तरी इथं अजूनही सामाजिक समता नाही. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना खूप अटकाव होतो. मी आताच एका धनगर-मराठा विवाहावेळी झालेल्या तणावात हस्तक्षेप करून लग्न लावून दिलं. राजकारणात स्त्रियांचा सहभाग नगण्यच आहे. इथं बाई नगरसेवक झाली तरी तिच्या नावावर नवराच कारभार करतो. आपला समाजच दांभिक आहे. पण आज आमच्या दलित वस्तीतल्या पोरी सक्षम व्हायल्यात. शिकून आर्थिक आणि वैचारिक स्वातंत्र्यही मिळवायल्यात. त्या खर्‍या जनीच्या वारसदार! जनाबाई अशी समकालीनतेची जोड देत परिवर्तनवादी अंगानं मांडली जायला पाहिजे. हे काम कोण करणार?’

बाजूलाच भालेराव यांच्या आई सुलोचना भालेराव आणि नात्यातल्याच सुमनबाई बसलेल्या असतात. दोघी सत्तरी ओलांडलेल्या. म्हणाल्या, ‘जनाबाई गावकुसाबाहेर मारोती मंदिराजवळ राहायच्या. त्या नामदेवांकडे निघून गेल्यावर आईवडील देवळे गल्लीत राहाय लागले. जना मोठी हिकमती बाई होती. आता आमच्या नातवांनाही आम्ही तिच्या कहाण्या सांगतो. मात्र गावातल्या मंदिरात आम्ही वा आमच्या वस्तीतलं कोणी कधीच जात नाही.’ तिथून निघाल्यावर मी आंबेडकर नगरातल्या काही आयाबायांशी बोलले. त्यांना जनाबाईंबाबत आस्था दिसली. मात्र त्याही कधी देवळात भजन वा उत्सवाला जात नसल्याचं त्यांनी सांगितलं.

मी गेले तेव्हा गावातलं कॉलेज सुट्यांमुळे बंद होतं. गावात भेटलेल्या नव्या पिढीशी गप्पा मारल्यावर ‘जनाबाई आमच्या गावाच्या होत्या’ यापलीकडे काही सांगता येत नव्हतं. कुणाला एखादी रचना पाठ असल्याचंही आढळलं नाही. त्यांनी सांगितलं, ‘कुटुंबातल्या सदस्यांसह आम्ही मंदिरात जातो. भजनात बसतो.’ एकीकडे धर्मानं हिंदू नसलेला जावेद, मागच्या पिढीतल्या आयाबाया यांची जनाबाईंबाबतची अपूर्वाई आणि दुसरीकडे तरुणाई मात्र या सगळ्यांपासून काहीशी अलिप्त, अनभिज्ञ! मी विचार करते की हे असं का झालं असावं. वाटतं, रूढार्थानं मूर्तीतला देव नाकारत त्याला श्रमसंस्कारात पाहणारी जनाबाईच आता मूर्तीबद्ध झालीय. तिच्या अभंगांतल्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करण्याहून त्यांना भजण्यातच आपण रमतोय का काय?

विद्रोही जनाबाई कोण सांगणार या भालेरावांच्या अस्वस्थतेवर उत्तर शोधत परभणीच्या प्रा. अशोक आणि आशा जोंधळे या परिवर्तनवादी चळवळीतल्या सुरेल दाम्पत्यानं नुकतीच जनाबाईंच्या निवडक रचनांना संगीतबद्ध करत ‘सुंदर माझे जाते’ ही ध्वनिफीत प्रकाशित केली आहे. आशाताईंच्या जवारीदार आवाजातली ‘खान्देशचा मळा; मराठवाड्याचा गळा’ अनेक वर्षं गाजणारी मैफल अनेकांच्या मनात अजूनही ताजी असते. बहिणाबाई चौधरींच्या काव्यातील अक्षरधन लोकसंगीताची जोड देत गीतबद्ध केलेलं. प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांचं रसाळ निवेदन आणि पाठ न सोडणारा आशाताईंचा स्वर! गेल्या चाळीस वर्षांत दीड हजारांहून अधिक मैफली रंगल्यात, अजूनही रंगताहेत. भेटायला गेल्यावर स्वागताचं भरभरून अगत्य करतानाच जोंधळे सर ‘सुंदर माझे जाते’ची सीडी लावतात. ‘स्त्री जन्म म्हणवूनी न व्हावे उदास…’, ‘विठोबा मला मूळ धाडा; धावत येईन दुडदुडा… ’, ‘सुंदर माझे जाते गं फिरते बहुत..’, ‘पक्षी जाय दिगंतरा..’ लिहिणारी … ‘देव खाते देव पिते; देवावरी मी निजते’, असं ठणकावून जाहीर करणारी जनाई! तसा लौकिकार्थानं गोड, मधुर नसलेला पण काळजात खोलवर उतरणारा, घर करणारा, टोचणी लावणारा हुरहुरता, धारदार, नमकीन स्वर. ऐकताना वाटत राहतं, अरे हे तर जनाबाईंच्या बाणेदार चित्तवृत्तींचं सगुण साकार स्वररूप.

आजवर अनेक मान्यवर स्वरसाधकांनी जनाईच्या रचना गायल्यात. मात्र या नव्याकोर्‍या, अपूर्व साक्षात्कारामागची कथा सांगताना जोंधळे म्हणतात, ‘आम्हाला काहीशी अनवट, अपरिचित जनाबाई सांगायची होती. तिचं शब्दरूप बंड, वृत्तीतला सहजभाव असणारा विद्रोह पोचवायचा होता. त्या वाळवंटी राजस्थानातली मीराबाई आणि या दुष्काळी मराठवाड्यातली जनाबाई यांच्या विचारी विद्रोहात मला साधर्म्य दिसलं. दोघीही मानवजन्माला आलेल्या हाडामासाच्या मर्त्य स्त्रिया होत्या. अक्षर विचारधनामुळे अमरत्वाला पोचल्या. जनाबाईंना कुठल्यातरी अप्राप्य ईश्वरी उंचीवर न ठेवता, देवत्व देत चमत्कार न सांगता तिची वैचारिक मूल्यं आम्ही ठळक केली.’

आशाताईंच्या आवाजातून जनाईला भेटता जाणताना सतत प्रश्‍न पडतो, की तिच्यासारखी आपल्या मातीतली, इथल्या सामाजिक सांस्कृतिक ताण्याबाण्यांतून विणलेली स्त्रीवादाची प्रागतिक मॉडेल्स आमच्या आधुनिक म्हणवणार्‍या पिढीसमोर का ठेवली जात नाहीत? आज प्रतिष्ठित विद्यापीठांच्या सुसज्ज वातानुकूलित वर्गखोल्यांमध्ये आम्हा मुलामुलींना चायनीज, अमेरिकन फेमिनिझम शिकवला जातो. भारतीय स्त्रीवादावर दिल्या जाणार्‍या पॉवर पॉइण्ट प्रेझेण्टेशन्समधूनही समग्र स्त्रीमुक्तीसाठीची ही चळवळ बहुतांशी महानगरांपुरतीच मर्यादित असल्याचं जाणवतं. गावाखेड्यातली काट्याकूपाट्याची वाट तुडवत अक्षरांच्या ओढीनं शहरं गाठलेल्या असंख्य मुलींना मग हा लिमिटेड स्त्रीवाद साहजिकच अनोळखी, बेगडी वाटू लागतो. अशावेळेस आमचं सो कॉल्ड पोस्ट मॉडर्न जगणं आम्ही जनाईच्या ‘अभंग’ वैचारिकतेवर का घासून पाहत नाही? अशावेळी मग ‘डोईचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी’ म्हणत वर खुशाल ‘मनगटावर तेल घाला तुम्ही’ असा उपरोधिक फटकारा लगावत आदिम, पुरुषी व्यवस्थेला सांस्कृतिक दणका देणारी जनाबाई मला अगदी जिवाभावाची वाटते. ‘स्त्रीजन्म म्हणवूनी न व्हावे उदास’, असं आश्‍वासक आवाहन करत शुद्रातिशुद्र ठरवल्या गेलेल्या बाईपणाचा सुरेख सोहळा करणारी जनाबाई माझ्या नात्यातलीच कुणी एक होते. तिच्या उग्र पण समंजस, टोकदार पण संयत, उत्स्फूर्त पण धीरगंभीर विद्रोहाशी मी सोईरपण सांगू पाहते. तिच्या पावलाखालची अनवट वाट निखार्‍याची होती. पण तिनं चाललेला डोळस प्रवास आता माझ्या वहिवाटेवरचे काटे दूर करतो. मग मी उद्याच्या उजेडवाटेवर तिचीच क्रांतिपताका मिरवत चालू लागते.

आशाताईंच्या टोकदार आवाजाची खोल जखम मनीमानसी वागवत मी निघते. नंदीग्राम एक्सप्रेस गर्दीनं भरून वाहत असते. लेडीज डब्यातल्या दाराजवळच्या बोगद्यात मी बसते. इथे खालीही बायका दाटीवाटीनं बसलेल्या. त्यातल्या दोघीजणी अगदीच दरवाज्यात. नेहमीच्या सवयीचा प्रवास असावा. एक बुरख्यात तर दुसरी साध्याशा साडीत. माझ्या हातात उघडलेलं पुस्तक पाहून मला कुतूहलानं विचारतात ‘काय शिकतेस?’ सुरू झालेल्या गप्पांतून कळतं की ही मेहरुन्निसा आणि सुनीता दोघी जालन्याहून मुंबईला चालल्यात. अंदाजे तिशीच्या आतल्याच. सततच्या दुष्काळामुळं त्यांनी गाव सोडून शहर जवळ केलंय. नवरेही शहरात एका कंपनीत कष्टाचं काम करतात. या दोघी दागिन्यांची कारागिरी शिकून पैसे कमावतात. मेहेरने मुलीला औरंगाबादला वसतिगृहात शिकायला ठेवलंय. गावाकडच्या शेताचंही पाहतात. मेहेर म्हणते, ‘आज कैसे भी हो निभाना है. आने वाला दिन तो अच्छा होगा. मुझे पढना था पर घरवालोने शादी कर दी. अब बच्ची को बोहोत सिखाना है. वरना हमको देखो न, औरतजात की ऐसी जिंदगी में मतलबीच नै कुछ!’ सुनीताही मान डोलावते. रस्ताभर दोघींच्या चेहर्‍यावरचं उजळ हसू भवतीचा रखरखीत वैशाख विसरायला लावतं. अवघ्या अभावातही आल्या जगण्याला रसरशीत असोशीनं सामोरं जाणारी, स्त्रीत्वाची मिराशी कौतुकानं मिरवणारी जनाबाई आता अशी ठायीठायी दिसू लागते! माझ्या बोटाला धरून पुढची वाट सांगू लागते!

0 Shares
स्वरूपाची खाणी मज सांभाळी विठ्ठला