आमचं नाव नामदेव!

हर्षदा परब

मध्य आणि उत्तर भारतात लाखो लोकांचं आडनाव नामदेव असं आहे. महाराष्ट्राबाहेरच्या या लोकांच्या नावात असणारे नामदेव आपले संत नामदेवच असतील, अशी शंकाही आपल्याला येत नाही. पण ही त्यांची नामदेवांविषयी असलेली कृतज्ञता आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि रंगभूमीचे अभ्यासक गोविंद नामदेव हे त्यांचेच एक प्रतिनिधी. त्यांच्या या मुलाखतीतून नामदेवांविषयी या नामदेव आडनावाच्या लोकांना काय वाटतं ते हर्षदा परब यांनी समजून घेतलं आहे.

गोरेगावच्या गार्डन इस्टेटमध्ये गोविंद नामदेवना भेटायला गेले. बेल मारल्यानंतर मिनिटांत दरवाजा उघडला. एका नववी- दहावीतल्या मुलीनं आत घेतलं त्यानंतर बसायला सांगितलं. ज्यूस दिला. बोलणं झालं नाही पण ती कोण हे कळायला फार उशीर लागला नाही. तिने पप्पा अशी हाक मारली. लक्षात आलं ती गोविंद नामदेवांची मुलगी असणार.

पत्रकारितेमुळे आजवर अनेक मोठ्या, प्रसिद्ध माणसांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला. जवळपास सगळ्याच ठिकाणी नोकर मंडळी सरबराई करतात. दरवाजा उघडण्यापासून ते आपण निघेपर्यंत सारं काही नोकरच करतात. पण या घरचा अनुभव सुरुवातीपासूनच वेगळा ठरला. मी आपलं घड्याळाच्या काट्याकडे पाहून उशीर तर झाला नाही ना याची खातरजमा करताना दोन घोटांचा एक घोट करून ज्यूस पीत होते. गोविंद नामदेव आले तर ज्यूस पीऊ की बोलू, असं व्हायला नको म्हणून. तोवर ती गोरीगोमटी मुलगी बॅग पाठीला लावून क्लासला निघून गेली होती.

पुन्हा दारावरची बेल वाजली आणि दरवाज्याशेजारी असलेल्या सीसीटीव्हीत कोणीतरी बाहेर आलंय ते लक्षात आलं. दोन-तीन बेलनंतर एक टोपी घातलेल्या माणसानं दरवाजा उघडला. त्यानंतर आत आलेल्या त्या माणसांना इन्स्ट्रक्शन देऊन तो माणूस सरळ माझ्या दिशेने चालत आला.

‘विरासत’मधला मिलिंद गुणाजीचा वाकड्या तोंडाचा बाप, ‘सरफरोश’मधला नक्षलवाद्यांचा नेता विरन आठवतोय किंवा ‘लज्जा’ मधला ‘नही तो हम उठ जायेंगे’ म्हणून हुंड्यासाठी मुलीच्या घरातल्यांचा छळ करणारा सासरा. नाहीतर ‘सिंघम’मधला अजय देवगणचा बाप…. कमीतकमी दोनेकशे चित्रपटांत भूमिका करणारे गोविंद नामदेव. हो तेच गोविंद नामदेव. भल्याभल्या हिरोंची कसदार अभिनय आणि वजनदार आवाजानं दमछाक करणारा हाच तो व्हिलन. यापूर्वी त्यांच्या नामदेव आडनावाचं विशेष कौतुक वाटलं नव्हतं. पण त्यांचं आडनाव नामदेव हे संत नामदेवांवरून घेतल्याचं कळलं आणि त्यांची व्हिलन ही प्रतिमा डोक्यातून अंधूक झाली. त्यांनी अदबीनं केलेल्या पहिल्या नमस्काराबरोबर तर ती पूर्ण गळून गेली.

दोन मिनिटांचं जुजबी बोलणं आणि मुलाखतीला सुरुवात झाली.

तुमचं नाव गोविंद नामदेव असंच आहे, की काही वेगळं आडनाव आहे?

– नाही नामदेव हेच आमचं आडनाव आहे. आमच्या पूर्वजांपासून आमचं हेच आडनाव आहे. मी मूळचा मध्य प्रदेशातल्या सागरचा. आमच्याकडे आमचा पूर्ण शिंपी समाजच हे आडनाव लावतो. संत नामदेवजींचे अनुयायी म्हणवून घेण्यात आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो.

नामदेव हे आडनाव कसं आलं, असं कोणी विचारत नाही का?

– अनेकजणांना हा प्रश्न पडतो. पण मग मी त्यांना त्याची सविस्तर माहिती देतो. संत नामदेवजींविषयी सांगतो. काहींना मी महाराष्ट्रीयच वाटतो. कारण नामदेव हे महाराष्ट्रात नाव. मग ते माझं आडनाव कसं, असा प्रश्न विचारतात. काहींनी तर मला माझं नाव बदलण्याचाही सल्ला दिला होता. या नावामुळे मी फिल्म इण्डस्ट्रीत चालणार नाही, असं मला लोकांनी सांगितलं होतं.

करियरच्या भीतीपोटी आडनाव बदलावंस नाही वाटलं का? आडनावामुळे फायदा झाला की तोटा?

-नाही, असं कधीच वाटलं नाही. कारण नामदेव ही आमची आमच्या समाजाची ओळख आहे. माझ्या वाडवडिलांपासून आलेलं हे नाव आहे. या आडनावामुळे आम्ही नामदेव समाजाशी जोडले जातो. जी माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. या नावानं मला नवीन आणि इतरांपेक्षा वेगळी ओळख दिली. मी बरंच काही कमावलंय. पैसा, प्रसिद्धी बरंच काही. पण नामदेव आडनावाबरोबर नामदेवांचे विचार जे मला मिळाले ती माझी सगळ्यात मोठी कमाई आहे. त्या विचारांमुळे आज माझा मान आहे.

पण नामदेवांचं नाव जोडणं ही केवळ एक परंपरा आहे की नामदेवांविषयी तुमच्या मनात असलेला आदरभाव?

-ही परंपरा तर आहेच, पण त्याहीपेक्षा त्यांच्याविषयी आदर म्हणूनच आम्ही हे नाव जोडलेलं आहे. नामदेव हे आमचे पूजनीय आहेत. त्यांनी सगळ्या मानवजातीसाठी योगदान दिलंय. त्यासाठी कृतज्ञता म्हणून आम्ही हे आडनाव लावतो. माझ्यासारख्या छोट्या माणसाशी एवढ्या मोठ्या संताचं नाव जोडलं जाणं मला गर्वाचंच वाटतं.

नामदेवांचे साहित्य वाचलं आहे का? त्यांच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला प्रभावित करतात?

-नामदेवांचं साहित्य मराठी आणि हिंदी भाषेत आहे. त्यात कधी पंजाबीची छाप आहे, कधी गुजरातीची, कधी ब्रजची. जिथे गेले तिथली भाषा ते बोलले. एखाद्या संतानं इतक्या भाषेत लिहिणं हे माझ्यातल्या कलाकाराला खूपच प्रभावित करतं. म्हणूनच की काय त्यांचे अनुयायी देशभर आहेत. दोन – तीनदा मी त्यांचे आत्मचरित्रपर अभंग वाचले आहेत. त्यांच्या चरित्रामुळे अध्यात्माची ओढ निर्माण झाली. आता धकाधकीच्या जीवनात फारसं वाचन होत नाही. तरी सकाळ ही भजनानं होते, हा नामदेवांचाच प्रभाव आहे. सकाळी आमच्याकडे पंडित जसराज, किशोरी आमोणकर अशा मोठ-मोठ्या गायकांची भजनं आम्ही ऐकतो. पूजेचा एक तास आमच्यासाठी खूप आनंदाचा जातो. आमच्या देव्हा-यातच संत नामदेवांना स्थान आहे. ही आमच्या कुटुंबाची परंपराच आहे म्हणा ना. माझ्या तिन्ही मुलीही पूजा अत्यंत आत्मीयतेने करतात.

आडनावामुळे लहानपणापासून नामदेव तुमच्या आयुष्याशी जोडले गेले आहेत का? नामदेवांच्या गोष्टी ऐकल्या होत्या का? त्यांचा फोटो लहानपणी तुमच्या घरी होता का?

-आडनावामुळे मीच नाही तर आमच्या पिढ्यानपिढ्या नामदेवांशी जोडले गेल्या आहेत. त्यांच्या कथा मी फार ऐकल्या आहेत. लहानपणी आमच्याकडे एक फोटो होता. ज्यात नामदेवांबरोबर एक कुत्रा दिसायचा. तेव्हा आम्हाला गोष्ट सांगितली होती. नामदेव जेवत असताना त्यांच्या ताटातली भाकरी घेऊन कुत्रा पळून गेला. तेव्हा नामदेव त्याच्यामागे तूप घेऊन धावले. ‘अरे, भाकरीला तूप तरी लाव’, असं ओरडत. प्राणिमात्रांवरही प्रेम करा हा संदेश देणारी ही नामदेवांची गोष्ट आहे. तसंच त्यांच्या भजनासाठी देऊळही उलटं फिरल्याची कथाही मला खूप आवडते.
अशा लहानपणी ऐकलेल्या गोष्टींनी माझ्या व्यक्तिमत्त्वात खूप बदल झाले आहेत. मी आज चित्रपटसृष्टीतही वेगळी ओळख निर्माण करू शकलो कारण लहानपणी झालेले संस्कार. अहंकार करू नये, प्राणिमात्रांवर प्रेम करावं आणि माणसांना माणूस म्हणूनच वागवावं, हे मी शिकलोय. मी इण्डस्ट्रीत सोळा वर्षांपासून काम करतोय. तितकी वर्ष माझा स्टाफ एकच आहे. मेकअपमन उल्हास अडनेरकर, ड्रायव्हर पांडुरंग पवार आणि असिस्टंट सुनील गवळी आणि मी, असा आमचा ग्रुपच आहे. इतकी वर्ष आम्ही एकत्र कसे आहोत, असा प्रश्न सगळ्यांना पडतो. त्यांच्याशी इतकी मोकळीक ठेवू नका, असा सल्लाही काही लोक देतात. त्यांना नोकराप्रमाणं वागवा, असं सूचवतात. पण मला ते पटत नाही. ते माझ्या कुटुंबाप्रमाणं आहेत. या शिकवणुकीमुळे मला समाधान मिळतं.

आठशे वर्षांपूर्वी नामदेव चांगल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी संपूर्ण देशभर फिरले. त्यांच्या वाणीनं आणि लेखनानं संपूर्ण देशाला प्रभावित केलं. तुम्ही याकडे कसं पाहता?

-मी त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं. सद्विचारांची शिकवण संपूर्ण जगापर्यंत पोहचविण्यासाठी या माणसानं पायी प्रवास केला. कोणकोणत्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं असेल, याचा आपण आज विचारसुद्धा करू शकत नाही. संपूर्ण आयुष्य त्यांनी यासाठी वेचलं. तेव्हा तर आत्ताप्रमाणं वाहतुकीची साधनंसुद्धा नव्हती. दिवस दिवस प्रवास करावा लागत असे. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी लोकांपर्यंत उत्तम विचार पोहोचवले. लोकांप्रती सेवाभाव दाखवला.

देशात अंदाजे असे किती लोक असतील जे नामदेवांचं नाव आडनाव म्हणून लावतात? आणि नामदेव समाजाची आज सामाजिक स्थिती काय आहे?

-माझ्या माहितीत देशभर हा समाज वसलेला आहे. नेमका आकडा मला सांगता येणार नाही. त्यातले काही लोक नामदेव आडनाव लावतात. काही लोकांचं आडनाव वेगळं असतं पण त्यांचं समाजाचं नाव म्हणून नामदेव असतंच. पण नामदेव हे आडनाव लावणा-यांची संख्या लाखांमधे आहे, हे नक्की.
नामदेव समाजाची स्थिती दहा-बारा वर्षांपूर्वीपर्यंत अत्यंत बिकट होती. लोक निरक्षर होते. परंपरागत सुरू असलेल्या शिवणकामाच्या धंद्यावर जगत होते. जेमतेम गुजराण करत होते, असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. त्यातही छोटी शहरं आणि गावातल्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. आमच्या मध्य प्रदेशातील नामदेव समाजातील लोक आर्थिकदृष्ट्या खूपच कमकुवत होते. मी जेव्हा महाराष्ट्रात यायचो तेव्हा इथल्या लोकांची परिस्थिती मला मध्य प्रदेशातल्या लोकांपेक्षा खूप चांगली वाटायची. इथले लोक सुशिक्षित होते आणि त्यांचं राहणीमान आमच्या लोकांपेक्षा खूप चांगलं वाटायचं. तेव्हा आपल्याकडचीही परिस्थिती बदलली पाहिजे, असं वाटायचं.
तोपर्यंत आमच्या भागातही शिक्षण येऊ लागलं होतं. लोकांनी आपल्या मुलांना शिक्षण दिलं. शिक्षण घेतलेल्या कुटुंबांची स्थिती सुधारलेली पाहून समाजात शिक्षणाचा प्रसार झाला. आज मुलीसुद्धा इतक्या शिकल्या आहेत, की समाजात लग्नं जुळवायची ठरवलं तर तेवढा शिकलेला मुलगा खूप मुश्किलीनं सापडतो. डॉक्टर, एमबीए, इंजिनियर या क्षेत्रांतही आमच्या समाजातील मुलं आहेत. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता आली आहे.

आडनावामुळे तुमच्या समाजातील लोक तुम्हाला सहज ओळखत असतील तसंच नेहमी भेटायला येत असतील. तेव्हा तुम्हाला काय वाटतं?

-खूप बरं वाटतं. आमच्याकडे घरी कोणी आलंच तर सगळा चार्ज माझ्या पत्नीकडे असतो. आदरातिथ्य करण्यासाठी ती आमच्या गावात आणि समाजात खूपच प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्र हे नामदेवांचं जन्मस्थान आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाबत तुम्ही काय विचार करता?

-महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपण ज्या संताचं नाव लावतो, ज्याची शिकवण आपल्या समाजाला लाभली, अशा संताचं हे जन्मस्थान असल्याचा आनंद वाटतो. संतांची कर्मभूमी ही योगायोगानं माझीही कर्मभूमी असल्याचा मला गर्व आहे. महाराष्ट्र हे मला मस्तकाप्रमाणं आहे तर माझं जन्मस्थान मध्य प्रदेश मला माझं हृदय वाटतं.

संपूर्ण देशाला एका धाग्यात जोडणा-या संतांच्या जन्मभूमीत असे काही राजकीय पक्ष आहेत जे प्रांतवादाचा पुरस्कार करतात, त्यावर आपली प्रतिक्रिया काय?

-त्यांच्या लहान विचारांबाबत दुःख होतं. ‘वसुधैवकुटुम्बकम’ ही शिकवण आणि आपली परंपरा आहे. अशा संकुचित प्रांतवादामुळे कुणालाच काहीच मिळणार नाही. केवळ काही ठिकाणापुरती आणि काही माणसांवर ते आपली सत्ता प्रस्थापित करू शकतील.

नामदेवांच्या काव्यात नेहमी नाट्य आणि संवाद आढळतं. एक रंगकर्मी आणि अभ्यासक म्हणून याकडे कसे पाहता?

-नाट्य आणि संवाद हे सर्वसामान्यांशी निगडीत आहेत. कारण त्यात लोकांच्या भावना आणि लोकांची भाषा येते. त्यामुळे ते सर्वसामान्यांपर्यंत सहज पोहचते. जो नाटकाचा गुण आहे. नामदेवांच्या काव्यात हे दोन्ही गुण आढळतात. त्यामुळेच नामदेवांना आपली शिकवण देशभर पोहचवणं शक्य झालं. अशा समजण्यास सोप्या मार्गानं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्यामुळेच लोकांवर नामदेवांचा पगडाही मोठा आहे. त्यांचे अभंग वाचणा-यांवर आजही ते प्रभाव पाडतात. त्यात त्यातलं तत्त्वज्ञान तर आहेच, पण त्याचा संवादाचा फॉर्मही महत्त्वाचा आहे.

नामदेवांवर चित्रपट किंवा नाटक होऊ शकतं का?

-नामदेवांच्या जीवनावर चित्रपट आणि नाटक दोन्हीही उत्तम होऊ शकतील. पण चित्रपट व्हावा, असं मला मनापासून वाटतं. एका संतावर चित्रपट काढण्यासाठी माणसं चांगल्या विचारांनी-भावनांनी एकत्र आलेली असतील यात अजिबात वाद नाही. ते तर हवंच पण चित्रपट उत्कृष्ट व्हावा यासाठी तो व्यावसायिक लोकांनीच तयार करावा, असं मला मनापासून वाटतं. त्यासाठी लागेल ते मार्गदर्शन करण्यासाठी मी तयार आहे.

(विशेष सहाय्य : प्रा. हरि नरके)

0 Shares
नामदेवनो गुजरात विनम्र बंडखोरी