नामा म्हणे तुझें सोलीन ढोपर

डॉ. भरतकुमार राउत

‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि त्याआधी अनेक इंग्रजी नियतकालिकांचे संपादक. देशातील पहिलं टीव्ही न्यूज चॅनल लॉन्च करणारे ट्रेण्डसेटर. भारतीय टीव्ही उद्योगाला युरोप आणि अमेरिकेत स्थिर करणारे व्यावसायिक तज्ज्ञ. भारतीय समाजव्यवहाराचं अत्यंत साध्या भाषेत विश्लेषण करणारे अभ्यासू लेखक. आता लोकमत समूहाचे संचालक आणि राज्यसभेचे सदस्य. खासदार भारतकुमार राऊत यांच्या यापेक्षाही मोठ्या कर्तृत्वाच्या यादीत त्यांचा आध्यात्मिक विषयांवरचा अधिकार दुर्लक्षितच राहतो. श्रीमद्भगवद्घीतेवर पीएचडी असणा-या राऊतांनी काही वर्षांपूर्वी ‘महाराष्ट्र टाइम्स’चा आषाढी विशेषांक काढला होता. तीच ‘रिंगण’मागची प्रमुख प्रेरणा आहे. अशा जाणकार नजरेतले हे नामदेव.

देवा तुज आम्हीं दिधलें थोरपण।
पाहें हें वचन शोधूनियां॥
नसतां पतित कोण पुसे तूतें।
सांदिस पडतें नाम तुझें॥

साक्षात विठुरायाला असं खडसावणारे संत नामदेव यांचं व्यक्तिमत्व, त्यांची विचारसरणी आणि त्यांच्या रचना यांचा विचार करता त्यांना रुढ अर्थानं ’संत’ म्हणणं हा दांभिकपणा ठरेल, परंतु नामदेव ख-या अर्थानं ’संत’च होते. कारण त्यांची ईश्वरभक्ती केवळ भावनेपोटी वा भीतीपोटी नव्हे, तर तर्काच्या कसोटीवर तपासून घेतलेली होती. नामदेवांनी देशाला विठ्ठलभक्ती शिकवली. त्यांचा विठ्ठल या नावातील दैवी शक्तीवर विश्वासही असावा, पण ज्या भक्तीनं अन्य संत व वारकरी यांनी विठ्ठल या देवाची पूजा बांधली आणि त्याच्या समोर शरणागती पत्करली, तसं करणं नामदेवांना मान्य नसावं. त्यामुळेच ‘पतितपावन नाम ऐकुनी आलों मी द्वारां। पतिपावन नव्हेसी म्हणुनी जातों माघारा॥’ या प्रसिद्ध अभंगाच्या अखेरच्या चरणात नामदेव देवाला ’नामा म्हणे देवा तुझें न लगे मज कांही’, हे सुद्धा स्पष्ट करतात. मराठी संत परंपरेतील अनेक संतांनी आपल्या रचनांमधून बंडखोरी केल्याचं वाचायला मिळतं. पण नामदेवांचं बंड केवळ त्यांच्या रचनांमध्ये नाही, तर त्यांच्या वर्तणुकीतूनही वारंवार दिसत राहतं.

संत ज्ञानेश्वरांचे ते समकालीन. त्यांनी एकत्र प्रवासही केला. परंतु ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर नामदेव पुढे ५४ वर्ष जगले. या काळात त्यांनी खचून न जाता पंजाबपर्यंत प्रवास केला आणि तिथं पंजाबी भाषा शिकून गुरुमुखीत रचना केल्या. शिखांच्या पवित्र गुरु ग्रंथसाहेबात नामदेवांच्या ६२
रचनांचा समावेश असल्याचं पाहायला मिळतं. हीसुद्धा नामदेवांची एक प्रकारची बंडखोरीच. नामदेव उत्तरेचा प्रवास करत होते, तेव्हा यवनांच्या आक्रमणांचा दररोज धोका होता. त्यांच्यासाठी हा नवखा प्रांत होता. मात्र तरीही घाबरून न जाता त्यांनी मार्गक्रमणा केली आणि आपलं ईप्सित कार्य संपवल्यावर ते पुन्हा महाराष्ट्रातही आले. हा पराक्रम करणं एखाद्या बंडखोरालाच शक्य होतं.

देवाचं देवपण हे मनुष्याच्या दुबळेपणात, त्याच्या व्याधींमध्ये आणि त्याच्यावर कोसळणा-या संकटांमुळे भयग्रस्त होणा-या त्याच्या मनात आहे, असा सिद्धान्त नामदेवांनी मांडला.

रोग व्याधि पीडा जनांसी नसती।
तरि कोण पुसती वैद्यालागी॥
…नामा म्हणे विठो दैवें आलों घरा।
नको लावूं दारा आम्हालागीं॥

या अभंगमालिकेत नामदेवांनी हाच सिद्धान्त मांडला आहे. ’माणसे माणसांवर चिडतात; त्यांच्याशी भांडणे उकरून काढतात; त्यांना बोल लावतात, पण देवाच्या बाबतीत असं कोणी करत नाही. आपल्या बाबतीत काही वाईट घडलं, तरी त्याला कारण आपणच, मात्र चांगलं झालं, तर ते देवाचे उपकार, असं मानण्याची प्रवृत्ती असते. नामदेव मात्र त्यातले नाहीत. त्यांचं विठ्ठलावर निस्सीम प्रेम तर आहेच, पण वेळप्रसंगी ते देवालाही शेलक्या भाषेत दूषणे देण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. प्रसंगी रस्त्यावरच्या भांडणांप्रमाणे हमरी-तुमरीवरही येतात. एका अभंगात ते चिडून देवाला म्हणतात,

मुळीच मी जाणें तुझा ठेंगेपणा। काय नारायणा बोलशील॥
पुरे पुरे आता तुमचे आचार। मजशीं वेव्हार घालूं नको॥
लालुचाईंसाठीं मागे भाजीपाना। लाज नारायणा तुज नाहीं॥
नामा म्हणे काय सांगों तुझी कीर्ती। वाउगी फजिती करुं तुज॥

नामदेव जन्माने शिंपी होते. त्यांचा जन्म पंढरपुरातलाच. त्यामुळे बालवयापासून तिथल्या विठ्ठलाशी त्यांची सलगी. कदाचित त्यामुळेच नामदेवांनी आपल्या रचनांत असं स्वातंत्र्य घेतले असेल का? पण इतर वेळी देवावर अतोनात प्रेम करणारे नामदेव जेव्हा त्याच्यावर चिडतात, त्याला कारणेही तशीच असावीत. कुठे काही अन्याय झालेला त्यांना दिसला आणि भगवंतांनी काहीच केलं नाही, असं त्यांना वाटलं की, नामदेवांची बंडखोर वृत्ती उफाळून यायची. दक्षिण मावळ प्रांतात पाण्याचं दुर्भीक्ष्य झालं, तेव्हा नामदेव चिडले. त्यांनी लिहिलं,

काय तुज देवा आले थोरपण। दाविशी कृपण उणें पुरें॥
पुरे आतां सांगों नको बा श्रीहरी। गोकुळाभीतरीं खेळ मांडी॥
हलाहल शांत करी तत्क्षण। अमृतजीवन नाम तुझें॥
तुझें नाम सर्व सदा गोपाळासी। नामा म्हणे यासी काय जालें॥

दुष्काळ संपेना आणि माणसांचे कष्टसुद्धा वाढतच चालले, तेव्हा नामदेव आणखी चिडले. कमरेवर हात ठेवून शांतपणे उभा राहिलेला विठुराया आता त्यांना चीड आणत होता. नामदेव त्या निर्गुणपणाच्या मूर्तीकडे पाहत लिहितात,

निर्गुणपणाच्या घेसी अभिमाना। तुज नारायणा सोडी नामी॥
काय तुझी भीड धरावी म्यां आतां। कृपाळू अनंता म्हणें नामी॥

नामदेवांचा राग असा होता.

कल्पतरुतळीं बैसलिया। कल्पिलें मळ न पाविजे॥
कामधेनु जरी दुभती। तरी उपवासी कां मरावें॥
उगे असा उगे असा। होणार ते होय जाणार तें जाय॥
नामा म्हणे केशवा काय तुझी भीड। संता महंतां देखतां सांगेन तुझी खोड॥

हातात वीणा आणि चिपळ्या घेऊन फिरतानाचं नामदेवांचं चित्र आपण नेहमीच पाहतो. पण या शांत दिसणा-या चेह-याच्या आड एक बंडखोर दडला आहे, हे कोणास कसे कळावे? नामदेवांच्या साक्षात भगवंतांविरुद्धच्या सततच्या बंडाचे कारण तरी काय असावे? ईश्वरावर अंधश्रद्धा असणा-यांची लुबाडणूक आणि फसवणूक पंढरपुरातलेच बडवे करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं. अशा अंधश्रद्धेपासून जनतेला दूर करून त्यांना कर्मयोगाच्या मार्गाला लावण्याचा अंतस्थ हेतू नामदेवांच्या रचनांतील बंडखोरीत असावा. केशवसुतांनी ‘देव दानवा नरें निर्मिले, हेत लोका कळवूं द्या।’, असं लिहिलं. नामदेव हे त्यांचेच पूर्वज असावेत. कारण त्यांनी केशवालाच लबाड म्हटलं.

साचपण ब्रीद सोडविन तुझ्या। आता केशिराजा पण हाचि॥
लबाड तूं देवा लबाड तूं देवा। लबाड तूं देवा ठावा आम्हां॥
काय मूर्खपणें सांगशिल गोष्टी। थोरपणें ओठीं पुरे आतां॥
नामा म्हणे काय खवळिसि आम्हां। लाज नाहीं तुम्हा कवणेविसीं॥

अशा बंडखोरीच्या रचना करतानाच नामदेव भक्तांना एक महत्त्वाची शिकवण देतात, ती कर्मयोगाची आहे. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत वीर अर्जुनाला कर्मयोगाची शिकवण दिली. तीच पुढे लोकमान्य टिळकांना भावली आणि त्यांनी गीतारहस्य म्हणजेच कर्मयोगशास्त्र विशद केलं. नामदेव ज्ञानेश्वरांच्या संगतीत राहिले. त्यांनी नेमके हेच सांगितलं.

मीच माझा देव मीच माझा भक्त। मी माझा कृतार्थ सहज असे॥
बंध आणि मोक्ष मायेची कल्पना। पडली होती मना भ्रांती कैसी॥
विठ्ठले विचारें दाखविलें सुख। होते जे अशंख हरपले॥
नामा म्हणे सोय सांपडली निकी। जालो येकायेकी हरिचा दास॥

हे मंथन करताना नामदेवांमधला बंडखोर शस्त्रे खाली टाकतो आणि तो देवाचरणी लीन होतो. त्यांची महती हीच आहे. नामदेवांच्या बंडाच्या कथा श्रवण केल्यानंतर हा अभंग अंतर्मुख करायला लावणारा आहे. नामदेवांची महती त्यातच आहे.

तुझा दास मी तों राहिलों होवोनि। बोल चक्रपाणी पुरे आतां॥
जावो प्राण आतां न सोडिन संग। नव्हति याउगे बोल माझे॥
श्रुति स्मृति वेद काव्यें ही पुराणें। तीं तुज भूषणें सुखें मानूं॥
काय हानि जाली सांगा मजपाशी। उद्धारा जगासी नामा म्हणे॥

0 Shares
विनम्र बंडखोरी खरे चमत्कार