पहिला कीर्तन कुळवाडी

अंजली मालकर

मृदंगाच्या ज्या ‘धुमाळी’वर वारकरी ठेका धरतात, टाळांच्या ओळी झुलू लागतात, लीलया ‘पावली’ खेळू लागतात, सहज गिरक्या घेत विठूनामाचा गजर करतात, ब्रह्मानंदी टाळी लावतात तो 'ठाय धुमाळी' ताल नामदेवांनी पंजाबातून आणला. ‘धूम’ या नादाची आळी - माळ म्हणजे धुमाळी. ‘बैसाखी’च्या वेळी ‘बल्ले बल्ले’ म्हणत ‘भांगडा’ करायला लावणा-या या रांगड्या पंजाबी ठेक्याला नामदेवांनी महाराष्ट्रीय रूप दिलं. कीर्तन, अभंगातून रुजवलं...‘आम्हा कीर्तन कुलवाडी आणिक नाही उदीम जोडी’, असं मोठ्या अभिमानानं सांगणा-या नामदेवांमधल्या संगीतकारानं महाराष्ट्राचं संगीतही समृद्ध करून ठेवलंय. सांगत आहेत अंजली मालकर.

टाळ दिंडी हाती उभा महाद्वारी, नामा कीर्तन करी पंढरीये |
आवडीचेनि सुख वोसंडतु प्रेमे, गातो मनोधर्में हरिचे गुण ||

या अभंगात नामदेवांनी स्वतःचं अतिशय समर्पक असं वर्णन केलं आहे. वारकरी संप्रदायाचे आद्य कीर्तनकार म्हणून भागवत धर्माची पताका महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन विठ्ठल नामाचा प्रसार करणारे, पांडुरंगभक्तीशी एकरूप झालेले, हरी प्रेमाने ओसंडून वाहणा-या मनाला वाट करून देण्यासाठी हातात टाळ घेऊन विठोबाच्या महाद्वारावर मनापासून गायन करणारे नामदेव पंढरीत सर्वांच्या परिचयाचे होते.

मागे किती संत झाले | नाम्या ऐसे कोण बोले ||
नामा जाता राऊळासी | देव बोले आधी त्यासी ||

असं कौतुकाने सांगणा-या जनाबाई नामदेवांची निस्सीम विठ्ठलभक्ती सांगून जातात.

हाती वीणा मुखी हरी | गाये राऊळा भीतरी ||
देह भान विसरला | छंद हरीचा लागला ||

असं म्हणत हातात वीणा घेऊन मंदिरात देहभान हरपून नाचणा-या नामदेवांनी अभंग गायनातून वारकरी कीर्तन परंपरा निर्माण केली. या आधी हरिदासी कीर्तन प्रकार प्रचलित होता. नामदेवांनी नामस्मरणाला वारकरी कीर्तनात विशेष महत्त्व दिलं. हरीप्रेम, आत्मविवेकाचा उपदेश, समाज जागृती या सद्गुणांचा ऊहापोह ‘अभंग’ या साहित्य रचनेच्या प्रकारातून केला. तो कीर्तनातून सोप्या पद्धतीने सांगताना नामदेवांची रसाळ वाणी वारक-यांच्या हृदयाचा ठाव घ्यायची. त्यांच्या मधुर आवाजानं मंत्रमुग्ध झालेल्या वैष्णवजनांच्या सागराकडे पाहत परिसा भागवत म्हणतात,

दुधावरली साय तेवी वानु काय | तैसे गाणे गाय नामदेवा ||
परिसा म्हणे नाम्या तैसे तुझे गाणे | जैसे का नाणे टाकसाळीचे ||

जनसमुदायाला भक्तीरसात भिजवण्यासाठी कीर्तन प्रकाराचा अत्यंत प्रभावी उपयोग नामदेवांनी केला. कीर्तनात वापरल्या जाणाऱ्या संगीताची तीनही अंगे- गीत, वाद्य आणि नृत्य यांचा अतिशय नेमका उपयोग त्यांनी केला. भावार्थदीपिकेतले मर्म जाणणा-या नामदेवांनी ज्ञानदेवांसारखा ‘ओवी‘ गीतप्रकाराचा उपयोग न करता ‘अभंग’ या प्रबंध प्रकाराचा स्वीकार केला. (प्रबंध हा शब्द, स्वर आणि तालात बांधलेला गेय प्रकार मध्ययुगात प्रचलित होता) कारण ओवीतील अनिर्बंध (न बांधलेला, मुक्त) गायन स्वभाव (यात पद महत्त्वाचं असून स्वर, तालाला गौणत्व दिले जाते) सामूहिक आवाहनास अपुरा वाटला. अभंग या रचनेत स्वर, पद, तालाचा उपयोग करून समूहाला आकर्षून घेण्याचं कौशल्य होतं. नामदेवांना ते बरोब्बर कळलं. त्यांच्या अभंगातील सोपेपणा आणि वाणीतील रसाळपणा यामुळे अगदी लहानथोरांच्या तोंडी अभंग रुळलेही. सोपे अभंग सहजपणे म्हटले जाऊ लागले. नामदेवांचं कीर्तनातून समाज प्रबोधनाचं द्रष्टेपण ज्ञानदेवांनी हेरलं, त्यांच्या रसाळ गायनाचा प्रभाव पहिला आणि सहजच म्हणाले.

भक्त भागवत बहुसाल ऐकिले | बहु होऊनी गेले होती पुढे ||
परि नामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व | हा रस अद्भूत निरुपमु ||

भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी नामदेवांनी आयुष्य समर्पित केलं. त्यासाठी ते संपूर्ण देशभर हिंडले. ज्ञानदेवांबरोबर तीर्थयात्रा केली. पुढे एकट्याने महाराष्ट्राबाहेर गेले. समाजातील सर्व स्तरांतील लोकांमध्ये वावरले. सर्व प्रकारचं संगीत त्यांनी ऐकलं, समजून घेतलं. आपल्या कार्याला उपयुक्त अशा देशी संगीताची (सामान्य लोकांच्यामध्ये प्रचलित असलेले संगीत) निवड त्यांनी केली.

प्रेमपिसे भरले अंगी | गीते छंदे नाचो रंगी ||
कोण वेळे काय गाणे | हे तो भगवंता मी नेणे ||
वारा धावे भलतेया | तैसी माझी रंगछाया ||
टाळ मृदंग दक्षिणेकडे | आम्ही गातो पश्चिमेकडे ||
बोले बाळक बोबडे | तरी ते जननीये आवडे ||
नामा म्हणे केशवा | जन्मोजन्मी देई सेवा ||

असं म्हणत त्यांनी कलेतील शास्त्राविषयी अज्ञान प्रकट केलं असलं तरी, गायनातील माधुर्य, स्वर, लय, ताल आणि शब्दातून होणारी परिणामकारकता याचा अचूक अंदाज त्यांना होता. गायनातून प्रेमरसाची निर्मिती करून जनकल्याणाची भूमिका त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारली. वास्तविक कुठल्याही कीर्तनकाराप्रमाणे स्वरज्ञान, तालज्ञान, रागज्ञान नामदेवांनाही होतं. हाती वीणा घेतल्यावर तो लावण्यासाठी स्वर माहीत असावा लागतो. मृदंगावर वाजणारे बोल, त्याच्या नादाची पोत, कळावी लागते. अभंगांना अर्थानुरूप चाल लावण्यासाठी रागदारीचं ज्ञान आवश्यक असतं. नामदेवांनी यांचा बारकाईनं अभ्यास केल्याचं त्यांच्या अभंगावरून दिसतं.

महाराष्ट्राबाहेर पंजाबातील घुमान गावी अनेक वर्षं राहून विठ्ठलभक्तीचा महिमा त्यांनी अनेक रागांत गायला. राग बसंत, भैरव, मारुषभाईचा, कल्याण, सारंग, धनश्री, आसा, सोरठी, टोडी, गौड, रामगिरी इत्यादी रागांची नावं गुरुग्रंथसाहिबमध्ये सापडतात. नामदेवांच्या काळात अभंगांना रागांची नावं लिहिण्याची पद्धत नव्हती. मराठी अभंगांमध्ये आपल्याला कुठंही रागांची नावं दिसत नाहीत. गुरुग्रंथसाहेबात ही नावं नंतर लिहिली गेली. जरी नंतर लिहिली गेली तरी मौखिक परंपरेतून आलेल्या स्वरांना ओळखून ही राग नावं दिली आहेत.

मंदल्या जेती घरोघरी गाती | धृपदासाठी ताक मागती ||
नामा म्हणे सोपी कवित्वे जाली फुका | हरी हरी म्हणता आपुलिया सुखा ||

गायनातलं पांडित्य हे लोकांवर छाप पाडण्यासाठी नसून श्रीविठ्ठलाप्रती प्रेम भाव निर्माण करण्याकरिता आहे, असं जेव्हा निक्षून सांगतात तेव्हाच नामदेवांचा सांगीतिक अभ्यास दिसून येतो.

शिकला ते गाणे राग आळवण | लोकांरंजतण करावया ||
भक्तांचे ते गाणे बोबडिया बोली | ते ही श्री विठ्ठल अर्पियेला ||
नामा म्हणे बहुत बोलो आता काय | विठोबाचे पाय अंतरती ||

रागशास्त्र शिकून तयार झालेला अहंकार भक्तीमार्गापासून दूर नेतो, असं त्यांना वाटत असल्यामुळे कदाचित त्यांनी लौकिक अर्थानं संगीतशिक्षण घेतलं नसावं. त्यांनी स्वतःकडे गायन शिक्षणाच्या बाबतीत कमीपणा घेतला. असं असलं तरी वारकरी कीर्तनपरंपरेसारखी सशक्त कीर्तनपरंपरा निर्माण करण्याची ताकद त्यांच्या गायनात होती. कुठलीही परंपरा शतकानुशतकं प्रवाहित राहण्यासाठी सादरीकरणाला शास्त्रशुद्ध चौकटीची गरज असते. ती चौकट नामदेवांनी वारकरी कीर्तन परंपरेला दिली.

कीर्तनाच्या सुरुवातीला होणारा ‘जय जय राम कृष्ण हरी’चा गजर संगीताच्या भाषेत सांगायचं तर ‘सा ग प नि सां’ असा चढत्या क्रमानं, तर ‘सां ध प म ग सा’ असा उतरत्या क्रमानं होतो. यातून स्वर स्थानांचं नेमकेपण आणि आपण गाणार त्या पट्टीतील स्वर सप्तकाचा आवाका लक्षात येतो. नामगजरातून भक्तांना भक्तीचं आवाहन दिलं जातं. कीर्तन सुरू होण्याचा तो एक संकेत असतो. चढत्या आणि उतरत्या स्वरांच्या स्वरसंवादाची योजना नामदेवांच्या सांगीतिक प्रतिभेची साक्ष देतात. याचं मूळ पूर्वीच्या जाती गायन, प्रबंध गायन या शास्त्रीय गायन परंपरेत आढळतं. वारकरी कीर्तनात कीर्तन सादर करताना दहा-वीस टाळकरी मुख्य कीर्तनकाराच्या मागं उभे राहून टाळ मृदंगाच्या तालावर त्यांना साथ करतात. हे अनुकरण सामगायन संगीत परंपरेतील प्रस्तोता किंवा उद्गाता हा सर्वप्रथम गायल्यानंतर इतरांनी त्याला साथ करणे यातून आलं.

ज्या मृदंगाच्या तालावर वारकरी आणि कीर्तनकारात एकरूपता साधली जाते, त्यावर वाजवला जाणारा ‘ठाय धुमाळी‘ हा ताल नामदेवांनी पंजाबातून आणला. ‘धूम’ या नादाची आळी – माळ, म्हणजे धुमाळी. राग शास्त्रातील पंजाबी ठेक्याचं हे महाराष्ट्रीय रूप नामदेवांनी अभंगाबरोबरच कीर्तनात रुजवलं. त्यांनी जसं पंजाबात जाऊन तिथल्या समाजाशी एकरूप होत अनेक पदं मराठीमिश्रित हिंदीत लिहून विठ्ठल भक्ती व्यापक केली, तसंच नामदेवांनी पंजाबातून अनेक रागिण्या, ताल, पंढरपुरात आणून वारकरी कीर्तनाला सांगीतिकदृष्ट्या व्यापक बनवलं. जातीभेद, लिंगभेद, भाषाभेद या सर्व भेदांपलीकडे नेणा-या या वारकरी संप्रदायाच्या ‘किंकरानं’ कीर्तनातून संगीताच्या मूळ ध्येयाची- मोक्षप्राप्तीची आठवण समाजाला करून दिली.

गाऊ नाचू आम्ही आनंदे कीर्तनी |
भुक्ती मुक्ती दोन्ही मागो देवा ||

देशी नादसौंदर्याचा उत्सव

वारकरी परंपरेत संत मोठे झाले तरी त्या संतांपेक्षा त्यांचा ध्यास मोठा होता. वारक-यांच्या प्रत्यक्ष पांडुरंग दर्शनापेक्षाही त्या दर्शनाची लागलेली आस मोठी आहे. तिचा ठाव कसा घ्यायचा? कोणालाच कळलं नाही. पांडुरंगापेक्षा पांडुरंगाचं वेड मोठं आहे, हे दाखवणारी सर्जकता आपल्या लेखक, कलावंतांच्या ठायी प्रकट झाली नाही. नामदेवांच्या कीर्तनात नाचताना पांडुरंगाचा पितांबरही सुटला, इतका तो बेभान झाला, अशी आख्यायिका आहे. देवांनाही बेभान करणारी ही भक्ती काय आहे, तिचा नाद काय आहे हे कळल्याशिवाय ख-या वारक-याचं दर्शन कसं घडवता येणार?

ज्ञानेश्वर, तुकाराम या संतांची महत्ता जगाला ओरडून सांगण्यापर्यंत आपण आलो आहोत. पण यात आपण संत नामदेवांना थोडं साईडलाईन केलंय का? नामदेवांच्या अभंगात जो नाद, लय आणि तालाचा अपूर्व संगम आहे, जो देशी नादसौंदर्याचा अपूर्व उत्सव आहे, तसा अन्य संतांमध्ये अभावानेच आढळतो. ही नादमयता हा या परंपरेचा प्राण आहे. नामदेवांच्या कीर्तनात नाचताना विठ्ठलाचं धोतर सुटणं याला म्हणूनच एक अर्थ आहे. या नामदेवांच्या अभंगांच्या आत खोल बुडी मारली तर मला वाटतं आपल्याला वारकरी संगीत, वारकरी संप्रदाय आणि वारकरी परंपरेची लय सापडेल.

(`सत्यशोधक संघटक` नोव्हेंबर २००४ अंकातल्या जयंत पवार यांच्या लेखातला एक तुकडा)

0 Shares
सिंपियाचा पोर एक खेळिया सिंपियाचें कुळीं जन्म माझा झाला