धर्म जागो निवृत्तीचा

अभय टिळक

जी समाजव्यवस्था सामान्य माणसाचे जगण्याचे हक्क हिरावून घेते, ती व्यवस्थाच बदलण्याचा निश्चकय एक विचारी उमदा तरुण करतो. त्यासाठी आपल्या बुद्धिवंत धाकट्या भावाला या वैचारिक लढ्याचा सेनापती बनवतो. त्यांचं हे ‘डोकी’ बदलण्याचं ऐतिहासिक ‘मिशन’ अत्यंत यशस्वी होतं. थोरला भाऊ, गुरू निवृत्तीनाथ आणि त्यांचा शिष्य, धाकटा भाऊ ज्ञानदेव यांची ही खरीखुरी कहाणी आहे.

प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धच्या उठावाला आपण ‘बंड’ अथवा ‘क्रांती’ असं म्हणतो. अस्तित्त्वात असलेली व्यवस्था अनेकानेक कारणांपायी अनिष्ट आणि म्हणूनच नकोशी वाटणारे घटक ती व्यवस्था उलथून टाकण्यासाठी स्वतंत्ररीत्या अथवा संघटितपणे कार्यरत बनतात आणि त्यांतूनच बंड अथवा क्रांती निपजते. इथेही पुन्हा एक फरक करावा लागतो. तो असा की, प्रत्येक बंडाची परिणीती क्रांतीमध्ये घडून येईल, असं सांगता येत नसतं. त्याच न्यायानं, क्रांतीच्या उदरातून नवीन, पर्यायी आणि आधीच्या व्यवस्थेतील अवांछनीय पैलूंपासून मुक्त असलेली अधिक सुभग आणि सर्वकल्याणकारी अशी पर्यायी व्यवस्था साकारेलच, याचीही हमी कोणीच देऊ शकत नाही. प्रचलीत व्यवस्था मोडून टाकणं तुलनेनं सोपं असतं. परंतु, नूतन व्यवस्थेची घडी बसवायची तर काही एक जीवनदृष्टी आणि त्या जीवनदृष्टीची जडणघडण करणारं तत्त्वज्ञान, जुन्या व्यवस्थेविरुद्ध उठाव करणार्‍यांपाशी असावा लागतं. १९१७ साली रशियामध्ये झालेल्या बोल्शेविक क्रांतीचं उदाहरण या संदर्भात उद्बोधक ठरावा. कार्ल मार्क्स यांच्यासारख्या प्रतिभाशाली समाजचिंतक तत्त्ववेत्यानं निर्मिलेली तात्त्विक चौकट बोल्शेविक क्रांतीचं वैचारिक अधिष्ठान ठरली. एखाद्या सुसंगत, तर्कशुद्ध आणि समाजाभिमुख तत्त्वज्ञानाची बैठक नसेल तर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा उठाव हा निव्वळ ‘उठाव’च राहतो. त्यांतून पर्यायी व्यवस्थेची पायाभरणी आणि पुढे उभारणी शक्य होत नाही. संकुचित, वर्जनवादी आणि उतरंडप्रधान अशा वर्णाश्रमधर्म व्यवस्थेला एक सक्षम अशी सर्वोदार, सर्वसमावेशक, समताप्रधान पर्यायी व्यवस्था महाराष्ट्रातील भागवतधर्मीय वारकरी संतमंडळानं १३व्या शतकात इथे साकार केल्यामुळंच, संतांच्या कार्याला ‘चळवळ’ अगर ‘बंड’ असं संबोधणं अपुरं ठरतं. ज्ञानदेव आणि नामदेव हे उभयता त्या पर्यायी व्यवस्थेचे शिल्पकार असले तरी त्या व्यवस्थापरिवर्तनाला तशाच पर्यायी जीवनदृष्टीची बैसका पुरवली ती नाथ आणि भागवत या दोन संप्रदायांच्या संगमातून सिद्ध झालेल्या तत्त्वविचारानं, हे आपण कधीच नजरेआड करता कामा नये. आणि ती तात्त्विक बैठक सिद्ध करणारे दोन अग्रणी सुधारक म्हणजे गहिनीनाथ आणि ज्ञानदेवांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ. ज्या प्रमाणं ज्ञानदेवांच्या कार्यकर्तृत्त्वाचा विचार आपल्याला निवृत्तीनाथांना वगळून करता येत नाही; त्याच प्रमाणं, गहिनीनाथांना वेगळं काढून निवृत्तीनाथांच्या अजोड योगदानाचं आकलन करून घेणं अशक्य ठरतं. ‘निवृत्ती-ज्ञानदेव’ आणि ‘निवृत्ती-गहिनी’ या जोडविभूतींतील निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांच्या तर, गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांच्या कार्यकर्तृत्त्वात एकजीव झालेले दिसतात. भौतिकशास्त्रातील उदाहरणानुसार, गहिनीनाथ स्थितीज ऊर्जेप्रमाणे गणले तर निवृत्तीनाथ हे गतिज ऊर्जा ठरतात. आणि निवृत्तीनाथ हे स्थितीज ऊर्जा गणले तर ज्ञानदेव हे गतिज ऊर्जा ठरतात.

वयाच्या हिशेबानं बोलायचं तर निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांपेक्षा दोन वर्षांनी वडील आणि नामदेवांपेक्षा तीन वर्षांनी लहान. ज्ञानदेवादी तीनही भावंडांना नाथ संप्रदायाची विधिवत दीक्षा देणार्‍या निवृत्तीनाथांना नाथविचारांची दीक्षा मिळाली ती गहिनीनाथांकडून. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पश्‍चात धाकट्या तीनही भावंडांचं पालनपोषण करण्याची दुर्घट जबाबदारी निवृत्तीनाथांनी पुरेपूर निभावून नेल्याचा दाखला नामदेवरायांनी रचलेल्या ज्ञानदेवांच्या समाधिमहिम्यातील एका अभंगावरून आपल्याला मिळतो. ‘पाळिले पोसिले चालविला लळा | बा माझ्या कृपाळा निवृत्तिराया ॥’ अशा शब्दांत निवृत्तीनाथांमधील मोठ्या भावाचा तर, ‘स्वामिचिया योगे झालो स्वरूपाकार’, अशा शब्दांत, निवृत्तीनाथांमधील गुरुतत्त्वाचा गौरव ज्ञानदेव मोठ्या आदरानं करतात, असं नामदेवरायांनीच नमूद करून ठेवलेलं आहे. परमार्थपथावरील गुरू, मार्गदर्शक, हितचिंतक, वाटाड्या… अशा नानाविध स्वरूपांत ज्ञानदेवादी तीनही भावडांच्या अभंगवचनांद्वारे निवृत्तीनाथ आपल्या पुढ्यात अवतरत राहतात. निवृत्तीनाथांच्या नावे उपलब्ध असणारी अभंगसंपदाही तशी मोजकी म्हणजे साधारणपणे पावणेचारशेच्या आसपास इतकीच भरते. संख्येनं मोजकी असली तरी, ही सारी अभंगसंपदा आध्यात्मिक अनुभूतीनं आणि योगविषयक शब्दकळेनं परिपूर्ण नटलेली आहे. एका अत्यंत सजग, तर्कनिष्ठ, अंतर्मुख, प्रज्ञाशील, प्रेमळ, समताप्रधान आणि प्रखर लोकहितैषी मनातून ही सारी अभंगरचना स्त्रवलेली आहे, याची प्रचिती निवृत्तीनाथांचा गाथा सहज चाळला तरी आपल्याला पानोपानी येते. परंतु, त्याच वेळी निवृत्तीनाथांच्या प्रखर बुद्धिमत्तेनं आपण दीपूनही जातो. ज्ञानदेवांमध्ये जितक्या सहजपणे त्यांच्या ठायीच्या माउलीपणाचा अनुभव येऊन आपण सलगी करण्यास सरसावतो तसं निवृत्तीनाथांच्या बाबतीत करण्यास मात्र मन धजावत नाही. ते स्वाभाविकही आहे म्हणा. कारण, तत्कालीन समाजव्यवहारात प्रचलीत असणार्‍या अत्यंत बलिष्ठ, जाचक आणि भेदकारक व्यवस्थेला तसाच सक्षम पर्याय निर्माण करणार्‍या विचारव्यूहाला समाजव्यवहारात समूर्त करण्याची प्रेरणावजा आज्ञा देणारं एक अत्यंत निर्भीड, अस्सल बंडखोर असं निवृत्तीनाथांसारखं व्यक्तिमत्त्व तितकंच धगधगीत असावं, हे ओघानंच येतं. आदिनाथ शंकरांपासून प्रवाही बनलेली शैवागमाची तत्त्वधारा ताकदीनं पेलणारे, गुरूकडून आणि गुरूच्या मुखातून केवळ त्याच्या शिष्याकडेच जे हस्तांतरित केलं जायचं ते शैवागमाचं तत्त्वज्ञान समाजपुरुषाच्या पुढ्यात खुलेआम प्रगट करण्याची आपल्या सद्गुरूंची आज्ञा तंतोतंत पाळणारे, त्या तत्त्वज्ञानाचं प्रगटीकरण घडवून आणण्यासाठी परंपरामान्य अशा अनुरूप ग्रंथाची निवड सुचविणारे निवृत्तीनाथ जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजवर प्रामाणिकपणे केलेलाच नाही.

समाजव्यवहाराचा पोत अंतर्बाह्य पालटून टाकणार्‍या काही कर्तृत्त्ववान व्यक्तींची कर्तबगारी सतत उलगडणार्‍या घटनाक्रमांतून साकारत जाते. तर, काही अलौकिक विभूतींची एखादीच कृती समाजव्यवस्थेत दूरगामी आणि विलक्षण मूलभूत स्वरूपाचे परिवर्तन घडवणारी अशी असते. गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथ या दोघांची गणना दुसर्‍या वर्गातील लोकोत्तरांमध्ये करावी लागेल. गहिनीनाथांच्या आदेशानुसार निवृत्तीनाथांनी जी ऐतिहासिक कलाटणी त्यांच्या परंपरेतील ज्ञानव्यवहाराला दिली तिचं नेमकं विवरण ज्ञानदेवांनी त्यांच्या गीताटीकेच्या उपसंहारामध्ये केलेलं सापडतं. त्या ओव्या मुळातूनच बघायला हव्यात. ज्ञानदेवांच्या कथनानुसार, शांभवाद्वयाचा शंकरांपासून उचललेला तत्त्वविचार मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांकडे सुपूर्त केला. गोरक्षांनी तोच ज्ञानठेवा गहिनीनाथांकडे हस्तांतरित केला. परंपरेनं गुरुमुखातून आलेलं संप्रदायाचं ज्ञान गुरूने केवळ आणि केवळ त्याच्या शिष्याकडेच अ-प्रस्फूटितपणे सोपविण्याच्या तेथवरच्या ज्ञानव्यवहार परंपरेला एक नवीन वळण देण्याची पहिली क्रांतिकारक कृती केली ती गहिनीनाथांनी. गहिनीनाथांनी त्या टप्प्यावर घेतलेल्या एका अभूतपूर्व निर्णयामुळं तिथून पुढे त्या सगळ्याच प्रवाहाची दिशा ज्या निर्णायक पद्धतीनं बदलली त्यांबद्दल ‘ज्ञानेश्वरी’च्या उपसंहारात ज्ञानदेव म्हणतात :

तेणें कळिकळितु भूतां | आला देखोनि निरुता |
ते आज्ञा श्रीनिवृत्तिनाथा | दिली ऐसी ॥
ना आदिगुरू शंकरा | लागोनि शिष्यपरंपरा |
बोधाचा हा संवसरा | जाला जों आमुतें ॥
तो हा तूं घेऊनि आघवा | कळीं गिळितयां जीवा |
सर्व प्रकारी धांवा | करीं पां वेगीं ॥
आधींच तंव तो कृपाळू | वरी गुरुआज्ञेचा बोलू |
जाला जैसा वर्षाकाळू | खवळणें मेघां ॥
मग आर्ताचेनि वोरसे | गीतार्थग्रंथनमिसें |
वर्षला शांतरसें | तो हा ग्रंथु ॥

नाथ संप्रदायातील सर्वसमावेशकतेचा आविष्कार आपल्याला घडतो तो या ठिकाणी. तत्कालीन परिस्थितीमध्ये त्या वेळच्या समाजव्यवस्थेची धारणा करण्यासाठी सर्वार्थानं प्रस्तुत असणारं शांभवाद्वयाचं तत्त्वज्ञान आणि त्या तत्त्वज्ञानातून निपजणारी लौकिक समाजव्यवहारासंदर्भातील जीवनदृष्टी समाजव्यवस्थेत प्रस्थापित करण्यासाठी गहिनीनाथ आज्ञा देतात ती निवृत्तीनाथांना. आणि जगाच्या कल्याणासाठी मुळातच आसुसलेलं निवृत्तीनाथांचं समाजमनस्क व्यक्तिमत्त्व ती आज्ञा व्यवहारात राबविण्यासाठी कृतिशील बनतं. निवृत्तीनाथांच्या त्या कृतिशीलतेची समूर्त पावती म्हणजे गीतेवर ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या रूपानं केलेलं भाष्य. लौकिकार्थानं आपण ‘ज्ञानेश्वरी’ला गीतेवरील भाष्य अथवा टीका असं संबोधत असलो तरी ज्ञानदेवांच्या मते तो एक स्वतंत्र प्रबंध आहे. आणि मुख्य गोष्ट म्हणजे, गीतेच्या निमित्तानं शांभवाद्वयाचं, एकजिनसी समाजरचनेस पूरक आणि उपकारक असं तत्त्वज्ञान प्राकृतासारख्या तत्कालीन लोकभाषेमध्ये शब्दबद्ध करण्याची प्रेरणा आहे ती निवृत्तीनाथांची. ज्ञानदेवांच्याच साक्षीनुसार –

परी साचचि गुरुनाथें | निमित्त करूनि मातें |
प्रबंधव्याजें जगातें | रक्षिले जाणा ॥

जगाची व्यवस्था सुविहितपणे चालावी यासाठी शांभवाद्वयाचं तत्त्वज्ञान दोन्ही हातांनी समाजपुरुषाच्या ओंजळीत घालण्यामागील निवृत्तीनाथांची प्रेरणा ही विशुद्ध ऐहिक (सेक्युलर) आहे, हे वास्तव या ठिकाणी अधोरेखित करावयास हवं. जगाची व्यवस्था रक्षण करायची म्हणजेच अनादी काळापासून उत्क्रांत होत आलेली ही ‘समाज’ नावाची लोकसंस्था जोपासायची. निवृत्तीनाथांच्या त्याच प्रेरणेचा उच्चार ‘ज्ञानेश्वरी’च्या तिसर्‍या अध्यायातील एका ओवीत ठसठशीतपणे आढळतो. अर्जुनाला उपदेश करताना बोलणार्‍या श्रीकृष्णाच्या मुखातून उभ्या संतपरंपरेच्या समाजधारक उद्योगाची ऊर्मी व्यक्त करताना ज्ञानदेव म्हणतात –

जे पुढतपुढती पार्था | हे सकळ लोकसंस्था |
रक्षणीय सर्वथा | म्हणऊनियां ॥

‘समाज’ नावाची लोकसंस्था रक्षणीय असते आणि ती निकोपपणे उत्क्रांत होत राहावी यासाठीच समाजमनस्क विवेकी व्यक्तींनी कार्यतत्पर बनायचं असतं, ही भागवत धर्मानं प्रस्थापित केलेल्या संतत्वाची जी आद्यखूण आहे तिचा उच्चार आपल्याला इथं गवसतो. नाथ आणि भागवत या दोन पंथविचारांतील समन्वयाचा अवकाश आपल्याला इथं आकळतो. या दोन पंथविचारांचा समन्वय साधणं निवृत्तीनाथांना शक्य बनलं तेही गहिनीनाथांच्या व्यक्तिमत्त्वामुळंच.

तत्कालीन एकंदरच समाजव्यवहारावर वैदिक तत्त्वविचाराची प्रचंड पकड होती. वणाश्रमधर्मपद्धतीचा पुरस्कार करणारी आणि जन्मजात अधिकारभेदाची उतरंड समाजव्यवहारात प्रस्थापित करणारी ती सारीच व्यवस्था आणि तिच्या मुळाशी असणारी जीवनविषयक दृष्टी स्वरूपत:च वर्जनवादी होती. चारी वर्णांतील स्त्रियांचा आणि शूद्रातिशूद्रांचा आत्मसन्मान पुरता पायदळी रगडणार्‍या त्या व्यवहारव्यवस्थेमध्ये लौकिक जीवनाची उभारणी करणार्‍या प्रवृत्तीपर जीवनदृष्टीला अवकाशच नव्हता. सरसहा निवृत्तीपर विचाराचं वर्चस्व नांदवणार्‍या अशा जीवनविषयक तत्त्वज्ञानानं, निकोपपणे केलेल्या शुद्ध प्रपंचापेक्षाही संन्यासाची महत्ता शिरोधार्ह मानावी, हे स्वाभाविकच होतं. रोजच्या जगण्याचा भाग असलेला संसार आणि तो समर्थपणे करण्यासाठी अनिवार्य असणारी प्रापंचिक कर्म निकृष्ट मानून त्यांच्या त्यागालाच पुरुषार्थ समजणार्‍या त्या तत्त्वविचारापायी जवळपास संपूर्ण समाजच एक प्रकारच्या परात्मभावात जगत राहावा, हे ओघानंच येतं. त्यांतच, साध्या डोळ्यांना दिसणारं जग हे मायिक आहे, असा एकदा शिक्का मारल्यानंतर त्या जगातील जे जे काही हिणकस आहे ते सुधारण्याच्या जबाबदारीतून समाजव्यवहारातील समजदार, ज्ञानी, जाणत्या व्यक्ती आपोआपच मुक्त होतात. अशी लोकसंस्था वरकरणी कितीही गोजिरवाणी दिसली तरी आतून ती खंगलेली, खुरटलेली, रोगट आणि म्हणूनच कमालीची विसविशीत झालेली असते. अशा समाजव्यवस्थेची पुनर्बांधणी करायची तर लौकिक जीवनाकडे निकोपपणे बघणार्‍या प्रवृत्तीपर विचारव्यूहाची बैठक जीवनव्यवहाराला पुरवावी लागते. त्यासाठीच वैदिक विचारविश्वाला पर्यायी अशी शांभवाद्वयाची वैचारिक चौकट समाजव्यवहारात प्रस्थापित करण्यासाठी निवृत्तीनाथ प्रवृत्त करतात ते ज्ञानदेवांना. निवृत्तीनाथांच्या समग्र योगदानाचा गाभा त्यांच्या या एका कृतीमध्ये सामावलेला आहे. मुळातच नाथ संप्रदाय सर्वसमावेशक. त्यांतच, शांभवाद्वयामध्ये ‘माया’ या संकल्पनेलाच थारा नाही. दृश्यमान होणारं विश्व हे सत्य आणि अंतिम आहे. या जगातून सुटून त्यापेक्षा अधिक श्रेष्ठ अशा अन्य कोणत्याही जगात अथवा अस्तित्त्वाच्या पातळीवर पोहोचण्यातच मनुष्याच्या कर्तृत्त्वाचा कस लागतो, असं कोणतंही प्रतिपाद्य मुळातच इथं अप्रस्तुत. त्यामुळं, समाजव्यवहारातील हिणकस प्रवाहांचा बीमोड करण्यासाठी समाजातील विवेकी प्रवृत्तींनी कार्यतत्पर बनावयाचं असतं, हा शांभवाद्वयाच्या तत्त्वज्ञानाचा व्यावहारिक निष्कर्ष ठरतो. तीच कार्यतत्परता आपल्या पुढ्यात समग्रतेनं साकारते ती निवृत्तीनाथांच्या रूपानं.

शांभवाद्वयाचं तत्त्वज्ञान जगापुढं मांडण्यासाठी तत्कालीन प्रस्थापित परंपरेला मान्य असणारं असं एखादं माध्यम निवडण्यास अन्य पर्यायच नव्हता. त्यासाठी गीतेची निवड केली जावी, हे अतिशय स्वाभाविक ठरते. गीता आणि भागवत हे भागवत धर्माचे दोन प्राणभूत ग्रंथ. विष्णू ही भागवत धर्माची अधिष्ठात्री देवता. नाथ संप्रदायाच्या श्रद्धाविश्वात मच्छिंद्रनाथ हे नारायणाचे (पर्यायाने विष्णूंचे) अवतार तर, गहिनीनाथ हे नवनारायणांमधील ‘करभाजन’ नावाच्या नवव्या नारायणाचे अवतार. भागवत पुराणाच्या एकादश स्कंधातील नवनारायणच पुढे नवनाथांच्या रूपानं पुन्हा अवतीर्ण होतात, अशी नाथ संप्रदायाची श्रद्धा. त्यामुळं, नाथ आणि भागवत या दोन संप्रदायांमध्ये आंतरिक असं पूर्णत: जैविक नातं. त्यातच, नाथ संप्रदायाची जीवनदृष्टी विशद करणारं शांभवाद्वयाचं तत्त्वज्ञान आणि भागवत धर्माचा वैचारिक गाभा यांत विलक्षण साम्य. भागवत धर्माचा तत्त्वविचार समग्रतेनं गवसतो तो गीतेमध्ये. गीताविचार हा भागवत धर्मविचारच आहे, असं लोकमान्य टिळकांचं स्पष्ट प्रतिपादन आपल्याला त्यांच्या ‘गीतारहस्या’त सापडतं. भागवत धर्म हा प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोहोंचा समन्वय घडवून आणणारा आहे. असं असलं तरी तो मुळात प्रवृत्तीपर आहे, असा दाखला थेट महाभारतामध्ये सापडतो, असं लोकमान्यांचं प्रतिपादन आहे. शांभवाद्वयानुसार दृश्य जग हे पूर्णपणे सत्य आहे. तो मायेचा पसारा नव्हे. अशा जगात निकोपपणे जगायचं तर प्रवृत्तीपर जीवनदृष्टीच हवी. ती जीवनदृष्टी फुलते ती भागवत धर्मविचाराद्वारे. त्यामुळं, शांभवाद्वयाचं तत्त्वज्ञान आणि त्यातून उमलणारी जीवनदृष्टी तत्कालीन समाजाच्या पुढ्यात मांडण्यासाठी गीतेइतका योग्य अन्य कोणताच ग्रंथ निवृत्तीनाथांसमोर नसावा, हे अतिशय स्वाभाविक आहे. त्यातच, गीता म्हणजे वेदान्ताचं सार. त्यामुळं वैदिकांनाही तो वंद्य. हा सगळा व्यूह नजरेसमोर ठेवून, समाजरचनेस उपकारक आणि आवश्यक ठरणारं शांभवाद्वयाचं तत्त्वज्ञान तत्कालीन ज्ञानव्यवहारात प्रचलीत करण्यासाठी निवृत्तीनाथांना गीताग्रंथाची निवड करावीशी वाटते, यात आश्‍चर्य वाटण्याजोगं काहीच नाही. ज्ञानेश्वरीच्या निर्मितीचं सारं श्रेय ज्ञानदेव त्यांच्या गुरूंना म्हणजेच निवृत्तीनाथांना देतात यात गुरूगौरवाचा भाग असणं स्वाभाविक असलं तरी, भाष्य करण्यासाठी गीतेची निवड करण्याची निवृत्तीनाथांची प्रगल्भ सूचकता ज्ञानदेव पदोपदी प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे निर्देशित करतात, ही वस्तुस्थिती आपण नजरेआड करता कामा नये.

तैसें निवृत्तिनाथाचें | गौरव आहे जी साचें |
ग्रंथु नोहे हें कृपेचें | वैभव तयें ॥

ही एक ओवी केवळ उदाहरणार्थ या संदर्भात पुरेशी ठरावी. नाथ आणि भागवत या दोन संप्रदायविचारांचा असा मनोज्ञ समन्वय घडवून आणणं, ही निवृत्तीनाथांची अजोड कृती ठरते.

निवृत्तीनाथांचं असंच दुसरं अजोड कर्तृत्त्व म्हणजे शिव आणि विष्णू तथा श्रीविठ्ठल यांचा त्यांनी साधलेला मिलाफ अथवा समन्वय. नामदेवरायांच्या माध्यमातून या भूमीमध्ये रुजलेली विठ्ठलभक्ती आणि गहिनीनाथांच्या कर्तृत्त्वातून याच भूमीत बीजारोपण झालेली नाथ संप्रदायाची विचारधारा यांचा संगम निवृत्तीनाथांच्या व्यक्तिमत्त्वात साकारलेला प्रतीत होतो. नाथपरंपरेतून प्रवाहित होत आलेली शिवाची अर्चना आणि गहिनीनाथांनी प्रदान केलेली कृष्णोपासना निवृत्तीनाथांच्या माध्यमातून या भूमीतील भक्तिविश्वात एकत्रित नांदती झाली. कृष्णभक्तीची गहिनीनाथांकडून प्राप्त झालेली प्रेरणा, ‘निवृत्ति सुंदर कृष्णरूप सेवी | गयनी गोसावी उपदेशिलें ॥’ अशा शब्दांत निवृत्तीनाथ व्यक्त करतात. शिव आणि कृष्णरूप विष्णू यांचं हेच ऐक्य निवृत्तीनाथ वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान असणार्‍या विठ्ठलदेवामध्ये प्रगट करतात. आपल्या भावभक्तीच्या बळावर पुंडलिकानं बाळकृष्ण रूपातील विष्णुतत्त्वाला पंढरीस आणलं, हा कथाभाग विख्यात आहे. मात्र, पंढरीस पुंडलिकासाठी विटेवर तिष्ठत उभ्या असलेल्या विठ्ठलाचं एक गुज (म्हणजे गौप्य) स्वत: गहिनीनाथांनीच आपल्याला सांगितलं आहे, असं आपल्या एका अभंगात निवृत्तीनाथ, ‘निवृत्तिचें गूज विठ्ठल सहज | गयनीराजें मज सांगितलें ॥’ अशा शब्दांत प्रगट करतात. गहिनीनाथांनी सांगितलेलं हे गुज नेमकं कोणतं हेही निवृत्तीनाथ, ‘विष्णुसहित शिव आणिला पंढरी | केलें भीमातीरीं पेखणें जेणें ॥’ अशा नि:संदिग्ध शब्दांत उघड करून टाकतात. पंढरीक्षेत्रात विटेवर विठ्ठलरूपानं नांदणारं विष्णुतत्त्व एकटं नसून तिथं ते शिवासहित विराजमान आहे, असं प्रतिपादन करून, तत्कालीन व्यावहारिक भक्तिविश्वात कडोविकडीनं लढवल्या जाणार्‍या शैव आणि वैष्णव यांच्यादरम्यानच्या वादाचा उपसर्ग वारकरी संप्रदायाला अणुमात्रही शिवू नये याची दक्षता निवृत्तीनाथ विलक्षण प्रगल्भतेनं घेतात. केवळ इतकंच नाही तर, ‘आदिपीठ देव ब्रह्म हें स्वयमेव| पुंडलिक भाव प्रगटला ॥’ असा नि:संदिग्ध पुकारा करीत निवृत्तीनाथ, वैदिकांनाही श्रीविठ्ठलाचं माहात्म्य सांगतात.

सर्वोदार, भक्तसुखाला आसुसलेलं देवत्व केवळ प्रस्थापित करून भागणारं नसतं. अशा देवत्वाच्या उपासनेद्वारे व्यावहारिक समाजजीवन निकोप बनवणार्‍या कोणत्या जीवनमूल्यांची उपज भक्तीच्या व्यवहारातून साकार होणं अपेक्षित आहे, हेसुद्धा समाजमनाला नीट समजावून सांगावं लागतं. भागवत धर्माला अभिप्रेत असणार्‍या संतत्वामध्ये लोकशिक्षकाचा अंश म्हणूनच अतिशय मोठा आणि गाभारूप आहे. हा गाभा निवृत्तीनाथांच्या उभ्या व्यक्तिमत्त्वाद्वारे सतत प्रगटताना आपल्याला प्रतीत होतो तो त्यांच्या अभंगकळेत. नाथपंथ हा योगपंथ गणला जातो. साहजिकच, सिद्ध, योगी यांचं माहात्म्य या संप्रदायात स्वयंसिद्धच आहे. परंतु, हे योगीतत्त्व विश्वाकडे पाठ फिरवणारं नसून ते समानसन्मुख आहे आणि असा योग साधण्यासाठी प्रापंचिक, लौकिक जीवनावर तुळशीपत्र ठेवून वन-कानन सेवन करण्याची अजिबात गरज नसते, हे निवृत्तीनाथ समाजाला पटवून देतात. नामसंकीर्तनासारखं लौकिक व्यवहारातील दैनंदिन कामकाजाशी अविरोध असणारं साधन हेच योगाचं मर्म होय. हे तत्त्व “सर्वभूतीं दया शांति पैं निर्धारी | तो योगी साचार जनीं इये ॥ नलगे मुंडणें काया हे दंडणें | अखंड कीर्तनें स्मरे हरी ॥” अशा मार्मिकपणे निवृत्तिनाथ व्यक्त करतात. परंतु, कीर्तनाचंदेखील अपेक्षित फल काय, असा प्रश्‍न खाली उरतोच. ‘निवृत्ति समता विठ्ठल कीर्तन | करितां अनुदिन मनमेळे ॥’ अशा अलौकिक पद्धतीनं कीर्तनभक्तीची अपेक्षित फलश्रुती निवृत्तीनाथ आपल्या पुढ्यात मांडतात. विठ्ठलकीर्तनाद्वारे अनुदिनी समता नांदणं निवृत्तीनाथांना अपेक्षित आहे. निवृत्तीनाथांचं हे वचन म्हणजे आजच्या यच्चयावत कीर्तनकारांसाठी आरसाच ठरावा. आमचं व्यक्तिगत तसंच सामाजिक जीवन शुद्ध बनायचं असेल तर द्वैताला तिलांजली देणं भाग आहे. आणि समतेचा अंगीकार केल्याखेरीज द्वैताचा निरास होणार नाही, हा कार्यकारणभाव ‘समता धरा आधीं टाका द्वैतबुद्धी’, अशा तळमळीनं निवृत्तिनाथ प्रतिपादन करतात. अहंकाराचा विलय घडवून आणल्याखेरीज समता प्रस्थापित होणं अशक्य आहे आणि नामजपासारखं साधन हे मुळात अहंकाराचं विसर्जन घडवून आणण्यासाठी अंगीकारायचं असतं, या अतिशय मूलभूत पैलूकडे निवृत्तिनाथ आपलं लक्ष वेधतात. किंबहुना, अंत:करणात समतेचा भाव प्रस्थापित न करता केलं जाणारं जपजाप्य हे निव्वळ कर्मकांड ठरतं, असं सूचीत करताना, ‘रामराम जप समत्वें साधावा | अहंकार टाकावा अहंबुद्धी ॥’ अशी विनवणीवजा जाणीव ते आपल्याला करून देतात. अहंकाराचं विसर्जन केवळ पारमार्थिक सत्याच्या प्राप्तीसाठीच करायचं असतं, हा आपला भ्रम मुळापासून काढण्यासाठी निवृत्तीनाथ अनेक अभंगांमधून तळमळीनं व्यक्त होत राहतात. लौकिक व्यवहारातही समतेचं साम्राज्य नांदण्यासाठी अहंबुद्धीला सोडचिठ्ठी देणं भाग आहे, हा निवत्तीनाथ प्रतिपादन करत असलेला रोकडा व्यवहारवाद आपण सर्रास कानामनाआड करतो. पारमार्थिक क्षेत्रात महत्ता गाजणार्‍या मोक्षाची लौकिकातील अभिव्यक्ती आणि प्राप्ती अहंकाराच्या निर्मूलनामध्येच गवसते, असा निवृत्तीनाथांचा निखळ आणि थेट सिद्धांत आहे. ‘समता वर्तावी अहंता खंडावी | तेणेंचि पदवी मोक्षमार्ग ॥’ हे निवृत्तीनाथांचं आवाहन आपल्या जाणीवेपर्यंत कधी तरी पोहोचतं का?

आकलनाच्या चिमटीत सहजासहजी न येणारं ‘निवृत्ती’नामक हे व्यक्तिमत्त्व आणि तत्त्व असं विलक्षण सखोल आणि सधन आहे.

0 Shares
वटवृक्ष पारंब्या