दोन आधारवड

डॉ.श्यामसुंदर मिरजकर

आपल्या गुंफेत नामदेव नसल्यामुळे संत निवृत्तीनाथांचा ‘थोडा जीव’ होता. त्यांना नामदेवरायांची महती जितकी कळली होती, तितकी कुणालाही माहीत नव्हती बहुतेक. नामदेवांनीही निवृत्तीनाथांचं आयुष्य नेमकेपणानं उभं केलंय. हे दोन संघटक चंद्रभागेच्या तीरावर झालेल्या क्रांतीचे आधारवड होते.

वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू संत नामदेवांचा सगळ्या संतमंडळींशी असणारा जिव्हाळा भावोत्कट होता. संत निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांशी नामदेवांचं असणारं नातं करुणकोमल होतं. वारकरी संप्रदायाच्या जडणघडणीचे जागते ऐतिहासिक भान असणारे नामदेव आपली प्रत्येक कृतीउक्ती विचारपूर्वक करीत. पंढरीत भक्तिध्वजा उंच फडकवणारे, नामसंकीर्तनाचा जयघोष उठविणारे आणि चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तांचा मेळा जमविणारे नामदेव हे अद्वितीय ‘मॅनेजमेंट गुरू’ होते. जातिवंतापासून चांडाळांपर्यंत सर्वांना भक्तीचा अधिकार आहे, असं सांगून त्यांनी नव्या भक्तियुगाची स्थापना केली. परिणामी त्यांच्या समकाळात अनेक जातीतून आणि अनेक प्रांतातून संत निर्माण झाले. सनातनी वैदिक परंपरेनं केलेली अडवणूक आणि बहुदैवतवादी कर्मकांडाच्या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी समताधिष्ठित भक्तिची पहाट होत होती. सगळे संत हे त्याचे शिल्पकार होते.

संत नामदेवांचे निवृत्तीनाथांशी असणारे भावबंध अनेक पातळ्यांवरचे होते. आपणास ते या संतद्वयांच्या अभंगांतून शोधता येते. नामदेवांनी आपल्या अभंगातून त्या काळचा सांस्कृतिक इतिहास अत्यंत सूचकपणे व्यक्त केला आहे. नामदेव हे ‘मिथमेकर’ आहेत, असं म. वा. धोंड म्हणतात, ते अनेक अंगांनी खरं आहे. निवृत्तीनाथादी भावंडांशी झालेली पहिली भेट नामदेवांनी मिथकाच्या स्वरूपातच चित्रित केली आहे. शासकीय नामदेव गाथ्यातील अभंग क्र. १३१५ ते १३४४मध्ये हा कथाभाग येतो. नामदेवांची या भावंडांशी झालेली ही पहिली भेट आळंदीतील ब्रह्मसभेनं शुद्धिपत्र नाकारल्यानंतर आणि पैठणमधील ब्रह्मसभेकडे शुद्धिपत्र मागण्यापूर्वी म्हणजे इ. स. १२८९मध्ये आळंदी येथे झाली आहे. ही भेट म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक सुवर्णक्षण म्हणावा लागेल. या भेटी दरम्यान या संतद्वयांची सामाजिक स्थिती काय होती? या भेटीवेळी नामदेव १९ वर्षांचे तर निवृत्तीनाथ १६ वर्षांचे होते. नामेदेवांचं कार्यक्षेत्र पंढरपूर. त्यांनी तिथं नामसंकीर्तन, अभंगलेखन, भजन आणि कीर्तन या माध्यमातून नवा भक्तिमार्ग प्रवर्तित केला होता. नामदेव इतके प्रभावी होते की, त्यांचा नावलौकिक चहूमुलखी पसरला होता. त्यामुळं पहिल्या भेटीतच आळंदी स्थित निवृत्तीनाथांचे उद्गार आहेत, ‘पंढरीचा प्रेमा घरा आला!’ नामदेवांचा भक्तिमार्ग ही आपातत: घडलेली गोष्ट नव्हती. तत्पूर्वी त्यांनी वैदिक, शास्त्री, पंडित, हरिदास, पुराणिक असणार्‍या ब्राह्मणांशी चर्चा करण्याचा, त्यांच्याकडून परमार्थमार्ग समजून घेण्याचा प्रयत्न केला होता; परंतु दंभ आणि अहंकारग्रस्त ब्राह्मणांनी शूद्र नामदेवांचं समाधान करणं टाळलं होतं. शेवटी स्वयंप्रज्ञेनं नामदेवांनी नवा भक्तिमार्ग प्रवर्तला. ते लोकांना जमवून भजन-कीर्तन करू लागले. अनेक जातींतील दीनदुबळे लोक या वारकरी ध्वजेखाली एकत्र आले. जरी विठ्ठलाच्या गाभार्‍यात बडव्यांचं राज्य असलं, तरी बाहेरच्या रंगशिळेवर आणि वाळवंटात नामदेवांची सत्ता चालत होती. दुसर्‍या बाजूला निवृत्तीनाथादी भावंडं ही संन्याशाची पोरं म्हणून बहिष्कृत होती. आश्रमव्यवस्था तोडण्याचं महापातक त्यांच्या वडिलांनी केलं. त्यामुळे त्यांचं ब्राह्मण्य नाकारलं गेलं. त्यांना अस्पृश्यांपेक्षा खालचा, चांडाळांचा दर्जा देण्यात आला. त्यांच्याशी सगळ्या समाजानं संबंध तोडावा असा आदेश देण्यात आला होता. मुक्ताबाईला मांडे खायची इच्छा झालेली असताना या भावंडांना मांडे भाजण्यासाठी खापराचा तुकडा मिळू शकला नाही, ही घटना सर्वश्रुत आहे. यावरून त्यांच्यावरील बहिष्काराची दाहकता लक्षात येते.

समाजाचं टोचून बोलणं आणि छळवणूक यामुळं उदास झालेले, मोडून पडलेले ज्ञानदेव एकदा घराचं दार (ताटी) लावून शोक करत बसले होते. ज्ञानेश्‍वरांसारख्या संयमी, नम्र आणि प्रज्ञावंत व्यक्तीची ही दयनीय अवस्था बहिष्कारामुळं झालेली होती. ब्रह्मवृंदानं निवृत्तीनाथांच्या माता-पित्यास देहान्त प्रायश्‍चित सांगितलं होतं. ‘ब्राह्मणांसाठी स्वदेशत्याग हा देहान्तासमान असतो’, असं धर्मशास्त्र सांगतं. त्याप्रमाणं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी हे अज्ञात प्रांती निघून गेले. त्यातला बहिष्काराची दाहकता कमी करण्याचा एकच भाग होता, तो म्हणजे गहिनीनाथांच्या उपदेशानं निवृत्ती आणि भावंडांनी केलेला नाथपंथाचा स्वीकार होय. वेदशास्त्रसंपन्न असणार्‍या विठ्ठलपंतांनी आपल्या मुलांना वेदशास्त्रांचं ज्ञान दिलं होतंच. त्यालाच नाथपंथाची जोड मिळाली. ही प्रज्ञावंत भावंडं योगमार्गी झाली. संत नामदेवांच्या कानी ही सर्व वार्ता गेली. त्यामुळंच ते आळंदीत या भावंडांच्या भेटीस स्वत: गेले. असं असले तरी नामदेवांनी आपल्या या भेटीचा नोंदविलेला कथाभाग गोंधळात पाडणारा आहे. ‘अहंकाराचा ताठा भरलेले नामदेव आणि त्यांचं मडकं कच्चं ठरवणारी संतमंडळी’ असे चित्रण या अभंगातून आलं आहे. असं का झालं असावं? ही संपूर्ण अभंगमालिका किंवा त्यातील काही भाग प्रक्षिप्त असावा काय? माझ्या मते, नामदेवांनी जाणीवपूर्वक रचलेली ही मिथ्यकथा आहे. या अभंगमालिकेच्या शेवटी येणारा १३४५ क्रमांकाचा अभंग मात्र, नि:संशयपणे प्रक्षिप्त आहे. निवृत्तीनाथादी भावंडांची भेट, पुढे विसोबा खेचराची भेट आणि उपदेश ही अभंगमालिका नामदेवांनी प्रत्यक्ष भेटीनंतर काही काळानं म्हणजेच इ. स. १२९१च्या आसपास, या भावंडांचा वारकरी संप्रदायात प्रवेश झाल्यावर लिहिली असावी. त्याचं कारण असं की, जरी ब्रह्मवृंदानं या भावंडांना बहिष्कृत करून चांडाळ ठरवलं असलं तरी ते अत्यंत प्रज्ञावान आहेत, श्रेष्ठ दर्जाचे आहेत, ‘संत’ या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याइतके श्रेष्ठ आहेत हे सर्वसामान्य भक्तांच्या मनी ठसविण्यासाठी ही मिथ्यकथा निर्माण केली आहे.

‘श्री विठ्ठलाच्या सांगण्यावरून नामदेव या भावंडांच्या भेटीस गेले. आपण प्रत्यक्ष विठ्ठलाच्या प्रेमकृपाछत्राखाली वावरत असल्यामुळे श्रेष्ठ आहोत, वरिष्ठ आहोत अशी त्यांची अहंकारयुक्त भावना झाली होती; परंतु मुक्ताबाई आणि इतरांनी हा भ्रम दूर केला आणि मडकं कच्चं असल्याचं सांगून गुरू उपदेशाची गरज आहे, असं सांगितलं. शेवटी या मंडळींना घाबरून नामदेव पंढरीस विठ्ठलाकडे पळून आले,’ असा कथाभाग येथे येतो. जरी ही भावंडं बहिष्कृत असली तरी त्यांची योग्यता मोठी आहे. त्यांना इतर वारकर्‍यांनी नामदेवांइतकाच सन्मान द्यावा, या भावनेतून ही मिथ्यकथा रचली गेली आहे.

या मिथ्यकथेतून हाती लागणारी तथ्यं वेगळीच आहेत.

उठले निवृत्ति संतांच्या दरुशना |
पंढरीचा प्रेमा घरा आला ॥

असा हा भेटीचा प्रारंभ आहे. ‘केली प्रदक्षिणा वंदिले चरण’, असं निवृत्तीनाथांचं वर्तन आहे. नंतर ज्ञानेश्‍वर, सोपान नमस्कार करतात, परंतु नामदेव त्यांना प्रतिनमस्कार करत नाहीत. या प्रसंगीचे सोपानदेवांचे बोल अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.

रंजल्यागांजल्याचा घेतला समाचार |
संता माया थोर अनाथांची ॥
आमचे मायबाप भेटलेति आज |
समाधान सहज आलिंगितां ॥

‘आम्ही भावंडे रंजलीगांजली आहोत, तर नामदेव हा मायबापाप्रमाणे अनाथांबद्दल थोर माया असणारा संत आहे. त्याच्या भेटीत सहज समाधान घडते’, असं सोपानदेव म्हणतात. या प्रसंगी मुक्ताबाई नामदेवास उणेदुणे बोलते, तेव्हा तिची समजूत काढताना निवृत्तीनाथ म्हणतात,

निवृत्तिदेव म्हणे ऐसें म्हणों नये |
धन्य भाग्यें पाहे संत आले ॥
आपुले स्वहित करावें आपण |
संतांच्या सन्माना चुकों नये ॥

परंतु मुक्ताबाई ते मान्य करीत नाही. नामेदवांच्या ज्ञानाची परीक्षा केल्याशिवाय त्यांच्या पायी डोके टेकवणे तिला मान्य नसते. मग ते सगळे गुंफेत जातात. तेथे ‘गुह्य गौप्य’ गोष्टी बोलल्या जातात.

गैनीची मिरास घेतला प्रमाण |
पूर्वभूमि जतन करित आस ॥
ऐसे गुंफेमध्यें नाही नामदेव |
म्हणुनि माझा जीव थोडा होतो ॥

असं निवृत्तीनाथ म्हणतात. ‘निर्गुणापासोनी सगुणाची संगती | नाही स्वरूपस्थिती अंगा आली ॥’ असं सर्वांचं मत पडतं. हा आत्मज्ञानाच्या संदर्भात कोरा आहे. त्याला नाथमताच्या भट्टीत नीट भाजला पाहिजे, असं या भावंडांचं मत पडतं; परंतु नामदेव तिथून निघून पंढरपुरास जातात.

कैकाड्याचे वानी करिती गुडगुड |
मजला हें गूढ उमजेना ॥
नामा म्हणे गाती प्रकाशाचें गाणें |
आम्हां अघोरवाणें दिसतसे ॥

असं नामदेवांचं मत बनतं. निवृत्तीनाथ भेटीचा हा पहिला प्रसंग खुद्द नामदेवांनीच असा रेखाटला आहे. वरवर पाहता या प्रसंगात नामदेवांना उणेपण मिळतं. परंतु, वस्तुस्थिती तशी नाही. पुढे नामदेवांच्या आग्रहानं झालेल्या तीर्थयात्रेत ज्ञानदेव नामदेवांना ज्ञानमार्ग आणि योगमार्गाचं मोठेपण सांगण्याचा प्रयत्न करतात; परंतु नामदेव आपला भक्तिमार्ग सोडत नाहीत. योगमार्गाद्वारे तहानलेल्या एका व्यक्तिची तृप्ती होईल; परंतु भक्तिमार्ग एकाच वेळी अनेकांची संतृप्ती घडवेल, असं नामदेव स्पष्ट करतात. त्याची अंतिम परिणती निवृत्तीनाथादी भावंडं वारकरी संप्रदायात येण्यात होते. ही परिवर्तनाची प्रक्रिया घडत असताना ही संतमंडळी परस्परांचा सन्मान जपतात आणि वाढवितात, हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

आज आपणास निवृत्ती, ज्ञानदेवादी भावंडांचं जे अल्पचरित्र माहीत आहे, त्याचं संपूर्ण श्रेय नामदेवांनाच द्यावं लागेल. नामदेवांचं आत्मचरित्रात्मक अभंग, श्रीज्ञानेश्‍वरांची आदि, तीर्थावळी आणि समाथी या अभंगमालिकांमधून नामदेवांनी स्फूट स्वरूपात या भावंडांचं चरित्र रेखाटलं आहे. नामदेवांनी हे ऐतिहासिक कार्य केलं नसतं, तर निवृत्तीनाथादी भावंडं हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील अज्ञात प्रकरण ठरलं असतं. ‘श्रीज्ञानेश्‍वरांची आदि’ या अभंग क्र. ८७२ ते ९०२ या अभंगमालिकेत नामदेवांनी या भावंडांच्या कुटुंबाचा कुलवृत्तांत दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात आळंदीतील ब्रह्मवृंदानं शुद्धिपत्र नाकारल्यावर निवृत्तीनाथांनी केलेलं भाष्य महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, ‘‘आम्ही वर्ण, जाती, कूळ, देवगण, यक्ष, किन्नर, ऋषी, निशाचर या भेदांच्या पलीकडे गेलेलो आहोत. आम्ही अविनाश, अव्यक्त आणि जुनाट असून, आमचे स्वरूप स्वबोधाने इष्ट (योग्य) असेच बनलेले आहे.’’ येथे ‘खर्‍या अर्थानं नाथपंथी असणार्‍या’ निवृत्तीनाथांना शुद्धिपत्राची गरज वाटत नाही. तर ज्ञानदेवांना मात्र ते गरजेचे वाटते, असे दिसून येते. पैठण येथेही त्यांच्यावरील बहिष्कार मागे घेण्यात आला नाही. त्यांना देव म्हटलं; पण ब्राह्मण म्हणून स्वीकारलं नाही. उलट अंत्यजांसह सर्वांना ब्रह्मभावनेनं वंदावं आणि ‘सृतिकामबंड’ (वंश) वाढवू नये हा आदेश कायम ठेवला गेला. निवृत्तीनाथ चरित्राचा पूर्वार्ध हा असा आहे.

श्रीनामदेव गाथेतील प्रमाणांच्या आधारे आपण संतद्वयांचा अनुबंध तपासला. तसाच तो निवृत्तीनाथांच्या अभंगांच्या आधारे पडताळता येतो. ‘सकलसंतगाथे’त निवृत्तीनाथांचे ३५७ अभंग आहेत. मूळात अभंग हा रचनाबंध नामदेवांनी निर्माण केला. तोच सगळ्या संतांनी स्वीकारला, निवृत्तीनाथांना गुरूपरंपरेनं कृष्णभक्ती मिळाली होती. त्यामुळं बालक्रीडेचे १३१ अभंग गाथ्यात आढळतात. याशिवाय सद्गुरू प्रसादे लाभलेली स्थिती दर्शवणारे ६६ अभंग आहेत.

नामस्मरण, कीर्तन, पंढरीमाहात्म्य, संतगौरव, उपदेश अशा विषयांना वाहिलेले अन्य अभंग आहेत. अर्थातच हे अभंग वारकरी संप्रदायाची महती गाणारे आहेत. नाथ ते वारकरी हा निवृत्तीनाथांचा प्रवास नामदेवांच्या सहवासातून घडला हे या अभंगातून स्पष्ट होतं. यामध्ये ‘काल्याचे अभंग’ या शीर्षकाखाली बारा अभंग आहेत. संत ज्ञानदेवांबरोबर पहिली तीर्थयात्रा झाल्यावर घालण्यात आलेल्या मावंद्यात ही काल्याची बीजं दडली आहेत. हे एक प्रकारचं सहभोजन आहे. ही पद्धत नामदेवांनी सुरू केली. त्याचा गौरव करताना निवृत्तीनाथ म्हणतात,

कालया कौशल्य नामदेव जाणे |
तेथिली हे खुणे निवृत्तीराज ॥
ज्ञानदेव सोपान जगमित्र नागा |
नरहरि वेगा झेलितात |
वैकुंठ सांवळे माजी भक्त मेळे |
काला एक्या काळें करिताती ॥

पंढरीत जमलेले सगळे भक्त हे हरिरूप असणारे गोपाळ आहेत. विठ्ठलानंच हा सोहळा मांडला आहे, अशी निवृत्तींची भावना! असे सगळे एकत्र जमून काला करीत असताना नामदेव मात्र, स्फुंदत आहे. त्याला राही, रखुमाबाई, सत्यभामा शांत करण्याचा प्रयत्न करतात; परंतु नामदेव ऐकत नाही. तेव्हा स्वत: विठ्ठल त्याला समजवतो, त्याच्या मुखी घास भरवतो, असं नवं मिथक निवृत्तीनाथ रचतात. येथे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, बालभक्त नामदेव विठ्ठलास जेवू घालतो या मिथकाचा हा उत्तरार्ध आहे. नामदेवानं देवाला जेवू घातलं आणि त्याला ऋणाईत बनवलं त्याची परतफेड येथे आहे. निवृत्तीनाथांनी हे मिथक रचून एक वर्तुळ पूर्ण केलं आहे. यातून नामदेवांशी असणार्‍या भावबंधाचं अनोखं दर्शन घडतं. गुरूपरंपरेनं मिळालेली कृष्णभक्ती आणि पंढरीचा विठ्ठल एकच आहेत, हे स्पष्ट करताना निवृत्तीनाथ म्हणतात,

प्राणिया उद्धार सर्व हा श्रीधर |
ब्रह्म हे साचार कृष्णमूर्ती ॥
तें रूप भीवरें पांडुरंग खरें |
पुंडलिकनिर्धारें उभें असें ॥

नामदेवांनी वर्णन केलेल्या पहिल्या भेटीत निवृत्तीनाथादी भावंडं, गोरा कुंभार हे सगळे नामदेवांस नाथ मत पटवण्याचा प्रयत्न करतात. याउलट निवृत्तीनाथांच्या अभंगात सगळी संतमंडळी विठ्ठलभक्तीत दंगलेली दिसतात.

सोपान सवंगडा स्वानंद ज्ञानदेव |
मुक्ताईचा भाव विठ्ठलराज ॥
दिंडी टाळघोळ गाती विठ्ठल नाम |
खेचरासी प्रेम भरित विठ्ठलाचे ॥
नरहरि विठा नारा ते गोणाई |
प्रेम डोही ओसंडती ॥
निवृत्ती प्रगट ज्ञानदेवा सांगे |
पुंडलिक संगे हरि खेळे ॥ १६४ |

नामदेव-निवृत्ती या संतद्वयांच्या सहवासाचा हा सुंदर अविष्कार म्हटला पाहिजे. निवृत्तीनाथादी भावंडं आणि नामदेवांचं कुटुंब यांचं एकत्र दर्शन या अभंगात घडतं. ‘भिवरा विठ्ठल दैवत आम्हां’ म्हणणारे निवृत्तीनाथ शेवटी ‘निवृत्ति कीर्तन दिननिशीं ध्यान | मनाचें उन्मन इये रूपीं ॥’ या अवस्थेपर्यंत पोचलेले दिसतात. नाथपंथ ते वारकरी हा निवृत्तीनाथांचा प्रवास अशाप्रकारे कीर्तन कुळवाडी नामदेवांच्या सोबत झालेला दिसतो. दुसर्‍या बाजूस निवृत्ती आणि ज्ञानदेवांनी नामदेवांना ज्ञानमार्ग आणि योगमार्गाचा परिचय करून दिला आहे. तीर्थयात्रेच्या निमित्तानं जगराहाटीचं दर्शन घडवलं आहे. अज्ञानाचं मळभ दूर केलं आहे. ज्ञानदेवांच्या चिद्विलासवादाचा परिचय नामदेवांना झाला आहे. पुढे नामदेवांनी ज्ञानोत्तर भक्तीचा मार्ग स्वीकारलेला दिसतो.

नामदेवांनी जाणीवपूर्वक समाजातील सत्प्रवृत्त, प्रज्ञावंत आदर्श व्यक्तिमत्त्वांचा गौरव केला. त्यांना संत म्हणून गौरवलं. त्यांचं मोठेपण सांगणारे अभंग रचले. त्यांच्या मिथक कथा रचल्या. त्यांच्या चरित्राला अद्भूताची, चमत्कारांची जोड दिली. त्यांचा गुणगौरव केला. चरित्रं रचली, समाधी वर्णन आणि स्थलमाहात्म्यही रचलं. त्यामुळं वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ असणारे संत त्यांच्या गुणकार्यानं अभंग आणि कीर्तनाच्या माध्यमातून सर्वत्र वंदनीय ठरले. नामदेवांनी रचलेल्या मिथ्यकथेला प्राचार्य नि. ना. रेळेकर कीर्तनासाठी रचलेले नाट्य म्हणतात, ते याच कारणानं. नामदेवांच्या या योजकतेमुळं चांडाळ म्हणून नाकारलेले निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई वारकरी संप्रदायात संत या सर्वोच्च पदापर्यंत पोचून स्वीकारले गेले. नामदेवांनी या चार भावंडांच्या समाधीचं भावोत्कट वर्णन केलं आहेच. परंतु, ते करत असताना या समाधीस्थळांना तीर्थक्षेत्राचं माहात्म्य दिलं आणि त्या ठिकाणी टाळ-वीणा जयघोषात दिंड्या नेण्याची परंपराच निर्माण केली आहे. या सगळ्या समाधी प्रसंगात नारा, विठा, गोंदा, महादा हे नामदेवपुत्र उपस्थित आहेत. समाधीस्थळ सुशोभित करण्याचं काम त्यांनी केलं आहे. कारण ज्ञानदेव आणि भावंडं ही नामदेवांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या नात्याचं वर्णन करताना जनाबाई ‘सखा विरळा ज्ञानेश्‍वर | नामयाचा तो जिव्हार ॥’, असं वर्णन करते, ते उगाच नव्हे !

या सगळ्या समाधी प्रसंगांचे सर्वेसर्वा पुन्हा नामदेवच आहेत. एका बाजूला हे जीवलग एक एक करून दुरावतात त्याचं दु:ख आणि दुसर्‍या बाजूला वडिलकीच्या नात्यानं इतरांना सावरण्याची जबाबदारी अशा दोन्ही अवस्थांमधून ते आळंदीस ज्ञानदेव सर्वप्रथम समाधीस्त होतात त्या वेळची निवृत्तीनाथांची भावस्थिती ‘फार आठवतें निवृत्तीचे चित्ती’ अशा शब्दात नामदेवांनी व्यक्त केली आहे. निवृत्ती मुक्ताईचं समाधान करतात आणि सोपानास मध्यभागी घेतात. नंतर म्लान वदनाच्या सद्गुरू निवृत्तीच्या पायी ज्ञानदेव लागतात, तेव्हा निवृत्तींचं भान हरपतं. ‘पाळिले पोसिलें चालविला लळा | बा माझ्या कृपाळा निवृत्तीराजा’ असं ज्ञानदेव म्हणू लागतात. तर त्याला आलिंगन देऊन निवृत्ती म्हणतात, ‘अमर्यादा कधी केली नाहीं येणें | शिष्य गुरूपण सिद्धी नेलें॥’ या प्रसंगातील नामदेवांचं समाधीवर्णन इतकं भावोत्कट आहे की, ते मुळातून वाचलं पाहिजे. निवृत्तीची भावना पूर्णपणे जाणणारे नामदेव अत्यंत नेमक्या शब्दांत त्यांची भावावस्था व्यक्त करतात. ‘बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट | ओघ बारा वाट मुरडताती॥’ अशी ती अवस्था आहे.

मायबापांनी त्याग केला तेव्हाही इतकं संकट वाटलं नव्हतं असं निवृत्तींचं म्हणणं आहे. तेव्हा सगळे संत त्यांचं समाधान करू लागतात. असाच प्रकार सोपानदेवांच्या समाधी प्रसंगी घडतो.

‘निवृत्ती म्हणे ऊर्मी तुटल्या श्रृंखला | मार्ग हा मोकळा आम्हां जाला |’ ते शोक करतात, मौन धरतात आणि उदास होतात. त्यानंतर नेवासा, पैठण, आपेगाव अशा मूळस्थानी निवृत्ती- मुक्ताबाई ही भावंडं जातात. नंतर तापीतीरावर मुक्ताई मुक्त होते तेव्हा प्रलयीचा वारा वाहिल्याचा भास निवृत्तीस होतो. ‘ज्येष्ठांच्या आधीं कनिष्ठाचें जाणें | केलें नारायणें उफराटे॥’ अशी निवृत्तीनाथांची भावना होते. तेही त्र्यंबकेश्‍वरी समाधी घेतात. त्या वेळचं वर्णन करताना नामदेव म्हणतात,

गोंदा आणि महादा सांडिती शरीर |
विसोबा खेचर फार कष्टी ॥
लोपलासे भानु पडला अंधार |
गेला योगेश्‍वर निवृत्तिराज ॥

जगाला वंदनीय आणि मार्गदर्शक असणारे संत स्वत:चा काळ चिरंजीव करतात. त्यांचं त्या काळातलं कार्य जितकं मोठं तितकेच ते शब्दबद्ध होणं महत्त्वाचं! संतशिरोमणी नामदेवांनी ते केलं. ही अलौकिक व्यक्तिमत्त्वं अजरामर झाली. परस्परांना प्रभावित आणि परिपूर्ण करणारी ही संतमंडळी त्यांच्या कार्यानं, लेखनानं आजही अभंग आणि अखंड राहिली आहेत, हेच खरं!

0 Shares
पारंब्या निवृत्ती तटाके निघालो आम्ही