मज लावियेले नाथपंथा

युवराज पाटील

भारतभर पसरलेल्या नाथपंथीयांची मुळं महाराष्ट्रात चांगलीच रुजली आहेत. महाराष्ट्रातील इतर विभागांप्रमाणंच विदर्भातही जागोजागी नाथपंथाची ठिकाणं दिसतात. जगणं समृद्ध करणार्याज नाथांच्या पाऊलखुणांचा हा घेतलेला शोध...

अकोल्यातील रामदास पेठेत श्रीनाथ दत्त मंदिर आहे. दत्ताचं मंदिर असल्यानं याचा नाथ संप्रदायाशी काही संबंध नसावा, अशी गावकर्‍यांचीही धारणा. परंतु पुजार्‍याची भेट घेतल्यावर त्यानं हे मंदिर नाथपंथीयच असल्याचं सांगितलं. या पंथाच्या माधवनाथांनी हे मंदिर बांधलं आहे. इथं माधवनाथांची मूर्तीही आहे. माधवनाथ महाराजांच्या आईचं नाव मधुराबाई आणि वडील मल्हारदादा रत्नपारखी (कुलकर्णी ). त्यांचा जन्म २६ मार्च १८५७ रोजी मध्य प्रदेशातील चित्रकुट करवी इथं झाला. बालपण पांगरी ता. सिन्नर जि. नाशिक इथं गेलं. मध्यप्रदेशात नाथ संप्रदायातील गुप्तनाथ यांची समाधी आणि गादी आहे. त्याठिकाणी चिठ्ठी टाकून १८६७मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी त्यांची गुप्तनाथाचे शिष्य म्हणून निवड झाली. त्यानंतर २४ वर्ष माधवनाथ अज्ञातवासात होते. वयाच्या ३९व्या वर्षी ते लोकांसमोर आले. त्यानंतर वयाच्या ७९व्या वर्षापर्यंत नाथ संप्रदायाचं काम करत राहिले. ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य श्रीसत्यामलनाथ आणि त्यांचे शिष्य श्रीगुप्तनाथ आणि त्यांचे शिष्य माधवनाथ. म्हणजे नाथ संप्रदायातील शेवटचे नाथ पंथीय गुरु श्री माधवनाथ. त्यांनी मात्र कोणालाही गादी दिली नाही; अथवा शिष्य केलं नाही. १४ मार्च १९३६ला हिंगणघाटमध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर या संप्रदायाचं काम मंदावलं.

माधवनाथ महाराजांनी इंदौरमध्ये एक मंदिर बांधलं. होळकर राजघराण्यानं नाथ पंथीयांचं शिष्यत्व पत्करलेलं होतं. त्यामुळं  नाथ पंथाला राजाश्रय मिळाला. त्यातूनच माधवनाथांनी १५ एप्रिल १९२६ला या मंदिराची कोनशीला बसवली. माधवनाथांच्या नंतर नाथ पंथीयांचं कार्य इंदौरच्या या मठातून त्यांनी स्थापन केलेला स्ट्रट चालवतं. माधवनाथ महाराजांचा राबता मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात असल्यामुळं त्यांचा भक्त मेळा या भागात मोठ्या प्रमाणावर आहे. पुण्यात गणपती मंडळाची स्थापना करून देशभर गणपती उत्सवाचा आदर्श निर्माण करणारे दगडूशेट हलवाई यांच्या पत्नी लक्ष्मीबाई त्यांच्या शिष्या होत्या. दगडूशेट यांच्या निधनानंतर लक्ष्मीबाईच्या आग्रहाखातर माधवनाथांनी पुण्यात दत्तमंदिर बांधलं. आज जिथं श्रीमंत दगडूशेट हलवाई ट्रस्टचा गणपती बसतो त्याच्या मागं हे दत्ताचं मंदिर आहे. माधवनाथांनी हयातीत जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अकोला, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत मंदिरं बांधून नाथ संप्रदायाचे भक्तगण निर्माण केले. नांदगाव हिंगणघाट, धर, सिराळे आणि काशी इथंही त्यांनी सेवाकार्य केलं. माधवनाथांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचं पार्थिव इंदौरमध्ये त्यांनी बांधलेल्या मंदिरांच्या प्रांगणात दहन करून त्यांचे अवशेष एका कुंडात ठेवून बंद करण्यात आले आहेत.

सध्या आळंदीतील मठात राहणारे ७५ वर्षांचे शांतीनाथमहाराज हे नाथपंथ आणि वारकरी संप्रदाय यांच्यातील दुवा म्हणावेत, असं काम करत आहेत. ते सांगतात, मी विदर्भातील रामनाथ महाराजांचा शिष्य. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात लाड कारंजाजवळ १३ किलोमीटर पूर्वेला रामगाव रामेश्वराचं मंदिर आहे. तिथं रामनाथ महाराजांचा मठ आहे. तिथं गायींचं संगोपन केलं जातं. दोन्ही बाजूंनी गंगा आणि मधे बेट असं हे रमणीय ठिकाण आहे. मठाची सात एकर शेती आहे. रामनाथ महाराजांनी इथं १९३२मध्ये समाधी घेतली. त्यांच्यानंतर मोहननाथ-ओंकारनाथ-गणेशनाथ-संतोषनाथ-सेवानाथ- गहिनीनाथ-शंखनाथ-शीलनाथ अशी परंपरा आहे.

शांतीनाथ महाराजांनी पंढरपूरला चार एकरांवर मठ उभारला आहे. दौंड तालुक्यात राहू पिंपळगाव, कानगाव, अमरावती जिल्ह्यात नांदगाव खांडेश्वर, कानगावला मध्यप्रदेशात नर्मदेच्या तीरावर बेडा घाट या ठिकाणी आमचे मठ आहेत. कारंजा लाडमधील भांबुर्डे, आखादवाडा, वाशिममध्ये मंगरुळपीर, नागपुरात धंतोली, मस्का सात आदी ठिकाणी आमचे मठ आहेत.

वारकरी आणि नाथ अशा दोन्ही पंथाचं आचरण करणारे शंखनाथमहाराज म्हणाले, मी ज्ञानेश्वरीची दोन वेळा म्हणजे १९७१ आणि १९९०मध्ये १११ पारायणं केलीत. उत्तर भारतातील नाथपंथीय साधूंना वारकर्‍यांचं आकर्षण नाही. ते ध्यानधारणेत रमतात. तर, इथले वारकरी भजनात. मी नाथसंप्रदायातील ध्यानधारणा करतो. आमच्या प्रत्येक आश्रमात जमिनीखाली गुंफा असते. तिथं आम्ही ध्यानधारणा करतो. पाऊणशे वयोमानातही मी ८४ योगासनं करतो. मठात धुनी अखंड चालू असते. दोन वेळी आरती होते. विष्णू सहस्त्रनामाप्रमाणं गोरक्षसहस्त्रनाम म्हणतो.

वारकरी संप्रदायाचा हरिपाठ, ज्ञानेश्वरी, काकडा, भजन करतो. आमच्या सर्व मठांमध्ये हे करतात. आळंदीच्या मठात आम्ही रोज अडीचशे मुलांना जेवण देतो.

आईनाथांचं उमरखेड

विदर्भात पैनगंगेच्या काठी असलेले हे क्षेत्र साधूसंत आणि मंदिरं, मठ यासाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. या गावात आईनाथ महाराज हे एक मोठं दैवत मानलं जातं. मराठवाड्यातील अनेक सत्पुरुषांनी आईनाथांना आपलं दैवत मानलं आहे. चिन्मयानंदमहाराज, साधूमहाराज, उत्तमश्‍लोकमहाराज इत्यादी सत्पुरुष उमरखेडचेच. दोनअडीचशे वर्षांपूर्वी समाधिस्त झालेले आईनाथमहाराज हे एक थोर नाथपंथीय सत्पुरुष होत. नाथ पंथीयांच्या निरनिराळ्या शाखांमध्ये आई नावाचा एक पंथ आहे. विमलाशक्तीचं नाव आई. आईनाथ देवीची संतान वा शिष्यपरंपरा आईनाथपंथी बनली. याच शाखेत पैठण उमरखेडचे आईनाथ महाराज होत. त्यांचे प्रख्यात शिष्य श्रीकृष्ण दयार्णव होत. आईनाथमहाराजांचं विस्तृत ओवीबद्ध चरित्र उमरखेडचे ग. अं. जोशी यांनी लिहिलं आहे.

पूर्णब्रह्म सनातनरुपा योगीशा|
सुरवर वंदिती भावे तव पदरजलेशा॥

असं वर्णन उत्तमश्‍लोकांनी आईनाथासंबंधी एका आरतीत केलं आहे.

आईनाथांच्या उमरखेडला इतर धर्मपंथीयांचीही अनेक पूज्य स्थानं आहेत. गोपिकास्वयंवर लिहिणारा शिवराम किंकर, रामचंद्र वांगे हे महानुभवीय कवी इथलेच. बेलखेडचे इनामदार संत साधुमहाराज यांनी १८१५मध्ये आपलं अवतारकार्य इथंच संपवलं. त्यांची इथं समाधी आहे. येथील मुनीमहाराजांचा मठ नाथपंथी आहे. कृष्ण दयार्णव, उत्तमश्‍लोक, मुकुंद कवी हे कवी याच परंपरेतील. आणखी एक नाथपंथी मठ येथे आहे. तो चिन्मयानंदांचा मठ म्हणून प्रसिद्ध असून, आदिनाथांपासून त्याची परंपरा आहे. हरिदास नामा, परमानंद, नित्यानंद, गोचरस्वामी, परमानंद, तुकामाई, विठ्ठलकिंकर, रावसाहेब शेवाळकर इत्यादी संतपुरुष याच परंपरेतील. माहुर येथील विष्णुकवींना संन्यासदीक्षा याच परंपरेची आहे.

पाटणबोरींच्या माधवनाथमहाराजांचं घराणं बेलखेडचं. याच घराण्यात चतुश्‍लोक भागवतावर टीका लिहिणारे हरिदास कान्हा हे उमरखेडचेच.

देशविदेशातील लाखो लोक ज्यांचे भक्त आहेत, त्या शिर्डीच्या साईबाबांना लोककल्याणाची प्रेरणा दिली ती एका निरक्षर महिलेनं. तिचं नाव जानकूबाई उर्फ संत मायबाई. विदर्भातील मोर्शी तालुक्यातील शिरखेडच्या देशपांडेच्या वारकरी घरात मायबाई जन्मल्या. त्यांचं माहेरचं नाव भागूबाई. अमरावतीतील चांदूर रेल्वे तालुक्यातील कु-हा गावच्या सीताराम देशपांडेंशी भागूबाईचं लग्न झालं. सासरच्यांनी तिचं नाव जानकू असं ठेवलं. लग्नानंतर जानकूचं वागणं खूप विक्षिप्त झालं. पण सीताराम यांनी ते मोठ्या मनानं सहन केलं.

संतांचा सहवास

सीतारामपंत पुढं वर्ध्यातील आर्वीत येऊन स्थायिक झाले. या ठिकाणी त्यांचा देहांत झाला. जानकू आणि त्यांचा मुलगा पांडुरंग पोरके झाले. या दरम्यान जानकूबाईंना संतांचा सहवास लाभला. त्यातूनच त्यांना आत्मभान आलं. दीनदुबळ्यांची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली. मग रोज अगदी भिक्षा मागून त्यांनी गरीबांना अन्नदान सुरू केलं. त्यांच्या या कार्यामुळं तसंच विठ्ठलभक्तीमुळं त्यांना लोक संत मायबाई असं संबोधू लागले. गोरगरीबांची सेवा करण्याचा हा मंत्र मायबाईंनी आपल्या अनुयायांनाही दिला. त्यातूनच मग श्री साईबाबा, गजाननमहाराज, ताजुद्दीनबाबा, अडकोजी महाराज, तुकडोजी महाराज आदी संत उदयाला आले.

विदर्भ म्हणजे उपेक्षेचा धनी. पण याच विदर्भातील अनेक संतांनी वारक-यांचा समतेचा विचार समाजात रुजवण्याचं मोठं कार्य केलं. याच संतांमधील एक महत्त्वाचं नाव म्हणजे संत मायबाई. मायबाईंनी अनेक महापुरुषांच्या मनात ज्ञानज्योती पेटवल्या.

शिराळ्यातील गोरक्षनाथ

सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळ्यात पंढरीच्या विठुरायाएवढंच गोरक्षनाथ मंदिराला महत्त्व आहे. एकादशीला सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील भाविक येथे दर्शनासाठी येतात. येथील जगप्रसिध्द नांगपंचमीची सुरुवात गोरक्षनाथांनीच केली. हनुमान जयंतीनंतर येणा-या एकादशीपासून चैत्र कृष्ण ११ पासून यात्रेस सुरुवात होते. त्याचा कालावधी आठ दिवसांचा असतो. या काळात राज्याच्या विविध भागातून अनेक वारकरी येतात. मंदिरामागे तोरण मोरण नदीचा संगम आहे. दर बारा वर्षांनी कुंभमेळ्यानंतर झुंडीनं नाथांचे पाईक येतात. दक्षिणाभिमुख मारूती, विठ्ठल- रखुमाई मंदिर याच मंदिराच्या परिसरात आहे. पूर्वी या मंदिरात गोरक्ष चिंचेचा भला मोठा वृक्ष होता. त्या चिंचेचा आयुर्वेदिक औषधं बनविण्यासाठी उपयोग होतो.

यात्रेच्या पहिल्या दिवशी राज्यातील विविध भागांतून येणा-या वारकरी दिंड्यांचं स्वागत गावकरी करतात. यात्रा कालावधीत मंदिराच्या परिसरात भजन, कीर्तन, सोंगी भजन, भारूडाचे कार्यक्रम होतात.

नाथ परंपरेत शिराळा अर्थात श्रीआलय हे एक पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं. दर बारा वर्षांनी इथं दर्शनी साधूंची झुंड येते. काही दिवस विसावते आणि पुढं परिक्रमा करते. यातील एका साधूची मठाधिपती म्हणून नेमणूक होते. पहिले मठाधिपती झुंडीसोबत निघून जातात. त्यांचा कार्यकाल बारा वर्षांचा असतो. गोरक्षनाथांचं काही दिवस इथं वास्तव्य होतं. निसर्गपूजक गोरक्षनाथांनीच इथं जिवंत नागाची पूजा सुरू केली.

सोनसळचा चौरंगीनाथ

सोनसळ येथील चौरंगीनाथ मंदिर प्राचीन देवस्थान असून, हे नाथपंथीय देवस्थान १२व्या शतकातील आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या या मंदिर परिसरात चौरंगीनाथ आणि शिवमंदिर आहे.

मत्स्येंद्रगड

सातारा आणि सांगलीच्या सीमेवर वाळवा तालुक्यात मत्स्येंद्र अर्थात मच्छिंद्रगड आहे. गडावर मच्छिंद्रनाथांचं मंदिर आहे. या गडावर मच्छिंद्रनाथांनी इसवी सन १२१०च्या सुमारास चैत्र वद्य पंचमीला समाधी घेतली. हा एक छोटा गड आहे. इसवी सन १६७६च्या सुमारास शिवरायांनी जी दुर्गशृंखला बांधली त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला होता. हा किल्ला कमळभैरवाच्या डोंगराशेजारील एका वाटोळ्या टेकडीवर उभा आहे. मच्छिंद्रनाथांच्या शिल्पांनी सजविलेल्या प्रशस्त मंदिरात भाविकांचा सतत राबता असतो.

रेवणनाथ नाथ संप्रदायामधील एक सिद्ध रेवणनाथ यांचं समाधिस्थळ सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रेवणी या गावात आहे.

पातला परी अकस्मात| येता झाला बाळ जेय॥
सहज चाली पुढे चालत| बाळ दृष्टी देखिले ॥

नवनाथ कथासारातील या वर्णनाप्रमाणं ब्रह्मदेवाचं वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडलं. त्यातच पूर्व संकेतानुसार चमसनारायणांनी प्रवेश केला. त्यातून एक मुलगा जन्मास आला. सहजसरुख नावाच्या कुणब्यानं त्याला पाहिलं. त्यानं आणि त्याच्या पत्नीनं या बाळाला सांभाळलं. रेवा नदीकाठी सापडला म्हणून त्याचं नाव रेवणनाथ ठेवलं. दत्तात्रयांनी त्याला महिमासिद्धी दिली. रेवणनाथांचं जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी रेणावी इथं आहे. विटे गावापासून हे ठिकाण १० किलोमीटरवर आहे.

0 Shares
नाथशृंखला कोकणचा ज्ञानेश्वर