नंदादीप

विराज परब

निवृत्तीनाथांनंतर महाराष्ट्रातली नाथांची गुरूपरंपरा रूढ अर्थांनी थांबली असं मानलं जातं. त्यांचा वारकरी परंपरेचा सांप्रदायिक वारसा बाजूला ठेवून पण वैचारिक वारसा मान्य करून थेट नाथपंथाशीच नातं सांगणारे स्वामी स्वरूपानंद यांची ही गोष्ट.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावस गावात स्वामी स्वरूपानंदांचं गोडबोले घराणं सुमारे दहा पिढ्यांपासून होतं. त्यांचं गौतमी नदीच्या तीरावर प्रशस्त घर आहे. या घराण्यातील श्रीमत् स्वामीजींचे आजोबा पर्शरामपंत गोडबोले शिक्षण खात्यात शिक्षणाधिकारी होते. एक आदर्श अधिकारी असा त्यांचा लौकिक होता. गरजूंना त्यांचा मदतीचा हात सदैव पुढे असायचा. त्यांचे चिरंजीव विष्णुपंत हे स्वामीजींचे वडील आणि आई रखमाबाई. विष्णुपंत विष्णुभक्त होते. त्यांचा विष्णू सहस्रनामाचा पाठ सदैव चालू असायचा. स्वरूपानंदजींचा जन्म १५ डिसेंबर १९०३ रोजी झाला. रत्नागिरीच्या शाळेत ते हुशार विद्यार्थी होते. पण लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधींच्या प्रभावामुळे ते स्वातंत्र्यलढ्यात ओढले गेले. वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांनी पावस गावात ‘स्वावलंबनाश्रम’ नावाची राष्ट्रीय शाळा स्थापन केली.

या शाळेत हातमागावर खादी विणण्याचं कामही शिकवलं जात असे. गणेशोत्सव आणि श्रीकृष्ण जन्मोत्सवप्रसंगी मुलांचे मेळे तयार करून त्यात देशभक्तीपर गाणी स्वामी स्वत: रचून म्हणवून घेत. इंग्रजांनी देशातील सर्वच राष्ट्रीय शाळांवर बंदी आणल्यामुळं ‘स्वावलंबनाश्रम’ ही शाळाही बंद करण्यात आली. पुढे स्वामीजींनी पुणे मुक्कामी काही विद्यार्थ्यांना नेऊन त्यांचं आणि स्वतःचं शिक्षण सुरू ठेवलं. त्याचबरोबर समाजरचना शास्त्रावरील विविध ग्रंथांचाही त्यांनी अभ्यास सुरू केला.

१९२३ साली त्यांचे मामा केशवराव गोखले यांच्यामुळं पुण्यात मामांचे सद्गुरू गणेशनाथ तथा बाबा महाराज वैद्य यांच्या भेटीचा योग आला. बाबा महाराज हे ज्ञानेश्‍वर महाराजांच्या परंपरेतील नाथ संप्रदायातील आत्मसाक्षात्कारी सत्पुरुष होते. स्वामींना त्यांचा अनुग्रह लाभला. आपल्या ‘अमृतधारा’ या ग्रंथात त्यांनी आपली गुरूपरंपरा सांगितली आहे,

आदिनाथ मत्स्येद्र गोरक्ष श्री गहिनी निवृत्ती|
ज्ञानदेव देवचुडामणि गुंडाख्यादी महंती॥
अनुभविली सद्विद्या ही गुरुपरंपरा सांगितली|
शतकानुशतके प्रत्यक्ष जशी पुढती चालत आली॥

निवृत्तीनाथांनी दिलेला बोध संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीतून सार्वजनिक केल्यामुळं नाथांची गुरूपरंपरा थांबली असं मानलं जातं. मात्र ते मान्य नसलेल्या नाथसंप्रदायिकांच्या काही शिष्यपरंपरा महाराष्ट्रात आजही कार्यरत आहेत. त्यातील स्वामी स्वरूपानंद हे एक प्रमुख उदाहरण. पण त्यांच्या ग्रंथरचनेतून वारकरी आणि नाथ या दोन्ही विचारांमधलं अव्दैतच मांडलं गेलं. सहा ते सात वर्षांच्या पुण्यातील वास्तव्यात स्वामींना गुरूंचा दर्शन सहवास, वचनामृतप्राशन, उपदेश, शारीरिक सेवा यांचा लाभ होत होता. बाबामहाराज हस्तलिखित ज्ञानेश्‍वरीची प्रत नित्य वाचत असत. ती जीर्ण झालेली पाहून स्वामीजींनी चार महिन्यांच्या कालावधीत स्वहस्ताक्षरात ज्ञानेश्‍वरी लिहून दिली. अध्यात्माबरोबरच स्वामींचं राष्ट्रकार्यही सुरूच होतं. गांधीयुग सुरू झाल्यानंतर त्यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी कोकणात दौरे काढून सत्याग्रही मिळवले आणि स्वत: सत्याग्रह केला. त्यामुळं त्यांना १५ दिवस रत्नागिरीच्या तुरुंगात पाठवण्यात आलं. त्यानंतर पुन्हा बंदी हुकूम मोडल्यामुळं स्वामींना तात्काळ अटक झाली आणि त्यांची रवानगी येरवडा तुरुंगात करण्यात आली. याच कारागृहात शंकरराव देव, रावसाहेब पटवर्धन, एस. एम. जोशी या देशभक्तांशी त्यांचा परिचय झाला. आपण स्वरूपानंदांमुळेच ज्ञानेश्‍वरी वाचली असं एसेमनी नोंदवून ठेवलंय. तुरुंगात असतानाही स्वामींची आध्यात्मिक साधना चालूच होती. ते कारागृहातही तासन्तास ध्यानधारणा करत. याच तुरुंगात स्वामींनी सद्गुरू स्तुतीपर नऊ ओव्यांचं काव्य केलं आणि मुक्त होताच हा ‘नवरत्नहार’ सद्गुरूंना अर्पण केला. आपल्या शिष्याच्या स्वरूप स्वानुभूतीनं संतुष्ट होऊन त्यांनी आपला वरदहस्त स्वामींच्या मस्तकावर ठेवला आणि त्यांना ‘स्वरूपानंद’ असं नाव दिलं.

पुण्यातून पावसमध्ये आल्यानंतर स्वामी मलेरियानं आजारी पडले. सहा महिने हा आजार होता. हा फक्त शारीरिक आजार नव्हता, तर आध्यात्मिक प्रगतीच्या दिशेनं मनाची अवस्था बदलणारी यौगिक प्रक्रिया होती. त्यातूनच स्वामींना आत्मप्रचिती झाली. त्यांच्या साधनेस पूर्णत्व आलं. या काळातील अनुभवांचं वर्णन करणार्‍या काव्याची त्यांनी साकी छंदात रचना केली. त्याला ‘अमृतधारा’ हे समर्पक नाव दिलं आहे. या काळात डॉ. बाबा देसाई यांनी स्वामींची सेवाशुश्रुषा केली. त्यांना आपल्या घरी येण्याचा आग्रह केला. त्यामुळं १९३४ ते १९७४ मधील स्वामींच्या महासमाधीपर्यंत सुमारे ४० वर्ष श्रीमत् स्वामींचं वास्तव्य देसाई यांच्या घरातील पडवीतील एका खोलीत होतं. श्रीमद अभंग ज्ञानेश्‍वरी, श्री भावार्थ गीता, श्री अभंग अमृतानुभव, संजीवनी गाथा इत्यादी प्रासादिक ग्रंथ याच खोलीत लिहून झाले. आधी स्वामी गावातसुद्धा फारसे कुणाला माहीत नव्हते. परंतु १९६० साली त्यांची ‘अभंग ज्ञानेश्‍वरी’ प्रसिद्ध झाली आणि त्यांच्या संतत्वाची ओळख सर्वांना झाली. गावोगावचे साधक आणि भक्त पावससारख्या आडगावी त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. ‘अनंत निवास’ परमार्थाचं परमधाम झालं. स्वामींची शांत, प्रसन्न मुद्रा पाहूनच माणसं समाधानानं भरून जात. त्यांच्या नंदादीपासारख्या सौम्य, स्निग्ध डोळ्यातून ओसंडणार्‍या करुणेनं आणि प्रेमानं त्यांना मायमाउली भेटल्याचा आनंद होई.

0 Shares
कोकणचा ज्ञानेश्वर संदर्भखुणा