उत्तरायण

प्रशांत जाधव

निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वरला. तेच त्यांचं मुख्य ठाणं. त्यामुळं त्यांच्या विशेषांकाच्या निमित्तानं त्यांच्या परिसरात म्हणजे उत्तर महाराष्ट्रात वारकरी परंपरेचा शोध घेणं महत्त्वाचं आहे. त्यात निवृत्तीनाथांचा आजचा प्रभावही शोधता येऊ शकतो.

वारी म्हटलं की पंढरपूर, देहू आणि आळंदी याच्यापलीकडं फारसं कुणी जात नाही. पण या तिन्ही ठिकाणी होणार्‍या गजराचे पडसाद राज्याच्या कानाकोपर्‍यात ऐकू येतात. अगदी आजच्या महाराष्ट्राच्या सीमा पार करूनही त्या ऐकू येतात. संत निवृत्तीनाथांचं संजीवन समाधीमंदिर असणारं त्र्यंबकेश्वर ज्याचा भाग आहे, तो उत्तर महाराष्ट्र याला अपवाद नाहीच. पंढरपूरहून शेकडो किलोमीटर दूर असणार्‍या या उत्तरेतल्या वारकरी परंपरेचा शोध महत्त्वाचा ठरतो. आजच्या नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यांमधला म्हणजे खान्देश संस्कृतीमधला हा मागोवा आहे. महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेचाच भाग असूनही उर्वरित महाराष्ट्राला या भागातल्या वारकरी परंपरेची फारशी ओळख नाही. मुंबई, त्र्यंबकेश्वर, येवला, चाळीसगाव, धुळे, नंदूरबार, कुकूरमुंडा, शिंदखेडा, अमळनेर, जळगाव-मुंबई असा सुमारे १२५० किलोमीटरचा प्रवास माझ्या स्वतःच्याच मुळांचा शोध होता.

सुरुवात करायची तर त्र्यंबकेश्वरला पर्याय नाही. परंपरेचं आद्यपीठ. सारूळपासून त्र्यंबकेश्वरला जायला एक छोटा दुपदरी रस्ता आहे. या भागात पाऊस झाला नव्हता. तरीही सकाळी खूप आल्हाददायक वातावरण होतं. मी त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिराजवळ पोचलो. वारीच्या तयारीची लगबग सुरू होती. माहिती घेण्यासाठी मंदिरात पोचल्यावर मंदिराचे पुजारी भेटले. वारी संदर्भात माहिती हवी म्हटल्यावर त्यांनी यंदाची कार्यक्रम पत्रिकाच मला दिली. निवृत्तीनाथांचे परंपरागत पुजारी असलेल्या गोसावी घराण्यांपैकी अनिल गोसावी यांच्याशी गप्पा सुरू झाल्या. ते म्हणाले, येथील वारीला सुमारे ४०० वर्षांची परंपरा आहे. पण कागदोपत्री पुरावाच हवा असेल तर १८८०मध्ये वामन चिंतामण गोसावी त्यांनी पालखी सुरू केल्याचे कागद आमच्याकडे आहेत. म्हणजे त्याला यंदा १३६ वर्ष झाली. तेव्हापासूनच या पालखी सोहळ्याची जबाबदारी गोसावी कुटुंबाकडे आली. पण वारकर्‍यांचा स्थानिक मठ किंवा गट नसल्यानं त्याची व्यवस्था नगर जिल्ह्यातील बेलापूर गावच्या बेलापूरकरांवर देण्यात आली. तेव्हापासून डावरे हे पालखीसोबत चालत होते. त्यामुळं निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यात प्रमुख तीन दिंड्या आहेत. पहिली गोसावी यांची, दुसरी बेलापूरकरांची आणि तिसरी डावरे यांची. आता या सोहळ्यातील दिंड्याची संख्या बत्तीसच्या आसपास गेली आहे. अनिल गोसावी अधूनमधून दिंडी सोहळ्याला जातात. त्यांच्या लहानपणी दिंडी सोहळ्यात रस्ते, सुविधा कमी असल्यानं खडतर प्रवास होता. आता समाज वाढला, सुविधाही वाढल्या त्यामुळं त्यामानानं वारी सुकर झाल्याचं त्यांनी सांगितलं.

अनिल गोसावींचे पुतणे अविनाश गोसावी हे निवृत्तीनाथांवर बोलायला लागले की ते आतून बोलतात. निवृत्तीनाथांच्या पायी वारीचा त्र्यंबकेश्वर-पंढरपूर-त्र्यंबकेश्वर असा ५२ दिवसांचा प्रवास आहे. पूर्वी पालखीसोबत हजारभर लोक असायचे. आता या सोहळ्याला मोठं स्वरूप प्राप्त झालं असून, नगरच्या पुढे जवळपास एक लाख वारकरी सहभागी होतात. त्यातल्या काही दिंड्या स्वयंपूर्ण असतात, तर काही दिंड्या गावांवर अवलंबून असतात. त्यांची व्यवस्था ही प्रत्येक मुक्कामाला गावातील मंडळी करतात. पूर्वीपेक्षा आता सोयी वाढल्या आहेत. नगरपालिका आणि जिल्हा परिषदा आरोग्याच्या, पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देतात. रथाच्या बदलत्या स्वरूपाबद्दल गोसावी म्हणाले, निवृत्तीनाथ महाराजांची पूर्वीची पालखी ही लाकडाला अॅल्युमिनिअमचं कोटिंग असलेली होती. त्यापूर्वी ती पितळेची होती. यावर्षीपासून चांदीची पालखी बनवण्यात आली आहे. रथाबाबत बोलायचं झालं तर नाशिकमधील श्रीमंत व्यक्तिमत्त्व रावजीसा यमासा क्षत्रिय यांनी १९५०-६० दरम्यान लाकडाचा रथ करून दिला होता.

इंग्रजांच्या काळात वारीच्या स्वरूपाची एक गोष्ट गोसावींनी सांगितली. १९३२मध्ये महाराष्ट्रात प्लेगची साथ होती, त्यामुळं नाशिकच्या कलेक्टरनं जमाव बंदी केली होती. त्यामुळं त्या वर्षीची वारी कशी निघणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. वारकरी त्र्यंबकला येऊन मग पंढरपूरला जायचे. रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून ही बंदी घालण्यात आली होती. मग त्यावेळी वारीत खंड पडू नये यासाठी गणेश विष्णू गोसावी, नारायण वीणेकरी आणि इतर काही सहकारी मूर्ती घेऊन पंढरीला गेले. शिवाजी महाराजांचा त्र्यंबकेश्वरच्या वारीशी संबंध असल्याचा एक दाखलाही त्यांनी दिला. शिवाजी महाराजांचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे या पालखी सोहळ्यासोबत जात होते. या वारीत कुणी धष्टपुष्ट वारकरी दिसला तर त्याला राजगडावर घेऊन जात असत आणि शिवरायांचे मावळे म्हणून सैन्यात भरती करत असत. शहाजी महाराजांपासून अहिल्याबाई होळकरांपर्यंत अनेक ऐतिहासिक सत्ताधार्‍यांचे त्र्यंबकेश्वर आणि निवृत्तीनाथ समाधी मंदिराशी संबंध असल्याचे पुरावे सापडतात.

या सोहळ्यातील तिसरी दिंडी असलेल्या डावरेंशी प्रत्यक्ष भेट झाली नाही. पण फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सरकारकडून मिळणार्‍या सुविधांविषयी अडचणी सांगितल्या. इतर पालखी सोहळ्यांना सुविधा मिळतात म्हणून आम्हाला मिळायला पाहिजेत, असं बाळकृष्ण डावरे यांना वाटतं. माउली आणि तुकोबांच्या पालखीच्या तुलनेत पोलिस संरक्षण कमी आहे. स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा केला जात नाही. पाण्याची व्यवस्था त्वरित होत नाही. अशा अडचणी डावरे यांनी सांगितल्या. माउलींचा चांदीचा रथ आहे म्हणून आम्ही ८० ते ८५ लाख रुपये खर्च करून निवृत्तीनाथांसाठीही चांदीचा रथ तयार करवून घेतला. आमच्या सोबत येणार्‍या वारकर्‍यांचीच तशी इच्छा होती, असं त्यांनी सांगितलं. पालखी सोहळ्यातील डावरे कुटुंबीयांची ही पाचवी पिढी आहे. वामन चिंतामण गोसावी यांनी १८८० दरम्यान हा सोहळा सुरू केला. तेव्हा डावरे यांचे मूळपुरुष शिवराम डावरे हे पालखी सोहळ्यासोबत होते. निवृत्तीनाथ महाराज संस्थान हे गेल्या काही वर्षांपूर्वी आले. पण सुमारे १३० ते १४० वर्षांपासून ही घराणी सोहळ्याचं आयोजन करत आहेत. आज बाळकृष्ण डावरे वीस वर्षांपासून सेवेकरी मानकरी म्हणून सहभाग घेत आहेत. त्र्यंबकेश्वरसारखेच आणखी महत्त्वाचे पालखी सोहळे, हे संत मुक्ताबाईंचे. मुक्ताईनगर आणि मेहूण या दोन गावांहून हे सोहळे निघतात.

त्र्यंबकेश्वरनंतर पुढचा मुक्काम होता कातरणी, तालुका येवला, जिल्हा नाशिक. हे वारकरी संप्रदायात आदरस्थानी असलेल्या गयाताई आणि दादामहाराज मनमाडकरांचं मूळ गाव. नाशिकपासून ७५ किलोमीटर आणि येवल्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेलं हे फारतर ५००० लोकवस्तीचं गाव. तिथे सर्वत्र दुष्काळाच्या खुणा दिसत होत्या. खरं तर हे लासलगाव-येवला या सधन पट्ट्यातलं गाव. पण डोंगराळ भागामुळं इथं दुष्काळ पाचवीला पुजलेला. पण गावकर्‍यांना दादामहाराज आणि गयाबाई मनमाडकर यांच्याबद्दल विचारलं तर आपुलकीचा धबधबा वाहू लागला.

कातरणीला गाडी थांबवली. उतरताच कपाळी अष्टगंध लावलेले एक महाराज भेटले. त्यांचं नाव विष्णू महाराज कदम. त्यांनी मला मंदिराच्या पारावर नेलं. तिथे गावकरी दादामहाराजांबद्दल भरभरून बोलू लागले. गयाबाई मनमाडकर यांच्या निधनानंतर १९५९ला पंढरपुरातील मनमाडकर मठाची जबाबदारी दादा महाराजांवर आली. लहान वयातच त्यांनी भजन, कीर्तन आणि प्रवचनाला सुरुवात केली. १९६० साली गयाबाईंच्या पुण्यतिथी नाम सप्ताहाला सोनोपंतमामासाहेब दांडेकर यांना कीर्तनाला बोलावलं. तेव्हा दादामहाराजांवर उच्चविद्याविभूषित मामासाहेबांचा प्रभाव पडला आणि ते त्यांचे शिष्यच बनले. पुढे मामासाहेबांच्या मार्गदर्शनात पुणे विद्यापीठात पीएच. डी. ची पदवी घेतली. ‘वारकरी संप्रदाय : तत्त्वज्ञान आणि सद्यकालीन औचित्य’ हा त्यांचा शोधप्रबंध पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटतर्फे जर्मनीच्या हायडेलबर्ग विद्यापीठात संशोधनात्मक अभ्यासासाठी उपयुक्त ग्रंथ म्हणून पाठवण्यात आल्याचं कदम महाराजांनी सांगितलं. वेदांताचा अभ्यास असल्यामुळं त्यांना ‘विद्यावाचस्पती’ अशी पदवीही देण्यात आली होती. दादामहाराजांचं मूळ आडनाव सोनावणे. जातीनं मराठा. त्यांची जमीनही गावात आहे. ते राहायला पंढरपुरात असले तरी आपल्या मातीशी नातं त्यांनी कधी तोडलं नाही. गेली ऐंशी वर्ष निर्जला एकादशीला गावात सप्ताह असतो. वृद्धापकाळानं थकेपर्यंत या एकादशीचं कीर्तन दादामहाराज करत होते. दादासाहेब सुरुवातीला विद्वत्ताप्रचुर आणि कठीण भाषेत कीर्तन करायचे. ते काहीच कळत नसल्याचं एकदा गावकर्‍यांनी त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी सोप्या भाषेत तेच कीर्तन केलं. त्यानंतर ते कायम ठेवलं. गावातील सप्ताहाला यंदा ८० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याअगोदरपासून गावात वारीची परंपरा आहे. काही जण आळंदीहून ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यात जातात तर काही जण निवृत्तीनाथांसह त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर चालतात. येवला, मनमाड, लासलगाव भागातील दिंडीची परंपरा आहे. या भागातून निवृत्ती महाराजांच्या सोहळ्यात त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशा वारीसाठी चार दिंड्या जातात. जवळच्या कानडे गावातून नारायण महाराज काळे, मनमाडमधून रामदास महाराज कैकाडे, पाटोदा येथून कै. रुंझा महाराज बोराडे, लासलगाव येथून बहुरूपी महाराजांच्या दिंड्या निवृत्ती महाराजांच्या सोहळ्यात सहभागी होतात, अशी माहिती कदम महाराजांनी दिली.

दादा महाराजांचे वडील नारायणबाबा यांचा स्वभाव धार्मिक होता. त्यामुळं गावकरी त्यांची चेष्टामस्करी करायचे. त्याला रागावून कपडे काढून मारुतीच्या पारावर बसले. गावकर्‍यांनी त्यांना हाकलून दिलं. त्यानंतर ते कधीच गावात दिसले नाहीत. आले ते महाराज बनूनच. त्यांच्या आयुष्यात हा बदल झाला गयाबाईंशी लग्न झाल्यामुळे. गाडगेबाबांच्या शिष्या मातोश्री गयाबाई हे वारकरी संप्रदायाला आधुनिक रूप देणार्‍या पिढीमधलं एक प्रमुख नाव. त्यांनी स्वतःची दिंडी काढून पालखी सोहळ्यातल्या प्रस्थापितांना मोठाच धक्का दिला. वाहनांची सोय नसलेल्या काळात त्यांनी पायी चारधाम यात्रा केली. त्यामुळं त्यांच्या व्यक्तित्त्वामागे एक वलय तयार झालं होतं. त्यांची यात्रा राजकोटला असताना नदी पार करण्यासाठी ब्रिटिशांनी होडी नाकारली, त्या वेळी गळ्यात वीणा घेऊन त्यांनी नदी पार केल्याचं गावकरी अभिमानानं सांगतात. दादामहाराजांचे नातेवाईक कोणी गावात राहतं का, असं विचारलं असता, गावकर्‍यांनी त्यांच्या चुलत भाऊ साहेबराव सोनवणे यांना फोन करून बोलावून घेतलं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडून अधिक माहिती मिळाली. दादामहाराजांच्या वडिलांना गावातून हाकलून दिल्यानंतर ते गाडगेबाबांच्या आश्रमात गेले. १० वर्ष पंढरपूरच्या मठात मॅनेजर म्हणून काम पाहिलं. नंतर गाडगेबाबांच्या आदेशानुसार ते गावोगाव कीर्तन करत हिंडू लागले. असंच एकदा राजा टाकळीला आल्यावर त्यांची आणि गयाबाईंची भेट झाली. त्या राजाराम मोहन राय यांच्या घरातील असल्याचं सांगितलं जातं.

नाशिकला लग्न झाल्यावर पाच वर्ष गयाबाई आपल्या सासूसह कातरणीला राहिल्या. त्यावेळी त्या गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणूनही काम करत होत्या. नारायणबाबा पंढरपूरला गाडगेमहाराजांच्या आश्रमात होते. १९३५ साली गयाबाई पंढरपूरला गाडगेमहाराजांच्या आश्रमात गेल्या. त्या ठिकाणी त्या भजन, कीर्तन शिकल्या. त्यानंतर पहिली पायी यात्रा १९३५मध्ये बद्रीनाथ येथे काढली. त्यावेळी गयाबाई गरोदर होत्या. दादा महाराजांचा जन्म १९३६मध्ये बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील तरनळी गावी प्रवासातच झाला. पण त्यांनी यात्रा थांबवली नाही. बद्रीनाथची यात्रा पूर्ण करून १९४२मध्ये सात वर्षांनी पंढरपूरला परतल्या. पंढरपुरात तनपुरे महाराजांच्या मठामागे मनमाडकरांचा भलामोठा मठ आहे. गयाबाईंनी आपली माहेरची जमीन विकून पंढरपुरात जमीन विकत घेतली आणि या मठाची उभारणी केली.

कातरणीनंतर माझी शोधाची दिंडी माझ्या गावाला म्हणजे चाळीसगावात गेली. तिथून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलदारवाडी येथून एक छोटा पालखीसोहळा दरवर्षी पंढरपूरला जातो. मोठ्या पालख्यांसारखं त्याचं रूप भव्य नसलं तरी त्यातली पंढरीची ओढ कुठंच कमी नसते. चाळीसगावपासून एकपदरी रस्ता बेलदारवाडीला जातो. दुपारच्या सुमारास पाच- सात एकरवर पसरलेल्या मंदिराच्या परिसरात गाडी लावली. नदीकाठी असलेला हा भव्य परिसर हळूहळू कात टाकत होता. त्या ठिकाणी एक मंदिर उभं राहिलं आहे आणि दुसर्‍याची उभारणी होते आहे. मग मी माउली कुमावत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा शोध घेत एका आऊट हाऊसच्या वरच्या खोलीत गेलो. पांढरी कोपरी, धोतर, गळ्यात तुळशीमाळ, डोक्यावर अष्टगंध आणि केस बारीक कापलेले ५५-६० वयाचे एक महाराज खुर्चीत बसून माझी वाट पाहत होते.

ज्ञानेश्वर महाराजांशी गप्पांना सुरुवात झाली. अत्यंत मृदूभाषी महाराजांनी वारीची सुरुवात कशी झाली याचा किस्सा सांगितला. बेलदारवाडी येथून गेल्या २४ वर्षांपासून निवृत्तीनाथ महाराज तुसे यांच्या नावानं सिद्धेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दिंडी पंढरपूरला जाते. जळगाव, नाशिक, औरंगाबाद, नगर, सोलापूर असे पाच जिल्हे आणि एकूण १३ तालुक्यातून ही दिंडी सुमारे ४०१ किलोमीटरचं अंतर पार करत पंढरपुरात पोचते. निवृत्तीनाथ तुसे महाराजांचं २१ मे १९७९ला निधन झालं. त्यांनी मरणावेळी पाच इच्छा सांगून ठेवल्या होत्या. त्यातील एक बेलदारवाडी ते पंढरपूर ही पायी वारी करावी, अशी इच्छा होती. आपल्या गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी ही वारी सुरू झाल्याचं आश्रमाचे ज्ञानेश्वर महाराज परदेशी यांनी सांगितलं. त्यांचं मूळ नाव हेमराज. पण गुरू निवृत्तीनाथांनी त्यांना ज्ञानेश्वर असं नाव दिलं.

ज्ञानेश्वर महाराजांसोबत गप्पा रंगल्या. वारी सुरू होण्यासाठी दात्यांनी जी मदत केली त्यामुळं हे शक्य झाल्याचं त्यांनी मान्य केलं. वारकर्‍यांची भोजनाची व्यवस्था हे दाते करतात. तसंच राहण्याची व्यवस्था गेल्या २४ वर्षांपासून मुक्कामाच्या ठिकाणी गावकरी करतात. कधी ही व्यवस्था शाळेत असते तर कधी मंगल कार्यालयात असते. दिंडीला सुरुवात होते तेव्हा जवळपास २०० जण असतात. नंतर हळूहळू माणसं जोडली जातात. १२०० वारकरी या दिंडीत सहभागी होतात. विशेष म्हणजे या दिंडीत कुणीही मानकरी नाही, सगळेच वारकरी. या दिंडीचं एक वैशिष्ट्य म्हणजे दिंडी सुरू करण्यापूर्वी प्रत्येक पुरुषाला डोक्याचे केस काढावे लागतात. या दिंडीतले सगळे वारकरी मुंडन केलेले असतात. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. थंड पाण्यानं आंघोळ करावी लागत असल्यानं केसात पाणी साचू नये हे पहिलं कारण. आपल्या दिंडीतले वारकरी ओळखता यावेत हे दुसरं कारण आणि मुंडन केल्यानंतर विद्रूप चेहर्‍यामुळं महिलांना पुरुषांचं आकर्षण उरत नाही, हे तिसरं कारण. या दिंडीत साडेतीनशेच्या आसपास महिला वारकरी असतात. पुरुष आणि महिला या दोन वेगळ्या रांगा करून चालत असतात. महिलांची विशेष काळजी घेतली जाते. या दिंडीचे नियम कडक आहेत. यात व्यसन करता येत नाही. केली तर शिक्षा होते. भजन सुरू असताना चालता चालता कोणी लघवीला थांबलं तर त्यालाही शिक्षा केली जाते. वारीच्या काळात कोणी हॉटेलमध्ये जेवण करता येत नाही. अशा व्यक्तींना डोक्यावर मोठा दगड घेऊन ठराविक अंतर पार करावं लागतं. हजार-बाराशे वारकरी जेवल्यानंतर त्या ठिकाणी अन्नाचा एक कण दिसत नाही, इतकी स्वच्छता या दिंडीत असते. पत्रावळ्या कचरापेटीत टाकण्याची शिस्त लावण्यात येते.

गेल्या २४ वर्षांत तालुक्यात बेलदारवाडीचे संप्रदायाला वाढविण्यात आघाडीचं स्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी दात्यांचीही कमतरता नाही. भागवत सप्ताहातून मोठी वर्गणी जमा होते. विठ्ठलाच्या कृपेनं ट्रस्ट स्थापन करून २ कोटी खर्च करून पंढरपुरातही चंद्रभागेच्या काठी एक मोठी धर्मशाळा बांधली आहे. बेलदारवाडीला कार्तिकस्वामींची मोठी जत्रा भरते. यातून येणार्‍या पैशातून पंढरपुरात चातुर्मासाला दररोज ५०० ते ६०० जणांची भोजनाची व्यवस्था माधुकरीतून करण्यात येते, हे समाजाप्रति देणं आम्ही पूर्ण करतो, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. सिद्धेश्वर आश्रमाच्या माध्यमातून तरुणांच्या व्यसनमुक्तीचं काम मोठ्या प्रमाणात केलं जात असल्याचंही ते म्हणाले. दररोज एक तरी व्यक्ती मी व्यसनमुक्त करतो, असा दावा त्यांनी केला.

चाळीसगाव तालुक्यातल्याच पिंपळगाव येथून संत गोरोबाकाका पायी वारी सोहळा निघतो. १९९९ सालापासून हा सोहळा सुखदेव महाराज वाघ आयोजित करत आहेत. महाराज बी.एस्सी. केमेस्ट्री असून, ते लोकमान्य हायस्कूलला शिक्षक होते. पण ते सोडून त्यांनी अध्यात्मासाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे. एके दिवशी गावात एका दिंडी सोहळ्याची पत्रिका आल्याचं पाहून सुखदेव महाराजांनाही आपल्या गावातूनही अशीच दिंडी असावी, असं वाटलं. सुरुवातीला फक्त ५५ लोक होते. आता २२ दिवसांचा हा प्रवास २५० ते ३०० जण भजन, कीर्तन आणि हरिपाठ म्हणत पूर्ण करतात. जळगाव, नाशिक, औरंगाबाद, नगर आणि सोलापूर अशा पाच जिल्ह्यांतून खडतर प्रवास करत ही दिंडी पंढरपूरला पोचते, असं सुखदेव महाराजांनी सांगितलं. चाळीसगाव तालुक्यातून किमान पाच दिंड्या या पंढरीला जातात. यात कृष्णा महाराज, भोईबाबा, सुखदेव महाराज, लीलाबाई आणि दस्केबर्डी येथील दिंड्यांचा समावेश आहे. प्रत्येक दिंडीत सुमारे २५० वारकरी असतात. एकूण चाळीसगाव तालुक्यातून २५०० वारकरी दरवर्षी पंढरीला जातात.

पुढचा मुक्काम हा धुळेला होता. तिथे देविदास माळी यांना भेटायचं होते. पण, फक्त फोनवरच बोलणं होऊ शकलं. ते जिल्ह्याच्या वारकरी सेवा समितीचे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले, वारकरी सेवा समितीसाठी मी खिशातील पैसे खर्च करून खटाटोप करतो. धुळे जिल्ह्यातील दिंड्यांची माहिती सरकारला, पत्रकारांना आणि पोलिसांना व्हावी, हा माझा उद्देश आहे. जेव्हा दिंड्या धुळ्यात मुक्कामला असतात. त्यांच्या स्वागताची जबाबदारी आम्ही पार पाडतो. जुन्या कागदपत्रांनुसार आणि वारकरी सेवा समितीकडे नोंद असलेल्या दिंड्यांनुसार जिल्ह्यातील काही दिंड्या १२५ ते १५० वर्ष जुन्या आहेत. यातील कुकुरमुंडा येथील दिंडींचा विचार करता, १९० वर्षांपासून कुकुरमुंडा ते पंढरपूर पायी वारी जात आहे. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा आणि धुळे तालुक्यात वारकर्‍यांची आणि दिंड्याची संख्या अधिक असल्याचं माळी यांनी सांगितलं.

शिंदखेडा तालक्यातून मेघश्याम महाराज यांची बालाजी मंदिराची पायी दिंडी गेल्या १५० वर्षांपासून पंढरीला जात आहे. तसंच दरातेगावातून मुरलीधर महाराज गेल्या १० वर्षांपासून पायी दिंडी पंढरपूरला नेतात. पाष्टे येथून ज्ञानेश्वर माउली महाराज गेल्या ३० वर्षांपासून दिंडी विठूरायाच्या दर्शनाला नेतात. शिंदखेडा तालुक्यातील विख्रण येथून शंकर महाराजांची दिंडी गेल्या १२५ वर्षांपासून ४५० किलोमीटरचा प्रवास करून पांडुरंगाच्या भेटीला जाते. तसंच त्याच्या शेजारी असलेल्या होळ गावातून तुळशीराम होळ महाराज गेल्या २४ वर्षांपासून पंचक्रोशीतील वारकर्‍यांना घेऊन वारीला जातात. शिंगठाणे येथूनही एक दिंडी गेल्या ३० वर्षांपासून सावळ्याच्या दर्शनाला नियमित जातं आहे. धुळे तालुक्यातील मोरशेवडी येथून ३० वर्षांपासून गवळीबाबा हे पायी दिंडी पंढरपूरला नेतात. तसंच मोहाडीतील राजाबाबा २५ वर्ष, धुळे शहरातून उत्तमरावबाबा ५० वर्ष, धुळ्यातील गोकुळनगरातून बन्सीलाल महाराज २५ वर्ष, धुळे तालुक्यातील कापडणे येथून बाबू महाराज ५ वर्ष, वनीमळाने या गावातून कैलास महाराज २२ वर्ष, रानमळा येथून देवराम आटोळे ३५ वर्षांपासून आपल्या गावातून पंढरीला पायी दिंडी सोहळा घेऊन जात आहेत. धुळे तालुक्यातील गरताड येथून एक दिंडी येते. साक्री तालुक्यातील सांजोरी गावातून गोपाळ महाराज ४५ वर्षांपासून तर बलठाणे गावातून पुंडलिक महाराज २० वर्षांपासून पंढरपुरात आपापल्या दिंड्या घेऊन जात आहेत.

धुळ्यानंतरचा पुढचा मुक्काम होता कुकुरमुंडा. थेट गुजरात. सुरत जिल्ह्यात निझर तालुक्यात असलेलं कुकुरमुंडा हे गाव वारकर्‍यांमध्ये प्रसिद्ध आहे. या ठिकाणाहून सुमारे ७५० किलोमीटर पायी प्रवास करून वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला येतात, हे ऐकून होतो. पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी असल्यावर खूप मस्त वाटलं. मी गाडीतून प्रवास करत इथं आल्यावर इतका थकलो होतो. हे पायी कसे प्रवास करत असतील याचं कौतुकही वाटलं.

कुकुरमुंडा… हे नाव सुरुवातीला ऐकल्यावर मला आपण दक्षिणेतील एखाद्या गावाला चाललो आहे असं वाटलं. पण आज गुजरातमध्ये असलेलं हे गाव पूर्वी पश्चिम खान्देशात समाविष्ट होतं. राज्यनिर्मितीनंतरही हे गाव महाराष्ट्रातच होतं. तेव्हाच्या धुळे जिल्ह्यातल्या नंदूरबार तालुक्यात. पण तापी नदीवर धरण बांधताना हे गाव नदीच्या पलीकडे गुजरातमध्ये स्थालंतरित करण्यात आलं. ते वर्ष होतं १९७०. मग त्या दिवसापासून कुकुरमुंडा हे कागदोपत्री गुजरात राज्याचा भाग झालं. पण आजही त्यांना मोठी बाजारपेठ म्हणून महाराष्ट्रातलं नंदूरबारच जवळचं वाटतं. कुकुरमुंडा येथे पोचल्यावर उद्धव महाराज कुकुरमुंडेकर यांचं घर विचारलं. मुख्य रस्त्यापासून आत ५०० मीटरवर एक मोठं कॉम्प्लेक्स होतं. हे कॉम्प्लेक्स उद्धव महाराजांचं, असं एका गावकर्‍यानं सांगितलं. कॉम्प्लेक्सचं काम सुरू आहे. त्याच्यामागे एक जुनं बांधकाम असलेलं मंदिर आहे. विशेष म्हणजे या मंदिराला कळस नाही.

कुकुरमुंडेकरांची कुकुरमुंडा, तळोजा, नंदूरबार आणि पंढरपूर येथे मालकीची मंदिरं आहेत. या चारही मंदिरांना कळस नाही. ही कुकुरमुंडेकरांची खासगी मंदिरं आहेत. या मंदिरात कोणी प्रवेश करायचा हे ते ठरवतात. पंढरपुरात कथित अस्पृश्यांनी मंदिर प्रवेश केला. सार्वजनिक मंदिरात सगळ्यांना प्रवेश द्यावा लागतो. मंदिरात ‘कोणीही’ प्रवेश करू नये म्हणून मंदिरांना कळस देण्यात आला नाही. नीरज कुकुरमुंडेकर यांची परवानगी घेऊनच मी कुकुरमुंडा येथील मंदिरात प्रवेश केला. मी कुकुरमुंडा येथे पोचलो तेव्हा दोन दिवस अगोदरच खंडोजी महाराज संस्थानाच्या दिंडीनं गुरुपुषामृताच्या मुहूर्तावर ९ जून रोजी पंढरीकडे प्रस्थान ठेवलं होतं. त्यामुळं कुकुरमुंडा येथील प्रस्थानाचं ठिकाण पाहून मी पुन्हा दिंडी सोहळा मुक्कामाला असलेल्या नंदूरबारमधील विठ्ठल मंदिरात गेलो. त्यालाही कळस नाही.

कुकुरमुंडा येथून १८८२च्या म्हणजे आसपास सुमारे १९० वर्षांपूर्वी खंडोजी महाराज कुकुरमुंडेकर यांनी या पालखीची सुरुवात केल्याचं विद्यमान महाराज उद्धव महाराज कुकुरमुंडेकर यांनी सांगितलं. त्यांचे गुरू दामोदर स्वामी यांनी यापूर्वी पंढरपूरला पायी वारी केली होती. त्यांच्या उपदेशावरून पायी वारीची परंपरा कुकुरमुंडा येथून सुरू झाली. त्यांच्या घरी तलाठीची परंपरा होती. पण खंडोजीबाबांचं मन त्यात रमत नव्हतं. त्यांनी पदाचा राजीनामा देऊन भारतातील तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. सर्वत्र फिरून आल्यानंतर पंढरपुरात त्यांना समाधान लाभलं. या ठिकाणी आपलं स्थान असावं म्हणून त्यांनी चंद्रभागेच्या काठावर उपासना सुरू केली. अकरा दिवस तपश्चर्या केल्यानंतर बडव्यांच्या स्वप्नात पांडुरंग आले, त्यांनी सांगितलं की, खान्देशातून खंडोजी म्हणून माझा भक्त आला आहे. त्याचं कीर्तन मला ऐकायचं आहे. त्यानुसार बडव्यांनी महाराजांचा शोध घेतला आणि रंगशिळेवर भजन करण्याचं आमंत्रण दिलं. पंढरपुरातील गरुडखांबासमोर असलेल्या रंगशिळेवर महाराजांनी भजन केलं. त्या भजनात महाराज असे नाचले, की ते भजन पाहण्यासाठी आलेल्या वेश्याही लाजल्या होत्या, असं उद्धव महाराजांनी सांगितलं. त्या दिवसापासून पंढरपुरात रंगशिळेवर पांडुरंगाच्या इतक्या जवळ भजन करण्याचा मान फक्त खंडोजी महाराज संस्थान कुकुरमुंडे यांना आहे.

गेल्या पाच पिढ्यांपासून वारीची ही परंपरा कुकुरमुंडेकर संस्थानानं कायम ठेवली आहे. कुकुरमुंडा ते पंढरपूर हे ७५० किलोमीटरचं अंतर पायी दिंडीच्या माध्यमातून पूर्ण करायचं. त्यानंतर दोन महिने पंढरपुरात वास्तव्य करायचं आणि त्यानंतर ३४ दिवसांत पुन्हा पंढरपूर कुकुरमुंडा असा प्रवास करायचा ही परंपरा अखंडपणे १९० वर्षांपासून सुरू असल्याचं उद्धव महाराजांनी सांगितलं. गेल्या १९० वर्षांपासून कुकुरमुंडा ते पंढरपूर हा प्रवास आम्ही ३४ दिवसांत करायचो, पण यंदा २५ दिवसांत हा प्रवास पूर्ण करण्याचा कार्यक्रम त्यांनी आखला आहे. बहुतांश दिंड्या आता रथ स्वरूपात जातात. पण गेल्या १९० वर्षांपासून कुकुरमुंडा येथील दिंडीतील महाराज विठ्ठलाची मूर्ती गळ्यात घालून, वीणेसह पायी प्रवास करतात. या मूर्तीचं वजन अंदाजे साडेसहा किलो आहे. पताका, टाळ, मृदुंग, वीणा असं दिंडीचं स्वरूप असतं. स्वातंत्र्यपूर्व काळात संस्थानांची जबाबदारी ही संतोजी महाराजांवर आली. त्यांनी वारीसोबत राजकारणातही उडी घेतली होती. त्यांनी आयुष्यभर खादी वापरली. सत्याग्रहात सहभाग घेतला होता. काही काळ तुरुंगवासही भोगला होता. त्यांच्याकडे महात्मा गांधींची पत्रंही आहेत.

या दिंडी सोहळ्यात ठरावीक ४० वारकरी असतात. महाराष्ट्रातील इतर सोहळ्यात जसे विविध ठिकाणांहून वारकरी जोडले जातात आणि मग मोठा समाज पंढरीत दाखल होतो, तशी प्रथा या दिंडी सोहळ्याची नाही. एकूण ४० वारकरी या वारीत असतात. मुक्कामाच्या ठिकाणापासूनच ही संख्या निर्धारित असते. ज्याला वारी सुरू करायची त्याला कुकुरमुंडा येथूनच करावी लागते. त्यासाठी पूर्वनोंदणी करावी लागते. कुणालाही मधेच प्रवेश नसतो. प्रत्येकाचा पांढरा पोशाख असतो. डोक्यावर टोपी असते. छोटी दिंडी असल्यानं प्रत्येकाच्या जेवणाची उत्तम सोय असते. उद्धव महाराजांच्या घरी वारीच्या प्रसादाचा लाभ घेत मी त्यांचा निरोप घेतला आणि पुढच्या मुक्कामाला माझी दिंडी हलवली. आता मला अमळनेरला सखाराम महाराजांच्या दिंडी सोहळ्याची माहिती घ्यायची होती. शिरीष कुमारांच्या नंदुरबारमधून मी गाडी वळवून पुन्हा धुळे जिल्ह्यातून शिंदखेडा मार्गे अमळनेरला जाण्याचं ठरवलं.

अमळनेरला जात असताना शिंदखेड्यापासून पाच किलोमीटरवर होळ म्हणून छोटं गाव लागलं. तेथून गेल्या २० वर्षांपासून एक छोटी दिंडी पंढरीला जात आहे. तुळशीरामबाबा होळ यांनी २८ जून १९९६ पासून पायी दिंडीची सुरुवात केली. विद्यमान दिंडीचे महाराज दोधू महाराज असून, ते अपंग आहेत. तरीही ते ४५० किलोमीटरची वारी पायी पूर्ण करतात. या दिंडीत शिरपूर, शहादा, बोरमोड, नंदूरबार, रजाळे आणि होळ गावातील सुमारे ४५० वारकरी सहभागी होतात. सहा जिल्ह्यांतून देवदर्शन करत ही वारी मार्गस्थ होत असते, असं वीणेकरी अभिमन पाटील यांनी सांगितलं.

होळवरून थेट सखाराम महाराजांचं अमळनेर. या गावाची ओळख म्हणजे साने गुरुजींची कर्मभूमी. साने गुरुजींनी अस्पृशतेविरुद्ध लढाई देत पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून दिला. या संदर्भात प्रताप कॉलेजचे माजी मराठी विभागप्रमुख प्रा. ब. लु. सोनार यांची भेट घेतली. त्यांच्या मते वारकरी संप्रदायचा पाया भेदाभेद अमंगळ हाच आहे, हे साने गुरुजींनी जाणलं होतं. त्यांनी वारकरी संप्रदायातील तत्त्वांचा आणि मूल्यांचा वापर हा जातीभेद नष्ट करण्यासाठी वापरला. जातीभेद नष्ट करण्यासाठी मुळावर घाव घातला पाहिजे, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळं त्यांनी हरिजनांना मंदिर प्रवेशाचं आंदोलन केलं. वारी आणि वारकरी संप्रदाय प्राचीन काळापासून महाराष्ट्राचा अविभाज्य अंग आहे. त्यामुळं वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाच्या चरणी हा जातीभेद होतो, तो जर दूर झाला तर तो संदेश संपूर्ण महाराष्ट्रात जाईल, हे गुरुजींनी हेरलं होतं. त्यामुळं त्यांनी वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला आणि त्यानुसार आपलं आंदोलन केल्याचं सोनार यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे अमळनेरच्या सखाराम महाराज संस्थानचे आठवे मठाधिपती वासुदेव महाराज यांनी साने गुरुजींच्या या आंदोलनाला विरोध केला होता. दलितांच्या मंदिर प्रवेशानंतर त्यांनी मंदिरात जाणंही थांबवलं होतं. तरीही या दोघांचे वैयक्तिक संबंध चांगले होते. साने गुरुजींनी वासुदेव महाराजांवर लेखनही केलं आहे. अमळनेरच्या वाडी चौकात सखाराम महाराज संस्थानचं विठ्ठल मंदिर आहे. तिथे तरुण पुजारी जयप्रकाश देव यांची भेट झाली. संस्थानाच्या पायी वारीबद्दल ते भरभरून बोलत होते.

१७७४ पासून मूळपुरुष सखाराम महाराज यांनी पायी वारीची परंपरा सुरू केली. सखाराम महाराजांचा जन्म १७५७ला झाला. त्यांचं १६व्या वर्षी लग्न झालं. त्याच वर्षी पत्नीला माहेरी पाठवून झोपडीला आग लावून ते वारीला गेले. त्यामुळं १७७४ पासून सखाराम महाराज संस्थानच्या पायी वारीची परंपरा सुरू झाली. सुमारे २४२ वर्षांपासून अमळनेरमधून वारी अखंडपणे पंढरीला जाते. सखाराम महाराज संस्थान हे १८१७मध्ये स्थापन करण्यात आलं. अमळनेरच्या सखाराम महाराज संस्थानाची वारी ही अत्यंत खडतर मानली जाते. इतर सोहळ्यांमध्ये रोज १८ किलोमीटर चालतात. पण या वारीत ५५ ते ६० किलोमीटरचे मुक्काम आहेत. ही दिंडी डोंगर दर्‍यातून आणि दुष्काळी गावातून जाते.

अमळनेरवरून सखाराम महाराज संस्थानचे विद्यामान महाराज प्रसाद महाराज यांच्या भेटीसाठी जळगाव येथे गेलो. त्या ठिकाणी पारंपरिक महाराजांच्या वेशात पांढरं शुभ्र वस्त्र परिधान करून प्रसाद महाराज बसले होते. त्यांच्या भेटीला भक्त परिवार रांग लावून बसला होता. ते म्हणाले, सुरुवातीला सखाराम महाराज यांच्यासोबत फक्त दहावीस जण हे वारी करत असत. त्यानंतर गोविंद महाराज प्रमुख झाले. त्यांनी वारीचं व्यवस्थापन केलं. त्यानंतर हा आकडा शंभरावर गेला. सध्या माझ्यासोबत सुमारे १५०० जण पायी वारी करतात. एकदा डोक्यावर घोंगडी घेतली की पुन्हा मागे फिरायचं नाही, हा या दिंडीचा नियम. एका वर्षी आईच्या निधनाची बातमी ऐकूनही त्यांना मागे फिरता आलं नाही. संस्थानची आषाढी वारी ४३६ किलोमीटरचं अंतर २४ दिवसांत पूर्ण करते. संस्थानचे महाराज प्राचीन पांडुरंगाची मूर्ती घेऊन पंढरपूरला जातात. महाराज जिथं तिथं ही मूर्ती असते.

प्रसाद महाराजांचा निरोप घेऊन जळगावमधील राम मंदिर संस्थानच्या मुक्ताबाई राम पालखी सोहळ्याची माहिती घेण्यास जुन्या जळगावात गेलो. जुन्या जळगावात प्रवेश केल्यावर एका भल्या मोठ्या मशिदीसमोर एक भलं मोठं जुन्या काळातलं राम मंदिर आहे. या मंदिरातून गेल्या १४३ वर्षांपासून पंढरपूरला पायी वारी प्रस्थान ठेवते. जळगाव जिल्ह्यातून मुक्ताईनगर येथे आणि जळगाव शहरातून मुक्ताईंची ही दुसरी मोठी पालखी पंढरपुरात जाते. हा पालखी सोहळा १८७२ पासून अप्पा महाराज जोशी यांनी सुरू केला. ही महाराष्ट्रातील मुक्ताबाईची सर्वात जुनी पालखी, असा दावा राम मंदिर संस्थाननं त्यांच्या पत्रकात केला आहे.

अप्पा महाराजांना मुक्ताईंचा दृष्टांत झाला त्या वर्षापासून वारी सुरू करण्यात आल्याचं सध्याचे प्रमुख मंगेश महाराजांनी फोनवरून सांगितलं. या सोहळ्यात मुक्ताईंची पालखी आणि अप्पा महाराजांची प्रतिमा असते. यासाठी एक रथ तयार करण्यात आला आहे. यात ब्रिटिश काळापासून वैद्यकीय सुविधा आहे. पूर्वी एका बैलगाडीत वैद्य असायचा, दुसरीत पाण्याची व्यवस्था. दरोडेखोरांपासून संरक्षणासाठी पोलिस बंदोबस्तही देण्याचा जुना प्रघात असल्याची माहितीही त्यांनी दिली. खान्देशच्या सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा आणि या पालखी सोहळ्याचा संबंध असल्याचं मंगेश महाराजांनी सांगितलं. बहिणाबाईंच्या कवितेवरचा वारकरी संप्रदायाचा प्रभाव स्वयंस्पष्ट आहे. त्या अप्पा महाराज जोशी यांच्या शिष्या होत्या, असं मंदिरानं प्रकाशित केलेल्या पुस्तकात म्हटलं आहे. अप्पा महाराजांच्या निधनानंतर बहिणाबाईंनी श्रद्धांजली काव्य केलं होतं. हे काव्य आजही मंदिरात अप्पा महाराजांच्या फोटोखाली लावलं आहे.

उत्तर महाराष्ट्रातल्या वारकर्‍यांची परंपरा वैशिष्ट्यपूर्ण आहे. पंढरपुरापुरापासून प्रचंड लांब असले तरी त्यांची नाळ चंद्रभागेच्या वाळवंटातच पुरलेली आहे. त्यामुळं विठ्ठलाच्या सावळ्या आकर्षणाची ओढ त्यांना रोखू शकत नाही. ते ‘ज्ञानोबा-तुकाराम’ म्हणत पंढरपुरात पोचतातच. उत्तरायण सुरू झालं की, दिवस मोठमोठे होत जातात. तसंच उत्तर महाराष्ट्रातल्या या वारकर्‍यांच्या आयुष्यातलं उत्तरायण कायमच सुरू असतं. स्वतःचा परीघ वाढवत वाढवत तुकोबांसारखं आकाशाएवढं होण्यासाठी.

0 Shares
कीर्तनकारांचे ‘आयटीआय’ वटवृक्ष