वाट निवृत्तीची

सुनील घुमे

आपेगावात जन्मलेल्या आणि आळंदीत वाढलेल्या निवृत्तीनाथांच्या आयुष्यात त्र्यंबकेश्वराचं स्थान मोठं आहे. इथंच त्यांना गहिनीनाथांचा अनुग्रह मिळाला. त्यानंतर पुन्हा याच ठिकाणी येऊन त्यांनी समाधी घेतली. त्या निवृत्तीची वाट दाखवणार्यान परिसराचा हा अनुभव.

नाशिकहून आमची ‘स्विफ्ट’ त्र्यंबकेश्वरच्या दिशेनं निघाली. त्र्यंबकेश्वर म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्राचीन शिवपीठ. दर १२ वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा इथं नुकताच पार पडलेला. पण, आम्ही निघालो होतो ते शिवशंकराच्या दर्शनासाठी नाही, तर संत निवृत्तीनाथांच्या समाधी मंदिराकडं. त्र्यंबकेश्वर आणि निवृत्तीनाथ हे नेमकं काय ‘कनेक्शन’ आहे, याचा शोध घ्यायला. निवृत्तीच्या वाटेवर…

संत निवृत्तीनाथ म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाउलींचे थोरले बंधू आणि गुरू देखील. म्हणजे साक्षात माउलींची गुरूमाउली.

सचिन तेंडुलकरला पहिल्यांदा बॅट धरायला शिकवली ती त्याच्या भावानं, अजित तेंडुलकरनं. म्हणजे तेंडुलकर घडवण्यात अजितचा जेवढा वाटा होता, तेवढाच ज्ञानेश्वरमाउली घडवण्यामध्ये निवृत्तीनाथांचा होता. पण, अजितनं केवळ एका सचिन तेंडुलकरला आकार दिला. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांसह सोपानदेव आणि मुक्ताबाईला तर घडवलंच; पण संपूर्ण वारकरी संप्रदायाला आणि समाजाला ज्ञानाची वाट दाखविली. या महागुरू निवृत्तीनाथांच्या त्र्यंबकेश्वर येथील समाधी मंदिराच्या दिशेनं आमचा प्रवास सुरू होता.

नाशिक ते त्र्यंबकेश्वर म्हणजे साधारण ३० किलोमीटरचं अंतर. वेळ टळटळीत दुपारची. त्यामुळं रस्त्यावर फारसं ‘ट्रॅफिक’ नव्हतं. नुकताच सिंहस्थ कुंभमेळा पार पडलेला असल्यानं रस्तादेखील एकदम चकाचक होता. भर वैशाखातली दुपार. बाहेर कडकडीत ऊन; पण गाडीतल्या ‘एसी’मुळं ते अजिबातच जाणवत नव्हतं. मोकळ्या काळ्याशार रस्त्यावरून वेगानं गाडी चालवायला वेगळीच मजा येत होती. त्यात नाशिकला अविनाश गोसावी आम्हाला ‘जॉईन’ झाले होते. अविनाश गोसावी हे त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ समाधी मंदिराचे विश्वस्त. त्यांचं गोसावी घराणं निवृत्तीनाथ समाधी मंदिराचे अधिकृत पुजारी. सासवडला संत सोपानदेवांची समाधी आहे. तिथल्या पूजेअर्चेचा मानही गोसावी कुटुंबाकडंच आहे. हे अविनाश गोसावी म्हणजे ‘मॅनेजमेंट गुरू’. नाशिकसह उभ्या महाराष्ट्रात ते विविध कंपन्यांना व्यवस्थापन कौशल्याबाबत सल्ले देतात. याशिवाय त्यांची वेगळी ओळख म्हणजे संत वाड्मयाचा त्यांचा उत्तम अभ्यास आहे. विशेषतः ज्ञानेश्वरमाउली, संत निवृत्तीनाथ, नामदेवराय, एकनाथमहाराज यांची अभंगवाणी त्यांच्या तोंडून ऐकताना कुणीही तल्लीन होऊन जावं.

‘निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई-एकनाथ-नामदेव-तुकाराम’ हा गजर आपण नेहमीच ऐकतो. त्यातला भावार्थ अविनाश गोसावींनी समजावून सांगितला. संत निवृत्तीनाथ हे व्यक्तिस्वरूप नसून, तत्त्वस्वरूप आहेत. ते ज्ञानदेव, सोपानकाका आणि मुक्ताईचेही गुरू आहेत. शिष्याच्या जीवनात प्रकाशाची दृष्टी प्राप्त करून देतो, तो गुरू. त्यामुळं निवृत्तीनाथ जाणून घ्यायचे असतील तर ज्ञानदेव समजून घ्यावे लागतात. निवृत्ती म्हणजे वृत्तीपासून परावृत्त होणे. ज्ञानदेव म्हणजे ज्ञानाचे देव आणि सोपान म्हणजे पायरी. निवृत्ती समजायचे असतील तर ज्ञानाचा देव समजून घ्यायला पाहिजे. त्याचा सोपान चढून जायला पाहिजे, मग मुक्ती आहे. एकनाथ म्हणजे विश्वात एकच ब्रह्म आहे. ते समजायचे असेल तर नामाचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे. तुकाराम म्हणजे ‘तू का राम’ किंवा ‘तुझ्यात राम आहे का’, या प्रश्नाचा शोध घेतला तर संत वाङ्मयाच्या दिशेनं वाटचाल करणं सोपं होतं…

गाडीतला ‘एफएम’ कधीच बंद झाला होता. अविनाश गोसावींचं रसाळ निरूपण मनात उतरत होतं. ज्ञानेश्वरीत तब्बल ९ हजार ३३ ओव्या आहेत. त्यातील सुमारे २८०० ओव्या या निवृत्तीनाथांना उद्देशून आहेत. ‘ओम नमोजी आद्या’च्या शेवटी ‘म्हणे निवृत्तीदासू’ असा माउलींनी स्वतःचा उल्लेख केलाय. म्हणजे ज्ञानेश्वर काय सांगतात हे ऐका, असं माउली म्हणत नाहीत. तर ‘निवृत्तीचा दास’ काय सांगतो ते ऐका, असं ते म्हणतात. संस्कृतातील भगवद्गीतेतील ज्ञान सर्वसामान्यांना समजावं, यासाठी ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली, ती निवृत्तीनाथांच्या कृपेनंच.

सकळही तीर्थे निवृत्तिचे पायी |
तेथे बुडी देई माझे मना ॥
आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण |
वृत्तीसी मार्जन केले असे ॥

निवृत्तींच्या पायीच सगळी तीर्थं असल्याचं माउली आपल्या अभंगातून सांगतात.

ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवी ज्ञान |
समाधी संजीवन हरिपाठ ॥

असं ज्ञानदेवांनी हरिपाठात म्हटलंय. निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर या दोघा भावांमधला नातेसंबंध गोसावी उलगडून सांगत असताना पाऊण तास कसा निघून गेला, ते कळलंच नाही. आम्ही त्र्यंबकेश्वरच्या जवळ पोचलो होतो. रस्त्याच्या दुतर्फा अनेक साधू-संतांच्या आखाड्याच्या खाणाखुणा दिसल्या. रस्त्यावर ठिकठिकाणी ‘बॅरिकेड्स’ लावलेले होते. एका ठिकाणी पोलिसांनी रस्ता बंद केला होता. उजव्या बाजूनं गावात जा, असा इशारा पोलिसानं खुणेनंच केला. गोसावींनी गाडीची काच खाली करायला सांगितली. ‘गावातला आहे, निवृत्तीनाथ मंदिर गोसावी’.

पोलिस एकदा गाडीत डोकावला. ‘बॅरिकेडस्’ बाजूला केले आणि आमची गाडी त्र्यंबकेश्वर गावात शिरली. गावपणाच्या खुणा काही मुख्य रस्त्यावरून दिसेनात. दोन्ही बाजूला दुकानं थाटलेली. त्यात हॉटेल्स, प्रामुख्यानं ‘व्हेज हॉटेल्स’ ठळकपणे दिसली. गेल्या २०-२५ वर्षांत त्र्यंबकेश्वरमध्ये मोठे बदल झालेत. विशेषतः नारायण नागबळी, त्रिपिंडी, कालसर्प शांती, उत्तरक्रिया, जननशांती, सिंहस्थसिन्हास्त असे धार्मिक विधी करण्यासाठी त्र्यंबकेश्वरला धाव घेणा-यांची संख्या वाढल्यानंतर. इथले पौरोहित्य करणारे ब्राह्मण आणि देशभरातले ज्योतिषी यांच्यात ‘कट प्रॅक्टिस’ सुरू झाली. देश-विदेशातून ‘शांती’साठी गिर्‍हाईकं येऊ लागली. दररोज सरासरी २५ हजार भाविक आणि पर्यटक इथं भेट देतात. त्यामुळं स्थानिक नागरिकांना जोडधंदे मिळाले. त्र्यंबकेश्वरचं अर्थचक्र गतिमान झालं. लॉजिंग, हॉटेलिंग, सोनाराची दुकानं वाढल्याने वर्षाकाठी सुमारे २०० ते ३०० कोटींचा ‘टर्नओव्हर’ इथं होत असल्याचा अंदाज आहे.

१९५४मध्ये मुंबई नगरपालिकेसोबतच त्र्यंबकेश्वर नगरपालिकेची स्थापना झाली. लोकसंख्येचे निकष पूर्ण होत नसतानाही. सिंहस्थ कुंभमेळा होत असल्यानं इथं नगरपालिका सुरू झाली. स्थानिक नागरिकांची संख्या जेमतेम १२-१५ हजारांच्या घरात असावी. त्यात पौरोहित्य करणार्‍या ब्राह्मणांची संख्या लक्षणीय आहे. हिंदू महादेव कोळी आणि आदिवासी हे इथले मूळ रहिवासी. अगदी अठरापगड जातीचे लोक इथं राहतात. धार्मिक पर्यटन हाच सर्वांचा प्रमुख व्यवसाय. गेल्या २० वर्षांत त्र्यंबकमध्ये पैसा भरपूर आला; पण गावपण मात्र हरवून गेलं, अशी खंत गावातच लहानाचे मोठे झालेल्या गोसावींनी मांडली.

त्र्यंबकेश्वरच्या गल्ल्या-गल्ल्यांमधून वाट काढत आमची गाडी निवृत्तीनाथ समाधी मंदिराजवळ पोचली. गावाच्या अगदी टोकाला असलेलं हे मंदिर. त्याच्या समोरच सध्या धर्मशाळेची इमारत बांधण्याचं काम सुरू आहे. डाव्या बाजूला हार विकणार्‍या एका बाईंचं दुकान. मंदिरासमोरच्या झाडाच्या बुंध्याजवळ कुठून कुठून आलेली मंडळी विसाव्याला बसलेली दिसली. त्यात म्हातारे-कोतारे होते, तशीच मध्यमवयीन माणसंही दिसली. अगदी मुलाबाळांना घेऊन आलेली संसारी मंडळीदेखील.

गाडीतून खाली उतरत असतानाच अविनाश गोसावींनी समोरच्या डोंगराकडं बोट दाखवलं. हा ब्रह्मगिरी पर्वत. त्र्यंबकेश्वर गाव या ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी वसलेलं आहे. ब्रह्मगिरी म्हणजे साक्षात भगवान शंकराचं स्थान. शैवपंथीय या ब्रह्मगिरी पर्वतालाच शिवस्वरूप मानतात. शिवाला जशी पाच मुखं होती, तशी ब्रह्मगिरीला पाच शिखरं आहेत. त्यातल्या अर्ध्या भागाला ‘त्र्यंबक मठिका’ तर गंगाद्वाराकडील भागाला ‘कौलगड’ म्हणतात. हे गंगाद्वार म्हणजे दक्षिण गंगा गोदावरीचं उगमस्थान. या ब्रम्हगिरीतच गोदावरी उगम पावून तिचा नाशिकच्या दिशेनं प्रवास सुरू होतो. पुढं हीच गोदामाई कोट्यवधी जनांची तहान भागवते. या ब्रह्मगिरीसह नजीकच्या अंजनेरी पर्वतालाही प्रदक्षिणा घातली जाते. हा अंजनेरी पर्वत म्हणजे श्री हनुमानाचं जन्मस्थान. या पर्वतावरच अंजनी मातेनं पवनपुत्र हनुमानाला जन्म दिला, असं मानलं जातं. कधी काळी घनदाट अरण्य असलेल्या या ब्रम्हगिरीवरच नाथ सांप्रदायाचे गुरू गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ यांनी घोर तपश्चर्या केली.

नाथ संप्रदायी मंडळींना एकांताची आवड असते. त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, नाशिक या पर्वतीय प्रदेशात ते साधना आणि उपासना करायचे. त्र्यंबकेश्वर, हरिश्चंद्रेश्वर, भीमाशंकर, रायरेश्वर, महाबळेश्वर ही महाराष्ट्रातली सगळी ठिकाणं म्हणजे शंकराची शिखरं. त्यामुळं नाथ सांप्रदायानं हाच सगळा पर्वतीय पट्टा साधनेसाठी निवडला, अशी माहिती नामदेव भक्तिपीठ संस्थेचे नंदन राहाणे यांनी दिली. तर प्रत्येक सिंहस्थ कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वरला नाथ सांप्रदायाचा राजा निवडला जातो. त्याला श्रीपात्रदेव कदली यात्रा म्हणतात. हा राजा एक पात्र घेऊन कर्दळी वनापर्यंत जातो. त्याच्यासोबत अर्थातच नाथांच्या झुंडी असतात, अशी माहिती त्र्यंबकेश्वरला पौरोहित्य करणारे राजेश दीक्षित यांनी दिली.

ब्रम्हगिरीच्या उजव्या बाजूला दिसणारी पांढर्‍या रंगाची एक ठळक खूण अविनाश गोसावींनी आम्हाला दाखवली. हीच ती गहिनीनाथ गुंफा! त्या गुहेमध्ये गहिनीनाथ तपश्चर्या करायचे. गहिनीनाथ म्हणजे निवृत्तीनाथांचे गुरू या गुरू-शिष्याच्या भेटीची कथाही थोडी रंजक आहे. निवृत्तीनाथांचे आजोबा गोविंदपंत यांनीही गहिनीनाथांकडून दीक्षा घेतली होती. पैठणपासून जवळच असलेल्या आपेगावी निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या भावंडांचा जन्म झाला. त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई. विठ्ठलपंतांनी आधी संन्यास घेतला, नंतर त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यामुळं संन्याशाची पोरं म्हणून या भावंडांना हिणवलं जायचं. ही भावंडं लहान असताना एकदा विठ्ठलपंत त्यांना त्र्यंबकेश्वरला तीर्थाटनासाठी घेऊन आले. कुशावर्तात स्नान केल्यानंतर, त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन ही मंडळी १८ मैलांची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करायचे. गोविंदपंताप्रमाणेच आपणावरही गहिनीनाथांची कृपादृष्टी व्हावी, या हेतूनं त्यांच्या शोधासाठी विठ्ठलपंत ब्रह्मगिरी पालथा घालायचे. एकदा या घनदाट जंगलात भटकत असताना, अचानक तिथं वाघ आला. वाघाच्या डरकाळ्या ऐकून सगळ्यांची एकच पळापळ झाली. बाकीची मंडळी एकीकडं आणि सात-आठ वर्षांचे निवृत्तीनाथ एकीकडं, अशी फाटाफूट झाली. घनदाट अरण्यात आपल्या कुटुंबाचा शोध घेत भटकत असतानाच निवृत्तीनाथांना एक गुहा दिसली. त्या गुहेत योगायोगानं निवृत्तीनाथांची आणि गहिनीनाथांची भेट झाली. निवृत्तीनाथांना गहिनीनाथांच्या रूपानं गुरू भेटले. गहिनीनाथांनी त्यांना नाथपंथीय योगमार्गाची, ब्रह्मज्ञान, गुह्यज्ञान, महावाक्यज्ञान, आत्मज्ञान अशा ज्ञानमार्गांची दीक्षा दिली. निवृत्तीनाथांचं त्र्यंबकेश्वरला येणं हा तीर्थयात्रेचा भाग असला तरी, नियतीनं घडवून आणलेला तो योगायोग होता.

आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा |
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ॥
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला |
गोरक्ष ओळला गहिनीप्रती ॥
गहिनीप्रसादे निवृत्ती दातार |
ज्ञानदेवा सार चोजविलें ॥

ज्ञानदेवांनी आपल्या हरिपाठात केलेलं हे गुरुपरंपरेचं वर्णन. वारकरी संप्रदायाची पताका गेली ७०० वर्ष डौलानं फडकत ठेवणार्‍या ज्ञानेश्वरांची नाळ मूळ नाथ संप्रदायाशी अशी जुळलेली होती. त्याकाळी कर्मठ ब्राह्मण्याची धारा होती. त्या वेळच्या कर्मठांनी निवृत्ती, ज्ञानदेव आदी भावंडांना संन्याशाची मुलं म्हणून ब्राह्मण धर्मात घेतलं नाही. त्यांची मुंज वगैरे होऊ दिली नाही. तर त्याच काळात योगाभ्यास करणारा नाथ संप्रदायही कार्यरत होता. हा संप्रदाय कोणतंही वैदिक कर्मकांड मानत नव्हता. कोणत्याही जातीचा माणूस नाथ संप्रदायात जाऊ शकत असे. समाजात मिळून मिसळून गेलेला, लोकभाषेत ज्ञान सांगणारा असा हा संप्रदाय. त्यामुळे नाथ संप्रदायाशी ही भावंडं आपोआप जोडली गेली. त्यात गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथांना अनुग्रह झाला. या भावंडांचे आईवडील प्रयागच्या संगमात देहान्ताचं प्रायश्चित्त घेण्यासाठी निघाले, त्या वेळी गहिनीनाथ त्यांच्या घरी आले होते. त्यांनीच त्यांना निरोप दिला आणि ते गेल्यानंतर तिघा भावंडांना ज्ञान देण्याची जबाबदारी निवृत्तीनाथांवर सोपवली. निवृत्तीनाथांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि ते या भावंडांचे गुरू झाले.

नाथ संप्रदायाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समाजासाठी जगायचं; पण ‘अनाम’ होऊन. मागं कसलीही ओढ शिल्लक ठेवायची नाही. अशा रितीनं हे नाथपंथीय सर्वसंग परित्यागी, निःसंगी होत. त्यामुळंच की काय, जेव्हा निवृत्तीनाथांच्या मनात इहलोकातून निवृत्ती घेण्याचा विचार आला; तेव्हा त्यांनी वाट धरली ती त्र्यंबकेश्वरची!

निवृत्तीचे गूज, विठ्ठल सहज |
गहिनीनाथे मज सांगितले ॥

असं स्वतः निवृत्तीनाथांनी सांगून ठेवलंय.

ज्ञानदेवांनी आळंदीत आणि सोपानदेवांनी सासवडला संजीवन समाधी घेतली. मुक्ताईदेवी विजांच्या कल्लोळात लुप्त झाल्या, असं मानतात. एका वर्षभरातच पाठच्या तिन्ही भावंडांनी ईहलोकीचा निरोप घेतल्यानंतर निवृत्तीनाथांनीही समाधीस्थ होण्याचं ठरवलं. ज्येष्ठ वद्य एकादशी शके १२१८ म्हणजे इसवी सन १७ जून १२९७ रोजी निवृत्तीनाथांनी वयाच्या २३व्या वर्षी त्र्यंबकेश्वरी समाधी घेतली. त्या वेळी उपस्थित असलेल्या संत नामदेवांनी त्या समाधी सोहळ्याचं वर्णन केलंय.

लोपलासे भानू पडलासे अंधार |
गेला योगेश्वर निवृत्तीराज ॥
गेल्या त्या विभूती अनादि अवतार |
आता देवा फार आठवते ॥

संत नामदेव पुढं म्हणतात,

धन्य धन्य निवृत्तीदेवा | काय महिमा वर्णावा ॥
शिव अवतार धरून | केले त्रैलोक्य पावन ॥
समाधी त्र्यंबकशिखरी | मागे शोभे ब्रह्मगिरी ॥

त्र्यंबकेश्वर म्हणजे शिवाचं स्थान आणि निवृत्तीनाथ म्हणजे साक्षात शिवाचा अवतार. ब्रह्मगिरीमध्येच गंगा गोदावरीचा उगम होतो आणि याच ठिकाणी निवृत्तीनाथांना गुरूचा म्हणजे गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला. त्यामुळंच चिरविश्रांती घेण्यासाठी त्यांनी त्र्यंबकेश्वरची निवड केली. यावर गोसावी, रहाणे, दीक्षित अशा सगळ्याच अभ्यासकांचं एकमत आहे.

आम्ही बूट काढले आणि समाधी मंदिरात प्रवेश करू लागलो. तिथं एक पायरी दिसली. पंढरपूर मंदिरात जशी नामदेवांची पायरी आहे, तशीच. निवृत्तीनाथ समाधी मंदिरातली ही पायरी आहे, अनाजीबुवांची. माझ्याही वडिलांचं नाव अनाजी असल्यानं अर्थातच कुतूहल चाळवलं गेलं. अनाजीबुवांना कुष्ठरोग झाला होता. पंढरपुरात जाऊन आत्महत्या करण्याचा त्यांचा विचार होता; पण तिथे गेल्यावर त्यांना कुणीतरी सांगितलं की, आठ महिने निवृत्तीनाथांच्या समाधी मंदिरात जाऊन राहा. त्यानुसार निवृत्तीच्या सेवेसाठी ते आले. सकाळी कुशावर्तावर स्नान केल्यानंतर दिवसभर १८ तास ते वीणा घेऊन मंदिराबाहेर उभे राहायचे. समाधी मंदिरात जायची माझी पात्रता नाही, असं म्हणायचे. निवृत्तीनाथांच्या समाधीला जो अभिषेक घातला जायचा, त्याचं तीर्थ ते प्राशन करायचे. श्रद्धेने म्हणां किंवा चमत्कार म्हणां, पण त्यामुळं अनाजीबुवांचा कुष्ठरोग बरा झाला, असं सांगतात. १९४९मध्ये मंदिराच्या सभामंडपातच अनाजीबुवांनी प्राण सोडला. त्यांची आठवण म्हणून ही पायरी.

तेव्हापासून मंदिरात वीणा पहारा सुरू आहे. आता तीन-तीन विणेकरी दिवसरात्र आलटून पालटून मंदिरात उभे असतात. ते वीणा खाली ठेवत नाहीत. आता ही सेवा पगारी झाली आहे. त्यांचा उदरनिर्वाहाचा सगळा खर्च मंदिर ट्रस्टकडून भागवला जातो.

१९५४मध्ये मंदिर ट्रस्टची स्थापना झाली. १२९७मध्ये निवृत्तीनाथांनी समाधी घेतली; तेव्हा विमलानंद गोसावी नावाचे गोसावी घराण्याचे पूर्वज उपस्थित होते. तेव्हापासून गोसावी घराण्याची २२वी पिढी या समाधीची पूजाअर्चा करतेय. या ट्रस्टमध्ये गोसावी कुटुंबीयांचाच भरणा असल्यानं मध्यंतरी मोठे वादही झाले. ‘श्री सद्गुरू निवृत्तीनाथ’ या आपल्या पुस्तकामध्ये पांडुरंग कवेश्वर ऊर्फ पी. के. पाटील आंधळे यांनी या वादाची तपशीलवार माहिती दिली आहे. महाराष्ट्र वारकरी मंडळ या संघटनेनं गोसावी घराण्याच्या एकाधिकारशाहीला आव्हान दिलं. या गोसाव्यांचं मूळचं नाव सोनटक्के आणि ते मूळचे सासवड-पंढरपूर मार्गावरील लोणी गावचे रहिवासी. चिंतामणी सोनटक्के हे या घराण्याचे मूळपुरुष. विष्णू वामन गोसावी यांनी त्र्यंबकेश्वरला पुजारी म्हणून काम करायला सुरुवात केली. ६ जानेवारी १९५४ रोजी गोसावी घराण्यानं जो ट्रस्ट स्थापन केला, त्यात विश्वस्तही तेच आणि पुजारीही तेच. मंदिरातल्या देणग्या, मंदिराला दान म्हणून मिळालेल्या जमिनी यांचा हिशेब गोसावी धर्मादाय आयुक्तांकडे देत नाहीत. मंदिराच्या स्थावर जंगम मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावतात, पावत्यांच्या माध्यमातून जमा केलेली रक्कम हिशेबात दाखवली जात नाही, असे अनेक आक्षेप घेण्यात आले. अखेर न्यायालयीन मध्यस्थीनंतर खासगी ट्रस्टचे सार्वजनिक न्यासामध्ये रूपांतर करण्यात आलं.

केवळ ट्रस्टबाबतच वाद आहेत, अशातला भाग नाही, तर मूळ समाधीबाबतही वाद आहेत. त्र्यंबक नगरपालिकेच्या दप्तरी ‘सिटी सर्व्हे नंबर ६२९’ म्हणून निवृत्तीनाथ समाधी मंदिराची नोंद आहे; पण ज्या ठिकाणी निवृत्तीनाथांनी समाधी घेतली, त्या ठिकाणी तब्बल ८० समाध्या होत्या. त्यातली निवृत्तीनाथांची समाधी नेमकी कुठली, याचा शोध कसा लागला, याच्या वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळाल्या. पाटीलबुवा (जोपुळकर), गंगागीर महाराज (बेटकर) आणि शिवरामबुवा (कोनांबेकर) यांनी निवृत्तीनाथांची समाधी शोधली आणि १२५ वर्षांपूर्वी वर्गणी काढून मंदिर बांधलं, अशी एक कथा. तर श्री केदारबाबा कर्‍हाडकर यांनी ही समाधी शोधल्याची दुसरी कथा. ते ७ दिवस अनुष्ठानाला बसले. सातव्या दिवशी एक ९ वर्षांची मुलगी कुठून तरी अचानक आली आणि तिनं म्हणे केदारबाबांना ही समाधी दाखवली. त्यानंतर ती मुलगी पुन्हा दिसेनाशी झाली. तर इसवी सन १८१२मध्ये पेशवाईच्या उत्तरार्धात त्या वेळचे त्र्यंबक गडाचे किल्लेदार जोगळेकर यांचे शिपाई लक्ष्मण लालमान यांनी हे मंदिर बांधलं, असाही उल्लेख प्राचीन दस्तऐवजांमध्ये आहे.

निवृत्तीनाथ समाधी मंदिराची आणखी एक गंमत आहे. इथं वर्षातून दोन वेळा निवृत्तीनाथांची यात्रा भरते. निवृत्तीनाथांनी समाधी घेतली, ती पंढरपूरच्या वारीच्या आधी, पावसाळ्यात, ज्येष्ठ महिन्यात. त्यामुळं खरं तर ज्येष्ठ एकादशीला इथं मोठा सोहळा व्हायला हवा. पूर्वी तो तसा व्हायचादेखील. मात्र १८९६ नंतर पौष वद्य एकादशीला यात्रेला सुरुवात झाली. विष्णू नरहर ऊर्फ जोग महाराजांनी ही पौष यात्रेची परंपरा सुरू केली. ज्येष्ठ महिन्यात पावसाळ्यात पंढरपूर यात्रेला जाण्याची वारकर्‍यांची लगबग असते. त्यामुळं ज्येष्ठ एकादशीला त्र्यंबकेश्वरसारख्या आडगावी दर्शनाला येण्याची संधी वारकर्‍यांना मिळत नव्हती; त्यामुळं वारकर्‍यांच्या सोयीसाठी पौष यात्रा सुरू करण्यात आली. ही तीन दिवसांची यात्रा असते. राज्यभरातून वारकर्‍यांच्या चारशे-पाचशे दिंड्या याठिकाणी येतात. सुमारे ५ लाखांच्या आसपास भाविकांनी ही तीर्थनगरी फुलून जाते. भगव्या पताका आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात निवृत्तीमाउलींच्या दर्शनासाठी अवघी त्र्यंबकनगरी विठ्ठलमय होऊन जाते.

त्र्यंबकेश्वरला ‘नारायण नागबळी’च्या निमित्तानं पुरोहित आणि ज्योतिषी यांच्यातील ‘कट प्रॅक्टिस’ची चर्चा होते. अगदी त्याच धर्तीवर ज्येष्ठातली यात्रा पौष महिन्यात साजरी करण्यामागं काही आर्थिक गणितं तर नाहीत ना, असा थेट सवाल मी ट्रस्टी अविनाश गोसावींना केला; तेव्हा त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. उत्पन्न मिळवणं, हा त्यामागचा हेतू नक्कीच नव्हता. १९७०-७२मध्ये मंदिराच्या दानपेटीत अगदी अत्यल्प उत्पन्न मिळायचं, हे मी स्वतः पाहिलं आहे. सोनोपंत ऊर्फ मामासाहेब दांडेकरांच्या चरित्रात तसे उल्लेखही आहेत. त्या तुलनेत आज उत्पन्न वाढलं असलं तरी ते फार नाही. दिवसाकाठी सुमारे ५०० भाविक मंदिरात येतात. त्यातून कितीसं उत्पन्न मिळणार? वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ असलेल्या निवृत्तीनाथांचं दर्शन वारकर्‍यांना घेता यावं, हाच पौष यात्रेमागचा उद्देश आहे. त्यामागं सेवाभाव आणि निस्सीम भक्तिभाव आहे, असं गोसावींनी सांगितलं.

पहाटे ५ वाजता काकड आरतीनं निवृत्तीनाथ मंदिराला जाग येते. सकाळी सव्वा सहा ते पावणे आठदरम्यान समाधीची नित्यपूजा होते. दुपारी १२ वाजता निवृत्तीनाथांना नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी ४ वाजता समाधीला पोषाख घातला जातो. रात्री ८ वाजता नित्य भजनानंतर शेजारती होते. निवृत्तीनाथ समाधी मंदिरातला हा नित्य दिनक्रम. वारीच्या काळात सायंकाळी ४ वाजता मंदिरात प्रवचनं होतात. दरवर्षी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरला निवृत्तीनाथांचीही पालखी निघते. आषाढी वारीत निवृत्तीनाथांच्या पालखीचा पूर्वी तिसरा नंबर असायचा. ज्ञानदेवांच्या पालखीला पहिला तर तुकोबांच्या पालखीला दुसरा मान मिळायचा; पण जोग महाराजांनीच निवृत्तीनाथांच्या पालखीला १९१७मध्ये दुसरा मान मिळवून दिला. ज्यांनी ज्ञानेश्वरांसारखा महान शिष्य दिला, त्या निवृत्तीनाथांच्या पालखीला दुसर्‍या क्रमांकाचा मान मिळावा म्हणून जोग महाराजांनी स्वतः तुकोबांच्या पालखीच्या चालकांना गळ घातली. निवृत्तीनाथांची पालखी त्र्यंबकेश्वरला परत आल्यानंतर मंदिरात मोठा सोहळा होतो.

घरा आले घरा आले घरा आले कृपाळू |
पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ ॥
सांभाळले सांभाळले सांभाळले अनाथा |
केला निळा केला निळा केला निळा पावन ॥

अशा संत निळोबारायांच्या अभंगाच्या गजरात हे समाधी मंदिर दुमदुमतं.

मी आणि माझा मित्र प्रशांत जाधव निवृत्तीनाथांचं दर्शन घेण्यासाठी सभामंडपात आलो. लाकडी बांधकाम. छतावर चौकटीचं नक्षीकाम. कोरीव नक्षीदार खांब. त्यांना दिलेला रंग. तिन्ही बाजूला ठरावीक अंतरानं लावलेल्या संतांच्या तसबिरी. लाकडी कठडे. एखाद्या जुनाट वाड्यासारखे असे ते सभामंडप. तिथं प्रवचनाची तयारी सुरू होती. निवृत्तीनाथ महाराज अभंगगाथा १०८ पारायण सांगतेनिमित्त तिथं अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी जमलेल्या लहानमोठ्या वारकर्‍यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय दिसली.

गाभार्‍याची पिवळसर आणि भगव्या रंगाची चौकट. मधोमध चांदीचा गणपती. लाकडी दारातून आम्ही आत पोचलो आणि निवृत्तीनाथांच्या समाधीपुढं नतमस्तक झालो. चांदीची मूर्ती, त्यावर पांढरंशुभ्र उपरणं, गळ्यात वाहिलेले हार, डोक्यावरची फुलं, मागचं चांदीचं सिंहासन, त्यावरच्या मयूरमुद्रा, त्यापाठीमागं चांदीच्या मखरात सावळ्या विठ्ठल-रखुमाईच्या पाषाणमूर्ती असं सगळं सगळं डोळ्यात साठवून घेतलं. दर्शन घेऊन बाहेर आलो, तर तिथं हातात वीणा घेऊन उभा असलेला विणेकरी दिसला. लोक त्यांचंही दर्शन घेत होते. आम्ही गाभार्‍याला एक प्रदक्षिणा घातली. गाभार्‍याबाहेर पुन्हा हात जोडून उभं असतानाच, तरुणांचा एक घोळका आला. ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’चा मोठा गजर त्यांनी केला. ‘निवृत्तीनाथ महाराज की जय’च्या जयघोषात आमचाही आवाज सामील झाला.

साधारणपणे पन्नाशीनंतर माणूस भक्तिमार्गाला लागतो, असा माझा आपला समज; परंतु त्या समजाला फाटा देणारं चित्र समाधी मंदिरात मला दिसलं. सात-आठ वर्षांच्या मुलांपासून ते पंच्याहत्तरी ओलांडलेल्या म्हातार्‍या कोतार्‍यांपर्यंत आणि पंधरा-वीस वर्षांच्या मुलींपासून ते हातात तुळशीमाळा घेऊन तोंडातल्या तोंडात पुटपुटणार्‍या आजीबाईंपर्यंत सगळ्याच वयाचे लोक तिथं दिसले. या एवढ्या म्हातार्‍या बायका, काकू-आत्या कुठून आल्या असतील? का आल्या असतील? कसला जप करत असतील? निवृत्तीनाथांकडं काय मागत असतील? त्या संसार करत असतील की, संसारातून मन उडालं म्हणून इथं येऊन बसल्या असतील? घरात सुनेच्या जाचाला कंटाळून त्या इथं आल्या असतील का? पोटच्या पोरांनी त्यांना टाकून दिलं असेल का? असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात घोंघावू लागले. लोक घरदार सोडून देवाच्या भक्तीत लीन होतात, मंदिरातच राहतात, असं ऐकलं होतं. सहा महिन्यांपूर्वी मुंबईला आमच्या शेजारी राहणार्‍या काळेआजी अशाच घरातून निघून गेल्या. कुठं गेल्या काहीच माहीत नाही. शोध घेऊनही सापडल्या नाहीत. बायकांच्या त्या गर्दीत काळेआजी कुठं दिसतायत का, म्हणून माझी नजर भिरभिरू लागली. निवृत्तीनाथांनी काहीतरी चमत्कार घडवावा आणि काळेआजी भेटाव्यात, असं मनोमन वाटत होतं; पण, चमत्कार घडला नाही.

काळेआजींसारख्याच दिसणार्‍या शांताबाई बाराखडे तिथं भेटल्या. अहमदनगर तालुक्यातील शेंडी भंडारदरा त्यांचं गाव. निवृत्तीनाथांच्या समाधी मंदिरात दरवर्षी गावकीचं जेवण देण्याची परंपरा आहे. त्यासाठी त्या आल्या होत्या. मनाची इच्छा झाली. देवाला आलो. आनंद वाटला. देवानं बुद्धी दिली की, येतो. दरवर्षी अशीच बुद्धी द्यावी, असं शांताबाई म्हणाल्या. काय मागितलं देवाकडं, या प्रश्नावर त्या किंचित हसल्या. काय मागायचं, सुख मागितलं. धनदौलत नाही मागितली. देवाचे आभार मानले, शांताबाईंनी प्रांजळपणे सांगितलं.

तिथं माइकच्या बाजूलाच एक मुलगा दिसला. पांढरा सदरा पायजमा. गळ्यात उपरणं. डोक्यावर पांढरी टोपी आणि कपाळी अष्टगंधाचा छानसा टिळा. त्याचं नाव वैभव भाऊसाहेब खांगळ. वय वर्ष १६. आळंदीच्या राजे शिवछत्रपती विद्यालयात दहावीला शिकतो. चांदवड तालुक्यातलं कोलटेक पाटे हे त्याचं गाव. त्याच्या आजोबांचं मंदिरात प्रवचन होतं. त्यांच्यासोबत तो आला होता. कीर्तन-प्रवचनाची आवड असल्यानं तो दोन वर्षांपासून आळंदीला ‘परेल मुंबई धर्मशाळे’त राहतो. मी देखील मुंबईला परळला राहतो, असं सांगितल्यावर तो हसला. काय शिकतोस, विचारल्यावर पखवाज आणि टाळ वाजवायला. गायनही शिकतोय, असं म्हणाला. बारावीनंतर आळंदीच्या जोग महाराज संस्कृत विद्यापीठात संस्कृत शिकणार, असंही बोलला. एवढासा मुलगा, पण त्यानं त्याचा मार्ग ठरवून टाकला होता. वडील सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या बनवतात, पण मला त्यात रस नाही. मला कीर्तन आवडतं आणि मी कीर्तनकारच बनणार, असं सगळं सांगत होता.

एव्हाना हरिपाठ सुरू झाला होता.

ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान |
समाधी संजीवन हरिपाठ ॥

माझे लक्ष भगव्या साडीतल्या एका तरुणीकडं गेलं. माइकच्या समोर ती उभी होती. कपाळी गंध. गळ्यात घातलेला टाळ वाजवत ती अभंगात तल्लीन झाली होती. आजूबाजूच्या बायकांचं वय आणि तिचं वय यात मोठं अंतर होतं. मी तिला बाजूला बोलावलं. म्हणालो, तुमच्याशी थोडं बोलायचंय. ती बिच्चारी गांगरून गेली. अविनाश गोसावींनी हातानं ‘या’ अशी खूण केल्यानंतर ती आमच्या मागून ट्रस्टच्या ऑफिसात आली. ‘बसा’, म्हणून मी तिला खुर्ची दिली. पण, ती बसली नाही. माउलींचा हरिपाठ सुरू आहे, मला बसण्याची अनुमती नाही, असं म्हणाली. ताई मानलं तुम्हाला, असं म्हणून गोसावींनी तिला हात जोडले आणि पाया पडण्यासाठी ते खाली वाकले.

मोहिनी प्रमोद ढोणे तिचं नाव. वय वर्ष २७. राहणार कल्याण. मग एवढ्या लांब इकडं कशी काय, असं विचारल्यावर ती म्हणाली, कीर्तनासाठी आले. गेल्या अडीच वर्षांपासून जिथं कीर्तन असतं, तिथं मी जाते. कीर्तनकार जे सांगतात, ते आचरणात आणायचा प्रयत्न करते. कोणाचा द्वेष करायचा नाही. मी नीट असेन तर, जग नीट आहे. ज्यानं जन्माला घातलं, तोच मला पुढं घडवेल, असं ती बोलत होती. तिचं अजून लग्न झालेलं नसावं, असं वाटलं. म्हणून या वयात भक्तिमार्गाकडं वळण्याचं कारण काय, असं मी विचारलं. तेव्हा तिनं जे सांगितलं ते धक्कादायक होतं. सातवीपर्यंत शाळा शिकल्यानंतर लवकर लग्न झालं. चार मुलं झाली. पण, नवरा वारला. सासरच्या मंडळींनी खूप छळलं. मग सगळं सोडून आईवडिलांकडं आले; पण त्यांच्याकडं तरी किती दिवस राहणार. मग देवाच्या चरणी आले. आता पुढं त्याची इच्छा. त्याच्या मनात असेल तसं त्यानं मला पुढं न्यावं, हे सांगताना तिचा एकही शब्द अडखळत नव्हता. मुलांची आठवण येत नाही का, असं विचारल्यावर ती भावूक होईल, असं वाटलं; पण ती झाली नाही. निदान दिसली तरी नाही. मुलांना नणंदांनी दत्तक घेतलंय. त्या आईसारखी माया लावतात, जीव लावतात. त्यांना भेटायचा प्रयत्न केला तर पुन्हा भांडणं सुरू होतील. आता निवृत्तीनाथच माझी आई, तोच बाप. ती बोलत होती आणि आम्ही नुसतं ऐकत होतो.

सद्गुरूसारिखा असता पाठीराखा |
इतरांचा लेखा कोण करी ॥

संसारात सुख मिळालं नाही; पण कोणत्याही गोष्टीचा मी दोन्ही बाजूनं विचार करते. मला कुणी चुकीचं ठरवलं तर समोरच्याचीही बाजू समजून घेते, असं मोहिनी बोलत होती. नाव मोहिनी आणि तिची भाषा सगळी विरक्तीची, निवृत्तीची. मोहिनी नावाच्या तरुणीच्या तोंडी ही भाषा शोभत नाही, असं म्हटल्यावर ती म्हणाली, आता मला सगळे कल्याणीताई म्हणतात. कल्याणला राहते ना मी. मधे एक मोठे महाराज भेटले होते. कीर्तन झाल्यावर त्यांनी मला बोलावून घेतलं आणि म्हणाले, मोहिनी तू मला मोहून घेतलं. महाराजांची माझ्यावर वाईट नजर पडली होती; पण मी बधले नाही. घरात केलेलं पाप तीर्थाला येऊन धुवायचं. पण, तीर्थाच्या ठिकाणी पाप केलं तर भगवंतदेखील क्षमा करत नाही. हे सांगताना मोहिनीच्या नजरेत आणि शब्दांत कुठंही अपराधीपणाची बोच नव्हती.

भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा |
अभिमान नित्यनवा तया माजी ॥
प्रेम सुख देई प्रेम सुख देई |
प्रेमाविण नाही समाधान ॥

असा संत एकनाथांचा अभंग ऐकवून मोहिनीनं आमची रजा घेतली आणि ती पुन्हा बाहेर जाऊन हरिपाठात दंग झाली. तिची १०-१५ मिनिटांची ही भेट. पण, तिनं जे सांगितलं, ते हादरवणारं होतं. एवढे सगळं भोगूनही ती २७ वर्षांची तरुणी एवढी निर्विकार कशी राहू शकते, असा प्रश्न मला पडला.

आता मंदिरातले परिपाठ-भजन वगैरे संपलं होतं. जमलेल्या बाया आणि पुरुषमंडळी सभामंडपात एकमेकांचा हात हातात घेत फुगड्या खेळत होते. त्यात मोहिनीदेखील होती. फुगड्या खेळतानाचा आनंद तिच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता. कुणीतरी आम्हालाही आग्रह केला. मग प्रशांतनं माझा हात धरला आणि गोल गोल फुगडी खेळायला सुरुवात केली. चार-पाच फेर्‍या मारल्या असतील नसतील, तोच मला गरगरायला लागलं. मी प्रशांतला थांबायला सांगितलं; पण प्रशांतच्या अंगात उत्साह संचारला होता. तो मला गोलगोल फिरवत होता. थोड्या वेळानं आम्ही थांबलो. समाधी मंदिर माझ्या भोवती ‘रिंगण’ घालत होतं. ते रिंगण थांबल्यावर आम्ही पुन्हा ऑफिसात गेलो. गोसावींनी आमच्यासाठी खास डाळवडा आणि चटणी मागवली होती. काळा चहाही मागवला त्यांनी.

तेवढ्यात पांढर्‍या शुभ्र कपड्यातली, डोक्यावरून पांढरी ओढणी घेतलेली सुनीता ढगे नावाची १८ वर्षांची मुलगी आली. तिनं नमस्कार करून स्वतःची ओळख करून दिली. ही तीच जिनं तिथला सप्ताह आयोजित केला होता. दिंडोरी तालुक्यातल्या पारोसे गावची. नकाशे जनता विद्यालयात शिकणारी. आश्चर्य वाटलं. कारण बारावी सायन्सची परीक्षा देणार्‍या या मुलीनं खरं तर ‘कॉलेज लाइफ एन्जॉय’ करायचं, सिनेमे वगैरे बघायचे, ‘सैराट’ व्हायचं. तर, ही देवदेव करत पूजेला लागलेली. पहाटे ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत दिवसाचे २०-२१ तास पारायणात गुंग झालेली. हे काय वय आहे, असं विचारल्यावर सुनीता म्हणाली, हेच तर वय आहे. परमार्थ हा म्हातार्‍या माणसांचं काम नाही. परमार्थ करणं हे तरुणांचं काम आहे.

जोवरी सकळ सिद्ध आहे | हात चालावया पाय |
तव तू आपले स्वहित पाहे | तीर्थयात्रा जाये चुकू नको ॥

असं संत तुकाराममहाराजांनी सांगून ठेवलंय.

‘तरणा भाग्यवंत नटेहरि कीर्तनात’

ज्ञानदेवे म्हणे तरलो तरलो | आता उद्धरलो गुरुकृपे ॥

सोळावं वरीस धोक्याचं असतं. या वयात मुलींकडून काही चुका होतात; पण माझी चप्पल माझ्या पायात आहे. कुणा मुलींना नटण्यात, कुणाला मिरवण्यात आनंद वाटतो. मला देव सजवण्यात वाटतो, ती सांगत होती.

निवृत्तीनाथांवर जरा अन्यायच झाला, असा मुद्दाही तिनं मांडला. निवृत्तीनाथांची गाथा आहे. त्यातल्या प्रत्येक अभंगात ठासून तत्त्वज्ञान भरलंय; पण ते का लोपलं? कीर्तनकार हे अभंग का घेत नाहीत? प्रासादिक गाथा असूनही ती मागं का पडली? अशी प्रश्नांची सरबत्ती तिनं केली. पण, शेवटी ‘शिष्याचा जयजयकार म्हणजेच गुरूचा जयजयकार’, असं उत्तरही तिनंच देऊन टाकलं.

एवढ्यात कुणीतरी तिला बोलवायला आलं आणि ती आली तशीच घाईघाईत निघून गेली.

सुनीताचे शब्द आणि तिचं वय यांचं काही केल्या ‘कॅल्क्युलेशन’ लागत नव्हतं. वयाच्या अठराव्या वर्षी अशी विरक्तीची भावना त्यांच्या मनात कुठून बरं आली असेल? का बरं आली असेल? त्या मोहिनीला वयाच्या २७ व्या वर्षीच संसारातून निवृत्ती घ्यावीशी का वाटली असेल? परिस्थितीशी दोन हात करण्याची तिची हिंमत नव्हती का? निदान तिनं संसारातले चटके तरी सोसले, पण या सुनीताचं काय? जीवनाचा अनुभव घेण्याआधीच तिचं मन भक्तिमार्गाला का लागलं असेल? शांताबाई बाराखडेंसारखं संसारात सुखी समाधानी होऊन देवाची सेवा करता आली नसती का या दोघींना? उद्या वैभव खांगळ मोठा होईल तेव्हा अशा सुनीता आणि मोहिनी यांना कीर्तनातून काय उपदेश देईल? एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात ‘रिंगण’ घालत होते.

परतण्याची वेळ झाली होती. निवृत्तीनाथांचा निरोप घेण्यासाठी आम्ही पुन्हा गाभार्‍याजवळ गेलो. आता त्यांना छान पोशाख घातला होता. डोक्यावर भगवी पुणेरी पगडी घातली होती. आम्ही नमस्कार केला आणि समाधी मंदिरातून बाहेर पडलो. गाडीत बसलो आणि मुंबईच्या दिशेने निघालो निवृत्तीच्या वाटेवरून पुन्हा एकदा संसाराच्या ‘हायवे’वर…

0 Shares
तरीही आपण ‘कूल’ जन्मभूमी