जोडण्याचा वारसा

अभय टिळक

मध्ययुगीन भारतात अनेक धर्म, पंथ आले आणि गेले. त्यात टिकला तो वारकरी पंथ. कारण वारकरी संतांनी सर्व धर्म, पंथातलं सत्त्व स्वीकारलं. या पंथांशी गुरु-शिष्याचं नातं जोडत मानवतेची पताका उभारली.

केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर, उभ्या दक्षिण भारताच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि संस्थात्मक विश्वात साधारणपणे १२व्या शतकाच्या अंतिम चरणापासून एक प्रगाढ स्थित्यंतर आकार धारण करू लागलं. वेदकालीन यज्ञसंस्कृती या भूमीमध्ये स्थिरावणं हा आरंभबिंदू मानून त्या पुढील प्रवासात काळानं घेतलेल्या वळणांच्या मालिकेचा विचार केला तर, १२व्या शतकाच्या अखेरीस या भूमीमध्ये साकारू लागलेलं स्थित्यंतर हे त्या प्रवासातील तिसरं वळण ठरतं. वेदकालीन यज्ञसंस्कृती आणि त्या संस्कृतीतून उद्भवलेला वैदिक धर्मविचार यांच्या विरोधात बंडाचा सशक्त हुंकार उमटला तो बुद्धविचाराच्या रूपानं सनपूर्व पाचव्या शतकात. ऐतिहासिक विश्‍लेषणाची मार्क्सप्रणीत परिभाषा वापरायची तर, वैदिक धर्मविचाराच्या ‘थिसिस’चा ‘ऍन्टिथिसिस’ बौद्ध धर्माच्या रूपानं अंकुरला आणि यथावकाश स्थिरावला. काळानं घेतलेलं हे पहिलं निर्णायक वळण. सनपूर्व पाचवं शतक ते इसवी सनाचं दहावं शतक असा त्या बौद्धदर्शनाचा प्रभाव पुढं तब्बल दीड हजार वर्ष टिकून राहिला. वेदप्रामाण्याला नकार, चातुर्वर्ण्यावर प्रहार, कर्मकांडांच्या वैय्यर्थाचं अधोरेखन, निव्वळ बाह्याचाराला विरोध, यज्ञीय हिंसेचा तीव्र निषेध, समतेचा पुरस्कार, करुणा आणि प्रेमाचा संदेश, धर्मप्रणीत तत्त्वविचाराच्या प्रसार-प्रचारासाठी संस्कृतसारख्या प्रमाण ग्रंथभाषेऐवजी मौखिक ज्ञानव्यवहाराच्या परंपरेचा मूलाधार असणार्‍या लोकभाषांचा अंगीकार… ही सारी मूल्यप्रणाली बुद्धविचाराद्वारे या भूमीमध्ये रुजली आणि व्यापक स्तरावरील राजाश्रय लाभल्यानं इथे दृढावलीही.

साधारणपणे इसवी सनाच्या आठव्या-नवव्या शतकापासून बुद्धधर्माच्या प्रभावाला ओहोटी लागायला सुरुवात झाली. आद्य शंकराचार्यांनी वेदप्रणीत धर्मविचाराचं घडवून आणलेलं पुनरुज्जीवन हे त्याचं कारण. काळाच्या प्रवाहानं दुसरं मोठं वळण घेतलं ते या ठिकाणी. तृष्णानिवृत्ती हेच सर्वोच्च जीवनध्येय उद्घोषित करणारा बुद्धविचार आणि संन्यासाश्रमाचं निरपवाद श्रेष्ठत्व आग्रहानं प्रतिपादणारे शांकरप्रणीत निगमविचार यांच्या एकत्रित प्रभावापायी, या भूमीतील विचारविश्वामध्ये तेथवर चांगल्यापैकी बहरलेल्या प्रवृत्तिपरतेला उतरती कळा आली. निवृत्तिपर तत्त्वविचाराला झळाळी चढली. लौकिक जीवनाबद्दल एक प्रकारचं बेजबाबदार विरागीपण त्यामुळं प्रस्थापित होऊ लागलं. गणित, खगोल, स्थापत्य, शिल्प, संगीत, चित्र, साहित्य, वैद्यक, धातुविज्ञान, कृषी… यांसारख्या जीवनक्षेत्रांत तिथवर बहरलेली सर्जनशील उत्पादकता परिणामी कोमेजू लागली. जन्मजात अधिकारभेद शिरोधार्ह मानणारी उतरंडप्रधान वर्णाश्रमधर्मप्रणीत समाजव्यवस्था स्थिरपद झाल्यानं समाजातील सर्जक उत्पादनक्षमता खुंटली-खुरटली. ग्रांथिक ज्ञानाचा आणि पाठांतरप्रधान ज्ञानग्रहण परंपरेचा बडिवार अतोनात माजला. बाह्यात्कारी कर्मकांडांचं स्तोम चौफेर बोकाळलं. परात्मभावनेनं व्यापलेलं जिणं समाजातील फार मोठ्या घटकाच्या भाळी आलं. एकंदरच समाजजीवनाची वीण या सगळ्यांपायी विसविशीत बनली.

अशी ही विचित्र कोंडी फोडली ती १२व्या शतकापासून क्रमानं विकसित पावलेल्या या भूमीतील संतविचाराच्या प्रवाहानं. खरं म्हणजे, हा एकच एक प्रवाह नव्हता. तर, परस्परांना समांतर धावणार्‍या, प्रसंगी एकमेकांत मिसळणार्‍या, देवाणघेवाणीचं नातं परस्परांत जोपासणार्‍या विविध प्रवाहांच्या संगमाचं ते आदिपर्व होतं. नाथ, महानुभाव, वीरशैव आणि वारकरी या चार प्रवाहांनी सगळ्या समाजव्यवस्थेतच चैतन्य फुंकलं. पुन्हा एकवार मार्क्सप्रणीत परिभाषा वापरायची तर, १२व्या शतकापासून या भूमीमध्ये उमटलेला संतविचाराचा प्रवाह अथवा संतविचारांचा प्रवाहसंगम म्हणजे वैदिक आणि बौद्ध या दोन्ही दर्शनांच्या रूपानं प्रतिष्ठा पावलेल्या ‘थिसिस-ऍन्टिथिसिस’च्या घर्षणातून प्रसवलेला ‘सिन्थेसिस’ ठरला. १२व्या शतकादरम्यान काळाच्या प्रवासानं घेतलेलं हे तिसरं निर्णायक वळण. वेदप्रामाण्याला नकार हा नाथ, वीरशैव आणि वारकरी या तीनही पंथांतील अथवा संप्रदायांतील समान धागा. नाथ संप्रदायाचा उगम झाला तो शैव पंथाच्या तत्त्वमुशीतून. वीरशैव आणि वारकरी या दोन्ही संप्रदायांच्या विचारविश्वावर नाथ संप्रदायातील पायाभूत प्रमेयांचा प्रभाव कमीअधिक प्रमाणात दिसून येतो. त्यांतल्या त्यांतही पुन्हा, नाथ संप्रदायाचा ठसा वारकरी विचारव्यवस्था आणि मूल्यसमुच्चय यांवर अधिक दिसतो. वेदप्रामाण्याऐवजी आत्मप्रामाण्याची महत्ता, जन्मजात समतेचा उद्घोष, निव्वळ कर्मकांडांचं स्तोम माजवण्यापेक्षाही चित्तशुद्धीवर भर, व्यक्तिगत मोक्ष अथवा उन्नयनापेक्षा सामूहिक उत्थानाला प्राधान्य ही चतु:सूत्री म्हणजे नाथ संप्रदायाचं वारकरी संप्रदायाला सारभूत देणंच जणू. या ‘सिन्थेसिस’चा निरपवाद उद्गाता ठरतात गोरक्षनाथ. किंबहुना, आदिनाथ भगवान शंकरांपासून तत्त्वविचाराचा उगम सांगणार्‍या नाथ संप्रदायाचं पुनरुज्जीवन घडवत उभ्या भारतीय साधनाविश्वाच्या शुद्धीकरणाचं शिवधनुष्य समर्थपणे पेललं ते गोरक्षांनीच. परंपरेनं तो वारसा आला ज्ञानदेवांपर्यंत. मराठी भावभक्तिविश्वात दहाव्या शतकाच्या पूर्वीपासूनच प्रतिष्ठित असणार्‍या श्रीविठ्ठलरायाच्या उपासनेची पताका खांद्यावर मिरवणार्‍या वारकरी संप्रदायाच्या प्रवाहात, नाथ संप्रदायातून प्रवर्तित झालेल्या प्रेमयोगमुद्रांकित तत्त्वविचाराचा प्रवाह एकजीव केला तो ज्ञानदेवांनी. मात्र, या प्रवाहसंगमामागील मूळ आणि मुख्य प्रेरणा होती ती ज्ञानदेवांचे परमगुरू आणि पर्यायानं निवृत्तिनाथांचे श्रीगुरू असणार्‍या गहिनीनाथांची. ‘निवृत्ति गहिनी कृपा केली पूर्ण | कुळ हे पावन कृष्णनामे ॥’ अशा मोठ्या यथार्थ आणि समर्पक शब्दांत निवृत्तिनाथ त्या प्रवाहसंगमाचं वर्णन करतात. वारकरी संप्रदायात मुरलेली कृष्णभक्ती आणि नाथसंप्रदायाची आत्मखूण असलेली शिवोपासना या दोहोंच्या मिलाफातून नाथ आणि भागवत या दोन उपासनापंथांचं ऐक्य साधत शैव आणि वैष्णव भक्तिपरंपरांचा मेळ या प्रवाहसंगमानं साधला गेला. या अपूर्व अशा स्थित्यंतरामागील प्रेरणा काय असावी, या प्रश्‍नाचं उत्तर शोधायला प्रवृत्त होण्यानं आजच्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जडणघडणीचा आलेख उलगडणं सोपं जाईल.

प्रवाहसंगमामागील ती प्रेरणा होती तत्कालीन उपासनापंथांच्या शुद्धीकरणाची, जनसामान्यांच्या अध्यात्मविषयक जाणिवा प्रगल्भ बनविण्याची आणि जबाबदार, लोकाभिमुख, इहवादी आणि प्रवृत्तिपर जीवनदृष्टी समाजपुरुषाला प्रदान करण्याची. या प्रेरणेचा आद्य आविष्कार साधारणपणे ११व्या-१२व्या शतकात घडताना दिसतो तो गोरक्षनाथांच्या माध्यमातून. त्या वेळचं सामाजिक आणि आध्यात्मिक वास्तवही मोठं गुंतागुंतीचं होतं. एक तर, बुद्धविचार आणि बौद्धधर्माला उतरती कळा यायला सुरुवात झालेली होती. बुद्धविचारातील उच्च मूल्यांचा सारभूत गाभा निष्प्रभ ठरून बौद्धधर्मातील उत्तरकालीन तंत्रसाधनेचं प्रस्थ चहूंकडे प्रस्थापित झालेलं होतं. दुसरीकडे, भेदाभेदप्रवण निगमविचारानं कर्मकांडांचा उदोउदो करत असतानाच लौकिक जीवनाबद्दलची विपरित जीवनदृष्टी प्रचलीत केल्यानं समाजव्यवस्थेतील सर्जक गतिमानता खुंटली-खुरटलेली होती. वैदिक परंपरेतील निगमबोधाला समांतर वाहणार्‍या आगमप्रणीत शिवोपासनेतही वामाचारप्रधान तंत्रानं त्यातील तत्त्वविचारावर कुरघोडी केलेली होती. समाजातील उच्चस्तरीय पोकळ आणि बाष्कळ कर्मकांडात तर तळातील समाजसमूह अघोरी तंत्रसाधनेमध्ये गुरफटल्यानं समाजव्यवस्थेतील मूल्यव्यवस्थाही एकंदरीनंच प्रदूषित बनलेली होती. साहजिकच, तत्कालीन समाजाचं केवळ आध्यात्मिकच नव्हे तर सर्वसाधारण सामाजिक जीवनही र्‍हासमय पर्वातून प्रवास करत होतं. हे सारं वास्तव गोरक्षांसारखा प्रकांड प्रज्ञेचा प्रगल्भ विवेकी डोळसपणे पाहत होता. कदलीबनातील योगिनींच्या मेळ्यात रमलेल्या आपल्या गुरूंना, म्हणजेच मत्स्येन्द्रनाथांना, तिथून बाहेर काढत गोरक्षांनी एक प्रकारे नाथ संप्रदायाच्या पुनरुत्थानाचीच मोहिम हाती घेतली.

असं युगांतर घडवून आणण्यासाठी सिद्ध होणार्‍या विभूतीच्या ठायी दृष्टी असावी लागते ती समन्वयाची. कोणत्याही व्यवस्थेत समन्वय साधायचा तर प्रथम गरज असते ती करुणेची आणि करुणेमधून उमलणार्‍या प्रेमाची. आपल्या गुरूंकडून प्राप्त झालेली प्रेममुद्रा अधिक तेज:पुंज बनवून ती गहिनीनाथांकडे सुपूर्त करणारे गोरक्षनाथ हे तर समन्वयाचा मूर्तिमंत आविष्कारच ठरतात. योगप्रधान गणल्या जाणार्‍या शैव पंथातून परंपरेनं आपल्यापर्यंत आलेली योगमुद्रा गोरक्षांनी प्रेममुद्रेमध्ये एकजीव जिरवून तो वसा लोकाभिमुख बनवण्याची प्रेरणा गहिनीनाथांच्या अंत:करणात जागवली. हा सारा घटनाक्रम निवृत्तिनाथांनी गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये नमूद केलेला आहे. वैराग्यानं धगधगलेलं गहिनीनाथांचं हृदय त्या प्रेममुद्रेमुळं निवालं. प्रेमातून निपजली शांती आणि तेच शांतीसुख विश्वातील प्रत्येक जीवाला प्राप्त करून देण्यासाठी गहिनीनाथांनी सर्वत्र संचार सुरू केला. शैव संप्रदाय आणि पर्यायानं नाथ संप्रदाय खर्‍या अर्थानं लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या उपक्रमाला अशा प्रकारे हात घातला तो गहिनीनाथांनी. गोरक्षांचा वसा त्यांनी जपला आणि वाढवला तो असा. वामाचारप्रधान तंत्रसाधनेचं संप्रदायाला जडलेलं किटाळ दूर करून गोरक्षांनी नाथ संप्रदायाचंच केवळ नव्हे तर उभ्या भारतीय साधनाविश्वाचं एक प्रकारे शुद्धिकरणच आरंभलं. त्यामुळं वामाचाराचा बीमोड झाला खरा; परंतु, योगप्रधान उपासना असणार्‍या नाथ संप्रदायातील योगमार्गाची साधना सर्वसामान्यांच्या लेखी दुर्घट आणि म्हणून दुष्प्राप्यच राहिली. नाथ संप्रदायातील शिवोपासनेची सांगड महाविष्णूंच्या आराधनेशी घालत ते वैगुण्य निवारण केलं गहिनीनाथांनी. व्यक्तिगत पातळीवरील एकाकी साधनेसाठी योगमुद्रा उपयुक्त आणि उचित ठरत असली तरी, व्यापक स्तरावरील जनसामान्यांना आंतरिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त करायचा तर त्या योगमुद्रेचं रूपांतर प्रेममुद्रेमध्ये करणं अनिवार्यच ठरतं, हे अचूकपणे हेरण्यात गहिनीनाथांच्या समाजहितैषी प्रगल्भतेचं रसरशीत दर्शन घडतं.

समन्वयाचं हे पर्व खरोखरच अपूर्व ठरतं. शैव परंपरेतील वामाचार तंत्रसाधना दूर केल्यानं उपासनापद्धतीचं उन्नयन घडून आलं आणि योगमुद्रेच्या ठायी प्रेममुद्रेची प्रतिष्ठापना केल्यानं सर्वसामान्यांच्या आटोक्यात येणार्‍या भक्तिसाधनेचा राजमार्ग प्रशस्त बनला. ‘‘परतत्त्वाबाबतचे अकृत्रिम, अपरंपार प्रेम म्हणजेच भक्ती’’, या नारदभक्तिसूत्रातील भक्तीच्या व्याख्येचं उपयोजन गहिनीनाथ-निवृत्तिनाथ-ज्ञाननाथ या त्रिमूर्तीच्या माध्यमातून साकारलं ते असं. शांकराद्वैत आणि शैवागम या दोहोंत, तसं सूक्ष्मपणे पाहू गेलं तर, भक्तितत्त्वाला कोठेही अवकाशच नाही. गहिनीनाथांनी अंगीकारलेली ती प्रेममुद्रा निवृत्तिनाथांमार्फत स्वीकारताना ज्ञानदेवांनी भक्तितत्त्वाला देव्हारा बहाल करत असतानाच भक्तीची व्याख्याही आपल्या आगम तत्त्वविचाराशी सुसंगत अशीच बदलून स्वीकारली. भक्तीची महत्ता प्रस्थापित करण्यासाठी ज्ञानदेवांनी आधार घेतला तो गीतातत्त्वाचा. परंपरेनं चालत आलेला नाथ संप्रदायाचा वारसा आणि भागवत धर्माच्या माध्यमातून रूढावलेली विष्णूतत्त्वाची उपासना यांचा मिलाफ ज्ञानदेवांनी आणि पर्यायानं वारकरी संप्रदायानं साधला तो शिव आणि विष्णू यांचं ऐक्य दृश्यमान करणार्‍या पंढरीपुरवराधीश्वर श्रीविठ्ठलाचं अधिष्ठान शिरीमस्तकी धारण करून.

गोकुळातील बालकृष्ण म्हणजेच श्रीविठ्ठलाचा पूर्वावतार अशी वारकरी सांप्रदायिकांची दृढ धारणा आहे. ‘पुंडलिकाच्या भावार्था | गोकुळीहुनी जाला येता ॥’ अशा शब्दांत खुद्द ज्ञानदेवांनीच बालकृष्ण आणि विठ्ठल यांचं ऐक्य प्रगट मांडलेलं आहे. भक्तशिरोमणी पुंडलिकरायांसाठी पंढरी क्षेत्रामध्ये गोकुळातून आलेला हा बालकृष्ण येताना एकटा आलेला नाही तर आपल्यासमवेत त्यानं शिवशंभोलाही आणलेलं आहे, असा दाखला खुद्द निवृत्तिनाथच, ‘विष्णुसहित शिव नांदतो पंढरी | भीमातीरी केले पेख्खण हे ॥’ अशा रोकड्या शब्दांत देतात. आदिगुरूशंकरांपासून उगम पावलेल्या नाथ संप्रदायाच्या बोधाचा विस्तार जपणारे निवृत्तिनाथ, ‘कुळ हे पावन कृष्णनामे’ असं का म्हणतात, त्याचा उलगडा आता सहज व्हावा. शिव आणि विष्णू यांच्या सहजैक्याच्या याच जाणिवेचे स्पष्ट पडसाद आपल्याला ‘हरिहरा भेद | नाही करूनये वाद ॥’ या तुकोबारायांच्या प्रचीतीमय उद्गारांत उमटलेले जाणवतात. भगवान शिवप्रणीत नाथ संप्रदायातील आगमविचार, भागवत धर्मानं परिपुष्ट बनवलेली कृष्णोपासना आणि शिव आणि विष्णू या दोहोंचं ऐक्य मिरवणार्‍या विठ्ठलाची उपासना या भूमीमध्ये १२व्या शतकाच्या पूर्वीपासून जागती ठेवणारा वारकरी संप्रदाय यांच्या संगमातून ज्ञानदेवांनी वारकरी दर्शनाची तात्त्विक पायाभरणी सिद्ध केली. शिव आणि विष्णू यांच्या ऐक्याचे आद्य उद्गाते ठरतात ते पुन्हा गहिनीनाथच. कारण, श्रीमद्भागवतातील नवनारायणांपैकी नववे नारायण गणले जाणारे करभाजन हे गहिनीनाथांचे पूर्वावतार गणले जातात. नारायणीय अथवा वैष्णव संप्रदाय आणि नाथ अथवा शैव संप्रदाय यांचं आंतरिक नातं गहिनीनाथांच्या रूपानं समूर्त बनतं ते असं. निवृत्तिनाथांकडून गुरूपरंपरेनं लाभलेला असा हा शैव आणि वैष्णव उपासनाऐक्याचा वसा ज्ञानदेवांनी १२व्या शतकातील समाजपुरुषाच्या पुढ्यात प्रगट केला तो गीताभाष्याच्या रूपानं.

गुरूपरंपरेनं आपल्यापर्यंत आलेला बोधाचा प्रवाह समाजाभिमुख बनविण्यासाठी श्रीमद्भगवद्गीतेचं माध्यम स्वीकारण्यात ज्ञानदेवांना मुळीच अडचण वाटत नाही यांमागील कारणं दोन. एक तर, गहिनीनाथांनीच शिवोपासनेमध्ये कृष्णभक्तीचा प्रवाह एकजीव मिळवला. दुसरं म्हणजे, नाथ परंपरेतील आगमाचा तत्त्वविचार आणि महाभारताच्या शांतिपर्वातील नारायणीय उपाख्यानात उगम असलेला भागवत धर्मविचार हे दोन्हीही स्वरूपत:च प्रवृत्तिपर आहेत. गीताप्रणीत भागवत धर्म हा मोक्षदायक असून, तो प्रवृत्तिपर आहे, असा दस्तुरखुद्द व्यासांचाच दाखला होय. गीता हे उपनिषदांचं म्हणजेच पर्यायानं वेदांताचं सार असल्यानं त्याच्यावरील भाष्य वैदिकांना रुचावं आणि त्याच वेळी वेदप्रणीत धर्मविचारातील संन्यासप्रवणतेवर प्रवृत्तिपर इहवादी जीवनदृष्टीचा उतारा गीताभाष्याच्या रूपानं व्यवहारात यावा, हा विचारव्यूह ज्ञानदेवांच्या दृष्टिपुढं असावा, हे अत्यंत स्वाभाविकच ठरतं. एकीकडे परंपरेचा आदर राखत असतानाच प्रचलीत समाजव्यवस्था निकोप बनवण्यासाठी जी जीवनदृष्टी प्रवर्तित करणं निकडीचं आहे तिचंही अवतरण घडावं यासाठी ज्ञानदेवांनी भाष्यासाठी केलेली गीताग्रंथाची निवड बिनतोड ठरली.

नाथ संप्रदायानं जपलेली समन्वयाची भूमिका वारकरी संप्रदायानं अंगीकारली ती याच सगळ्या प्रक्रियेद्वारे. गीतेच्या मिषाने नाथ संप्रदायाच्या बोधाचा गाभा लोकभाषेमध्ये मांडताना ज्ञानदेवांनी बौद्ध, वैदिक, नाथ अशा पूर्वपरंपरांमधील शाश्वत अंश गीतेच्या प्रतिपादनात बेमालूम समाविष्ट केला. वारकरी दर्शन हे विविध दर्शनांचा महासंगम ठरतं ते असं. सर्वसमावेशकता, जनसामान्यांबद्दलची असीम करुणा, अकृत्रिम प्रेम, लोकभाषेची प्रतिष्ठा हा सारा मूल्यसंचय बुद्ध, शैव आणि नाथ परंपरांकडून वारकरी संप्रदायानं धारण केलेला आहे. कोणतंही नवदर्शन मांडत असताना परंपरेपासून एकदम फारकत घेतली तर समाजमन नवदर्शनाचा स्वीकार करत नाही, हा धडा गहिनीनाथांपासून ज्ञानदेवांपर्यंत सगळेच शिकलेले होते. त्यामुळं, वेद शिरोधार्ह मानायचं परंतु, “तैसे ज्ञानिये जे होती | ते वेदार्थाते विवरिती | मग अपेक्षित स्वीकारिती | शाश्‍वत जे ॥” या युक्तीनं आत्मप्रामाण्याची कसोटी लावायची, असा अफलातून व्यूह ज्ञानदेव रचतात. “त्रिवेणीसंगमी नाना तीर्थे भ्रमी | चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ॥” असा टोला लगावत, आचारधर्माची अवहेलना करायची नाही, परंतु नामस्मरणानं चित्तशुद्धी झाल्याखेरीज हे सारे उपाय फिजूल आहेत, हेही मनावर बिंबवायचं, ही खास संतप्रणीत अंतर्दृष्टी होय. योगाचं माहात्म्य जपत-उच्चारत असतानाच योगसाधनेद्वारे परतत्त्वाशी साधल्या जाणार्‍या सामरस्याच्या अवस्थेलाच ‘भक्ती’ असं संबोधायचं, ही ज्ञानदेवप्रणीत अपूर्व भूमिका म्हणजे नाथ संप्रदायाच्या गाभामूल्यांचा भागवत धर्मप्रधान वारकरी विचाराशी समन्वय घडवून आणण्याच्या उपक्रमाचंच अंग होय. शिव, बौद्ध आणि नाथ या तीन वैदिकेतर परंपरांमधील मूल्यसंचय कालानुरूप सुलभ आणि सुसेव्य बनवून तो लोकाभिमुख करण्यासाठी, वैदिकांनी प्रतिष्ठेस पावलेल्या महाविष्णूंचा अवतार गणल्या जाणार्‍या श्रीकृष्णानं प्रगट केलेले गीतातत्त्व आधारासाठी घेऊन गहिनीनाथांच्या प्रेरणेनं निवृत्तिनाथांनी ज्ञानदेवांच्या माध्यमातून जे मन्वंतर या भूमीत घडवून आणलं त्यातून एक महासमन्वय साकारला तो असा.

सनपूर्व साधारणपणे पाचव्या शतकापासून ते १२व्या शतकापर्यंत या भूमीमध्ये साकारत आलेल्या ‘थिसिस-ऍन्टिथिसिस’च्या प्रक्रियेद्वारे निपजलेला ‘सिन्थेसिस’ संतविचाराच्या रूपानं इथं कसा स्थिरावला हे या पद्धतीनं नीट जाणून घेतलं की वारकरी संप्रदायाच्या सर्वसमावेशक उदारमनस्कतेचा उलगडा क्षणार्धात होतो. शैव, बौद्ध, वैदिक आणि नाथ या चार पंथपरंपरांमधील स्वीकारार्ह असा शाश्वत अंश वारकरी संतांनी लोकमानसामध्ये मुरवला. करुणा, समता आणि प्रेम ही मूल्यत्रयी बुद्धांकडून स्वीकारत असताना वारकर्‍यांनी त्यांतील मठव्यवस्था अव्हेरून चल् भक्तीचा पुरस्कार केला. शैवांचा योग शिरोधार्ह जरूर मानला पण त्याला भक्तीचं अस्तर असेल तरच. शैवतत्त्वज्ञानातील आगमोक्त इहवादी जीवनदृष्टी अंगीकारून वैदिकांच्या अतिरेकी संन्यासप्रवणतेवर नामी उतारा प्रस्थापित केला. वैदिकांचं कर्मकांड नाकारलं नाही परंतु त्या कर्मकांडाद्वारे अंत:करण शुद्धी होत नसेल तर ते फिजूल आहे, अशी मेख मारून चित्तशुद्धीच्या अनिवार्यतेची द्वाही फिरवली. एकीकडे वैदिकांच्या वेदविद्येचं कृपणत्व उघड करत असतानाच वेदान्ताचं सार असणार्‍या गीतातत्त्वाचा गौरव त्रिखंडात मिरवला. शैवागमातील चिद्विलासाचं तत्त्वदर्शन आणि जगरूपानं नटलेल्या जगदीश्वराची उपासना कर्मरूपी पूजेद्वारे करण्याची गीताप्रणीत भागवत धर्मविचाराची गाभाभूमिका यांचा मेळ साधत वारकर्‍यांनी भारतीय दर्शनविचारातील प्रवृत्तिपरतेचा खुंटा हलवून पुन्हा एकवार बळकट केला. गीतेनं कथन केलेल्या भागवत धर्मातील जबाबदार इहवाद आणि शैवागमातून निपजणारी चिद्विलासवादी जीवनदृष्टी यांचा मेळ साधत शैव आणि वैष्णव अशा उभय परंपरांमधील तत्त्वविचाराचा मनोज्ञ संगम वारकरी संप्रदायानं साधला.

गहिनीनाथांपासून उगम पावलेला हा समन्वयशील प्रवाह तिथून पुढे तसाच खळाळत राहिल्याचा प्रत्यय वारकरी संप्रदायातील उत्तरकालीन गुरू-शिष्यांच्या आंतरिक अनुबंधांवरून आपल्याला येतो. मूळचे शिवोपासक असलेले विसोबा खेचर, मुळात नाथसांप्रदायिक असणार्‍या ज्ञानदेवादी भावंडांचं गुरुत्व मोठ्या गौरवानं मुखर करतात. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अशा औंढ्याच्या नागनाथ मंदिरात वास करणार्‍या विसोबांचं शिष्यत्व, बालपणापासूनच बालकृष्णरूपी विठ्ठलाच्या प्रेमभक्तीमध्ये रममाण झालेल्या नामदेवरायांनी स्वीकारावं याचं अप्रुप, वारकर्‍यांनी प्रतिष्ठित केलेल्या शैव आणि वैष्णव या उभय पंथपरंपरांच्या समन्वयाच्या पार्श्वभूमीवर, वाटण्याचं मग कारणच उरत नाही. पंढरीक्षेत्रामध्येच जीवनाचा बहुतेक काळ प्रौढपणी व्यतीत करणार्‍या नामदेवरायांचं जन्मगाव नरसी हे औंढ्यापासून जवळच असल्यानं त्या प्राचीन शिवस्थानाशी त्यांचा बाळपणापासून परिचय असावा, यात अनैसर्गिक काहीच नाही. पोळ्या पळवणार्‍या कुत्र्याच्या पाठीमागं तुपाची वाटी घेऊन धावणार्‍या नामदेवरायांच्या भावविभोर मूर्तीद्वारे आपल्याला दर्शन घडतं ते त्यांच्या ठायी पुरेपूर मुरलेल्या चिद्विलासवादी जीवनदृष्टीचं. तर, इस्लामपंथीयांच्या आक्रमणापायी विस्कळीत होऊ पाहणारी उत्तर भारतातील समाजजीवनाची घडी सावरण्यासाठी उत्तरायुष्यातील पुरी चार दशकं तिथे व्यतीत करणा-या नामदेवरायांच्या कार्यकर्तृत्त्वातून प्रचीती येते ती भागवत धर्मप्रणीत नामभक्तीचंच दुसरं अंग असणार्‍या लोकसंग्रहाच्या प्रेरणेची.

शैव आणि वैष्णव परंपरांच्या याच ऐक्याचं कवडसं पुढील काळात स्पष्टपणे दृग्गोचर होतात ते वैष्णवकुळाचा वारसा सांगणार्‍या पैठणवासी एकनाथ आणि दत्तसंप्रदायाचे दीक्षित असणारे त्यांचे गुरूजनार्दनस्वामी यांच्या साहचर्याद्वारे. ‘धन्य निजभाग्याची लीळा | आलो वैष्णवकुळा जन्मोनी ॥’ असा आपल्या घराण्यातील वैष्णवपरंपरेचा उद्घोष करणार्‍या नाथांना दत्तसांप्रदायिक असलेल्या जनार्दनस्वामींचं अंकितपण मिरवावंसं वाटतं कारण, जनार्दनस्वामींच्या परंपरेचे आद्यस्वामी असणारे दत्तात्रेय हेच मुळी शैव आणि वैष्णव या उभय परंपरांचं ऐक्य प्रगट करतात. दत्तात्रेय हे महाविष्णूंचे अवतार. परंतु, गंमत अशी आहे की, दत्तात्रेय विश्वात विख्यात आहेत ते ‘अवधूत जोगी’ म्हणूनच.

दत्तात्रेय हे अवधूत जोगी आणि नाथ संप्रदाय हा अवधूत पंथ, असा नाथ आणि दत्त यांचा जैविक अनुबंध आहे. शैव पंथ आणि पर्यायानं नाथ पंथही योगप्रधान तर दत्तात्रेय हे योगाचार्य. अवधूत दत्तात्रेयांचे ते योगीपण, “पैल मेरूच्या शिखरी | एक योगी निराकारी | मुद्रा लावोनि खेचरी | प्राणायामी बैसला ॥” अशा विलक्षण प्रत्ययकारी शब्दांत ज्ञानदेवांनी वर्णन केलेलं आहे. परतत्त्वाचा गुरूरूपातील अवतार म्हणून गणल्या जाणार्‍या दत्तात्रेयांची योगप्रधान उपासनापंथ गणल्या जाणार्‍या नाथ संप्रदायानं गुरूतत्त्वाचं प्रतीक म्हणून मोठ्या श्रद्धेनं आपल्या भावविश्वात प्रतिष्ठापना केलेली आहे. समाजजीवनाची ऐहिक घडी सुविहितपणे बसावी यासाठी भागवत धर्मविचारातील इहवादी कर्मविचार प्रकर्षानं समाजापुढं मांडणं आणि त्याच वेळी समता, करुणा आणि प्रेम या तीन जीवनमूल्यांचं जागरण आपल्या उभ्या जीवनक्रमातून साकारणं, अशा उभय अंगांनी, एकनाथांच्या ठायी वसणार्‍या वैष्णवभक्तीप्रधान भागवत धर्मविचाराचं आणि बौद्ध आणि नाथ परंपरांद्वारे संक्रमित झालेल्या सर्वोदार सर्वसमावेशकतेचं दर्शन आपल्याला घडत राहतं. “हेतुक अथवा अहेतुक | लौकिक वैदिक स्वाभाविक | भगवंती अर्पे कर्मे देख | या नाम एक भागवत धर्म ॥” अशी भागवत धर्मविचाराची कर्मपूजक व्याख्या अधोरेखित करत एकनाथांनी गृहस्थाश्रमाची प्रतिष्ठा आणि त्या गृहस्थाश्रमाचं अविभाज्य अंग असणार्‍या नित्यनैमित्तिक कर्मांशी असलेला भक्तीचा अविरोध आपल्या आचरणाद्वारे समाजपुरुषाच्या मनावर बिंबवला. साधनेद्वारे अंत:शुद्धी साध्य करण्यावर असलेला बौद्ध आणि नाथ संप्रदायांचा भर आणि व्यक्तिगत स्तरावरील नामभक्तीचे सामाजिक परिमाण गणल्या जाणार्‍या लोकसंग्रहाच्या भागवत धर्मप्रणीत कर्तव्याचं जीवनभर केलेलं निष्ठापूर्वक आचरण यातून एकनाथांच्या जीवनातील समन्वयशीलतेचं दर्शन आपल्याला घडतं.

जनार्दनस्वामींचे गुरू आणि अर्थातच एकनाथांचे परमगुरू नेमके कोण याबद्दल अभ्यासकांत मतैक्याचा अभाव दिसतो. दत्तात्रेय हेच जनार्दनस्वामींचे गुरू असं सांप्रदायिक परंपरा मानत असली तरी, श्रीगोंदेकर शेख महंमदबाबांचे गुरू असणारे चांदसाहेब कादरी उपाख्य चांद बोधले वा चंद्रभट बोधले हे वास्तवात जनार्दनस्वामींचे गुरू होत, असा पक्ष काही अभ्यासक मांडतात. चांदसाहेब कादरी हे सूफी संप्रदायातील कादरी शाखेचे उपासक. आता, जनार्दनस्वामींचे गुरू नेमके कोण हा संदिग्ध मुद्दा जरी घटकाभर बाजूला ठेवला तरी, चांद बोधले आणि शेख महंमदबाबा यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाशी सूफी उपासनापंथाचा जुळून येणारा अनुबंध नजरेआड करता येत नाही. सूफी उपासकांना सामावून घेण्यात वारकरी संतपरंपरेच्या सर्वसमावेशकतेचं दर्शन घडून येत असलं तरी तो केवळ संतदृष्टीतील उदारमनस्कतेचा आविष्कार गणनं अपुरं ठरेल. तत्त्वदृष्ट्यात्मक पातळीवरही नाथ आणि भागवत या दोन पंथपरंपरांशी सूफींचा आत्मिक संबंध आहे. वर्णाश्रमप्रधानता आणि जातिभेद यांना विरोध, सर्व प्रकारच्या बाह्याचाराला तिलांजली, नैतिकतेचा आग्रह, लोकसंग्रहाबाबतचा कटाक्ष, गृहस्थाश्रमाची प्रतिष्ठा, चित्तशुद्धीवर भर, अहिंसा-दया-क्षमा-सत्यभाषण-कामिनीकांचनाचा त्याग यांसारख्या शाश्वत आणि व्यक्तिगत तसंच सामाजिक जीवनाची उभारणी निकोप पायावर करण्याच्या दृष्टीनं अनिवार्य असणार्‍या मूल्यसंचयाचा आग्रह…हा सूफी उपासनापंथाचा गाभा बौद्ध, शैव, नाथ, भागवत या सगळ्यांच संप्रदायांच्या सारभूत शिकवणुकीशी विलक्षण संवादी आहे.

घराण्यामध्ये आठ पिढ्यांची विठ्ठलभक्ती नांदणार्‍या तुकोबारायांचे परात्पर गुरू राघव चैतन्य हे दत्तोपासक होते. आगम आणि निगम अशा उभय परंपरांचा महासमन्वय या दृष्टीनंच कुटुंबाचं कुलदैवत असणार्‍या श्रीविठ्ठलाकडे तुकोबाराय बघतात. ‘विठ्ठल आमुचे जीवन | आगमनिगमाचे स्थान ॥’ अशा मोठ्या विलक्षण शब्दात विठ्ठलाच्या ठायी झालेला तो समन्वय तुकोबाराय प्रगट करतात. तुकोबारायांच्या घरात गोसावी पंथाचीही परंपरा असावी, असा काही अभ्यासकांचा दावा आहे. गोसावी पंथ ही नाथ संप्रदायाच्या परिवारातीलच एक शाखा. नाथ संप्रदाय हा तर योगप्रधानच आहे. आता, तुकोबारायांच्या घरात गोसावी पंथाची परंपरा असावी का, हा जरी निर्विवाद मुद्दा नसला तरी खुद्द तुकोबारायांनी राजयोगाची प्रगल्भ साधना केलेली असली पाहिजे याचे अनेक दाखले त्यांच्या अभंगकळेमध्ये आपल्याला सापडतात. ‘रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न | चिन्मय अंजन सूदले डोळां ॥’ यांसारखे महाराजांचे अभंग तर निखळ योगाच्या परिभाषेतील आहेत. बौद्ध आणि नाथ या दोन्ही पंथांनी ललामभूत मानलेल्या अंत:शुद्धीवर पराकोटीचा कटाक्ष हा तर तुकोबारायांच्या साधनाप्रांताचा आद्यविशेष. कठोर, निर्मम आत्मशोधन हे तर आत्मशुद्धीसाठीच्या प्रयत्नांचे अधिष्ठान. तुकोबारायांचा गाथा म्हणजे आत्मशोधनाच्या त्यांनी केलेल्या पराकाष्ठेचा निखळ आलेखच जणू ! ‘वेद अनंत बोलिला | अर्थ इतुकाचि साधला | विठोबासी शरण जावे | निजनिष्ठा नाम गावे ॥’ इतक्या ठणठणीतपणे आत्मप्रामाण्याची प्रतिष्ठा जपण्याबाबतच्या निर्धाराचा तुकोबांनी केलेला उच्चार त्यांच्या विचारविश्वावर नाथ संप्रदायाच्या संस्कारांचा असलेला प्रभाव निखालसपणे प्रगट करतो.

वैदिक, बौद्ध, शैव, नाथ, भागवत अशा विविध संप्रदायविचारांचा, भागवतधर्मीय संतबोधाच्या प्रवाहाद्वारे वारकरी पंथांच्या रूपाने गुंफला गेलेला समन्वयाचा गोफ हा असा आहे. अनेक शतकं क्रमानं उत्क्रांत होत आलेली ही प्रक्रिया काळाच्या प्रत्येक टप्प्यावर दरवेळी सातत्यानं सौहार्दपूर्ण, सात्विक, सुसंवादी अशीच राहिली असेल, असंही मानण्याचं कारण नाही. एकापेक्षा अनेक प्रवाह एकत्र येतात तेव्हा काही ना काही खळखळाट हा होणारच. एकमेकांमध्ये समाविष्ट होत असताना तळातील गाळही पृष्ठभागावर येणं स्वाभाविकच गणायला हवं. विविध उपासनापंथांचं साहचर्य एकाच भूभागावर नांदत असताना संपर्क, संघर्ष, संधी, सामोपचार, देवाणघेवाण यांसारख्या नानाविध भावभावनांच्या लाटा उमटून जाणं हेही नैसर्गिकच गणायला हवं. मात्र, हे सगळं होऊनही, आपापल्या संप्रदायाचं पृथकपण जोपासत असतानाच अन्य संप्रदायविचारांतील ग्राह्यांश सकारात्मक बुद्धीनं स्वीकारण्याची प्रगल्भ समन्वयशीलता या सगळ्यांच संप्रदायांच्या अध्वर्यूंनी त्यांच्या त्यांच्या काळात प्रगट केली, हे शाश्वत सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. तीच सकारात्मकता आणि समन्वयशील स्वागतता आजही जपणं हेच आपलं कर्तव्य ठरतं. वारकरी विचाराचा खरा वारसा कोणता असेल तर तो हाच. न उतता, न मातता हा वसा आपण पेलणार का, हाच खरा कळीचा प्रश्‍न आहे!

0 Shares
मुंगीची गुंगी निगुऱ्याचा गुरू