काय माहीत नाय

नामदेव अंजना

बार्शी गाव तसं भलामोठा इतिहास असणारं. पण तिथं विसोबा खेचरांची समाधी एका उकीरडावजा मैदानात एकटी उभी आहे. तिच्यावर धड छप्परही नाही. तिच्यावर दिवसभर कपडे वाळत घातले जातात. तिलाच टेकून सायकली उभ्या राहतात. तिच्यावरच बसून संध्याकाळी शिळोप्याच्या गप्पाही होतात.

‘नाय, ते काय माहीत नाय.’, या उत्तरानं बार्शीत माझी ‘विसोबायात्रा’ सुरू झाली. बार्शी एसटी स्टँडवर उतरुन बाहेर आलो. मोबाईल रिचार्ज करणारं एक दुकान समोर होतं.  दुकानात विचारलं, ‘विसोबा खेचरांचं समाधीस्थळ कुठे आहे ओ?’ निर्विकार चेहर्‍याने उत्तर आलं…

दादरहून सिद्धेश्वर एक्प्रेसनं सोलापूरला. एकीकडे लाखो वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी निघाले होते आणि मी विसोबांच्या. माझ्या नावाशिवाय विसोबांशी माझा संबंध आजवर आला नाही कधी. नाव सारखंय म्हणूनच संत नामदेवांची गाथा वाचलीय तशी वरवर. त्यात विसोबा खेचर डोकावून गेले होते. आता विसोबांच्या समाधीस्थळाला भेट द्यायचीय. माहिती मिळवायचीय. हीच उत्सुकता उरात भरुन बार्शीच्या दिशेनं निघालो होतो. गाडीत रात्रभर झोप येण्याऐवजी समोर मोठा प्रश्न होता. संत नामदेवांचे गुरू असतानाही विसोबा इतके दुर्लक्षित कसे?

सिद्धेश्वर एक्स्प्रेस अर्धा-पाऊणतास उशिरा होती. केमनंतर कुर्डूवाडी. मी कुर्डूवाडीला उतरलो. रेल्वे स्टेशनपासून एसटी स्टँडपर्यंत रिक्षानं आलो. तिथं वारकर्‍यांची गर्दी होती. एका आजोबांना विचारलं, ‘कुठं चाललाय?’ आजोबांनी आपल्या खमक्या आवाजात उत्तर दिलं, ‘पंढरीला. माय-बापाच्या भेटीसाठी.’ मरगळलेलो मी एकदम चार्ज झालो. तिथून उदगीर एसटी पकडली आणि बार्शीत उतरलो. जवळपास पाऊण तासाचा प्रवास. विसोबांच्या नगरीत आल्याचा आनंद होता. लिंगायत आणि वारकरी विचारांत समन्वय घडवण्यार्‍या विसोबांविषयीच्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तर मला शोधायची होती. पण सुरुवातीलाच ऐकू आलं, नाय, ते काय माहीत नाय.

बार्शी तसं ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक वारसा लाभलेलं शहर. आता मुंबई- पुण्यासारखे इमारतींचे टॉवर उभे राहायला सुरुवात झालीय. बार्शीत प्रवेश करतानाच एकामागून एक नव्या इमारती बांधल्या जाताना दिसतात. त्या बार्शी झपाट्यानं बदलतेय असं सांगत असतात. सोलापूर ६५-७० किलोमीटर दूर. त्याचं प्रतिबिंब इकडेही दिसू लागलंय. मोठमोठी शॉपिंग सेंटर्स, कॉलेज, हायस्कूल, कपड्यांची दुकानं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे शोरूम्स, अलिशान रेस्टॉरन्ट आहेत. शहरीकरणाचा विळखा बार्शीला शोभून दिसतोय. शहर वाढतंय, पण बार्शी अजूनही आपली मूळ ओळख टिकवून उभी आहे.

बार्शी तालुका नावालाच सोलापूर जिल्ह्यात. तिन्ही बाजूनं उस्मानाबाद जिल्हा वसलेला. मुळात बार्शी मराठवाड्याचाच भाग. पाऊसही तिकडूनच येतो. शेजारच्या कळंब, भूम तालुक्यांत बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. तिथंच बार्शी तालुक्यातून वाहणार्‍या बहुतेक नद्या उगम पावतात. तिकडे पाऊस पडला तर शेतीला पाणी मिळतं. पाण्याची तशी अडचणच. ओलिताखालचं क्षेत्र काही वाढत नाही. बार्शीच्या चारही दिशांच्या बाजूला असलेल्या गावांनी द्राक्षं, बोरं, केळी, लिंबू, ऊस, कांदा आणि भाजीपाला उत्पादनांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलीय.

शेतीत नसलं तरी शिक्षणात बार्शी अग्रेसर आहे. केजीपासून पीएचडीपर्यंत सर्व शिक्षण उपलब्ध आहे. शिवाजी कॉलेज, सुलाखे कॉलेज, झाडबुके कॉलेज अशा नामवंत शिक्षणसंस्था आहेत इथं. तसं हे हॉस्पिटलांचंही गाव आहे. अगदी सोलापूर कोल्हापुरापासून अख्ख्या मराठवाड्यातून पेशंट इथे येतात. मुंबईनंतर राज्यातलं सगळ्यात सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटलही बार्शीत आहे. नर्गीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल असं त्याचं नाव. बार्शीतल्या उत्तरेश्वर कथालेंच्या मदतीने ते उभारण्यात आलं. शिवाय, अनेक नामांकीत डॉक्टरांची कितीतरी खासगी हॉस्पिटल्स.

अॅम्ब्युलन्सच्या आवाजाला सरावण्याआधी बार्शी देवळांचं गाव होतं. तीही महादेवाची देवळं. अख्ख्या देशात बारा ज्योतिर्लिंग आहेत. तशी बारा ज्योतिर्लिंग फक्त एका बार्शीत आहेत. त्याचा उल्लेख पुराणातही आहे म्हणतात. शहरभर पसरलेली शंकराची देवळं ही गावाच्या नावाचीही ओळखच आहे. श्री रामेश्वर, श्री पाताळेश्वर, श्री वाळेश्वर, श्री शंकेश्वर, श्री विश्वेश्वर, श्री नगरेश्वर, श्री गणेश्वर, श्री बुद्धेश्वर, श्री गणाधिश्वर, श्री पंचमुखी परमेश्वर, श्री समोश्वर आणि श्री भीमाशंकर, असे हे बारा शिव. बारा शिव,  बाराशी, बारशी आणि सध्या बार्शी. कुणीतरी बारशी म्हणजे द्वादशीलाही या नावाशी जोडलंय. पंढरपुरात एकादशी करायची आणि इथं द्वादशी. तसं कुणाला वाटलं असेल तर आश्चर्य नको, कारण इथलं भगवंत मंदिर.

शैवांच्या या गावात भगवान विष्णूंनी लक्ष्मीसह वास्तव्य केलं होतं. विष्णू भगवंत या रूपात फक्त बार्शीच्या मंदिरातच आहेत ‘कशास काशी, गया, अयोध्या, जावे रामेश्वरी. असता श्रीहरी आमुचे घरी’, अशी बार्शीकरांची भगवंताविषयी खात्री आहे. १२४५ साली बांधलेलं हे देऊळ हेमाडपंथीय शैलीतलं आहे. या मंदिराच्या चारही दिशांना प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या शिखरावर दशवताराची शिल्पं कोरलीत. भगवंताची मूर्ती गंडकी शिळेच्या गुळगुळीत काळ्या पाषाणाची आहे. भगवंताच्या उजव्या हाताखाली भक्तशिरोमणी अंबरीश राजाची मूर्ती आहे. देवाच्या अंगावर भक्ताची मूर्ती स्थापित असलेलं हे आगळं उदाहरण आहे. देवाच्या पाठीमागं लक्ष्मीची मूर्ती मुखवट्याच्या रूपात आहे. आरशातून तिचं दर्शन घेता येतं.

पंढरपूरच्या विठ्ठलासारखंच भगवंताच्या मस्तकावरही शिवलिंग आहे. छातीवर भृगू ऋषींच्या पावलांची खूण आहे. पुंडलिकासाठी पांडुरंग आला, तसाच भगवंतही अंबरिशासाठी आला. पण पांडुरंग पुंडलिकाला फक्त भेटण्यासाठी आला होता. अंबरिश राजाला असुरापासून वाचवण्यासाठी विष्णूनं भगवंत अवतार घेतला. भगवंत मंदिरालाही पंढरीच्या मंदिरासारखेच सोळा खांब आहेत. एक गरुडखांबही आहे. भक्त त्याला आलिंगन दिल्याशिवाय पुढे जात नाहीत. त्यातला प्रत्येकजण भगवंतांची महती सांगण्यासाठी गाण्याच्या ओळी म्हणतो,

‘ज्याने केली नाही काशी, त्याने यावी बारशी
भगवंताच्या चरणापाशी सखा नांदे अंबऋषी
आले भगवंत वैकुंठ सोडुनी भक्तासाठी’

चैत्र, मार्गशीष, आषाढी आणि कार्तिकी अशा चारही मोठ्या एकादशींना इथं गर्दी असते. एकादशींना भाविकांची अक्षरश: मांदियाळी असते. एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि बारशीला बार्शीच्या भगवंताच्या दर्शनानं उपवास सोडायचा, अशी स्थानिक वारकर्‍यांची परंपरा आहे.

असाच एक वारकरी गेली सातशे वर्ष तरी भगवंत मंदिराच्या ओवरीत ठाण मांडून बसलाय. जोगा परमानंद त्याचं नाव. गाभार्‍याच्या उत्तर बाजूला संत जोगा परमानंद यांची समाधी आहे. त्यावर छोटंसं देऊळ आहे. भक्तविजयात महिपतीबुवा म्हणतात, ‘जोगा परमानंद भक्त| बारसी ग्रामांत होता राहात| अखंड उदास आणि विरक्त| वैराग्यभरित सर्वदा|’ त्यांची सुरस गोष्टही बार्शीत सांगितली जाते.

सिद्धराम आणि गिरिजा हे तेली समाजातलं एक शिवभक्त दाम्पत्य. बार्शीतल्या मल्लिकार्जुनाचे ते निस्मीम भक्त. त्यांना मूलबाळ नव्हतं. एक दिवस त्यांना मल्लिकार्जुनाच्या देवळात एक बाळ सापडलं. मल्लिकार्जुनाचा प्रसाद म्हणून त्याचं नाव मल्लिनाथ ठेवण्यात आलं. त्याचा पोटच्या पोरासारखा सांभाळ केला. पण हा मुलगा खेळात न रमणारा. तो अतिशय विरक्त होता. शेजारपाजारचे सगळे लिंगायत त्याला ‘जोगडा’ म्हणू लागले. त्याचं जोगा झालं. गावात आलेल्या परमानंद नावाच्या साधूनं त्याला दीक्षा दिली म्हणून तो जोगा परमानंद झाला.

‘भक्तविजया’तली कथाही परमानंदांच्या विरक्तीची दाहकता दाखवणारी आहे. ते रोज गीतेचं पारायण करत भगवंताच्या देवळाला साष्टांग दंडवत करत प्रदक्षिणा घालायचे. एकदा पावसाळ्याच्या दिवसांत ते भर चिखलात दंडवत घालत होते. तेव्हा एका व्यापार्‍यानं त्यांना पाहिलं. त्यानं आग्रह करून एक नवंकोरं महागडं पितांबर परमानंदांना दिलं. दुसर्‍या दिवशी नव्या पीतांबरामुळे ते सांभाळून दंडवत घालू लागले. यामुळं आपल्या निष्ठेत खोट झाल्याचं त्यांना वाटलं. त्यांनी पीतांबर शेतकर्‍याला देऊन त्याच्याकडून दोन बैल घेतले. स्वतःला त्या बैलांना बांधलं आणि बैल उधळून लावले. त्यामुळं त्यांचं शरीर रक्तबंबाळ झालं. पण ते होत असतानाही त्यांनी तोंडातून पांडुरंगाचा नामजप सुरूच ठेवला. ती निष्ठा बघून पांडुरंगानं त्यांना दर्शन दिलं.

संत नामदेवांनी त्यांच्या जीवलग सांगातींचा उल्लेख केलेला एक अभंग आहे. त्यात जोगा परमानंदांचा खास उल्लेख सापडतो. ‘परमानंद जोगा, जगन्मित्र नागा| वटेश्वर चांगा केशवदास्||’ जोगा या नावामुळं ते मूळ नाथपंथी असतील, असा कयास करता येतो. पण नामदेवांच्या नादाला लागून ते वारकरी भक्तिमार्गाला लागले असावेत. जोगा परमानंदांचेही स्वतःचे काही अभंग आणि रचना सकलसंतगाथेत आढळतात. वाययकोशात म्हटलंय, ‘यांनी अभंग, आरत्या व पदे अशी रचना केली आहे. बैसोनि संताघरी हो| घेतली गुरगुडी हो| हे त्यांचे गुरगुडी नावाचे रूपकात्मक पद फार प्रसिद्ध आहे. त्यांचे कवित्व भक्तिभावाने टवटवीत आहे.’ या टवटवीत कवित्वाच्या लोभानंच विसोबा खेचर बार्शीत आले असं म्हणतात.

विसोबा हे मूळचे मराठवाड्यातील औंढ्या नागनाथ येथील रहिवासी. सधन घरातल्या विसोबांना विरक्ती प्राप्त झाली. जोगा परमानंदांच्या अधिक कडक विरक्तीमुळं ते त्यांच्याशी जोडले गेले असतील. इथं आल्यानंतर ते जोगा परमानंद यांच्याकडे लेखनिक म्हणून काम करू लागले. जोगा परमानंद यांचे अभंग ते लिहून काढण्याचं काम करत असत. विसोबांनी नम्रपणे लेखनिकाच काम घेतलं असलं तरी त्यांचा अधिकार मुळातच मोठा होता. त्यांच्या चर्चा होतंच असणार. त्यात विसोबाही वारकरी झाले असतील. जोगा परमानंदांच्या विठ्ठलभक्तीत खेचरही तल्लीन होत असतील. याविषयी काही पुरावे नाहीत. पण विसोबा बार्शीत आले आणि इथल्या समृद्ध मातीतच त्यांनी देह ठेवला, त्याचा एक पुरावा आहे, त्यांची समाधी.

गावात चुकून एखादा माणूस सापडतो, विसोबांच्या समाधीचा पत्ता सांगणारा. लँडमार्क म्हणून उत्तरेश्वर मंदिर विचारायला सांगतात. तिथं गेलं की मुख्य रस्त्यावरून खड्ड्यांनी भरलेला रस्ता लागतो. एखादी गाडी जाईल इतकाच. आपण छोटं मोठं देऊळ शोधत असतो. आपल्याला देवळाच्या मागच्या बाजूचं मैदान दाखवलं जातं. आत डुकरं चिखलात बसलेली असतात. मुलं खेळत असतात. मैदानाच्या कोपर्‍यात एक दगडी चौथरा दिसतो. त्यावर छोटी समाधी. समाधीवर छोटं शिवलिंग. चारही बाजूंना पांढर्‍या रंगानं ओढलेले तिहेरी पट्टे, त्याचं लिंगायत मूळ सांगतात.

जोगा परमानंदांची समाधी भगवंताच्या ओसरीत तरीही देवळातच. त्यामुळं त्यांच्या समाधीला निदान आडोसा तरी मिळाला. इथं आमचे विसोबा उत्तरेश्वराच्या देवळाबाहेर. त्यांना नाही चिरा, नाही पणती. ऊन-पाऊस सताड झेलत उभे पिढ्यानपिढ्या. पायाचा दगडच तो, कुणी श्रेय देवो, न देवो, पर्वा कशाला. गेलो तेव्हा काही बायकामुलं चौथर्‍यावर ऐसपैस बसली होती. आम्ही तिथं जाताच उठून गेली. चौथर्‍याला लागूनच भिंती आहेत. तिथून पुढे अधिकृत अनधिकृत घरांची गर्दी. ही घरं प्रामुख्यानं गेल्या वीस-पंचवीस वर्षांचीच आहेत. फार पूर्वी तिथं बेलाच्या झाडांची बाग होती. त्या बागेमुळंच बहुदा वेगळ्या देवळाची गरज वाटली नसेल पूर्वी. पण आज तिथं सगळं उजाड, भकास झालंय. रहदारी वाढलीय. पण कुणालाच विसोबांचं काही पडलेलं नाही. कपडे वाळत घालण्यासाठी ती हक्काची जागा आहेच. तो सायकल स्टँडही आहे. त्यावरच दुपारी वामकुक्षी घेता येते आणि त्यावर बसून शिळोप्याच्या गप्पाही होतात.

विसोबांचं हे समाधीस्थळ असलेली जागा उत्तरेश्वर मंदिर ट्रस्टच्या मालकीची आहे. भव्य उत्तरेश्वर देवळाची व्यवस्था त्यांनी छान राखलीय. पण विसोबा समाधीकडे त्यांचं लक्ष नाही. बार्शीला किंवा महाराष्ट्राला विसोबांच्या समाधीचं महत्त्व नसलं, तरी कोसो दूर असलेल्या पंजाबमधील शीख धर्मीयांना या समाधीचं महत्त्व कळलेलं आहे. त्यांच्या ‘नामदेव बाबां’चे गुरू असल्यानं शीख धर्मीय इथं येत राहतात. अगदी गाड्या वगैरे करून, असं समाधीस्थळाच्या बाजूच्या झोपडीत राहणार्‍या छाया म्हातेकर सांगत होत्या. पंजाबातून गुरू गोविंदसिंगांसाठी नांदेडला आलं की शीख नामदेवांसाठी नरसीला जातात. त्यातले काही जण वाट वाकडी करून बार्शीलाही येतात.

भागवत धर्माच्या पताका पार पंजाबपर्यंत नेणार्‍या संत नामदेवांचे गुरू असलेल्या विसोबा खेचरांच्या समाधीस्थळाबाबतचा हा अक्षम्य हलगर्जीपणा महाराष्ट्रासाठी लाजिरवाणा आहे. आषाढी, कार्तिकी, शिवरात्री आली की एकट्या बार्शीतच लाखो रुपये खर्च करून कार्यक्रम होत असतील. संतपरंपरा जोपासण्याची वगैरे कळकळ व्यक्त होईल, पण इतक्या महत्त्वाच्या स्थळाकडे कुणी लक्षही देणार नाही. बहुतेक तुकाराम बीजेला काही वारकरी इथं येतात, पण ते नियमाला अपवाद म्हणूनच.

आपल्याला नसली तरी पंजाबातल्या शिखांना चाड आहे. त्यांना विसोबांच्या समाधीस्थळाचं मोठं मंदिर बांधायचंय. तशी इच्छाही त्यांनी उत्तरेश्वर मंदिर ट्रस्टकडे व्यक्त केलीय. वाढत्या शहराच्या मध्यभागी इतकी मोक्याची जागा कोणता ट्रस्ट सोडेल? अधिकृतरित्या कुणी बोलत नसलं, तरी पंजाबहून येऊन स्वखर्चानं विसोबांसाठी मंदिर बांधू पाहणार्‍यांनाही इथं सहकार्य होऊ नये, याला काय म्हणावं?

नामदेव, विसोबा आणि बार्शी या तीन गोष्टींना जोडणारा आणखी एक दुवा इथं आहे. खरंतर तो इतिहास आहे की आख्यायिका आहे, हे ठामपणे सांगता येणं शक्य नाही. मात्र अनेक बार्शीकरांना असं वाटतं की इथल्या मल्लिकार्जुन मंदिरातच विसोबांनी नामदेवांना गुरुपदेश दिला. हे खासगी मालकीचं देऊळ आहे आणि बाबासाहेब कथले या देवळाचे मालक. त्यांच्या घरात पिढ्यानपिढ्या सांगितली गेलेली कथा ते डायलॉगनिशी सांगतात.

संतांच्या मेळ्यात संत गोरा कुंभारांनी नामदेवांना गुरुपदेशाची गरज असल्याचे सांगतलं. त्यावेळी नामदेव बार्शीतील मल्लिकार्जुन मंदिरात आले. मल्लिकार्जुन मंदिरात आल्यानंतर त्यांना अत्यंत पिचलेल्या अवस्थेतील एक म्हातारा शिवलिंगावर पाय ठेवून झोपल्याचं दिसलं. नामदेव मंदिरात येताच, तो वृद्ध म्हणाला, ‘कोण आहे?’ तर नामदेव म्हणाले, ‘मी नामदेव’. वृद्ध म्हणाला, ‘हा ‘मी’पणा सोड’. संतापलेल्या नामदेवांनी त्या वृद्धाचे पाय शिवलिंगावरून उचलून बाजूला ठेवले, तर तिथंही शिवलिंग तयार झाल्याचा भ्रम संत नामदेवांना झाला. त्यावेळी तो वृद्ध पुन्हा म्हणाला, ‘हा भ्रम सोड’. नामदेव काय समजायचं ते समजले. तो वृद्ध दुसरा-तिसरा कुणी नव्हता, तर विसोबा खेचर होते.

दस्तुरखुद्द नामदेवांच्या अभंगांमध्ये ‘द्वादशीचे गांवी जहाला उपदेश’ असा उल्लेख सापडतो. द्वादशी म्हणजे बार्शी. त्यावर अभ्यासक सांगतात पिंडीचा प्रसंग औढ्या नागनाथाला घडला. नंतर फक्त उपदेश बार्शीत झाला. पण बार्शीकर हे मान्य करणार नाहीत. कारण मल्लिकार्जुन देवळापासून अगदी दोनशे फूटांवर विसोबा खेचरांची समाधी आहे.

बाबासाहेब कथले आणखीही एक गंमत सांगतात. आताच्या मल्लिकार्जुन देवळात शिवलिंग संगमरवरी आहे. मात्र हे संगमरवरी शिवलिंग १९१०च्या सुमारास बसवण्यात आलं आहे. विसोबांनी पाय ठेवलेलं शिवलिंग या संगमरवरी शिवलिंगाच्या खाली काळ्या दगडाचं आहे.

बार्शीत नामदेवांचंही एक जुनं देऊळ आहे. ते शिंपी समाजांचं आहे. जीर्णोद्धारानंतर जुन्या खाणा-खुणा पुसल्या गेल्या आहेत. पण इथंही धक्का बसतो, नामदेवांचा वारसा सांगणार्‍या कुणालाही विसोबांबद्दल फार माहिती नसते. नामदेवांचा पालखी सोहळा नरसी नामदेवहून पंढरपूरला जाताना वाटेत विसोबांच्या समाधीस्थळी पालखीची भेट घडवली जाते. हीच त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट.

लिंगायत तत्त्वज्ञानाचा सर्वात जुना ग्रंथ विसोबांनी लिहिलाय. बार्शीत लिंगायत मोठ्या संख्येनं आहेत. त्यांचे अनेक मठही आहेत. सरकारदरबारी सध्या वजनही आहे. विसोबांचं आडनाव चाटी असल्याचं महिपतीबुवा सांगतात. बार्शीत दोन चाटी गल्ल्या आहेत, एक नवी, एक जुनी. इथं नामदेव शिंप्यांचीही संख्या लक्षणीय आहे. वारकरीही भरपूर आहेत. इथले अनेक कीर्तनकारही प्रसिद्ध आहेत. यापैकी कुणालाही विसोबांचं घेणंदेणं नाही. त्यापैकी कुणालाही अभिमान वाटावा, असं विसोबा खेचरांमध्ये काहीच आढळत नाही. विसोबांबद्दल कुणालाही विचारलं असता, निराशा पदरी पडते आणि मन उदास होतं. विसोबांनी आपलं उत्तर आयुष्य ज्या परिसरात घालवलं, तिथली ही उदासीनता पाहून मन अस्वस्थ होतं.

बार्शीचा वारसा खूप महत्त्वाचा आहे. विसोबा आणि जोगा परमानंद तर आहेतच. आजरेकर फड हा वारकरी परंपरा जपणारा फड म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचे मूळपुरुष गुरुमाऊली बाबासाहेब आजरेकर यांचे गुरू बार्शीकर महाराज यांची ही भूमी आहे. विसोबांचा कष्टकर्‍यांच्या जनजागरणाचा वारसा विसाव्या शतकात चालवणार्‍या शाहीर अमर शेखांचं हे जन्मगाव आहे.

तरीही विसोबांची समाधी असून तिला कुणी विचारत नाही. विसोबांविषयी काहीही विचारलं तरी एकच उत्तर मिळतं, ‘नाय काय माहीत नाय.’

0 Shares
विसोबाविन औंढा रिते मुंगीची गुंगी