पुरोगामी प्रतिमा

भास्कर हांडे

रिंगणच्या कव्हरवर विराजमान संत विसोबा खेचर यांच्या कल्पनाचित्रामागचा विचार.

‘रिंगण’साठी दरवर्षी एका संताचं चित्र रेखाटणं हा पंढरीच्या वारीप्रमाणं आता नित्यनेम झाला आहे. या वर्षाच्या चित्रानं जरा जास्तच विचार करायला लावला. कारण यंदाचे संत विसोबा खेचर यांच्याबाबत फारच कमी माहिती उपलब्ध आहे. विसोबांना संत नामदेव यांनी गुरुस्थानी मानलं हा उल्लेख नामदेवांच्या काही अभंगांत येतो. इतर समकालीन संतांनी नामोल्लेखापलिकडं विसोबांविषयी काही लिहिलेलं नाही. संत चोखामेळा, संत गोरा कुंभार यांच्या समकालीन परंतु ब्रह्मज्ञान प्राप्त असलेला सद्गुरू अशीच विसोबांची ओळख. नामदेवांच्या आयुष्यात एक चमत्कारी पुरुष म्हणून गुरू विसोबा खेचरांचा प्रवेश होतो. विसोबा आणि नामदेवांच्या भेटीचा प्रसंग वारकरी संप्रदायात आवडीनं सांगितला जातो.

‘रिंगण’साठीचं काम हे माझ्यासाठी केवळ चित्र काढण्यापुरतं मर्यादीत राहत नाही. त्यानिमित्तानं मी संबंधित संताच्या जीवनकार्याचं चिंतन करतो. आजच्या काळात विसोबा खेचर या व्यक्तिमत्त्वाचा कोणताही दृश्यसंदर्भ उपलब्ध नाही. शिवाय त्यांच्याबद्दलची माहितीही त्रोटक.

विसोबा ज्या काळात होऊन गेले तो काळ तेराव्या शतकातला, यादव कालीन आणि मुसलमान राजवटींचा विस्तार वाढीचा काळ. सामाजिक, राजकीय संघर्षाचा काळ. तसाच तो वैदिक परंपरेला स्थानिक संस्कृतीनं शह देण्याचाही काळ. थोडक्यात धार्मिक, सामाजिक राजकीय उलथापालथीचा काळ. अशा काळात नामदेवांसारख्या वेगळे विचार मांडणार्‍या शिष्याच्या माध्यमातून गुरू विसोबा खेचरांनी ब्रह्मविद्येचं रूपांतर मानवकेंद्रित भक्तीत केलं. म्हणजे माणूसपण हेच भक्तीचं सार असल्याचं सांगितलं. औंढ्या नागनाथाला झालेल्या विसोबा-नामदेवाच्या पहिल्या भेटीच्या कहाणीमागं नक्की कोणतं कारण असेल याचा विचार वारंवार येत राहतो.

जैन आणि बौद्ध धर्माची पीछेहाट, ब्राह्मणी वर्चस्व आणि वैदिक धर्माच्या प्रसाराच्या त्या काळात संत ज्ञानेश्‍वर आणि भावंडांनी जो सामाजिक लढा दिला, अशा काळात विसोबांसारखा समन्वय साधणारा महात्मा तयार होतो. संत नामदेवांचे गुरू म्हणून त्यांना सर्वांनी स्वीकारलं हा योगायोग नक्कीच नसतो. विसोबा मूर्तिपूजा मानत नव्हते, असे संदर्भ आहेत. मुस्लिम धर्मातही मूर्तिपूजा नाही. कारणं काहीही असोत. मात्र त्यामुळं मध्ययुगीन काळातले दृश्य संदर्भ कमी झालेत. त्यामुळं मराठी संतांच्या तत्कालीन प्रतिमा संदर्भासाठीसुद्धा मिळत नाहीत. युरोपियन चर्चमध्ये किंवा व्हॅटिकन चर्चमध्ये इसवी सन १०० पासून संत पदाला पोचलेल्या प्रत्येकाचं व्यक्तिचित्र उपलब्ध आहे. महाराष्ट्रात किंवा भारतात म्हणा संतांच्या पादुका पूजण्याची प्रथा आहे. हे मुस्लिम परंपरेत दिसत नाही. तिथं कबर (मजार) पूजन चालते. विसोबांच्या दृश्यरूपाचं चिंतन करताना हे मुद्दे समोर येतात.

माझ्या कल्पनेप्रमाणं विसोबा शास्त्रींसारखी पगडी बांधत असतील किंवा तेराव्या शतकातील अंगरखा, बंडी, धोतर वा पंचा उपरणे अशी वेषभूषा करत असतील. मंदिरात जाताना त्यांच्या अंगावर एक लांबलचक वस्त्र असणार. ते सर्व केस वपन केलेले आणि फक्त शेंडी असलेले असणार. विसोबा एक की अनेक अशा शंकाही आहेत. मला मन:चक्षू समोर दिसलेले विसोबा औंढ्याच्या मंदिरातले आहेत. नामदेवांच्या भोळ्याभाबड्या भक्तीला आत्मज्ञानाची बैठक घालून देणारा हा सत्पुरुष शैव विचारसरणीचं एक फलित होतं. हा माणूस ब्रह्मज्ञानीच असणार. कपाळावर भस्म लावणारा मात्र वैष्णवांना स्वीकारणारा असा हा पुरोगामी विचारसरणीचा सत्पुरुष असणार. संत नामदेवांना उपदेश करून झाल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर काय भाव विलसत असतील, याचाच मी विचार करत बसलो. त्यातूनच मी विसोबांचं चित्र रेखाटायला घेतलं. विसोबांना भेटण्याच्या वेळी संत नामदेवांचं वय १५ ते १८ वर्ष असावं. १२७० हे नामदेवांचा जन्मवर्ष असेल तर ज्ञानदेवांच्या समाधीच्या वेळी नामदेव २७ वर्षांचे असतील, तर विसोबा उतारवयाचे असतील. ज्ञानदेवांची समाधी आणि नामदेवांचं उत्तर भारतात जाणं, या घटनांनंतर औंढ्याच्या देवालयाबाहेर विचारमग्न बसलेले विसोबा मला दिसले. त्यांची ती विचारी मुद्राच मग माझ्या हातून चितारली गेली.

संतपरंपरेत अनेक चमत्कारिक बाबी सांगितल्या जातात. त्या तार्किक, वास्तव किंवा विज्ञाननिष्ठेवर पारखून पाहणं क्रमप्राप्त ठरतं. औंढ्याच्या मंदिरात शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेल्या विसोबांच्या कथेचा विचार करताना मला विसोबांची प्रतिमा सुचत गेली आणि मी ती रंगवत गेलो. म्हणूनच या अंकाच्या कव्हरवर काढलेलं चित्र हे केवळ रंगकाम किंवा चित्रकला नसून ते एक चिंतनाचं दृश्यरूप आहे, असं मी नम्रपणे नमूद करतो.

0 Shares
पायाचा थोर दगड इंद्रायणी काठी विसोबा चाटी