थँक्यू राजाभाऊ!

Ringan

राजाभाऊ चोपदारांनी एकदा दंड उचलला की, ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातले लाखो वारकरी एका क्षणात थांबतात. फक्त रिवाज आहे म्हणून असं होत नाही. फक्त दंडात ती ताकद नसते. दंड हातात असणा-या माणसालाच ती कमवावी लागते. राजाभाऊंच्या कित्येक पिढ्यांनी संतविचारांवरील निष्ठेला जगण्याचा आधार बनवत पालखी सोहळ्यातलं सत्त्व टिकवण्यात मोठं योगदान दिलंय. यंदा भिडे गुरुजींच्या धारकर्‍यांना पालखी सोहळ्यात घुसण्यापासून रोखताना राजाभाऊंनी ती निष्ठाच जगाला दाखवून दिली. म्हणूनच राजाभाऊ, संत विसोबा खेचरांचं रिंगण विठुरायाच्या पायाशी अर्पण करताना तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणावंसं वाटतंय.

विसोबा खेचर समन्वय सांगतात. सर्वसमावेशकता सांगतात. जात, धर्म, कूळ, वंश, प्रदेश, संप्रदाय या सगळ्याच्या पलीकडचं माणूसपणाचं नातं समजावून सांगतात. देशाचं आणि त्यातही आमच्या शिवरायाचं नाव सांगून द्वेष पसरवणार्‍यांना तुम्ही रोखलंत, हा वारसा विसोबांचाच आहे.

वारकरी संतांविषयी राग असणार्‍या जातवर्चस्ववादी इतिहासकारांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या आसपास धारकरी हा शब्द जन्माला घातला. वारकरी टाळकुटे नेभळट, म्हणून राष्ट्रनिर्मितीसाठी धारकरी हवेत, असा त्यांचा दावा होता. तीच मानसिकता असणारे आजही धिंगाणे घालू पाहात होते. तुम्ही ते चालू दिलं नाही. पुन्हा आभार.

‘मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रालाही भेदतो’, हे एव्हाना धारकर्‍यांना कळलं असेलच. आम्ही वारकर्‍यांनी शेकडो वर्ष जग जिंकलंय. त्यासाठी आम्हाला खेळण्यातल्या तलवारी नाचवाव्या लागल्या नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजही आळंदी आणि देहूपासून हाकेच्या अंतरावर वारकर्‍यांच्या आणि वारकरी विचारांच्या सोबतच मोठे झाले होते. संतांनी आम्हाला स्वराज्यासाठी नांगराच्या तलवारी करायची पाईकगिरी शिकवली आहेच. तलवारीच्या जोरावर दिल्लीचं तख्त राखणारे आमचे महादजीबाबा शिंदे माळकरी होते आणि इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणारे क्रांतिसिंह नाना पाटीलही. देश राखायला धारीची नाही वारीची गरज असते.

राजाभाऊ, तुमच्या या कृतीनं रिंगणची दिशा बरोबरच आहे, याची खात्री झालीय. त्यासाठीही थँक्यू.

सचिन परब

डॉ. श्रीरंग गायकवाड

0 Shares
संदर्भखुणा पायाचा थोर दगड