सांस्कृतिक इतिहासाचा दस्तावेज

सतीश बडवे

विसोबा खेचर लिखित शडुस्थळ हा ग्रंथ तत्त्वज्ञानाविषयी आहे, पण तो इतिहासाचे दुवेही देतो. विविध संप्रदायांचे परस्पर अनुबंध शोधण्यास चालना देतो. त्यामुळं तो मराठी साहित्यातील एक महत्त्वाचा ग्रंथ ठरतो.

वीरशैव ही मराठी आणि कन्नड वाड्मयाची एक समृद्ध परंपरा आहे. ती सकस आणि दीर्घ आहे. त्यातील शडुस्थळ अर्थात षट्स्थल हा आद्य मराठी ग्रंथ आहे. वीरशैव अथवा लिंगायत धर्माचं तत्त्वज्ञान हे अष्टावरण, पंचाचार आणि षट्स्थल या तिन्ही ग्रंथांशी संबंधित आहे. या तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान म्हणून या ग्रंथांकडे बघता येतं. अष्टावरण म्हणजे अंग, पंचाचार म्हणजे प्राण आणि षट्स्थल म्हणजे आत्मा होय. या आत्म्याला जाणणं म्हणजेच षट्स्थल दर्शन होय, अशी पंथीयांची धारणा आहे. आपल्या भोवतालच्या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली? त्याचा कर्ता कोण आहे, हे प्रश्‍न बहुतेक सर्व धर्मसंप्रदाय वा पंथ यांच्यापुढे होते आणि या सर्वांनी आपापल्या परीनं त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. लिंगायत पंथीयांच्या मते विश्‍वाच्या उत्पत्तीपूर्वी काहीही अस्तित्वात नव्हतं. मात्र परमेश्‍वर सर्वत्र होता. अव्यक्त, निराकार आणि निर्गुण रूपात तो व्यापून होता. त्याला इच्छा निर्माण झाली. या इच्छेलाच ‘लीलाविनोद’ असं संबोधलं जातं. या ग्रंथाकडे सांप्रदायिक अभ्यासक आणि साहित्याचे अभ्यासक ज्या पद्धतीनं बघतात त्यात फरक आढळतो.

लीलाविनोदाच्या इच्छेमधून चित् निर्माण झाले. चित्मधून सत्-आनंद-नित्य परिपूर्ण शिवतत्त्व निर्माण झाले. तेच परशिव, परब्रह्म, महास्थल होय. परशिवाची दोन रूपं आहेत. अंग आणि लिंग. हे दोन्ही एकच असून, यासंदर्भातील महात्मा बसवेश्‍वरांचं वचन पुढीलप्रमाणे आहे.

काय म्हणून काय म्हणू तयास,
एकाचे दोन जाहलेल्यास
काय म्हणून काय म्हणू तयास,
दोनाचे एक जाहलेल्यास
कसे कल नि काय करू वर्णन?
अविरळ धन, तयाचे महिमान
महादानी कूडलसंगम देवच जाणे

बसवण्णांनी परमात्म्याचं उत्पत्तीरहित, अयोनिज, शून्य, निराळं असं वर्णन केलेलं आहे. या शिवत्त्वालाच ‘स्थल’ असं म्हटलं आहे.

अंगस्थलात त्यागांग, भोगांग आणि योगांग अशी तीन उमांगं तयार होतात. लिंगस्थलात इष्टलिंग, प्राणलिंग आणि भावलिंग अशी तीन लिंग तयार होतात. या प्रत्येक उमांगांचे प्रत्येकी दोन असा सहा स्थलविस्तार होतो. अशा प्रकारे एकाचे दोन, दोनचे तीन, तीनचे सहा असा स्थलविस्तार होत गेला. मानवाच्या उन्नतीसाठी षट्स्थल ग्रंथ दिशादिग्दर्शन करणारा आहे. षट्स्थल दर्शन म्हणजे मानवाच्या दुष्ट प्रवृत्ती, दुराभिमान, दुराभिलाषा यांचा त्याग करणं आणि सत्याच्या शोधासाठी प्रवृत्त होणं. आत्मोन्नती साधण्यासाठी एकेक स्थल म्हणजे एकेक पायरी चढत जाणं आवश्यक आहे. तोच षट्स्थल दर्शनाचा मुख्य हेतू आहे. या सहा पायर्‍या म्हणजे भक्त, महेश, प्रसादी, प्राणलिंगी, शरण आणि ऐक्य होय. थोडक्यात षट्स्थल म्हणजे मानवाचा महादेव होणं, जीवाचा शिव होणं होय. शिवरूपात समरस होण्यासाठी षट्स्थलाच्या दिशेनं जाणं आवश्यक आहे, असं मानलं जातं.

उन्नत जीवनासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी या विचारांमधून पुढे येतात. स्थलविचाराशी निगडीत असणार्‍या काही संज्ञा आहेत. त्या अशा

पिंडस्थल : आपल्यातच ‘शिवत्व’ कसं आहे, याचं विवेचन यात केलेलं आहे. ‘मी’पणाचा भाव नष्ट होऊन परमात्म्याचं निजस्वरूप आपल्यातच आहे, याची जाणीव इथं होते.

पिंडज्ञानस्थल : शरीर आणि आत्मा या दोन वस्तूंचं यथार्थ ज्ञान होणं म्हणजे पिंडज्ञानस्थल होय.

संसारहेयस्थल : म्हणजे संसाराबद्दल तिरस्कार वाटणं होय. व्यक्तीपेक्षा व्यक्तीच्या ठायी असलेल्या दृष्ट वृत्तीचा त्याग करणं म्हणजे संसारहेयस्थल होय.

गुरूकारुण्यस्थल : गुरू एक तत्त्व आहे. ज्ञानाचा उदय गुरुमुखातून होतो. गुरूमुळेच षट्स्थलाचा मार्ग गवसतो.

लिंगधारणस्थल : परमानंदाची अनुभूती येण्यासाठी गुरू लिंगधारता करतात. त्यालाच लिंगधारणस्थल म्हणतात.

विभूतिधारणस्थल : मनुष्याच्या व्यक्तीमत्वातील दुर्गुणांचा नाश करून, त्यांच्या ठायी सद्भाव जागृत होतो, ते भस्म अथवा विभूती होय.

रुद्राक्षधारणस्थल : व्यक्तीच्या अंतरंगातील ज्ञान म्हणजे रुद्राक्ष. ते धारण केल्यानं अंतरंगातील सुज्ञान, सद्भाव जागृत होतो.

मंत्रधारणस्थल : मंत्रानं मानवाचं मन आणि चित्त स्थिर होतं. मनाच्या एकाग्रतेसाठी मंत्रपठण आवश्यक आहे.

या सर्व बाबी उपासकाच्या अथवा साधकाच्या उपयोगी पडणार्‍या आहेत. षट्स्थल दर्शनाच्या ज्या सहा पायर्‍या आहेत, त्याही जाणून घेता येतात. त्या पायर्‍या पुढीलप्रमाणे आहेत.

१) भक्तस्थल : हे पहिलं स्थल आहे, भक्त होण्यासाठी. प्रथमतः जीवाच्या ठिकाणी माझ्यातच शिव आहे याची जाणीव होणं आणि या शिवाच्या दर्शनासाठी उत्कंठा निर्माण होणं या त्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हा भक्त शांत, सत्य बोलणारा, गुरू, लिंग, जंगमाची निंदा न करणारा असणं आवश्यक असतं.

२) माहेश्‍वरस्थल : भक्तस्थलात श्रद्धा महत्त्वाची तर माहेश्‍वरस्थलात निष्ठेला प्राधान्य असतं. भक्ताची इष्टलिंगावर संपूर्ण निष्ठा असावी. त्यानं बहुदेवांची उपासना वर्ज्य मानावी. आपली निष्ठा डळमळीत असू नये. उपास्थ इष्टलिंग, तलाचरण आणि धर्म याप्रती निष्ठा ठेवणारा भक्त हवा.

३) प्रसादीस्थल : भोजनाला प्रसादरूप देऊन त्यात दैवीभाव इथं महत्त्वाचा मानला जातो. प्रसादाचं सेवन, प्रसादाबद्दल आदर व्यक्त केला जातो. आपला देह हा परमात्म्याचा प्रसाद असल्याची भावना या स्थलाशी निगडीत आहे. म्हणून देहाची अवहेलना करू नये. प्रसादाचा व्यय होता कामा नये, अशी ही भूमिका आहे. आपलं सर्वस्व लिंगार्पित करण्यातून प्रसादभाव निर्माण होतो. हे या स्थलाचं प्रयोजन आहे.

४) प्राणलिंगीस्थल : या स्थलामध्ये लिंग हाच प्राण आणि प्राण हेच लिंग असतं. देहामन आणि बुद्धी यांच्या सर्व विकारांतून मुक्त झाल्यानं सर्व सृष्टी शिवमय बनते. प्राण आणि लिंग यातील अभरता किंवा अद्वैत भावना म्हणजेच प्राणलिंगीस्थल होय.

५) शरणस्थल : शरणस्थल याचा अर्थ सर्वस्वाचं समर्पण. शरणस्थलात ‘शरण सती-लिंग पती’ हा भाव प्रधान असतो. अंग आणि लिंग यात पती-पत्नीचं नातं निर्माण होतं. शरण होणं म्हणजे शिवस्वरूप होणं होय. शरण लौकिक जीवन जगत असला तरी अलिप्त असतो. शिवाशी एकरूप होण्याचा भाव गात असतो.

६) ऐक्य स्थल : षट्स्थलातील ही अंतिम अवस्था आहे. इष्टलिंगात आपल्या व्यक्तिमत्त्वाला विलीन करणं आणि लिंगभावनेनं जीवन जगणं म्हणजे ऐक्य स्थल. ‘मीच शिव आहे’ हा भाव निर्माण होणं इथं महत्त्वाचं ठरतं.

वीरशैव उपासकांमध्ये षट्स्थल दर्शन महत्त्वाचं मानलं जातं. जो हे शिखर सर करतो, त्याचा व्यष्टीभाव जातो आणि तिथं समष्टीभाव येतो. ही परिभाषा अध्यात्माची, तत्त्वज्ञानाची असली तरी त्यात समष्टीप्रधान विचार आहे. सांप्रदायिक षट्स्थलाचा कसा विचार करतात, यास्तव हे विवेचन केलेलं आहे. डॉ. बसवलिंग पट्टेश्‍वरू यांच्या ‘षट्स्थल दर्शना’च्या प्रवचनाचा आधार घेऊन हे विवेचन करण्यात आलं आहे.

अनेक अभ्यासक, संशोधकांनी षट्स्थलाच्या निमित्तानं लेखन केलेलं आढळतं. डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी केलेलं संशोधन महत्त्वाचं आहे. ‘शडूस्थळी’ हा ग्रंथ त्यांना सासवड येथील सोपानदेव समाधी मंदिरातील कागदपत्रांच्या गठाळ्यात सापडला (१९६९). त्यातील गुरूपरंपरेचा वेध घेण्याचा प्रयत्न डॉ. ढेरे यांनी ‘चक्रपाणि’ या ग्रंथात केला. त्यात महानुभाव पंथाचे प्रवर्तक असणारे सर्वज्ञ चक्रधर हेच हरिनाथ आहेत असं निरीक्षण नोंदवलं. हा ग्रंथ वादाचा विषय झाला. १९८९ला ‘गुरुमाऊली’ या दिवाळी अंकात ‘शडूस्थळी’ प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथामुळं खेचर विसांच्या गुरूपरंपरेबाबत असणारी धूसरता कमी होत गेली. वीरशैव तत्त्वज्ञान मांडणार्‍या या ग्रंथाचं कर्तृत्व विसोबा खेचरांकडे जातं. साहजिकच संत नामदेवांचे गुरू असूनही वारकरी पंथापेक्षा त्यांचा विचार वीरशैव संप्रदायाच्या पार्श्‍वभूमीवर करता येतो, हे लक्षात येतं.

विसोबा खेचर यांची शडूस्थळीतील गुरूपरंपरा आदिनाथ मत्स्येंद्रनाथ-गोरक्षनाथ-मुक्ताई-चांगा वटेश्‍वर-कृष्णनाथ वा रामकृष्णनाथ खेचर विसा याप्रमाणं आढळते. विसोबा हे योगाधिकारी सत्पुरुष होते. या ग्रंथातून नाथपंथाचा असणारा त्यांचा ऋणानुबंध स्पष्ट होतो. गोरक्षनाथ आणि अल्लमप्रभूंची भेट, त्यांच्यातील संवाद, मंगळवेढा-सोलापूर-शिखर शिंगणापूर-पंढरपूर ही क्षेत्रं वीर शैवांच्या प्रभावात होती.

डॉ. रा. चिं. ढेरे यांनी प्रकाशित केलेली शडुस्थळाची संहिता नवा विचार देणारी आहे. डॉ. ढेरे यांना वैचारिक विरोधाला तोंड द्यावं लागलं; मात्र ‘अज्ञाननिरसन हा पराभव नसून प्रगती आहे’, अशी त्यांची धारणा आहे. मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवून ही संहिता अभ्यासली तर या ग्रंथाच्या आशयाचा बोध होतो. सांस्कृतिक इतिहासाचा हा अनोखा दस्तावेज आहे. हे हस्तलिखित बाड अपूर्णावस्थेत असलं तरी हे संपादन महत्त्वाचं ठरतं. षट्स्थलाची यथामूल संहिता, त्याचं पाठस्वरूप, विसोबा खेचरांची अभंगरचना, त्यांचं हरिश्‍चंद्रास्थान, विसोबांची गुरुपरंपरा, पांचाळ परंपरेतील ग्रंथ आणि योगिनी मुक्ताबाईंची परंपरा अशा विविध आशय सूत्रांविषयीचं प्रतिपादन या ग्रंथात आलेलं दिसतं. षट्स्थलाच्या पोथीत ८१ पत्रं होती. मात्र, उपलब्ध पत्रांची संख्या केवळ ५७ असल्यानं त्याची अपूर्णता ध्यानात येते. ग्रंथाची मांडणीही विविध विषयांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे. यातील साडेएकवीस पत्रांमधून खेचर विसाकृत षट्स्थलाचा आशय आलेला आहे. डॉ. ढेरे यांची प्रस्तावना ही महत्त्वाची ठरते.

या हस्तलिखिताची भाषा यादवकालीन आहे, हे त्यातील शब्दरूपांवरून स्पष्ट होतं. सांस्कृतिकदृष्ट्या काही गुढं त्यातून उलगडत जातात. ‘शडूस्छल’, ‘शडूस्छळी’ असे नामनिर्देशनही या रचनेमध्ये बघता येतात. एखादा ग्रंथ विशिष्ट कालखंडाची वाटचाल कशी होत जाते, याचा निर्देश करतो. षट्स्थल त्या दृष्टीनंही उपयुक्त ठरणारा आहे. रचनेच्या अंगानं अधिक काही सांगायचं तर ग्रंथाचा प्रारंभ, गणेश-शारदा स्तवन, ग्रंथाचा समाभिलेख अशी रचना ओवी छंदातील आहे. म्हणूनच तो गेय असणारा ग्रंथ आहे. ‘षट्स्थल’ हा संस्कृत शब्द आहे. पण त्याचं मराठी रूप ‘शडूस्छळ’ होतं. पण त्याबरोबरीनंच

ईति श्रीगुरुशिष्य संवादु | तो हा शडूस्छळाचा भेदू |
मराठी टीका वोविप्रबंधु | संपूर्ण जाला

उकारान्त शब्दांचा वापर ही यादवकालीन भाषेची पद्धत इथं आढळते. संवाद, मराठी टीका, वोविप्रबंध या शब्दांमधूनही यादवकालीन मराठीचं रूप लक्षात येतं. हा अनुवाद असल्याचा उल्लेखही ग्रंथात आहेच. ‘मराठी टीका’सारखे रचनेतील शब्द, अन्य भाषेतून हा ग्रंथ अनुवाद करून मराठीत आणला आहे, हे लक्षात येतं. षट्स्थल सिद्धांताची मांडणी केल्याचंही दिसतं. वीरशैव अभ्यासकांनी हा ग्रंथ संस्कृत आणि कन्नड भाषेत नेलेला आहे. ६७७ ओवीसंख्येच्या या ग्रंथात तीन अध्याय वा तीन प्रसंग करण्यात आले आहेत. त्यातून ग्रंथविस्ताराची दिशाही आढळते.

या वोविया पुष्पे प्रासिं| समप्रिली मनोभावें सि|
या परी हरीख जाले| वटेश्‍वरासि| खेचर विसा म्हणजे॥

ही ओवी बघितली की, खेचर विसांचं हे ग्रंथकर्तृत्व असल्याचं स्पष्ट होतं. ‘कृष्णसूत’ असा स्वतःचा निर्देश जसा इथं केलेला आढळतो, त्याचप्रमाणं ‘रामकृष्ण’ असं आपल्या गुरूंचं नावही नोंदवलेलं दिसतं. आदिनाथांपासून सुरू होणारी आपली गुरू-परंपरा ग्रंथाच्या अखेरीस आढळते. विसोबा खेचर असं नाव जरी रूढ असलं तरी नामदेवांनी आपल्या गुरूचा उल्लेख ‘खेचर विसा’ असाच अनेक अभंगांत केला आहे.

‘शडूस्थळी’ ग्रंथावर जाणकारांनी काही आक्षेप नोंदवले; तर क्वचित समर्थनही केलं. प्राचार्य नरहर कुरुंदकर, डॉ. ब्रह्मानंद देशपांडे, पुरुषोत्तमदादा नागपुरे, डॉ. वि. रा. करंदीकर, महंत मुरलीधरशास्त्री, प्रा. कन्हैया कुंदप, डॉ. पंडित भावशीकर, डॉ. अशोक कामत, डॉ. श्यामा घोणसे यांनी आपल्या ग्रंथांमधून वा स्फूट लेखांमधून आपलं म्हणणं मांडलेलं आढळतं. या सर्वांचा विचार केला तर हे लक्षात येतं की, ‘शडूस्छळी’ अथवा ‘षट्स्थल’ हा ग्रंथ येथील विविध संप्रदायांच्या वाटचालीवर, त्यांच्या भूमिकांवर आणि त्यांच्या परस्परसंबंधावर प्रकाश टाकणारा ठरतो. एखादा तत्त्वज्ञानप्रधान ग्रंथ केवळ तत्त्वज्ञानच मांडतो असं नाही. कितीतरी नवीन दुवे शोधण्यास तो प्रोत्साहित करतो. नाथपंथ, वीरशैव, महानुभाव, वारकरी अशा भिन्न भिन्नपंथसंप्रदायांचे अनुबंध शोधण्यास प्रवृत्त करणारा हा ग्रंथ समन्वयाची दिशाही स्पष्ट करतो.

या ग्रंथातून खेचर विसांचं वीरशैव संप्रदायाशी असणारं नातं उलगडलं जातं. खेचर विसा आणि संत नामदेव यांच्या गुरुशिष्य संबंधांची व्यापकता त्यातून ध्यानात येते. डॉ. ढेरे यांची चिकित्सक दृष्टी जशी या संपादनातून आणि संशोधनातून प्रकटते, त्याचप्रमाणं महाराष्ट्रातील मान्यवर विचारवंतांनी या लेखनाला तितक्याच चिकित्सकपणे उत्तरं दिल्याचंही दिसतं. शिवभक्तीचा पुरस्कार करणारा हा ग्रंथ वीरशैव अथवा लिंगायत पंथीयांच्या श्रद्धेचा भाग आहे. या ग्रंथाच्या आधारेच त्या संप्रदायाचं तत्त्वज्ञान जसं लक्षात येतं, तसंच यादवकाळातील सांस्कृतिक भूमिकांचं दर्शनही घडवलं जातं. शिवभक्तीला प्राधान्य देणारा हा ग्रंथ उपासकांना प्रेरणा देणारा, उपासनापद्धतीची उकल करून दाखवणारा ठरतो. आत्मोन्नतीच्या भूमिकेतून जसे विचार मांडले जातात, तसंच समूह विकासाला अथवा लोककल्याणाला प्राधान्य देण्याची दिशा त्यातून सूचित होते. शिवोपासना आणि विष्णूची उपासना यादवकाळात महत्त्वाची होती. हरिहरैक्याची दृष्टी देणारा हा कालखंड आहे. वीरशैव आणि वारकरी यांच्या अनुबंधाची मांडणी करणारा हा ग्रंथ सांस्कृतिक वाटचालीचा एक भक्कम पुरावा ठरतो, असं म्हणता येईल.

0 Shares
गुरुकृपांकित तत्त्वज्ञ संवादाचा दुवा