आम्ही चोखोबा का नाकारतो?

ज. वि. पवार

चोखामेळांसारख्या संतांना युगधर्मानुसार व्यवस्थेसमोर वाकावे लागले. त्यामुळे बाबासाहेबांसारखा कणखर आणि दणकट आदर्श मिळताच तो स्वीकारणं स्वाभाविक होतं. याचा अर्थ आम्ही चोखोबांचं योगदान नाकारत नाही. सांगत आहेत ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ज. वि. पवार. ‘रिंगण’नं दिलेल्या ‘आम्ही चोखोबा का नाकारतो?’ या विषयावरचं त्यांचं हे महत्त्वपूर्ण भाष्य.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं विहित कर्तव्य होतं जीवनाच्या सर्व क्षेत्रांत समता प्रस्थापित करणं. महाराष्ट्रातील संतांनी हेच उद्दिष्ट स्वीकारल्यामुळे बाबासाहेबांना संतांबद्दल ममत्व होतं. महाराष्ट्रातील सर्वच संत हे वर्चस्ववादाचे बळी होते. हे संत सगळ्या सामाजिक स्तरांतले आणि थरातले असले तरी ते वर्चस्ववादासमोर हतबल झाले होते. ब्राह्मण या उच्चस्तरापासून तत्कालीन महार या निम्नस्तरातील म्हणजेच अठरापगड जातीजमातीतील संत असले तरी त्यांना व्यवस्थेपुढे वाकावं लागणं हा युगधर्म होता.

या युगधर्माला विरोध केल्यामुळे ज्ञानेश्व्रांनासुद्धा जात बहिष्कार स्वीकारावा लागला. सात-आठ शतकांपूर्वी पराकोटीला गेलेला धर्मवर्चस्ववाद इतका उग्र होता, की त्यामुळे व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविणार्यांाना देहांताची शिक्षा दिली जात होती. संतांना भक्तीत एकी पाहिजे होती तर व्यवस्थेला बेकी पाहिजे होती. याचा परिणाम असा झाला की, सर्व संतांचे खून करण्यात आले. खुन्यांना खुनी समजण्यात येऊ नये म्हणून संतांच्या मृत्युंचे उदात्तीकरण करण्यात आले. या उदात्तीकरणाचा आसरा घेण्यासाठी नामजपाचा मार्ग स्वीकारण्यात आला. या खुनांचं आणि त्यांच्या उदात्तीकरणाचं उत्तम उदाहरण म्हणजे संत चोखामेळा.

निम्नजातीत जन्मलेल्या चोख्याने समताधिष्ठित समाजव्यवस्थेची अपेक्षा केल्यामुळे त्यांना भिंतीत चिरडून मारण्यात आलं. एका चोख्याला मारण्यासाठी इतर कामगारांना मारण्यात आलं, परंतु तो खून दडपून टाकण्यासाठी चोख्याच्या हाडातून ‘विठ्ठल विठ्ठल’ हा नामगजर होत असल्याचा कांगावा करण्यात आला. त्याच्या खुनाचे उदात्तीकरण करून त्याची समाधी प्रचलित व्यवस्थेप्रमाणं गावकुसाबाहेर मंदिराबाहेर बांधण्यात आली. म्हणजे जिवंतपणी गावकुसाबाहेरील व्यक्ती मरणानंतरही गावकुसाबाहेरच. भक्तीत एकी असल्याचं सांगण्यात आलं, परंतु ही एकी पंक्तीत नव्हती तशीच ती समाधीतही नव्हती.

माळी समाजातील सावता, कुंभार समाजातील गोरा, सोनार समाजातील नरहरी, न्हावी समाजातील सेना, कसाई असलेला सजन, महार जातीत जन्मलेला बंका आणि चोखा इत्यादी संत समतेसाठी लढत होते. कारण आपला समाज जातिव्यवस्थेमुळे वा जातीय उतरंडीमुळे सर्वच क्षेत्रांत पिछाडीला कसा आहे हे वास्तव ते नाकारू शकत नव्हते. माणसं सगळी सारखीच असतात, त्यांच्या रंगरूपामुळे वा जन्मामुळे ती हीन ठरू नयेत ही अभिलाषा सर्वच मागासजातीय संतांनी मनी बाळगली. त्यांची ही अभिलाषा कालातीत नव्हती असं नाही, परंतु व्यवस्थेला छेद देणारी होती आणि म्हणूनच त्यांना जरब दाखविण्यासाठी एकेकाचे खून करण्यात आले. तुकोबांचंही तेच करण्यात आलं. त्यांच्या खुनाचं उदात्तीकरण करण्यासाठी पुष्पक विमानाचा दाखला देण्यात येतो. समता मागाल तर खून करू या दहशतीमुळे सर्वच मागासजातीमध्ये संतांचं पीक येऊ शकलं नाही. कुणबी समाजातल्या तुकोबांना धडा शिकविल्यामुळे तुकोबांची परंपरा संपुष्टात आली. तीच गत सोनार, न्हावी, माळी, कसाई इत्यादींमध्ये झाली. या समाजामध्ये पुढे संत निर्माण झाले नाहीत याचं एकमेव कारण म्हणजे वर्णवर्चस्ववादाचा अहंकार.

‘ऊस डोंगा परि, रस नव्हे डोंगा’, असं म्हणणार्याा चोखामेळा यांनी समताधिष्ठित समाजाचं स्वप्न पाहिलं होतं. हे स्वप्न पाहताना त्यांनी आपल्या हृदयात दुःख लपवून ठेवलं होतं. चोखा म्हणतात,

अवघ्या वर्णामानी हीन केली जाती |
विटाळ विटाळ म्हणती क्षणोक्षणी ॥
कोणीही अंगीकार न करिता माझा |
दूर दूर हो जा अवघे म्हणती ॥
चोखा म्हणे तुम्ही घ्याल पदरी |
तरीच मज हरी सुख होय ॥

चोखाबांनी हे शल्य आपल्या उरी जपलं होतं. ते दुःख, दैन्य हे त्यांचं एकट्याचं राहिलं नव्हतं, ते त्यांच्या समस्त समाजाचं झाले होते. दुःखाच्या या सार्वत्रिकीकरणाबाबत चोखामेळा म्हणतात,

नाही देह शुद्ध यानी अमंगळ |
अवघे घोंगळ गुणदोष ॥
वाणी नाही शुद्ध धड नसे वचन |
धिक्कारिती जन सर्व मज ॥
अंग संग कोणी जवळ न दक्षे |
चोखा म्हणे ऐसे जीवित माझे ॥

ही परिस्थिती नष्ट व्हावी म्हणून पंढरीरायाचा त्यांनी धावा केला होता. विठू कोण हे सांगताना चोखोबा म्हणतात, ‘लोभाळू मायाळू दीनांचा कनवाळू | दुष्टांचा काळू’. विठुराया दुष्टांचा काळ असल्याची भावना झाली असली तरी शिवशिव, बाट आणि अपवित्रता नष्ट झाली नसल्याचं सत्य सांगतात. कोणाचीही पर्वा न करणारे संत आणि महंत हे समाजाचे आदर्श असतात.

महाराष्ट्रापुरतं बोलायचं झाल्यास अनेक जातींनी आपल्या जातीत जन्मलेल्या संतास आपला आदर्श मानलं. उदाहरणार्थ माळ्यांनी सावतामाळी, चर्मकारांनी संत रोहिदास, कैकाडी समाजाचा संत कंकय्या. आपल्या जातीपुरते संतांना बांधून ठेवणारे अनेक समाज विशेषतः अस्पृश्यांमध्ये दिसून येतात. संत रविदास, संत कनकदास, संत हरलय्या ही काही वानगीदाखल नावं. खरंतर कोणत्याही संतानं आपल्या जातीपुरता विचार केला नव्हता. अस्पृश्य संतांनी तर जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय माणसाला जात एवढी चिकटलेली आहे, की तो आपल्या जातीबाहेर विचारच करायला तयार नाही. खरंतर समाजाला कोणी ना कोणी आदर्श असतोच.

हा आदर्श दणकट, कणखर आहे, की कणाहीन आहे हा मुख्य प्रश्‍न आहे. चोखोबांच्या समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक दणकट आदर्श मिळाला. या आदर्शानं चोखोबांच्या खांद्यावर उभं राहून दूरदृष्टीनं समाज बदलायचा कार्यक्रम दिला. हा कृती कार्यक्रम असल्यामुळे त्याला जनआंदोलनाचं स्वरूप आलं. हे आंदोलन उक्तीपुरतं मर्यादित न राहिल्यानं ते कृतीत उतरलं. चोखाबांनी प्रचलित वर्णव्यवस्था अनुभवली. तिचे चटके सहन केले. त्यातून बाहेर यायचा प्रयत्न केला. परंतु त्यांना कुंपण होतं ते विठूच्या नामस्मरणाचं. विठ्ठलच सर्व दुःखांचा नायनाट करेल, अशी चोखोबांची धारणा होती. बाबासाहेबांनी ही चौकट तोडण्या-फोडण्याचे प्रयत्न केले. धर्म, धर्मग्रंथ पर्यायानं धर्मशास्त्र यांनाच त्यांनी आव्हान दिलं. अगदी मनुस्मृतीसारखे धर्मग्रंथ जाळले. हजारो वर्षांच्या दुःखावर फुंकर घालणं वा मलमपट्टी करणं त्यांना मान्य नव्हतं. त्यांनी रोग नष्ट करण्यास शस्त्रक्रियेचा मार्ग अनुसरला.

त्यांनी तथागत गौतमबुद्धाचा अडीच हजार वर्षांपूर्वीचा समताधिष्ठित समाज अस्तित्वात आणण्यासाठी हिंदुधर्माला ठोकरलं अन् तेही एकेका वेळी लाखोंच्या संख्येनं. हे नवदीक्षित बौद्ध अनुयायी बाबासाहेब यांच्यामध्ये आपला आदर्श शोधू लागले. बाबासाहेबांनी संतवाणीवर प्रेम केलं होतं. त्यांनी ज्ञानेश्वरांच्या शब्दलालित्याबद्दल गौरवोद्गार काढले तर संत तुकारामांची वचनं आपल्या भाषणात आणि लिखाणात ते उद्घृत करू लागले. बाबासाहेबांना जातिविहीन समाज निर्माण करायचा होता. त्यामुळे आपल्या एकेकाळच्या महार जातीत त्यांना आपल्या समाजाला बंदिस्त करायचं नव्हतं. याचा अर्थ ते वा त्यांचा समाज चोखोबांचं योगदान मान्य करीत नाही, असं नाही.

0 Shares
त्याचे आता काय? लाज येईल तुमच्या नावा