त्याचे आता काय?

इलिनार झेलियट

चोखामेळा संत भला तेणे देव भुलविला, अशी चोखोबाची महती संत जनाबाईनं सांगितली आहे. पण काळ बदलला. पिढ्यानपिढ्या अस्पृश्यतेच्या अंधारात चाचपडणार्यात दलित समाजाला डॉ. आंबेडकरांनी मुक्तीचा, आत्मोद्धाराचा प्रकाश दाखविला. बौद्ध धर्म स्वीकारलेल्या दलितांनी परंपरेच्या जोखडांमध्ये राहून जोहार घालणारा चोखोबा प्रतीक म्हणून नाकारला. त्यामुळे असेल चोखामेळा संत भला, त्याचं आता काय, असा सवाल आंबेडकरी चळवळ करत आहे. अमेरिकेतील एक अभ्यासक एलिनॉर झेलियट यांनी संशोधनाच्या निमित्तानं तटस्थपणे या सामाजिक इतिहासाचा आढावा घेतला आहे. त्यांच्या ‘चोखामेळा अँड एकनाथ’ या लेखातील हा संपादित अंश.

चोखामेळा हे महाराष्ट्रातील अस्पृश्य समाजातील महत्त्वाचे असे एकमेव विठ्ठलभक्त होते. अस्पृश्यांसोबत जेवणार्याए आणि कीर्तन करणार्याल एकनाथांनी चोखामेळ्यावर एक काव्य केले आहे. त्यात ते म्हणतात, ‘चोखामेळा हा असा एक महार आहे की जो आध्यात्मिक बाबतीत समकालीन ब्राह्मणांपेक्षा जास्त जाणकार होता.’ चोखामेळा आणि एकनाथ दोघेही संत अस्पृश्यतेच्या संबंधांच्या बदलाबाबत आदर्श आहेत. चोखामेळा यांनी अस्पृश्य जातीतील असूनही भक्तगणांमध्ये एक उच्च आणि अढळ स्थान प्राप्त केले, तर एकनाथ हे पैठणमधील एका प्रतिष्ठित आणि विद्वान घराण्यातील असूनही आपल्या वर्तनातून दाखवून दिले की खरे भक्तगण हे समान पातळीवर असतात.

चोखामेळ्याच्या आयुष्याबद्दलच्या आख्यायिकांवरून आपल्याला एवढे कळते, की चोखामेळा आणि त्यांच्या कुटुंबियांनी परंपरेने महारांसाठी नेमलेली कामे विनातक्रार केली. त्यांची ही कामे सुरळीतपणे पार पडण्यापुरतीच ईश्वुरी कृपा मध्यस्थी असे. मेलेले जनावर गावाबाहेर ओढून नेण्याच्या अतिशय तुच्छ समजल्या गेलेल्या अशा कामामध्ये विठ्ठलाने चोखामेळ्याला मदत केली. महारांच्या पारंपरिक मर्यादांना चोखामेळ्याने कोठेही विरोध केल्याचे आढळत नाही.

चोखोबाच्या उपलब्ध असलेल्या काही अभंगामध्ये अस्पृश्यतेला विरोध केल्याचे दिसते, परंतु त्यांच्या जास्तीतजास्त अभंगांतून पारंपरिक भक्ती आणि देवनिष्ठाच दिसून येते. चोखामेळ्याचे जे काही साहित्य लिखित स्वरूपात उपलब्ध आहे त्यावर मी काम केले आहे. त्यांच्या अभंगांपैकी दोनशे अकरा अभंग खचितच संशयास्पद वाटतात. कारण त्यामध्ये काही इतर संतांचीही नावे आलेली आहेत. हे गोळा केलेले साहित्य प्रसिद्धीसाठी संकलित केल्यासारखे वाटते. पंढरपूर येथे असणार्याी हस्तलिखितांमध्ये या स्वतंत्र विद्वत्तापूर्ण कामाचा काहीच भक्कम पुरावा आढळत नाही. मला असे वाटते की, जरी या साहित्याची भाषा अपभ्रंश स्वरूपाची झाली असली तरी तिचे अस्सलपण या अभंगांमधून जाणवते.

अस्पृश्यतेचा संदर्भ आलेल्या अभंगांतून आपल्याला असे दिसते, की चोखामेळ्याचा, त्याच्या समाजातील कनिष्ठ स्थानामुळे फारच छळ होत होता. त्यामुळे त्याच्या अभंगांमध्ये चोखामेळा हा छळ निमूटपणे स्वीकारतो, तर कधी त्याला विरोधही करतो. धांव घाली विठू आता चालू नको मंद… या प्रसिद्ध अभंगामध्ये चोखामेळा देवाकडे लोचटपणाने मागण्यापेक्षा आपल्या महारपणाचा वापर करून आपली देवावरील भक्तीच बळकट करतात. त्याच वेळेस ते आपल्या परंपरा, आपली कामे आणि आपली भक्ती याची एक गुंफण करतात. तर टाळी वाजवावी गुढी उभारावी… या अभंगात चोखामेळा दवंडी पिटवण्याचे महारांचे परंपरागत काम करुन सर्वांना पंढरीच्या वारीला चलण्यास सांगतात. तसंच जोहाराच्या अभंगांमध्ये त्यावेळच्या रुढीप्रमाणे महारांना मिळणार्याा उष्ट्या अन्नाचा परंपरागत वापर चोखामेळ्याने विठ्ठलभक्तीसाठी वापरला आहे. महारांनी वरिष्ठ जातींसाठी आदर व्यक्त करावयाचे ‘जोहार’ संबोधन ते विठ्ठलाला उद्देशून लिहिलेल्या अभंगांमध्ये आपला आदरभाव प्रकट करण्यासाठी वापरतात. येथे विठ्ठलाला चोखामेळ्याने आपले मायबाप असे संबोधलेले आहे.

मलीनतेसंबंधी चोखोबांनी लिहिलेल्या अभंगाशी विरोधाभास दाखविणार्याी अभंगामध्ये चोखामेळा आपल्या या जन्मातील नीच कुलातील जन्माचा, पूर्वजन्मातील दुष्कृत्यांचे ते फळ आहे, असे मानून, स्वीकार करतो. स्वतःला इतरांच्या नजरेत अत्यंत क्षुद्र मानून चोखामेळ्याने तडजोड केली आहे. असा हीन की ज्याला शूद्राशिवाय काहीही लेखलं जाणार नाही. पण त्याबरोबरच त्याने स्वत:ला विठ्ठलाचा परमप्रिय मानलेले आहे. ऊस डोंगा परी… या प्रसिद्ध अभंगात चोखामेळ्याने आपल्या शरीराच्या किंवा जातीच्या उणिवांबाबत एक सार्वत्रिक अशी संकल्पना मांडली की, जे काही कुरूप, बेडौल, बाह्य दर्शनी न स्वीकारता येण्यासारखे असेल, ते सुद्धा पवित्र असते. इरावती कर्वे यांनी आपले पंढरपूरच्या वारीचे अनुभव सांगताना म्हटले आहे की, वारीमधील ब्राह्मण वारकरीही वाट चालताना अस्पृश्य भक्त चोखामेळ्याचे अभंग म्हणतात.

चोखामेळ्याने जरी सामाजिक परिस्थितीचा निषेध केला असला किंवा त्यावर प्रहार केला असला तरीही त्याच्या वाट्याला आलेली महाराची भूमिका त्याने सामाजिक रुढींच्या मर्यादेतच राहून केलेली आहे. आयुष्यात अनेक हालअपेष्टा सोसूनही ‘परमेश्वआराच्या भक्तीचा आनंद’ हाच आशय चोखामेळ्याच्या जवळपास सर्वच अभंगांतून आढळतो. त्यामध्ये व्यथा असली तरी त्यातील मध्यवर्ती संदेश हाच आहे की, चोखा जरी जन्माने महार होता तरीही त्याला ईश्वारी कृपेचा लाभ झाला होता.

चोखोबांनंतरच्या काळात महारांनी सामाजिक न्याय मिळविण्याबाबत काहीच आवाज उठवलेला दिसून येत नाही. ते काम उच्चवर्णीय संतांनीच केलेले दिसते. परंतु तत्कालीन धार्मिक जीवन आणि त्यातून प्राप्त केलेले श्रेष्ठत्व दाखविण्यासाठी चोखामेळ्याच्या नावाचा उपयोग केलेला दिसतो. मुसलमांनी राजवटीच्या काळात चोखामेळा आणि काही इतर महान व्यक्ती सोडल्यास महारांना त्यांचे असे सामाजिक प्रस्थापित मूल्य काहीच नव्हते. महारांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी झटलेल्यांमध्ये चोखामेळ्याचेच नाव येते. पुण्यामध्ये १९१२ ते १९३३पर्यंत महारांसाठी चालवल्या गेलेल्या रात्रशाळेला ‘चोखामेळा विद्यावर्धन मंडळ’, असे संबोधण्यात येत होते. १९२४ साली नागपूर मध्ये जी. ए. गवई या शिक्षित महाराने सुरू केलेल्या वसतिगृहाला ‘चोखा मेळा वसतीगृह’, असे नाव दिले होते. १९२०च्या सुरुवातीला विदर्भामध्ये ‘चोखामेळा सुधारणा संघटना’ स्थापन झाली होती. या संघटनेतर्फे अशा देवळांची मागणी केली गेली होती की, जी सर्वांसाठी खुली असतील.

महारांनी केलेल्या सत्याग्रहावरील पोवाड्यानुसार १९२६ साली अस्पृश्यांनी पवित्र समजल्या जाणार्यान पर्वतीच्या टेकडीवर चढण्याचा प्रयत्न केला. ही टेकडी चढत असताना ते ‘हर हर महादेव’ बरोबरच शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर आणि चोखामेळा यांच्या नावांचा जयघोष करत होते. विदर्भातील पूर्वीच्या काळातील महारांचे सुप्रसिद्ध नेते किसन फागूजी बनसोड यांच्या १९२० ते १९३० या काळात केलेल्या कामामुळे महारांना धार्मिक हक्क मिळण्यावर भर दिला गेला. वास्तविक महाराष्ट्रातील या भागाला भक्ति चळवळीचा काही खास असा इतिहास नाही. तरीही बनसोड स्वतः पंढरपूरच्या यात्रेला गेले. त्यांनी चोखामेळ्याचे अभंग गोळा केले. चोखामेळ्याच्या आयुष्यावर एक नाटक लिहिले. तसेच महार लोकांमध्ये धैर्याचा संचार करविण्यासाठी चोखामेळ्यांच्या प्रतिमेबद्दल कविताही लिहिली.

दलितांचे नेते म्हणून डॉ. आंबेडकरांचा उदय झाल्यानंतर चोखामेळ्याच्या नावाचे महत्त्व थोडे कमी झाले. पाश्चाळत्यांच्या आधुनिक शिक्षणपद्धतीप्रमाणे शिक्षण घेतल्यामुळे डॉ. आंबेडकरांना सुरुवातीपासूनच पारंपरिक धार्मिक मार्गांनी होणार्याु सुधारणांपेक्षा राजकीय मार्गांनी महारांची प्रगती जास्त परिणामकारक होईल याविषयी खात्री होती. त्यांनी १९२० साली सुरू केलेल्या ‘मूकनायक’ या पहिल्या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी तुकारामांचा एक अभंग समाविष्ट केला होता. त्यामध्ये तुकारामांनी आठवण करून दिली आहे, की जो लाजाळू, मुका, बुजरा असा असतो त्याची दखल घेतली जात नाही. आंबेडकरांनी प्रसंगानुरूप तुकाराम किंवा ज्ञानेश्वारांबाबत लिहिले, परंतु चोखामेळ्याच्या देवधर्मनिष्ठेचे महारांना उदाहरण दिल्याचे दिसत नाही. विशेषतः अशा काही विशिष्ट प्रसंगी की जेव्हा ते अस्पृश्यांना देवळात प्रवेश करण्यासाठी आवाहन करत होते, जानवे घालण्यास सांगत होते, वैदिक लग्नविधी करण्यासाठी सांगत होते, सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये भाग घेण्यास सांगत होते.

१९२९ साली गोदावरी काठी वसलेल्या त्र्यंबकेश्व र या पवित्र क्षेत्री झालेल्या मेळाव्याचे डॉ. आंबेडकरांनी अध्यक्षपद भूषविले होते. या मेळाव्यामध्ये चोखामेळ्याच्या नावाने मंदिर बांधण्याचा मुद्दा उपस्थित केला गेला. या मेळाव्याच्या शेवटी असे ठरले की अस्पृश्यतेचा कलंक धुवून काढण्यासाठी आपल्या शक्तीचा सदुपयोग करणे हेच चोखोमेळ्याचे खरे स्मारक होईल. १९३२ साली आंबेडकरांनी धार्मिक निष्ठांच्या फोलपणाविषयी तपशील देताना म्हटले, गळ्यात तुळशीमाळा घातल्याने तुमच्यावरचा सावकारी पाश काही सुटणार नाही. रामनाम घेतल्याने जमीनदारांची भाडी कमी होणार नाहीत. दरवर्षी पंढरीची वारी केली म्हणून कुणी तुम्हाला दर महिन्याच्या शेवटी पगार देणार नाही.

आंबेडकरांच्या घरातील लोक कबीर आणि रामानंदांचे अनुयायी होते. परंतु त्यांच्या पत्नीने आयुष्यभर पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती केली. खरेतर तिला पंढरपूरची वारी करावयाची होती, परंतु आंबेडकरांनी तिला तसे करू दिले नाही. कारण त्यांची अशी ठाम खात्री होती, की पंढरपूरला जाऊनही तिला विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करू दिला जाणार नाही. तिला फक्त देवळाच्या पायरीशी असलेल्या चोखामेळ्याच्या समाधीपर्यंतच जाऊ दिले जाईल. आंबेडकरांचे चरित्र लिहिणार्यााने असे लिहिले आहे की, आंबेडकरांनी आपल्या पत्नीची पुढील शब्दांत समजूत घातली, अशा पंढरपुराचं काय करायचं जे आपल्याला देवाच्या मूर्तीचा चेहराही पाहू देत नाही. आपल्या सद्गुणी जीवनाने, नि:स्वार्थी सेवेने आणि शुद्ध त्यागाने आपण शोषितांसाठी झटू आणि त्यातून आपण आपले दुसरे पंढरपूर निर्माण करू.

१९३६ साली, हिंदुधर्माचा त्याग करून दुसर्याी धर्मात प्रवेश करण्यासाठी अस्पृश्यांची परिषद बोलावली होती. त्या परिषदेत भाषण करताना आंबेडकर श्रोत्यांना म्हणाले, तुमची जात कोणती असं तुम्हाला कुणी विचारलं, की तुम्ही चोखामेळा किंवा हरिजन असं सांगता. तुम्ही महार असं सांगत नाही. गरज नसेल तर कुणीही असं आपलं नाव बदलत नाही. पण चोखामेळा किंवा हरिजन असं नाव स्वीकारण्यात काहीच अर्थ नाही. त्या जुन्या नावाचा दुर्गंध नव्या नावालाही जोडून येईल. त्यामुळे तुम्हाला पुन्हा नवीन नाव बदलावे लागेल. त्यापेक्षा मग ही ओळखच कायमस्वरूपी का सोडत नाही?

महारांच्या या स्थितीत तोपर्यंत काहीच कायमस्वरूपी बदल झाला नाही जोपर्यंत म्हणजे १९५६ साली आंबेडकरांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला आणि पाठोपाठ पुढल्याच महिन्यामध्ये जवळपास तीन लाख लोकांनीही धर्मांतर केले. असे धर्मांतर करणार्यांनमध्ये बहुतेक सर्व अस्पृश्यांचाच समावेश होता. महारांचा असा गट की जो एकजूट झाला होता, शिक्षणोत्सुक होता आणि ज्याला थोडेफार राजकीय स्वरूप प्राप्त झाले होते, अशांनी चोखामेळा किंवा भक्तीमार्ग अनुसरण्यापेक्षा बौद्धधर्म स्वीकारण्याची कारणे स्पष्ट आहेत. विसाव्या शतकात सुरू असलेल्या भक्तीचळवळीमध्ये, संत गाडगे महाराजांचा अपवाद वगळता, कोणीही सामाजिक विरोधाचा किंवा सामाजिक सुधारणेचा प्रयत्न केला नाही.

तसे पाहता चोखामेळ्याने गावगाड्यानुसार ठरलेले आपले स्थान मान्य केले होते. तर विसाव्या शतकामधील महाराला त्याचे स्थान म्हणजे गुलामगिरी किंवा अस्पृश्यता या दोनच बाजू असणारी गोष्ट आहे हे कळून चुकल्यामुळे, त्यांना ते झुगारुन देण्याशिवाय दुसरा काही पर्यायच शिल्लक राहिला नव्हता. चोखामेळ्याने त्याचे समाजातील कनिष्ठ स्थान हे त्याच्या पूर्वजन्मातील पापकृत्यांचे फळ आहे ही संकल्पना मान्य केली होती, पण विसाव्या शतकातील महारांनी या तर्काचा विरोध केला. चोखामेळ्याला इतर भक्तांनी आणि देवाने जे बरोबरीचे स्थान दिले होते त्यातच आनंद वाटला, तर नव्या पिढीला राजकीय आणि सामाजिक बाबींमध्ये समानाधिकार हवे होते.

बौद्धधर्माच्या धर्मग्रंथानुसार जन्मापेक्षा माणसाच्या कर्माने आणि बुद्धीने योग्यता प्राप्त होण्याचे समर्थन केले आहे. तसेच आंबेडकरांनीही अस्पृश्यांच्या इतिहासाचे असे एक स्पष्टीकरण दिले की अस्पृश्य हे आधी बौद्ध धर्मीयच होते. हिंदुधर्माला जेव्हा पुन्हा महत्त्व प्राप्त झाले तेव्हा बौद्धधर्मीयांचे खच्चीकरण केले गेले. या स्पष्टीकरणामुळे अस्पृश्यांच्या भूतकाळाला एक झगमगते वलय प्राप्त झाले. त्यामुळे या लोकांशी आपणही लायक तसेच, सर्जनशील, निर्मितीक्षम आहोत या विचारांना बळकटी मिळाली.

हा बदल फारच वेगाने घडून आला, पण त्याची पार्श्व भूमी अतिशय चांगल्या रीतीने तयार करण्यात आली होती. १९५४ साली आंबेडकरांना पुण्याजवळील देहूरोड या छोट्या गावी आमंत्रित केले होते. तेथील अस्पृश्यांनी दारूगोळ्याच्या कोठारात व इतरत्रही कामे करून थोडाफार निधी उभारला होता आणि त्या निधीमधून त्यांना चोखामेळ्याच्या नावाने एक मंदिर उभारावयाचे होते. आंबेडकरांनी हे देऊळ बुद्धाच्या नावाने उभारावे या अटीवरच हे निमंत्रण स्वीकारले. आता चोखोमेळ्यापेक्षा आंबेडकरांच्या विचारसरणीला जास्त महत्त्व प्राप्त झाले होते. त्यामुळे त्यांची ही सूचना मान्य केली गेली. १९५४ साली २५ डिसेंबर नाताळच्या दिवशी डॉ. आंबेडकरांचे बुद्धप्रतिमा आणि बुद्ध भिक्षूंसह देहूरोड येथे आगमन झाले आणि देहूरोडचे हे देऊळ बौद्धधर्मियांसाठीची पहिली इमारत ठरली. त्यानंतर वर्षाच्या आतच जेव्हा लोक नागपूरला धर्मांतरासाठी जमले तेव्हा तेथील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये बातमी होती, ‘ते सारे दृश्य असे दिसत होते की जणू काही दुसरे पंढरपूरच अवतरले होते’.

चोखामेळ्याबाबत जरी अभिमान वाटत असला तरीही भक्तिपंथाबाबतीत शिक्षित बौद्धधर्मियांची रुची ही मुख्यतः पुस्तकीच होती ज्यामध्ये चोखामेळ्याचे अस्सल अभंग शोधणे, बौद्धधर्माचा भक्तिपंथाच्या विचारसरणीवर काय परिणाम झाला याचा शोध घेणे यांचा समावेश होता. दुसरीकडे महाराष्ट्रातील चर्मकारांनी आंबेडकरांच्या चळवळीत भाग घेतला नाही. उलट त्यांनी त्यांच्याच जातीतील परंतु हिंदीभाषिक संत रोहिदास यांनाच आपला पालनकर्ता संत म्हणून स्वीकारले. आता पंढरपूरच्या देवळाचे दरवाजे साने गुरुजींच्या उपोषणामुळे सर्वांसाठी खुले झाले आहेत. चोखामेळ्याच्या अस्थी ज्या ठिकाणी पुरल्या अशी ती देवळाची शेवटची पायरी आजही चोखामेळ्याच्या स्मारकाच्या रूपात तेथे आहे. आजही बौद्धधर्म न स्वीकारलेले काही हिंदू महार वारकरी आढळतात ज्यांची आपल्या भक्तिपंथावर अढळ श्रद्धा आहे. तरीही जातिव्यवस्था पाहू जाता असे म्हणता येणार नाही, की चोखामेळ्याचे आयुष्य, त्याचे विचार हे आजच्या लोकांसाठी आदर्श ठरतील. कारण समाजात जो काही बदल झाला आहे तो आपला ह्क्कच आहे, असे त्यांचे मत आहे.

आजही महाराष्ट्रातील भक्तिसंप्रदाय समाजातील बदलांवर जोर देत नाही. या मुद्द्यावर विशेष जोर दिला पाहिजे. जे वारकरी साधूवृत्तीने राहतात, तुळशीमाळ घालतात, वारीला जातात, अभक्ष्य खाणे, अपेयपान करणे वर्ज्य करतात. तेही कधी कोणत्या प्रकारच्या सामाजिक सुधारणांच्या मोहिमेमध्ये पुढाकार घेत नाहीत. शतकानुशतके संतांनी सांगितलेल्या समानतेत आणि परमेश्वसराच्या दृष्टीने समानतेत फरक करतात.

पंढरपूरच्या वारीसंबंधी लिहिलेल्या आपल्या निबंधात इरावती कर्वे अचंब्याने मांडतात, की भक्तांमधील समानतेचा उद्घोष करणारे अभंग, गाणी हे वारकरी जोरजोराने म्हणतात, पण त्याच वेळेस दिंडीतील जातीप्रमाणे केलेले गटही तितकेच जपतात. तरीही हेही तितकेच खरे आहे की भक्तीचळवळ आणि त्यासंबंधीचे साहित्य हे आजही विचारांचे भांडार आहे.

सध्या चोखामेळा आणि त्याच्या कुटुंबियांबाबतची लोकांची रुची कदाचित फक्त पुस्तकीच असेल. त्याचे परिणाम कदाचित चोखामेळा आणि त्याच्या कुटुंबियांच्या अभंगांच्या नवीन आवृत्ती निघण्यात होतात. कदाचित काही नाटके किंवा त्याच्या संबंधीच्या आख्यायिकांचा काव्यात वापर किंवा प्रबंधाचा विषय म्हणूनही. शेवटी असे म्हणता येईल की भूतकाळातील अस्पृश्यांच्या संस्कृतीचे चोखामेळा सरळसरळ आणि वैशिष्ट्यपूर्ण रीतीने प्रतिनिधित्व करतो. जरी चोखामेळ्याला या चढाओढीच्या जगात स्पर्धेत आदर्श म्हणून स्थान मिळत नसले तरीही चोखामेळा आजही भूतकाळातील एका सर्जनशील प्रतिमेच्या रूपात प्रेरणादायी बनून राहील.
(‘संत चोखामेळा : विविध दर्शन’ या पुस्तकातील वंदना कुंडेटवार यांनी केलेल्या भाषांतरातून संपादित)

0 Shares
चोखोबांचा काळ आम्ही चोखोबा का नाकारतो?