भेदाभेद भ्रम अमंगळ

प्रशांत जाधव

समतेचा संदेश देणार्या् वारकरी सांप्रदायात वादाची, टोकाची भूमिका टाळली जाते. समन्वयाचा मध्यम मार्ग स्वीकारला जातो. पालखी सोहळ्यात होणार्याध भेदाभेदाच्या विरोधात दलित दिंड्यांनी १९७७मध्ये आळंदीत आंदोलन केलं होतं. अनेकांना त्या आठवणीही नकोशा वाटतात. इतक्या दिवसांनंतरही माऊलींच्या पालखी सोहळ्यात काय परिस्थिती आहे, हे आम्ही जाणून घेतलं...

आळंदीत इंद्रायणी उधाणली होती. काठावर, घाटावर, देवळात, बाहेर एकच गजर, माऊली माऊली..!!! संत सोयराबाईंच्या शब्दांत सांगायचं तर, गर्जती नाचती आनंदे डोलती| सप्रेम फुंदती विठ्ठल नामें॥ असा अनुपम्य सुखसोहळा. माऊलींची पालखी देवळाबाहेर येण्याची वाट बघणार्याल वारकर्यांपचा उत्साह ओसांडत होता. भजनं, फुगड्यांचा खेळ रंगला होता. हा सोहळा संत ज्ञानेश्वारमाऊलींच्या प्रस्थानाचा. आषाढी वारीसाठी माऊली पंढरपूरला निघण्याचा. अचानक वातावरणात तणाव जाणवू लागला. काय झालं, काय झालं? विचारणारे टाचा, माना उंचावून बघू लागले. गडबड महाद्वाराकडून ऐकू येत होती. हळूहळू टाळ-मृदुंगाचे आवाज कमी होत गेले आणि घोषणांचे आवाज येऊ लागले. यापूर्वी कधीच घडला नाही, असा प्रकार. काही दिंड्यांनी चक्क महाद्वारासमोर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केलं होतं. हळूहळू लक्षात आलं, की या दिंड्या दलितांच्या आहेत. पालखी सोहळ्यात भेदभाव केला जातो. अस्पृश्यता पाळली जाते, असा आरोप करत समतेच्या या सोहळ्यात आम्हाला बरोबरीने सामावून घ्या, अशी मागणी या दिंड्या करत होत्या. वर्ष होतं, १९७७..

यंदाचा रिंगणचा अंक संत चोखामेळा यांच्यावरचा. त्यातील ‘रिपोर्ताज’साठी आळंदीत प्रवेश करताना आंदोलनाचं हे चित्र डोळ्यासमोर नाचत होतं. बर्याशच दिवसांपासून त्याबद्दल ऐकत होतो. त्याविषयी सविस्तर जाणून घ्यायचं होतं. पहिल्यांदा मंदिरात जाऊन माऊलींच्या समाधीवर डोकं टेकलं. काही क्षण डोक्यातला कल्लोळ शांत झाला. बाहेर आलो. प्रस्थानासाठीची तयारी सुरू होती. रथाची डागडुजी वगैरे. घडीभर महाद्वार न्याहाळलं. इंद्रायणीच्या घाटावर आलो. मला नदीपलिकडं जायचं होतं. किसनमहाराज साखरेंना भेटायचं होतं. ते या सगळ्या आंदोलनाचे साक्षीदार. कर्ते, करविते. त्यावर्षीच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख. तसं त्यांच्याबद्दल ऐकलंही बरंच होतं. भेटायला जायचं म्हणून त्यांची वेबसाईट पाहिली. त्यांच्या नावावर ५६ ग्रंथ होते. विद्वान मनुष्य. मित्र विलास काटेनं त्यांचा आश्रम दाखवला. इंद्रायणी काठापासून सुमारे ८०० मीटरवर. भव्य परिसर. समोर बगीचा. जुन्या पद्धतीची बैठी घरं. आम्ही गेलो तेव्हा त्यांचे शिष्य स्नान संध्या करीत होते. काही बसले होते. एकाला विचारलं, महाराज कुठं आहेत..? त्यानं बोटानं दाखवलं. मोठ्या सभामंडपातून चालत आम्ही महाराजांच्या मधल्या खोलीत गेलो. पांढराशुभ्र सदरा, धोतर, लांब पांढरे केस, पांढरी दाढी, महाराजांची नशशिखांत धवलमूर्ती वेताच्या खुर्चीवर बसून एकाग्रपणे टीव्हीवरच्या संध्याकाळच्या बातम्या पाहत होती. त्यांनी आमच्याकडं दुर्लक्ष केलं. एका शिष्यानं आम्हाला बसायला सांगितलं. अखेर बातम्या संपल्या. त्याबरोबर महाराजांची समाधीही सुटली. त्यांनी मोहरा आमच्याकडे वळवला. मी परिचयासाठी तोंड उघडणार तोच महाराजांनी हातावर पेढा ठेवला. म्हणाले, पहिल्यांदा तोंड गोड करा. म्हटलं, संत चोखोबांबद्दल विशेष अंक काढतो आहोत. महाराज सावध झाले. सावरून बसले. महाराज, संत चोखोबांचं संत परंपरेतील महत्त्व काय…विचारलं, त्यावर त्यांनी लगेचच चोखोबांचा ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा| काय भुललासी वरलीया रंगा॥ अभंग म्हणून दाखवला. मी पुढं विचारतो, महाराज, तुमचा ज्ञानदेवांच्या साहित्याचा गाढा अभ्यास आहे, त्यांनी चोखोबांबद्दल काही म्हटलं आहे काय? त्यावर ते म्हणाले, ब्रम्हदेवाने एकाच काळात सर्व समाजाचे संत निर्माण करण्याची किमया केली होती. संत ज्ञानेश्वरांचा आणि चोखोबांचा काळ एकच होता. पण त्यांनी असं काही म्हटलेलं नाही. गप्पांची गाडी रुळावर येते तसा मी हळूच विषय काढतो. महाराज, वारकरी संप्रदायात ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ मानला जातो. पण वारीत १९७७ साली काही वारकर्‍यांनी पालखी सोहळ्यात भेदाभेद होतो म्हणून आंदोलन केलं होतं म्हणे. त्यावर महाराज एकदम ‘एक्साईट’ झाले. हो ना, त्या बाबा आढावने तेव्हा रिक्षा आणि हमाल पंचायतीची माणसं आणून अख्खा पालखी सोहळा अडवून धरला होता. आमच्यावर माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानाची जबाबदारी होती. त्यामुळं आम्ही सामंजस्याची भूमिका बजावली. आम्ही जर जशास तसं उत्तर दिलं असतं तर बाबा आढावच्या माणसांचा भुगा झाला असता. आम्ही शांतपणे भजन करत होतो. ती मंडळी मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसली होती. खूप संघर्ष झाला. पण प्रस्थान उरकून माऊलींची पालखी आम्ही मुक्कामासाठी गांधीवाड्यात आणलीच. वाद कोर्टात गेला. आम्ही सांगितलं, आमच्यातील वाद आम्ही मिटवू, बाहेरच्या लोकांनी यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. प्रस्थानाच्या दुसर्या च दिवसापासून दलित दिंड्यांना त्यांना हवं तसं सोहळ्यात सामावून घेण्यात आलं.

ते होतं असं की, माऊलींच्या अश्वापुढे या दलित दिंड्या चालत असत. बाकीचा सोहळा मागे. त्यामुळं आम्ही सोहळ्यापासून तुटतो, असं त्यांचं म्हणणं होतं. मग या दिंड्या घोड्याच्या मागे घेतल्या. पण घोडे चालेनात. कारण त्यांना माणसं पुढं असण्याची सवय होती. दलित दिंड्या तर पुढे चालणार नाही, म्हणून हटूनच बसल्या होत्या. आम्ही मार्ग शोधू लागलो. सर्व दिंड्यांमधील थोडे थोडे वारकरी एकत्र करून घोड्यांपुढे चालण्यासाठी एक दिंडी करावी, असा एका प्रस्ताव आला. पण तो काही जुळेना. अनेकांनी अनेक आयडिया सुचवल्या. अखेर मी स्वतः भोई समाजाच्या गोविंद तारू या २५ वर्षाच्या पोराला पुढं केलं. त्याच्या भोई समाजाच्या दिंडीला २७ क्रमांक दिला. मग ती दिंडी घोड्यांच्या पुढे चालू लागली. सर्व काही सुरळीत झालं.

मी मग चर्चा वाढवत नेली. १९४५मध्ये साने गुरूजींनी दलितांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळवून दिला. १९७७ मध्ये दलित दिंड्यांना सोहळ्यात सामावून घेण्यात आलं. अर्थात या दोन्हींसाठीही आंदोलनं झाली. आता परिस्थिती बदलली आहे, असं वाटतं का? यावर साखरे महाराज म्हणाले, हे दोन्ही विषय वेगळे आहेत. आता तर विठ्ठलाची कोणीही पूजा करू शकतो. हे चुकीचं आहे. हा निर्णय घेणार्याी या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. त्यांची सत्ता जाईल, अशी शापवाणीच महाराजांनी उच्चारली. अहो, ईश्वराची पूजा कोणीही करून नाही चालत. त्या उपचारांमध्ये र्हेस्व दीर्घ उच्चारांचं महत्त्व आहे. फुलं वाहा, असं म्हणून चालत नाही, ‘पुष्पम् समर्पयामी’, असं म्हटल्यावर खरी पूजा होते. आपल्या म्हणण्याला आधार म्हणून साखरे महाराज लगेच तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देतात.

मंत्र चळे थोडा| तरि धड चि होय वेडा॥
व्रतें करितां सांग| तरी एक चुकतां भंग॥

मंत्राचा जप योग्य प्रकारे केला नाही, तरी त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे हे जे पाप सरकार करत आहे, त्याची शिक्षा त्यांना मिळणार हे नक्की.

मग एकूणच समाजात पाप वाढत असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. पाप वाढल्यानं निसर्ग आपल्यावर दया करणार नाही. पुन्हा तुकाराममहाराज त्यांच्या मदतीला आले.
पापाचिया मुळें| झालें सत्याचें वाटोळे॥
दोष झाले बळिवंत| नाही ऐसी झाली नीत॥
मेघ पडों भीती| पिकें सांडियली क्षिती॥
तुका म्हणे कांहीं| वेदा वीर्य शक्ती नाहीं॥

माणसांच्या वागण्याच्या काही रिती आहेत. सांगून ठेवलेलं काम ज्यानं त्यानं केलं नाही, माणूस वागायला विसरला तर निसर्गही अवकृपा करतो. मानव ऋत आणि ईश (ईश्वर) ऋत यांचा घनिष्ठ संबंध आहे. नैसर्गिक नीतीला ईश ऋत म्हणतात. ऋतु चक्र सुरू राहिलं तर उन्हाळ्यामागून पावसाळा येतो. पण तो मानवी व्यवहाराशीही जोडलेला असतो. सचोटी, सदाचार, प्रामाणिकपणा आणि विशेष करून वेदनीती यास सत्य किंवा मानव ऋत म्हणतात. मानवी आचरणातून वेदाची नीती गेली तर त्याचा परिणाम ईश ऋतावर होतो. मग आकाशात मेघ येतात पण पडायला घाबरतात. धरणी पिकं धरत नाहीत, असे अनिष्ट परिणाम जाणावतात. त्यामुळे ज्याला जे काम ठरवून दिलं आहे ते त्यानं योग्य प्रकारे करावं.

माझं डोकं गरगरू लागलं. पण मी चिकाटी सोडली नाही. महाराजांना काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. तरी ते नित्य नियमाने वारी करतात, पण ते पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला मंदिरात जात नाहीत, असं ऐकलं होतं. साने गुरुजींच्या सत्याग्रहानंतर दलितांना पंढरपूरच्या विठोबा मंदिरात प्रवेश मिळाला. त्यानंतर विठोबा बाटला म्हणून अनेकजण विठ्ठलाच्या दर्शनाला जात नव्हते. साखरेमहाराजही त्यापैकीच एक. त्याबद्दल ते म्हणाले, ‘वारी न चुकता करतो. माळशिरसपर्यंत पुण्यात येऊन-जाऊन वारी करतो. ठिकठिकाणी कीर्तनं होतात. मग माळशिरसपासून पुढं पंढरपुरात मुक्काम असतो.’ पंढरपुरात मुक्काम असताना दर्शन होते का? या प्रश्नावर साखरे महाराजांनी एवढ्या गर्दीत कुठं दर्शन घेणार, असा प्रतिप्रश्न केला. मग इतर वेळी दर्शन घेता का? या प्रश्नाावर त्यांनी थोडा वेळ घेत दीर्घ श्वादस घेतला आणि ‘घेतो’, असं हळूच म्हणाले. समाधान पावून मी महाराजांची रजा मागितली. निघताना महाराजांनी मला त्यांच्या कीर्तनमालेचा दुसरा भाग भेट म्हणून दिला. उभ्या उभ्या त्याची चार पानं उलटली तर त्याच्या प्रस्तावनेतच किसनमहाराजांनी ईश ऋत आणि मानव ऋत यावर प्रकाश टाकलेला दिसला. अंधार पडण्यापूर्वी आपण आपले निघावं म्हणून धन्यवाद म्हणून निघालो. पुन्हा त्या मोठ्या सभामंडपात आलो. तिथं महाराजांचे शिष्य आता हरिपाठ म्हणत होते. हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी…

मला आता माऊलींच्या दारात रिक्षा, हमाल पंचायतींची माणसं आणून साखरेमहाराज म्हणतात त्या दांडगाई करणार्याा बाबा आढावांना भेटायचं होतं. बाबांना भेटण्यासाठी पुण्यात गेलो, पण व्यग्र शेड्यूलमुळे ते भेटले नाहीत. फोनवर मात्र भेटले. भरपूर वेळ बोलले. ‘‘१९३५मध्ये तत्कालीन मुंबई सरकारनं पंढरपूर यात्रेसंदर्भात निर्णय घेतला होता. त्यात पालखी सोहळा समिती, पंढरपूर देवस्थान समिती यांना काही नियम घालून दिले होते. वारीत दिंड्यांनी कोणत्या क्रमाने चालायचं, यासाठी नंबर दिले होते. त्यानुसार या दिंड्या चालत होत्या. महार, मातंग आणि चांभार समाजाच्या दिंड्यांना मानाच्या घोड्याच्या पुढं चालवलं जायचं. घोड्याच्या मागं इतर समाज. त्यामुळं आपल्याला इथंही अस्पृश्यतेची वागणूक दिली जातेय, अशी या दिंड्यांमधील वारकर्यांेची भावना होती. शिवाय भाविक घोड्याचं दर्शन घ्यायला येत तेव्हा होणार्याव धक्काबुक्कीचा या दिंड्यांना त्रास व्हायचा. मग या दिंड्या पुढे जात. मुख्य सोहळा मागेच राही. प्रयत्न करूनही यात बदल होत नाही, म्हणून मग या दलित दिंड्यांपैकी हरळे वैष्णव दिंडी म्हणजे संत रोहिदास दिंडीच्या प्रमुखांनी आमच्याशी संपर्क साधला. देशाला स्वातंत्र्य मिळून ३० वर्षे झाली तरी समतेचा संदेश देणार्याद संतांच्या पालखी सोहळ्यात अस्पृश्यता पाळली जावी, याचं आम्हाला वैषम्य वाटलं. या देशात आता अस्पृश्यता चालणार नाही, म्हणत आम्ही हा प्रश्न लावून धरण्याचे ठरवले. त्यामुळे १९७७ला माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यावेळी हमाल पंचायत, रिक्षा संघटना आणि दलित समाजाच्या दिंड्यांनी माऊली मंदिरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचं ठरवलं. या संदर्भात आम्ही जिल्हाधिकार्यांोना पत्रही दिलं. दलित दिंड्यांना सोहळ्यात समाविष्ट करून घ्या, या मागणीसाठी सत्याग्रहाचं आयोजन केलं. अस्पृश्यता नष्ट व्हावी, हाच यामागचा उद्देश.

ठरल्याप्रमाणे ऐन प्रस्थानाच्या वेळी आम्ही महाद्वारात ठिय्या मांडला. दलितांचा मुख्य सोहळ्यात समावेश होणार नाही तोपर्यंत माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होऊ देणार नाही, असं बजावलं. खूप मोठा संघर्ष झाला. लाठ्या काठ्या चालल्या. मलाही डोळ्यावर फटका बसला. पण आम्ही त्याचं भांडवल केलं नाही. सायंकाळी साडेसातपर्यंत आमचा संघर्ष सुरू होता. अखेर तत्कालीन सरकारनं त्यावेळी निर्णय दिला आणि दुसर्या दिवसापासूनच दलित दिंड्या घोड्याच्या मागं चालायला लागल्या. या निर्णयाचं वारकरी आणि इतर जनतेकडून स्वागत झालं. त्यावेळचे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू दत्ता दाभोळकर यांनीही आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला. विद्यापीठाच्या वतीनं माऊलींच्या पालखीचं पुण्यात स्वागत करण्याची परंपरा आहे. पण पालखी सोहळ्यात अस्पृश्यता पाळली जात असल्याचं लक्षात येताच, पालखी सोहळ्याचं स्वागत करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका कुलगुरू दाभोळकर यांनी त्या साली घेतली होती.

नंतर कोर्टाची लढाई सुरू झाली. कोर्टानं स्पष्ट निकाल दिला की, वारीमध्ये अस्पृश्यता चालणार नाही. या लढ्याला त्यावेळी एस. एम. जोशी यांनीही पाठिंबा दिला होता. आळंदी संस्थानाची दहशत एवढी होती की, दलित बांधवांवर हल्ला होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही आळंदीपासून अगदी फलटणपर्यंत आमचे कार्यकर्ते सोबत ठेवले. या दिंड्यांची राहण्याची व्यवस्था केली.’’

बाबा पुढं म्हणाले, हा सर्व प्रकार काही सनातनी लोकांमुळे घडला. ते अजूनही जातीव्यवस्था मानतात. त्यांना संत चोखोबांबद्दल आदर नाही. ते संत गाडगेबाबांना मानत नाहीत. साने गुरूजींनी जेव्हा दलितांना मंदिर प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन केलं, त्यानंतर यातील काही सनातनी मंडळी विठोबा बाटला म्हणून मंदिरात प्रवेश करत नव्हती. आजही काही जण विठोबाचं दर्शन घेण्यासाठी जात नाहीत. ते माढ्याच्या विठोबा मंदिरात जातात. ही मंडळी या काळातही वंशभेद, जातीव्यवस्था, स्त्री-पुरूष असमानता, अस्पृश्यता काटेकोरपणे पाळतात. ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, अशीच वृत्ती या सनातनी लोकांची आहे. म्हणजे आम्ही पूर्वंपार तुम्हाला जसं वागवतो आहोत, तसंच तुम्ही वागलं पाहिजे आणि याबद्दल तुमच्या मनात समाधान असायला हवं, असा त्याचा अर्थ होतो. या विषयातील खाचाखोचा सांगत बाबा प्रदीर्घ बोलले.

दोन्ही बाजूंच्या प्रमुखांशी बोलल्यानंतर मला प्रत्यक्ष त्या आंदोलनात सहभागी झालेल्या वारकर्यांलशी बोलायचं होतं. ज्यांनी पहिल्यांदा हा बंडाचा झेंडा फडकावला, ते संत रोहिदास दिंडीचे प्रमुख पंढरीनाथ आबनावे. वय वर्षे ७२. आळंदी सत्याग्रहात आघाडीवर असणारे चर्मकार समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते. संत रोहिदास दिंडीला हरळे वैष्णव दिंडीही म्हणतात. वय झालेलं असलं तरी बाबांची स्मरणशक्ती तल्लख. संदर्भ आणि माणसांची नावं अगदी पाठ. म्हणाले, ‘‘७७च्या सत्याग्रहाची ठिणगी ही १९७६च्याच वारीत पडली होती. चांदोबाच्या लिंब येथे माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण होतं. त्यावेळी माऊलींचा रथ मध्यभागी, रथापुढं २६ दिंड्या आणि रथामागं मानाच्या दिंड्या ओळीनं रस्त्याच्या दुतर्फा उभ्या होत्या. या दिंड्या माऊलींच्या अश्वाला धाव घेण्यासाठी रस्त्यावर जागा मोकळी ठेवतात. यावेळी माऊलींचा अश्व रथापासून पुढे धावायला लागला. त्यावेळी तो २४ क्रमांकाच्या संत रोहिदास यांच्या दिंडीच्या अगोदरच रोखण्यात आला आणि पुन्हा रथाकडे वळविण्यात आला. ही चोपदाराची चूक होती. माऊली आमच्यापर्यंत आलेच नाहीत, असं आम्हाला वाटलं. पालखी सोहळ्यात दोन मानाचे अश्व असतात. एकावर स्वार बसलेला असतो. तर दुसरा अश्व रिकामा असतो. त्यावर प्रत्यक्ष माऊली विराजमान झालेले असतात, अशी वारकर्यांसमध्ये भावना आहे. वारीमध्ये माऊलींचा अश्वव समोरून धावत गेल्यास वारकर्यांभना कृतकृत्य वाटतं. रिंगणामध्ये अश्वांची फेरी त्यासाठीच असते. भाविक या अश्वांमच्या दर्शनासाठी गर्दी करतात. अश्वभ जिथून धावला तिथली माती कपाळाला लावतात. एवढ्यावरून या अश्वांवचं सोहळ्यातील महत्त्व लक्षात यावे. तर चांदोबाचा लिंब या ठिकाणी आमच्याशी मुद्दाम दुजाभाव केल्याचं आमचं मत झालं. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी संध्याकाळी समाज आरती असते. सगळा सोहळा आरतीसाठी एकत्र उभा राहतो. टाळ-मृदुंगाचा गजर थांबतो. त्यावेळी कोणाची काही तक्रार असेल तर त्या दिंडीतून टाळ वाजत राहतात. त्यावेळी संत रोहिदास दिंडी टाळ वाजवत राहिली. चोपदारांनी आम्हाला बोलावून घेतलं. आम्ही सांगितलं, उभ्या रिंगणाच्या वेळी माऊलींचा अश्व आमच्यापर्यंत आलाच नाही. त्यावेळी काही तरी सारवासारव करण्यात आली. काही निर्णयही झाला नाही. मग या प्रकरणाची वाच्यता वृत्तपत्रांनी केली. त्या सालची वारी अशी अस्वस्थतेत पार पडली.

पुढच्या वर्षी पुन्हा वारी आली. आम्ही ठरवलं, संत रोहिदास, संत चोखामेळा आणि संत अजामेळा या दलितांच्या दिंड्यांना अश्वाोपुढं चालत ठेवून मुद्दाम अस्पृश्यता पाळली जात आहे. त्याला यंदा विरोध करायचा. आम्ही मग आळंदीत सत्याग्रह करायचं ठरवलं. त्याबाबत तहसीलदारांना निवेदन दिलं. माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्यावेळी दलित दिंड्यांना मूळ प्रवाहात समाविष्ट करून घेण्यासाठी महाद्वारातच आंदोलन सुरू झालं. या आंदोलनात दलित समाजातील सर्व वारकरी, कष्टकर्यां चे नेते बाबा आढाव, पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू दत्ता दाभोळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष आगवणे, सातार्यादचे डॉ. नितीन लवंगारे, शि. धो. अबनावे (गुरूजी) सहभागी झाले. सत्याग्रहाचे सूत्रधार हणमंत गायकवाड आणि संत रोहिदास दिंडीचे अध्यक्ष रामचंद्र पांडुरंग पिंपुडकर होते. सर्वांनी बैठा सत्याग्रह केला. यावेळी सत्याग्रही आणि संस्थानाच्या प्रतिनिधींमध्ये संघर्ष झाला. संस्थानचे पदाधिकारी, इतर दिंड्या तसेच माऊलींचे अश्व आम्हाला तुडवून पुढं गेले. प्रस्थानसोहळा आटोपून पालखी मुक्कामासाठी गांधीवाड्यात नेली गेली. या संघर्षात काठ्या चालल्या. आमच्या अनेक सत्याग्रहींची डोकी फुटली.’’ संघर्ष करायचा म्हणजे याची तयारी ठेवावीच लागते, असं आबनावे मध्येच म्हणाले.

सत्याग्रहींनी आपली जागा सोडली नाही. त्यावेळी संध्याकाळी साडेसात वाजता तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आदेश की, हरिजनांच्या दिंड्यांच्या पुढेच माऊलींचा अश्व राहील. त्यावर संस्थानाचे सदस्य म्हणू लागले की, अश्वांगना माणसांची सवय आहे. टाळ आणि मृदुंगाच्या आवाजाशिवाय हे अश्वी पुढेच जात नाहीत. त्यामुळे भोई समाजाच्या दिंडीला घोड्यापुढे ठेवून पालखी सोहळा दुसर्या. दिवशी पंढरीकडे मार्गस्थ झाला. अर्थात प्रकरण तिथंच मिटलं नाही. या घटनेनंतर काहींनी हरिजन दिंड्यांवर सूड उगविण्याचा डाव आखला होता. पुणे ते सासवड प्रवासादरम्यान दिवे घाटात तीनही हरिजन दिंड्यामधील वारकर्यां ना मारहाण होईल, अशी खबर होती. त्यावेळी मी गृहमंत्र्यांना सांगून गुप्तचर पोलिसांच्या मदतीनं हरिजनांच्या तिन्ही दिंड्या आळंदी ते पंढरपूर सुखरूप नेण्याची व्यवस्था केली.

त्यानंतर सुमारे दोन वर्ष कोर्ट कचेर्याि सुरू होत्या. हरिजनांच्या दिंड्या घोड्याच्या पुढे चालतील, असं माऊलींच्या संस्थानाच्या घटनेत स्पष्ट म्हटलं होतं. ती बाब मी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. घटनेतील हाच मुद्दा अस्पृश्यता पाळण्यास भाग पाडतो, असं सांगितलं. त्यानंतर माननीय न्यायमूर्तींनी पालखी सोहळ्यात समता असावी, कुठंही भेदाभेद होऊ नये यासाठी माऊलींचे अश्वी हरिजनांच्या दिंड्याच्या पुढं असावेत, असा निर्णय दिला. १९७९ मध्ये दलित दिंड्यांच्या बाजूने हा निकाल लागला. ही घटना काही छोटी नव्हती.

आबनावेंचं सांगणं संपलं नव्हतं. ते पुढं म्हणाले, हे झालं दिंडीत चालण्याबाबत. इतरही अनेक प्रकार होते. दलित दिंड्यांमधील कीर्तनकारांना सोहळ्यातील कीर्तन फडावर कीर्तनाचा अधिकार नव्हता. त्यासाठी कारण सागितलं जात होतं, की दलित समाजात एकही चांगला कीर्तनकार नाही. मग यासाठीही संघर्ष करावा लागला. अर्थात हालचाल होण्यास सुरुवात झाली. आळंदी सत्याग्रहानंतर माझी माऊली दिंडी समाज कमिटीवर हरिजनांचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक झाली. हरिजन समाजाला माऊलींच्या सोहळ्यातील फडावर कीर्तनसेवा मिळावी, अशी मागणी करण्यात आली. यासाठीही संघर्ष करावा लागला आणि कीर्तन सेवा आम्ही मिळवली. त्या वर्षी विवेकानंद वासकर हे प्रमुख होते. त्यांनी फक्त एकदाच जेजुरी मुक्कामी हरिजनांच्या दिंडीला कीर्तन सेवेची संधी दिली. ती काही आजतागायत पुन्हा मिळालेली नाही.

त्या काळातच किसनमहाराज साखरे दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष होते. दलितांनी मंदिरप्रवेश करून विठोबा बाटवला म्हणून पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेत नव्हते. माढ्याच्या विठोबाचं दर्शन घ्यायचे. त्यावेळी मी नुकताच दिंडी समाज कमिटीवर सदस्य म्हणून आलो होतो. आपला अध्यक्षच पांडुरंगाचं दर्शन घेत नाही, तर त्याला अध्यक्षपदी का ठेवावे, असा ठराव मी मांडला. त्यानंतर साखरे महाराज यांना रितसर नारळ देण्यात आला.

याच दरम्यान वारकरी शिक्षण संस्थेत शिकणार्या हरिजनांच्या काही विद्यार्थ्यांना अस्पृश्यतेची वागणूक दिली जात असल्याचं समोर आले. तिथं सवर्ण विद्यार्थी व्यासपीठाजवळ कीर्तन करायचे. पण हरिजन विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी चपला-बूट ठेवले जायचे तिथं उभं राहून कीर्तनसेवा करावी लागायची. हा जातीभेद अगदीच स्पष्ट होता. हे समाजाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पत्रकार, लेखक अनिल अवचट यांना आम्ही निवेदन दिलं. त्यानंतर अवचटांनी पत्रकार परिषद घेऊन ही बाब जगासमोर आणली.

त्यानंतरची महत्त्वाची दिंडी मातंग समाजाची. अजामेळा दिंडी क्रमांक २६. दिंडीप्रमुख निवृत्तीबुवा गायकवाड. गेली ६३ वर्ष दिंडीची धुरा सांभाळतायत. ते सांगतात, त्यांच्या घरात किमान चार पिढ्यांचा पंढरपूर वारीचा वारसा आहे. वडील कीर्तनकार तुकारामबुवाही पंढरीच्या वाटेवर समाजाचे नेतृत्व करायचे. ते सोबत घोडं घेऊन यायचे. त्यांच्या घोड्यावर वारकरी पडशा ठेवायचे. तुकाराम महाराजांची गाथा आणि इतर संतांचे अभंग त्यांचे मुखोद्गत होते. चालता चालता कुणी अभंग म्हणताना चुकला की, लगेच दुरुस्त करायचे.

आंदोलनाच्या वेळी आणि त्यानंतरची परिस्थिती सांगताना ते म्हणाले, माऊलींचा मुख्य सोहळा असायचा घोड्यांच्या मागं. तीन दिंड्या सोहळ्याहून वेगळ्या म्हणजे घोड्यांच्या पुढं चालायच्या. वाटेवरच्या भाविकांच्या दर्शनासाठी वगैरे घोडे थांबायचे. आमच्या दिंड्या मात्र भजन म्हणत पुढे गेलेल्या असायच्या. त्यांची कुणीही चौकशी करायचं नाही. जमेतच धरायचं नाही. समाज आरतीच्या वेळीही सर्व सोहळ्यातून या दिंड्यांना बाहेर काढलं जायचं. उभं राहायला जागा होत नाही, असं कारण त्यासाठी सांगितलं जायचं. आंदोलनानंतर परिस्थिती बदलली. आता आम्ही समाजआरतीला अगदी माऊलींच्या तंबूजवळ उभं राहतो. आळंदीत प्रस्थानाच्या वेळी तर माऊलींच्या मंदिरात प्रवेशच दिला जात नव्हता. या तीनही दिंड्या महाद्वारातील घंटेजवळ उभ्या राहायच्या.१९७७पर्यंत हीच परिस्थिती होती. ७७च्या आळंदीतील आंदोलनाला बाबामहाराज सातारकर आणि आळंदीचे सदानंद गुरुजी यांचाही पाठिंबा होता. सदानंद गुरुजी तर म्हणायचे, ‘घ्या ठाम भूमिका. मला एक तरी वारकरी आळंदीतून बेड्या घालून नेलेला पाहू द्या…’ परिणामी सदानंद गुरुजींना पुढं प्रत्येक गोष्टीत टाळलं गेलं. म्हणजे उदाहणार्थ ते कीर्तनात चाली म्हणायला असायचे. पुढं पुढं ते त्यातून दिसेनासे झाले. या आंदोलनानंतरची साखरेबुवांची एक आठवण आहे. त्यावेळी ते पालखीसोहळ्याचे अध्यक्ष होते. वेळापूरच्या पुढं ठाकुरबुवांच्या गोल रिंगणाची बांधणी सुरू होती. रिंगण बांधताना चोपदार रिंगणात फूट पडू देत नाहीत. दिंडीला दिंडी अगदी चिकटून असते. तिथं शेताच्या कडेला उंच बांध होता. त्या धांदलीत काही दिंड्या बांधाच्या खाली उतरल्या. त्यात आमच्याही दिंड्या होत्या. त्यावेळी आम्हाला सोडून बाकीच्या दिंड्यांनी आतून वेढा धरला. त्यांचंच रिंगण पार पडलं. पुढं शेगावला गेल्यावर साखरेबुवांनी सकाळी आम्हा तीनही दिंड्यांच्या प्रमुखांना बोलावून घेतलं. तुमच्यामुळं रिंगणाचा घोटाळा झाला, असा आमच्यावरच आरोप केला. आम्ही वस्तूस्थिती सांगत होतो. ते मात्र ऐकत नव्हते. शेवटी ‘सध्या तुमचा चष्मा आमच्याविषयी काळा झाला आहे’, असं मी त्यांना सुनावलं. खरं तर आमचं चोपदारांना, सोहळ्याला मोठं सहकार्य असायचं, आहे. एकदा वाखरीच्या उभ्या रिंगणाच्या वेळी गोंधळ उडाला. पीएसआय नवखा होता. त्याला ते समजलं नाही. तो वारकर्यां वरच उखडला. शब्दानं शब्द वाढला. माऊलींचे चोपदार त्याच्यावर हातातला चांदीचा चोप घेऊनच धावले. मी त्यांना आवरलं. पीएसआयला रिंगणाची पद्धत सांगितली. ‘ते झेंडे आणि हे झेंडे एकत्र आल्याशिवाय रिंगण पूर्ण होणार नाही’, हे त्याच्या लक्षात आणून दिलं. घोड्यांच्या दर्शनाच्यावेळीही मोठी गर्दी उसळायची. त्यावेळीही आम्ही अशीच मदत करायचो. पण आंदोलनानंतर काही काळ कारभार्यांआच्या वागणुकीत फरक पडला. अर्थात साखरेबुवासारख्यांचा आमच्याविषयीचा दृष्टीकोन पूर्वीही काही फार उदार नव्हता. ७० साली आमच्या धर्मशाळेत विठ्ठल-रुक्मिणीच्या नव्या मूर्ती बसवल्या. त्यानिमित्तानं आयोजित सप्ताहाचं हँडबील द्यायला त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी उंबर्या च्या आतही येऊ दिलं नाही. हँडबील बाहेरच उंबर्याीवर ठेवा म्हणाले. बोललेही नाहीत. या आंदोलनानं मात्र अशा प्रवृत्तींना चांगलाच टोला दिला. अर्थात अजूनही राजकारण सुरूच आहे. दिंडीत दुफळी निर्माण व्हावी यासाठी मुद्दाम एकाचीच बाजू घेतली जातेय. आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जातंय. गैरसुविधांना तोंड देत आम्ही वारीची वाट चालतोच आहोत. त्यात खंड पडणार नाही.

दलितांच्या दिंड्यांपैकी तिसरी दिंडी म्हणजे, महार समाजाची संत चोखामेळा दिंडी. ही दिंडी विशेष महत्त्वाची. कारण महार समाजानं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हिंदू धर्मच नाकारून बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे पालखीच्या धार्मिक सोहळ्यात सहभागी होणारा समाज द्वीधा मनस्थितीत सापडला. धर्मांतरानंतर पुलाखालून बरचसं पाणी वाहून गेलं असलं तरी चोखोबांची दिंडी अजून पंढरीला जाते. या दिंडीचे प्रमुख एकनाथ कामाजी सावंत यांचं याच वर्षी निधन झालं. त्यांचे दोन पुतणे संजय आणि बापूराव सावंत सध्या ही दिंडी चालवतात. संजय सावंत शिक्षक असल्याने ते पूर्ण वेळ वारीत सहभागी होत नाहीत. पण त्यांचे बंधू बापूराव सावंत आळंदी ते पंढरपूरपर्यंत चुलते एकनाथ सावंतांसोबत अनेक वर्षांपासून जात होते. आज बापूराव एकटेच जात आहेत. या दोघा भावांना ७७चा इतिहास सांगता येत नाही, पण त्यांनी सध्याच्या स्थितीवर प्रकाश टाकला.

महार समाज हा बहुतांश आंबेडकरी चळवळीशी जोडला गेला आहे. संत चोखामेळा यांचं महात्म्य महार समाजाच्या पुढील पिढीपर्यंत पोहचलं नाही. पण माऊलींची पालखी सुरू होऊन १८४ वर्ष झाली, तेव्हापासून हा समाज वारीत सहभागी होतो आहे. या समाजाला अजूनही पूर्णपणे स्वीकारलं गेलं नसल्याची खंत संजय सावंत बोलून दाखवतात. ते म्हणाले, गेल्या महिन्यात १९ तारखेला माझे चुलते एकनाथ कामाजी सावंत यांच्या गोड जेवणाचा कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमात सकाळी प्रल्हाद दैठणकरांचं कीर्तन होतं. त्यावेळी कीर्तनात ते ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ या अनुषंगानंचं बोलत होते. वारकरी संप्रदायात माळ घातली, की तो कोणत्याही जातीचा असला तरी त्याला भेदभाव केला जात नाही. पण मला त्यांचं हे बोलणं वरवरचं वाटलं. आम्ही या सोहळ्यात वावरत असलो तरी आम्ही मागसवर्गीयच आहोत, असा दैठणकर महाराजांचा दृष्टिकोन मला या बोलण्यातून जाणवला. त्यानंतर इंदुरीकर महाराजांचं कीर्तन झालं. तेही म्हणाले, ‘गळ्यावर सुरी येईपर्यंत वारकरी पताका सोडू नका, तशी शपथ घ्या.’ त्यातून त्यांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजला. आम्ही महार समाजाचे आहोत, आम्ही बौद्ध बनू, अशी शंका त्यांना वाटत असावी. पण आमच्या चुलत्यांची ही परंपरा आहे, ती आम्ही चालवणार, असा निश्चलयही संजय सावंत यांनी बोलून दाखवला.

वारीतील परिस्थिती अजूनही फार बदलली असं सावंतांना वाटत नाही. ते म्हणाले, पुण्याचा मुक्काम सोडला तर आजही वारीच्या काळात आमचा मुक्काम आंबेडकर वस्ती किंवा दलित वस्तीतच असतो. आता या ठिकाणीही आम्ही उपरे होऊ लागलो आहोत. माझ्या चुलत्यांना ओळखणारे, त्यांना मान देणारे जुने लोक आता या वस्त्यांमध्ये राहिले नाहीत. त्यांची आंबेडकरी विचारांची पुढची पिढी याबाबतीत तत्परता दाखवत नाहीत. केवळ वडिलांनी सांगून ठेवलं आहे, म्हणून ते कसंबसं स्वागत करतात.

चोखोबांचे अभंग, त्यांचे विचार व्यवस्थित प्रकाशित होण्याची गरज आहे. चोखोबांच्या ओव्या, अभंग, गाथा प्रकाशित करून त्याचा प्रचार आणि प्रसार करावा, अशी माझ्या चुलत्यांची इच्छा होती. आता इतर कोणी करो अगर न करो, आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. मी आणि माझ्या भावानं चोखोबा कुटुंबाच्या अभंगांचा संग्रह सुरू केला आहे. हा संग्रह पूर्ण झाल्यावर पंढरपूर किंवा परळी नाही तर आळंदीत त्याचा प्रकाशन सोहळा करण्याचा मानस आहे. दलित समाज बौद्ध झाला मग चोखोबा आपोआपच बाजूला पडले. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, नामदेव महाराज आदी संताची पताका त्यांच्या समाजानं पुढे नेली. चोखोबा मात्र त्याबाबत दुर्दैवी ठरले. पण सर्वांना सोबत घेऊन जाणारे चोखोबा आजच्या समाजाला हवे आहेत, असे विचार सावंत यांनी बोलून दाखवले.

दलित दिंड्यांच्या वारीत चालण्याचा जो प्रश्न निर्माण झाला होता तो दिंड्यांच्या शिस्तीशी, व्यवस्थापनाशीदेखील संबंधित होता. या पालखी सोहळ्याच्या शिस्त आणि व्यवस्थापनाचं सर्वत्र मोठं कौतुक होतं. त्याची मोठी जबाबदारी असते, चोपदारांवर. म्हणून त्याबाबत राजाभाऊ चोपदार यांच्याशी चर्चा केली. राजाभाऊ म्हणाले, ‘काळाच्या ओघात दलित समाजात जागृती झाली. हा समाज मुख्य प्रवाहात येऊ लागला. साहजिकच वारी सोहळ्यातही त्याचे पडसाद उमटले. मागणीप्रमाणे त्यांच्या दिंड्या घोड्याच्या मागे ठेवण्यात आल्या. पण अशा प्रकारचे जे काही निर्णय असतील, ते वारकरी संप्रदाय घेईल. बाहेरच्या व्यक्तींनी यात लुडबूड करू नये. सहा वर्षांपूर्वीही माऊलींच्या सोहळ्यात तुकारामांच्या आरतीसाठी संभाजी ब्रिगेडनं हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आम्ही असा निर्णय घेतला की, इतरांनी आमच्या संप्रदायाच्या विषयात पडू नये.’

‘वारीत आता भेदाभेदाची परिस्थिती राहिलेली नाही. सध्या ब्राह्मणांच्या दिंड्यांमध्ये दलित समाजाचे लोकही पाहायला मिळतात. समता, एकात्मता, बंधुता या संतांच्या शिकवणीवर आम्ही आमची वाटचाल करत आहोत. चोखोबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या वर्षी चोखोबांच्या पुण्यतिथीला मंगळवेढ्याला जाऊन संत ज्ञानेश्वर माऊली संस्थानचे पदाधिकारी, महाराष्ट्रातील विविध पालखी सोहळ्याच्या प्रमुखांनी चोखोबांची पुण्यतिथी साजरी केली होती. संत चोखोबांसाठी सर्व मंडळी जमल्याचा आनंद मंदिर पदाधिकार्यां ना झाला. त्यावेळी आम्ही ठरवलं, दरवर्षी चोखोबांच्या पुण्यतिथीला मंगळवेढ्याला जायचं. यंदा काही जमलं नाही, म्हणून आम्ही थांबलो नाही. वारकरी सेवा संघातर्फे माऊलींच्या मंदिरात गेल्या १९ मे २०१४ रोजी संत चोखोबांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. भजन, कीर्तन करण्यात आलं. चोखोबांच्या कार्याची ओळख व्हावी म्हणून आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनाही वारकरी साहित्य संमेलनाला आम्ही बोलावतो. पहिल्या वर्षी रामदास आठवले, दुसर्याल वर्षी प्रकाश आंबेडकर या संमेलनात सहभागी झाले होते’.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म| भेदाभेद भ्रम अमंगळ॥ असं संतांनी शेकडो वर्षांपूर्वी म्हणून ठेवलं आहे. काळाच्या ओघात हे भेद गळून पडलेत. पण अजूनही या जातीभेदरूपी इंगळीची फुणफुण जाणवते आहे. ती पूर्णपणे शांत व्हावी, हीच यानिमित्तानं माऊलींच्या चरणी प्रार्थना.

0 Shares
पंढरीच्या गाभाऱ्यात चोखोबाचा जोहार चोखोबा माझा गणपती