पंढरीच्या गाभाऱ्यात चोखोबाचा जोहार

नीलेश बने

चोखोबा पंढरपूरच्या महाद्वारात पांडुरंगाच्या दर्शनाची वाट पाहत आयुष्यभर उभे राहिले. पण आज काळाची चाकं फिरली आहेत. १९४७ मध्ये साने गुरुजींमुळे अस्पृश्य मानलं जाणार्यां ना मंदिरप्रवेश मिळाला. आता सुप्रीम कोर्टानं बडव्यांचं राज्य खालसा केलं आहे. एखादा कालचा अस्पृश्य थेट पुजारी होणंही आता फारसं दूर नाही. ७०० वर्षांपूर्वी चोखोबानं केलेला जोहार पंढरीच्या महाद्वारातून थेट गाभार्याोपर्यंत पोहचला आहे.

कोणत्याही वेळी पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी अर्धा एक तास तर सहज लागतो. आता देवळात जावं लागतं ते दर्शन मंडपातून म्हणजे रांग लावायच्या इमारतीतून. त्यामुळे नामदेव पायरी ओलांडावी लागत नाही. महाद्वारासमोरचा चोखोबा तर अनेकांच्या खिजगणतीतही नसतो. शेकड्यांमधले आठ-दहाजणच चोखोबांना पाया पडण्यासाठी जातात. त्यातही एखाद-दुसराच जण एखादं नाणं किंवा नोट पुढ्यात टाकतो. एकंदरीत काय, तर विठोबाच्या दारात चोखोबा आजही ‘लो प्रोफाइल’च.

अनेकांना पंढरपूरच्या देवळासमोर असलेल्या घुमटीतील हा कोणता देव आहे, हेदेखील नीटसं माहीत नसतं. बहुसंख्य हौशा नवशांना पंढरपूरची परंपरा ठाऊक नसते. बालाजीचं, सिद्धीविनायकाचं दर्शन घ्यावं तसं ते विठ्ठलाचं दर्शन घेतात. त्यांच्याकडून चोखोबांची समाधी म्हणजे काय याची माहिती असण्याची अपेक्षा का करावी? तरीही मिनिटागणिक एक-दोन डोकी चोखोबांसमोर टेकत असतात.

चोखोबांची ही समाधी त्यांचे गुरू असलेल्या संत नामदेवांनी बांधली, असं सांगितलं जातं. मंगळवेढ्याला गावकूसाची भिंत कोसळून झालेल्या चोखोबांच्या संशयास्पद मृत्यूनंतर नामदेवांनी त्यांच्या अस्थी पंढरपुरात आणल्या. त्याची विठ्ठलमंदिरासमोर समाधी बांधली. आजही दलितांचे अंत्यसंस्कार सवर्णांच्या स्मशानभूमीत करण्यावर वाद होत असल्याच्या बातम्या दिसतात. असं असताना सात-आठशे वर्षांपूर्वी हे मोठंच धाडस होतं. पण चोखोबांना आयुष्यभर आणि मेल्यानंतरही महाद्वाराबाहेरच राहावं लागलं, हेही खरंच. सुरुवातीला ही समाधी म्हणजे जमिनीत पुरलेला नुसता एक खुणेचा दगड होता. आजही चंद्रभागेच्या वाळवंटावर असे समाधीचे दगड कित्येक दिसतात. फलटणचे राजे मालोजीराजे निंबाळकर यांनी १९५४ मध्ये त्यावर घुमटी बांधून त्याला आजचं स्वरूप दिलं. या जीर्णोद्धारासंदर्भातील शिलालेख चोखोबांच्या समाधीपाठी दिसतो. दगडू भोसले यांनी त्याच्याभोवती लोखंडी कुंपण घातलं आहे, तशी लादी तिथं लावलेली आहे. सणासुदीला या समाधीवर चोखोबांचा पितळी किंवा चांदीचा मुखवटा लावला जातो.

चोखोबांची ही समाधी महाद्वारासमोर असल्याचे पुरावे पेशवेकालीन दप्तरातही सापडतात. सवाई माधवरावांच्या काळातील एका पत्रात या समाधीचा उल्लेख असल्याचं पंढरपुराचे इतिहास अभ्यासक धनंजय रानडे यांनी सांगितलं. या पत्रात यात्रेच्या काळात होणारी गर्दी टाळण्यासाठी तत्कालिन अस्पृश्य जातीतील लोकांनी कसं वागावं याची माहिती आहे. त्यातून ही समाधी तेव्हापासूनच इथं होती हे स्पष्ट होतं.

पंढरपुरातच राहणारे सर्वगोड हे चोखाबांची वंशपरंपरा सांगतात. हेच सर्वगोड कुटुंब हे चोखोबांच्या समाधीच्या घुमटीतले परंपरागत पुजारी आहे. पूर्वी ज्याचा महारवाडा म्हणून हेटाळणीखोर उल्लेख व्हायचा, त्या आजच्या आंबेडकर नगरमध्ये या सर्वगोडांची घरं आहेत. तिथे जाताना एक रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता भेटला. ओळख वगैरे सांगितल्यावर त्याला म्हटलं की, चोखामेळा यांची आणि त्याच्या परंपरेची माहिती हवीय. त्याच्या चेहर्याेवर अनेक प्रश्नचिन्हं दिसली. सर्वात आधी त्यानं विचारलं, काय करणार माहिती घेऊन? लेख लिहायचाय म्हटल्यावर दुसरा प्रश्न, पॉझिटिव्ह लिहिणार की निगेटिव्ह? म्हटलं, ठरवून वाईट लिहिणार नाही. तरीही त्याच्या मनातले राजकीय गणितं शोधणारे प्रश्न संपलेले दिसत नव्हते. शेवटी तो मला म्हणाला, ‘चोखामेळा यांच्याबद्दल आमच्या तरुण पिढीला फार काही सांगता येणार नाही. पंढपुरात समाधी आहे आणि आमच्या नगरात एक चोखामेळा वसतीगृह आहे, एवढं माहितेय. पण नीट माहिती हवी असेल तर, आमच्यातली काही बुजुर्ग मंडळी आहेत. ती सांगू शकतील. मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकतो.’

बाईकवरून आमची स्वारी आंबेडकर नगरकडे निघाली. चोखामेळा यांच्या पंढरपुरातील आंबेडकर नगर बर्याखपैकी निळं दिसत होतं. एकीकडे निळे झेंडे, घरांवर लावलेल्या निळ्या टाइल्स, बुद्ध विहार. दुसरीकडे उर्दू भाषेत लिहिलेले दुकानांचे बोर्ड, गोल टोप्या अशा मुस्लिम वस्तीच्या खाणाखुणा. त्या मित्राला विचारलं तर म्हणाला, आता इथं सगळे एकत्र राहतात. बौद्ध आहेत, मुस्लिम आहेत आणि काही हिंदूही आहेत.

वाटेत एक कमान लागली. त्यावर लिहिलं होतं, संत गाडगे महाराज चोखामेळा वसतिगृह. दलितांच्या मुलांना शिकता यावं यासाठी गाडगेबाबांनी १९४४ मध्ये हे वसतिगृह बांधलं, असं सांगतात. ती मुळात धर्मशाळा होती. १४ जुलै १९४९ रोजी गाडगेबाबांनी मुंबईत दादर येथे बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली. तेव्हा बाबासाहेब केंद्रीय कायदामंत्री होते. त्यांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीनं तिथं दलित मुलांसाठीचं वसतिगृह सुरू केलं. दोन महामानवांच्या ऋणानुबंधाची आठवण सांगणारं हे वसतिगृह इथं चुपचाप उभं आहे. नाही चिरा नाही पणती. आज इथं जवळपास २०० मुलं राहतात, तर वसतीगृहाला लागून असलेल्या गौतम विद्यालयात सुमारे ७०० विद्यार्थी शिकतात. हीच या महापुरुषांना खरी श्रद्धांजली म्हणायची.

वस्तीत एक मरीआईचं देऊळ आहे. रोगराईपासून ही मरीआई गावाला वाचवते, अशी सर्वांची श्रद्धा आहे. त्यामुळे आषाढी-कार्तिकी झाली की, पंढरपुरातील अनेक जण मरीआईच्या दर्शनाला येतात, असं एकानं सांगितलं. सगळे देव गावात आणि मरीआई मात्र इथं का असावी? हा प्रश्न डोक्यात भूणभूण करत होता. यात्रा ओसरली की गावभर घाण होणार. या घाणीमुळे रोगराई होऊ नये, म्हणून ती साफ करायला या वस्तीत येऊन सांगण्यासाठी ही योजना असू शकते.

‘या मरीआईच्या पूजेचा मानही सर्वगोडांकडेच आहे’, आबा सर्वगोड सांगत होते. आबांचं नाव अभिमन्यू, पण गावात त्यांना सर्वजण आबा म्हणूनच ओळखतात. आंबेडकर नगराच्या नाक्यावर आबांचं टेलरिंगचं दुकान आहे. बनियनवजा पांढरा सदरा, लेंगा. किरकोळ वाढलेली दाढी आणि गळ्यात उठून दिसेल अशी तुळशीमाळ. नमस्कार वगैरे झाल्यावर म्हणाले, ‘आम्ही चोखामेळ्याचे वंशज. समाधीच्या पूजेसोबत कार्तिकीची दिंडीही आमच्या घरी आहे. माझ्याकडे वीणा आहे. पण आता वयोमानाप्रमाणं चालणं जमत नाही. तरीही जेवढं जमेल तेवढं करतो.’

‘कसं झालंय आता, सगळ्यांनाच पुढारी व्हायचंय. देवाचं काम कोणाला करायचं नाही. त्यामुळे बाहेरची माणसं घुसू लागली आहेत. आमच्या कुळात चोखोबांचं ‘सत्पन्न’ आहे. पण आता दुसर्याक गावातील लोकही अधिकार सांगू लागलेत. नदीच्या पलिकडे चोखोबांची दीपमाळ होती. आजूबाजूला जमीनही होती. पण आता जमीनही उरली नाही आणि दीपमाळही. आम्ही आमच्यापरीनं आवाज केला. पण काहीही झालं नाही,’ आबा उद्विग्नतेनं सांगत होते.

बोलता बोलता आबांनी चोखोबांची आरती गाऊन दाखवली. त्यांच्या घरातील चोखोबांचा फोटो दाखवला. तो फोटो म्हणजे कुण्या चित्रकारानं काढलेलं चित्र होतं. त्यात नदीच्या पल्याड चोखोबांना पांडुरंग भेटल्याचा क्षण दाखवला होता. झोपडीबाहेर चोखोबा नामस्मरणात दंग आहेत आणि साक्षात पांडुरंग त्यांच्या गळ्यात हार घालतोय, असं ते चित्र होतं. हे सगळं दाखवताना आबांच्या मनातील काहूर त्यांच्या डोळ्यात दिसत होतं. शेवटी ते म्हणालेच, ‘आम्ही हे सगळे सांभाळतोय. पुढं काय होईल माहीत नाही. पण माझा देवावर विश्वास आहे.’

आबा असं का म्हणत होते ते पुढे आंबेडकर नगरमध्ये फिरताना पावलापावलावर जाणवत होतं. बाबासाहेबांपाठोपाठ तेव्हाच्या महार जातीतल्या बहुसंख्यांनी बौद्धधर्म स्वीकारला. त्यामुळे नवी पिढी ही भगवान गौतम बुद्धांना मानते, बुद्धविहारात जाते. या नव्या पिढीला चोखामेळ्यांबद्दल आदर आहे. पण पूजा, दिंडी, परंपरा याविषयी त्यांना फार रस नाही, असं त्यांच्याशी बोलताना जाणवत राहतं.

या तरुण पिढीच्या भावनांना वाट करून दिली ती सुनील सर्वगोडांनी. पंढरपूरचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीचं असावं असंच त्यांचं घर, बंगलेवजा. दारावर अशोकचक्र आणि बौद्धस्तूप कोरलेला. घरात बाबासाहेबांचा फोटो. नव्या पिढीला चोखोबांबद्दल काय वाटतं, असं विचारल्यावर ते म्हणाले, ‘चोखोबांविषयी आमच्याही मनात श्रद्धा आहे. पण आता अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्या नव्या संदर्भात चोखोबा समजून घ्यायला हवेत’.

‘बाबासाहेबांनी धम्म स्वीकारल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. चोखोबांच्या वाटेला ज्या हालअपेष्टा आल्या, अवहेलना आली, त्याची नव्या पिढीला जाणीव आहे. पण ही नवी पिढी शिकलेली आहे, सवर्णांच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे. बाबासाहेबांनी रुजवलेल्या शिक्षणामुळे हा बदल घडला आहे. या पिढीनं आपल्या जगण्यावागण्यासोबत आपल्या धारणाही बदलल्या आहेत. त्यामुळे चोखोबांबद्दल आदर असला तरी आधीच्या पिढीएवढी ओढ नक्कीच नाही. आमचे वाडवडील वैशाख पंचमीला येणार्याच चोखोबांच्या पुण्यतिथीपर्यंत आंबे खात नव्हते. पण आता ही प्रथा फार कोणी पाळत नाही.’

त्यांना म्हटलं की, आता तर विठोबाच्या मंदिरातून सुप्रीम कोर्टानं बडव्यांना बाहेर काढलं आहे. बाबासाहेबांच्या राज्यघटनेनं अस्पृश्यता संपवत, सर्व जातीजमातील लोकांना आज विठोबाचे पुजारी होण्याची संधी दिली आहे. तुम्ही या सर्व गोष्टींकडे कसं पाहता? त्यावर ते म्हणाले, ‘ही चांगली गोष्ट आहे. पण मंदिर समितीमध्ये अद्यापही दलिताला जागा नाही. त्यामुळे असे निर्णय होणं, ते प्रत्यक्षात येणं आणि लोकांनी स्वीकारणं, याला बराच वेळ लागेल. आजवर सनातनी लोकांनी देव आपल्या हातात ठेवला, संतांना छळलं. माझं तर असंही म्हणणं आहे की, सनातन्यांनी चोखोबांना मारलं आणि त्यांचा मृत्यू गावकूस पडून झाला, असं सांगितलं. हा अन्याय किती दिवस सहन करायचा? त्यापेक्षा बाबासाहेबांच्या वाटेनं आम्ही चाललो आहोत’.

‘वाट बाबासाहेबांची असली तरी चोखोबांबद्दल कुठंही अनादर नाही. आजही आमच्या कुणाच्याही घरात काहीही चांगलं कार्य असलं तर आम्ही सर्व चोखोबांच्या दर्शनाला जातो. काही वाईट घडलं की, तीन दिवस आम्ही चोखोबांची पूजा पाहुण्यांकडून करून घेतो. चोखोबांची पुण्यतिथी साजरी करतो. पण नवी पिढी कर्मकांडांमध्ये फारसा विश्वास ठेवत नाही, हेही तेवढंच खरं आहे’, सुनीलभाऊंच्या बोलण्यात जुन्या-नव्याची मोट बांधण्याचं राजकीय शहाणपण शब्दाशब्दात जाणवत होतं.

सुनीलभाऊंच्या घराच्या मागच्या बाजूला त्यांचं जुनं घर आहे. तिथं एक मोठी पितळेची छत्री आहे. मालोजीराजे निबांळकरांनी चोखोबांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यापूर्वी ही छत्री समाधीवर होती, असं सांगितलं जातं. आता कित्येक वर्षं ती तशीच पडून आहे. छत्री पाहून आम्ही सुनीलभाऊंचा निरोप घेतला. डोक्यातील प्रश्न काही संपले नव्हते. चोखोबा आणि बाबासाहेब हे एकाचवेळी स्वीकारणं या नव्या पिढीला अवघड जात आहे, एवढं मात्र जाणवत होतं.

वाटेत ‘चोखामेळा धर्मशाळा, संतपेठ, पंढरपूर’ असं निळ्या शाईनं लिहिलेली एक बैठी वास्तू दिसली. बोरगावकर मठ म्हणूनही ही वास्तू ओळखली जाते. बोरगावातील कै. दगडू भोसले हे या फडाचे मालक होते. त्यांनी ही धर्मशाळा बांधली. चोखोबांच्या समाधीभोवती असणारं कुंपणही यांनीच बांधून दिल्याचा उल्लेख आहे. धर्मशाळेच्या आतमध्ये विठ्ठल-रुक्मिणीचं छोटं मंदिर आहे. तसंच चोखामेळ्यांचीही मूर्ती आहे. मी गेलो तेव्हा मठाच्या दरवाजाला कुलूप होतं. एकादशीला किंवा उत्सवाच्या वेळी लोक येतात, असं आसपासच्या लोकांनी सांगितलं. पंढरपुरातल्या बाकीच्या धर्मशाळांच्या तुलनेत चोखोबांच्या धर्मशाळेच्या नशिबीही उपेक्षाच असल्याचं दिसलं.

विठ्ठलमंदिराच्या महाद्वारासमोरील समाधीशिवाय पंढरपुरात चोखोबांची आठवण सांगणार्याी वास्तू फारशा नाहीत. चंद्रभागा नदीच्या दुसर्याी काठावर चोखोबांनी बांधलेल्या दीपमाळेचा उल्लेख अनेकजण करतात. पंढरपुरात चोखोबांचं वास्तव्य होतं. पण ते जातीनं अस्पृश्य असल्यानं त्यांना गावाबाहेर राहणं क्रमप्राप्त होतं. विठोबाचं सानिध्यही हवं आणि गावातही राहायचं नाही, यावर चोखोबांनी मार्ग शोधला होता. विठ्ठलमंदिरासमोरील चंद्रभागेच्या पैलतीरावर त्यांनी झोपडी बांधली आणि विठोबाचं स्मरण म्हणून एक दीपमाळ बांधली, असं सांगतात. ही दीपमाळ १९६९ पर्यंत तरी होती, असं पुरावे सांगतात. स. भा. कदम यांच्या अभंगगाथेत तिचा फोटो आहे. नंतर त्या जमिनीचा ताबा बदलला आणि नव्या मालकानं चोखोबांची आठवण कायमची जमीनदोस्त केली.

याबद्दल कोण माहिती देईल, असं विचारलं तेव्हा अनेकांनी माधव सर्वगोड यांचं नाव सुचवलं. माधव सर्वगोड हे गावातील सर्वात वयस्कर गृहस्थ म्हणून ओळखले जातात. चोखोबांचा अभ्यास हा त्यांचा ध्यास आहे. त्यांना भेटायला गेलो तेव्हा ते घराच्या मागच्या बाजूला असलेल्या दगडी घुमटीमध्ये निजलेले होते. उघडं अंग, गळ्यात तुळशीमाळ, डोक्यावर गंध असा वारकरी पेहराव. शेजारी चोखाबांची गाथा होती आणि बरेच कागद. मी गेल्यावर ते सावरून बसले.

चोखोबांविषयी माहिती घ्यायला आलोय म्हटल्यावर त्यांच्या चेहर्याववर तेज आलं. त्यांनी दगडी घुमटीकडे हात करत सांगितलं, ही गोपाळस्वामींची समाधी. गोपाळस्वामी हे चोखोबांचे सातवे वशंज आणि आम्ही बारावे. चोखोबा पंढरपुरात चंद्रभागेच्या पूर्वतीरावर राहत असत. आजच्या पुराव्यानुसार मौजे शेगाव, सर्वे नंबर १० येथील ३० बिघ्याचं शेत चोखोबांचं होतं. त्यांना पंढरपुरातून हाकलल्यानंतर ते विठोबाचं मंदिर तरी दिसावं म्हणून चंद्रभागेच्या दुसर्याक किनार्या वर राहत असत. तेथे त्यांनी आपल्या शेतात पांडुरंगाचं स्मरण म्हणून एक दीपमाळ बांधली होती. त्या शेताचं नावही दीपमाळेची पट्टी असंच होतं. नंतरच्या काळात फसवणूक होऊन त्याचे बरेच व्यवहार झाले. आज ते शेतही नाही आणि ती दीपमाळही नाही. फक्त भक्तिविजय ग्रंथातल्या २३व्या अध्यायातील ‘सन्मुख लक्ष्मी राउळा| पैलतिरी बांधली दीपमाळा| तेथे राहतसे चोखामेळा| हृदयी घननीळा ध्यातसे॥’, असा उल्लेख शिल्लक राहिला आहे.

गोपाळस्वामींच्या या समाधीशेजारी आणखी एक घुमटी आहे. तिथे विठ्ठल-रखुमाईची भग्न मूर्ती आहे. बरेच दिवस इथे पूजा वगैरे होत नसावी. एकंदरीत या नवबौद्ध घरात आता पूजाअर्चा करणारे माधवआजोबा शेवटचेच असावेत. त्यांचंही आता वय झाल्यानं देव पूजेविना राहिला होता. आंबेडकर नगरमधील अनेक घरांमध्ये असंच वातावरण असेल का, असा प्रश्न घेऊन मी माधवआजोबांना निरोप दिला.

त्याच वाड्यात पुढे सीताराम सर्वगोडांचं घर आहे. १९४७ मध्ये साने गुरुजींनी केलेल्या मंदिरप्रवेशाच्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता, असं कळलं. मंदिरप्रवेशाचं आंदोलन हे चोखोबांचं खरंखुरं उत्तरकार्य होतं. ‘दार राखत बैसलो, तुम्ही दिसे मोकालिलो’ म्हणत विठ्ठलदर्शनाची आस धरणारे चोखोबा आणि ‘अस्पृश्यता तरी नष्ट होवो, नाहीतर माझे प्राण तरी जावोत’ म्हणणारे साने गुरुजी यांची अंतस्थ प्रेरणा एकच होती. त्यामुळे पंढरपुरात चोखामेळा धुंडाळताना मंदिरप्रवेश समजून घेणं गरजेचं होतं.

सीताराम सर्वगोड यांच्या घरी पोहचलो तेव्हा तेही खोलीत पडून होते. तेही आज पंच्याहत्तरीच्या घरात असतील. मी गेलो तेव्हा ते वॉकरचा आधार घेत अंगणात आले. तिथंच खुर्ची टाकून आम्ही बोलू लागलो. त्यांचा आवाज स्पष्ट नव्हता. ते सांगत होते, ‘गुरुजींनी आंदोलन केलं तेव्हा भीतीचं वातावरण होतं. विठ्ठलमंदिरात प्रवेश वगैरे ठीक, पण इथले सनातनी उद्या आमच्या घरादाराचं काय करतील, याची सर्वांना चिंता होती. त्यात पोलिस पहारा. काही दंगा झाला तर मार पडेल तो वेगळा. त्यामुळे पंढरपुरातले फार दलित या आंदोलनात नव्हते. बाहेरून आलेले खूप जण होते. अखेर गुरुजींच्या उपोषणापुढं बडवे नमले आणि आम्ही पंढरपुराच्या विठ्ठलमंदिरात प्रवेश केला. या डोळ्यांनी विठोबाचं दर्शन घेतलं.’ त्यांना सारखा दम लागत होता. फार बोलणं शक्य नव्हतं आणि त्यांचं बोलणं नीट कळत नव्हतं. नाईलाजानं भेट थोडक्यात आवरती घ्यावी लागली.

१ मे १९४७ रोजी साने गुरुजींनी पंढरपुरातील तनपुरे मठात आमरण उपोषण सुरू केलं. अनेक नाट्यमय घटनांनंतर अखेर बडवे नमले. १० मे रोजी बडव्यांनी हरिजनांना मंदिर प्रवेश देण्याचं मान्य केलं आणि गुरुजींनी उपोषण सोडलं. पंढरपुरानंतर महाराष्ट्रातील सर्व मंदिरं हरिजनांसाठी खुली झाली. जातिअंताच्या लढाईतला हा महत्त्वाचा विजय होता. ज्या चोखोबांना फक्त जातीनं महार आहे म्हणून आयुष्यभर विठ्ठलमंदिराच्या दारात उभं ठेवलं, त्या चोखोबांच्या समाजबांधवांनी मंदिरप्रवेशाच्या या आंदोलनानंतर विठ्ठलदर्शन घेतलं. साने गुरुजींनी पंढरपुरात मांडलेला संघर्ष पूर्णत्वाला गेला.

ज्या तनपुरे महाराजांच्या मठात गुरुजींचं उपोषण झालं तिथं आताचे मठप्रमुख बद्रीमहाराज तनपुरे भेटले. गुरुजींच्या आंदोलनाला आज साठ वर्ष उलटली आहेत. वारकरी संप्रदायातल्या जातिभेदाकडे तुम्ही कसं पाहता, असं विचारल्यावर ते म्हणाले, ‘खरा वारकरी जातपात मानूच शकत नाही. ‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ अशी भागवतधर्माची शिकवण आहे. तरीही सनातनी लोक चोखोबांच्या काळातही जातीभेद पाळत होते आणि आजही पाळतात, हे सर्वज्ञात आहे. याच मठात इथे साने गुरुजींनी दहा दिवस प्राणांतिक लढा देऊन विठ्ठलमंदिरासह सर्व देवळांचे दरवाजे बहुजनांना खुले केले. पण ज्यानं केलं आणि जे केलं ते विसरण्याची आपली वृत्ती आहे. आपण कृतघ्न होत चाललो आहोत. ना आपण चोखोबांची आठवण जपली ना गुरुजींची.’

‘वारकरी म्हणवणार्याआ काही फडांमध्ये आजही बहुजन जातीतील महाराजांची कीर्तनं होत नाहीत. महिलांची प्रवचनं होत नाहीत. विठोबा बाटला म्हणून काही मोठमोठे महाराज आजही पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात जात नाहीत. देव त्यांना उतारवयात तरी सद्बुद्धी देवो. पण हाही सारा जातीभेदच आहे. सनातनी आणि कर्मठपणा हा एवढ्या सहजासहजी आपली पाठ सोडणार नाही. त्यासाठी दोन्ही बाजुच्या लोकांनी बदल स्वीकारावा लागेल. गुरुजींच्या उपोषणानंतर जेव्हा मंदिरप्रवेश झाला, तेव्हा काही सनातन्यांनी विठोबाचं तेज घागरीत उतरवून ठेवलं होतं. आज त्या घागरीचं दर्शन घ्यायला कोणी जात नाही, पण श्रीविठ्ठलापुढची बारी वाढतच आहे. त्यामुळे बदल होतो, निश्चित होतो, फक्त त्यासाठी वेळ द्यावा लागेल, हे विसरून चालणार नाही,’ बद्रीनाथ महाराज आपल्या मृदू आवाजात सांगत होते.

‘सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बडवे आणि उत्पातांच्या तावडीतून विठोबा आता मोकळा झालाय. पण पर्यायी व्यवस्था व्हायला वेळ लागेल. कोणताही व्यवस्थाबदल हा कधीच सोपा नसतो. तिथं संघर्ष टाळता येत नाही’, असं सांगून बद्रीनाथ महाराज म्हणाले, ‘उद्या नव्या पिढीतील आणि विविध जातीतील पुजारी जेव्हा विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करतील, ती कदाचित आधीसारखी नसेल. पण ती आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे. तरच सर्वांना सामावून घेणारी नवी व्यवस्था जन्माला येईल.’

पंढरपूरच्या बडवे उत्पातांच्या या व्यवस्थेविरोधातलं पहिलं बंड चोखोबांनी केलं होतं. विठोबाच्या गळ्यातील हार चोखोबांच्या गळ्यात सापडला. त्यावेळी बडव्यांनी चोखोबांना हार चोरला, असं सांगत खूप मारलं. तेव्हा विठ्ठलानंच त्यांची सुटका केली, अशी एक कथा सांगतात. खरं तर विठ्ठलदर्शनाची आस अनावर होऊन एकदा चोखोबा मंदिरात प्रवेश करत होते म्हणून त्यांच्यावर हार चोरल्याचा आळ आणून बडव्यांनी त्यांना मारलं. हा प्रसंग स्वतः चोखोबांनी आपल्या अभंगातून सांगितला आहे.

धाव घाली विठू आता, चालू नको मंद |
मज मारती बडवे काहीतरी अपराध ||
विठोबाचा हार तुझ्या कंठी कसा आला |
शिव्या देऊन मारा म्हणती देव कां बाटला ||

एवढा मार सहन करूनही चोखोबांची विठ्ठलभक्ती कमी झाली नाही. त्यांनी आपला विठ्ठल अंतर्मनात पुजला होता. चोखोबांचं बंड हे विठ्ठलाच्या विरोधात नव्हतं, तर व्यवस्थेच्या विरोधात होतं.
कोण तो सोवळा कोण तो वोवळा |
दोहींच्या वेगळा विठ्ठल माझा ||

असं म्हणत मंदिरप्रवेश नाकारणार्यार बडव्यांना चोखोबांनी ‘पायरीशी होऊ दंग, गाऊनी अभंग’ असं प्रत्युत्तर दिलं आणि महाद्वारासमोर ठिय्या मांडला. चोखोबाचं हे आंदोलन साने गुरुजींनी पुढे नेलं. हरिजनांना मंदिरप्रवेश मिळवून दिला. आता या आंदोलनाचं पुढलं पाऊल पडलं आहे. बडवे उत्पातांच्या व्यवस्थेतून पंढरपूरचं विठ्ठल मंदिर मोकळं होत आहे.

१५ जानेवारी २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयानं अंतिम निकाल दिला आणि बडवे उत्पातांविरोधात गेली ४० वर्ष सुरू असलेला खटला कायमचा निकाली निघाला. नवे पुजारी येईपर्यंत पर्यायी व्यवस्था उभी करण्यात आली आहे. आता राज्य सरकारच्या मंदिर समितीनं नवे पुजारी नेमण्यासाठी मुलाखतीही घेतल्या आहेत. या मुलाखतीसाठी देशभरातून गोंधळी, लमाण, महार, माळी, धनगर, वंजारी यांच्यासह २९ जातीतील १९९ जणांनी मुलाखती दिल्या. त्यात २३ महिला होत्या. उद्या यातील काही जण पुजारी म्हणून निवडले जातील. ज्या चोखोबांना साधा मंदिरप्रवेश मिळत नव्हता, त्या चोखोबांचे वंशज खर्या अर्थानं विठ्ठलसेवेसी रुजू होतील. चोखोबा, सोयराबाई, कर्ममेळा, बंका, निर्मळा, जनाबाई, संताबाई या दलित संतांनी केलेला जोहार खर्या् अर्थानं विठ्ठलचरणी पोहचेल. ज्ञानेश्वरांपासून निळोबारायांपर्यंतच्या संतपरंपरेनं जपलेल्या आध्यात्मिक लोकशाहीच्या स्वप्नातील हा सोन्याचा दिवस असेल.

हे सारं जरी खरं असलं तरी हा बदल बडवे उत्पात कसे स्वीकारणार हेही पाहणं महत्त्वाचं आहे. आजवर ज्यांच्या हातात सत्ता होती, त्यांच्या हातून जेव्हा सत्ता जाते तेव्हा ते शांत नक्कीच बसत नाहीत. या अशा स्फोटक पार्श्वभूमीवर वा. ना. उत्पात यांना भेटण्यासाठी गेलो. वा. ना. हे प्रख्यात प्रवचनकार. पंढरपुरातलं एक मोठं प्रस्थ. बडवे उत्पातांचे विशेषतः उत्पातांचे अघोषित नेते. चोखोबांचा संघर्ष आणि आज मंदिरात होत असलेले बदल याकडे तुम्ही कशा अर्थाने पाहता, असं विचारल्यावर त्यांचा आवाज थोडा चढतोच. ते म्हणाले, ‘बडवे आणि उत्पातांनी कधीच हरिजनांना मंदिरात येऊ नये म्हणून रोखलं नाही. काही सनातनी ब्राह्मणांना ते मान्य नव्हतं. पण कायमचं नाव मात्र आमचंच खराब केलं जातं. आमचं म्हणणं एवढंच आहे की, परंपरेनं चालत आलेले आमचे अधिकार कायम राहावेत.’

‘चोखोबांनी कधीही बंड केलं नाही. तो विठ्ठलाचा खरा भक्त होता. स्वतःच्या कर्माच्या फळाच्या मर्यादा त्याला ठावूक होत्या. पण महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीनं चोखोबांचं बंड, बंड म्हणून उल्लेख केला. आम्ही कधीच जातपात मानली नाही. चोखोबांच्या पुण्यतिथीला आम्ही समाधीची महापूजा करतो. मी स्वतः चोखोबांचं मंदिर मुख्य देवळात घ्यावं, यासाठी लेख लिहिला होता. वि. स. पागे यांनाही ही कल्पना आवडली होती. पण तेव्हा चोखामेळा यांच्या वंशजांनीच त्याला विरोध केला. स्वतःला ते बुद्ध म्हणवतात ना, मग हिंदू चोखोबा कशाला हवा?’ उत्पातांच्या वाणीला धार चढली होती.

‘गीतेच्या नवव्या अध्यायात साक्षात भगवंताना स्त्रिया, वैश्य, क्षुद्र यांना भक्तीचा अधिकार दिला आहे. त्यांना रोखणारे आम्ही कोण? पण परंपरा नावाची गोष्ट असते की नाही. आमच्या पिढ्यानपिढ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीची सेवा केली आहे. ती फक्त कायद्याचा धाक दाखवून तुम्ही हिरावून घेणार? फक्त कायदा हातात घेऊन बदल होत नाहीत. बदल घडवण्यासाठीही परंपरा लागते. आमचा अधिकार काढला म्हणून आम्ही उपाशी राहणार नाही. आम्ही ब्राह्मण असल्याचा अभिमान लपवत नाही. आज आमची मुलं अमेरिकेत आहेत. आम्हाला विश्वास आहे, पुढील काही वर्षांत अमेरिकेचा अध्यक्षही ब्राह्मण असेल’. उत्पातांचा आत्मविश्वास सात समुद्र ओलांडून गेला होता.

उत्पातांच्या भेटीनंतर धारुरकर शास्त्र्यांना भेटायचं होतं. मंदिरप्रवेशाच्या वेळी विठोबाचं तेज घागरीमध्ये उतरवणार्याो भगवानशास्त्री धारूरकर यांचे ते पुत्र. धारुरकरांच्या घरात कसं जायचं हा प्रश्नच होता. त्यांची भेट मिळणं अवघड आहे, असं पंढरपुरातील अनेकांनी सांगितलं होतं. अखेर हिंमत करून देवळाशेजारच्या गल्लीत असणार्यात धारुरकर शास्त्रींचं घर शोधून काढलं. दार ठोठावलं. एक गौरवर्ण, शुभ्रवस्त्र परिधान केलेल्या वयस्कर गृहस्थांनी दार उघडलं. सोबत असलेल्या मित्रानं मुंबईहून वगैरे आल्याचं सांगितलं. मी म्हटलं घागरीचं दर्शन घ्यायचंय. त्यांनी हातानंच ओटीवर असलेली घागर दाखवली. देव्हार्यायसारख्या छोटेखानी कप्प्यात एक चांदीची घागर होती. त्यावर काही फुलं वाहिली होती. मी विचारलं, फोटो काढू का? तर शास्त्रीबुवा बिथरलेच. म्हणाले, ‘बिलकुल नाही. धिस इस अवर प्रायव्हेट प्रॉपर्टी. तुम्हाला याचा अर्थ कळणार नाही. याचा विपर्यास होऊ शकतो.’ पुढं काही बोलायची त्यांची तयारीच नव्हती. विठोबाचं तेज ही कुणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी कशी काय असू शकते?, याचा विचार करत आम्ही त्यांचा निरोप घेतला.

एकीकडे जातिअंतांची लढाई आणि दुसरीकडे सनातनी विचारसरणी या संघर्षात आपल्या समाजाची वर्षानुवर्ष सुरू असलेली घुसळण पंढरपुरात पदोपदी जाणवत होती. चोखोबा समजून घेताना ही घुसळण दिसणं आवश्यकही होती. कारण या संघर्षाला वाचा फोडण्याच्या कामाची सुरुवात याच पंढरपुरात चोखोबांनी सातशे वर्षांपूर्वी केली होती. आज स्पृश्यास्पृश्यता उरली नसली तरी मनामनातली जात संपलेली नाही. सुंभ जळला तरी जातीचा पिळ काही सुटलेला दिसत नाही. कदाचित काळ हे त्यावरील उत्तर असेल. पण अजून किती काळ याचं उत्तर त्या पांडुरंगालाच ठावूक.

पंढरपुरातील चोखोबांचा शोध थांबवून आता परतायचं होतं. निघताना वाटेत पुन्हा आबा सर्वगोडांचं शिलाईचं दुकान लागलं. दुकानात आबांचा मुलगाही होता. मनात आलं, आबांना ‘येतो’ म्हणून सांगावं. आबांनी अगदी बाजूला बसवून घेतलं. म्हणाले, ‘चोखोबांचा अभ्यास करायला आलात म्हणून खरंच बरं वाटलं. आमच्या चोखोबानं आमचा त्रास पहिल्यांदा जगाला सांगितला मग बाबासाहेबांनी. आम्हीसुद्धा बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेतलाय, प्रभातफेर्याद काढल्यात. पण बाबासाहेब आणि चोखोबा दोघांनाही विसरून चालणार नाही. शेवटी आमच्या रक्तात चोखोबांचा अंश आहे. त्यामुळे मला विश्वास आहे, आमची पोरंपण चोखोबाला विसरणार नाहीत’. आबांच्या डोळ्यातील आशा आणि चोखोबांची कीर्ती दोन्हीही संपणारी नाही, याचा पंढरपूर सोडताना पुरेपूर विश्वास पटला होता.

हाच विश्वास सोबतीला घेऊन, पांडुरंगाचा निरोप घ्यायला महाद्वारासमोर उभा राहिलो. हात जोडले. डोळे मिटले. डावीकडे कर्मठ धारुरकरशास्त्र्यांच्या घागर विठोबाकडे जाणारी गल्ली होती. उजवीकडे भक्तश्रेष्ठ, संतश्रेष्ठ चोखोबांची समाधी होती आणि डोळ्यासमोर या महानाट्याचा महानायक असलेला विठोबा कमरेवर हात ठेवून विजयी मुद्रेनं उभा होता.

0 Shares
चोखोबांची पालखी भेदाभेद भ्रम अमंगळ