चोखोबांची पालखी

राजेंद्र पाटील

संत चोखामेळांचं जन्मगाव म्हणून बुलडाणा जिल्ह्यातलं मेहुणाराजा गाव ओळखलं जातं. त्या गावात छोट्या सरकारी मंदिराशिवाय चोखोबांची म्हणून काही खूण नाही. निर्मळा, बंका यांच्या समाध्या आहेत. पण त्या गाळात रुतल्या आहेत. शंभर वर्षांपूर्वीपर्यंत पंढरपूरला नाचत गाजत जाणारी चोखोबांची पालखी आहे. पण ती स्थलांतर होऊन शेजारच्या गावी गेली आहे. आता तिला कुणी पंढरपूरला घेऊन जात नाही. चोखोबांची त्यांच्या विठुरायाशी गाठ घालणारं आता कुणी उरलं नाही.

आमचा बुलडाणा. महाराष्ट्राच्या नकाशावरील एक जिल्हा. तुम्हाला मराठवाड्यातून विदर्भात यायचं असेल किंवा खान्देशातून प्रवेश करायचा असेल, तर बुलडाण्याच्या सीमा ओलांडल्याशिवाय पर्याय नाही. त्या अर्थानं हा जिल्हा विदर्भाचं प्रवेशद्वार. इथं प्रवेश केलात की चटकन जाणवेल तो विकासाचा अनुशेष. मराठवाड्यातून आत शिरलात तर नागपूर महामार्गावरून, जळगाव खान्देशमधून आत आलात तर धुळे नागपूर महामार्गावरून तुम्हाला यावंच लागतं. या रस्त्याला महामार्ग का म्हणतात, असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे. उखडलेल्या रस्त्याच्या कडेला असलेली शेतजमीनही तशीच उखडलेली, भकास, पाण्यासाठी आसुसलेली. कोरडवाहू शेती आणि वैशाखाचा वणवा असला, की विदर्भातलं भकासलेपण कोरड्या शेतांनी अधिकच जाणवतं.

एकीकडे बुलडाण्याची अशी प्रथमदर्शनी ‘उजाड’ ओळख होत असली तरी इथली माती अतिशय समृद्ध आहे. या मातीतून छत्रपती शिवरायांना घडविणारी जिजाऊ जन्मली, याच मातीत सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे बाबा सैलानी रमले. याच मातीत उल्कापातामुळं जगप्रसिद्ध असं लोणारचं सरोवर उदयास आलं. याच मातीत संत गजानन महाराज प्रगट झाले. याच मातीत ‘स्त्रीपुरुष तुलना’सारखं क्रांतिकारक पुस्तक लिहिणार्याउ ताराबाई शिंदे यांचा जन्म झाला अन् याच मातीत महात्मा फुले यांचे पहिले चरित्रकार पंढरीनाथ पाटील यांनी आपला ठसा उमटविला. विनोदाचार्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकरही याच मातीतील रत्न. नांदूर्या्चा १०५ फूट उंचीचा हनुमान असो की डोळे दीपवणारा शेगावचा आनंदसागर असो, देऊळगावराजाच्या अंगुष्ठ बालाजीपासून तर शेतकर्यांअना मार्गदर्शक ठरणार्या् भेंडवळच्या मांडणीपर्यंत बुलडाण्याचं महत्त्व हे विकासाच्या अनुशेषावर भारी पडतं. सांस्कृतिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक दृष्टीनं अतिशय समृद्ध असलेल्या बुलडाण्याच्या मातीत आणखी एक महान रत्न आहे ते म्हणजे संत चोखामेळा.

नदीचं मूळ आणि साधूचं कूळ शोधू नये, असं म्हणतात. पण ते शोधायलाच हवं. आणि संत चोखामेळांचं जन्मस्थळ असलेल्या मेहुणपुर्यांचा म्हणजे आजच्या मेहुणाराजा गावाचा शोध हा कुणाही पत्रकाराला मोहात पाडणाराच. वैशाख संपत आला होता. मृग नक्षत्राला सुरुवात झाली होती. पण ती फक्त कॅलेंडरवरच. प्रत्यक्षात कुठंही पावसाचा मागमूस नव्हता. त्यामुळं विदर्भातील उन्हाचा तडका काय असतो याचा अनुभव घेत चोखामेळांच्या ओेढीनं निघालो. अकोल्यावरून भल्या पहाटेच एका मित्राची गाडी घेतली अन् महामार्ग म्हणून ओळखल्या जाणार्यात औरंगाबाद रस्त्याला लागलो.

रस्त्यातील खाच खळगे पार करत खामगाव ओलांडलं. चिखलीच्या पुढे मेहकर फाटा म्हणून अतिशय गजबजेला ‘फाटा’ आहे. या फाट्याची गंमत म्हणजे कुठलंही घर नाही फक्त हॉटेल्स. चोवीस तास जागा आणि माणसांचा राबता असलेला हा फाटा. तिथं कुठल्याही दुकानाला शटर नाही कारण दुकान बंद करण्याचं काम कधी पडत नाही. कुठलंही वाहन असो तेथे श्रमपरिहार होणारच. आम्हीही थांबलो. एका हॉटेलवर चहा घेतला. सहज गप्पा म्हणून हॉटेलच्या मालकाला विचारलं, संत चोखामेळा यांचं जन्मगाव किती दूर आहे हो अजून! हा प्रश्न पहिल्यांदाच कुणीतरी त्याला विचारला होता. आमच्या प्रश्नानं तो क्षणभर बावरला, उत्तरला, ‘चोखामेळा? कोणतं गाव?’ त्याच्या या अनपेक्षित उत्तरानं आमच्या उत्साहाला धक्काच बसला. मेहुणाराजा या अवघ्या ३५ किलोमीटरवर असलेल्या गावाविषयी या गृहस्थाला काहीही माहिती नव्हती, याचं आश्चर्य वाटलं. मग आम्ही गावाचं नाव सांगितलं. हा, हा, असं सांगाना! बस, एक तासात पोहचाल, असं सांगितलं. आम्ही ज्यांना शोधत चाललो त्या चोखोबांविषयी अवघ्या ३५ किलोमीटरवर तरी माहिती नाही, हे कळलं. ते थोडंसं शल्य मनात ठेवत आम्ही पुढे निघालो.

रस्त्यात देऊळगाव मही नावाचं गाव पार करत आळंद फाटा येथे पोहचलो. या फाट्यावर वीस वर्षांपूर्वी गणेश मंदिराची स्थापना झाली अन् पाहता पाहता त्याला लहानशा तीर्थक्षेत्राचं स्वरूप आलं आहे. मंदिराबाहेर चार दोन टपरीवजा हॉटेलं. दूर्वा, फुलं, प्रसाद विकणारी आणखी दोन तीन दुकानं. पण भक्तांची चांगलीच गर्दी. गाड्यांचे आवाज आणि वार्याटचा सतत वाहणारा झोत असल्यामुळं मंदिरात शांतता नव्हती. दर्शन घेतलं आणि तिथंच चोखोबांचा शोध घेण्याचा श्रीगणेशा झाला. मंदिराच्या आवारात क्षणभर मागं वळून पाहिलं तर अथांग असा जलसागर दिसला. एका धरणाची भिंत आणि विशाल पाण्याचा साठा पाहून सरता वैशाख सुखावला.

एका झाडाखाली एक बाबा बसले होते. दाढी वाढलेली, अंगावर टिपिकल वर्हााडी वेश, धोतर, बंडी, खांद्यावर शेला, टोपी बंडीच्या खिशात घडी करून ठेवलेली. बाजूला तंबाखूची डबी, चुन्याची पुडी. आधाराची काठी बाजुलाच पडलेली. डोळ्यात कुठलीही घाई नसलेले भाव. काही विचारावं असे तेच एकटे दिसले. त्यांना विचारलं हे धरण कोणतं? बाबा उत्तरले, थ्यो चोखा सागर व्हय, खडकपूर्णेच्या धरणाचं पाणी हाय ते! बाबाच्या उत्तरानं पुन्हा उत्साह संचारला. खडकपूर्णा धरणाचा जलाशय संत चोखामेळांच्या नावानं ओळखला जातो हे ऐकताच मेहकर फाट्यावरच्या ‘अनोळखी’ अनुभवाच्या निराशेचं मळभ चटकन दूर झालं. मेहुणाराजा जायचं आहे, चोखामेळा यांच्या दर्शनासाठी आलो, असं सांगत बाबांशी पुन्हा संवाद साधला. आमच्या प्रश्नानं त्यांच्या चेहर्याबवरचे भाव एकदम बदलल्यासारखे वाटले. जणू काही पहिल्यांदाच कुणी त्यांना चोखामेळांच्या गावाविषयी विचारत असावं. म्हणाले, हे कायं… जरासकं गेला की कमान लागते, त्यातून घुसलं की दोन-तीन फर्लांगावरच आहे, कोणीबी सांगेन!

त्यांचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो. अवघ्या पाचशे मीटर अंतरावर उजव्या बाजूला एक कमान उभी होती, त्या कमानीवरची अक्षरं कधीच पुसली गेलेली. सिमेंट जागोजागी उखडलेलं. रंग उडलेला. कमानीच्या पायथ्याशी एक सार्वजनिक बांधकाम विभागाचा दिशादर्शक फलक अंग रेलून उभा होता, त्यावर लिहिलं होतं मेहुणाराजा ५ किलोमीटर. एरवी संतांच्या गावात शिरताना जाणवत असलेल्या प्रसन्नतेचा कुठलाही लवलेश त्या कमानीतून प्रगट होऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. एक अनामिक अशी हूरहूर घेऊन संत चोखोबांच्या ओढीनं मार्गस्थ होत होतो. ‘ऊस डोंगा परी, रस नाही डोंगा…’ हे आठवलं. मनातले निराशेचे विचार बाजूला फेकले.

मेहुणाराजाच्या सीमेवरच जिल्हा परिषदेची शाळा नटूनथटून उभी होती. शाळेला न्याहाळत पुढे सरकल्यावर अगदी गावाच्या बाहेर, एक-दोन सभामंडप अन् कुंपण घातलेलं शेत दिसलं. या शेताच्या बाहेरच आमचे मित्र प्रा. कमलेश खिल्लारे आमची वाट पाहत होते. ते चोखाबांच्या चरित्राचे अभ्यासक म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. चोखामेळांचा जन्मोत्सव सोहळा सुरू झाल्यापासून त्या कार्यक्रमात त्यांचं भाषण ठरलेलंच असतं. चोखोबांच्या विषयी जिव्हाळा, अभंगाचा अभ्यास आणि बहुजनवादाचं अधिष्ठान असल्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्त्व सर्वांना परिचयाचं. चोखोबांच्यासाठी मेहुणाराजामध्ये कुणीही आलं तरी खिल्लारे सरांना भेटण्याशिवाय पर्याय नसतो. देऊळगाव मही या गावात राहणारे खिल्लारे सर चोखोबांसाठी सर्व कामं बाजूला ठेवून धावत येतात. आजही ते मेहुणाराजाला आले होते.

गाडी थांबवली. नमस्कार झाला. औपचारिक बोलणं सुरू असतानाच नजर आजूबाजूला भिरभिरत होती. रस्ताच्या कडेला कुंपणाच्या शेतात शेवटच्या टोकाला सभामंडप होता. बाजूला छोटंस मंदिरही होतं. खिल्लारे सर म्हणाले, चला, चोखोबांच्या दर्शनाला जाऊ! चोखाबांच्या नावानं असलेल्या त्या शेतातून पुढं निघालो. पाच एकर शेताच्या टोकाला एक भला मोठा औदूंबर होता. त्याचं खोड पाहूनच तो शेकडो वर्ष स्थितप्रज्ञासारखा उभा असावा असं जाणवलं. उन्हाच्या तडाख्यात औदुंबराची सावली मनाला आल्हाददायक वाटत होती. पण त्याच औदुंबराच्या पायथ्याशी चोखाबांची एक मूर्ती भग्नावस्थेत होती. आजूबाजूला भले मोठे घडीव दगडांचे चौथरे असल्याच्या खुणा होत्या. या दगडांमध्ये चार-पाच शिवलिंग ठेवलेली दिसली. त्यांची घडणही जुन्या काळातीलच वाटत होती. तिथं एखादी इमारत असावी आणि त्याचे हे अवशेष असावेत. याच ठिकाणी चोखोबांचा जन्म झाला असं म्हणतात.

औदुंबराची भव्यता, भव्य घडीव दगडामुळे प्राचीनतेची जाणीव होते. पण त्याला एक उदासिनतेची, उपेक्षेची किनार होती. औदुंबराच्या बाजुलाच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून एक सभामंडप उभा ठाकलेला आहे. टिपिकल सरकारी थाटात बांधलेल्या या सभामंडपावर चोखाबांचे अभंग अंकित केले आहेत. या मंडपाच्या बाजूला एक सरकारी थाटाचंच भक्तनिवास बांधलेलं आहे. ते बंदच असतं. कुणी भक्त मुक्कामी येतच नाहीत. पण त्याचा वापर धार्मिक कार्यक्रमांसाठीच केला जातो. सभामंडपाच्या मागं आणि भक्तनिवासाच्या समोर एक मंदिर उभारण्यात आलं आहे. सरकारी निधीतून उभारलेल्या या मंदिरामध्ये चोखोबांची मूर्ती विराजमान आहे. औदुंबराखाली असलेली मूर्ती आणि मंदिरातील मूर्ती यांचं स्वरूप सारखं असलं तरी चेहरेपट्टी वेगळी आहे. मंदिरात कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही. दिव्याच्या तेलाची पुटं चढलेली. मूर्तीच्या गळ्यात एक प्लास्टिकचा हार, आजूबाजूला अगरबत्तीच्या काड्या, कागद पडलेले. अशाही स्थितीत मूर्तीच्या चेहर्या वरील भाव हे अतिशय निरव शांतेतेचे आणि समाधानाचे. वाटलं, उपेक्षेचं जिणं जगलेल्या चोखोबांना याची सवयच असावी. मंदिराच्या जवळ व्यवस्था पाहणार्यांाचं निवासस्थान आहे. या घराबाहेर अतिशय पुरातन असे दगड पडून आहेत. यामधील एक दगड चक्कीच्या दगडासारखा गोलाकार आहे. तो या ठिकाणी असलेल्या भव्य इमारतीचा मागोवाच सांगत असतो.

मंदिराच्या मागंच निर्मळा नदी वाहते. ही नदी उत्तरवाहिनी आहे. नदीच्या पात्रात शिरण्यासाठी जिल्हा परिषदेनं घाट बांधला आहे. तो घाट उतरून नदीत गेल्यावर प्रत्यक्ष नारदांना नव्यानं जन्म देणारी हीच का ती निर्मळा, असा प्रश्न उभा राहतो. ती नदी नाही नाला उरला आहे. पाण्याचा मागमूसही नाही. कोरड्या पात्रात एक कुंड होतं. अगदी ३० ते ३५ वर्षांपूर्वीपर्यंत या कुंडात आंघोळ केल्यानं महारोगासारखे त्वचारोग बरे होतात अशी धारणा या पंचक्रोशीत होती. तो कुंड आता पूर्णपणे बुजला आहे. नदीच्या पात्रात शिवलिंग आहेत. ही शिवलिंग म्हणजेच चोखोबांचा मेहुणा बंका, बहीण निर्मळा यांच्या समाध्या असल्याचं सांगितलं जातं.

निर्मळा नदीचीही एक आख्यायिका आहे. महर्षी नारदानं इंद्राच्या दरबारात आगळीक केल्यानं नारदाला स्त्रीचं रूप मिळालं. नारदाची नारदी झाली. त्यावर उ:शाप म्हणून देवेंद्रांनी निर्मळा नदीमध्ये स्नान करायला सांगितलं. त्यामुळं नारदीचे पुन्हा नारद झाले. खुद्द चोखामेळांच्या अभंगात हेच वर्णन असल्यानं ही आख्यायिका त्यांना ठावूक असल्याचं कळतंच. पण चोखोबांचं जन्मस्थळ म्हणून मेहुणपूरीवरही शिक्कामोर्तब होतं.

देव म्हणे नारदासी | जाय निर्मळा तीर्थासी ॥
तीर्थ निर्मळे संगती | स्नान करी नारदस्वामी ॥
नारदाशी नारदी सरी | धन्य धन्य मेहूणपूरी ॥
चोखा म्हणे हेंची देई | स्नान घडो तेथे ठायी ॥

याच नदीच्या पैलतीरावर चोखोबा झोपडी बांधून राहत आणि त्यांच्या झोपडीत विठ्ठलाच्या सांगण्यावरून स्वर्गलोकीतून इंद्र अमृत पवित्र करण्यासाठी आले होते, अशीही आख्यायिका या परिसरात गोडीनं सांगितली जाते. म्हणजे महर्षी नारदांना शाप उःशाप देणार्या् देवांचा राजा इंद्र अमृत नासले म्हणून येतो कुठं तर चोखोबांकडं. संतांच्या कथांमध्ये इतकं महत्त्व असलेल्या चोखोबांची जन्मभूमी असलेला हा सर्व परिसर एकदा डोळे भरून आणि डोळे उघडे ठेवून पाहून घेतला.

चोखोबांचं जन्मस्थळ म्हणून आता याच स्थळाला ओळखलं जातं, असं खिल्लारे सर सांगू लागले. दादासाहेब कस्तुरे समाजकल्याण मंत्री असताना त्यांनी मेहुणाराजा येथे चोखोबांचा जन्मोत्सव १९९८ साली सुरू केला होता. परंतु दोन वर्षांतच तो बंद पडला. त्यानंतर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सन २०००मध्ये हा जन्मोत्सव जिल्हा परिषदेच्या मार्फत सुरू केला. तो आजतागायत सुरू आहे. दरवर्षी १४ जानेवारीला या ठिकाणी शासकीय मांदियाळी जमते. चोखोबांना अभिवादन करते अन् विकासाच्या काही घोषणा करून पुन्हा पुढच्या वर्षापर्यंत गायब होते. एक सभामंडप, भक्तनिवास हीच काय ती विकासाची खूण!

मेहुणाराजावासीयांनी ही १४ जानेवारी तारीख कुठून आणली, असं जाणकार विचारतात. कारण कुठंच चोखामेळांच्या जन्मदिनाचा उल्लेख नाही. त्यामुळं त्यांच्यावर जिथं कुठं काही लिहिलं गेलं आहे, त्यात त्यांचा जन्मदिन अज्ञात असंच म्हटलं आहे. सगळीकडं साजरी होते ती त्यांची पुण्यतिथीच. पण जन्मगावी जयंती साजरी व्हायला हवी म्हणून त्यासाठी तारखेचा शोध घेतला गेला असावा. एका ठिकाणी उल्लेख आहे, की ही तारीख शोधण्यासाठी विदर्भातील लोकपरंपरेचे गाढे अभ्यासक ना. रा. शेंडे यांच्या अध्यक्षतेत समिती नेमण्यात आली होती. त्यांनी १४ जानेवारी १२६८ हा दिवस शोधला. तसे काही पुरावे असू शकतील. पण चोखोबांशी संबंधित पुस्तकांमध्ये ते सापडत नाहीत. पंढरपूर येथील चोखोबांचे वंशज मानले जाणार्यात सर्वगोड कुटुंबांच्या परंपरेत १२ जून १२९४ रोजी त्यांचा जन्म झाला, असं मानलं जातं. पण या तारखांना कागदोपत्री पुरावा नाही.

चोखोबांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर आतापर्यंत चोखोबांच्या संदर्भानं वाचलेलं लिखाण, चोखोबांचे अभंग समोर येऊन ठाकले. मुळातच चोखोबांच्या जन्मस्थळाविषयी वाद आहेत. कुणी पंढरपूर, मंगळवेढा, कुणी अनागोढा आणि कुणी मेहुणपुरी अशा गावांची नावे देतात. तर काही जाणकारांच्या मते चोखोबांची बहीण निर्मळा आणि मेहुणा बंका हे मेहुणपुरीत राहत असत. चोखोबा तेथे काही काळ वस्तीला आले होते. निर्मळाच्याच अभंगाचा दाखला द्यायचा झाला तर ‘संसाराचे भय घेवोनी मानसी| चोखा मेहुणपुरीसी जाता झाला||’ असा उल्लेख आहे. अशा अभंगांचा दाखला देऊन चोखोबा मेहुणपूरीचे नसून तिथे फक्त वास्तव्यासाठी आले होते, असं सांगितले जातं. पण बहुसंख्य अभ्यासक मेहुणपुरीलाच चोखोबांचं जन्मस्थळ मानतात. त्यात ज. रा. आजगावकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज. गो. संत ते आजच्या आप्पासाहेब पुजारींपर्यंत मान्यवर आहेत. स्थानिक लोकगीतांमधूनही हेच चोखोबांचं जन्मस्थान असल्याचे उल्लेख आढळतात. चोखोबांच्या अभंगातले मेहुणपुरी म्हणजेच आजचे मेहुणाराजा याविषयी कुणाला शंका उरलेली नाही. खुद्द चोखोबा, त्यांच्या पत्नी सोयराबाई, बंका, निर्मळा, संत नामदेव, संत एकनाथ सर्वांच्या अभंगातूनही मेहुणपुरी हा शब्द येतो. मेहुणाराजा हे चोखोबांचं जन्मस्थान आहे की नाही याविषयी थोडे मतभेद असले तरी ते बंका आणि निर्मळा यांचं गाव असल्याबद्दल मात्र मतैक्य आहे. चोखोबा आणि निर्मळा हे जसे बहीणभाऊ तसेच बंका आणि सोयरा हेदेखील बहीणभाऊ. मेहुणपुरा हे चोखोबांची सासुरवाडी याबद्दलही कोणताही वाद उरत नाही.

चोखोबांच्या जन्मस्थळाची कथा आणि प्रत्यक्षातली व्यथा मनात रेंगाळत ठेवत आम्ही गावाच्या दिशेने निघालो. चोखोबांचं जन्मस्थळ आणि गाव यामध्ये साधारणपणे अर्ध्या किलोमीटरचं अंतर आहे. दलित समाजाची घरं आजही गावाबाहेर आहेत. तसंच चोखाबांचं जन्मस्थळ म्हणून ओळखल्या जाणारं स्थळ गावाबाहेरच आहे. गावात शिरताना उजव्या हाताला एक वेस लागते. सध्या ही वेस भग्नावस्थेत आहे. तरी या वेशीची भव्यता चटकन जाणवावी अशीच आहे. काळयाशार पाषाणातून घडवलेल्या या वेशीतून पूर्वी मेहुणाराजामध्ये प्रवेश होत असे. आता वेशीच्या समोरून होतो. मेहूणाराजा या नावाचीही वेगळी आख्यायिका आहेत. सिंदखेडराजा हे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ, जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधव यांनी त्यांच्या मेहुण्याला या परिसराची जहागिरी दिली म्हणून या गावाला मेहुणाराजा म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

वेशीची स्थिती आजही उत्तम असल्यानं गावाचं राजेपण एकदम उठून दिसतं. घडीव दगडांची ही प्राचीन वेस या गावाच्या इतिहासाची पाळंमुळं ७०० ते ८०० वर्षांपर्यत कशी रूजली आहेत याचं प्रत्यंतर देते. अतिशय शांत आणि आल्हाददायक वाटणार्यात या वेशीच्या दरवाज्यातच अनेक वयस्कर मंडळी बसलेली असतात. त्यांना नमस्कार करून चोखोबांच्या विषयी चर्चा केली. त्यांच्या बोलण्यातून चोखोबांविषयीचा आदर चटकन जाणवतो. पण त्यांना माहीत असतात त्या फक्त आख्यायिकाच. संक्रांतीला चोखोबांच्या उत्सवात सर्व गाव सहभागी होतो, हे आर्वजून सांगताना ग्रामस्थांचा ऊर भरून येतो. मात्र त्यांना चोखोबांच्या विषयी फारशी माहिती नाही. चोखोबांचे चारदोन लोकप्रिय अभंग अनेकांना मुखोद्गत आहेत. चोखोबांची जन्मकथा तर सर्वच चवीनं सांगतात.

गावात फेरफटका मारताना जाणवतं, एरव्ही वर्हााडात जशी इतर गावं दिसतात, तसंच एक मेहुणाराजा. राजा या नावाची वेस हीच एकमेव खूण. वेशीच्या आत शिरलं की लहान लहान गल्ल्यांच्या दुतर्फा घरांची रांग. घरासमोर सांडपाणी वाहून नेणार्याच नाल्या. खेडेगावामध्ये असतात तशी लहान मोठी किराणा, जनरल स्टोअर्ससारखी दोन तीन दुकानं. घरंही फार मोठी नाहीत. सिमेंटचा स्लॅब आता घरोघर असला तरी टिनाची घरं अजूनही आहेत. ग्रामपंचायतीकडे जातांना लागणार्यां घरांना अंगण नाहीच. घरासमोरचा रस्ता हेच अंगण. त्यामुळे शेणमातीचा सडा रस्त्यावर टाकल्यानं रस्त्याला एक वेगळीच प्रसन्नता मिळालेली होती. बैलगाडीचा राबता या रस्त्यावर अधिक असल्यानं बैलगाडीच्या चाकांमुळं एका ओळीत दबलेला रस्ता चटकन नजरेत भरतो. पुढं सरकत गेल्यावर ग्रामपंचायतची इमारत लागली. दोन खोल्यांमध्ये असलेल्या या इमारतीत सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ बसलेले होते. तिथं उपसरपंच शेषराव चाटे भेटले. त्यांच्यासोबत भगवानराव चाटे होते. चोखोबांचा विषय काढला तर शेषराव म्हणाले, चला घरीच बसू! ग्रामपंचायतीच्या बाजूलाच त्यांचं घर होतं. मातीच्या धाब्याची घरं आता संपत चालली. परंतु चाटे यांनी अजून हे वैभव जपलं होतं. पहिल्याच खोलीत पाच-सहा खुर्च्या ठेवल्या होत्या, तिथंच बैठक मारली आणि सुरू झाल्या गप्पा.

चोखोबांमुळं गावाला वेगळी ओळख मिळाल्याचा अभिमान दोघांच्याही बोलण्यात जाणवत होता. जिल्हा परिषदेनं जन्मोत्सव सोहळा सुरू केला तर देऊळगावराजा येथील कीर्तनकार सुभद्राबाई खरात यांनी पुढाकार घेऊन २०११मध्ये चोखोबांचा पुण्यतिथी उत्सव सुरू केला. भोगले महाराज, जनार्दन महाराज, मधुकर वाघ, सोनुने गुरूजी यांनीही पुण्यतिथी उत्सवाची भूमिका उचलून घेतली. आज हा उत्सव गावाचा उत्सव झाला आहे. पंचक्रोशीतून लोक या उत्सवात सहभागी होतात, असं सांगताना चोखोबांच्या जन्मस्थळाबाबत केलेला विकास आराखडा शासनस्तरावर मंजूर होत नसल्याची खंत त्यांच्या बोलण्यात जाणवली. गावाचा विकास आराखडा शासनाकडे पडून आहे. त्यात अजून त्रुटी असल्या तरी त्याचा पाठपुरावा ग्रामपंचायत करत आहे, असं चाटे म्हणाले. आमच्या गप्पा सुरू असताना आणखी काही ग्रामस्थ तेथे जमा झाले. चोखोबांच्या पालखीतील वारकरी कोणी आहे का? त्यांना भेटता येईल का, असं विचारल्यावर सारेच विचारात पडले. नव्वदीच्या वर आता कोण आहे याचा विचार करता आता कोणीच नाही यावर सर्वांचं एकमत झाले. या चर्चा सुरू असतानाच ताहेर अली नावाचे वार्ताहर आले. ते जन्मानं मुसलमान असले तरी चोखामेळांविषयी प्रचंड आदर त्यांच्या बोलण्यात जाणवत होता. १९८८पासून आपण ‘लोकमत’मध्ये चोखामेळांविषयी लहान-मोठ्या बातम्या प्रकाशित केल्या असल्याचं ते म्हणाले. आमच्या गावाला हे मोठं धन लाभलं पण त्याचा सांभाळ होत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. चोखोबा हा आम्हाला आमचा वाटतो, असं ते सांगत होते आणि ग्रामस्थ ‘खरं आहे’, असा दुजोरा देत होते.

या गावातून पूर्वी चोखोबांची पालखी पंढरीला जायची. साधारणपणे शंभर एक वर्षापूर्वी ही परंपरा बंद पडली. गावातील काकडे आडनावाचं कुटुंब हे चोखोबांचं वंशज म्हणून ओळखलं जातं. त्यापैकीच एक असलेले रामकृष्ण गोविंद काकडे हे पालखीला जाणारे शेवटचे वारकरी असावेत. ते आता हयात नाहीत. किंबहुना या पालखीतील एकही वारकरी सध्या जिवंत नाही. रामकृष्ण काकडे यांनी मेहुणाराजा कधीचाच सोडला. त्यांचे वंशज आता उगला या सिंदखेडराजा तालुक्यातील गावात राहतात. त्यांच्याकडे चोखाबांची पालखी आजही सुरक्षित आहे. रामकृष्ण काकडेंचे खापरपणतू अंकुश या पालखीचा सांभाळ करतात. ही पालखी मेहुणाराजाला परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

चर्चेत एक नावही समोर आलं. सगळे म्हणू लागले त्यांना भेटायलाच हवं. शिवदास राजे जाधव. नव्वदीच्या उंबरठ्यावर. ऐकायला आता कमी येतं पण स्मरणशक्ती प्रचंड दांडगी. संपूर्ण चोखोबा तोंडपाठ आहे. ते चोखोबा, बंका, निर्मळा यांच्या अभंगांचे दाखले देत आपल्याला चोखोबा समजावून सांगतात. चोखोबांची जन्माची कथा त्यांना मान्य नाही.

कथेतलं कोरेगाव मेहुणाराजापासून जवळच आहे पण आता अस्तित्वात नाही. कोरेगावच्या पाटलाकडे सुदाम आणि सावित्री हे महार समाजाचं जोडपं काम करत असे. त्यांना ‘येसकर’ म्हणत. कोरेगावचे पाटील विठ्ठलभक्त. त्यांच्या शेतातील सव्वाशे आंबे विठ्ठलचरणी अर्पण करण्यासाठी त्यांनी सुदाम आणि सावित्रीला पंढरीला पाठवलं. त्यांना वाटेत एक भुकेला ब्राह्मण मिळाला. त्यानं दोघांकडे आंबा मागितला. त्याची स्थिती पाहून त्यांनी आंबा दिला. पण त्यानं तो अर्धाच खाल्ला आणि आंबट आहे म्हणून परत केला. सावित्रीनं तो पेटीत टाकण्याऐवजी ओटीत ठेवला. पंढरीत मालकानं सांगितल्याबरहुकूम आंब्याची पेटी आणि मालकाचं पत्र सुदामानं बडव्याच्या हाती सोपविलं. बडव्याला एक आंबा कमी भरला. त्यावर सावित्रीनं सर्व कथा सांगून आंबा दाखवण्यासाठी ओटीत हात घातला. तर तेथे एक गोंडस बाळ होतं. तो आंबा प्रत्यक्ष विठ्ठलानं चोखला होता आणि त्याचंच फळ म्हणून हे बाळ जन्मलं. त्यामुळे त्याचं नाव चोखट-चोखा असं ठेवलं. चोखोबांची जन्मकथा म्हणून सगळे हीच सांगतात. शिवदास राजेसुद्धा ही कथा सांगतात, मात्र त्यांना ती आख्यायिका वाटते. सुदाम आणि सावित्री विठ्ठलाचे परमभक्त होते, सात्विक होते. त्यामुळं त्यांच्या पोटी प्रत्यक्ष विठ्ठलानं अवतार घेतला. चोखोबा हे योनिज होते, असं शिवदास राजे यांचं ठाम मत आहे. त्यांच्याकडे स्वर्गीय बबनराव जाधव यांचं एक हस्तलिखीत होतं त्यामध्ये चोखोबांचं आडनाव गाडे होतं, असं त्यांना आठवतं. परंतु या भागात चोखोबांचं आडनाव काकडे असल्याचा समज आहे, असंही ते म्हणाले.

चोखोबांविषयी बोलताना त्यांचं अंत:करण भरून येतं. त्यांनी जमा केलेले दुर्मीळ ग्रंथ अनेक संशोधकांनी परत आणण्याच्या बोलीवर नेले, ते आणूनच दिले नाहीत, अशी खंत त्यांना आहे. मात्र स्मरणशक्ती दांडगी असल्यानं आजही ते पान क्रमांकासहित अभंग ऐकवतात. चोखोबांच्या जन्मस्थळी गाडगेबाबा आणि कैकाडी महाराजांचं कीर्तन झालं होतं. हे कीर्तनही त्यांना आठवतं. या परिसरात एक उपचोखोबा नावाचं संत व्यक्तिमत्त्व होतं. ते चोखोबांच्या जन्मस्थळावरच राहत असत. अतिशय साधूवृत्तीच्या या माणसाला कैकाडी महाराजांनी सर्वसंगपरित्याग करण्याचा सल्ला मेहुणाराजातच दिल्याचं ते म्हणाले. चोखोबांसाठी प्रत्यक्ष विठ्ठल तीन वेळा मेहुणाराजात आल्याचे अभंग ते सांगतात. कर्ममेळा या चोखोबांच्या मुलाचा जन्म हा विठ्ठलानं बाळंतपण केल्यानं झाल्याचं सांगताना त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतात. शिवदास राजे हे मेहुणाराजातील सर्वात वयस्कर गृहस्थ. त्यांचा अभ्यास आणि चोखाबांवरील भक्ती यामुळं त्यांना भेटल्याशिवाय मेहुणराजाची वारी पूर्ण होत नाही.

कधीकाळी निर्मळा नदीच्या कुंडात स्नान केलेले शिवदास राजे यांना आता तो कुंड बुजल्याचं शल्य आहे. निर्मळा, बंका यांच्या समाध्या म्हणून जी शिवलिंग दाखवली जातात, त्या खर्याा समाध्या नाहीत. नदीच्या काठावरील गाळात त्या दबल्या असल्याचं शिवदास राजे सांगतात. महान संत चोखोबा आमचं भाग्य म्हणून आमच्या गावात जन्माला आले. पण आम्हाला त्यांना वैभवात ठेवता आलं नाही, ही खंत ते सांगतात.

या गावातील अनेकांना चोखोबांवरील संशोधन, लिखाण यासारख्या गोष्टी माहीत नसल्याचं जाणवतं. अलीकडेच डॉ. शांताराम बुटे यांनी चोखोबांची अभंगगाथा प्रकाशित केली आहे. बुलडाण्याच्या अध्यापक महाविद्यालयात प्राचार्य म्हणून डॉ. बुटे यांनी काम केलं आहे. चोखोबांच्या अभंगाचे अभ्यासक म्हणून त्यांनी मेहुणाराजाला भेट दिली आहे. इथं त्यांनी चोखोबा समजून घेतला आहे. आज त्यांचं पुस्तक अनेकांच्या घरात दिसून आले.

मेहुणाराजातून निघताना एकीकडे चोखोबांची एकरूप श्रद्धा, कर्ममेळाचा विद्रोह, सोयरा, निर्मळा, बंका यांची जीवननिष्ठा यांचा गजर मनात रुंजी घालत असतो. पण त्यांचं जन्मस्थळ मात्र आजही एकाकी, उपेक्षित अन् पूर्वीप्रमाणंच गावकुसाबाहेर असल्याचं शल्य त्याच मनाच्या कोपर्यातत खुपत राहतं.

मेहुणाराजाचा निरोप घेऊन चोखोबांची एकमेव खूण शिल्लक असलेल्या पालखीचं दर्शन करण्यासाठी आम्ही उगला गाठलं. छत्रपतींना घडवणार्याख जिजाऊंच्या मातीत म्हणजे सिंदखेडराजाच्या जवळ चोखोबांची पालखी विराजमान आहे. उगला या गावातील अंकुशराव काकडे यांचं घर शोधून काढलं. चोखोबांच्या पालखीच्या दर्शनासाठी आलो म्हटल्यावर त्यांच्याही डोळ्यात आनंद, आश्चर्य आणि थोडंसं भीतीचे भावही आले. चोखोबांची हीच ती पालखी ज्या पालखीच्या झेंड्याखाली वारकरी पंढरीनाथाच्या दर्शनासाठी जात असत. संपूर्ण तांब्याची असलेली ही पालखी आता जीर्णावस्थेला आली आहे. या पालखीत श्री विठ्ठल-रखुमाईची पितळी मूर्ती आणि पादुका आहेत. साधारणपणे शंभर वर्षांपूर्वी पंढरीची वारी बंद पडली. त्यानंतर या पालखीची वारी पैठण येथे षष्ठीला होत असे. मात्र १९५६ नंतर पैठणची वारीही बंद पडली. दोन महान संतांची होणारी भेटही थांबली. काकडे कुटुंबाकडे १९२४मध्ये १७० रुपयांमध्ये पंढरपूर येथे जागा विकत घेतल्याचा स्टॅम्पपेपर आहे. मात्र त्याचं पुढं काय झालं याची माहिती नाही. ‘श्री रामकृष्ण हरी’ लिहिलेला बिल्ला, दतात्रय जनार्दन असं नाव अंकीत असलेला आणखी एक धातुचा बिल्ला तसंच बाराव्या शतकातील एका दुर्मीळ ग्रंथाचं मुखपृष्ठ इतकाच ठेवा त्यांच्याकडे आहे. मेहुणाराजा गावात ही पालखी का देत नाही, असं विचारल्यावर काकडे परिवार ठामपणे नकार देतात. चोखामेळा यांच्याशी नातं सांगणारी ही एकमेव खूण आज अस्तित्वात आहे. पण त्या पालखीतून पांडुरंगाला त्याच्या लाडक्या भक्ताची चोखोबांची भेट करून देणारा मात्र कुणी उरलेला नाही. उगल्यातही नाही आणि मेहुणाराजातही नाही.

0 Shares
भूमी संतांची पंढरीच्या गाभाऱ्यात चोखोबाचा जोहार