भूमी संतांची

सुकृत करंदीकर

‘पंढरपूर पान्याचं, सांगोलं सोन्याचं अन् मंगुडं दान्याचं’, अशी म्हण आहे. म्हणजे, पंढरपुरात मुबलक पाणी, सांगोल्यात सोन्यासारखी समृद्धी आणि मंगळवेढा जोंधळ्याचं कोठार! इथल्या लोण्यासारख्या काळ्या रानात जोंधळा भरभरून लगडतो. अनुकूलतेचा पाऊस पडो न पडो, मंगळवेढ्याच्या शिवारात माणुसकी उगवतेच उगवते. ती इथं पेरलीय, चोखामेळादी थोर संतांनी.

मंगळवेढे भूमी संतांची… सुट्टीच्या दिवशी लाऊडस्पीकरवर लागलेलं हे गाणं ऐकून सगळ्या अंगभर जणू पिसं फुटायची. जीवाचं पाखरू व्हायचं. आज गावात सार्वजनिक कार्यक्रम असणार. मज्जा येणार… यात्रा-जत्रा, सणासुदीच्या दिवशी हेच वातावरण असायचं. बालपणी ते गाणं आणि आनंदाचं असं समीकरणच होतं. पुढं कळलं ते गाणं आपल्याच गावाचं होतं आणि ते आपल्या खणखणीत आवाजात गाणारा गायकही गावातलाच. लोकगायक प्रल्हाद शिंदे. बारसं असो, लग्न असो की सत्यनारायणाची पूजा… हे गाणं महाराष्ट्रातल्या गावागावात वाजायचं. पुढं आणखी लक्षात असं आलं की, त्या गाण्यात ज्या संतांची वर्णनं आहेत, ते सर्वच आपल्या गावातले आहेत आणि त्यांच्यामुळंच आपल्या गावाचं नाव सर्वत्र प्रसिद्ध झालंय. मग मी मंगळवेढ्याचा आहे, हे शहरात गेल्यावरही ऐटीत सांगू लागलो.

मंगळवेढ्याचं सगळं बालपणच तुडुंब आनंदानं भरलेलं होतं. गावच्या महादेवाच्या चिरेबंदी विहिरीत शेजारच्या वडाच्या उंच झाडावरून सूर मारून तासनतासत डुंबत राहणं म्हणजे सर्व सुखाचे आगर! अख्खा मंगळवेढा या विहिरीत पोहायला शिकला. महादेवाच्या मंदिरात भली थोरली पिंड. बाहेर वडाच्या झाडाभोवती मोठा पार. त्यावर गर्द सावली. वडाची पिवळी-लाल फळं. त्यासमोर दत्ताचं देऊळ. त्यावर सावली धरून उभा राहिलेला कडूनिंब. विहिरीच्या एका कोवाड्यात ब्रम्हदेवाची काळ्या पाषाणातली उंच मूर्ती. तिला मात्र सगळे टाळायचे. दर्शन घ्यायचे नाहीत. पूजा करायचे नाहीत. कारण म्हणे ब्रम्हदेव स्वत:च्या मुलीशी अनैतिक वागला होता.. अशा अनेक आख्यायिका, परंपरा, ऐतिहासिक, सामाजिक वारसा जपणारा माझा मंगळवेढा गाव. ‘पंढरपूर पान्याचं, सांगोलं सोन्याचं अन् मंगुडं दान्याचं’, असं या पंचक्रोशीचं वर्णन लोकभाषेत केलं गेलंय. याचा अर्थ पंढरपुरात मुबलक पाणी, सांगोल्यात सोन्यासारखी समृद्धी आणि मंगळवेढा म्हणजे जोंधळ्याचं कोठार. खरं तर हा परिसर कायम दुष्काळ झेलणारा. पण इथलं लोण्यासारखं काळं रान एवढं सुपीक की फक्त वारं पिऊन इथला जोंधळा भरभरून पिकतो. या रानाच्या जीवावर तर इथल्या दामाजीपंतांनी ज्वारीचं भरलं कोठार भुकेल्यांसाठी खुलं केलं होतं. त्याच्या माणुसकीचा महिमा एवढा मोठा की, प्रत्यक्ष विठ्ठलानं त्या लुटवलेल्या कोठाराची भरपाई बिदरच्या बादशहाला सोन्याच्या मोहोरांनी करून दिली. पाऊस पडो न पडो, मंगळवेढ्याच्या शिवारात अजूनही अशी माणुसकी उगवते. कारण तिची मशागतच तशी झाली आहे. अनेक संत, महात्म्यांनी समतेच्या विचारांचं खतपाणी घालून इथली भूमी सुपीक केलीय.

वैदीक, जैन, शैव, वैष्णव, लिंगायत, सूफी असे अनेक पंथ, संस्कृती मंगळवेढ्यात एकमेकांच्या सोबतीनं नांदल्या. त्यांनी मानवतेची गाणी गाणार्याक अनेक संतांना घडवलं. बिज्जल राजाचे प्रधान बसवेश्वर यांनी याच मंगळवेढ्यात स्त्रीशूद्रांना अधिकार देणार्यास लिंगायत धर्माची स्थापना केली. पुढं टीकाचार्य उर्फ स्वामी जयतीर्थ, संत मौनीबुवा, श्रीकृष्णभक्त मुस्लीम संत लतीफबाबा, सीताराम महाराज, अक्कोलकोटचे स्वामी समर्थ, कान्होपात्रा तसंच संत चोखोबा आणि त्यांचं कुटुंब; असे जवळपास चौदा संत मंगळवेढ्याच्या भूमीनं घडवले.

क्षितीजापर्यंत पसरलेली काळी रानं, सुसह्य हवामान, पंढरपुरातून येणारी चंद्रभागा आणि वर्षातले काही महिने का होईना दुथडी वाहणारी माण या नद्या गावापासून दहा-पंधरा मैलाच्या अंतरावर. या सार्याा अनुकूलतेमुळे राजा-महाराजांनी ही भूमी आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी लढाया केल्या.

सुमारे हजार वर्षांपूर्वी मंगळवेढ्यावर कल्याणीच्या चालुक्य घराण्यातील सम्राटांची सत्ता होती. म्हसवड (जि. सातारा) येथे इसवी सन ११४७ मधला एक शिलालेख सापडला आहे. या शिलालेखात मंगळवेढे नगरी ही कलचुरी बिज्जलांचं ठाणे असल्याचा उल्लेख आहे. बिज्जलानंतरचा तिसरा राजा संकम याचा शके १०९५ मधला कानडी भाषेतला शिलालेख आहे. त्यातही ‘मंगळवाड’ हे कलचुरी सोयीदेव याचं स्थिर शिबिरस्थान असल्याचं म्हटलं आहे. देवगिरीच्या यादव वंशातील भिल्लम राजानं मंगळवेढ्याच्या कलचुरी घराण्याचा शेवट केला. इसवी सन ११९१ मध्ये कलचुरींचा शेवटचा राजा बिल्हण पराभूत झाला. देवगिरीकर यादवांचा पराभव बहामनी राजांनी केला. आपसूकच मंगळवेढे बहामनी राज्यात सामील झाले. राजेराजवाड्यांची सत्तांतरं, व्यापारी पेठांमधल्या उलाढाली आदींमुळे हजार वर्षांपूर्वीचं मंगळवेढे सदोदीत गजबजलेलं होतं. मंगळवेढ्यापासून काही कोसांवर भीमेच्या तिरी पुण्याच्या डेक्कन कॉलेजनं काही वर्षांपूर्वी उत्खनन केलं. त्यात थेट मोहंजोदडो-हडाप्पा संस्कृतीशी जवळीक साधणार्याढ वस्तू त्यांना मिळाल्या. मंगळवेढ्यातून पाश्चिमात्य देशांशी व्यापार-उदीम चालत असावा, याचे पुरावे मिळाले.

एकेकाळी मंगळवेढ्यात नऊ बुरुज होते. आता चौबुर्जी तेवढी शाबूत आहे. केवळ दगडामातीच्या त्या चार बुरुजांचे आकार पाहिल्यानंतर त्या कठीण कामाचं आश्चर्य वाटतं. या बुरुजांभोवती खंदक खणून ठेवले होते. भुईकोट किल्ल्याच्या तटाची रुंदीच तेरा फूट आणि उंची चाळीस फुटांची होती. सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती नेताजी पालकर यांनी विजापूरच्या आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून घेत शिवशाहीत आणला. शिवाजी महाराज आणि औरंगजेबाचे सरदार जयसिंग यांची मंगळवेढ्याच्या किल्ल्यात भेट झाल्याचा उल्लेख आहे.

स्थैर्य आणि समृद्धी असलेल्या ‘हाताला काम अन् पोटाला भाकरी’ देणार्याल या गावात चोखामेळा आले आणि गावचेच होऊन गेले. गावकीची कामं, मोलमजुरी करता करता त्यांना पंढरीच्या विठुरायाची गोडी लागली. पंढरपूर इथून अवघ्या १४ मैलांवर. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक स्वातंत्र्य जपणार्याम या परिसरात चोखोबा रमले. बरीच भटकंती केल्यानंतरही ‘गड्या आपुला गाव बरा’ अशी भावना चोखोबा एका अभंगातून व्यक्त करतात.
बहुत हिंडलो देश देशांतर|
परी मन नाहीं स्थिर झालें कोठें॥
बहुत तीर्थें फिरोनियां आलों| मनासवें झालों वेडगळची॥
बहुता प्रतिमा ऐकिल्या पाहिल्या|
मनाच्या राहिल्या वेरझारा॥
चोखा म्हणे पाहतां पंढरी भूवैकुंठ|
मनाचे हे कष्ट दूर गेले॥

याचाच अर्थ सामाजिक उतरंडीत कष्टाचं जीणं वाट्याला आलेल्या चोखोबांना मंगळवेढा आणि पंढरपूरचा परिसरच आपला वाटला. याच परिसरात त्यांच्या प्रतिभेला धुमारे फुटले. आज राजेरजवाड्यांचं वैभव राहिलं नाही पण चोखोबांच्या शव्दांचं वैभव मात्र कायम राहिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे याच परिसरात त्यांना नामदेव, ज्ञानदेवादी संतांचा सहवास लाभला. या सहवासातच मजूर चोखोबा संत चोखामेळा बनले. अनुभवातून आलेलं जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणारे अभंगलेखक बनले. चोखोबांचं वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ एकटेच लेखक, अभ्यासक झाले नाहीत तर त्यांनी कुटुंबालाही साक्षर केलं. त्यांची पत्नी सोयराबाई, मुलगा कर्ममेळा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका लिहिते झाले. या सर्व साधनेसाठी गाव, परिसराचं वातावऱण पोषक अस़णार. शिवाय गावकर्यांहमध्येही चोखोबांचं ‘गुडविल’ असणार. म्हणून तर गावातील अनंतभट्ट या ब्राम्हण तरुणानं चोखोबांचे अभंग लिहून घेतले.

असं असलं तरी सत्तेपुढं शहाणपण चालत नाही. सत्ताधार्यां पुढं गावकरी सामान्य आणि चोखोबा तर मजूरच. विजापूर ते माणदेशी पठार या विस्तारात कळीचं ठाणं म्हणून मंगळवेढ्याच्या भुईकोटाला महत्त्व होतं. गावाभोवतीचे बुरुज, तटबंदी, खंदक याच्या दुरुस्तीची कामं वरचेवर केली जात असत. तेराव्या शतकात मंगळवेढ्याच्या तटबंदीचं काम हाती घेण्यात आलं. त्यासाठी मजूर जमा केले जाऊ लागले. त्यात विठ्ठलभक्तीत बुडालेल्या चोखोबांनाही जबरदस्तीनं आणून कामाला जुंपलं गेलं. त्या कष्टाचं वर्णनही रात्रंदिवस पडिलों हाव भरीं| मातीची उकरी कुसुवाची॥ असं चोखोबांनी करून ठेवलंय. भुईकोटाच्या पूर्वेकडील वेशीचं काम सुरू असताना एकाएकी ते बांधकाम कोसळलं आणि इतर मजूरांसह चोखोबाही त्या ढिगार्यालखाली गाडले गेले. इसवी सन १३३८ मध्ये वैशाख वद्य पंचमीस ही घटना मंगळवेढ्यात घडली. चोखोबांच्या अपघाती मृत्यूची खबर मिळताच नामदेवमहाराज पंढरपुरातून मंगळवेढ्यात घटनास्थळी आले. एवढ्या ढिगार्याढतून चोखोबांच्या अस्थी शोधण्याचं कोडं त्यांच्यापुढं होतं. ते चोखोबांनीच सोडवलं. त्यांची हाडं ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणत होती! ती घेऊन नामदेवांनी पंढरपूर गाठलं. देवाच्या या लाडक्या भक्ताची हाडं महाद्वारासमोरच पुरली. त्यावर समाधी बांधली.

ज्या ठिकाणी चोखोबांचा प्राण गेला त्या ठिकाणी मंगळवेढेकरांनी श्रद्धेनं दिवा लावण्यास सुरवात केली. या ‘दिव्याच्या पारा’वर गेली सातशे वर्ष चोखोबांच्या स्मृतीचा हा दिवा तेवतो आहे. केवळ दिवा लावण्यापुरतीच नाही, तर चोखोबांनी सांगितलेली समता, बंधुभावाची, गरजूंना मदत करण्याची शिकवण आचरणात आणून चोखोबांच्या स्मृतींचं खरंखुरं जतन मंगळवेढेकरांनी केलंय. माझे आजोबा या विचारांचे पाईक. नावाजलेले वकील होते. पण वकिली कधी पैशांसाठी केली नाही. त्यांचं नाव रामचंद्र गणेश करंदीकर उर्फ भाऊसाहेब. वकीलसाहेब म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. सांगली संस्थानचे प्रतिनिधी असल्यानं त्यांना गावात मान होता. त्यांनी गावातली दामाजीची पेवं शोधून काढली. गावात दामाजीचं मंदिर, संस्थान, पंढरपुरातील मठ उभारण्यात पुढाकार घेतला. ते पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाशी संबंधीत होते. त्यामुळे त्यांनी कर्नाटकातील बिदरला जाऊन दामाजीच्या इतिहासाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

सांगली संस्थानावर निवडून गेल्यानंतर त्यांनी चोखोबांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं. दरम्यानच्या काळात मंगळवेढे गावाचा पसारा वाढला होता. गावाची वेस आता मुख्य चौकातच आली होती. चोखोबारायांचं प्राणोत्क्रमण झालेली जागा अर्थात ‘दिव्याचा पार’ येथली वर्दळ वाढली होती. वेळीच काळजी घेतली नाही तर चोखोबांच्या स्मृती नामशेष होण्याची शक्यता होती. १९४० साली सर्व गावकरी जातीभेद मोडून पुढे आले. ब्राह्मण आजोबांसोबत मराठा समाजाचे भाऊसाहेब चेळेकर, जैन समाजाचे रतनचंद शहा, मारवाडी समाजाचे कि. रा. मर्दावकील, लिंगायत समाजाचे भुजंगराव वठारे एकत्र आले. दिव्याच्या पारावर फक्त एक दगड चोखोबांची स्मृती जपत उभा होता. त्या चौथर्या ची डागडुजी करून त्यावर चोखोबांच्या पादुका ठेवण्यात आल्या. सुंदर घुमटी बांधण्यात आली. त्यासाठी आजोबांनी सरकार दरबारी प्रयत्न केले. सांगलीचे राजे हिज हायनेस चिंतामणराव पटवर्धन यांनीही या गोष्टीला सर्वतोपरी सहकार्य केलं. तत्कालीन नेते बाळासाहेब खेर यांनी आर्थिक मदत दिली. चोखोबांची समाधी अशी सर्व जातीधर्मीयांच्या एकत्रित प्रयत्नातून उभी राहिली. या समाधीचं लोकार्पण सांगलीच्याच पटवर्धन राजेसाहेबांनी १९६० मध्ये केलं.

चोखोबांसहित मंगळवेढ्यातील इतर संतांचा महिमा आजोबांनीच पहिल्यांदा पुस्तकबद्ध केला. त्यांनी चोखोबांना खरा न्याय दिला तो पंढरपूरचा विठोबा बडवेमुक्त करण्याच्या प्रकरणात. सेवा म्हणून वारकर्यांयच्या बाजूनं ते कोर्टात लढले आणि जिंकलेही. एरवीही ते गोरगरीबांचे खटले फी न घेता लढवायचे. गरीबीमुळं शिक्षण घेत असताना त्यांना अनेक अडचणी सोसाव्या लागल्या. त्या इतरांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून त्यांनी अनेक मुलांना शिकण्यासाठी मदत केली. त्यांचं रोजचं जेवण म्हणजे मोठी पंगतच असायची. रोज तीस-चाळीस लोक तरी घरी जेवायला असायचे. सर्व जातीपातींची माणसं घरात वावरायची. गावात पै पाहुणे आले की त्यांचा पहिला पाहुणचार आजोबा करायचे. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात शिकलेले आजोबा दरवर्षी पायी पंढरपूरला जात. गावातील दामाजींची पालखी, चोखामेळांचा वार्षिक उत्सव साजरा करणं म्हणजे जीवितकार्यच मानत. ते अनेक संस्था संघटनांशी संबंधीत होते. गावचं जुनं ग्रंथालय जोपासणं असो, इंग्लिश स्कूल उघडणं असो की बार असोसिएशनची स्थापना या सर्व कामांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. संतांनी रुजवलेलं ‘सोशल इंजीनिअरिंग’ जोपासण्यासाठी ते आयुष्यभर काम करत राहिले.

खरं पाहता मंगळवेढ्याची मातीच मतं आणि विचारांचं वैविध्य सामावून घेणारी आहे. बसवेश्वर, चोखोबांपासून ते अक्कलकोटच्या स्वामी समर्थांपर्यतच्या परंपरेचे पाईक इथं नांदतात म्हणून मंगळवेढ्यात पराकोटीच्या जातीयतेचे फुत्कार कधी उमटले नाहीत. मंगळवेढ्यानं सांगली संस्थानाच्या निवडणुकीत ब्राह्मण उमेदवार करंदीकर वकील, मराठा उमेदवार भाऊसाहेब चेळेकर, मातंग समाजाचे निवृत्ती बेंद्रे आणि लिंगायत समाजातील भुजंगराव वठारे या चार जातींच्या चार लोकप्रतिनिधींना निवडून दिलं. त्यामुळंच तर चोखोबांच्या समाधीसाठी भर चौकात जागा का द्यायची, अशी बारीकशी शंकाही कोणाच्या मनात आली नव्हती. बदलत्या काळासोबत मंगळवेढाही बदलतंय. चोखोबांची छोटी का होईना मंगळवेढ्यात समाधी तरी आहे. पण २१ वर्ष वास्तव्य करणार्याग बसवेश्वीरांच्या काहीही खुणा इथं पाहायला मिळत नाहीत. संतपरंपरेतील थोर महिला संत कान्होपात्रेचं मंदिर नीट करावं, असं कोणाला वाटत नाहीये.

पूर्वी आत्मियतेनं साजर्याो होणार्याक चोखोबांच्या वैशाखातल्या पुण्यतिथीचा आता सोहळा होऊ पाहतोय. त्याचे फ्लेक्स राजकीय मंडळींच्या फोटोंसह गावात झळकताना दिसतायत. सर्वांचे झालेले चोखोबा मंगळवेढ्यातच विशिष्ट कुंपणापुरते मर्यादीत होतात की काय, असं वाटू लागलंय. दामाजीपंतांच्या तर जातीचं ‘संशोधन’ सुरू झालंय. समता आणि बंधुतेची क्रांती करणारे बसवेश्वरही एका विशिष्ट समाजाच्या चौकटीत दिसू लागलेत. जातीपातींचे फणे ताठ होताना दिसतायत. अशावेळी मला चोखियाची महारी अर्थात संत सोयराबाई आठवतायत. त्या म्हणतात,
अवघा रंग एक झाला| रंगी रंगला श्रीरंग॥
मी-तूंपण गेलें वाया| पाहतां पंढरीच्या राया॥
नाहीं भेदाचे ते काम| पळोनी गेले क्रोध काम॥

संतांनी पक्का केलेला हा समता-बंधुभावाचा रंग मंगळवेढेकरांनी उडू न देणं हेच संत चोखोबारायांचं खरं स्मारक ठरेल.

0 Shares
मेड फॉर इच अदर चोखोबांची पालखी