मेड फॉर इच अदर

राजस पैंगीणकर

चोखोबांची बहीण निर्मळा आणि सोयराबाईंचा भाऊ बंका हे एकमेकांचे नवराबायको. मेहुणपुर्याबतल्या या दाम्पत्याविषयी फार काही माहिती उपलब्ध नाही. तरीही त्यांच्या उपलब्ध अभंगांवरून त्यांचं मोठेपण कळतंच. समाजाने झिडकारलं तरी महाराष्ट्राच्या संतमंडळानं सोपवलेली खांद्यावरची माणुसकीची काठी उंच नेण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती.

कवी आपल्या सोबतच्या कवींविषयी कधी लिहितात का? आता नाही पण मध्ययुगात हे घडायचं. संतकवी एकमेकांविषयी लिहित राहायचे. आपल्या सोबतच्याच नाही तर आपल्या आधीच्या संतांविषयी देखील. विशेषतः महाराष्ट्रातल्या संतांमध्ये तरी ते बरंच झालं. त्यांचा रस्ताच वेगळा होता. कारण त्यांचा देव विठोबा वेगळाच होता. तो नवसाला पावणारा नव्हता. कुणासाठी तो विष्णू होता कुणासाठी शिव. कुणासाठी बुद्ध होता, कुणासाठी जिन. ना त्याच्याकडे शस्त्रं ना कोणतं वाहन. त्याचा ठाव ना वेदांमध्ये ना पुराणांत. तो पृथ्वीवर आला ना धर्माच्या संस्थापनेसाठी, ना दुष्टांच्या निर्दालनासाठी. कोणत्या राक्षसाला त्याला मारायचं नव्हतं की धावा करणार्याव भक्तावर त्याला प्रसन्न व्हायचं नव्हतं. तो आला होता आपल्या पुंडलिक नावाच्या भक्ताची ‘कर्टसी व्हिझिट’ घ्यायला. त्यानं फेकलेल्या विटेवर तो आता अठ्ठावीस युगं उभा आहे.

अशा या मुलखावेगळ्या देवाचे भक्त अधिकच मुलखावेगळे. तेच आपल्या देवासाठी धावून आले. त्यांनी प्रेमाची लेखणी उचलली आणि या शेंडाबुडखा नसलेल्या पांडुरंगाला परब्रह्म बनवलं. त्यांच्या प्रेमाची, भक्तीची, त्यागाची ताकदच इतकी मोठी होती की पांडुरंग परब्रह्मापेक्षाही मोठा झाला. त्यासाठी त्यांनी रचली नवी पुराणं, नव्या कथा. त्या कथा पुराणातली वांगी नव्हती. ते त्यांच्या आसपासच घडत होतं. सगळं संतमंडळ आनंदात न्हात होतं आणि त्यांच्याबरोबर विठ्ठल रमत, बागडत होता. त्याच्या या आनंदमेळ्याच्या कथा आल्या. त्या कथा कोणाच्या, संतांच्या की पांडुरंगाच्या? खरंतर दोघांच्याही. संतांसोबत उभी राहिली देवाची महती आणि देवासोबत उभी राहिली संतांची थोरवी.

आज संतांविषयी माहिती शोधायची म्हटल्यावर संतांनी आपल्या सोबतच्या संतांविषयी सांगितलेल्या गोष्टींवर अवलंबून राहावं लागतं. नाहीतर संतांच्या कथांमध्ये अद्भूततेचा पाक घोटून घोटून तयार झालेल्या लोककथांवर. बंका आणि निर्मळा हे काही पहिल्या फळीतले संत नाहीत. त्यामुळे चोखोबांबद्दल जेवढं आहे तेवढंही त्यांच्याबद्दल लिहिलं असण्याची शक्यता नाही. ना संतांच्या अभंगांत ना आख्यायिकांत.

चोखोबांच्या पंचरत्नी गाथेत तशी एक कथा सापडते. मेहुणपुऱीच्या एका महाराच्या घरातली. चोखा-निर्मळा आणि सोयरा-बंका या बहीण भावांच्या वाडवडिलांची. राम आणि गजराबाई हे मूळ दाम्पत्य आहे. त्यांना दोन मुलं कृष्ण आणि मीरा. कृष्णाचं लग्न झालं भीमाशी आणि मीरेचं निवृत्तीशी. कृष्ण आणि भीमा यांना बंका आणि सोयरा ही मुलं झाली तर निवृत्ती आणि मीरा यांना चोखोबा आणि निर्मळा ही मुलं झाली. पण बाकीच्या सर्वच ठिकाणी चोखोबांच्या आईवडिलांचं नाव सुदाम आणि सावित्री मानलं गेलंय. शिवाय निवृत्ती, मीरा ही संतांची नावं कुणीतरी जोडल्यासारखी आलीत. पण नावात फारसं काही नसतंच. या कथेतून बोध घ्यायला हरकत नाही, की दोन्ही घरांत भक्तीचं वातावरण असावं. आत्याच्या घरी भाची देण्याचा रिवाज महारांमध्ये सर्रास होता, असं चोखोबांवर पी.एचडी करणार्या् सरिता जांभुळे यांनी नोंदवून ठेवलंय. ते आधीच्या पिढीतही झालं असावं. नंतरच्या पिढीत तर ते झालंच झालं. चोखोबाची बहीण बंकोबांना दिली आणि बंकोबांची बहीण चोखोबांना. याच कथेला खरं मानाल तर चोखोबा-सोयरांना मुलगा झाला त्याचं नाव कर्ममेळा आणि बंका-निर्मळेच्या मुलाचं नाव हरी.

चोखोबा तसा जबरदस्त माणूस असावा. घरातल्या सगळ्यांवर त्याचा प्रचंड प्रभाव आहे. आता हरीविषयी कुणालाच काही माहीत नाही. पण बाकीच्या चौघांनीही आपल्या अभंगांतून चोखोबांचा हा प्रभाव लखलखीत मांडला आहे. बंका तर चोखोबांना आपला गुरूच मानतात. बहीण निर्मळा आपल्या भावाला सर्वस्व मानते. चोखोबांच्या डोक्यावर हात ठेवून नामदेवांनी त्यांचं डोकं भक्तीसाठी फिरवलं. त्यानंतर एकटे चोखोबाच बदलले नाहीत तर चोखोबांचं सगळं कुटुंबच बदललं. इथे चोखोबा कुटुंबप्रमुखासारखे आघाडीवर आहेत. त्यांच्या प्रेमाच्या धाग्यात कुटुंब जोडलेलं आहे. विठ्ठलाची भक्ती हे याच धाग्याचं अधिक व्यापक रूप आहे. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या मोठ्या कुटुंबात कुणाचे कोण नसलेले एकमेकांचे सगेसोयरे बनले. इथे तर सगळंच कुटुंब एकजीव होतं. ते भक्तीच्या आणि ज्ञानाच्या वर्षावात अगदी एकरूप झाले नसतील तरच नवलं. अवघा रंग एक झाला असणारच.

चोखोबांचा प्रभाव असला तरी त्यांच्या प्रभावात बंका आणि निर्मळा यांची व्यक्तिमत्त्व स्वतंत्र घडलेली दिसतात. ही संत नामदेवांची शैली आहे. चोखोबा आपल्या गुरूचं नामदेवाचं वर्णन करताना म्हणतात,
आपुले आपण करावें कारण | दुजीयासी खूण न कळेचिं ॥
जयाचा ठेवा तो तयासीच ठावा | येरा कळे हेवा त्यांचा काही ॥
जयाची ती खूण तयासीच ते ठावी | येरा नेणें जीवी सोय त्याची ॥
चोखा म्हणे माझा नामया तो भला | उगाणा दाविला अनुभवाचा ॥

गुरूला देव मानायचा आंधळेपणा इथे नाही. इथे आहे तो अनुभवांच्या आधारावर स्वतःतला प्रकाश शोधण्याची धडपड. त्यामुळे झापडबंद शिष्यांची फौज करण्यात कुणालाच रस नव्हता. जो तो स्वतःच स्वतःला शोधत शोधत घडला. त्यात अडीअडचणीला कुणीतरी एक गुरू म्हणून उभा राहिलेला दिसतो. तशा अर्थानं चोखोबा फक्त बंकांचे नाहीत तर सर्वच कुटुंबाचे गुरू आहेत. पण त्यांच्या वटवृक्षाखाली स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडलेली आहेत. तरीही त्यांच्या मनावरच चोखोबांचं मोहन कसं होतं, हे सांगणारा हा बंकांचा अभंग
चोखा चोखट निर्मळ | तया अंगी नाही मळ |
चोखा सुखाचा सागर | चोखा भक्तीचा आगर ॥
चोखा प्रेमाची माऊली | चोखा कृपेची साऊली ॥
चोखा मनाचे मोहन | बंका घाली लोटांगण ॥

निर्मळांचाही आपल्या भावावर मोठा जीव आहे. त्या आपल्या अभंगात सोयराबाईंसारखी नवर्याोची निजखूण देत नाहीत. आपल्याला त्यांच्या उपलब्ध असलेल्या २४ अभंगांमध्ये कुठेही बंक्याची महारी असा उल्लेख येत नाही. बंका हा शब्दच निर्मळांकडे नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व स्वतंत्र आहे. पण आपल्या भावाचा चोखोबांचा उल्लेख मात्र त्यांनी अनेकदा केलेला आहे. चोखोबांनी केलेला उपदेश निर्मळांनी आपल्या एका अभंगात वर्णन केला आहे. त्यानंतर आनंदून त्यांच्या पायाशी मिठी घातली, असंही त्यांनी म्हटलं आहे. हे दाम्पत्य चोखोबांशी प्रेमानं, भक्तीनं, ज्ञानानं आतून जोडलेलं होतं.

तेव्हा नामदेव ज्ञानेश्वरांच्या संतमंडळात दिग्गजांची गर्दी होती. एकेक जण डोंगरापेक्षा मोठा. त्यात बंका आणि निर्मळाबाई यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं, ही छोटी गोष्ट नाही. ते चोखोबांचे नातेवाईक आहेत किंवा जातीने खालचे आहेत म्हणून त्यांच्यासाठी विशेष जागा करण्यात आली असेल असं दिसत नाही. इथं सगळ्यांचेच कुणी ना कुणी नातेवाईक संतकवी असलेले दिसतात. नामदेव आणि ज्ञानेश्वरांचं सगळं कुटुंबच संतही आहे आणि कवीही. त्यामुळे कुटुंब असण्याचं कौतुक इथं नाही. इथं ज्यांनी जे काही मिळवलं ते कुणाच्या वशिल्यावर नाही. प्रत्येकानं आपलं स्थान कमवलं स्वतःच्या कर्तृत्वानं.

गर्जती विठ्ठल पवाडे | बंका काठीकर पुढे || या नामदेवांच्या अभंगात बंका यांचं स्थान संतमंडळात कसं आघाडीवर होतं हे समजतं. ते चोखोबांबरोबर नामदेव, ज्ञानदेवांच्या तीर्थावळीत सामील होते, असे उल्लेख काही ठिकाणी सापडतात. चंद्रभागेच्या तिरावर या तीर्थयात्रेची मावंदं पार पडली तेव्हा त्यात चोखोबा आणि बंकोबा सगळ्या संतांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. समतेचा हा काला आजही जगाला खुणावतो आहे. बंकांनी जसं चोखोबांचं वर्णन केलं आहे, तसंच त्यांनी आपल्या अभंगांत नामदेवांचा आणि ज्ञानेश्वरांचाही खूप सुंदर उल्लेख केला आहे. त्यांना या दोघांच्याही संपर्कात असण्याचा लाभ मिळाला असावा असं दिसतं.

संतमंडळात मान मिळाला तरी अस्पृश्य म्हणून रोजच्या शिव्या या संतांनाही चुकल्या नव्हत्या. त्या घुसमटीचा आविष्कार या दोघांच्याही अभंगात दिसून येतो. ‘हीन याति दीन पतित आगळा| म्हणोनि कळवळा न ये माझा||’, असा खणखणीत सवाल बंका पांडुरंगाला विचारताना दिसतात. तर निर्मळादेखील काहो पांडुरंगा मज मोकलिले | पारधीन केले जिणे माझे ||, असा प्रश्न सहजपणे करून जातात. पण सर्वसामान्यपणे दोघांच्याही अभंगांमध्ये विठ्ठलमहिमा, नाममहिमा, संसारसागरातून पार होण्याची आस असे विषय दिसून येतात. तसंच चोखोबांच्या आयुष्यातले प्रसंग रंगवून सांगण्यातही त्यांना आनंद मिळतो. त्यातली बंकांनी सांगितलेली सोयराबाईंच्या बाळंतपणाची कहाणी सुंदर आहे. देव निर्मळाबाईंचं रूप घेऊन आला आणि त्यानं सोयराबाईंना सोडवलं असं हे अभंग सांगतात. निर्मळा आणि सोयरा या दोघींमध्ये खूपच प्रेमदेखील असावं. खरंतर नणंद भावजय, सासू सून ही अशी नाती आहेत की तिथं हेवा, मत्सर, रागच अधिक. पण या दोघी एकमेकींविषयी इतक्या उमाळ्यानं लिहितात, की दंग व्हायला होतं. देशभरातल्या महिला संत ज्याप्रमाणं बालपणापासून देवाला पती मानून पूजतात, तसं महाराष्ट्रातल्या प्रमुख महिला संत करताना दिसत नाहीत. निर्मळादेखील त्याला अपवाद नाहीत. आज त्यांचे अवघे दोन डझन अभंग उपलब्ध आहेत. पण त्याच जोरावर मुक्ताबाई, सोयराबाई, जनाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई या महिला संतांच्या प्रभावळीत त्या शोभून दिसतात.

चहूकडे देवा दाटला वणवा | कां न ये कनवा तुजलागी ||
सापडले संधी संसाराचे अंगी | सोडवी लगबगी मायबापा ||

हे निर्मळांचे शब्द कविता म्हणून किंवा आध्यात्मिक प्रचिती म्हणून किती योग्यतेचे आहेत ते कुणालाही कळू शकेल.

चोखोबांच्या अपघाती मृत्यूमुळे या कुटुंबावर वीजच कोसळली. कर्ममेळा यांनी पांडुरंगाला प्रश्न विचारून केलेला विलाप उठून दिसणारा आहेच, पण त्याचबरोबर अशाच आशयाचे एक-दोन अभंग बंका आणि निर्मळा यांनीही लिहिलेले आहेत. त्यामुळे चोखोबांच्या निधनानंतरही ही दोघं जिवंत होती, असं दिसतं. म्हणजेच दोघांनाही दीर्घ आयुष्य लाभलं होतं, असा अंदाज लावता येतो.

आज मेहुणाराजा या बुलाडाणा जिल्ह्यातल्या गावात म्हणजे बंका निर्मळा यांच्या मेहुणपुरीत आजही निर्मळा नदीच्या पात्रातील शिवलिंग बंका निर्मळा यांच्या समाधी म्हणून दाखवल्या जातात. काहींच्या मते नदीच्या गाळात मूळ समाध्या गाडल्या गेल्या आहेत. आज बंका आणि निर्मळा यांची हीच एवढी आठवण आहे. पण तिचं महत्त्व कुणालाच नाही.

0 Shares
निरुत्तर करणारं प्रश्नोपनिषद भूमी संतांची