जोहार चोखोबा जोहार

Ringan

देवळाच्या महाद्वारावर उभं राहून विठू पाटलाला जोहार करणारे चोखोबा. जवळपास आठशे वर्षांपूर्वी अद्भूत आयुष्य जगणारा हा माणूस. त्यांना संत म्हणा, कवी म्हणा, महापुरुष म्हणा, की आणखी काहीही. पण गावकुसाबाहेर कुत्र्यामांजरांपेक्षा वाईट वागवलं जाणार्याह चोखोबांनी जे करून दाखवलं त्याला आपल्या देशाच्या इतिहासात तोड नाही. त्या काळात अध्यात्म या सर्वात थोर मानल्या जाणार्याू क्षेत्रात त्यांनी केवळ स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर सर्वोच्च स्थान मिळवलं. जातिभेदाविरुद्ध नम्रपणे बंड करत त्यांनी त्या काळच्या महाराष्ट्रातील समाजपुरुषाच्या कानाखाली खणखणीत हाणली. आजही त्याचे वळ गेलेले नाहीत. म्हणून दुसर्याह ‘रिंगण’च्या निमित्तानं मायबाप चोखोबांना हा जोहार. जोहार चोखोबा जोहार!

पहिल्या ‘रिंगण’च्या निमित्तानं आम्ही नामदेव महाराजांना दंडवत घातला होता. त्याला तुम्ही सगळ्यांनी उचलून धरलं. गेली दोन वर्ष त्या कौतुकात आम्ही न्हातो आहोत. खरं तर गेल्या वर्षीच्या आषाढी एकादशीलाच ‘रिंगण’चा संत चोखामेळा विशेषांक यायचा होता. पण त्याच काळात आम्ही दोघंही मुंबईच्या बाहेर स्थिरावलो. स्थिरावण्याची अस्थिरता होतीच. शिवाय आळस पाचवीला पूजलेला. अंक हातून झाला नाहीच. दरवर्षीचा आषाढी वारीचा नेम चुकला.
तेव्हा वाटलं होतं, एक वर्ष अंक आला नाही तर काय बिघडणार? पण खूप बिघडलंय. वेळेवर अंक झाला असता तर अंकात असली असती, अशी तीन माणसं आज आपल्यात नाहीत. चोखोबांच्या पहिल्या गाथेच्या प्रकाशिका मंदाकिनी कदम नुकत्याच वयाच्या नव्वदीत गेल्या. चोखोबांच्या अभ्यासाचा पाया रचणारे स. भा. कदम यांच्या त्या पत्नी. त्यांचं शरीर पार थकलं होतं. पण स्मृती तल्लख होत्या. आम्ही चोखोबांवर काम करणार आहोत हे ऐकून त्यांचा सुरकुतलेला चेहरा आनंदानं फुलला होता. स. भा. कदमांविषयी त्या आमच्याशी बोलणार होत्या. पण आता सगळं राहून गेलं.

पहिल्या ‘रिंगण’मध्ये आम्ही ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे यांची मुलाखत घेतली होती. त्याच धर्तीवर या अंकात कॉ. शरद पाटील होते. एका कार्यशाळेच्या निमित्तानं मुंबईत झालेल्या चर्चेत त्यांनी धुळ्याचं निमंत्रणही दिलं होतं. त्यानिमित्तानं वारकरी परंपरेविषयी वेगळे आणि मूलभूत विचार समोर येतील असं वाटत होतं. आता कॉम्रेड नाहीत आणि ते विचारही.

नामदेव ढसाळांनी चोखोबांविषयी इथंतिथं थोडं थोडं लिहून ठेवलंय. म्हणून आम्ही त्यांना फोन केला होता. विषय ऐकून ते बेहद्द खूश झाले होते. भरभरून बोलले. लवकर या, मला खूप काही सांगायचंय, म्हणाले. पण तेवढ्यातच त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. ते बरं होऊन पुन्हा घरी येतील असं वाटलं होतं. पण ती परतीची वाट नव्हतीच. आंबेडकरी चळवळीतल्या ढसाळांच्या अनेक समकालीनांशी आमचे सहकारी मित्र सुनील तांबे यांनी संपर्क साधला. गंगाधर पानतावणे, राजा ढाले, प्रकाश आंबेडकर, आनंद तेलतुंबडे, शरणकुमार लिंबाळे, संजय पवार, अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे यांनी चोखोबांवर बोलायला नकार दिला. काहींना खरंच चोखोबांविषयी माहिती नव्हती. काहींच्या खरंच व्यावहारिक अडचणी होत्या. काहींना नीट संपर्क साधण्यात आम्ही कमी पडलो असू. पण यापैकी कुणाला जमलं नाही, हेही खरं आहे. ज. वि. पवारांनी मात्र लेख दिलाय. त्यांचे आभार!

नामदेव ढसाळ, शरद पाटील आणि मंदाकिनी कदम तिघे अंकात असते तर चोखोबांना अधिक आनंद झाला असता. हे करू शकलो नाही म्हणून आम्ही माफी मागतो आहोत. ‘रिंगण’चा हा संत चोखामेळा अंक त्या तिघांनाही अर्पण.
झालंय ते गोड मानून घ्यावं, ही विनंती. जोहार चोखोबा जोहार!

आपले नम्र,
सचिन परब / श्रीरंग गायकवाड

0 Shares
मानवतेचं गाणं