नाचू कीर्तनाचे रंगी

विठ्ठल पाटील

वारकरी संप्रदायात सर्वसाधारणपणे चोखामेळा महाराजांच्या गाथेचं पारायण होताना दिसत नाही. तशी परंपरादेखील कुठं सुरू नाही. असं असताना चोखोबांची स्मृतिभूमी मंगळवेढ्यात ‘वारकरी साहित्य परिषद’ या संस्थेच्या वतीनं ‘संत चोखामेळा गाथा पारायण सोहळा’ आयोजित केला होता. अतिशय जल्लोषात साज-या झालेल्या या कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील सर्व महत्त्वाचे धुरीण आवर्जून उपस्थित राहिले होते. त्याबद्दल सांगत आहेत स्वतः परिषदेचे अध्यक्ष.

बाराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वचर माऊली आणि नामदेव महाराज आदी संतांनी स्त्री, शूद्र, अतिशूद्र असा भेदभाव न करता ‘या रे या रे लहान थोर, याती भलती नारी नर’ या उक्तीप्रमाणं सामाजिक समतेचा विचार धारण करणार्याल वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. यामध्ये अठरापगड जाती आजही ‘लावुनी मृदंग श्रुती टाळ घोषा’च्या आनंदात तल्लीनतेनं पंढरीची वारी चालतात. हे करून दाखवणार्याय संतांच्या या महान मांदियाळीत संत चोखामेळा महाराजांचं स्थान अग्रणी आहे. संत चोखामेळा यांना दलित समाजातील आद्यकवी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. चोखामेळा यांचं अवघं कुटुंबच वारकरी होतं. कुटुंबातील सर्वांनीच अभंगरचना करून समाजाला दिशादर्शक तत्त्वज्ञान दिलं आहे. पंढरीपासून जवळच असलेलं मंगळवेढा ही त्यांची कर्मभूमी होय.

आजच्या भौतिक प्रगतीच्या जगात मृगजळामागं धावताना आपण सगळे चोखामेळा महाराजांचा आदर्श आणि विचार विसरलो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मानवी जीवन आनंदी राहण्यासाठी जीवनमूल्यं आणि नैतिकमूल्यं वृद्धिंगत होण्यासाठी चोखोबांसारख्या संतांच्या विचारांची प्रकर्षानं गरज आहे. याचकरिता अखिल भारतीय वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र या संस्थेनं २७, २८, २९ मे २०१३ रोजी जाणीवपूर्वक श्री संत चोखामेळा गाथा पारायण सोहळा मोठ्या उत्साहात सुरू केला. तो कायम मोठ्या प्रमाणात आयोजित केला जावा यासाठी वारकरी संप्रदायातील मंडळींनी त्यात भाग घेऊन चोखोबारायांचे सद्विचार प्रसारीत करावेत, यासाठी याप्रसंगी परिषदेच्या वतीने ‘श्री संत चोखाबा समग्र गाथा’ प्रकाशित केली गेली.

काम हीच परमेश्वरसेवा समजून पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन गावकुसाची भिंत बांधत असताना ती केव्हा कोसळली हे चोखोबारायांना समजलंच नाही आणि ते पांडुरंगात विलीन झाले. या संतश्रेष्ठ चोखोबांची मंगळवेढा येथे रस्त्याच्या मध्यभागी छोटी समाधी आहे. इतक्या मोठ्या संताचं एवढं छोटं स्मारक पुरेसं नाही. या महान संताच्या सद्विचाराची समाजाला प्रकर्षानं जाणीव करून देण्यासाठी त्यांचं भव्यदिव्य स्मारक मंगळवेढा येथे व्हावं यासाठी वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र आणि श्री संत चोखामेळा ट्रस्ट, मंगळवेढा या संस्थांनी सध्याच्या समाधीजवळ असलेल्या २२ हजार चौरस फूट जागेच्या मागणीसाठी सरकारकडे प्रस्ताव सादर केलेले आहेत. ही जागा मिळवून देण्यासाठी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आश्वाससनही दिलं आहे. ही जागा उपलब्ध करून दिल्यास संत चोखोबांची भव्य समाधी, संत साहित्याचं ग्रंथालय, वाचनालय आणि प्रशस्त सभागृह बांधून संत साहित्याच्या प्रचार आणि प्रसाराच्या कार्यासाठी त्याचा उपयोग केला जाईल.

श्री संत चोखामेळा पारायण गाथा सोहळ्याप्रसंगी तत्कालीन पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे प्रमुख अतिथी होते. त्याचबरोबर आमदार भारत भालकेदेखील उपस्थित होते. याप्रसंगी वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात हरिभक्तपरायण मुरलीधर अण्णा पाटील, डॉ. शिवाजीराव मोहिते, रामभाऊ गोसावी, रवींद्रभय्या पाटील, माधवमहाराज नामदास, नंदकिशोर लाहोटी, ज्ञानेश्व रमहाराज जळगावकर, शिवाजीमहाराज मोरे, समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष माधवमहाराज शिवणीकर, समस्त ज्ञानेवर पालखी सोहळ्याचे अध्यक्ष, भानुदासमहाराज ढवळीकर, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, देहू फड प्रमुख बापूसाहेब देहूकर, आजरेकर फड प्रमुख श्रीगुरू तुकाराम काळेमाऊली, बद्रीनाथमहाराज तनपुरे, चैतन्यमहाराज कबीर, राजाभाऊ चोपदार, जयंतमहाराज बोधले अशी आणि इतरही अनेक वारकरी संप्रदायातील प्रमुख मंडळी उपस्थित होती.

संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचावा या ध्येयानं कार्यरत असलेल्या वारकरी साहित्य परिषदेनं नाशिक, नेरूळ-नवी मुंबई आणि श्रीक्षेत्र शेगाव येथे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनं आयोजित केली आहेत. त्याचबरोबर २ ते ५ ऑक्टोबर २०१३ या कालावधीत सिऊर आणि औरंगाबाद येथे संयुक्तरित्या संत बहिणाबाई गाथा पारायण सोहळा आयोजित करून संत बहिणाबाईंची गाथा प्रकाशित केली. त्याचबरोबर श्री संत तुकाराम गाथा पुनरुत्थान दिन देहू येथे साजरा केला. तसंच संतांचे विचार घराघरांत पोहचावेत यासाठी वारकरी परिषदेच्या माध्यमातून तसंच सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यानं सध्या डीडी सह्याद्री वाहिनीवर ‘कीर्तनाचे रंगी’ ही कीर्तन, प्रवचन मालिका सुरू केली आहे. संत साहित्याचं स्वतंत्र अभ्यास केंद्र असावं याकरिता पुणे येथे देशपातळीवरील आणि नवी मुंबई येथे जागतिक पातळीवरील अभ्यासकेंद्र स्थापन करण्यासाठी परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. संतांच्या विचारांचं आणि कार्याचं स्मरण समाजाला व्हावं यासाठी परिषदेनं जाणीवपूर्वक उपक्रम सुरू केले आहेत. ही आम्ही संतश्रेष्ठ चोखोबारायांची सेवा आहे, असंच मनापासून मानतो.

0 Shares
खांद्यावर पताका समतेची रंगी रंगला श्रीरंग