रंगी रंगला श्रीरंग

राजेंद्र हुंजे

समाजानंही नाकारून चोखोबा गेली सातशे वर्ष जिवंत राहिले ते केवळ त्यांच्या शब्दांवर. त्यांच्या अभंगावर. महाराष्ट्रातील गोर-गरीब-निरक्षर जनतेनं त्यांचे अभंग पाठ केले. टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर नाचत म्हटले. अनेक गायकांनी आपल्या गायनातून चोखोबारांयांचा आर्त भाव जनतेपर्यंत पोचवला. चोखोबारायांच्या शब्दांना कोंदण देणार्यात लोकप्रिय अभंगांचा हा स्वरानुभव.

ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा…यांसारख्या अभंगांमधून समाजाला निरुत्तर करणारा प्रश्न विचारणारे संत चोखामेळा. त्यांच्या अभंगांचं गायन करताना अनेक गायकांना एक वेगळीच अनुभूती आली.

बालगंधर्व, छोटागंधर्व, कुमारगंधर्व, भारतरत्न पं. भीमसेन जोशी, गानसरस्वती किशोरीताई आमोणकर, पं. जितेंद्र अभिषेकीबुवा, पं. अजित कडकडे, गजलनवाज भीमराव पांचाळे याशिवाय अनेक दिग्गज आणि नामवंत गायकांनी चोखोबांचे अभंग तल्लीन होऊन गायले. चोखोबांच्या प्रत्येक शब्दाला स्वरसाज चढवत, गोड, मधाळ, धारदार स्वरांमधून ते जनतेपर्यंत पाझरवले. हे अभंग ऐकून चोखोबांचा आर्त भाव काळजाला भिडतो. त्यातील चोखोबांचं आर्जव व्याकुळ करतं. चोखोबांचे शब्द अंत:करण उजळून टाकतात. आम्हाला वेद पुराणे कळत नाहीत. आम्ही केवळ मुखाने देवाचे नाम घेणे जाणतो हे सांगताना ते, आम्हा नकळे ज्ञान न कळे पुराण| वेदांचे वचन नकळे आम्हा॥ असा अभंग सहज लिहून जातात.

या अभंगाला ज्येष्ठ संगीतकार राम फाटकांनी दिलेलं संगीत आणि पं. जितेंद्र अभिषेकी बुवांनी त्याला चढवलेला स्वरसाज म्हणजे सुवर्णस्पर्श योग. अभिषेकी बुवांच्या मधाळ आणि धीरगंभीर स्वरांनी चोखोबांना जे म्हणायचं होतं, ते अगदी नेमकेपणानं रसिकांपर्यंत पोचवलंय. चोखोबांचा प्रसिद्ध अभंग म्हणजे,

जोहार मायबाप जोहार| तुमच्या महाराचा मी महार॥
बहु भुकेला झालो| तुमच्या उष्ट्यासाठी आलो॥
चोखा म्हणे आणिली पाटी| आणिली तुमच्या उष्ट्यासाठी॥ …

या अभंगाला मूळ स्वरसाज लाभला बालगंधर्वांचा. त्यानंतर अनेक गायकांनी हा अभंग स्वरबद्ध केला. ‘संत कान्होपात्रा’ या संगीत नाटकामधून चोखोबांची ही रचना बालगंधर्वांनी सादर केली होती. मास्टर कृष्णरावांनी त्याला संगीत दिलं होतं. अभंगातील फिरकीच्या ताना या लावणीच्या चालीच्या अंगानं जाणार्या आहेत, पण शास्त्रीय संगीताच्या खास बाजामध्ये ही चाल बांधली गेलीय. कलिंगडा आणि बीभास या दोन रागांचं मिश्रण या चालीतून आपल्याला ऐकायला मिळतात. यातील रागदारीमुळे चोखोबांनी लिहिलेला प्रत्येक शब्द हृदयात पाझरू लागतो. त्याकाळची परिस्थिती, अगतिक, हात जोडून उभे राहिलेले चोखोबा डोळ्यासमोर उभे राहतात.

खरं तर संत नामदेवांनी तयार केलेला अभंग छंद असा आहे, की त्याला कुठलीही साधीसोपी चाल लावा. त्याला एक भजनी ठेका, नाद प्राप्त होतो. तरी चोखोबांची प्रत्येक रचना स्वरबद्ध करताना, त्यासाठी विशिष्ट अशा रागाची निवड केली गेली. त्यामुळंच त्यातला स्वरानुभव घेताना आपल्याला संतांनी सोसलेलं दु:ख, जगलेल्या आयुष्याचा अनुभव येतो.

अबीर गुलाल उधळीत रंग |
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥
उंबरठ्यासी कैसे शिवू? आम्ही जाती हीन |
रुप तुझे कैसे पाहूं? त्यात आम्ही दीन |
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥
वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू |
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ |
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निःसंग ॥

चोखोबांची ही रचना संगीतबबद्ध केलीय राम फाटक यांनी, तर त्याला स्वरसाज चढवलाय पं. जितेंद्र अभिषेकी यांनी. भूप आणि नट रागात स्वरबद्ध झालेला हा अभंग ऐकताना वारकरी तर डोलू लागतोच, पण एरवी संतांशी घेणे-देणे नसलेल्यांचेही डोळे पाणावतात. हा अभंग अभिषेकी बुवांनी असा काही गायलाय, की त्यातील प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ काळजाला भिडतो. मुळातच भूप आणि नट रागातली रचना ऐकणं म्हणजे कुठल्याही रचनांमधली उत्सुकता आणि तितकीच अस्वस्थता दर्शवून देणारा अनुभव असतो. त्याची पुरेपूर प्रचिती बुवांनी ‘अबीर गुलाल’ गाताना रसिकांना आणून दिली आहे.

पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं|
प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे॥
चोखा म्हणे तेथें सुखाची मिराशी|
भोळ्या भाविकांसी अखंडित॥

राग बागेश्रीमध्ये राम फाटकांनी बांधलेली ही रचना पं. जितेंद्र अभिषेकींनी इतकी सुंदर गायली आहे की, चोखोबांचं पंढरपूरच आपल्या नजरेसमोर उभं राहतं.

या सगळ्या अभंगांमधून संत चोखामेळा यांचं भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता, तर एक मूक आक्रंदनाचा ऐकू येतं. संस्कारसंपन्न, संवेदनक्षम, भक्तिप्रवण, आत्मनिष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या चोखोबांच्या रचनांमधून त्यांच्या आंतरिक वेदनांचे सूर छेडलेले जाणवतात. त्यांना भोगावं लागलेलं दुःख, त्यांची झालेली अक्षम्य उपेक्षा या सगळ्यांचे पडसाद त्यांच्या अभंगातून उमटत राहतात.

संत चोखामेळा यांची पत्नी संत सोयराबाईसुद्धा परम विठ्ठल भक्त आणि थोर कवयित्री होत्या. त्यांचेही अभंग नितांतसुंदर आहेत. ज्यांनी त्यांना लिहायला-वायाचला शिकवलं, त्या चोखोबांचा त्या अत्यंत विनम्रतेने ‘चोखियाची महारी’ असा अभंगाच्या शेवटच्या नाममुद्रेत उल्लेख करतात. सोयराबाईंनी लिहिलेला एक अभंग भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी गायला आहे. तो म्हणजे –

सुखाचें हें नाम आवडीनें गावें|
वाचे आळवावें विठोबासी॥
आवडी धरोनी वाचें म्हणे हरिहरि|
म्हणतसे महारी चोखियाची॥

सोयराबाईंची एक लोकप्रिय अभंग रचना म्हणजे –
अवघा रंग एकचि झाला, रंगी रंगला श्रीरंग, हा किशोरीताईंनी गायलेला अभंग आजही कोणाच्याही काळजाचा ठाव घेतो. मी तू पण गेले वाया| पाहता पंढरीच्या राया॥ हे चोखियाच्या सोयरेच्या अंतरीचे अद्वैत किशोरीताईंच्या धारदार स्वरांमधून ऐकताना एक प्रकारच्या भावसमाधीचा अनुभव येतो. अद्वैताच्या जाणिवेनं, गोडीनं आणि ओढीनं स्वतः किशोरीताई या अभंगाशी एकरूप झाल्याचं दिसून येतं.

हा अभंग गाताना किशोरीताईंची एकरूपता, एकतानता त्यांच्या सुरांतून आणि स्वरांतून अविरत जाणवत राहते. अभंग म्हणजे भंग न पावणारे, अभंग म्हणजे विचार, अभंग म्हणजे भाव, हे भाव जितके कणखर, सडेतोड तितकेच नाजूक, सहज समजणारे, फुलागत उमलणारे आणि अभिव्यक्त होत जाणारे. या भावनांना पेलणारा सूरही त्याला लाभला आहे.

किशोरीताई म्हणतात, ‘कुठल्याही संतांची अभंगरचना गात असताना, गायकाच्या गळ्यातून बाहेर पडणारी प्रत्येक तान ही श्रोत्याच्या हृदयात स्थान मिळवणारी हवी. सप्तकातले सूर, सूरात गाणं किंवा सुरावटीवर प्रभुत्व सिद्ध करणं म्हणजे केवळ गाणे नव्हे. अस जर झालं तर ते केवळ गायन होतं. शब्द, सूर-स्वर-श्रोते आणि आत्मा यांचं एकमेकांशी निखळ तादात्म्य म्हणजे गाणं…हे गाणं चोखियाच्या सोयरेच्या निर्मळ, निखळ भावांइतकंच खरं, सच्चं आणि थेट विठोबाच्या अंतरंगाला स्पर्श करून जाणारं असावं…’ अभंग गायनाच्या कार्यक्रमाची सांगता किशोरीताईंनी गायलेल्या या भैरवीनं झाल्यावर श्रोते भरून पावतात.

जोहार मायबाप
संत कान्होपात्रा नाटक गाजवलं, ते बालगंधर्वांनी. रूपवान कान्होपात्रा मंगळवेढ्यातील गणिकेची मुलगी. एक सरदार तिला त्याची बटिक होण्यासाठी जबरदस्ती करतो. हताश कान्होपात्रेला चोखोबा मानसिक आधार देतात, असा नाटकाचा कथाभाग. या नाटकातील इतर पदं प्रेक्षकांची दाद मिळवतच, पण या सर्वांवर कडी करत ते बालगंधर्वांचे चोखोबा. ते जेव्हा,

जोहार मायबाप जोहार| तुमच्या महाराचा मी महार॥
बहु भुकेला झालो| तुमच्या उष्ट्यासाठी आलो॥
चोखा म्हणे आणिली पाटी| आणिली तुमच्या उष्ट्यासाठी॥ …

हा अभंग गात तो ऐकून सारे प्रेक्षागृह भावव्याकूळ होई. यात आणखी एक संदर्भ होता. तो म्हणजे, प्रेक्षकांचे लाडके नारायणराव उर्फ बालगंधर्व स्वत: प्रेक्षकांना अन्नदाते मायबापहो, अशी साद घालत. या अभंगातून जणू चोखोबा आणि बालगंधर्वांच्या भावना एक होत आणि त्या रसिकांचे हृदय पिळवटून टाकत.

0 Shares
नाचू कीर्तनाचे रंगी नाटक, सिनेमा, चोखोबा