नाटक, सिनेमा, चोखोबा

किशोर शिंदे

पन्नासच्या दशकापर्यंत ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांमध्ये संतचरित्र आवर्जुन दिसत राहिली. त्यात चोखोबांवर दोन सिनेमे आले. तसंच चोखोबा दोन-तीन नाटकांमध्येही भेटतात. प्रा. अनिल सपकाळ यांनी ‘समीक्षा : दुसरी खेप’ या पुस्तकातील ‘मराठी नाटक व सिनेमातील संत चोखोबाची प्रतिमा’ या लेखाच्या आधारे घेतलेला हा वेध.

संगीत उ:शाप
हिंदुत्त्वाचे भाष्यकार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीतील आपल्या स्थानबद्धतेमध्ये अस्पृश्यांचा प्रश्नर हाती घेतला होता. त्यात सर्व जातींना समावून घेणारं पतितपावन मंदिर, सहभोजन, जात्युच्छेदक निबंध असे प्रयोग होते. त्यातलंच एक ’संगीत उ:शाप’ हे नाटक. या पाच अंकी नाटकातल्या अनेक उपकथानकांमध्ये चोखोबांच्या चरित्राचा वेधदेखील आहे. ९ एप्रिल १९२९ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. यातले चोखोबा ’जसे आहेत तसे’ नसून ’सावरकरांना हवे तसे’ आहेत. आपली राजकीय आणि धार्मिक मते दलितांपर्यंत पोचवण्यासाठी चोखोबांच्या प्रतिमेचा यात सावरकरांनी अत्यंत खुबीनं वापर केला आहे. दलितांनी धर्मांतर करू नये, असा संदेश त्यांना यातून द्यायचं आहे. आश्च र्य म्हणजे यातील चोखोबा आपल्या जातीचा अभिमान बाळगतानाच ब्राह्मण हेच कसे धर्मश्रेष्ठ आहेत, त्यांचं वरिष्ठ ठिकाणी असणं हेच धर्मरक्षणासाठी कसं महत्त्वाचं आहे, अशा मानसिकतेचे दिसतात. यात अस्पृश्यता निवारणापेक्षाही मुस्लिम आणि ख्रिश्चषन धर्मविरोधी प्रचारावर भर आहे. धर्मांतर करणारा शंकर आणि न करणारी कमलिनी या अस्पृश्य प्रियकर-प्रेयसीचा एक संवाद यात आहे. त्यात कमलिनी म्हणते, हिंदुत्वाचं मूल्य माझ्यासारख्या दुर्गंधमतीयुक्त एका यःकश्चिणत मुलीवरच्या प्रीतीहून जो अधिक समजला नाही, तो अधमच असला पाहिजे. प्रेम हे जातिधर्मापेक्षा मोठं असल्याचं मांडणार्याे आधुनिक नाटक-सिनेमांच्या तुलनेत या संवादाकडे पाहता येईल.

जोहार मायबाप
संत चोखामेळा यांच्या जीवनावरची सर्वाधिक प्रसिद्ध कलाकृती म्हणजे ‘जोहार मायबाप’ हा सिनेमा. व्यंकटेश माडगूळकर यांची कथा आणि ग. दि. माडगूळकर यांची पटकथा, संवाद आणि गीते असलेला हा सिनेमा १९५० साली ‘जोहार मायबाप’ आणि १९८१ साली ‘ही वाट पंढरीची’ या नावानं प्रदर्शित झाला. राम गबालेंनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात पु. ल. देशपांडे आणि सुलोचना यांनी चोखोबा आणि सोयराबाई यांना चेहरा दिला होता. भक्त चोखोबांच्या कौटुंबिक आयुष्याचा हा सिनेमा प्रामुख्याने वेध घेतो. त्यामुळे यात चोखोबांसह पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेव्हणा बंका आणि मुलगा कर्ममेळा यांनाही महत्त्वाचं स्थान आहे. सर्वसामान्य चोखोबांचं संत चोखामेळ्यात होणारे भूमिकांतर यात अत्यंत प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे. त्यासाठी एखाद्या निरुपणकारानं जसे विविध दाखले देत मुख्य विषय सहज सोपा करून श्रोत्यांना सांगावा त्याप्रमाणं चोखोबांमध्ये होत गेलेला बदल दाखवण्यासाठी वाल्या ते वाल्मिकी ही कथाही समांतर मांडली आहे. असं असलं तरी जातीमुळे चोखोबांना प्रस्थापितांकडून त्रास होतो आहे, असं काहीएक चित्रण यात दाखवण्यात आलेलं नाही. पु. ल. देशपांडे या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वानं यात चोखोबांची भूमिका केल्यानं याला वेगळं महत्त्व आलं आहे. त्यांनी साकारलेला भाबड्या चेहर्या चा चोखोबा वठलाही उत्तमच होता. विशेष म्हणजे ‘पुलं’च्या नावानं आलेल्या पोष्टाच्या तिकीटावर याच सिनेमातले पुलदेखील दिसतात.

युगयात्रा
औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनात सादर झालेल्या नाटकांबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हा महाविद्यालयाचे प्राचार्य असलेल्या म. भि. चिटणीस यांनी ‘युगयात्रा’चं लिखाण केलं. १९५६ साली नागपूर दीक्षाभूमी येथे धर्मांतरासाठी आलेल्या लाखो दलित बांधवांसमोर याचा पहिला प्रयोग सादर झाला. वास्तव आणि फॅण्टसी तंत्राचा वापर करत नाटककारानं यात यातीहिन चोखोबांचं चित्र रेखाटलं आहे. मध्ययुगापासून ते स्वातंत्रोत्तर काळापर्यंत अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशावर चोखोबांच्या प्रतिमा आणि प्रतिकाद्वारे लेखकानं प्रकाशझोत टाकला आहे. यातील कर्मसिद्धांताला अनुसरणारे चोखोबा मंदिर प्रवेश न मिळाल्यामुळे महाद्वारातून वारकर्यां जवळ पांडुरंगासाठी निरोप धाडताना दिसतात. चोखोबाकालीन एकूणच समाजव्यवस्था नेमकी कशी होती, याचं या नाटकात चित्रण करण्यात आलेलं आहे. गावगाड्यातील महारांचं जगणं, त्यांची असाहाय्यता, अगतिकता याचा आणि प्रस्थापितांच्या दांभिकपणाचा घेतलेला वेध यामुळे परिवर्तनवादी चळवळीमध्ये ‘युगयात्रा’ला अग्रस्थान प्राप्त झालं आहे.

चोखामेळा
संत चोखामेळा यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारा पहिला सिनेमा म्हणजे मोहन पिक्चर्स निर्मित आणि डी. के. काळे दिग्दर्शित १९४१ साली प्रदर्शित झालेला ‘चोखामेळा’. चोखोबांच्या उपलब्ध चरित्रांसोबतच विविध काल्पनिक आख्यायिकांच्या आधारे यशवंत सरदेसाई यांनी कथा लिहिली होती. तर शिवराम वाशीकर यांचे संवाद आणि स. अ. शुक्ल यांच्या पदरचना यात होत्या.

चोखोबा आणि बिंदुमाधव यांच्या माध्यमातून महार आणि ब्राह्मण समाजातील संघर्ष यात चित्रित केला असला तरी मरीआईला महारांनी रेडा देण्याच्या प्रथेला विरोध केल्यामुळे दस्तुरखुद्द जातीतील लोक देखील चोखोबाला यात विरोध करताना दिसतात. त्याचप्रमाणं विठ्ठल भक्तीमध्ये सर्वस्व विसरलेले चोखोबाही यात दिसतात. गावकुसामध्ये काम करताना मृत्यू पावलेल्या चोखोबांच्या अस्थींमधून विठ्ठल नामजप दाखवत सिनेमा संपवलेला आहे. सध्या या सिनेमाच्या फक्त पटकथेचं पुस्तकच उपलब्ध असून ते शि. श्री. वाशीकर आणि मोहन पिक्चर्स, मुंबई यांनी प्रकाशित केलं आहे.

ऐन आषाढात पंढरपुरात
दलित जाणिवेला नवे आयाम देणारा लेखक म्हणून ‘चोख्याच्या पायरीवरून’ लिखाण करणार्याि संजय पवारांकडे पाहिलं जातं. आपल्या विविध स्तंभलिखाणांतून आणि नाटकांतून संजय पवारांनी समाजवास्तव प्रकर्षानं मांडलं आहे. त्यांच्या ‘मुक्ता’ सिनेमातही ‘व्हाय चोखामेळा इज आऊटसाईट ऑफ टेम्पल’, असा सवाल विचारलेला आहेच. याच संदर्भात त्यांची ‘ऐन आषाढात पंढरपुरात’ ही एकांकिकाही खूप महत्त्वाची आहे. या एकांकिकेच्या थेट आणि भेदक मांडणीमुळे नाट्यवर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली. फॅन्टसी तंत्राचा मुबलक वापर करत संजय पवार यांनी आपल्या एकूणच लिखाणात विविध सामाजिक समस्यांचा वेध घेतलेला आहे. या एकांकिकेमध्येही कुठेही आक्रस्ताळी भाषा न वापरताही चोखोबा आणि विठ्ठलामधील संवाद बुद्धीवादी आणि थेट विषयावर घाव घालणारे आहेत.

आषाढी वारीमध्ये पंढरपुरात विठ्ठल आणि चोखोबा यांची होणारी भेट आणि त्यांच्यातील ‘आपुलकी’तील सवाल- जवाबातून विविध विषय समोर येतात. चोखोबा आणि विठ्ठल हे ‘आजची’ भाषा बोलणारे आहेत. त्यामुळे चोखोबा स्वत:च्या ‘जाती’पासून रखुमाईच्या ‘स्त्री स्वातंत्र्या’पर्यंत अनेक प्रश्न् विचारत विठ्ठलाला कोंडीत पकडतात. त्यावर माझ्याकडे कशाचंच उत्तर नाही! माझं मंदिर बांधण्याचा चॉईससुद्धा माझा नाही. माझी अवस्था सैनिकांनी अडचणीत आणलेल्या सेनापतीसारखी झालीय, असं म्हणणारा हतबल विठ्ठल यात दिसतो. ‘इंडिव्ह्यूजल प्रॉब्लेम सोडवून तू मास मूव्हमेंटची वाट लावलीस’, असं एके ठिकाणी म्हणणारे चोखोबा विठ्ठलाच्या माध्यमातून सध्याच्या दलित चळवळीच्या सद्यस्थितीवर थेट भाष्य करतात. अत्यंत कण्टेम्परेरी असलेल्या या एकांकिकेतील चोखोबांचे प्रश्न कोणत्याही काळात तेवढेच भेदक ठरतात.

संत चोखामेळा आणि मी
रंगभूमीवर आंबेडकरी चळवळ रुजवण्याचं एक प्रमुख श्रेय भि. शि. शिंदे यांना जातं. ते दादासाहेब गायकवाडांच्या भूमिहीनांच्या चळवळीमध्ये सक्रीय होते. त्यावर आधारित ‘भूमिपुत्र’ हे नभोनाट्य त्यांनी लिहिलं. ग्रामीण प्रश्नां ची चांगली समज असलेल्या शिंदे यांनी समाजवास्तवाचं भान राखत विविध प्रश्ना आंबेडकरांच्या समतावादी विचारांतून रंगभूमीवर आणले. त्यांनी लिहिलेल्या ‘काळोखाच्या गर्भात’ या नाटकानं एकूणच नाट्यवर्तुळात इतिहास घडवला. पुढे त्यांनी ‘संत चोखामेळा आणि मी’ पुस्तक लिहिलं. यात चोखामेळापूर्व आणि नंतरच्या एकूण संतचळवळीवर प्रकाश टाकला असून, ‘चोखोबांच्या साहित्याचे सामाजिक मूल्यमापन’ आणि ‘संत साहित्याचे एकविसाव्या शतकातील स्थान’ या अभ्यासपूर्ण लेखांचा यात प्रामुख्यानं उल्लेख करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणं ‘चोखोबांचा कुलवृक्ष’ या पुस्तकातून पहिल्यांदाच लोकांसमोर आला. चोखोबांचा विद्रोह कालसापेक्ष दृष्टीकोनातून जाणून घ्यायला हवा. त्यावेळचं त्यांचं कार्य आजच्या काळाच्या निकषावर तपासायला नको, अशी शिंदे यांची चोखोबाचं मूल्यमापन करण्यामागची भूमिका आहे.

चोखोबांचा वग
तमाशांमध्ये फक्त चावट आणि विनोदीच गोष्टी असतात, असा गैरसमज सर्वत्र आहे. त्याला छेद देण्याचं काम तमाशातल्या अनेक कलाकारांनी जाणीवपूर्वक केलं. त्यात चंद्रकांत ढवळापुरीकर आणि दत्ता महाडीक पुणेकर प्रमुख होते. त्यांनी त्यांच्या तमाशातल्या वगनाट्यात १९७९ साली चोखोबांचा वग सादर केला. आपल्या वगनाट्यामध्ये संपूर्ण चोखोबा चरित्र आणि त्यांचे विचार गुंफत अत्यंत बहारदार पद्धतीनं हा लोकप्रबोधनाचा वग ते सादर करत असत. त्यात फक्त एका संताचं चरित्र दाखवण्याबरोबरच आजच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीविषयी टिप्पणीही होती. हा वग बराच लोकप्रियदेखील झाला होता.

याशिवाय टी. एस. कावले यांनी ‘संगीत संत चोखामेळा’ नावाचं नाटक लिहिल्याची नोंद मिळते. ‘धाव घाली विठू आता’ नावाची म. वि. गोखले यांची एक नाटिका १९७१ साली पुस्तकरूपानं सुमती प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केली आहे. १९३१ सालच्या ‘संत कान्होपात्रा’ या प्रसिद्ध संगीत नाटकात चोखोबांचं ‘जोहार मायबाप जोहार’ हे पद बालगंधर्वांनी अजरामर केलं आहे. प्रबोधनकार के. सी. ठाकरे यांच्या संत एकनाथांच्या जीवनावर आधारित ‘खरा ब्राह्मण’ या नाटकात चोखोबांचे अनेक संदर्भ आहेत. संत नामदेव आणि संत जनाबाई यांच्या जीवनावर आधारित विविध नाटक-सिनेमांमध्येदेखील संत चोखामेळा हे पात्र पाहावयास मिळतं. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फँड्री’ या सिनेमात शिक्षक मुलांना चोखोबांचा ‘ऊस डोंगा परि’ हा अभंग कविता म्हणून शिकवताना दाखवले आहेत. जातिभेदावर आधारित या सिनेमात याचा खुबीनं वापर करून घेतला आहे.

0 Shares
रंगी रंगला श्रीरंग चोखोबाच्या पाठी