चोखोबाच्या पाठी

रंगनाथ पठारे

मानवी जीवनाच्या गुंतागुंतीची आपल्या साहित्यातून सर्वस्पर्शी उकल करणारे ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे चोखोबांवर लिहायला घेतात आणि चोखोबात पूर्णपणे विरघळून जातात. या कथेत आठशे वर्षांपूर्वीचा चोखोबा त्यांच्यासोबत पंढरपूर, मंगळवेढ्यात फिरतो. या अस्तित्व हरवलेल्या चोखोबांची वेदना आपल्याला पोखरत जाते. ही कथा वाचल्याशिवाय चोखोबांविषयीचं वाचन पूर्णच होणार नाही, एवढी ती मोलाची आहे

चोखोबाचं नाव ऐकून होतो, पण खास ओळख अशी नव्हती आणि ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा ॥ पलीकडे त्याचे अभंगही माहीत नव्हते. पण अलीकडेच ओळख झाली आणि चांगली दोस्तीही झाली, याला कारण सभा कदम. म्हणजे स टिंब भा टिंब कदम. मुंबईत नायगाव, दादर पूर्व येथे अहमद खलाशाच्या कोणत्या तरी क्रमांकाच्या चाळीत तिसर्याथ किंवा चौथ्या मजल्यावर एका बारक्या खोलीत हे सभा कदम सहकुटुंब राहतात. वय नव्वदीकडे झुकलेलं, त्यामुळे शरीरानं अर्थातच जरा थकलेले तरीही तल्लख आणि टवटवीत. पूर्वी हायकोर्टात बेलिफ ते रजिस्ट्रार अशी चढत्या श्रेणीनं कामं केलेली आणि बॅरिस्टर महमदअली जिना यांना यांचं इतकं अगत्य की, पाकिस्तान झाल्यावर त्यांनी यांना तिकडे बोलावलं होतं, तसंच इकडे आल्यावर निरोप पाठवून भेट घेतली होती, म्हणजे त्यांच्या त्या उद्योगात ते किती माहीर असतील बघा. आणि या सगळ्याच्या सोबतीनं खास आवडीचा उद्योग म्हणून या सभा कदमांनी चोखोबाचे अभंग, त्याच्याविषयीच्या आख्यायिका आणि बाकी बरंच सगळं वर्षानुवर्ष हिंडून, पदरमोड करून गोळा केलं आणि स्वतःचे पैसे घालून त्याचं पुस्तक छापून घेतलं आणि बर्या्च जणांना फुकट सप्रेम भेटही दिलं. पुस्तकं छापून भेट देण्याचा त्यांचा छंद आजही इतका टवटवीत की, आम्ही त्यांना भेटायला गेलो असतानाही त्यांनी काही पुस्तकं आम्हाला भेट दिलीच! आणि अगदी मनापासून. त्यांची गृहिणी तिथंच होती. तीही आपल्या पतीच्या या घरबुडव्या छंदात तितकीच प्रेमानं समरस झालेली. अशी इतकी पाखरांसारख्या स्वप्नाळू डोळ्यांची माणसं दुनियेत क्वचितच असतात. या कदमांनी आयुष्यभर चोखोबाचा इतका पिच्छा पुरवला, की लोक त्यांना महारच समजायला लागले. लोकांचा तरी काय दोष त्यात? जनरीतच आहे. काहीतरी जातीचा आणि गोताचा संबंध असल्याखेरीज कोण कोणासाठी इतकं करतो? कदमांनी ते इतकं केलं आणि कोण काय म्हणतं याची फिकीर कधीच केली नाही.

या सभा कदमांनी छापलेल्या पुस्तकामुळंच तर चोखोबा मला भेटला. मऊ गोड, बुजरा आणि हीनयातीच्या जन्माच्या स्वघोषित अपराधातून अजूनही बाहेर न पडलेला. त्याला ते पुष्कळ सांगितलं की, आता ते हीनयातीचं, विटाळ ह्या असल्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. म्हणजे लोकांच्या मनातून ते गेलेलं नाहीच आहे. पण आता ते कोणी दाखवत नाही. मुख्य म्हणजे महार असं हीनयातीच्या अपराधाचं बिलकूल मानत नाहीत. त्यांच्याही मनात ते थोडंफार असेलच. पण तेही तसं दाखवत नाहीत. आत्मविश्वारसानं आणि क्वचित मुजोरीनं वागतात आणि ते चांगलं आहे इत्यादी. पण चोखोबानं एक आख्खं आयुष्य बुजरेपण आणि अपराधी भाव घेऊन काढलेलं. तेही पंढरीच्या विठोबाच्या साक्षीनं. त्याला त्यातून बाहेर पडता येत नाही, याला त्याचाही इलाज नाही. नसो.

तर चोखोबाच्या अभंगांचं हे पुस्तक मी वाचलं. त्याच्या अभंगात तो दिसला. त्याच्या असण्याचं, जगण्याचं काही काही कळलं. चोखोबाचं सगळं नाही पटत. त्याचा पोर कर्ममेळा, त्याचं जास्त पटतं आणि मनाचा ठावही घेतं.
आमुची केली हीन याती |
तुज का न कळे श्रीपती ॥
जन्म गेला उष्टे खाता |
लाज न ये तुमचे चित्ता ॥

हा कर्ममेळा. ठणकावून श्रीपतीची लाज काढणारा. तुझ्या संगतीनं आम्हाला कोणतं सुख आहे, असा रोकडा सवाल विचारणारा. चोखोबा हे करीत नाही. तो नामाचा महिमा गातो.

त्रैलोक्य वैभव ओवाळोनी सांडावें |
नाम सुखे घ्यावे विठोबाचे ॥

तो म्हणतो. आणखी बरंच तो बोलतो आणि मनात उरतो. वाटतं, की बुवा हे कसलं बळ असेल? या माणसाला आयुष्यानं काय दिलं असेल? उभ्या आयुष्यात जो विठोबाच्या देवळाच्या पायरीलाही स्पर्श करू शकला नाही, तिथं पायरीखाली टाचा घासून भेटीसाठी आर्त आक्रोश करण्यातच ज्याचं आयुष्य गेलं, त्यानं कोणत्या बळावर नामाचा महिमा गाईला असेल? आणि,

पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ॥
ही कोणत्या श्रद्धेची ताकद? आयुष्यभर कर्मठांकडून सदा हाड् हाड् ऐकत कशासाठी विठ्ठल नामाचा जप त्यानं केला असेल?

ढोर गँवार शूद्र नारी | सब ताडनके अधिकारी॥
जिंदगीभर ताडन सहन करूनही त्याच्या मनातला अंगार कधीच का पेटला नाही?
चोखा महार जोहार करितसे | प्रसाद देई म्हणोनी ॥

कोणता प्रसाद त्याला मिळाला? त्याला काय मिळालं? पंढरीच्या आयुष्यानं त्याला काय दिलं?… हे असं सगळं पुष्कळ मनात आलं आणि या सगळ्याचं मिळून एक व्याख्यान मी चोखोबासमोर ठोकलं. संधी मिळाली तर का सोडायची? त्याचं झालं असं की, ‘‘या पुस्तकाची आवृत्ती आता संपलीय. नवी छापायची. त्यातले फोटो मात्र फारच जुने झाले आहेत. नवे मिळाले तर बरं,’’ कदम म्हणाले. म्हटलं, ‘‘इतकंच ना? आणू की काढून. कुठं कुठं जावं लागेल?’’ म्हणाले, ‘‘पंढरपुरातच मिळतील. महाद्वारासमोर चोख्याची समाधी आहे. चंद्रभागेपल्याड तो वस्ती करून राहिला होता, तिथली दीपमाळ आहे आणि मंगळवेढ्याला भिंतीखाली चिणून तो मेला, त्याचं स्मारक असेल, त्याचाही घेता येईल.’’ म्हटलं, ‘‘ठीक आहे. तुम्ही इतकं केलंय त्याच्यासाठी, त्याच्या प्रेमापोटी, तर तुमच्या या भावनेच्या आदरापोटी इतकं करायला आपली काहीच हरकत नाही. आनंदानं करू’’.

हे असं ठरलं आणि त्यात काही प्रॉब्लेमही नव्हता. पण एक दिवस चोखोबा माझ्याजवळ येऊन बुजर्या् स्वरात म्हणाला, ‘‘मलाही पंढरीला जायचंय.’’ तर त्या वेळेला डोकं सणकलं आणि आधी मी जे सांगितलं ते सगळं त्याला ऐकवलं. व्याख्यानच ठोकलं. मी थंड झाल्यावर तो पुन्हा म्हणाला, ‘‘मला यायचंय.’’ म्हटलं, ‘‘तुला जायचं असेल तर जा की. माझ्यासोबत कशाला? पंढरीला जाण्याची मला काही हौस नाही. आजवर एकदाही मी तिथं गेलेलो नाही. जावं असं कधी वाटलंच नाही. मला तिथलं काहीच माहीत नाही. मी फक्त फोटो काढण्यासाठी जाणार. तिथं तुझं लोढणं माझ्या गळ्यात कशाला? आख्खं आयुष्य ‘विठ्ठल विठ्ठल’ करीत वाळवंटात चटके खाल्लेस तरी तुझी हौस फिटली नाही का? आणि ठीक आहे ना, याच्या उप्परही तुला जायचं तर जा तू. मी माझा जाईन.’’ चोखोबा बापुडवाणा चेहरा करून तसाच उभा राहिला, पण राहिला हमखास ठाम. इतक्या सरबत्तीतही तो उडून गेला नाही किंवा त्यानं माझा नादही सोडला नाही.

‘‘मला यायचंय,’’ तो म्हणाला. मी क्षणभर मनाशी विचार केला आणि म्हणालो, ‘‘ठीक आहे. जाऊ आपण. तुझा विठाबो, तुझी पंढरी हे काहीच मी पाहिलेलं नाहीय. आणि आजचं हे सगळं तुलाही माहीत नाही. पण आता ते देऊळ सगळ्यांसाठी खुलं झालंय हे तुला माहीत नसलं तर सांगतो. पन्नासेक वर्षांआधी पांडुरंग सदाशिव साने नावाच्या माणसानं विठोबाचं देऊळ अस्पृश्यांसाठी खुलं व्हावं म्हणून आमरण उपोषण केलं होतं. माझ्या सोबत आलास तर तुला देवळात यावं लागेल. आपण आत जाऊन विठोबा पाहू. तू त्याला मिठी मारुन घे. करशील तसं?’’ चोखोबा विचारात पडला. ‘‘अरे बाबा, ते गेलं सगळं. आता कोणीही कोणाला दूर हो, दूर हो म्हणत नाही. सगळे एकमेकांना स्पर्श करतात. एकत्र खातात, पितात. हे बघ-’’ म्हणत मी त्याला जवळ घेतलं, तसा तो आक्रसला. पुन्हा त्याचा तो अपराधी भाव. पोटात घ्या म्हणारा. घेतलं, तसा तो आक्रसला. पुन्हा त्याचा तो अपराधी भाव. पोटात घ्या म्हणणारा.

‘‘छट् सालं! तुझं काही खरं नाही,’’ मी वैतागून म्हणलो.
‘‘मी येईन आत.’’ तो हळूच म्हणाला आणि हसला.
‘‘मी ठीक आहे. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, उगीच का लिहिलंस? आता तरी घे ते. खरं तर त्यात काय सुख आहे हे मला अजूनही कळत नाही. पण तू म्हणतोस आहे ते, तर घे ते आणि घ्यावंच लागेल, सांगून ठेवतो’’. मी दाबात म्हणालो.

पंढरपूर बसमधून उतरलो आणि रस्त्यावर आलो. रुंद अस्वच्छ रस्ता होता. दुतर्फा टोलेजंग कळकट इमारती. भक्तिनिवास, विठ्ठलछाया अशा तुपकट नावाची लॉजेस. परमिट रूम, बीयर बार भरपूर, दणकून गर्दी. तरी बरं, एकादशीच्या आसपासचा दिवस नव्हता. आषाढी – कार्तिकीला गर्दी इतकी म्हणे की, चंद्रभागेतीरी वाळवंटात अगदी स्त्री – पुरुषही पाठीला पाठ लावून बहिर्दिशा करतात आणि स्नान करून शुचिर्भूत होतात! या सार्यारत चंद्रभागेवर किती जाण पडत असेल याची कल्पनाच करवत नाही. मी पंढरपूर वाचलेलं होतं आणि ऐकलेलंही, पुंडलिकापासून नामदेव, ज्ञानेश्वणर, चोखोबा, गोरोबा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार, दासी जनी अशांमधून वाचलेलं आणि अलीकडच्या काळात वाडवडलांकडून ऐकलेलं. माझ्या आईनं वर्षानुवर्ष पंढरपूरच्या वार्याा केलेल्या. काही वर्षांआधी गर्दी होऊन माणसं चेंगरुन मेली यात्रेत. त्या वेळेला ती तिथं होती. तेव्हापासून मी तिला पंढरपूर बंद करून टाकलं. तिच्याच भाषेत सांगितलं, की देव सारीकडं असतो ना! तर इथूनच पंढरीकडं तोंड करून हात जोडत जा. इत्यादी. त्यामुळं पंढरपुराच्या पहिल्या दिसण्यानं धक्का नाही बसला. देवाच्या दारीसुद्धा परमिटरूमची सोय, प्रश्ननच नाही. आणखी काय पाहिजे? अभक्ष तर त्याच्या जोडीनं असतंच. आणखी बर्याखच सोयीही आहेत म्हणे. गाणी – बजावणी, इष्कबाजी या गोष्टी देवादिकांनाही चुकलेल्या नाहीत. आपण तर मर्त्य मानव. खेरीज पापकर्माची भावना मनात उगवली तर प्रक्षालनासाठी चंद्रभागा आयती आहेच! तिथून मग सरळ देवाच्या दारात उभं राहायचं. काय बिशाद आहे पापाच्या शिल्लक उरण्याची?

‘‘चल, चोखोबा. आली तुझी पंढरी,’’ मी म्हणलो, ‘‘आता तू मला सगळं दाखवायचं आणि सांगायचं’’.

मी त्याच्याकडं पाहिलं. तो खूपच गडबडून, गोंधळून गेलेला होता.

माझ्या लक्षात आलं. साडेसहाशे वर्षे लोटलीत. तेराशे अडतीस साली चोखोबा मंगळवेढ्याला गावकुसाच्या भिंतीखाली चिणला गेला आणि मेला. तेव्हाची पंढरी आणि आताचं हे शहर, त्याचा गोंधळ होणं स्वाभाविकच होतं. तो बिचारा काय दाखवणार मला?

‘‘चल, चल. आपण चौकशी करू ना. आधी उतरायची सोय बघू कुठंतरी आणि नंतर नदीकाठी जाऊ. देवळाजवळ गेलास की तुला ओळखीचं दिसेल’’.
मी त्याच्या हाताला धरून सोबत खेचलं. त्यानं हलकेच स्वतःचा हात सोडवून घेतला आणि तो अंतर राखून चालू लागला.

‘‘का रे? रागावलास?’’ मी विचारलं.

‘‘नाही, नाही जी.’’ तो तत्परतेनं म्हणला आणि गप्प झाला.

मी उतरायच्या सोयीविषयी ज्याला विचारलं, तो फारच सज्जन पोलीस निघाला. साध्या कपड्यातच होता. पण मिश्या दणकट आणि पायात पोलिसी बूट. खेरीज केसही विशिष्ट पद्धतीनं व्यवस्थित कापलेले.

‘‘इथून जवळच शामियाना नावाचं लॉज आहे. अटॅच्ड् बाथ वगैरे अगदी चांगलं,’’ तो माझ्या एकूण अवताराकडं बघून म्हणाला.
‘‘असं धर्मशाळा वगैरे नाही का? इथं देवाच्या दारी’’.

‘‘आहेत ना! भरपूर आहेत. तुम्ही असं करा. इथून पुढं शिवाजी चौकात जा. तिथून उजवीकडं वळून थोडं पुढं गेलात की तिथं गजानन महाराजांचा मठ आहे. तिथं जा. तो चांगला आहे.’’ पोलीस तत्परतेनं म्हणाला.

‘‘जाऊ या तिकडं?’’ मी चोखोबाला विचारलं.

त्यानं हलकेच मान हलवली. गजानन महाराज कोण वगैरे काहीही विचारलं नाही.

‘‘एऽऽ! तू असा धरून आणल्यासारखा वागू नकोस रे. जरा मोकळा हो आणि माझं काही चुकत असेल तर बोल तसं. अगदी शिव्या दिल्यास तरी चालेल.’’ मी म्हणालो. त्यानं हात जोडले. ते मला की पांडुरंगाला कोणास ठाऊक? कारण समोर उंचावर ‘विठ्ठल – रुक्मिणी मंदिर’ असा भलामोठा बोर्ड अगदी दिवसाढवळ्या उजेडातल्या आभाळात असावा तसा मंदिराच्या शिखराच्या आसपास दिसत होता आणि बाकी इमारतींची दाटी. रस्ता रुंद होता. दुभागलेला होता. गर्दी विशेष नव्हती. तरीही होते त्यात पाठीला गाठोडे आणि भगवी पताका घेतलेले काटकुळे लोक तुरळक होतेच. पांडुरंगाच्या दारची वारी अखंड चालूच.

“समोर बोर्ड दिसतो तिथं देऊळ असावं. म्हणजे मी अर्थातच पाहिलेलं नाहीय. आणि तू पाहिलेलं असशील त्यातलं अजून तुलाही काही दिसलं नसेल, पण तो मघाचा माणूस सांगत होता तसा हा शिवाजी चौक आणि इथं उजवीकडं वळून गजानन महाराजांचा मठ. चल. हे शेगावचे महाराज आहेत फार प्रसिद्ध. त्यांचा फोटो मी पाहिलाय. अंगात फक्त लंगोटी आणि हातातली चिलीम तोंडाला लावून ती ओढण्याच्या पोजमधला त्यांचा फोटो किंवा चित्र फारच प्रचलित आहे. ते कित्येक जण आपल्या शय्यागृहातही श्रद्घेनं लावतात. शेगाव नावाचं हे गाव या महाराजांमुळं फार महत्त्वाचं तीर्थ होऊन गेलंय आणि याच्या पल्याड मलाही त्यांच्याविषयी माहिती नाही…”.

मी बडबडत होतो आणि चोखोबा माझ्यापाठी चालत होता. गजानन महाराजांच्या मठात चालायलाही जागा नाही, इतकं बांधकाम चालू होतं. लाकडं, फळ्या, वाळू, सिमेंट, पाणी – सगळं ओलसर गच्च. तरीही याला भरुन आवार होतं. इमारती होत्या. ऑफिसात चौकशीला गेलो. तिथं वैताग चेहर्या नं एक कारकूनवजा इसम हिशेब लिहीत होता.

‘‘जागा आहे का?’’ खिडकीबाहेरुन मी विचारलं.

कारकुनानं एकदा वर पाहिलं आणि स्थितप्रज्ञ वृत्तीनं हिशेब सुरू.

खूप वेळानं आंबट चेहर्याीनं त्यानं विचारलं, ‘‘कोणती?’’

म्हटलं, ‘‘कोणती आहे?’’

त्यानं उजवीकडं बोट दाखवलं. तिथं भिंतीवर फलक होता. इतके इसम तितके पैसे वगैरे.
‘‘इथं नको.’’ चोखोबा हळूच माझ्या कानाशी लागला.
मलाही तसंच वाटलं. कार्यतप्तपरतेची इतकी आम्लता पेलण्याजोगी नव्हती. ईश्वतरी अस्तित्वाच्या इतक्या प्रभावातही हे टणकपण म्हणजे मुष्कीलच होतं.
आम्ही बाहेर पडलो.

रस्त्यावर आल्यावर आणखी एकाला विचारलं.
‘‘देवासाठी आले का दवाखान्यासाठी?’’ त्यानं उलट विचारलं.
‘‘अर्थातच देवासाठी आणि दवाखान्यात काय? त्याचा काय प्रश्ना? इथं कोणी भारी डॉक्टर आहेत का?’’
इसम थांबला, मग सुरकुत्यांत हसला.

‘‘का हो? हसता कशासाठी?’’
‘‘तुम्ही एकटेच आहात ना? की आणखी कोणी?’’ त्यानं विचारलं.
‘‘नाही बा. आम्ही दोघंच. हे काय —’’

त्यानं जरा चमत्कारिकपणे माझ्याकडं पाहिलं.
‘‘बाईमाणूस कोणी सोबत नाही?’’
‘‘नाही बा. का बरं?’’ मी उलट विचारलं. कळेचना.

मग त्यानं सांगितलं. इथं अनाथाश्रम आहेत. अनेक तरुण मुलींचे प्रश्नि असतात. पुष्कळदा लग्नाआधीच त्या गर्भवती होतात. विधवा स्त्रियांचेही प्रश्नष असतात. त्यांच्या नवजात बाळांना इथं आसरा मिळतो. बाया मोकळ्या होऊन जातात. मार्गी लागतात. पुण्याचंच काम. पांडुरंगाच्या दारी हे वर्षानुवर्ष चाललेलं आहे. दवाखान्यासाठी आले का, हे विचारलं, ते त्यासाठीच. त्या अर्थानंच आणि एकादशी नसताना येणार्यां त त्या लोकांचाच भरणा जास्ती. म्हणून चौकशी केली. तुम्हाला काहीच माहिती दिसत नाही इत्यादी.

‘‘आम्हाला उतरायला जागा पाहिजे. इथलं हे गजानन महाराजाचं जरा जास्तीच भव्य आहे. आम्हाला आपली साधी धर्मशाळा…’’
‘‘आहे ना. समोर जाऊन डावीकडं वळा. तिथं गाडगेबाबाची धर्मशाळा आहे.’’
गाडगेबाबाची आहे ना, मग तिथंच जायचं. मी झटकन मनाशी निर्णय घेऊन टाकला.
‘‘चल, जाऊ या आपण’’, मी चोखोबाला म्हणलो.

‘‘हा गाडगेबाबा अलीकडचा. विसाव्या शतकातला आपला मोठा संत. म्हणजे माझ्यासारख्याला आपला तो मोठा वाटतो. त्यानं तुम्हा मंडळींसारखे चमत्कार वगैरे काहीच नाही केले. तुम्हा लोकांचा चमत्कारांवर फार भर.’’ मी रस्त्याने चालताना चोखोबाला सांगत होतो, ‘‘गोरोबाचे तुटलेले हात परत आले. त्यानं भजन करताना भान हरपून पायाखाली तुडवलेलं त्याचं मूल देवानं त्याला परत आणून दिलं. तुझी बहीण निर्मळा, तिच्या रूपात येऊन त्यानं तुझ्या बायकोचं बाळंतपण केलं. किती सगळे चमत्कार! तू देवाचा रत्नहार चोरला म्हणून तुला बैलाच्या पायी बांधलं तर तिथंही देव चमत्कारासाठी हजर आणि जनाबाईला तर दळू काय लागायचा, तिची लुगडी काय धुवायचा – अगदी कहर केला विठोबानं आणि हे सगळं तुम्ही एकमेकांचं मोठेपण सांगत लिहून ठेवलंत. या गाडगेबाबानं असल्या भानगडी केल्या नाहीत. त्यानं खूप साध्या गोष्टी थेटपणे सांगितल्या. गोरगरिबांच्या पोरांना शिकायला मिळावं म्हणून शाळासुद्धा काढल्या. संत हा सत्पुरुष. आपल्या आचरणानं शुद्ध व्यवहाराचा आदर्श घालून देणारा. गाडगेबाबा हा असला संत होता म्हणजे तुम्हीही मोठेच संत होता. त्याचं मला काहीच म्हणायचं नाही. पण तुमचं हे चमत्काराचं मला समजत नाही. रत्नहाराच्या चोरीचा आळ तुझ्यावर आला तेव्हा देवच तुला आत घेऊन गेला होता ना! मग त्यानं तुला तिथं ठेवून का नाही घेतलं? आणि तुळशीहार दिला तर रत्नहार कुठून आला? तुमचं काही कळतच नाही. हे काहीच नसतं तरी तुम्ही मोठे आहात. चमत्कार कशासाठी? आणि संत कशामुळं होतो माणूस? देवाच्या भक्तीपोटी की संसारापासून पळण्यासाठी? काय असतं? नामदेव ढसाळ नावाचा आमचा एक कवी आहे. तो म्हणतो, अकलेचं भजं झालं की माणूस संत वगैरे होतो. तुला काय वाटतं?…’’

मी बडबडत होतो आणि चोखोबा निमूट माझ्यासोबत चालला होता.
‘‘का रे? तुला काहीच म्हणायचं नाही?’’ मी वैतागून विचारलं.
‘‘काय बोलू जी?’’
‘‘अरे तू मला तुझा अभंग ऐकवू शकतोस -’’

देवा नाही रुप देवा नाही नाम |
देव हा निष्काम सर्वांठायी ॥
डोळियांचा डोळा दृष्टीच न भासला |
देव प्रकाशला आदि अंती ॥

इतकी साक्षात्कारी रचना करता आणि त्याचं सांगत काहीच नाही. का नाही? तुम्हाला साधं आत्मसमर्थनही करता येत नाही. आलं पाहिजे. वेळेला आपलं आपल्याला आठवलं पाहिजे’’…

मी चोखोबाला उपदेश करीत होतो आणि या औद्धात्याला त्याची प्रतिक्रिया केवळ मौन. संतच तो. सहन करणं हा त्याचा धर्म. आयुष्यभर त्यानं दुसरं काय केलंय?

गाडगेबाबांच्या धर्मशाळेचं दार ओलांडून आम्ही आत शिरलो. मध्यभागी उघडा मोठ्ठा चौक. शहाबादी फरशी घातलेला. चारी बाजूंनी जुनाट दुमजली इमारत. बांधली असेल तेव्हा सुंदरच असेल. त्याच्या काही खुणा तेवढ्या जाणवतात. बाकी उरलेलं वृद्धत्व. डुगडुगतं असणं.

कोप-यात ऑफिस होतं. तिथून चावी घेतली. एक म्हातारा कुतांगळा कर्मचारी सोबत आला. अंधार्यान जिन्यातून मार्गदर्शन करीत वर येत त्यानं खोली उघडून दिली. खोली म्हणजे अगदी प्लेन खोली. एक खिडकी. एक देवळी. बस्स. तुम्ही तुमचं बोचकं टाका आणि निवांत राहा. देवाच्या दारी आणखी काय पाहिजे? बाहेर कोपर्याडत कॉमन संडास, बाथरूम. तसंच आणखी खाली मागच्या इमारतीतही आहेत. तिथं पाणी चोवीस तास असतं. इथं वर बादली भरुन आणता येईल. खाली जास्त सोयीचं, कर्मचार्याआनं माहिती दिली.

आम्ही आमची बोचकी ठेवली. चोवीस तास पाण्याची हमी असलेल्या खालच्या मागच्या जागेत जाऊन हातपाय स्वच्छ धुतले. पुन्हा चौकात आलो. स्वच्छ वाटलं. खूप माणसं होती. गरिबांची धर्मशाळा. म्हातारे – कोतारे, बाया – बापड्या. बावरल्या नजरेच्या तरण्या पोरी दवाखान्यासाठी आलेल्या असणार, मघाच्या माणसाचं मनात उगवलं.

समोर एका ठिकाणी देणगीदारांची नावं असलेला संगमरवरी फलक होता. १९१७ साली चोखोबांच्या स्मरणार्थ अस्पृश्यांसाठी ही धर्मशाळा गाडगेबाबांनी बांधली.
घ्या! म्हणजे, चोखोबा, आजही तुला अखेर निवारा कुठं सापडला? बघ. तुझ्या लोकांसाठीच बांधून ठेवलीय गाडगेबाबांनी. आता सगळेच येत असतील. अस्पृश्य कोणीच नसेल. कायद्यानं अस्पृश्यता राहिली नाही आणि तुझे अस्पृश्य सगळे आता बौद्ध झाले. त्यांना पंढरीचं आता काहीच राहिलं नाही. तसा तर मीही हिंदू वगैरे. पण आमच्या मनात तरी पंढरीचं काय असतं? किती जणांच्या मनात किती असतं आणि कितपत असतं?

हे काहीही मी चोखोबाला म्हणलो नाही.
‘‘काय करायचं? चंद्रभागेत अंघोळ करून दर्शनाला जायचं? मला फोटोही काढता येईल तुझ्या समाधीचा. उजेड सोयीचा आहे.’’ मी विचारलं.
‘‘जाऊ ना.’’ तो म्हणला.
‘‘तुझ्या उत्साहाला झालंय काय चोखोबा? इतका हट्ट करून माझ्यासोबत आलास.

निजभावे बळें घातिलासे वेढा |
देव चहूंकडा कोंडियेला ॥

आपल्या प्रेमभावाच्या बळावर देवाला चोहोकडून कोंडलं, म्हणतो. आता त्याला भेटण्याचाही उत्साह नाहीये मनात? काय झालंय? हे पंढरपूर बघून बावरलास? पण तुझ्या वेळी तरी तुला कोणतं पंढरपूर होतं? तुला या बाकी सगळ्याचं काय करायचंय? अरे, तुझी चंद्रभागा आहे, वाळवंट आहे, महाद्वार आहे आणि विठोबाही आहे. तुझं पंढरपूर अबाधित आहे चोखोबा. चल, जाऊ या आपण. तुझ्या पंढरपुरात जाऊ. निदान तिथं तरी तू माझा मार्गदर्शक हो. मला तुझ्या पंढरपुराविषयी सांग’’.

पुढे थोड्या अंतरावर दुकानांची दाटी लागली. फ्रेम विकणारे, पुस्तकं विकणारे, मूर्ती, तांब्याची पूजेची भांडी आणि गुलालाचे डोंगर तर कैक. लाह्या-बत्ताशांचे पुडे, पेढ्याचे ढीग हेही अमाप. खेरीज पानंफुलं, हार असं ओरडून तुम्हाला विठोबाला अर्पण करण्यासाठी पुकारत पुण्य देऊ पाहणार्यात प्रापंचिक बाया.

आणखी पुढं गेलो. तिथं चोखोबा स्वाभाविकपणे वळला. मी समोरची भलीमोठी इमारत बघत होतो. चोखोबा वळून महाद्वारासमोर उभा राहिला होता. त्याच्या ओळखीची जागा त्याला सापडली होती. तो तिथं उभा होता म्हणून ते महाद्वार होतं. तो अशा पद्धतीनं तिथं उभा होता की ते दुसरं काही असूच शकत नव्हतं. तरीही चोखोबाला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं किंवा त्याला तसं वाटत असावं, असं मला वाटत होतं. मी त्याच्या शेजारी जाऊन उभा राहिलो. समोर नामदेवाची पायरी. मी दचकल्यासारखं मागे पाहिलं. तिथं चोख्याची समाधी होती. तेलकट काळ्या पाषाणातलं मूर्तिवजा काहीतरी होतं. त्यावर हार घातलेला. फुलं ठेवलेली. शेजारी एक इसम बसलेला होता. पाखरासारखा चेहरा. पांढरी कुरतडल्यासारखी खुरटी दाढी. टोपी – सदरा आणि लाचार डोळे का, कशासाठी? जरा रागच आला. ‘अरे! चोखोबाच्या समाधीशेजारी बसला आहेस. ताठ बस. अभिमानाने बस.’ मी मनातल्या मनात म्हणालो.

समाधीवर छत्रीवजा काम होतं. एक दणकट देशी वारकरी आला. वारकरी होता आणि अर्थात् प्रापंचिकही. विठ्ठलाच्या भक्तीसाठी प्रपंचापासून पळावं लागत नाही. संत पळतात, कारण त्यांच्या अकलेचं भजं कधीच होऊन गेलेलं असतं. खेरीज त्याच्यामुळंच त्यांना प्रपंचावर भाष्य करण्याचा अधिकार मिळतो! हा वारकरी जवळचाच कुठलातरी असावा. त्यानं हातातली अवजड ओझी तिथं चोखोबाच्या आसर्यारला ठेवली आणि सरळ निघाला. चोखोबाला हात जोडायचं त्याच्या डोक्यात का आलं नाही? आणखी एका बाईनं केरसुण्या, कंगवे, फुगे, चप्पल असं नव्या खरेदीचं गाठोडं तिथं ठेवलं. खुरट्या दाढीचा, पाखरांच्या डोळ्यांचा तो तिथला इसम कोणालाही नको नको म्हणत नव्हता. ते त्यांचं सामान तिथं ठेवत होते, हे आपल्यावर उपकारच अशी भावना आणि ती बाईही चोखोबाला नमस्कार करायच्या नमस्कार करायच्या भानगडीत पडली नाही. कोणीच पडत नव्हतं. पुष्कळ लोक येत होते. आले की सरळ समोर महाद्वार. तिथं नामदेवाची पायरी. नामदेवाचा पितळी मुखवटा. हार फुलं, उदबत्त्या, दक्षिणेची नाणी. तिथंही वरच्या बाजूला एक पुजारीवजा इसम बसलेला होता. असाच कोणीतरी बारटक्के किंवा सदावतें. सदरा – पायजमा, दाढीचे खुंट. वयस्क आणि आत्मविश्वाासपूर्ण. मी कॅमेरा सरसावला तसा तो पोज घेऊन बसला.

लोक सारखे येत होते आणि भक्तिभावानं पायरीला स्पर्श करून नमस्कार करीत होते. पुजारीवजा इसम पोज घेऊन स्तब्ध. त्याच्या आणखी साताठ पायर्याि वर महाद्वारात जानवी घातलेले उघडेबंब जाडे लोक आळसावल्यासारखे उभे होते. माणसं सारखी येत – जात होती. मला फोटो घेता येत नव्हता. पुजारीवजा इसम पोज घेऊन फ्रीज झालेला तसाच. मला तोही फोटोत नको होता. मी कॅमेरा अॅडजस्ट करीत होतो. त्यात त्या इसमाचे पाय येत होते. तेही मला नको होते आणि लोकांचं येणं – जाणं अव्याहत. त्यांचे पार्श्वोभाग कॅमेरा व्यापत. अखेर एकदाची संधी मिळाली. मी स्नॅप मारला. दोन – तीन सटासट. वळलो. चोखोबा शेपटीसारखा उभा होता.

‘‘का रे? नामदेवाला नमस्कार केला ना? तिथं जाऊन कर की! तिथं पायरीखाली समाधी घेतलीय त्यांनी.’’ मी म्हणालो.

‘‘माझा निरसिला भेवो | दाखविला पंढरीरावो ॥
आणि ठेवोनी माथा हात | दिले माझे मज हित ॥

असं म्हणालास ना तू नामदेवाबद्दल, तुझा तो गुरू तिथं आहे.’’ मी पुन्हा म्हणलो.
चोखा पुढं झाला. नामदेवाजवळ जाऊन झुकला. त्याच्या आरपार मला नामदेव दिसत होता!

इतकं चमत्कारिक वाटलं की काही सुचेचना! चोखा होता आणि उजेड त्याच्या आरपार जात होता. कधीपासून हे असं झालं होतं? पंढरपुरात उतरल्यापासून हा असा मुका आणि पारदर्शक झाला होता की काय? आणि आत्ताच ते आपल्याला कसं दिसलं? की हा सतच असा आरपार आहे? साडेसहाशे वर्षांपासून?
मी खुळ्यासारखा बघतच राहिलो.

चोखा पुन्हा जवळ येऊन उभा राहिला तरी पुढलं सुचेना आणि हे त्याला सांगायचं की नाही ते कळेना.
मी वळलो आणि चोखोबांच्या समाधीसमोर उभा राहिलो. कॅमेरा सरसावून. तिथला पाखरासारखा माणूस संकोचला.
‘‘तू बसतोस तिथं? तुझ्या समाधीसमोर तू, असा फोटो काढायचा?’’ मी हसत हसत विचारलं.
‘‘त्याचा काय उपेग जी?’’

चोखा हसला. खरंच होतं की! काय उपयोग? जो पारदर्शक आहे त्याचा काय उपयोग? तो फोटोत येणारच नाही. हाडं आणि मांस उजेडाला अडवतं. त्याचा फोटो होतो. ज्याला उजेड अडवता येत नाही, त्याचा कसला फोटो? आणि माझ्या नकळत हे मला आधीपासून माहीत असणार. मी चोख्याचा फोटो घ्यायचा प्रयत्नही केलेला नव्हता. तो विचारच मनात आलेला नव्हता. का आला नव्हता? आतल्या आत मला जे माहीत असणार. कळत असणार. पण मग चोख्यालाही हे माहीत आहे? ‘‘त्याचा काय उपेग?’’ तो म्हणतोय, म्हणजे त्यालाही चोख्यालाही हे माहीत आहे? ‘‘त्याचा काय उपेग?’’ तो म्हणतोय, म्हणजे त्यालाही कळतंय.

समोर बाकी काहीच प्रश्न नव्हता. नमस्कारासाठी येऊन कोणीही अडचण करीत नव्हतं. मी कॅमेरा ठीकठाक केला. दोन – तीन कोनांतून फोटो काढले. शेजारचा पाखरासारखा माणूस कटवून. तरीही त्याचं काहीतरी आलं असणारच, हे मनात येत राहिलं. खेरीज त्या तेलकट पाषाणावर हारांचं आवरण जरा मोठ्ठंच होतं.

‘‘ते हार काढता थोडा वेळ?’’ मी पाखराच्या चेहर्याहला म्हटलं.
त्यानं ते पट्कन काढले.
‘‘आणि तुम्हीही जरा पलीकडं सरका.’’ मी त्याला आणखी सुचवलं. तो सरकला. मी आणखी फोटो काढून घेतले.
‘‘चल’’. मी शेजारी उभ्या चोखोबाला म्हणाला, ‘‘आता आंघोळ करायला मोकळे आपण’’.

पुढे जाताना मनात आलं, नामदेवाच्या पायरीवरच्या पुजारीवजा माणसाला ‘बाजूला हो’ म्हणण्याची हिंमत आपल्याला झाली नाही. चोखोबाच्या भक्ताला मात्र आपण सहज आत्मविश्वानसानं बाजूला केलं. हे कसं काय? आपल्या क्रिया आणि प्रतिक्रियांतील आत्मविश्वांसाच्या सापेक्षतेचं प्रकरण अखेर जातं कुठं? नामदेवानं पायरीखाली समाधी घेतली. भावना अशी की देवाच्या दारी येणार्या भक्तांची पायधूळ आपल्या मस्तकी पडावी. त्याआधी चोख्याच्या हाडांना त्यानं सन्मानानं देवासन्मुख उभं केलं. पण प्रत्यक्षात झालं काय? देवाकडं पाठ करून चोख्याला कोण हात जोडणार? चोखा एकाकी बेवारस अलक्षित उभा आणि पायरीखाली नामदेवाला अगणित नमस्कार. त्याच्या डोक्यावर पायधूळ झाडायची भक्तांना पाळीच नको म्हणून महाद्वाराचा रस्ता बंद. ते उघडं आहे पण भक्तांना आत जाण्यासाठी तो रस्ता बंद आहे. नामदेवाच्या डोक्यावर पाय देऊन कसं जाऊ द्यायचं? त्याचा पुजारी फार तर त्याच्या डोक्यावर बसू शकतो. जानवी घातलेले तुंदिलतनू आणखी वर उभे राहू शकतात. चोखोबानं आयुष्यभर जे केलं तेच त्याच्या हाडांनी उरलेली साडेसहाशे वर्ष आणि नंतरचा अगणित काळ करीत राहावं.

त्याच्या आसपास कुणी असण्याची गरजच काय? आणि असेल कोणी तरी त्याला सहज हाकलता येतं. ‘दूर हो दूर हो’ म्हणायचं. त्यात अडचण नाही!
आम्ही खाली उतरलो. वाळवंट होतं. चंद्रभागा होती. पुंडलिकाचं देऊळ होतं. माणसं होती. ती कायम सगळीकडंच. हार, फुलं, पानं, पावित्र्य. भक्तिभावाची लयलूट.

‘‘चोखाबा, या चंद्रभागेत दिवसाढवळ्या तू किती वेळा आंघोळ केलीस?’’ मी विचारलं. ‘‘तशी तू केलेली असणारच. तू देव बाटवलास म्हणून या लोकांनी तुला पंढरपुरातून हद्दपार केलं तेव्हा पल्याड तू झोपडी बांधून राहिलास. विटाळ होऊ नये म्हणून देवाला लांबून बघायचास. आणि या चंद्रभागेलाही आपला विटाळ नको म्हणून पल्याड गेलास. देवाचं मला माहीत नाही. मी त्याला पाहिलेलं नाही. पण ही चंद्रभागा तर साक्षात वाहती आहे. सगळ्यांचा सगळा मळ, सगळा विटाळ आपल्या विशाल आणि पराकोटीच्या सहनशील अंतःकरणात सतत घेणार्या या वाहत्या आईसारख्या चंद्रभागेत मोकळा होऊन तू किती वेळा बुडाला आहेस? तुला ‘दूर हो दूर हो’ म्हणणार्यात दुनियेनं इथंही सहजी येऊ दिलं असेल असं मला वाटत नाही. आत तुला तसं म्हणणारं कोणी नाही. आपण मुक्तपणे अंघोळ करू’’.

चंद्रभागा फार काही भरलेली नव्हती. वाळवंट होतं. विठोबाच्या नावाचा घोष करीत नामदेव इथं कैकदा कीर्तनाला उभा राहिला असेल. चोखोबाही. विठ्ठलाच्या देवळात त्याला जागा नव्हती. पण सुरक्षित अंतरावर इथं या वाळूत तरी निदान त्यानं कीर्तन केलं असेल. या वाळवंटानंच खरं तर त्याची कितीतरी दुःखं मायाळूपणे सांभाळली असतील.

‘‘तू कोणत्या ठिकाणी कीर्तन करायचास चोखोबा? काही आठवतंय? आणि कोण असायचं तुझ्या भोवती? की तुम्ही म्हणजे, तू, तुझी बायको सोयरा, तुझी बहीण निर्मळा, मेव्हणा बंका महार आणि फार तर तुझा मुलगा कर्ममेळा एवढेच असायचे तुम्ही? देवाचं नावदेखील एकेरी जातवार येऊन घ्यायचे लोक? आता किती बदलला काळ बघ, आता कोणीच कोणाला काही विचारत नाही. कोणी कोणाला अडवत नाही. विचारलं तुला कोणी? म्हणाले कोणी तुला, ‘दूर हो दूर हो’ म्हणून?’

‘‘कशापायी म्हणतीन?’’ चोखोबा म्हणाला.
म्हणजे काय? कसं काय म्हणतील, असं? तू काय कोणाला दिसत नाहीस की काय? आणि ते तुला माहीत आहे? आणि मला तर तू दिसतो आहेस. खेरीज काही काही लोकांनाही तू दिसलेला आहेस. आधी उतरलो तेव्हाचा पोलीस. गजानन महाराजांच्या मठाबाहेर भेटलेला माणूस. की तेही मलाच तसं वाटलं फक्त? आहे काय? आणि नामदेवाच्या पायरीपुढं पारदर्शक कसा झालास तू?

‘‘काही कळत नाही. चमत्कारिक वाटतं सगळं.’’ मी स्वतःशी म्हणालो. चोखोबा हसला. किंवा तो हसला असं मला वाटलं असेल. कशाचाच काही भरवसा देता येईना.

आम्ही चंद्रभागेत उतरलो. सगळ्या घाणीचं शेवाळ तळाला सुखरुप बसलेलं होतं. आणि ते हिरवं नव्हतं. पिवळं गढूळ पातळ असं होतं. आणि वरचं सगळं पाणी स्वच्छ. इतकी घाण, मळ, सगळं स्वीकारत चंद्रभागेनं स्वच्छ राहण्याचं एक तंत्र विकसित केलेलं दिसतंय, असं मनात आलं.

मी डुबकी मारली. रंध्रारंध्रात चंद्रभागा घुसली. जय गंगे भागिरथी. या हिंदुस्थानातल्या नद्या माणसाला वेडं करून सोडतात. त्या आपल्यात घुसतात आणि आपल्याला मायेच्या कोषात गुरफटवून ठेवतात. त्यांच्या सनातन नादात तुम्हाला निर्मळ करतात आणि तुमची सारी सुखदुःखं स्वतःच्या हृदयात तळाशी घेतात. मग तिथं पिवळं गढूळ पातळ शेवाळ साचतं. तरी पाणी निर्मळ ते निर्मळच. गेल्या एवढ्या वर्षात किती लोकांनी या नदीत डुबक्या घेतल्या असतील!

मीही त्यांच्यातलाच एक झालो. मनाला एक असाधारण शांतीचा, सुस्थित असल्याचा अनुभव. आधीच्या आणि नंतरच्या सगळ्यांशी नातं जडण्याच्या भावनेची स्थिती. सुटं असण्याचा दाब नाही. एकटेपणाची भीती नाही. विश्वअ हे नात्याचं प्रचंड मोठं जाळं. अनेक जाळी आणि जाळ्यांमधली अनेक नाती. त्यामुळं एकटा एक कोळी केंद्राशी असं नाही आणि तो फक्त भक्षक असंही नाही. ईश्वंर कोळी. आपल्याला तुटलेपण नाही. नात्यागोत्यातलं मनाचं स्थैर्य शाश्व त.
मी शेजारी पाहिलं. चोखोबा ओंजळीत पाणी घेऊन काहीतरी पुटपुटत होता. तुला घ्यायचं आणि तुलाच अर्पण करायचं. शब्द असतात. तुझ्या प्राणात माझा प्राण. मला तुझ्यात येऊ दे. मला तुझ्याशी एकरूप होऊ दे. खाली – वर, अल्याड – पल्याड सगळीकडं तू. शाश्व त तू.

चंद्रभागा शाश्वंत होती. वाहती होती. चोख्याच्या अल्याड आणि पल्याड. त्याच्यातून पल्याड. पुन्हा तो पारदर्शक. चोखा दुसर्यां दा पारदर्शक झाला.
चोखोबाचं माझ्याकडं लक्ष नव्हतं. मी उभा राहिलो आणि तरातरा बाहेर आलो. चोखोबा आतच उभा होता. उजेड होता. चोखोबावर आणि चंद्रभागेवरही. दोघेही उजळलेले. कमाल आहे! अरे, चंद्रभागा पारदर्शकच आहे. तरीही उजळतेच की ती! चोखोबा तिच्याहून कुठं वेगळा आहे? तो तर साडेसहाशे वर्षांआधीच कैकदा तिचा भाग होऊन गेलाय. कैकदा जोडला गेलाय. सरळ आहे सगळं!

‘‘चल, आवर लवकर, लगेच निघू. तेवढाच लवकर नंबर लागेल. च्यायला! देवाच्या पाया पडायलाही लायनीला उभं राहावं लागतंय!’’ मी बाहेर येणार्याी चोखोबाला म्हणालो.
‘‘तसं कसं जाता येईन? आधी पुंडलीकरायाची भेट.’’ तो म्हणाला.

तेही खरंच होतं. पुंडलिकाच्या दर्शनाखेरीज विठोबा कसला पावन होतोय? तसं विठोबाच्या दर्शनाचं पुण्यच मिळत नाही. त्यानंतर तर याला तिथं विटेवर उभा करून ठेवलाय आणि स्वतः इथं मस्त चंद्रभागेत. पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. सालं, या बालकवी ठोंबर्यांाच्या डोक्यात पुंडलीकच होता की काय? चंद्रभागेला कायमची मिठी घालून बसलाय हा पुंडलीकराया! चल बाबा, काय एकेक असेल ते सगळं केलं पाहिजे.

‘‘ठीक आहे. आज हे दर्शनाचं सगळं उरकू आणि मुक्कामाला जाऊ. उद्या सकाळी पल्याड जाऊन तुझ्या झोपडीच्या जागेचा फोटो घ्यायचा. तिथं तू बांधलेली दीपमाळ मोडलेल्या स्थितीत का होईना, आहे म्हणतात. सभा कदमांनी तसं लिहून ठेवलंय आणि मला ती बघायचीय.’’ मी म्हणलो.
पुंडलिकाच्या तिथं गेलो तर चोखोबा म्हणे, आधी त्याचे आईबाप. मग तो. ठीक आहे, म्हटलं, ये भेटून. तुला जिथं जिथं जायचंय, तिथं जा. मी पायताणांजवळ उभा राहतो. देवाच्या दारीसुद्धा चोरचिलटांची कमी असत नाही. आणि पुंडलिकाला तरी काय भेटायचंय? तिथंही तूच जा बाबा. पुण्य घे. मला बाहेरुनच काही दिसलं तरी पुरेसं आहे.

चोखोबा रांगेतून आत गेला. अंग चोरुन, इतरांना आपला स्पर्श होणार नाही अशी काळजी घेत. मला ते दिसत होतं आणि मी चिडलोही होतो. पण इतक्या लोकांसमोर त्याला कसं झापणार? निमूट उभा राहिलो. त्यात बाहेरून पुंडलिकाला बघायचं डोक्यात होतं, ते राहून गेलं. चोखाबा मात्र भक्तिभावानं भिजून प्रसन्नचित्ते बाहेर आला. म्हटलं, चला. हेही काही कमी नाही. किंवा याच्याइतकं चांगलं काहीच नाही. आता विठोबा. त्याला भेटण्याच्या सार्याी पूर्वअटी चोखोबानं पुर्याा केल्यात. म्हणजे, त्याला त्या वाटत होत्या. चंद्रभागेत न्हाला आणि पुंडलिकाला भेटला. आता तो मला आधी दिलेला शब्द पुरा करणार. मी विठोबा – चोखोबाची गळाभेट पाहणार. मी विठोबाला पाहिलेलं नाहीय आणि हा चोखोबाही मला अधूनमधून संशयास्पद पारदर्शक दिसतो. तरीही दोघांची गळाभेट पाहण्याची मात्र अतीव इच्छा आहे.

आम्ही पुन्हा महाद्वारासमोर आलो. लोक दर्शनासाठी आत जात होते. शेजारी डावीकडून एक बारकं दार होतं. तिथून. मी चौकशी केली. आम्ही निघालो. आत लोखंडी कठडे होते. माणसं उभी होती. बाया, पुरुष, तरणे, म्हातारे. त्यांच्यात आम्ही उभे राहिलो. रांगेत. पुढची गर्दी नुसतीच ठप्प. काही तर अगदी बसलेले. एकाला विचारलं, म्हटलं, काय चाललंय काय? म्हणाला, देवाची आरती चालू आहे. ती होईस्तोवर दर्शनार्थी आत नाही जाऊ शकत. म्हटलं, ठीक आहे. थांबायचं तोवर या लोखंडी कठड्यात. चोखोबा माझ्या मागं उभा होता. त्याच्या मागं आणखी माणसं येत होती. तरी बरं, सीझन नव्हता म्हणून गर्दी विशेष नव्हती. समोर उजवीकडं देवाच्या दाराची चौकट दिसत होती. देव अर्थातच तिथून बराच आत असणार. कधी पाहिलाच नव्हता. कसं कळणार? काही माणसं येत – जात होती. उजवीकडं सभामंडपात काही जण उभे होते. उघडे, जानवी घातलेले, हातात थाळ्या घेतलेले. त्यांतला एक थाळी समोर धरीत जवळ आला आणि थाळीतला गुलाल बोटांवर थापून समोर धरत राष्ट्रभाषेत म्हणाला,

‘‘पूजा करायचीय? इकडून अग्रक्रमानं मिळेल. तिथं दक्षिणा द्याल ती कंत्राटदाराला मिळेल. इकडे आम्ही पुजारी. ब्राह्मणदेवता. देवाच्या अंतःकरणाचे सेवक. पुण्य इकडे आहे. वेगळ्या वेगळ्या पूजांसाठी वेगळे वेगळे दर.’’
‘‘नको नको’’. म्हटलं, पूजा कोणाला करायचीय इथं?
‘‘या भटजींच्या हातून घ्यायचं का रे पुण्य?’’ मी चोखोबाला विचारलं.
‘‘नको नको.’’ तो म्हणाला.
‘‘अरे हे बडवे नाहीयेत. त्यांची सद्दी संपली आता’’.
‘‘नको नको’’.

त्या लोकांना बघून आधीच तो धास्तावला होता. अर्थात त्यांना बघूनच असंही नसेल. आणि तो धास्तावला होता, हेही नेमकं नसेल. पण काहीतरी वेगळं, उलघालीसारखं नक्कीच त्याच्या मनात चाललेलं असणार. आणि जरा वेळानं माझी खात्रीच पटली. त्याच्या जरा वेळ आधी मी वैतागून समोरची श्रद्धाळू माणसं पिंजर्यातत बघत होतो. उजवीकडच्या सभामंडपात, जिथं ते देवाचे अंतःकरणाचे हिंदीभाषी सेवक बसलेले होते, त्यांच्यापल्याडून पुष्कळ लोक पुढे जात होते.
मी शेजारच्याला विचारलं.

‘‘समोरच्या दारातून आत गेलं तर लांबून आरती बघता येते. नशीब असलं तर विठोबाच्या मुखाचं दर्शनही होतं.’’ तो म्हणाला.
‘‘मग आपण कशासाठी थांबलोय इथं?’’
‘‘या रांगेतून गेलं की आत थेट गाभार्याआत जाता येतं. देवाला स्पर्श करून नमस्कार करता येतो. तिकडून ती सोय नाही’’
.
च्यायला! म्हटलं, काय हरकत आहे? आपल्याला काय देवाला हातबीत लावायची हौस नाही. इथं उभं राहून तंगडण्यापेक्षा लांबून का होईना, बघून घेऊ. तेवढं आपल्याला पुष्कळ झालं. चोखोबा राहील इथं. त्याला देवाला भेटायचंय. आपल्याला नाही. आपल्याला त्या दोघांची भेट बघायचीय. ती तिथूनही बघता येईल.

‘‘मी तिकडं जाऊन थांबू का चोखोबा?’’
मी मागे वळून चोखोबाला विचारलं. तर चोखोबा गायब.
मी नीट पाहिलं. मागंपुढं, डावीकडं, उजवीकडं. कुठंच नव्हता तो. अचानक गायब झाला होता! की अंतर्धान पावला होता! कुठं गेला होता?
‘‘हा गेला कुठं?’’ मी मागच्या माणसाला विचारलं.

त्याला काहीच कळेना. त्यानं प्रश्नाार्थी चेहरा करीत निरागसपणे माझ्याकडं पाहिलं. तो बहुधा कन्नडमध्ये, काही कळत नाही किंवा माहीत नाही, असं काहीतरी म्हणाला. च्यायला! विठोबाच्या भेटीसाठी चोखोबा काय कर्नाटकात गेलाय की काय?
कानडा विठ्ठलू कर्णाटकू | तेणे मज लावियला वेडू ॥

कोणाचा हा अभंग? चोख्याचा नाहीय. पण त्यालाही विठोबाचं हे इंगीत माहीत असणार. पण आता हा देवळातला विठोबा इथं आहे आणि हा चोखोबा कुठं गेलाय?

मी तिरीमिरीनं बाहेर पडलो. माणसं माझ्याकडं चमत्कारिक नजरांनी बघत होती. मला त्याच्याशी काहीच घेणं नव्हतं. चोखोबा पळाला होता म्हणून मी पिसाटलो होतो. विठोबाला भेटायचं मान्य करून पंढरपुरात आला आणि आता कुठं पळाला? चंद्रभागेत न्हाला, पुंडलिकाला भेटला आणि विठोबानंच ऐनवेळी त्याचं काय घोडं मारलं?

मी रस्त्यात उतरलो. पुन्हा सारं तेच. तीच गजबज. दुकानं. गुलाल. मूर्त्या आणि लाह्या – बत्ताश्यांचे पुडे. माणसांची ये – जा. भक्तिभावाची अखंड हलचल. सातशे वर्षांपासून हे रसायन जळत ठेवलंत साल्येहो, सगळ्या मराठी मुलखाला वेड लावलंत आणि तुम्ही मात्र पसार आपल्या आपल्या जागी. वा रे वा, चोखोबा! विटाळाला कंटाळून तूच ना विठोबाला म्हणाला होतास –

आता कोठवरी | भीड तुमची धरू हरी ॥
दार राखत बैसलो | तुम्ही दिसे मोकलिलों ॥
ही नीत नव्हे बरी | तुमचे साजे तुम्हा थोरी ॥
चोखा म्हणे काय बोलों | आमुचे आम्ही वाया गेलों ॥

मग आता काय झालं होतं? चांगले आत गेलो होतो ना! आता कोणी अडवलं होतं तुला? तुलाच मुळात इच्छा नाहीय्ये विठोबाला शिवायची की तू काय सांगतोस? तुला नकोच आहे. उगीच का कच खाल्लीस? दुसरं कारण काय?…

मी स्वतःशी बडबडत पंढरपुराच्या गल्लीबोळातून, गर्दीतून, मिठाईच्या दुकानांतून, म्हशींतून, माश्यांतून, मठांतून, पताकांमधून, घाणीतून, गायांतून, डुकरांमधून, गोखाड, वाळू, चिखल सारीकडं हिंडत राहिलो आणि दमून अखेरी गाडगेबाबांच्या जुन्या मठाचा उंबरा ओलांडून आत शिरलो.
समोर सकाळचा म्हातारा कुतांगळा कर्मचारी गळ्यात वीणा बांधून तिची बेसूर दीनवाणी तार छेडत ‘विठ्ठल विठ्ठल’ करीत हिंडत होता. पुष्कळ माणसं इकडं – तिकडं झोपलेली होती. हा कुतांगळा मधूनच कोणालातरी उठवायचा आणि विचारायचा, पावती फाडलीय का? मग तो उठलेला डोळे चोळत म्हणे, हां. हां. कुतांगळा बाकी शहनिशा करीत नव्हता. देवाच्या दारी कोण कशाला खोटं सांगेल अशी श्रद्धा असेल, दुसरं काय? किंवा त्या बेफिकीर दरिद्री भाविकांची त्या कुतांगळ्याला दयाही येत असेल. काहीच सांगता येत नाही.

मी कुतांगळ्याला नमस्कार ठोकला. विचारलं, ‘‘चोखोबा दिसला का?’’ त्यानं चेहर्याावरच्या सुरकुत्या हलवत ओळख दाखवली आणि शांतपणे वीणेची तार बेसूर छेडत ‘विठ्ठल विठ्ठल’ येरझारे सुरू केले.

मी तिरीमिरीत चिंचोळ्या जिन्यातला अंधार पार करीत वर आलो. खोलीचं दार ढकललं. चोखोबा होता. कोपर्याअत धरुन आणल्यासारखा बसलेला होता. मी दिसल्यावर त्यानं अंग आणखी आक्रसून घेतलं. इतकं की माझं चिडणं, दमणं, भडकणं – सगळं क्षणार्धात वितळलं. पुढं होऊन त्याला मिठी घालावी, असं वाटलं. ते मी केलं नाही. त्यातून सुटण्यासाठी पुन्हा तो फरार झाला तर काय अशी भीती मनात कुठंतरी असेल.

‘‘दमलो यार! आख्खा दिवस गणागणा हिंडण्यात गेला. आता भाजीभाकरी खाऊन चांगली ताणून देऊ.’’ मी जरा जास्तीच हाश्श – हुश्श करीत म्हणलो.
ते तसं खरं होतंच. मग ते मी कृत्रिमपणे अधिक वरच्या पातळीवर नेलं. चोखा देवळातून पळाल्याचं मला काही बोलायचं नव्हतं. तो उल्लेख करायचा नव्हता आणि तरीही काहीतरी बोलायचं होतंच. त्यामुळं मी मार्ग काढीत होतो. इथं आल्यापासूनच एकूणात चोखोबानं मला फार अडचणीत आणलं होतं. मी एरवी भडका, चिडका, मोकळा, स्पष्ट बोलणारा असा दिसणारा माणूस होतो आणि ते बर्याआपैकी खरंही होतं. पण आता या संयम नामक प्रकरणानं मी क्षणोक्षणी दाबला जात होतो. हा संयम मी का राखत होतो, ते मला कळत नव्हतं. तडातडा बोललं की मन मोकळं होतं. निर्मळ होतं. मी ते करतच नव्हतो. मनात मळ साठलाय असं वाटत नव्हतं. पण आपण काहीतरी दडवून ठेवतोय आणि त्याला आपला इलाज नाही, असं मला वाटत होतं.
अर्थात हे असलं फार वेळ जमत नाही, चालत नाही. इथं नाही तर तिथं, कुठंतरी कशी का होईना, वाफ बाहेर येतेच. मी ठरवून पुष्कळ संयमाने पुष्कळ बाष्कळ बडबडत राहिलो आणि अखेर चोखोबाच म्हणाला,

‘‘दमच निघंना जी. पळून आलो. तुम्ही चिंतागती झाले आस्तान’’.
‘‘जाऊ दे रे. तुला ते वातावरण आवडलं नसेल. मलाही नाही आवडलं. पण आपण जाऊ ना. परत. तुझी आणि विठोबाची भेट डोळे भरून पाहिल्याखेरीज मी इथून जात नाही. तेवढंच तुम्हा लोकांचं गौडबंगाल कळलं तर कळलं थोडं फार.’’
‘‘म्हंजे काय जी?’’

‘‘सांगतो ना ! अरे, तुम्हा लोकांच्या या विठोबाविषयीच्या प्रेमाचं मला काही कळत नाही. म्हणजे, मला मान्य आहे – हा तुमचा नेता नामदेव, त्यानं लोकांना दिलेला भक्तीचा सोपा मंत्र, तुम्हा सगळ्यांना त्यानं या झेंड्याखाली आणलं, हे छानच म्हणजे, मोठंच काम होतं ते. ज्याला ज्याला परंपरेनं नाकारलं त्याला नामदेवानं आपल्या पंखाखाली घेतलं आणि विठ्ठलभक्तीला लावलं आणि तुम्ही सगळे किती वेडे झालात! संसार करतानाच विठोबाच्या नावानं टाळ कुटत गाणी रचीत राहिलात, म्हणत राहिलात. पण गोणाई, राजाई काय म्हणत होत्या? तुझी सोयराबाई काय म्हणत होती? अगदी निर्मळासुद्धा. किती ताप झाला या बायांना? आणि कोण कुठला हा विठोबा, कुठली रखुमाई? कुणी म्हणतं नामदेवच त्यालाही घेऊन आला कोणी म्हणतं दरोडेखोर होता तो. कोणी म्हणतं नामदेव आणि विठोबा, दोघंही साथीदारच होते सगळ्यात. आता हे तुमच्यापैकी कोणीच म्हटलेलं नाहीय पण बाकी दुनिया होतीच की! आणि तेही समजा सोड, पण सालं या देवानं सगळ्या गोष्टी मुक्तपणे भरपूर उपभोगायच्या आणि तुम्ही मात्र त्याच्या नावानं टाळ कुटत हालहाल करून घ्यायचे. स्वतःचे करायचे, कुटुंबाचे करायचे. हा कसला धंदा? आणि जनाबाईच्या तो इतका प्रेमात पडला की तिला दळू काय लागायचा, तिची लुगडी काय धुवायचा. उगीच नाही, रुक्मिणीसुद्धा किती वैतागली होती!


रुखमिनी मनिती देवा तुम्हा लाज थोडी
गादी फुलाची सोडून वाकळाची काय गोडी
रुखमिन मनिती देवा तुमचा येतो राग
तुमच्या धोतराला जनीच्या काळजाचा डाग

त्याची बायको होती ती. तिला कळलं होतं ते. आणि खुद्द जनाबाईनं लिहून ठेवलंय ना!
जनी म्हणे देवा मी झाले वेसवा ॥ रिघाले केशवा घर तुझे ॥

तुम्ही म्हणाल, अहो असं नाही. याचा आध्यात्मिक अर्थ बघा. काय अर्थ निघतो? आणि अध्यात्म कुठून येतं? जगण्यातूनच. अनुभव जगण्यातूनच येतो. अर्थ कैक काढता येतात. त्यांत हाही एक आहेच ना! हे आहे काय? तुम्ही लोकांनी देवाचं इतकं चालवून घेतलं त्यानं तुमचं काय चालवून घेतलं? तुम्ही स्वतःचे हाल करून घेतलेत आणि दुनियेलाही तेच करायला सांगितलंत आणि भोळ्या दुनियेनं वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या ते ऐकून घेतलं. मला कळतच नाही. हे काय आहे? हा कसला चमत्कार? तुम्ही सगळे येडे झालात आणि उभ्या मराठी मुलखाला येडं करून टाकलंत! तुम्हाला काय मिळालं? तुम्ही कशासाठी हे केलंत? आणि तू चोखोबा, तुला काय मिळालं? तुला पाहिजे ते मिळालं? तुला त्याची साधी भेटही कधी मिळाली नाही. कसलं चेटूक केलं होतं त्यानं तुझ्यावर? अरे, तुला तो भेटला नाही यात त्याचंच न्यून राहिलं. तुम्ही सगळीच फार भली माणसं होता. इतकं कसं असं झालं तुमचं? खरंच अकलेचं भजं होतं. माणसाच्या?…’

मी इतका सलग, इतका वेळ भान हरपल्यासारखा बडबडत राहिलो की चोखोबाची त्यावर काही प्रतिक्रिया असेल, त्यालाही काही म्हणायचं असेल याचंही भान मला राहिलं नाही आणि ते आलं तेव्हा पाहिलं तर चोखोबा डोळे मिटून शांतपणे झोपी गेलेला होता.

दुसर्या दिवशी सकाळी चंद्रभागेच्या तिरी जाऊन उभे राहिलो. आम्हाला पल्याड जायचंय हे सरावाच्या आतल्या आवाजानं ओळखून एक जण जवळ आला. म्हणाला, नावेत बसा. गोपाळ तीर्थाला जा. स्नान करून दर्शन घेऊन या वगैरे आणि पुण्याच्या प्रतापाविषयी व्यावसायिक पेरणी मधुर सराईत टरफलासारखी होतीच. म्हटलं, ‘‘पल्याड इथं जायचंय. तिथं चोखामेळ्याची समाधी कुठं आहे – म्हणजे समाधी नाही पण त्याची झोपडी होती आणि एक पडकी दीपमाळ आहे, ती जागा दाखवता येईल?’’

म्हणाला, ‘‘आहे ना, माहीत आहे ना, ते काय समोर दिसतं, तिथं मागच्या बाजूला’’.
‘‘ठीक आहे’’, म्हटलं, ‘‘चल. आम्ही दोघं आहोत’’.

चोखोबा अर्थातच गप्प होता आणि ते ठीक होतं. शिवाय त्याला ही माहिती विचारण्याइतका उत्साह माझ्यात नव्हता. तो स्वतः होऊन काही सांगेल अशी शक्यता वाटत नव्हती. त्याचं असणंच मुळात, आता मला गोंधळात टाकायला लागलं होतं. तिथं बाकी काय! त्यामुळं सरळ लगाम घातला मनाला. म्हटलं, हा आपल्या सोबत आहे. पण तो नाहीय. तो असणं शक्यच नाही हे इतकं रॅशनल असताना तो आहे असं समजणं, यात भ्रमाखेरीज काय असणार? चमत्कारिक काहीतरी झालंय आपलं. पण आवरायचं, नीट गोळा करायचं आपण आपल्याला आणि बघायचं. चोखोबा आहे, असं वाटतंय तर असू देत. त्याचा आपल्याला काही ताप नाही. तो नाही असं म्हणणं मुष्कील होतंय, तोवर तो आहे आणि तो नाही आहे हे तर आहेच. आम्ही दोघं आहोत म्हटल्यावर नावाडी चमत्कारिक पाहतो ते तेही ठीकच आहे…

उतरुन वर गेलो. विजेवरच्या खूप मोटारी होत्या. चंद्रभागेतून पाणी खेचणार्याठ. कोणाच्या होत्या? उजवीकडं भलीमोठी दगडी इमारत होती. नावाडी सोबत आला होता. त्याला विचारलं.

म्हणाला, ‘‘मारवाडी का गुजराथी लोकांचं संस्थान आहे. ही मागची उसाची सगळी शेती त्यांचीच आहे’’.
‘‘आणि या मोटारी?’’
‘‘त्यांच्याच आहेत’’.
दणकेबाज संस्थान दिसत होतं. ‘‘इथं चोखोबाची झोपडी कुठं होती?’’
नावाड्याला विचारलं.
म्हणाला, ‘‘हे काय झाड’’.
‘‘आणि दीपमाळ?’’
म्हणाला, ‘‘नाही बुवा. ती कुठंय?’’

‘‘म्हटलं, वा रे वा! सभा कदमांनी एवढं लिहून ठेवलंय. नसेल कशी? शेत काढताना पडली असेल. पाडली असेल’’.
काहीच न सुचून नावाडी परत फिरला. म्हणाला, ‘‘परत घ्यायला येतो. काम झालं की इकडून हात वर करा. मी लगेच येतो’’.
ठीक आहे, ठीक आहे म्हणलो आणि पुढं झाले.

नावाड्यानं झाड दाखवलं होतं; तिथं.
तळाशी सुबक चौथरा बांधलेला होता. मऊ गुळगुळीत फरशी होती. एकीवर मजकूर होता वाचला.

॥ श्री मुकुंद गोपाल जयती ॥
॥ श्री मदन मोहनो जयती ॥

प्रथम परिक्रमा करते हुए श्री ‘वल्लभाचार्यजी इसी वृक्ष के नीचे बिराजे | उस समय सन्मुख पांडुरंग श्री विठ्ठलनाथजी आपसे मिलने पधारे | आप भी स्वागत के लिए आये | वर्तमान बैठक जो आप दोनों के मिलाप के स्थळ पे है | अस्तु |…’

आणि पुढं मग हा चौथरा आपल्या स्मृतिप्रीत्यर्थ काशी येथील मुरलीधरलालजी महाराज, सौ श्री प्रेमप्रिया बहुजी महाराज, आत्मजा कृष्णप्रिया बेटीजी यांनी सिद्ध केला वगैरे आणि आपल्या म्हणजे अर्थातच वल्लभाचार्यजींच्या.

वल्लभाचार्य परिक्रमा करीत या ठिकाणी आले तेव्हा त्यांच्या भेटीसाठी विठोबा इथं आला होता. त्या दोघांच्या भेटीची ही पवित्र जागा. अरे बापरे! आणि चोखामेळा? त्याची दीपमाळ? किंवा जे काही असेल ते? काहीच नव्हतं. नावाड्यानं हे झाड का दाखवलं? इथं काय आहे चोखोबाचं?

मी चोखोबाकडं पाहिलं. तोही बघत होता. काही वेळ गोंधळल्यासारखा वाटला आणि नंतर निर्विकार झाला. वा वा ! धन्य आहे चोखोबा तुझी! तुझा पांडुरंग जसा विकारांच्या पल्याड तसा तूही. अरे, इथंच यायचा ना तो, तुझ्या घरी जेवायला यायचा म्हणे! आठवते तुला जागा? इथं तर काहीच दिसत नाही. सगळं सपाट शेत आणि उसाचं रान. काहीच नाही इथं.

मी चोखोबाला विचारायच्या बेतात असताना शेजारच्या संस्थानच्या इमारतीतून एक तरुणाबांड तगडा पोर्याा तिथं आला.
म्हणला, ‘‘का हो? काय विशेष?’’
म्हटलं, असं असं.

म्हणालो ‘‘छे छे! मी हे पहिल्यांदाच ऐकतोय. कोणी सांगितलं तुम्हाला? ही वल्लभाचार्यांच्या येण्यानं पावन झालेली जागा. पाचशे वर्षांपासून आमचं संस्थान आहे इथं. सगळं रेकॉर्ड आहे आमच्याकडं. त्यात तुम्ही म्हणता तसं काहीच नाही’’.

म्हटलं, ‘‘असं कसं असंल? इथून महाद्वार समोर दिसतं. इथंच कुठंतरी असेल. आणि तुम्हाला – म्हणजे ठीक आहे इथं नसेल ती जागा, पण इथंच कुठंतरी असेल. तो इथं राहिला होता. तुमचं पाचशे वर्षांचं संस्थान आहे. तर तुम्हाला हे माहीत असायलाच पाहिजे’’.

‘‘अहो, असतं तर सांगितलं नसतं का?’’ तो उर्मटपणे म्हणाला.
‘‘नाही पण, जवळ कुठं -’’ मी नम्र होऊन विचारलं.

‘‘बघा. विचारा. मला तरी माहीत नाही. इथं तर नक्कीच नाही.’’ तो म्हणाला आणि तसाच तृप्त चालत त्या भव्य इमारतींकडे गेला.
मी भांबावल्यासारखा उभा राहिलो. समोर वल्लभचार्यांचं सुबक झाड. नांगरलेली जमीन, त्यापुढं आणि उजवीकडं ऊस. बाकी पोसलेली हिरवी झाडं. वल्लभचार्यांचं झाड. अरे! पाचशे वर्षांचं संस्थान तुझं आणि या झाडाखाली वल्लभाचार्यांला विठोबा भेटला तर हे झाड त्याच्यापेक्षाही जुनं असायला पाहिजे ना! हे मघाशी माझ्या ध्यानात कसं आलं नाही? कितीही ताणलं तरी या झाडाचं आयुष्य पंचवीस – तीस वर्षांच्या पुढं नेता येणार नाही. काय सांगतोस काय तू? पाचशे वर्ष कशाला म्हणतात? कसलं रेकॉर्ड आहे तुझ्याकडं? कोणत्या भाषेत? चौदाशे सत्त्याण्णव साली हिंदुस्थानावर कोणाचं राज्य होतं? पंढरपूर कोणाच्या ताब्यात होतं? चोखोबा सातशे वर्षांआधी होऊन गेला. पुरावा आहे. सज्जड पुरावा आहे. त्याच्या झोपडीची जागा कुठंय? त्याची दीपमाळ? तिचा चौथरा कुठंय? या शेतात बुलडोझर किती साली आणलात? आहे रेकॉर्ड? आदिलशाही, कुतुबशाही ही नावं ऐकलीत?…

चल चोखोबा! आणखी तपास करू. ती जागा ही नसेलही कदाचित. पण तुझं नावच ऐकलेलं नाही, हा न्याय नाही. या उभ्या दांड्यानं आपण पल्याड जाऊ. हे उसाचं रान संपल्यावर पल्याड असेलही काही. आणखी कोणाला तरी विचारू. तुला आठवत नाही हे ठीक. पण दुनियेलाही आठवत नाही, असं कसं होईल?

मी पुढे निघालो. चोखोबा मागे मागे होता. काल मी त्याच्यावर वैतागलो होतो, हे त्यानं भलतंच मनाला लावून घेतलं बहुतेक. आपण ऐनवेळेला पळून गेलो म्हणून मनाला खात असेल. मी एकदोनदा तिरपं मागे पाहिलं तर तो अगदी व्यवस्थित माझ्या मागं मागं होता. रस्त्यात एका ठिकाणी एक पोरगेला इसम बाभळीचं झाड तोडत होता. त्याला विचारलं. म्हटलं, असं असं. काही माहीत आहे का? ऐकलंय का? तो छान कोरं हसला. जुन्या माणसानला विचारायला पायजे, म्हणाला. हे सगळं निर्मळ कोरेपण आणि सौजन्य अशा वातावरणात झालं आणि मनाला जरा थंडावा वाटला हेही पुष्कळ. आणखी पुढं गेलो. तिथं दोन माणसं समोरुन येतानाची दिसली. म्हटलं, असं असं. नाही. काही माहीत आहे का? त्यांतला एक वयस्क होता. तो म्हणला, ‘‘आहे की’’. त्याच्या बरोबरचा कमी वयस्क होता, त्याला तो म्हणाला, ‘‘ती नायी का रे, तिथं चौथरा हाये समांदी.’’

तो कमी वयस्क म्हणाला, “हां हां.” मग मी म्हणालो, ‘‘कुठं आहे, दाखवता का? मला फोटो घ्यायचाय, पुस्तकासाठी. चोखोबाच्या अभंगांचं पुस्तक आहे’’. तेव्हा तो जास्ती वयस्क कमी वयस्काला म्हणाला, ‘‘जा रे सायबान्ला दाखवून ये. पुन्याचं काम ह्ये. तवर मी इठंच ह्ये. ये जाऊन.’’
नंतर आशाळभूतपणे आणि कॅमेरा सरसावत मी कमी वयस्कापाठी. रस्त्यात मला पुन्हा तो तरुण तगडा इसम, संस्थानचा दिसला. तिथं काही माणसं विजेच्या खांबावर दुरुस्ती करीत होती. हा ऐटबाजपणे देखरेख करीत होता. त्यानं मला पाहिलं आणि पाहिलं नाही असं केलं. किंवा मला ते तसं वाटलं.
आणखी पुढं जाता जाता अखेर हा कमी वयस्क पुन्हा त्याच जागी पोहोचला. पुन्हा तेच वल्लभाचार्य आणि विठोबा यांच्या भेटीचं सुबक झाड. पाचशे वर्षांपेक्षा जुनं म्हणे! ‘‘अरे हे नाही. हे वेगळंच आहे,’’ मी कमी वयस्काला म्हणालो. पण तो तिथंच आणखी काहीतरी शोधत होता. एखादा पानाड्या जसा एखाद्या जागी चाहुलीसरशी घोटाळतो तसा तिथं त्या झाडाशेजारीच तो रिंगण मारीत होता.

म्हटलं, ‘‘का रे बाबा? काय झाल?’’
तर म्हणे, ‘‘इथंच व्हतं. चबुत्रा व्हता. कुठं गेला काय जनू? पन इथंच व्हता. म्या पायल्याला ह्ये. दगडाचा चबुत्रा व्हता. पडाया झाल्यालाच व्हता, पन व्हता. आता पत्त्या नाय.’’
म्हटलं, ‘‘कधी पाहिलास?’’
तर म्हणे, ‘‘दोन – तीन वर्सं झाली, काय न्यामकं ध्यानात नायी. पन ह्या इठंच व्हता’’.

दरम्यान संस्थाचा तरुण तगडा इसम लांबवर येऊन उभा राहिलेला मी पाहिला. नंतर एखाद्या चुंबकाकडे ओढला जावा जसा तो कमी वयस्क त्याच्याकडं ओढला जाताना मी पाहिला. तरुण तगडा उर्मटपणे त्याला काहीतरी जाब विचारल्यासारखा विचारत होता आणि कमी वयस्क घाबरुन ‘नाही नाही’ अशी मुंडी हलवत होता. मी कॅमेरा काढला आणि वेड्यासारखे त्या नांगरलेल्या जागेचे फोटो घेतले. चोखोबाला म्हटलं, चल. जाऊ आता. इथं काहीच नाही. मनात आलं, निरर्थकपणे एखादी कृती करण्यातही कधी कधी पुष्कळ काही असतं. नांगरलेल्या वावराचे फोटो घेण्याच्या कृतीत काय होतं?

परत दांड ओलांडून गेलो. जास्ती वयस्क तिथं थांबलेला होता. म्हणाला, ‘‘पाहिलंत?’’ म्हटलं, ‘‘तिथं काहीच नाही’’. तर म्हणे, ‘‘वा वा ! असं कसं? मी स्वोत्ता पाहिल्यालं ह्ये.’’ म्हटलं, ‘‘त्या मारवाडी का गुजराती संस्थानिकानं ते नांगरुन टाकलं असेल. बरं झालं, त्याला बिचार्यानला तेवढीच सरळ सपाट जमीन.’’ नंतर तो कमी वयस्क धावत तिथं आला आणि नजरेचा इशारा करून जास्ती वयस्काला सोबत घेऊन गेला. त्यांनी पुन्हा आमच्याकडं पाहिलंदेखील नाही. मी खिळल्यासारखा त्या संस्थानच्या इमारतीकडं बघत राहिलो. सगळीकडून तजेलदार हिरवे वृक्ष होते. नदीतलं पाणी असंख्य मोटारींनी ओढलं जात होतं. ऊस पिकत होता. संस्थानची इमारत झाडांच्या वर झळकत होती. वरच्या मजल्यावर नवं मोठं बांधकाम झालेलं होतं. नवा आधुनिक बंगलाच त्या संस्थानिकानं बांधून घेतला होता. तिथल्या झोपाळ्यावर झुलत सुपारी कातरताना त्याला समोरचं महाद्वार आरामात बघता येत असेल. पण तो बिचारा ते सारखं सारखं काय बघणार? रोज मरे त्याला कोण रडे? भक्तीचा इतका डोस त्याला खचितच परवडणारा नव्हे. तब्येत सांभाळायची तर भक्तिभावाला काबूत ठेवलंच पाहिजे! तिची हेळसांड करायला तो काय चोखोबा थोडाच होता? आयुष्यभर विठ्ठलासाठी मेला आणि आयुष्यभर त्याला हाका मारत राहिला. आज आता त्याची नामोनिशाणी राहिली नाही. कशी राहणार? नामोनिशाणीही राखावी लागते. कोण राखणार?

परतताना नावेत आणखी दोघे जण होते. त्यांना म्हणालो, असं असं तर हे असं कसं? तर म्हणाले, ‘‘अहो हे आसंच आस्तंय. भायेरचे लोकं येऊन इथं कब्जा करत्यात आन आपून आंड चोळीत बस्तोय. आता ह्यो आपला यावढा मोठा संत व्हता, त्याची समदी जागा ह्या लोकांनी दडापली तरी आपल्याला त्याचं हाये का काही? काय म्हनले, नाव काय त्या संतांचं?’’

दुपारी मंगळवेढ्यात उतरलो. बसस्टँडवर उसाचा रस पिता पिता विचारलं तर म्हणाले, ‘‘आहे ना! चोखोबारायाचं मंदिर आहे. असं सरळ पुढं जा. चौकात आहे पुढं. पंधरा एक मिनिटांचा रस्ता आहे’’.

मनात बिलकूल खूष झालो. चला, म्हटलं पंढरपुरात नाही तरी निदान ज्या मंगळवेढ्यात चोखोबा भिंतीखाली चिणला गेला, त्या गावात तरी त्याच्या नावाचं मंदिर आहे. या गावानं त्याची आठवण जपलीय.

सकाळपासून मी चोखोबाशी फारसा बोललो नव्हतो. तो बोलत नव्हता हे विशेष नव्हतं. तो आल्यापासूनच बोलत नव्हता. मनाला धक्के बसून आणखी गप्प झाला असेल. पण मीही बोलत नव्हतो.

रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा |
पावे जिवलगा जय जय हो जय ॥

वल्लभाचार्याच्या संस्थानिक सेवकानं दिलेल्या धक्क्यातून अजूनही मी सावरलेलो नव्हतो. पण आता ही मंदिराची बातमी ऐकली आणि मनाला उल्हास वाटला. म्हटलं, ‘‘चोखाबाराय! फारच ताप झाला रे तुला. माझ्यापाठी फरफटत हिंडायला लागतंय. पण आता अगदी थोडं राहिलंय. हे एवढं तुझं देऊळ पाहिलं की झालं आपलं काम. आपण परत जायला मोकळे’’.
‘‘पांडुरंगाला भेटायचं ना!’’ तो म्हणाला.

‘‘म्हणजे ते आहेच का अजून? हे बघ, काल पळालास. आज पुहा मला गाजर दाखवू नकोस. पांडुरंगाला भेटण्याइतकं माझं काहीही अडलेलं नाही. त्याला भेटलो नाही तर माझं काहीही बिघडणार नाही. भेटीलागी जीवा लागलिसे आस वगैरे माझं अजिबातही नाही. ते न होताही माझा जीव निवांत राहू शकेल. तुलाही त्याला भेटायची खास ओढ नाहीय हे तू दाखवून दिलं आहेस. त्यामुळे माझ्यावर उपकार म्हणून ते करायची गरज नाही. अर्थात तुला जायचं असेल तर तू अवश्य जा. तुमची भेट पाहण्यात मला स्वारस्य नाही. तुझं ठीक आहे. तू साडेसहाशे वर्ष खोळंबलेला आहेस. तुझं ते देवानं तुला आत नेणं वगैरे जुन्या गोष्टी मला खोट्या वाटतात. पण असू देत. श्रद्धेचा तुझा उजेड तुझ्याजवळ. मला त्याचं काहीही घेणं नाही. इकडं येताना मी तुला म्हणालो होतो, पण तेही मी आता मागे घेतो’’.

‘‘चुकी झाली देवा. पुन्यांदा आसं करनार नायी जी’’. तो म्हणाला.
त्याचे डोळे इतके विलक्षण द्रवलेले होते की मनातल्या मनात दुथडी भरुन आलो. रस्त्यातच त्याला मिठी मारून, त्याला असं बोलायला लावण्याचा अपराध धुऊन टाकावा असं वाटलं. तरीही प्रत्यक्ष मी दगडासारखा टणकच राहिलो. बाहेरचं कवच घट्ट राहिलं.

‘‘असं बोलू नकोस. आपण हे काहीच बोलायचं नाही. मीच चुकलो,’’ मी जरा वेळाने म्हणालो.
रस्त्यात डावीकडं एक पाटी दिसली. श्रीसंत दामाशेट मंदिर. भलं थोरलं आवार. प्रवेशद्वार. झाडं. कळस. स्वच्छता. पताका. दामाशेटीचं इतकं छान आहे म्हणजे चोखोबाचंही असणारच. मी खूष झालो. दामाशेटीचं प्रवेशद्वार पार करून आत जायचं मनात आलं. पण ते मी दाबलं. येताना जाऊ, म्हटलं. आधी देऊळ चोखोबाचं मग दामाशेटीचं. मी स्वतःशी हसलो. समोरुन एक जण येत होता. त्याला वाटलं, त्याच्याशी हसलो. तर म्हणाला, ‘‘रामराम. का वो?’’ म्हटलं, ‘‘चोखोबारायाचं देऊळ?’’ त्यानं मागं म्हणजे माझ्यापुढं हात केला. मग पुढं. रस्ते अरुंद होते. ब-यापैकी गर्दी. गाव संपन्न वाटत होतं. भेळीची, सोड्याची दुकानं. संतांच्या नावाच्या पाट्या. सुरू असलेली बांधकामं. काळे बुटके तगडे पुरुष आणि मराठमोळ्या विकच्छ पद्धतीची नऊवारी लुगडी नेसणार्यात स्त्रिया. पुढच्या चौकात विचारलं, ‘‘चोखोबारायाचं देऊळ?’’ म्हणाले, ‘‘ते काय.’’

म्हटलं, ‘‘कुठंय? इथं देऊळ कुठंय?’’

म्हणाले, ‘‘कमाल झाली. इतकं समोर चौकात ढळढळीत दिसतंय, तरी विचारताय! ती काय ती छत्री. तिथं खाली लिवलेलं हाये समदं.’’
खरोखरीच छत्री होती. किंवा पॅगोडा होता. शहरांमध्ये चौकात ट्रॅफिक पोलीस उभा असतो, त्याला उभं राहण्यासाठी उंचवटा असावा आणि सावलीसाठी वरून पॅगोडाटाईप छत असावं आणि वाहनं चालवणार्यांॅना तो, त्याचे हातवारे ठळक दिसावेत म्हणून ते सगळीकडून मोकळं असावं किंवा असतं, तसं हे देऊळ! हवेला खुलं. सारीकडून मुक्त. मूर्ती होती. कोणाची ते ओळखायला अचडण नको म्हणून नावही लिहिलेलं होतं.

॥ श्री संत चोखामेळा महाराज ॥
या ठिकाणी वैशाख वद्य ५ शके १२६०
या दिवशी गावकूस अंगावर पडून
श्री पांडुरंगचरणी विलीन झाले.
समाधी जिर्णोद्धार
शके १८८२ इ. स. १९६०

प्रश्नजच नाही! चोखोबारायाचं मंदिर! वा वा. फोटो घेतला पाहिजे. इतकं छान मंदिर बांधलंत तुम्ही चोखोबारायाचं आठवणीसाठी आणि त्याला निष्कारण भिंतीत कोंडून नाही ठेवलंत! खुलं ठेवलंत त्याला. चौकात उभा करून कायमचा निरीक्षणासाठी उघडा ठेवलात. त्याच्यावर आभाळ कोसळू नये म्हणून छत्री दिलीत. तो भिंतीखाली एकदाच चिणला. तुम्ही त्याला आख्ख्या आभाळाखाली कायम चिणत ठेवलंत. वा वा ! छान छान. या भक्तीला तोड नाही. चोखोबा! तू धन्य आहेस, चोखोबा! तुला त्यांनी चौकात जागा दिली. तू मेलास तिथं त्यांनी चौक निर्माण केला. तुझी अस्पृश्यता घालवून टाकली त्यांनी. आता आपल्याला तक्रारीला जागाच नाही. रहदारीचं नियंत्रण करणार्याा पोलिसाला असावा तितका निवारा तुलाही आहेच ना! आणि अधिकार केवढा! भर चौकात इथं कायमचा बसला आहेस! वा वा! फोटो काढलेच पाहिजेत. या खुल्या अंतराळात तुला खुला श्वा!स घेता यावा म्हणून ही केवढी कल्पकता!

भराभर फोटो हाणले आणि म्हटलं, चल चोखोबाराय. तुझ्या देशात आलो आणि भरून पावलो. आता हृदय इतकं भरून गेलंय की फुगून फुटून ते कधीही अंतराळासारखं निराकार व्हायचं. त्याच्या आत सटकलं पाहिजे इथून. तुझं ठीक आहे बाबा. साडेसहाशे वर्षांआधीच तू निराकार झालास आणि तसंही नाही. बिंदू झालास तू बिंदू. म्हणजे अंतराळ असतंच. ते विराट असतं. आदि अंत नाही त्याला. ते असतं. आपण असतो. पण फक्त बिंदू. वेग असतो ना! त्या वेगात फक्त बिंदू. विराट वस्तुमान आणि असणं बिंदुवत्. काळ थांबलेला. काळ तुझा वेगळा आमचा वेगळा. माझ्या साडेसहाशे वर्षांत तुझे पळ आणि विपळ. तुझा काळ तुझ्या गतीनं वाहतो. मला माझी गती नाही. तुला आहे. कारण तू बिंदू. पण विराट अस्तित्वाचा सदस्य. आपलं म्हणून काहीच उरत नाही किंवा सगळंच आपलं असतं तिथं. खेरीज पारदर्शकही होता येतं तुला. किंवा आमच्या नजरेत तू होतोस. बिंदू कशालाच अडवत नाही. खच्चून भरलेलं वस्तुमान तरीही अवकाश मोकळा. आम्ही सदा अपारदर्शक. माझ्यासाठी आणि माझ्यापुरता काही काळ तू पारदर्शक झालास हेच पुष्कळ. साडेसहाशे वर्षं ओलांडून आलास. माझ्यातलाच दुसरा झालास आणि माझ्यासाठी आलास. तुझं असणं भ्रमाचं आहे, तेही पुष्कळ. तू आहेस हे कळणं, तेही पुष्कळ. बस्स. काहीच नाही. माझं काहीच म्हणणं नाही. तू, तुझी बायको, मुलगा, बहीण, मेव्हणा कोणाचंच मला काहीही विचारायचं नाही. तुझा विठोबाही तुला लखलाभ. मला त्याची ओढ नाही. माझ्यातल्या मला खेचून, त्याला स्वतःचं रूप देऊन वर आणखी मलाच भ्रमात पाडलंस, काय साधलंस? कशासाठी?…
पंढरपुराला परत येईस्तोवर मी सारखा बडबडत होतो. चोखोबा काही बोलत होता, माहीत नव्हतं. मी काय म्हणतोय, ते ऐकत होता, माहीत नव्हतं. मी काय बोलत होतो, माहीत नव्हतं. पंढरपूल आलं, ते कळलं. परत निघायचं, ते जाणवलं. मठात बोचकं टाकलेलं होतं. ते उचलायचं आणि निघायचं. आलो, कार्यभाग साधला; निघायचं.

सरळ पुढे जायचं. डावीकडं वळून दहा पावलं चाललं की रस्ता ओलांडायचा. हे गाडगेबाबांच्या धर्मशाळेचं दार.
‘‘पांडुरंगाचं दर्शन घेऊ ना!’’ चोखोबा म्हणाला.
‘‘तू जा यार. मी खूप थकलोय. कंटाळा आलाय’’.
‘‘इतक्या लांब आलो आणि…’’

‘‘माझं काहीच बिघडत नाही. खरं तर तुझंही काही बिघडत नाही. पण तुला ते कळत नाही’’. मी तिथं दारात उभा राहूनच त्याला फैलावर घेतलं; ‘‘काय बिघडणार आहे तुझं? काय मिळणार आहे तुला? काय राहिलंय इथं तुझं? काहीही राहिलेलं नाहीय. तुझ्या समाधीचा दगड काळा, तेलकट होऊन गेलाय आणि त्याच्यावर पत्र्याचं छत आहे इतकंच. पण त्याच्याकडं कोणीच बघत नाही. तू चंद्रभागेपल्याड राहात होतास; त्या झोपडीची जागा नाही. तुझी दीपमाळ त्यांनी नांगरुन टाकलीय. तुझ्या आस्थेचे सारे दगड हवेत विरून गेलेत. मंगळवेढ्याला चौकातल्या पोलिसाची अवकळा आणलीय त्यांनी तुला. काय राहिलंय तुझं? आणि कोणीच राहिलं नाही तुझं. बाकीच्यांना निदान त्यांच्या जाती आहेत. तुझं काय आहे? काय राहिलंय? या विठोबांनी काय दिलंय तुला?’’
माझ्या या भडिमारात नेहमीसारखा चोखोबा गप्पच होता. तो नेहमीसारखाच काही बोलणार नाही याची खात्री होती मला आणि आत कुठंतरी हेही जाणवत होतं की, तरीही तो मला त्याच्या म्हणण्याप्रमाणं वागायला लावणार. तो मला देवापुढं नेणार. त्याच्याजवळ अफलातून टेक्निक होतं. प्रत्येक वेळी अनपेक्षित नवी खेळी. शब्दांचा मितव्यय. मुद्रेच्या आविष्काराचा सहज वापर.

असंच झालं. पण जरा वेगळं झालं. पुन्हा एक अफलातून टेक्निक. चोखोबा गप्प राहिला. पण फार वेळ नाही. तो बोलला. पहिल्यांदाच वेगळं आणि सकारात्मक.

‘‘तुम्ही कष्टी नका होऊ देवा,’’ तो मऊपणे म्हणाला, “चुकीच्या गोष्टीसाठी मनाला दुखवायचं कशाला? माझं कशाला काय राहायला पाहिजे? कोणाचंच कशाला काय राहायला पाहिजे? आणि काय नाहीये वो माझं? वाळवंट आहे, चंद्रभागा आहे, विठोबा आहे. आणखी काय पाहिजे? आणि हेही माझं एकट्याचं नाही. कोणाचंय एकट्याचं नाही. ते सगळ्यांचं आहे, म्हणून ते माझं आहे. बाकी असतं, नसतं, भरतं, उरतं ते चालतंच. तरीही राहातंय. राहायचं ते राहातंय. जायचं ते जातंय.”

‘‘काय राहातंय?’’ मी विचारलं.
तो इतका बोलल्यामुळे मी आधीच गोंधळलो होतो. त्यात तो मला आणखी गुरफटत चालला होता. मीच गुरफटत चाललो होतो.
‘‘राहातंय. अक्षर राहातंय.’’ तो म्हणाला.

आँऽऽ! अक्षर राहातंय? म्हणजे काय? अभंग? लिहिलेलं अक्षर? इतकंच? छे छे! इतकं सोपं नाही. इतकं मर्यादित नाही. अक्षर राहातंय. ज्याला क्षर नाही ते राहातंय. अविनाशी ते राहातंय. ज्याला मरण नाही ते उरतं. अक्षर काय आहे? तुम्हा लोकांनी लिहिलेले अभंग? तुम्ही घालून दिलेली वहिवाट? विठोबा? पंढरपूर? चंद्रभागा? अक्षर आहे ते राहाणारच. त्यात नवीन ते काय? जे राहणार आहे ते राहातंच. संपायचं ते संपतं. आसक्ती कशासाठी? जीव अडकवायचा नाही. कष्टी व्हायचं नाही. अक्षर काय आहे? अक्षर कोण आहे? श्रद्धा? कुठून कशी पेरली लेको! दोन शब्दांत सांगता आणि आमच्यासाठी घोळाचे पामीर उभे करता! अक्षर राहातंच. सगळ्यांना माहीत असतं. पण तु्म्ही सांगितलंत की ते अधिकृत होतं. त्याला वजन येतं. कुठून येतं? ही कसली भक्ती पेरून ठेवलीत?

‘‘चलायचं ना?’’ त्यानं विचारलं.
‘‘म्हणजे आता पुन्हा चंद्रभागेत स्नान. पुंडलिकाची भेट आणि नंतरच विठोबा – रखुमाय.’’
‘‘हो.’’
‘‘नको. तू ये जाऊन.’’ मी म्हणलो.

पण हे म्हणतानाच माझ्या नकळत मी त्याच्या पाठी निघालो होतो. सातशे वर्षांतला माझ्या मागच्या इतक्या पिढ्या त्यांनी त्या रस्त्याला नेऊन ठेवलेल्या होत्या. तिथं मी थोडाच सुटू शकणार होतो? इथं तर सगळ्यांचा वड होता. सातशे वर्षांआधी त्यांनी रोपटं लावलेलं होतं. आता त्याच्या पारंब्या सार्याआ मुलखात पसरलेल्या. त्यांना लटकण्याखेरीज वेगळी कोणती गती कोणाला उपलब्ध होती? थोडा नाठाळपणा थोडा वेळ चालू शकतो. पण विठोबाचा रस्ता तुम्हाला टाळता येत नाही. तुम्ही तो टाळू शकत नाही आणि नजरानजर झाल्यावर हा काळा विठोबा तुम्हाला पागल केल्याखेरीज सोडत नाही. चेटूक हमखास करतोच. इतक्या वर्षांच्या अनुभवांचं संचित धमन्यांतून वाहात असताना, कळून – सवरुन चोख्यासाठी मी उगीच का चाललो होतो? इथवर चोखोबा माझ्या पाठी आला होता. आता मी त्याच्या पाठी चाललो होतो.

0 Shares
नाटक, सिनेमा, चोखोबा चोखोबांच्या संदर्भखुणा