साक्षात्कार

श्रीरंग गायकवाड

संतांच्या समाज घडवण्याचा विचारांकडे दुर्लक्ष करून त्यांना टाळकुटे म्हणणारे विद्वानही आपल्याकडे होऊन गेले. पण संतांचे विचार प्रत्यक्षात उतरवले तर लोककल्याणाचं किती व्यापक कार्य उभ करता येतं, याचं उदाहरण म्हणजे, विठ्ठल सखाराम उर्फ वि. स. पागे आणि त्यांनी सुरू केलेली रोजगार हमी योजना. आज राज्यातच नव्हे तर देशपातळीवर आणि जगभरात ही योजना पोचून गोरगरीब कष्टकर्यां च्या हाताला काम आणि पोटाला अन्न मिळालं आहे. राज्यकर्त्यांपुढे आदर्श घालून देणार्या या लोकनेत्याचे विचार आणि कार्याचा हा आढावा...

पूज्य सानेगुरुजी यांनी हरिजनांना मंदिरात प्रवेश मिळावा या हेतूनं पंढरपूर क्षेत्री उपोषण आरंभलं होतं आणि त्यावेळी मी सानेगुरुजींना पाठिंबा मिळावा म्हणून तेथे रोज प्रचार, भाषणं, गाठी-भेटी अशा तर्हेवचे उपक्रम करीत होतो. सुदैवाने त्यावेळी संत फुटाणे (कराड येथील ह. भ. प. बळवंत कृष्ण फुटाणे उर्फ संत) पंढरपुरात होते. या प्रचारासाठी मी ‘संत चोखोबाचा मंदिर प्रवेश’ नावाचं एक छोटं पुस्तक लिहिलं होतं आणि ते मी लोकांना वाटत असे. या पुस्तकात संत चोखोबा आपल्या आयुष्याच्या अखेरीस श्री पांडुरंगाच्या दर्शनाला मंदिरात जात होते, असा उल्लेख आहे. या लहानशा लेखात ती सर्व कथा मी उधृत करीत नाही, परंतु श्री चोखोबांना बडव्यांनी बहिष्कृत केलं आणि चोखोबा चंद्रभागेच्यापलिकडे झोपडी बांधून राहू लागले. त्यांनी तेथे एक दीपमाळ बांधली आणि तेथे असलेल्या एका लिंबाच्या झाडाखाली आपला भजनाचा कार्यक्रम चालू ठेवला. त्या दीपमाळेत एक छोटासा कोनाडा असून, त्यामध्ये श्री पांडुरंगाची मूर्ती आहे. एकदा समस्त बडवे मंडळींनी या चोखोबाच्या झोपडीस भेट दिली. चोखोबा तेव्हा जेवावयास बसले होते. ते आपल्या पत्नीस दही वाढत असताना म्हणाले, ‘बेतानं दही वाढ, नाही तर ते पांडुरंगाच्या पितांबरावर पडेल’. बडव्यांना पांडुरंग दिसला नाही. त्यांनी चोखोबांचे हे उद्गार ढोंगीपणाचे आहेत, असं म्हटलं आणि चोखोबास चोप दिला. दुसर्याा दिवशी बडवे देवळात गेल्यावर त्यांना असं दिसलं की, देवळातील देवाच्या अंगावर वळ उठलेले आहेत. त्यावेळी बडव्यांना पश्चायताप झाला आणि त्यांनी तो प्रकटही केला. “तै पासूनी चोखा मेळा| सदा राऊळी जावो लागला॥” अशी ही कथा आहे.

तिकडे पूज्य सानेगुरुजींचा उपवास चालू होता. आमची बडव्यांशी बोलणी चालू होती. अशा वेळी दुपारी चार-पाच वाजण्याच्या सुमारास नामदेव मंदिराजवळ घाटावर मी आणि संत फुटाणे असे दोघेजण बसलो होते. मी एका पायरीवर बसून ‘संत चोखोबांचा मंदिर प्रवेश’ हे पुस्तक संत फुटाणे यांना वाचून दाखवित होतो. ते खालच्याच पायरीवर बसले होते. त्याच पायरीवर अकस्मात एक ३५ ते ४० वर्षांचा इसम एकदम येऊन बसला. तो तेथे केव्हा आला, कसा आला, आम्हाला कळले नाही. वर्णानं तांबूस गव्हाळी असा तो होता. तोही मी वाचीत असलेलं पुस्तक ऐकू लागला. जेव्हा दीपमाळेचा उल्लेख आला तेव्हा संत मला म्हणाले, ‘‘काहो, खरोखरच अशी दीपमाळ अस्तित्वात आहे काय?’’ त्यावेळी मी म्हणालो, ‘‘मला नक्की माहीत नाही.’’ तेव्हा तो जवळ बसलेला इसम म्हणाला, ‘‘हो, हो आहे ना’’ मी म्हणालो, ‘‘तर मग आम्हाला ती दाखव’’ मग त्यानं आम्हाला दोघांना घाटाच्या बाजूस नेऊन तिराच्या पलिकडील दीपमाळ दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्या बोटानं दाखवून तो ‘‘ती पाहा’’ असं म्हणत होता. पण मधे ज्वारीचं पीक उभं होतं आणि त्यामुळं आम्हाला दीपमाळ दिसत नव्हती. आम्ही ‘‘आम्हाला दिसत नाही’’, असं म्हणताच त्यानं आम्हाला पलिकडे चलण्यास सांगितलं. पुढं पाण्याचा प्रवाह होता. तेव्हा आम्ही एक नाव केली. आणि आम्ही पलिकडे गेलो. नाववाला प्रत्येकी ४, ६ आणे मागू लागला. आम्हाला वाटले की तो जास्त पैसे मागत आहे. तेव्हा आमच्या त्या वाटाड्यानं ‘‘ देऊन टाका ना’’, असं सांगताच आम्ही ते पैसे देऊन टाकले.

आम्ही पलिकडे गेलो. वल्लभ स्वामींची गादी या नावाची मोठी इमारत तेथे आहे. तिच्या बाजूने नदीकाठ चढून आम्ही पुढे गलो तो तेथे एक दीपमाळ दिसली आणि श्री पांडुरंगाचं दर्शन झालं. आम्ही देवाला नमस्कार केला. पुढे मी त्या आम्हाला दीपमाळ दाखवणार्याळ तरुणाला त्याचं नाव विचारलं. त्यानं आपलं नाव चोख्या असं सांगितलं. मग बोलत चालत आम्ही परत आलो. घाट चढून आम्ही जेव्हा रस्त्यावर उभे राहिलो तेव्हा आम्ही वेगळ्या दिशेनं जाणार होतो. आम्ही नमस्कार केला त्यावेळी त्या इसमानं म्हणजे त्याच्या भाषेत चोख्यानं नमस्कार करून आमचा निरोप घेतला. त्यानं माझ्या हातातील पुस्तक मागून घेतलं आणि अकस्मात चमत्कार घडून आला. तो चोख्या पुस्तक हातात पडल्याबरोबर बघता बघता गुप्त झाला. माझ्या आणि संतांच्या डोक्यावरून एकदम कोणीतरी पडदा काढून घेतला आणि आम्हाला स्पष्ट दिसू लागले की, झाला हा प्रकार काही साधासुधा नव्हता. हे चोखोबा पायरीवर प्रथम येऊन बसले तेव्हापासून ते गुप्त होईपर्यंत सतत पाच पाच मिनिटांनी हात जोडीत असत आणि आनंदानं त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असत. असं सतत चालू होतं. हा संतांना झालेला साक्षात्कार मला पहावयास मिळाला आणि त्यात माझी भागीदारी तयार झाली.

हा काही कोणा साध्या, भोळ्याभाबड्या व्यक्तीचा अनुभव नाही. तर ज्यांनी सुमारे १८ वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेचं अध्यक्षपद भूषवलं, ज्यांनी प्रसिद्ध रोजगार हमी योजना सुरू केली त्या वि. स. पागे यांचा हा अनुभव आहे.

विशेष म्हणजे संत फुटाणे यांच्या कराडमधील अमृत महोत्सवी कार्यक्रमात वि. स. पागे यांनी ही आठवण जाहीररित्या सांगितली, त्यावेळी खासदार यशवंतराव चव्हाणही उपस्थित होते. याबाबत ते म्हणाले, ‘‘कोठलाही बुद्धीवादी ही गोष्ट ऐकून स्तिमित झाल्याशिवाय राहणार नाही. दुसर कोणी असं म्हटलं असतं तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. पण पागे यांना मी चांगला ओळखतो. ते जसे अध्यात्मवादी आहेत, तसेच बुद्धीवादी आणि विज्ञाननिष्ठ आहेत. बुद्धीवाद्यांना हे आव्हान आहे. मी एवढंच म्हणेन, मंदिरप्रवेशाच्या वेळी हे घडलं. ज्ञानेश्व र, चोखोबा हे सर्व संत या नव्या सुधारणेच्या मागे आहेत, याची मला त्यामुळे खात्री पटलेली आहे.’’

यानंतर पागे म्हणाले, ‘‘ज्या पांडुरंगाची आम्ही आजन्म भक्ती केली, त्याच्या साक्षीनं आम्ही खोटं बोलत असू तर नरकात जाऊ. दुसर्याा कोणाला काही मांडायचं असेल तर आम्ही वादविवादास तयार आहोत. त्यामुळं समाजाच्या विचारास चालना तरी मिळेल.’’ या अमृत महोत्सव कार्यक्रमाचं हे वृत्त दि. ३० नोव्हेंबर १९८३च्या ‘सकाळ’ वृत्तपत्रात छापून आलं. त्यानंतर पत्रकार प्रभाकर पाध्ये यांनी यावर खूप टीका केली. तर ‘सकाळ’मध्येही त्यावर अग्रलेख लिहिले गेले.

(संबंधीत मजकूर ‘किंबहुना श्रीनारायणें विश्वे कोंदले’, वै. वि. स. पागे यांच्या अध्यात्मिक, धार्मिक, तात्त्विक विचारांचा संग्रह, या वै. वि. स. पागे वाड्मय प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या पान क्रमांक ७८ व ८१वर छापला आहे.)

यातून चोखोबा आणि इतर संत यांच्या विचारांनी पागेंसारखी राजकारणात असलेली व्यक्ती किती भारावलेली होती हे लक्षात येतं.

तब्बल १८ वर्ष महाराष्ट्र विधानपरिषदेचं सभापतीपद भूषवणार्या पागेंच्या कारकीर्दीत १९७२मध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला. विसापूर (ता. तासगाव) इथं ‘आमच्या हाताला काम द्या, पोटाला अन्न द्या’, अशी मागणी लोकांनी पागेसाहेबांकडे केली. पागे तेव्हा तुकोबांचा अभ्यास करीत होते. त्यांना तुकोबांवर नाटक लिहायचं होतं. तुकोबांनी त्यांच्या काळातील दुष्काळाच्या वेळी शेतकर्यांकची गहाणखतं इंद्रायणीत सोडून दिली, दुकानातील धान्य भुकेल्या लोकांना वाटून टाकलं होतं. दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना शोधणार्याल पागेसाहेबांना तुकाराममहाराजांच्या याच कृतीतून प्रेरणा मिळाली. त्यातून संपूर्ण देशातील श्रमिकांना वरदान ठरलेली रोजगार हमी योजना जन्माला आली. सुरुवातीला ११ गावांमध्ये ही योजना सुरू झाली. अकुशल ग्रामीण बेरोजगारांना स्वत:च्या परिसरामध्ये रोजगार प्राप्त करून देणारी ही योजना कोट्यवधी बेरोजगारांना अक्षरश: वरदानच ठरली. या योजनेमुळं शहरांकडे जाणार्यार लोंढ्यांच्या स्थलांतराचं प्रमाण कमी झालं. दारिद्य्रनिर्मूलन आणि ग्रामीण विकासाचं प्रभावी साधन म्हणून या योजनेनं ऐतिहासिक कामगिरी बजावली. नोबेल पारितोषिक विजेते डॉ. अमर्त्य सेन यांनीही या योजनेचं कौतुक केलं. महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांची कामं या योजनेतून झाली. विहिरी, शेततळी, जलसंधारणाची कामं या योजनेतून झाल्यामुळं पाणीप्रश्न सोडवण्यात काही प्रमाणात यश आलं. अलिकडं यात फलोत्पादनाचाही समावेश झाला आहे.

या योजनेचा गौरव संयुक्त राष्ट्रसंघातही करण्यात आला. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे काही मागास आफ्रिकन देशांमध्ये ही योजना सध्या राबविण्यात येत आहे. काँग्रेसच्या मनमोहन सिंग सरकारनं या योजनेबाबतचा कायदा संसदेमध्ये संमत करून त्याची देशभर तातडीनं अंमलबजावणी सुरू केली.

वकील, समाजसेवक, राजकारणी, लोकप्रतिनिधी, चिंतक, अर्थव्यवस्थेचे अभ्यासक आणि विश्लेषण करून उपाय सुचविणारे प्रशासक अशी त्यांची अनेक रूपे होती. त्याशिवाय संत वाङ्मयाचा आणि संस्कृताचा गाढा अभ्यास हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वेगळंच वैशिष्ट्य होतं.

ते उत्तम दर्जाचे कवी, नाटककार होते. १९३२-३३ च्या सुमारास त्यांनी ‘वीर मोहन’ नावाचं नाटक लिहिलं. ‘निवडणुकीचा नारळ’ नावाची नाटिका लिहिली. त्याचप्रमाणं ‘पहाटेची नौबत’ आणि ‘अमरपक्षी’ या नावाचे त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले.

‘तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत’ हे त्यांनी लिहिलेलं सुंदर संगीत नाटक. ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक दाजी भाटवडेकर हे या नाटकाचे दिग्दर्शक होते. तसेच संत तुकारामांची प्रमुख भूमिकाही त्यांनीच साकारली होती. सामान्यातून साधुत्वापर्यंतचा संत तुकारामांचा प्रवास या नाटकामध्ये सादर केला आहे.

लोकांच्या मनाचा ठाव घेणारी त्यांची वक्तृत्वशैली, ज्ञानेश्वर-तुकारामांचं प्रचंड वाचन, सुंदर-ओघवती भाषाशैली यामुळे सहकारासारखा रुक्ष विषयसुद्धा लोकांच्या मनावर ते बिंबवत असत.

दलित मंदिर प्रवेशासाठी सानेगुरुजींनी जेव्हा पंढरपुरात उपोषण सुरू केलं तेव्हा त्यांना पाठिंबा देण्यासाठी वि. स. पागे आघाडीवर होते. अनेक काँग्रसनेते या उपोषणापासून त्यावेळी दूर होते. पण पागे त्यात सक्रीय सहभागी झाले. त्यांनी बडव्यांची समजूत काढली. बडव्यांच्या समितीचं बहुमत सानेगुरुजींकडे वळवलं. त्याचवेळी त्यांनी संतवचनांचे दाखले देत मंदिरप्रवेशाला विरोध करणार्याय सनातन्यांचा जोरदार प्रतिवाद केला. त्यासाठी त्यांनी ‘चोखोबांचा मंदिर प्रवेश’ नावाची पुस्तिकाच छापून वाटली.

पुढं मागास, उपेक्षित समाजासाठी विशेष काम करणार्याि पागेंना महाराष्ट्र सरकारनं ‘दलित मित्र पुरस्कार’ देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. केंद्र सरकारनं त्यांच्यावर पोस्टाचं तिकीटही काढलं.

उदार, विरक्त आणि सेवाभावानं राजकारण करण्याचा, सत्ता राबवण्याचा आदर्श घालून देणारा हा लोकनेता १६ मार्च १९९० रोजी वैकुंठवासी झाला.

0 Shares
वरळीचा वारकरी खांद्यावर पताका समतेची