वरळीचा वारकरी

सचिन परब

स. भा. कदमांचं ‘श्रीसंत चोखामेळा महाराज यांचे चरित्र व अभंग गाथा‘ हे पुस्तक चोखोबांवरच्या अभ्यासात माईलस्टोन आहे. मुंबईच्या गिरणगावातल्या या सामान्य कारकुनानं हे मोठं काम करून ठेवलंय.

साईबाबा, स्वामी समर्थ, सिद्धिविनायक आणि लालबागचा राजा. हे सगळे मुंबईच्या गिरणगावात अनेक दशकं आहेत. पण, त्यांचा गाजावाजा झाला तो गिरण्या बंद झाल्यानंतरच्या हताश काळात. त्याआधी जमाना वेगळा होता. तेव्हा गिरण्यांच्या भोंग्यांबरोबरच गिरणगाव जागा व्हायचा तो हरिपाठाच्या आवाजानं. कष्टकर्यां्चं कर्तृत्व तेव्हा या कामगारवस्तीत बहरत होतं. हरिनाम सप्ताह, पारायणं, भजनं, प्रवचनं, पालखी यात गिरणगावातला घाटी आणि कोकणी कामगार खांद्याला खांदा लावून वर्षभर गुंतायचा. संतांच्या विचारांनी त्याच्यातली नेकी टिकवून ठेवली होती. त्याचा कणा ताठ ठेवला होता.
आजचं ‘हाय स्ट्रीट फिनिक्स’ आणि ‘आयटीसी ग्रँड’चं गिरणगाव बघणार्या‘ला हे खरं वाटणार नाही कदाचित. त्यासाठी ‘३५ ए, भिमडीवाला बिल्डिंग, वरळी नाका, मुंबई १८’ हा पत्ता शोधावा लागेल. वरळी नाक्यावरच नव्वद अंशांच्या गोल वळणात उभी असलेली ही बिल्डिंग. आता तिला भिमडीवाला बिल्डिंग नाही म्हणत कुणी. त्याचा भिवंडीवाला असा अपभ्रंश झालाय कधीचाच. काही वर्षांत तिथे टॉवर उभा राहील अशी चिन्हं आहेत. नाव बदलल्यानं इतिहासजमा झालेला हा पत्ता खरंच इतिहासजमा होईल. पण म्हणून या पत्त्याची इतिहासातली नोंद कुणाला पुसता येणार नाही.

या पत्त्यावर न. र. फाटक, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, वि. स. पागे, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, सोपानदेव चौधरी अशा अनेक मान्यवरांची पत्रं आली आहेत. हा पत्ता शोधत भालचंद्र नेमाडे, वि. स. पागे, एलिनॉर झेलियट, रंगनाथ पठारे यांच्यासारखी मोठमोठी माणसं पोहोचली आहेत. त्याचं कारण होतं त्या पत्त्यावर जन्मलेलं एक पुस्तक. दिवसभर कोर्टात कारकुनी करणारा एकजण रात्र झाली की स्वयंपाकघरात पुस्तकांचा पसारा घेऊन बसायचा. त्या एकशे ऐंशी – दोनशे फुटांच्या घरात दुसरी जागा आणि वेळही नव्हती. वर्षानुवर्षांच्या धडपडीतून हे पुस्तक तयार झालं. स. भा. कदम लिखित ‘श्रीसंत चोखामेळा महाराज यांचे चरित्र व अभंग गाथा’.

आता हे पुस्तक प्रकाशित झाल्याला बरोबर ४५ वर्षं झालीत, तरीही चोखोबांचा अभ्यास करणार्या कुणालाही या पुस्तकाला टाळून पुढे जाता येत नाही. चोखोबांचा असा एकही मान्यवर अभ्यासक नाही, ज्यानं या पुस्तकाचं कौतुक केलेलं नाही. त्यामुळेच चोखोबांचा अभ्यास करणार्यां नी या घराच्या वार्याभ केल्या आहेत.

शंभर घरांची ही चाळवजा इमारत १९३५ साली उभी राहिली. लालबागमधल्या ट्रामच्या आवाजाचा आईला त्रास म्हणून ऐन पंचविशीत कदम पुढच्याच वर्षी इथं राहायला आला. तेव्हापासून चारेक वर्षांआधीपर्यंत हे घर नांदतं होतं. तिसर्याा पिढीचा संसार थाटण्यासाठी हे घर रिकामं करावं लागलं. तोवर या पत्त्त्त्यावर कदमआजी भेटायच्या. वय नव्वदीचं. शरीर थकलं होतं. पण चेहर्या वर शेवटपर्यंत तेज होतं. आठवण तल्लख होती. वाणी साफ होती. स. भा. कदमांच्या आठवणी सांगताना त्यांचा चेहरा खुलायचा.

सखाराम भाऊराव कदम यांचा जन्म २७ सप्टेंबर १९१२, मालवणातल्या तेंडूर कट्टा या गावातला. आईचं नाव लक्ष्मी. तेव्हाचं तळकोकण गरिबीत खोल रुतलेलं. तेव्हा गरीब शेतकर्या च्या घरात शिक्षण असण्याची शक्यता नव्हती. त्यामुळं खेडेगावात कदमांनी घेतलेला शिक्षणाचा ध्यास आश्चर्यकारकच होता. सातवी म्हणजे तेव्हाचं वर्नाक्युलर फायनल होऊन पुढच्या शिक्षणासाठी ते मुंबईत आले. मॅट्रिक झाले. विल्सन कॉलेजात त्यांनी दोन वर्ष काढली. तेव्हा स्वातंत्र्यचळवळ जोरात होती. काँग्रेसच्या विद्यार्थी चळवळीतही त्यांनी भाग घेतला. घरी गरिबीही होती. ग्रॅज्युएशन पूर्ण न करताच शिक्षण सोडावं लागलं.
अत्यंत गरिबी आणि मुंबईतलं कॉलेजचं शिक्षण, या गोष्टी जुळून येणं कठीणच होतं. कदमांबद्दल बोलताना त्यांच्या कदमआजी आवर्जून एक घटना सांगायच्या, ‘मुंबईत राहायला जागा नव्हती. त्यामुळं ते कॉलेजच्या हॉस्टेलमधल्या एका मित्राच्या खोलीत लपून राहायचे. एकदा हॉस्टेलवर इन्स्पेक्शनसाठी धाड घालण्यात आली. पलंगाच्या खाली लपलेल्या कदमांना पकडलं. खूप अपमान करून त्यांना हाकलवण्यात आलं. तो दिवस होता दिवाळीच्या पहिल्या आंघोळीचा. तो प्रसंग ते कधीच विसरू शकले नाहीत. एरव्ही लवकर उठणारे दिवाळीच्या पहिल्या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहत आणि दिवाळी साजरी करत नसत.’ बहुदा त्या प्रसंगानंतर त्यांचं शिक्षण सुटलं असावं. ते १९३५ साली मुंबई हायकोर्टातल्या रजिस्टार ऑफिसात साधे कारकून म्हणून लागले. चारच वर्षांत त्यांचं लग्न झालं. मसुर्यााच्या बागव्यांच्या घरची विमल लग्नानंतर मंदाकिनी सखाराम कदम झाली. काटकसरीनं केलेला चार मुलांचा संसार, नेकीनं केलेली नोकरी, सामाजिक कामातला सहभाग आणि संतविचारांच्या अभ्यासाचा छंद, कदमांचं आयुष्य लग्नानंतर चहूबाजूंनी बहरून आलेलं होतं.

साधे कारकून नोकरीत चिकटलेले कदम सेशन्स कोर्टात असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून रिटायर्ड झाले. मोजूनमापून बढत्या मिळायच्या काळात त्यांचं हे नोकरीतलं यश चांगलंच म्हणायला हवं. त्यांच्या कामातला चोखपणा, कायद्याची माहिती, अंगभूत हुशारी, अत्यंत सचोटी यामुळे त्यांचं काम कायम नावाजलं गेलं. त्या काळात वकिली करणार्याो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशीही त्यांचा संबंध आला होता. काय कदम, कितीजणांना फाशी दिली तुम्ही, असं विचारून बाबासाहेब त्यांची नेहमी गंमत करत. आपलं ‘अनटचेबल्स’ हे पुस्तक चोखोबांना अर्पण करणार्यात आणि संतसाहित्याची उत्तम जाण असणार्यार बाबासाहेबांच्या कदमांशी चोखोबांविषयी चर्चा झाल्या असतील का? माहीत नाही.

कोर्टामुळेच कदमांचा बॅरिस्टर जिनांशीही संपर्क आला होता. ‘चोखोबाच्या पाठी’ या प्रसिद्ध कथेत रंगनाथ पठारे कदमांविषयी लिहितात, ‘बॅरिस्टर महमदअली जिना यांना यांचं इतकं अगत्य की पाकिस्तान झाल्यावर त्यांनी यांना तिकडं बोलावलं होतं. तसंच इथं आल्यावर निरोप पाठवून भेट घेतली होती. म्हणजे त्यांच्या उद्योगात ते किती माहीर असतील बघा.’ जिनांवर एक चाकूहल्ला झाला होता. त्याचा खटला मुंबई हायकोर्टात चालला होता. पुरावे म्हणून जिनांचे रक्तानं माखलेले कपडे कोर्टात जमा होते. हे पुरावे काही वर्षांनी नष्ट करण्यात येतात. पण कदमांनी ते सांगून खास जपून ठेवले होते. जिनांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आठवणी गोळा करण्यासाठी पाकिस्तानातून माणसं भारतात आली होती. कदमांनी त्यांना हे कपडे दिले. त्यांच्यासाठी तो मोठाच ठेवा होता. त्याबदल्यात हजाराच्या दहा नोटा कदमांना आनंदानं काढून देण्यात आल्या. पण त्या त्यांनी नाकारल्या. त्यांचं कायदेविषयक ज्ञान उत्तम होतं. त्यामुळे अनेकदा न्यायाधीशदेखील निकालपत्र त्यांना नजरेखालून घालण्यास सांगत. गुन्हेगाराविरुद्ध आरोप आणि कलमं निश्चित करण्यात त्यांचा हातखंडा होता. निवृत्त झाल्यानंतरही अनेकदा पोलिस यात त्यांची मदत घेत. त्यांनी ‘चार्ज फ्रेम’ केले की सुटका अशक्य असे. पुण्यातल्या प्रसिद्ध जोशी अभ्यंकर खून खटल्यातही त्यांची मदत घेण्यात आली होती.

कदमांच्या मित्रांनी त्यांचा साठीनिमित्त सत्कार केला होता. तेव्हा त्यांना दिलेलं मानपत्र उपलब्ध आहे. त्यातल्या नोंदीनुसार तरुणपणात ते सामाजिक कार्यात आघाडीवर होते असं दिसतं. ते माजगावच्या नाईट स्कूलमध्ये शिकवत. मोफत वाचनायल चालवत. वरळीच्या नागरिक संरक्षण सस्था, शिवजयंती उत्सव आणि संत सेवा मंडळ अशा संस्थांत ते काम करायचे. याच संत सेवा मंडळामुळे त्यांना संतविचारांचा नाद लागला असावा. तसा उल्लेख गाथेतल्या निवेदनात आहे. त्यानंतर फावल्या वेळात ते संत साहित्याचा अभ्यास करू लागले. अनेक वर्ष ते नित्यनेमाने दरवर्षी पंढरपूरला जात. मात्र सुटीमुळे त्यांची ही वारी आषाढी किंवा कार्तिकीला नसे, तर नाताळाच्या सुटीत होत असे. प्रसिद्ध प्रवचनकार सोनोपंत दांडेकर त्यांना गुरुस्थानी होते, असं गाथेतल्या संदर्भांवरून वाटतं. पण त्यांचा व्यासंग हाच त्यांचा गुरू होता.

त्यांच्या याच व्यासंगामुळे वारकरी संप्रदायात त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. आळंदीचे श्रावणबुवा कांबळे हे त्यापैकी एक. कदमआजींनी सांगितलं होतं तसं हे बोवा एकदम फाटके होते. चातुर्मासात ते गिरणगावातच राहत. कदमांकडे ते अनेकदा जेवायला असत. यांना आक्षेप नसतानाही ते एका पंगतीत जेवत नसत. कधीच खुर्चीवर बसत नसत, वगैरे. शिवाशिव पाळणारे हे दलित वारकरी तल्लख मात्र नक्कीच असावेत, नाही तर त्यांना चोखोबांची गाथा करण्याची कल्पना आली नसती. कदम श्रावणबुवांविषयी लिहितात, ‘श्रीसंत चोखामेळा महाराज यांच्या उपलब्ध असलेल्या समग्र अभंगांची स्वतंत्र गाथा छापून प्रसिद्ध व्हावी हे सुखस्वप्न आळंदीचे ह. भ. प. श्रावणबोवा गंगाधर कांबळे हे कित्येक दिवस आपल्या उराशी बाळगून होते. श्री. श्रावणबोवा हे महार समाजातील असून, ते आज कित्येक वर्ष वारकरी संप्रदायात एकनिष्ठेनं वावरत आहेत. ते माधुकरी मागून बहुतेक आळंदी येथेच असतात. बोवांचे स्वप्न साकार होणे म्हणजे फार कठीण काम होते. कारण चोखोबांचे उपलब्ध समग्र अभंग मिळवणं आणि त्यांच्या जीवनाची आता दुर्मीळ होत चाललेली माहिती गोळा करणं आणि सध्याच्या महागाईच्या दिवसांत छापणं या सार्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत… १९६६च्या ऑक्टोबर महिन्यात एके दिवशी श्री. श्रावणबोवा माझ्याकडे आले असताना त्यांनी ही गोष्ट माझ्याजवळ काढली.

बोवांजवळ ना पैसा ना संतवाङ्मय लेखनाचा व्यासंग, मग हे कार्य कसे तडीस जाणार? बोवांना मी सांगितलं, बुवा ही अवघड गोष्ट आपणास कशी शक्य होणार? बोवा नाराज झाले आणि म्हणाले, आमच्यासारख्या गरिबांचं कोणी ऐकूनसुद्धा घेत नाही. चोखोबांच्या कार्याकडे आमच्या वारकरी पंथातले लोकसुद्धा कोणी पाहत नाहीत. मी पुष्कळांना विचारून पाहिलं, पण कोणीच या गोष्टींत लक्ष घालीत नाहीत. बोवांचे हे खिन्न शब्द ऐकून मला जरा वाईटच वाटलं आणि त्यांना मी प्रयत्न करून पाहू म्हणून चटकन बोलून गेलो. त्यानंतर मला कोणाची कसलीच मदत न मिळाल्यामुळे एकट्याला जेवढे म्हणून शक्य होते ते सर्व प्रयत्न मी केले.’ श्रावणबोवांचं हे कठीण स्वप्न कदमांनी मोठ्या ताकदीनं सत्यात उतरवलेलं आहे. हे करताना श्रावणबोवांना या संकल्पनेचं श्रेय पूर्णपणे दिलेलं आहे.

ही गाथा म्हणजे एखाद्या सकलसंतगाथेतला चोखोबांचे अभंग वेगळे काढून छापण्याचा उपचार नाही. यात चोखोबांचे ३४९ अभंग आहेत. त्याचे विषयानुसार वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. अक्षरानुसार वेगळी यादी गाथेच्या शेवटी दिलेली आहे. शिवाय सोयराबाईंचे ६२, बंका महारांचे ३९, कर्ममेळ्यांचे २७ आणि निर्मळाबाईंचे २४ अभंग यात आहेत. संत नामदेवांनी लिहिलेले चोखोबांच्या समाधीचे अभंग, चोखोबांच्या चरित्रपर लिहिलेले अभंग यात आहेत. एकनाथ महाराजांनी चोखोबांचं थोडक्यात लिहिलेलं चोखोबांचं चरित्र यात आहे. पंढरपुरात समाधीसमोर म्हटली जाणारी बंकाकृत आरती त्यांनी पुजारी सीताराम सर्वगोड यांच्याकडून मिळवलेली आहे. चोखोबांवर विविध संतांनी लिहिलेले अभंग त्यांनी नोंदवून ठेवलेले आहेत. संतसंगतीचे फायदे वर्णन करणारी वचनंदेखील त्यांनी एकत्र केलेली आहेत.

चोखोबांचे अभंग पूर्वी सकलसंतगाथेत आलेले असल्यामुळे तसंच बाळकृष्ण पाठकांचं पंचरत्नी चोखामेळा अभंगगाथा हे छोटेखानी पुस्तक पूर्वी प्रकाशित झालेलं असल्यामुळे कदम स्वतःला संत चोखामेळा चरित्रकार असं अभिमानानं म्हणवून घेत. चोखोबांच्या चरित्राची सगळी साधनं एकत्र करण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत स्पष्टपणे दिसून येते. चोखोबांच्या चरित्राची अनेक साधनं त्यांनी एकत्र आणलेली आहेत. त्यात त्यांचा स्वतंत्र दृष्टिकोनदेखील वाचता येतो. सर्वांना समजेल अशी भाषाशैली हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यात चोखोबांविषयीच्या आख्यायिकांची, लोककाव्याचे संदर्भदेखील आहेत. परिशिष्टात चोखोबांचा समाधीकाळ, चोखोबांची पालखी, समकालीन संतांचे समाधीकाळ आहेत. शिवाय भा. पं. बहिरट आणि मंगळवेढ्यातील वकील रा. ग. करंदीकर यांचे चोखोबांवरचे चरित्रपर लेख यात आहेत. हे सगळं कमी होतं म्हणून की काय, चोखोबांच्या पंढरपूर तसंच मंगळवेढ्याची समाधी आणि चंद्रभागेपल्याडची दीपमाळ या खुणांचं त्यांनी फोटोरूपानं दस्तऐवजीकरण करून ठेवलेलं आहे.

कदमांच्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती छापून घेणार्या भालचंद्र नेमाडेंनी या संबंधात घेतलेली नोंद महत्त्वाची आहे, ‘या मूळ कोकणातल्या साध्याभोळ्या वारकर्या्ला चोखामेळा कुटुंबियांची स्वतंत्र गाथा सिद्ध करावी, अशी प्रेरणा आळंदीचे वारकरी श्रावणबुवा गंगाधर कांबळे यांच्याकडून मिळाली. त्याचप्रमाणे भिगवणचे सखाराम धोंडिबा शिंदे यांनी आपल्या कल्पनाचक्षूंनी चोखामेळा महाराजांचं रंगीत चित्र काढून या मूळ आवृत्तीला प्रासादिक रूप दिलं. शिवाय चोखोबांच्या पंढरपूर व मंगळवेढे येथील समाध्या, तसेच पंढरपूरची १९६९ सालापर्यंत उभी असलेली दीपमाळ अशी छायाचित्रे त्यांना बारामतीचे छायाचित्रकार तानाजी श्रीपतराव काळे यांनी पुरवली. या सर्व कानाकोपर्याेतील लोकांचे आपल्या वारकरी परंपरेवरचे प्रेम मुद्दाम लक्षात ठेवण्यासारखे आहे. असे पुस्तक छापणे हा एक वारसा जपण्याचा थोर प्रघात या सर्वांना वाटत होता.’ या थोर प्रघातासाठी कदमांना खूप सोसावे मात्र लागले.

मराठी साहित्याच्या या कथित सुवर्णकाळात मामासाहेब दांडेकरांची शिफारस असतानादेखील कुणा प्रकाशकाने कदमांना उभं केलं नाही. कुणी आश्वासनं देऊन झुलवत ठेवलं, कुणी दिलेले शब्द मोडले. तेव्हा कंटाळून त्यांनी हे पुस्तक स्वतःच छापायचं ठरवलं. कर्ज काढून, पत्नीचे दागिने मोडून त्यांनी हा ग्रंथराज दिमाखात प्रकाशित केला. त्यामुळे प्रकाशिका होण्याचं श्रेय त्यांनी पत्नीला दिलेलं आहे. या जवळपास अडीचशे पानांच्या हार्डबाऊंड पुस्तकाची किंमत अवघी सहा रुपये ठेवली होती. तरीही त्यांना आणि त्यांच्या मित्रांना पुस्तकं विकण्यासाठी दारोदार हिंडावं लागलं. त्याविषयी न. र. फाटकांनी आपल्या अभिप्रायात लिहिलंय, ‘या पुस्तकाचा लोकांत प्रसार व्हावा, यासाठी अनेक प्रकारे श्री. कदम झटत असूनही त्यांची विद्यापीठासारख्या संस्थांनी दाद घेऊ नये, ही शोचनीय लोकस्थिती मुद्दाम लक्षात ठेवण्यासारखी आहे. अलिकडच्या काळातील वारकर्यांठच्या महंतांपैकी एक वै. ह. भ. प. सोनुमामा दांडेकर यांची प्रस्तुत पुस्तकाला त्याची महती निदर्शनास आणणारी प्रस्तावना असूनही वारकरी संप्रदायातही या पुस्तकाची उपेक्षा दिसून येते हे या पुस्तकासंबंधीचे आणखी एक आश्चर्य आहे. सरकार विद्यापीठे व संप्रदाय यांना या पुस्तकाचे महत्त्व वाटत नसले तरी जो कोणी हे पुस्तक मर्मजिज्ञासेने नजरेखाली घालण्याची तसदी घेईल. त्यांना योगायोगाने श्री. कदम यांनी अंगावर घेतलेले काम किती आस्थेने व प्रयासाने पूर्ण केले याची साक्ष पटण्याला हरकत नाही.’

पुस्तकाचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे त्यातल्या विचारांचा बंडखोर पदर. ‘अस्पृश्य समाजाची केलेली अवहेलना, उपेक्षा व छळ यांतून एकच निष्कर्ष निघतो की एके काळी समृद्ध व सुखी असणारा आमचा देश आज मूठभर तांदूळ किंवा गहू यांना वंचित झाला असून, परकियांच्या उष्ट्यासाठी पाटी घेऊन टपून बसला आहे.’ प्रकाशिकेच्या मनोगतातल्या या वाक्यासारखी वाक्य यात अचानक चमकून जातात. एकीकडे सोनोपंत दांडेकर, धुंडामहाराज देगलूरकर यांच्यासारख्या विद्वानांच्या प्रस्थापित विचारांचा प्रभाव असतानाही कदमांमधली विनम्र बंडखोरी अधूनमधून दिसते. तरुणपणात भास्करराव जाधवांसारख्या ब्राह्मणेतर नेत्याच्या सहवासामुळे हे घडलं असावं. अन्य मान्यवर अभ्यासकांनी पुढे चोखोबांच्या गाथा संपादित केल्यात. त्यात याचा मागमूसही दिसत नाही. मुळात जातिभेदाच्या चक्राबाहेर शक्यतो न येणार्याू तळकोकणातल्या मराठ्यांपैकी एकाने चोखोबांवर पुस्तक छापणं हीच एक बंडखोरी होती. चोखोबांवर काम करणारे कदम दलितच असतील, असं अनेक परिचितांनादेखील वाटत असे. काहीजण तर त्यासाठी त्यांच्या घरातलं पाणीही घेत नसत. याचा राग येणं किंवा वाईट वाटण्यापेक्षा कदमांना त्याची गंमत वाटत असे.

पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर मान्यवर अभ्यासकांनी या पुस्तकाला दाद दिली असल्याचं दिसून येतं. ‘केसरी’नं त्यावर दोन अग्रलेख लिहिले, सकाळ, नवशक्ती, मराठा, नागपूर तरुण भारत, नवाकाळ, मार्मिक यांनी या पुस्तकाची उत्तम दखल घेतली. या पुस्तकानं त्यांना आर्थिक फटका बसला असावा, त्यामुळे ते पुन्हा कधीही मोठ्या पुस्तकाच्या वाटेला गेलेले दिसत नाहीत. त्यांनी संत कबिरांच्या दोह्यांचं मराठीत केलेलं गेय भाषांतर हेच त्यांचं गाथेशिवायचं बर्यांपैकी आकाराचं पुस्तक. त्यांनी लोकांकडून पैसे गोळा करून छोट्या पुस्तिका मात्र अनेक छापल्या. ‘श्री चोखामेळा आश्रम’ या नावानं छापलेल्या पुस्तिकांमध्ये गोरा कुंभार, जनाबाई, कान्होपात्रा, पुंडलीक, श्रीकृष्ण, सती सावित्री, राजा हरिश्चंद्र, नरसी मेहता, जयदेव, आंडाळ यांची चरित्र आहेत. शिवाय दोन पानांच्या पत्रकवजा धार्मिक पत्रिकाही ब-याच आहेत. विठ्ठलोपासना, ज्ञानेश्वरी पारायण विधी, सूर्यनमस्कार, ज्ञानेश्वरीच्या सावलीत, गीतेची तोंडओळख अशा नावांवरून त्यांचं स्वरूप लक्षात येऊ शकेल.

त्यांना या पुस्तकानं सन्मानदेखील मिळवून दिला. साठाव्या वर्षी सत्कार समिती स्थापून वि. स. पागेंच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. एक स्मरणिका काढण्यात आली. पुढेही चोखोबांचा अभ्यास करणार्याए प्रत्येकानं कदमांचा मोठ्या आदरानं उल्लेख केला आहे. नेमाडेंनी सांगितलंय तसं, या पुस्तकामुळे अनेक पी.एचडीचे प्रबंध सुरळीत पार पडले. त्यानंतर चोखोबांविषयी आलेल्या जवळपास प्रत्येक पुस्तकात कदमांचं नाव आहे. असं सगळं असलं तरी चोखोबा कुटुंबियांची एकही चिकित्सक गाथा अद्याप तयार झालेली नाही, हेदेखील तितकंच वास्तव आहे. कदमांनी पुस्तकात व्यक्त केलेल्या अपेक्षेनुसार वारकरी कीर्तन, प्रवचनकार या गाथेचा उपयोग करताना दिसत नाहीत.

निवृत्तीनंतरच्या काळात गिरणगावातल्या पिचलेल्या लोकांना मार्गदर्शन करत कदमांनी वार्धक्य सत्कार्यी लावलं. रात्री अपरात्रीही गरजू लोक त्यांच्याकडे येत. मग कधी कायदेविषयक तर कधी जगण्याचं मार्गदर्शन चाले. ते दर आठवड्याला घरातच प्रवचनं देत. त्याला चांगली गर्दी होत असे. त्यांनी अनेकांना तुळशीची माळ दिली. अनेकांना ज्ञानेश्वरी वाचायला शिकवली. त्यामुळे कितीतरी जण चांगल्या विचारांकडे वळले आणि कितीतरी जणांची व्यसनं सुटली. १६ सप्टेंबर १९९८ रोजी स. भा. कदमांचं निधन झालं. तर त्यांच्या पत्नी मंदाकिनी कदम यांचं निधन नुकतंच २१ ऑक्टोबर २०१३ रोजी झालं.

0 Shares
परिवर्तनाचा अग्रदूत साक्षात्कार