माऊलींच्या गावात काका

राहुल बोरसे

दूर तेरला राहणारे संत गोरा कुंभार आळंदीला आले होते का? सांगता येत नाही. पण माऊलींच्या आळंदीत काकांचं जुनं देऊळ आहे. या देवळामुळं गोरोबांचा ज्ञानदेवांशी असलेला ऋणानुबंध जपला गेलाय.

पान पराग गुटखावाल्या रसिकलाल धारीवालांनी चकाचक बांधून दिल्यानं आळंदीत फ्रूटवाला धर्मशाळा सगळ्यांना माहीत आहे. तिच्या अगदी समोर संत गोरा कुंभारांचं देऊळ आहे. प्रदक्षिणा मार्गाच्या रुंदीकरणात ते आक्रसलंय. अगदीच रस्त्यावर आलंय. बाहेरचा ओटा आणि त्यावरची महादेवाची पिंड, दगडी पादुका आता रस्त्यावरच्या वर्दळीला कंटाळून अंग चोरून बसल्यासारखे वाटतात.

देवळाच्या बाहेर पत्र्याची शेड आहे. त्यावरच ‘श्री गोरोबा काका मंदिर ट्रस्ट’ अशी पाटी लावलीय. बाहेरून पाहिल्यास देऊळ अगदी लहानसं वाटतं. आत शिरल्यावर मात्र मोठा सभामंडप दिसतो. त्यात गरुडाची मूर्ती लक्ष वेधून घेते. लाकडी खांबांना देवांचे आणि संतांचे जुने फोटो आहेत. छताला टांगलेल्या दिवे ठेवायच्या काचेच्या हंड्या आता प्रकाशाऐवजी फक्त शोभा देण्यासाठी उरल्यात. भिंतीला सगळीकडे अनेक खुंट्या दिसतात. माऊलींची पालखी निघण्याच्या वेळी अनेक वारकरी आळंदीत मुक्कामाला असतात. त्यांचं अस्तित्व या खुंट्यांशी जोडलेलं आहे.

सभामंडपातच पुढं संत गोरा कुंभारांचं छोटं समाधी मंदिर आहे. या समाधी मंदिराला दगडी खांबांची भक्कम अशी कमान आहे. दरवाजावर मंदिराचे जुने पुजारी दशरथ बुवा दाते यांचा फोटो आहे. दशरथ बुवांनी अनेक वर्ष गोरोबा काकांची सेवा केली. आता त्यांची चौथी पिढी मंदिराची देखभाल करतेय. आम्ही दशरथ बुवांचा फोटो पाहत असतानाच दाते मावशी मंदिरात येऊन बसल्या. पन्नाशीच्या, सडपातळ, हातात स्मार्टफोन असलेल्या दाते मावशी आमच्याशी बोलत होत्या. मधूनच मोबाईलवर कॉल्सला उत्तरं देत होत्या. दाते मावशी म्हणाल्या, ‘गोरोबा काकांच्या पूजेचे नियम ठरलेले आहेत. दररोज सकाळी गोरोबांचं स्नान, गंध, कपडे, हार, फुलं, तुळस वाहिलं की आरती होते. त्यानंतर गोरोबांना दुधाचा नैवद्य दाखवला जातो. दुपारी बाराच्या दरम्यान जेवणाचा नैवद्य असतो. संध्याकाळी पुन्हा गोरोबांची आरती होते. त्यानंतर शेंगदाण्यांचा नैवद्य असतो.’

मंदिराच्या आत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीसारखीच गोरोबा काकांची काळ्या दगडाची समाधी आहे. उत्सवांच्या वेळेस त्यावर छान चांदीचा मुखवटा लावून सजावट केली जाते. समाधीच्या शेजारी गोरोबा काकांची मूर्ती आहे. त्यावर गोर्‍या ऑईल पेंटचे थरावर थर मारून त्याचा आकार-ऊकार घालवलाय. मागच्या भिंतीत विठ्ठल रखुमाईचं लहानसं संगमरवरी मंदिर आहे. आतल्या टाईल्समुळे मूळ दगडी कामाचं सौंदर्य हरवलंय. पण दगडी घुमटावरचा जुना पितळी कळस मात्र शोभा आणतो.

मंदिराच्या मागच्या बाजूला एक हौद आहे. पूर्वी त्या हौदात पाण्याचं कारंजं होतं. आता मात्र हौद बुजलेला आहे. त्यावर शके १८६७या बांधकामाच्या वर्षाची नोंदच फक्त जुन्या वैभवाची आठवण करून देते. कुंभारांच्या कारागिरीचा हा दाखला आता दुर्लक्षित आहे.

गोरोबांचं देऊळ आळंदीतल्या जुन्या देवळांपैकी एक आहे. तेरमधल्या समाधी मंदिरानंतर गोरोबा काकांचं सगळ्यात जुनं देऊळ हेच असावं. याच्या पलीकडं देवळात काहीच माहिती मिळत नाही. त्यामुळं कुंभार समाजाचे माजी अध्यक्ष सुरेश हिरे यांची भेट घेतली. सुरेश हिरे हे वयाची साठी ओलांडलेलं, जरासं ठेंगणं आणि हसतमुख असं व्यक्तिमत्त्व आहे. कुंभार समाजाचं संघटन करण्यासाठी ते महाराष्ट्रभर फिरलेत. ते सांगतात, ‘आळंदीतलं गोरोबा काकांचं मंदिर किमान २००ते २५० वर्ष जुनं आहे. पूर्वी या ठिकाणी गोरोबा काकांची मूर्ती उघड्यावर होती. त्यावर छतही नव्हतं. तीच मूर्ती सध्या मंदिराच्या गाभार्‍यात ठेवलीय. १९३२ साली दत्तात्रय आवडाजी शिंदे, सोनू समजसकर, गेणू शिंदे, विठोबा चिंचवडकर यांनी एकत्र येत देवळाचा जीर्णोद्धार केला. गोरोबा काकांच्या मंदिरात कायम पुजारी असावा म्हणून सासवडहून दशरथ बुवा दाते यांना मंदिरात आणले. त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था असावी म्हणून समाजातील लोकांनी वर्गणी काढून आळंदीत दोन एकर शेती घेतली. त्याचं उत्पन्न पुजार्‍यांना लावून दिलं.’

मंदिरापासून थोड्याच अंतरावर गोरोबा काकांच्या नावाची धर्मशाळा आहे. श्रीमती भीमाबाई कुंभार यांनी धर्मशाळेसाठी जागा दान केली होती. तिथं आज सात-आठ खोल्या आहेत. काही भाग जुना तर काही नवीन बांधकाम केलेला आहे. वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेणारे विद्यार्थी त्यात राहतात.

गोरोबाकाकांच्या मंदिराचे पुजारी दशरथ बुवा दाते आणि महादेव कुंभार गुरुजी हे दोघंही मिळून पूर्वी चैत्र वद्य त्रयोदशीला गोरोबा काकांच्या पुण्यतिथीचा सात दिवसांचा सोहळा करत. वद्य वारीला नवमी, दशमी, द्वादशी, त्रयोदशी जागर, कीर्तन, प्रवचन, काला, भंडारा अशी कार्यक्रमांची रेलचेल असे. तेव्हा रोकडोबा दादा यांच्या परंपरेतले कीर्तनकार येत. कुंभार समाजाबरोबरच मराठा, माळी समाजातील लोकही अन्नदान करत.

आज होणार्‍या समाधी सोहळ्याची माहिती दाते मावशींनी दिली होती. ती अशी, ‘आता पुण्यतिथीचा सोहळा तीन ते पाच दिवसांचा असतो. सकाळी काकडा, त्यांनतर गाथा भजन, नियमाचं भजन, हरिपाठ, संध्याकाळी कीर्तन असतं. तसंच कार्तिक महिन्यातही हेच कार्यक्रम केले जातात. कार्यक्रमाच्या शेवटी काल्याच्या कीर्तनांनंतर अन्नदान केलं जातं.’

गोरोबाकाकांच्यामंदिरालाआळंदीत मानाचंस्थान आहे.ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरहून परत आली की नगर प्रदक्षिणेदरम्यान पालखी या मंदिरासमोरथांबते.‘देवाचिया द्वारी उभा क्षणभरी’ हा आणि आणखी एक अभंग म्हटला जातो. त्याचबरोबर आळंदीत येणार्‍या दिंड्या नगर प्रदक्षिणा करताना काकांच्यादेवळासमोरथांबतात. एक अभंग आणि आरती म्हणतात. माऊलींच्या पालखी सोहळ्याची सुरुवात करणार्‍या हैबतबाबांची वीणा दर महिन्याला वद्य नवमी, दशमी आणि एकादशीला गोरोबाकाकांच्यामंदिरासमोरथांबते.तिथं एक अभंग म्हटला जातो.

गोरोबा काकांच्या मंदिराची देखभाल, कारभार आणि धर्मशाळेची व्यवस्था ‘संत गोरोबा ट्रस्ट’ मार्फत चालते. आताचे नवे ट्रस्टी आणि जुने ट्रस्टी यांची भांडणं आहेत. ट्रस्टची दोन एकर जमीन बळकावून विकल्याच्या आरोपात जुन्या ट्रस्टींविरुद्ध सध्या कोर्टात खटला सुरू आहे. चिंचवड येथील ‘कुंभश्री’ मासिकाचे संपादक असलेले संजय राजे यांनी त्यांच्या मासिकात ‘आळंदी जमीनकांड’ नावानं या प्रकरणाला वाचा फोडली. त्यानंतर समाजातील लोकांनी एकत्र येत नवीन विश्वस्त मंडळाची स्थापना केली. या नवीन विश्वस्त मंडळानं धर्मादाय आयुक्तांकडे या प्रकरणी दाद मागितली. त्यावेळी धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचे आदेश दिले.

ज्ञानश्वेर माऊलींच्या पालखीत गोरोबांच्या नावानंएकही दिंडी नाही. मात्र देहूहूनसंततुकाराम महाराजांच्या पालखीत संतगोरोबा काकांच्या नावाची दिंडी असते. या दिंडीला रथाच्या पुढं चालण्याचा मान आहे.तसंच तरेकर नावाची एक दिंडीही पालखीसोबत असते.त्यांच्यासोयीसाठी देहूमध्ये गोरोबाकाकांच्या नावाचा एक मठ आहे.

कुंभार समाज संघटनेचे पुणे शहराचे अध्यक्ष संतोष कुंभार आणि त्यांचे सहकारी दरवर्षी आळंदीहून संत गोरोबा काकांची स्वतंत्र पालखी काढतात. यंदा पालखीचं बारावं वर्ष आहे. २० ते ३० लोकांना सोबत घेऊन सुरू केलेल्या या पालखीत दरवर्षी २५० ते ३०० माणसं सहभागी होतात. संतोष कुंभार सांगतात, ‘गोरोबा काकांची मुख्य पालखी तेर या गावाहून निघते. मात्र आळंदीत काकांचं जुनं देऊळ असल्यानं इथूनही पालखी असावी, म्हणून आम्ही हा सोहळा सुरू केला. भविष्यात रथ सुरू करण्याचाही आमचा विचार आहे.’

चाकण रस्त्यानं पुढं गेलं की गुरुवर्य कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेची दुमजली इमारत आहे. याच कुंभार गुरुजींनी संत गोरोबाकाका धर्मशाळेत १९७८ साली ब्रह्मविद्या पाठशाळा सुरू केली होती. पुढं त्यांनी संस्थेसाठी स्वतंत्र इमारतीची उभारणी केली. गुरुजी आता हयात नाहीत मात्र गुरुजींचे जावई कीर्तनकार पंडित महाराज क्षीरसागर आज संस्थेचं कामकाज पाहतात.

गोरोबा काकांचा आळंदीशी म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या भावंडांशी संबंध कसा आला होता, याविषयी पंडित महाराज सांगतात, ‘गोरोबा काका आणि गुरू गहिनीनाथ या दोघांचे गुरू गोरक्षनाथ होते. त्यामुळं गहिनीनाथ आणि गोरोबा हे गुरुबंधू होते. गुरू हा वडिलांच्या स्थानी असतो. त्यामुळं गुरूंचे गुरुबंधू या नात्यानं निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई हे संत गोरा कुंभार यांना काका संबोधत असत. त्यामुळं इतर संतही गोरोबा काकांना काकाच म्हणत असत.’

गोरोबांनी आळंदीला कधी भेट दिली होती का? याबाबत कीर्तनकारांमध्ये एकमत आढळत नाही. गोरोबांच्या चरित्रातला संत परीक्षा हा महत्त्वाचा प्रसंग आहे. हा प्रसंग कुठं घडला याबाबतही एकमत नाही. काही जणांच्या मते काकांनी थापटण्यानं संतांचं मडकं कच्चं की पक्कं हे तपासलं ते आळंदी इथंच. काही जण ती परीक्षा पंढरपूर, पैठण किंवा तेरला झाली, असंही पंडित महाराज यांनी सांगितलं.

मरकळ रस्त्यावर स्टेट बँकेजवळ लोहिया धर्मशाळा आहे. इथं कीर्तनकार छोटे कदम महाराज राहतात. गोरोबा काकांच्या पुण्यतिथीच्या सोहळ्यात ते दरवर्षी कीर्तन करतात. त्यातून ते काकांचं चरित्र सांगतात. मी गेलो त्यावेळी पस्तिशी-चाळिशीचे कदम महाराज ताराहाबादहून आलेल्या लोकांशी बोलत होते. गांधी टोपी, गंध टिळा आणि तुळशीमाळ असलेले कदम महाराज महिपतीबुवांविषयी चर्चा करीत होते.

माऊली आणि काकांच्या भेटीविषयी बोलताना कदम महाराज सांगतात, ‘संत परीक्षेबाबत महिपतीबुवा आणि नामदेवराय यांच्या अभंगांत भिन्नता आढळते. पण संत परीक्षा आळंदीतच झाली असावी. त्यासाठी आपण नामदेव महाराजांचा अभंग प्रमाण म्हणून पाहू शकतो. माऊलींनी समाधी घेतली त्यावेळी सगळे संत आळंदीत जमले होते. तेव्हा गोरोबाही आळंदीत उपस्थित असणारच.’

आळंदीत कुंभार समाजाची काही घरंआहेत. मात्र ते मुळचे इथलेनाहीत. यातील काही जण इथंवारकरी संप्रदायाचंशिक्षण घेण्यासाठी आलेआणि स्थायिक झाले.आळंदीत कुंभारकाम करणारेकुंभार राहत नाहीत. याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते.मुक्ताबाईंनामांडे भाजण्यासाठी खापर नाकारलं,तेव्हामुक्ताबाईंनीकुंभारांना शाप दिला की कुंभाराचंचाक इथंचालणार नाही. कुणी चाक चालवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा वंश वाढणार नाही. त्यामुळं आळंदीत कुणीही कुंभारकाम करत नाही.

आळंदीत राहणारे सोपान महाराज कुंभार सांगतात, ‘आम्ही गोरोबा काकांच्या कुंभार समाजात जन्मलो, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. गोरोबा काकांनी संसार करत करत अध्यात्माचा संदेश समाजाला दिला. गोरोबा काकांमुळं वारकरी संप्रदायासोबत समाजाचं नाव जोडलं गेलं. तेर सर्व समाजातील लोकांसाठी तीर्थक्षेत्र आहे. गोरोबा हे देवत्वाचा अंश होते, त्यामुळं त्यांच्या मुलाचा पुनर्जन्म आणि गोरोबांना हात परत येणं, असे चमत्कार त्यांच्या आयुष्यात घडलेले दिसतात.’

गोरोबा आळंदीला आले होते का? कदाचित आले असतील. कदाचित आलेही नसतील. आज सातशे वर्षांनंतर आपण फक्त अंदाज बांधू शकतो. पण गोरोबा काकांना माऊलींच्या गावात ज्येष्ठत्वाचा मान आजही आहे. त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं आजही घट्ट आहे.

0 Shares
काका कनेक्शन गोराजी का लंगर