काका कनेक्शन

हर्षदा परब

संत गोरा कुंभार त्यांच्या विठ्ठलाला भेटायला पंढरपुरात यायचे. पण गोरोबांच्या ओढीने साक्षात पांडुरंगही तेर मुक्कामी गेले होते. गोरोबांच्या अशा कहाण्यांनीच पंढरपुरात गोरोबांचं अस्तित्व टिकवून ठेवलंय.

विठ्ठलनामात गुंगहोऊन पायाखाली माती तुडवताना त्याच मातीत स्वत:चं मूल पायाखाली चिरडलं गेलंय, याचा थांगपत्ता नसलेला एक निष्काळजी बाप.

संत गोरा कुंभारांबद्दल असा थॉट माझ्या डोक्यात पक्का मुरलाय. पुढं गोरोबांचा बाप असलेल्या पांडुरंगानं ते मूल जिवंत केलं. तरीदेखील माझं आईचं मन गोरोबांविषयी नाराजच. देवाचं नाव घेताना कुणाचा जीव घेण्याइतपत गुंगी कधी न येवो, बा विठ्ठला.

हे असंच काहीतरी सोबत घेऊन मी विठ्ठलाच्या पंढरीत गोरा कुंभारांना भेटायला पोचले. रात्रीचे नऊ वाजले होते. पण पंढरपूर जागंच होतं. कारण एकादशी होती. पांडुरंग जागा होता. देऊळ उघडं होतं. म्हटलं, लगे हाथों दर्शन घेऊया.

एकादशीला मासाची वारी करत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. मोठी रांग होती. रांगेतून लगेच दर्शन मिळणं कठीण होतं. आम्ही पत्रकार असल्यानं डायरेक्ट दर्शन मंडपापर्यंत पोचलो होतोच. आम्ही म्हणजे, मी आणि माझा नवरा. सभामंडपातल्या टीव्हीवर दिसणारं लाईव्ह टेलीकास्ट बघून ‘दूरदर्शना’तच समाधान मानायची तयारी करत होतो. तेवढ्यात जुगाड झाला. भाबड्या वारकर्‍यांच्या कष्टाच्या बारीवर आमची लबाडी वरचढ ठरली. पत्रकारपणाचा वशिला लावत रांगेत घुसण्याचा शॉर्टकट मारत आम्ही अलगद गाभार्‍यापर्यंत पोचलो.

मी देवाचिये द्वारी उभी होते. विठ्ठल अगदी डोळ्यांसमोर होता. पण मला ते सावळं परब्रह्म दिसतच नव्हतं जणू. मला दिसत होता सिक्युरिटी. विठ्ठलाच्या पायावर डोकं टेकण्यासाठी आतूर भक्तांना, बाई आहे की पुरुष काहीच न पाहता सरळ ओढून ढकलून देणारा. त्याचा आरडाओरडा, ‘ओ आजी, चला उड्या मारत नका बसू. बाहेर व्हा.’ आमच्या कपड्यांवरून त्यानं हिंदीत इन्स्ट्रक्शन्स दिल्या, ‘चलो जल्दी, आगे बढो.’

मी आधी सिक्युरिटीकडे रागानं पाहिलं. मग विठ्ठलाकडे. त्याच्या पायावर डोकं टेकलं. माझ्या वाट्याला विठ्ठलाचा एक सेकंदसुद्धा नाही आला. मी आपोआप पुढं रेटली गेले. मागे वळून पाहिलं तर दोन्ही हात क्रॉस करून कान धरून कितीतरी आजी आजोबा जागच्याजागी उड्या मारत होते. विठ्ठलाकडं बघत मंद हसत होते. ऊर्जेचा सागर म्हणवणार्‍या विठ्ठलाकडे माझी पाठ होती. पण तहान भूक हरपून तासन्तास रांगेत उभे राहून आलेले वेडे लोक मला ऊर्जा देत होते. रापलेल्या चेहर्‍याचे, भेगाळलेल्या पायांचे, मळलेल्या कपड्यातले हे लोक मला त्या विठ्ठलापेक्षा सॉल्लिड वाटत होते. ते येतात आणि पांडुरंगावर प्रेम करून मेहनतीनं कमावलेल्या ऊर्जेचं तेज या गाभार्‍यात उधळून देतात. त्याचा हा सारा प्रभाव आहे. बाकी काही नाही.

बास्स, मला काहीतरी सापडलं होतं. मी देवळातल्या छोट्या चौकात इतरांसारखंच लोटांगण घातलं, ‘विठ्ठला दिसलास रे. च्यायला, इतक्या जवळून दिसशील असं वाटलंच नव्हतं.’

दुसर्‍या दिवशी सकाळपासून आम्ही संत गोरा कुंभारांना शोधायला बाहेर पडलो. त्यांचा पंढरपुरात एकच पत्ता आहे, संत गोरा कुंभार मठ. नवी पेठेतल्या भजनदास चौकात डाव्या बाजूला एका चिंचोळ्या गल्लीच्या तोंडावर दुकानवाल्याला विचारलं. त्यानं पाच-सहा इमारतींच्या पुढं फडफडणारी भगव्या रंगाची पताका दाखवली.

या गल्लीचं नाव जुनी कुंभार गल्ली. थोडं आत गेल्यावर टाळ, मृदुंग आणि कीर्तनाचे स्वर कानावर आले. दरवाजावर लिहिलं होतं, श्री संत गोरोबा काका सेवा मंडळ मठ. आजूबाजूच्या जुनाट इमारतींसारखीच त्यांना चिकटून असणारी एक इमारत. दारात पोचलो. आतलं कीर्तन आणि बाहेर उंच ओट्यावर बसलेली बरीच म्हातारी माणसं एकदम दिसली.

आत फार उजेड नव्हता. आत जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फार दाद दिली नाही. ‘कीर्तन संपल्यावर या’, ‘इथं काय नाय.’, ‘तेरला जा. सर्व माहिती मिळेल.’ अशी त्रोटक उत्तरं कॉपी पेस्ट केल्यासारखी मिळत होती. कीर्तन संपलं होतं. एक बाई मठात दर्शनासाठी आली. तिला विचारलं. तिनं तीच उत्तरं दिली. मागेच लागले, तेव्हा बाहेर ओट्यावर बसलेल्या एका आजोबांकडं नेऊन सांगितलं, ‘हे नाना. हे सर्व माहिती देतील. हे खूप जुने आहेत.’ नाना म्हणजे बळीराम जाधव. ते पंढरपूरपासून १५ ते १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या हळदगावचे. मठातले सगळे त्यांना मानतात.

८३ वर्षांचे नाना बोलू लागले. त्यांचीही सुरुवात तीच. ‘काकांचं सगळं तेरमध्ये’. इथं कुणी गोरा कुंभार म्हणत नाही. गोरोबाही नाही. गोरोबाकाका असं म्हणायचीही तसदी कुणी घेत नाही. इथं फक्त काका. संत गोरा कुंभार म्हणजे ओन्ली काका. काकांचं पंढरपूर कनेक्शन सांगण्यासाठी नानांकडे विठू कुंभाराची गोष्ट होती. गोष्ट इंटरेस्टिंग होती. विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग होऊन काका पायानं चिखल तुडवत असताना पोटचा पोर मेला. इथपासून सुरू होणारी कथा थांबते, ती काका स्वतःचे हात तोडून घेईपर्यंत. मग गोष्टीत पंढरपूर येतं.

नाना सांगतात, ‘हात गेले. आता गाडगी मडकी कोण करणार? तेव्हा इथून पंढरपूरहून पांडुरंग निघाले कुंभाराच्या वेषात. ते निघाल्यावर आईसाहेबही कुंभारणीच्या वेषात निघाल्या.’ आईसाहेब म्हणजे रुक्मिणी हे मी संदर्भानं समजून घेतलं.

‘नाना, ते त्या गरुडाचं बी सांगा’, ओट्यावरच्या लोकांपैकी एक आवाज.

‘तू थांब. अस्सं लायनीत सांगतात ते’, ओट्यावरचा दुसरा आवाज बोलला.

नाना सांगतात, ‘विठ्ठलाचा गरुड विठ्ठलाला म्हणाला. देवा, तुम्ही निघालात. मी एकटा इथं राहून काय करू? मला बी येऊ द्या की तुमच्यासंगं.’

नानांची गोष्ट पुढं सुरू राहते. गरुड गाढव बनतो. तिघं तेर गावी जाऊन गोरोबांच्या वाट्याचं काम करतात. इथं इतर संतमंडळी पंढरपुरात येतात. त्यांना विठ्ठल भेटत नाही. विठ्ठलाच्या शोधात सगळे संत काकांकडे तेरला जातात. संतांची चाहूल लागताच देव, रुक्मिणीमाता आणि गरुड पोबारा करतात.

नानांची गोष्ट शेवटाकडे आल्यासारखी वाटते, ‘मग सर्व संत, काका, काकांची मंडळी पंढरपूरला निघाली. ती कार्तिकीला इथं पोचली. म्हणून काकांची पालखी दरवर्षी कार्तिकीला पंढरपुरात येते. इतर संतांसारखी आषाढीला येत नाही.’

पण गोष्ट संपलेली नसते. सगळे संत पंढरपुरात विठ्ठलाला शोधत आले. तेव्हा नामदेवांनी वाळवंटात कीर्तन केलं. नामदेवांनी सर्वांना सांगितलं, ‘टाळ्या वाजवून म्हणा विठ्ठल, विठ्ठल.’ काकांना हात नव्हते ते कशी वाजवणार टाळी? पण नामदेवांनी त्यांनाही सांगितलं, ‘म्हणा विठ्ठल, विठ्ठल. वाजवा टाळी’ तेव्हा काकांनी टाळी वाजवली आणि त्यांना हात फुटले.

सांगता सांगता नानांचे डोळे भरून येतात. बाकीचेही त्यात रंगलेले असतात. कित्येकदा सांगितलेल्या आणि ऐकलेल्या त्याच त्या कथांमध्ये ही मंडळी वारंवार रंगून जात होती. हसत, रडत होती. मठात भेटणारा प्रत्येकजण त्याच कहाण्या सांगत होता. ते सांगताना त्यांचे डोळे भावनेनं ओथंबून जात होते.

काकांच्या कहाण्या भरभरून सांगणारी हीच माणसं गोरोबाकाकांच्या अभंगांविषयी बोलताना चूप होतात. त्यांचे अभंग मोजकेच असूनही लोकांना त्यांची माहिती नाही. मठात तर त्यांचं पुस्तकही नाही. मठाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष शिंदे यांनी अभंगांसाठी तेर आणि त्यांच्या घराकडे बोट दाखवलं. ‘तेरला सापडेल पुस्तक. माझं पुस्तक माझ्या घरी आहे.’

मठाच्या सभामंडपात भिंतीवर वेगवेगळ्या संतांच्या चरित्रातील गोष्टींची चित्रं आहेत. मठाच्या एक-दोन खांबांवर गोरा कुंभारांची आरती लिहून ठेवलीय. त्या जागी काकांचे अभंग लिहिता आले असते. २०-२२ तर आहेत. मठातल्या छोट्या मंदिरात काकांची समाधी. सोबत गोरोबांचा बारीक पण पीळदार मिशीवाला पितळी मुखवटा आणि विठ्ठल-रखुमाईची जुन्या पद्धतीची मूर्ती. मंदिराच्या बाहेर उजव्या बाजूला काकांची चिखल तुडवणारी मोठी मूर्ती. दुसर्‍या बाजूला गोरोबांची बायको संती हिचीही ठसक्यात उभी असलेली मूर्ती. शेजारी तुकोबारायांचीही मूर्ती आहे. तिथंच तुकाराम गाथ्याच्या खाली एक हिरव्या रंगाचं पातळ पुस्तक होतं. ते तुकाराम चरित्र होतं. काकांचं असं इथं काहीच का नाही?

मठाची जागा ५०-६० सालात घेतली, असं नानांचं म्हणणं. सुरुवातीला इथं फक्त छोटी जागा होती. त्यावर पत्र्यांचा आडोसा होता. २००५ साली पंढरपुरात पूर आला. त्यावेळी मठातही पाणी भरलं. अखंड विणेचा संकल्प तुटू नये म्हणून छतावरच्या पत्र्यावर उभं राहून विणेकर्‍यांनी सेवेत खंड पडू दिला नाही. त्यानंतर मठाच्या कारभार्‍यांनी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला.

काकांना मानणार्‍या वारकर्‍यांच्या वर्गणी आणि देणगीतून मठाचं बांधकाम टप्याटप्यानं सुरू आहे. सध्या तळमजल्यावर देऊळ, सभामंडप, किचन, जेवणाची जागा आहे. वरच्या दोन मजल्यांवर पंधरा-सोळा छोट्या खोल्या आहेत. महिन्याच्या वारीला आणि कार्तिकी एकादशीला पालखीबरोबर येणारे वारकरी त्यात राहतात. आणखी बांधकाम सुरू आहे. नवीन पिढीसाठी अटॅच्ड टॉयलेट, बाथरूम असलेल्या खोल्या बनवायचेही प्लॅन आहेत.

मठाची इमारत वारकर्‍यांकडून वर्गणी गोळा करून उभी राहिलीय, राजकारण्यांकडून देणगी घेऊन नाही, असं सुभाष शिंदे सांगतात. त्यामुळं लोक आजही हक्कानं येतात, राहतात आणि सेवा देतात. मठात राहणार्‍या वारकर्‍यांना प्रत्येक एकादशीला दोन वेळचं, द्वादशीला एका वेळचं जेवण दिलं जातं. रूमच्या ५० रुपये भाड्यातच हे जेवण इन्क्ल्यूड असतं. शिवाय मठात नेहमी राहणारे सेवेकरी आहेत. त्यांना माधुकरीचं जेवण, ४००-५०० रुपये महिना मानधन आणि वर्षातून एकदा कपडे दिले जातात.

पंढरपुरात फक्त गोरोबा काकांच्या मठातून माधुकरी गोळा केली जाते, असं आम्हाला सांगितलं गेलं. त्या दिवशी माधुकरी मागायची जबाबदारी असलेले श्रीधर कोसरुळकर यवतमाळ जिल्ह्याच्या कळम तालुक्यातील चिंचोली गावचे. त्यांची माधुकरी मागण्याची ही पहिलीच टर्म. गेल्या ६-७ महिन्यांपासून ते रोज सकाळी१० ते दुपारी १२या वेळेत ठरलेल्या ५० ते ६० घरात माधुकरी मागतात. ते म्हणतात, ‘मी नाही, तर काका जातात माधुकरी मागायला दारोदारी. माझा फक्त देह.’

फक्त कुंभारच नाहीत, तर सर्व जातीचे लोक माधुकरी देतात. कारण काका कोण्या एका जातीचे नाहीत. त्यांना मानणारे लोकही सर्व जाती धर्माचे आहेत. मठाला देणगी देणार्‍यांमध्येही सर्व जातींचे लोक आहेत. इति शिंदे.

अभ्यासकांत मतभेद असले तरी शिंदे ठामपणानं सांगतात, की गोरोबांनी संतांची परीक्षा घेण्याची गोष्टही पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटातच झाली. आमच्याशी बोलताना कीर्तनकार असणार्‍या शिंदेंनी काही अभंगांचा आधार घेत काकांचं चरित्र सांगितलं. ते सांगताना पेशानं वकील असलेल्या शिंदे यांचे डोळे आणि स्वर भरून येत होता. यावेळी आसपास जमलेले वारकरी विठ्ठलाची गोरोबांवरच्या प्रेमाची, मायेची गोष्ट ऐकून गहिवरत होते. कोणी हातानं तर कोणी उपरण्यानं डोळे पुसत होते.

कार्तिकीला तेरहून पंढरपूरला येणारी पालखी भाऊबीजेच्या दिवशी प्रस्थान करते. हिंग्लजवाडी, वरुडा, उस्मानाबाद, भातांब्रे, वैराग, येवला, खायराव कुंबर, अनगर, रोपळा असा ९ दिवसांचा मुक्काम करत दहाव्या दिवशी पालखी पंढरपुरात वाळवंटात पोचते. त्यानंतर पालखीचंमठातल्या मानकर्‍यांकडून स्वागत होतं. त्यानंतर वाजत गाजत पालखी मठात आणली जाते. दशमीला पालखी नगर प्रदक्षिणा करते. दशमी ते पौर्णिमा पालखीचा मुक्काम मठातअसतो. एकादशीला काकड आरती, भजन, त्यानंतरतुकारामगाथेचं पारायण होतं. दुपारी प्रवचन, हरिपाठ आणि त्यानंतरगोरोबाकाकांच्याअभंगांवरकीर्तनहोतं. मठातल्या अन्नदानाचे चोपदार वामन पाटील सांगतात, पालखीसोबत१६५गावांतले ३६ हजार लोकयेतात.

नानांच्या कृपेनं आम्हाला थेट गाभार्‍यात प्रवेश मिळाला होता. इथं कुणालाही घाई नव्हती. विठ्ठलही अगदी निवांत होता. मलाही त्याच्याशी बोलायला प्रायव्हसी मिळाली होती. मठातल्या वारकर्‍यांनी आम्हाला माधुकरीतलं प्रेमानं जेवू घातलं.

पंगतीत एकानंविचारलं,‘तुम्हालातरंगणारी वीट हवीय का? नेहमी माझ्या पिशवीत असते. आजही होती. एकानं मागवली होती. येऊनघेऊनगेला. पूजेला लागणार असेल. पुढच्याखेपेला याल तेव्हादेतो. अशा विटा खूप मिळतात तेरमध्ये’.तो सांगत असतानाच मळक्या कपड्यातल्या म्हातार्‍या वारकर्‍याची रॅशनलकमेंट आली, ‘त्याचा काय संबंध नाही काकांशी. अशा खूप विटा सापडतात तेरमध्ये.’ हे अगदी खरंअसलंतरी पंढरपुरातूनगेलेल्यापांडुरंगानं विठू कुंभार म्हणून घडवलेल्या विटा पाण्यावर तरगंतात, असा विश्वास श्रद्धाळूंना आहे.तरंगणाऱ्या विटांचा बाजार चालतो का, हेमात्र कळूशकलंनाही. अशावळेसे पत्रकारितेचा व्यवसाय आड येतोच. एरव्ही सहजपणे बोलले असतेते आमच्यासमोरबोलत नाहीत.

सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही मठातून बाहेर पडलो. मठाच्या समोरच हळदीकुंकवाच्या दुकानात गेलो. तिथं बोलता बोलता दुकानदार भागवत कुंभार यांनी महत्त्वाची माहिती दिली. आता मठात असणारी समाधी पूर्वी त्यांच्या छोट्याशा घरात होती. त्यांचे आजोबा विठ्ठल रामचंद्र कुंभार यांच्याकडे मठाची मालकी होती. विठ्ठल यांनी मुलीच्या लग्नासाठी मठाची मालकी आप्पा तेली यांना विकली. आजही काही जुने वारकरी त्यांच्या घरात दर्शनासाठी येतात. पण त्यांच्याकडेही गोरोबांविषयीचं पुस्तक नाही.

थोडंशोधल्यावर वनमाला कुंभार भेटल्या. त्यांच्या घरात आजोबांच्या काळापासून मठासाठी माधुकरी दिली जाते. त्या स्वत:च ४० ते५०वर्ष माधुकरी वाढतात. पहिली भाकर वेगळी काढून देवासमोरठेवायची. माधुकरी मागायला कोणी आलंकी ती द्यायची, असा त्यांचानेम आहे.

आम्ही कुंभार घाट शोधत होतो. वाटेत एक पुस्तकांचं दुकान लागलं. गोरोबांच्या चरित्राची माहिती असलेलं वीणा आणि र. रा. गोसावी यांनी लिहिलेलं एकच पुस्तक तिथं होतं. ते अगदीच छोटं आहे. ३५ रुपये किंमत असल्यानं वारकर्‍यांना परवडणारंही आहे. पण गोरोबांच्या पुस्तकांना फार मागणी नाही. माऊली ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्याच अभंगांच्या पुस्तकांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. इतर संतांच्या नाही. अशी माहिती तीन पिढ्यांपासून चालणार्‍या जगदीश पुस्तक भांडारचे सुधीर करजकर देतात.

मठाच्या परिसरात गोरोबांचे फोटोही फारसे विकले जात नाहीत. वयाच्या दहाव्या वर्षापासून फोटो विकत आज वयाच्या सत्तरीच्या जवळ आलेले रमाकांत माने आपला अनुभव सांगतात. त्यांच्याकडे विठ्ठल-रखुमाईच्या बाजूला छोट्या छोट्या चौकटीत सगळे संत दाखवल्याचा एक फोटो आहे. या मुंबईकडून आलेल्या फोटोत गोरोबा पांढरा कुर्ता आणि धोतर असे पूर्ण कपड्यांत आहेत. तर पंढरपूरमध्येच बनलेल्या फोटोत काका धोतर आणि उपरणं इतक्याच पेहरावात आहेत.

मूर्ती बनवणार्‍या गणेश जवारे यांचाही अनुभव फोटोवाल्या मानेंपेक्षा वेगळा नाही. तिथंही गोरोबांना फार मागणी नाही. वर्षातून फार तर ५ ते ६ मूर्ती जातात. त्या मूर्तीत काकांच्या पायाखाली चिखल आणि त्या चिखलात पायाखाली तुडवलं जाणारं मूल दाखवण्याची फर्माईश असते.

आम्ही मुद्दामून चंद्रभागेच्या कुंभार घाटावर गेलो. पण त्याचं गोरा कुंभारांशी काहीच कनेक्शन सापडत नाही. घाण, दुर्गंधी, चिखल आणि कचरा यांचंच साम्राज्य असणार्‍या घाटाशी गोरोबांचा संबंध नाही, तेही बरंच झालं. याला कुंभार घाट नाव पडलं कारण पूर्वी इथून गाडग्यामडक्यांची ने-आण केली जायची. कुंभार घाटाकडून फार लांब नसलेल्या नव्या कुंभार गल्लीत मात्र गोरोबांचं कनेक्शन सापडतं. कारण इथं त्यांना मागणार्‍यांची घरं रांगेनं आहेत.

इथं सध्या गणपतीच्या मूर्ती बनवण्याचं काम जोरात आहे. काळे माठ, कुंभारकामाची चाकं, नव्या इलेक्ट्रिक मशीन, पावसाळ्यामुळं झाकून ठेवलेल्या भट्ट्या दिसत होत्या. तिथं चिखलात खेळणारी लहान मुलंही दिसली. वाटलं, अजून हे सुरूच आहे. नशीब, आता चिखल पायानं तुडवावा लागत नाही. त्यासाठी मशीन येतं.

‘गोरोबा आमचं दैवत. प्रपंचात राहून त्यांनी भक्ती केली. आम्हीपण प्रपंच करतो. इथं राहून मातीच्या वस्तू बनवतो आणि गोरोबांची भक्ती करतो. त्यांच्या चरित्राला तोड नाही. संताचं वर्णन शब्दांत करणं मुश्किल’, कुंभारगल्लीतल्या गोविंद कुंभार यांनी गणपतीचा साचा साफ करता करता सांगितलं. गोरोबाकाकांची पुण्यतिथी गल्लीत दरवर्षी साजरी होते. इथंच एक मांडव घालून फोटोची पूजा, भजन, कीर्तन केलं जातं.

शेजारच्याच गाळ्यात काम करणार्‍या अशोक कुंभार यांनी आम्हाला आवर्जून संपूर्ण कुंभार गल्ली दाखवली. हात, पाय आणि कपड्यांना लागलेली माती घेऊनच त्यांनी आम्हाला ३ ते ४ घरी फिरवलं. त्यातल्या मुक्ताबाई कुंभार यांच्या घरी एक वेगळाच किस्सा कळला. त्यांच्या अंगणात गोरा कुंभारांच्या चरित्रावरील सिनेमाचं शूटिंग झालं. इथल्या एका कुंभाराच्याच घरातलं एक बाळ मातीत सोडून प्रसिद्ध सीन शूट केला. ते बघायला गर्दी झाली. त्यांच्या धक्क्यानं माठ फुटले. पाचशे रुपयांचं तरी नुकसान झालं. तरी त्यांनी देवासाठी त्याकडे दुर्लक्ष केलं. सिनेमावाल्यांनी सिनेमा दाखवतो, असं आश्वासन दिलं होतं. पण ते पाळलं मात्र नाही.

शांतिनाथ कुंभार थोडं वेगळं सांगतात, ‘देव कोणत्या रूपात असतो, हे सांगता येत नाही. आमच्या कलेत पांडुरंग आहे. पांडुरंगाच्या गावात आम्हा कुंभारांचं व्यवस्थित चाललंय.’ वाळवंटावर नामदेवांचं कीर्तन ऐकताना काकांना हात फुटले, ही कथाही ते रंगवून सांगतात. तेव्हा त्यांचे डोळे पाण्यानं डबडबलेले असतात. ते गोरोबांशी स्वतःला सहज जोडून घेतात. मला देवळात भेटला नाही, तो विठ्ठल त्यांना भेटलेला असतो.

या अशा हजारो शांतिनाथ कुंभारांना गोरोबाकाकांचे अभंग माहीत नाहीत. त्यांचं तत्त्वज्ञान त्यांना सांगता येत नाही. पण ते त्यांच्या कथा सांगताना हसतात, रडतात, स्वतःला विरघळवून टाकतात. चमत्कारांतून नेमका घ्यायचा तोच बोध घेतात. इतकं त्यांचं सातशे वर्षांपूर्वी झालेल्या गोरोबांवर प्रेम आहे. हजारो वर्षांचा काळ लोटला. तरी ते प्रेम कमी झालेलं नाही.

एक नक्की, मला भेटलेल्या अनेकांचं गोरोबांशी डायरेक्ट कनेक्शन आहे. आणि गोरोबांचं विठोबाशी डायरेक्ट कनेक्शन आहे. सगळं बदललं पण हे कनेक्शन बदलत नाही. कळत नाही नेमकं कशामुळं, पण हे कनेक्शन जबराट आहे. ते कनेक्शन म्हणजेच गोरोबा काका आहेत. आणि काकांचं ते कनेक्शन म्हणजेच तेजानं उजळून निघालेला विठ्ठलाचा गाभाराही आहे.

0 Shares
मन संसारी लागत न्हाई माऊलींच्या गावात काका