मन संसारी लागत न्हाई

शर्मिष्ठा भोसले

संती आणि रामी. दोघी बहिणी आणि गोरोबांच्या बायकाही. संतासोबत संसार म्हणजे पदरात निखारा सांभाळणं. एकीकडे प्रेम आणि दुसरीकडे पिसेपण. संती आणि रामीच्या निमित्तानं त्यांचं माहेर म्हणजे ढोकी गावात बाईच्या मनाचा, बाईच्या सुखाचा घेतलेला हा शोध.

सकाळीच तेरला संत गोरोबाकाकांच्या समाधी मंदिरात माथा टेकवून मी ढोकीला निघाले. गोरोबाकाका संतपदाला पोचलेले. संसार, प्रपंच न सोडता विठ्ठलभक्तीत लीन झालेले. त्यांची मूर्ती नजरेत भरून घेतली. पण संताची बायको होण्याचं वाण पदरात घेत आयुष्यभर उरीपोटी सांभाळलेल्या संती आणि रामी कशा दिसत, जगात वावरत असतील? त्यांचं देहमन कसं असेल? गोरोबाकाकांनी स्पर्श न करायचं ठरवल्यावर ते दोन स्त्रीदेह कसे जगले असतील? संतीचं मूल चिखलात तुडवलं गेल्यावर तिच्या मनाचं काय झालं असेल? रामी बहिणीची सवत झाली. पण तिच्या ओटीत पडलेल्या दु:खाचा रंगही बहिणीच्या दु:खासारखाच. पण ते दु:ख होतं की सुख? सगळेच प्रश्न अवघड.

या बायांच्या माहेरात काही उत्तरं कळू शकतील कदाचित असं म्हणत मी ढोकीला निघाले होते. ढोकीत पोचले. वेशीजवळ काही जुनी खोडं बसली होती. मी गावात येण्याचं कारण सांगितल्यावर म्हणाले, ‘तिकडं कुंभारवाड्यात जा. लोकं सांगतीन बगा तुमाला.’

कुंभारवाड्यात पोचले तर लोकांनी एक घर दाखवलं.निर्मला कुंभार यांचं. घरासमोर उभी राहिलेतर दिसलंएक बाईखोपटातल्या किराणा दुकानात मीठ-मिरची, गोळ्या, चॉकलेटअसंकाहीबाही विकत होत्या. मी विचारलं,‘ताई बोलायचंयतुमच्याशी. येऊ का जरा?’ निर्मलाताईजरा घुटमळल्या, ‘कुठून आल्या तुम्ही?’ मी कारण सांगितलं,‘मुंबईहून. तुमचं गाव म्हणजे संतगोरोबाकाकांचं सासर, संती, रामीचं माहेर ना? त्यांच्याविषयी विचारायला आले तुम्हाला.’

मग मात्र लगेच त्यांनी मुलीला हाक दिली, ‘आर्ची, ताईंना तिकडल्या दारातून आत बोलाव. आन बसाय वाकळ टाक. आलेच मी.’ अर्चना मला आत घेऊन गेली. निर्मलाताई लगबगीनं पाणी घेऊन आल्या. जवळ बसत म्हणाल्या, ‘बोला की!’

मी माझंनाव सांगून माझ्या येण्याचं निमित्त स्पष्ट करण्याआधीच ताईम्हणाल्या, ‘माझेसासू-सासरेआता वारलेत. पण ते सांगायचे, की संती-रामी याच घरात राहायच्या. हेचत्यांच्यामाहेरचं घर!’

मी फक्त मान डोलावली. ताई पुढं सांगू लागल्या, ‘अजून मी ऐकलंय, की ज्या कडुलिंबाच्या झाडाला धरून गोरोबा चिखल तुडवायचे ना, त्या लिंबाची पानंही गोड झाली! गोरोबांनी मूल चिखलात तुडवलं आणि पुढं दोन्ही बायकांना स्पर्श केला नाही. गोरोबांचा निर्वंश झाला ना. त्यामुळं जे तेरचे मूळ कुंभार समाजाचे लोक आहेत ते तेरमध्येच राहिले तर त्यांना मूल होत नाही असंही सांगायची माझी सासू.’

आमचं बोलणं चाललं होतं तेव्हा अजून दोन-चार बायका कुतूहलानं येऊन बसल्या. मी त्यांनाही बोला म्हणलं, तर एक म्हणाल्या, ‘आम्ही मराठ्याचे. निर्मलाताई कुंभाराच्या हाईत. त्यान्लाच म्हाइत गोरोबाची कथा.’

एक विमलाबाई म्हणाल्या, ‘पहिलेच्या अडाणी बायकांना लई व्यवहारज्ञान होतं. त्या सोशीकपण होत्या. भोळ्या-भाबड्या असायच्या. आताच्या पोरी काय शिकल्या आन हुकल्या. संसार टुकीनं करत नाहीत. संती-रामीनं संताचा संसार केला. किती मोठं सुख म्हणायचं! गोरोबाकाकांनी बायकांना कधी मारायलाही हात लावला नाही. पण बायका एकदा त्यांच्या दोन्ही बाजूला येऊन झोपल्या. मग हातांना बायकांचा स्पर्श झाला म्हणत गोरोबांनी स्वतःचे हात तोडून घेतले ना! त्यामुळं मडकी कशी थापणार? प्रपंच बंद पडला. मग स्वत: विठ्ठल अन् रुक्मिणी रूप बदलून काम मागायला आले काकांच्या घरी. दोघं मडके बनवायचे. गाढवावर वाहून विकायलाही न्यायचे. इकडे रामी संतीला विचारायची, ए संती, ही कुंभारीण जवळून चालली की कसा तुळशीचा वास येतो गं? आता त्या दोघींना कुठं माहीत की ही कुंभारीण म्हणजे रूप बदलून आलेली रुक्मिनी आहे! असा देवानंच प्रपंच केला गोरोबांचा.’

त्यांच्यातल्या सुशीला ताटे म्हणाल्या, ‘संती,  रामीपण देवाचंच नाव घेत राहिल्या ना पुढं. सगळं  दु:ख हलकं झालं त्यांचं. संतसहवासानं जलम पवित्र झाला. आम्हालाही देवाचाच आधार. जागृत आधार आहे पांडुरंगाचा. विश्वास ठेवला तर आहे, नसता काय?’ बाजूला आशाबाई माळी बसलेल्या. त्यांनी मान डोलावली.

आता मी या बायकांचा निरोप घेत पुढं निघाले. निर्मलाताई दाराशी मला सोडायला आलेल्या. म्हणाल्या, ‘गाणी रचणार्‍या, कीर्तन करणार्‍या बायका त्या मांगवाड्यात भेटतील बघा तुम्हाला.’

थोडं पुढं गेल्यावर काही बायका आडावर धुणं धूत होत्या.

मला म्हणाल्या, ‘कुठं जायचं?’

मी म्हणाले, ‘संती-रामीला शोधायला.’

बायका म्हणाल्या, ‘आम्ही नाही ओळखत’

मी म्हणाले, ‘गोरोबाकाकांच्या बायका नव्हत्या का?’

आता बायकांनी हसून मान डोलावली.

ढोकी गाव तसं मोठं दिसत होतं. सोळा हजार लोकसंख्येचं. उस्मानाबादहून २४ किलोमीटरवर. पण तेरपासून अगदीच पाच-सहा किलोमीटरवर. म्हणून तेरढोकी असं जोडीनं ही दोन्ही गावं वर्षानुवर्ष ओळखली जात. कदाचित गोरोबांच्या सहवासानं बहरल्यामुळं ही दोन्ही गावं लोकांना एकच वाटत असावीत. पूर्ण गावात शोधलं. तीन-चार देवळं आहेत. पण गोरोबाकाका किंवा संती-रामी यांची आठवण ठेवणारं इथं काहीच नाही. गेल्या वर्षीपासून ढोकीहून तेरला दर महिन्याला पायी वारी जाते. दीडएकशे लोक असतात.

मी मांगवाडा शोधत होते. एका वाड्याच्या पडवीत दोन-चार पोरं मोबाईलमग्न बसलेली. मी विचारलं, ‘नक्की कुठं आला मांगवाडा? आणि काही नाव असंल ना मांगवाड्याला?’ एकजण म्हणाला, ‘ते बघा तिकडं पिवळे झेंडे दिसतेत ना घरांवर. साठेनगर म्हणतात त्याला.’

मी पिवळ्या झेंड्यांचा माग काढत पोचले. साठेनगरात एक चाळीशीच्या ताई फडे बांधत बसल्या होत्या. माझ्याकडं नजर जाताच थबकल्या. म्हणाल्या, ‘कुणाकडं जायाचं?’ मी म्हणाले, ‘आले तुम्हालाच भेटायला. बसू का जरा?’ त्या तोंडभरून हसल्या तशी मी बाजूच्या पायरीवर बसले. माझ्या येण्याचं कारण सांगितलं, ‘मला तुमच्या साठेनगरमधल्या बायका, पोरींशी गप्पा मारायच्यात. येतील का बायका? तुमचं काय नाव?’

‘संगीता लोखंडे’, ताई उत्साहात म्हणाल्या. बाजूलाच एक तरुण पोरगा मोबाईल घेऊन बाजेवर बसला होता. त्याला म्हणाल्या, ‘जा बरं, सगळ्या म्हातार्‍या, तरण्याइला अंगणवाडीच्या अंगणात बोलून आन.’ वीसेक मिनिटातच बर्‍याच बायका आल्या. चेहर्‍यावर थोडं कुतूहल आणि खूप सगळे प्रश्न घेऊन.

एक आजी आल्या-आल्या खणखणीत आवाजात विचारत्या झाल्या, ‘काय अनुदानाचं हाय का काई?’

मी म्हणले, ‘आजी, अनुदानाचं नाही, गप्पा माराय आले तुमच्यासोबत.’ ‘बरं, बरं माय. मला वाटलं सरकारचे लोकं हाइत का काय’ म्हणत आजी बसल्या.

बायकांना मी येण्याचा हेतू सांगितला. तशी एकजण म्हणाली, ‘पण गोरोबाकाका तर कुंभाराचे होते. त्या कुंभारआळीत बायका सांगतील की तुम्हाला माहिती!’ मी म्हणाले,‘तसंनाही, मला फक्त गोरोबाकाका आणि त्यांच्याबायकांविषयी माहिती नको.तुमच्याशी गप्पा मारायच्यात.’

त्यांच्यातली एकजण म्हणाली, ‘बरं, बोला की मग!’  मी विचारलं, ‘बाईला संसारात सुख वाटायला काय लागतंय बरं?’ बायका जरा बिचकल्या. काहीजणी तोंडाला पदर लावत हसू लागल्या. मी म्हणाले, ‘सांगा सांगा… बाईसाठी काय असतंय सुख?’

लक्ष्मीबाई कांबळे बोलायला लागल्या, ‘मुलंबाळं चांगली निघाली की तेच सुख, दुसरं काय?’ काही बायांनी माना डोलावल्या.

साधारण पंचेचाळिशीच्या बायडाबाई कसबे हळूच म्हणल्या, ‘नवरापन चांगला असावं, म्हणजे सुख.’ मी लगेच विचारलं, ‘नवरा चांगला म्हणजे कसा असाव बरं?’

आता बायका अजूनच खुसूखुसू हसल्या. एकजण म्हणाली, ‘दारू पिऊ नाही नवर्‍यानं.’ दुसरी म्हणाली, ‘मारहाण करू नाही.’ तिसरी म्हणाली, ‘जरा गोडीनं राहावं, मायेनं बोलावं.’ तिच्या उत्तरावर बायका तिला कोपरानं उचकवत ‘अस्सं का गं? व्हय की काय?’ म्हणू लागल्या. जरा हसणं-खिदळण्याला रंग आला. मीपण हसायला लागले.

हसता-हसता एक प्रश्न मनात आला, ‘नवर्‍यानं गोडीनं राहत मायेनं बोलावं’ ही बायकांची सुखाची किमानच अपेक्षा म्हणावी लागंल. पण ते मायेनं बोलणंही इतकं दुरापास्त असंल का, की बायका ती सुखाची कल्पना ऐकून इतक्या हसायला लागल्या? त्या हसण्यात खूप सगळं दु:ख लपलं असंल का?

सोजरबाई ढवारे साठीच्या आहेत. म्हणाल्या, ‘आजकालच्या पोरींचं बरं हाय. आमचं सांगताव तुला. विहिरी खंदायच्या, तळ्याच्या कामाव जावं लागायचं. घरात आडाचं पाणी शेंदणं. जात्याव दळणं. दोन येळचं रांधणं. या सगळ्यात सासूचीच गाठ असायची. नवरा काय कवाबवा नजरेला पडायचा. एकच लुगडं धूनसुकवून नेसायचं, डोईला तेल मिळायचं नाही. सासवा भाकरतुकडा द्यायच्या नाहीत. मग रानात काम करताना बांधावरच्या रानभाज्या उपटून खायचो. दुस्काळात तर इलू-मिलू, उंबरं, सातू, कुर्डूची भाजी आन् कायकाय नाय खाल्लं. अशात काय आलं बाईला सुख?’

वय बरंच झालेल्या समिंद्राबाई म्हणाल्या, ‘माझं तर नेणती असतानाच लग्न झालं. मजुरीला जावं लागायचं दिसभर. मजुरी मिळायची दोन ओंजळ जवारी. नवर्‍याला बाईच्या कष्टाची जाण असंल तर बाईला सुख मिळतंय.’ आसपासच्या दोन-तीन म्हातार्‍या यावर मान डोलावत म्हणाल्या, ‘आता सुना चांगल्या मिळाल्या ते मातर सुख म्हणायचं!’

एका ताईनं विचारलं, ‘तुमी हे लिवनार ते वाट्सपवर दिसनार का आमाला?’ मी हसले. म्हणाले, ‘नाही, नाही. मासिकात येणार एका.’

दोन कॉलेजवयीन मुली अबोल ऐकत होत्या. मी एकीला विचारलं, ‘काय गं, तू पण बोल की काही. आता तुम्ही दोघी शिकताय. पुढं नोकरी करताल. तुम्हाला दोघींना कसा जोडीदार, कसा संसार पाहिजे?’

त्यावर दोघी लाजल्या. एकजण धिटाईनं बोलली, ‘माझ्या नवर्‍यानं मला आदर द्यायला पाहिजे.’ मी चमकले. म्हणलं, ‘किती छान बोललीस. तुला कसं काय वाटलं गं हे?’ ती म्हणाली, ‘मी बाबासाहेब आंबेडकरांची भाषणं वाचली ना, त्यातून मला कळलं.’

तिचं नाव सरिता कसबे. सरिता उस्मानाबादला आयटीआय करते. तिच्या बाजूला तिची मैत्रीण रोहिणी कसबे. ती उस्मानाबादला नर्सिंग शिकते. रोहिणी सांगते, ‘वस्तीतले अनेक पुरूष व्यसनी आहेत. बायका त्यांना दारू सोड नायतर मी माहेरी जाईल म्हणतात. चार दिवस जातातही, पण फिरून पुन्हा नवर्‍याच्या दारातच येतात. तो बरोबर बायकोची पोथी ओळखतो. तिला पाहिजे तसं वाकवतो, वळवतो. हीच बाई शिकलेली असती, कमावती असती, तर एवढी लाचार नसती.’

एक आजी म्हणाल्या, ‘पोरी हुशार झाल्यात आताच्या. या पोरींच्या वयाच्या होतो तवा तर मला लेकरू झालेलं होतं. सावित्रीबाईनं बायकांसाठी चांगलं केलं. म्हनतेत ना, सावित्रीनं काढली शाळा, तवा संपला बायांचा उन्हाळा.’

‘बरं आता काही गाणी म्हणा की,’ मी जरा अंदाज घेतला. या इतक्या बोलक्या बायांमध्ये गाता गळा असणारच. मग बाया एकमेकींना खुणावू लागल्या. एकजण दुसरीला म्हणाली, ‘ऐ कौशल, म्हण की तुझं रचलेलं.’ कौशल जरा नाही-नको करत तयार झाली. म्हणाली, ‘लई वर्षांपासून मी आन् माझ्या सासूबाई दोघी गाणे रचतो. आडवी उभी रेघ लिहाय येत नाही. अडाणी आहोत. पण रचतो ते मनात ठेवतो. भाकरी करताना, निंदता खुरपताना मनात घोटतो. वेडेवाकडे बोल आमचे. आता तेच म्हणून दाखवतो.’ तिच्या सासूबाई लक्ष्मी कसबे. म्हणाल्या, ‘मोप गाणे रचलेत. म्हणत बसल्यावर रात उजाडल इथंच. वानोळा दाखवतो उगी दोन-तीन गाण्यांचा.’ दोघी गाऊ लागल्या,

पंढरीच्या पेठा मांडिले दुकान
इठ्ठल कुंभार, रुक्मीन कुंभारीन
संतमेळा आला जवळी पाहुनिया दंग
कुंभाराच्या चिखलावरी नाचे पांडुरंग
शंख चक्र मडक्यावरी पहा चक्रपाणी
आवा भाजू लागे माय रुकमिनी
गरुडही गाढव झाले होऊनिया संग
कुंभाराच्या चिखलावरी नाचे पांडुरंग
क्षीरसागरीचा हरी, गोरा कुंभाराच्या घरी
जगन्माता वाहू लागे पाण्याच्या घागरी
दोघे मिळून चिखुल करती, भक्तीचाही रंग
कुंभाराच्या चिखलावरी नाचे पांडुरंग

मी विचारलं, ‘गोरोबावर गाणी रचलीत एवढी. आन संती-रामीवर?’ यावर हसतच लक्ष्मीबाई म्हणाल्या, ‘नाही. त्यांच्यावर गाणं नाही रचलं बघा. फक्त एका गाण्यात उल्लेख केलाय संतीचा,

माती तुडविता ध्यान नाही चित्ती
आठविता मनी पांडुरंग
गोरोबाची कांता पाणीयासी जाता
पुत्र लपत खेळे तैसे
लक्ष असू द्यावे स्वामी बाळावरी
घरी नाही कुणी सांभाळावे.

मी विचारलं, ‘गाण्यातून काय मिळतंय तुम्हाला?’ लक्ष्मीबाई म्हणाल्या, ‘जीवाला आनंद होतंय. संसारातलेच अनुभव गाण्यातून ओठावर येतेत. गाण्यापाशीच मन मोकळं करतोत आम्ही.’ बायका म्हणाल्या, ‘या दोघींचं गाणं ऐकून आमच्या संसाराचा भार हलका होतो. तोच एक इरंगुळा असतोय आम्हाला. यांचं गाणं ऐकल्यावर टेन्शन जातं.’

आता आमच्या गप्पा संपत आल्या होत्या. मी म्हणाले, ‘संत गोरोबाकाका, त्यांच्या दोन बायका. पहिल्या बायकोपासून एक मूल झालं. ते विठ्ठलाच्या नादात पायाखाली तुडवलं गेलं, मग पुढं दोन्ही बायकांच्या अंगालाही हात लावला नाही. ही कथा ऐकून तिघांबद्दल काय वाटतंय बरं तुम्हाला?’ बायका विचारात पडल्या. एक म्हणाली, ‘काय वाटायचं? संत माणूस होता तो, त्याचा संसार करणं भाग्याचंच की!’

मी अजून खोदायचा प्रयत्न चालू ठेवला. ‘पण बायकोला त्यांनी बायकोसारखं वागवलं नाही, त्या दोघींच्या मनाचं काय झालं असेल.’ यावर शारदाबाई म्हणाल्या, ‘विठ्ठलाचा नाद लागला होता त्येन्ला. आता देवाच्या भक्तीपुढं बायकोची काय किंमत? भक्तीनं मन दुमदुमून गेलेलं. तिथं काय चूक, काय बरोबर?’ बायडाबाई म्हणाल्या, ‘बाईची धन-दौलत नवराच असतोय! त्याच्या सुखातच त्या दोघीचं सुख असणार!’

मी विचारलं, ‘पण नवर्‍यानं जवळ घ्यायचं, चार शब्द प्रेमाचे बोलायचं असं कुठलं सुख नकोच असणार का त्या दोघींना? संती बाईचं मूल डोळ्यादेखत नवर्‍याच्या पायी तुडवलं गेलं. आईचा जीव कसा झाला असंल?’

इकडं मला मनात नुकत्याच नेटफ्लिक्सवर पाहिलेल्या ‘लस्ट स्टोरीज’मधली कियारा अडवाणीनं साकारलेली नवविवाहिता आठवत होती. तिची सासू तिला म्हणते, ‘जब पुरी हो जाए हसरत, तो किसलीये करनी कसरत?’ त्यावर तिचा प्रतिप्रश्न असतो, ‘और अगर हसरत पुरीही ना हो तो?’ आता या बायांपर्यंत व्हॉट्सप पोचलय, पण नेटफ्लिक्सवरच्या बाईच्या देहमनाबाबत बोलणार्‍या या स्टोरीज पोचलेल्या असण्याची काही शक्यता नव्हती. पण ‘बाईची हसरत’ खरंच नेमकी काय असते याचा थांग काही बायका मला हवा तसा लागू देत नव्हत्या.

माझ्या प्रश्नावर महादेविबाईम्हणाल्या, ‘ते आपल्यासारख्या साध्या बायांचं झालं. आता संताची बायको म्हणल्यावर संती, रामी संतपदाला पोचलेल्याच असणार की. आईचा जीव हळवा असतोय. पण संताच्या बायका काय साध्यासुध्या नसणार. मोहमाया सुटली असंलत्यांची.’ त्यांचं हे बोलणं बर्‍याच बायकांना पटलेलं दिसलं.

मला संती-रामी किती सापडल्या-कळल्या होत्या काय माहीत? ‘बाई म्हणजे एक गूढ’ असं म्हणत आपण त्यांना, त्यांच्यासारख्या कित्येकींना न शोधण्याची, न समजून घेण्याची पळवाट वर्षानुवर्ष शोधत आलोत. पण परतीच्या वाटेवर एक जाणवत राहिलं, ‘बाई आपल्या सुखाचं प्रतिबिंब सतत इतरांच्याच मनात शोधायची. ते तिथंच सापडेल अशी आशा बाळगायची.’ संती-रामी काय किंवा लक्ष्मी, महादेवी, शारदा, बयडाबाई काय! सगळ्याजणी सोशिक असण्यातच सुख शोधत राहिल्या.स्वत:च्या मनाच्या अंधार्‍या आडात डोकवायची हिम्मत त्यांना झाली नाही. पण नव्या पिढीच्या सरिता आणि रोहिणी सुख शोधायला वेगळ्या वाटांवर निघाल्यात. त्यांच्याशी बोलून वाटलं, नव्या पिढीत आता स्वत:च्या मनाचा तळठाव बाई हुडकायला लागलीय. तो तिला सापडायलाय. त्यात स्वत:चं प्रतिबिंब बघण्यात ती आनंदून जातेय. तिचं सुख तिला हळूहळू का होईना पण नीटच गवसतंय. असा काय काय विचार करत होते.

आता निरोप घ्यावा म्हणलं, तर तर लक्ष्मीबाई म्हणाल्या, ‘अजून एक गाणं म्हणू का?’ मी हरखले. म्हणलं, ‘म्हणा की!’ दोघी सासू-सुना गाऊ लागल्या,

आलो भजनाला देवा तुझ्या दारी
मन संसारी लागत न्हाई
सासू खट्याळ लय हाय भारी
चापट मारीतीया गालावरी
मन संसारी लागत न्हाई
नणंद खट्याळ लय हाय भारी
चुगल्या सांगतीया जाउनी घरी
मन संसारी लागत न्हाई
आलो धावूनी देवा तुझ्या द्वारी
मन संसारी लागत न्हाई
एका जनार्दनी गवळण राधा
नको लागू तू हरीच्या नादा
मन संसारी लागत न्हाई

लक्ष्मीबाई गातानाच लयीत हात नाचवत ताल धरू लागल्या. लक्ष्मी आणि कौशल. उगाच फेमिनाईन लाजरेबुजरेपणाच्या कुठं खुणा नाहीत. कृत्रिम आढेवेढे नाहीत. ओठावरचं मनमोकळं हसू. काळासावळा रापलेला चेहरा. साध्यासुध्या साडीत डोक्यावरचा पदर. अंगावर काळ्या पोतीशिवाय कुठलेच नसलेले दागिने. सगळ्या देहबोलीतला अर्धाकच्चा गावरानपणा. रानातल्या आभाळासारखा खुला रांगडा आवाज.

निगुतीनं संसार करत असतानाच ‘मन संसारी लागत न्हाई’ असंगाणार्‍या या दोघी. त्यांनाऐकताना वाटून गेलं, या दोघी जे अंगणात बसून, कसलीही भीडभाड न बाळगता गाताहेत, ते संती-रामी कधी मनातल्या मनात तरी गुणगुणल्या असतील का? ‘मन संसारी लागत न्हाई.’ परतीच्या वाटवेर माझ्या ओठावर याच ओळी नाचत राहिल्या.

0 Shares
तेरमधल्या विटा का तरंगतात? काका कनेक्शन