तेरमधल्या विटा का तरंगतात?

चंद्रसेन देशमुख

खरंतर वीट आणि संताचं अनोखं नातं आहे. भक्त पुंडलिकानं फेकलेल्या विटेवर संतांचा लाडका पांडुरंग युगानुयुगं उभा आहे. या विटेमुळंच पांडुरंगाला विठ्ठल ही ओळख मिळाली. हीच वीट तिकडं मराठवाड्यातल्या संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या जीवनाशी नातं सांगत टिकून आहे. त्यांच्या तेर या गावी पाण्यावर तरंगणारी अशी वैशिष्ट्यपूर्ण वीट आढळते. या विटा काकांनी आणि कुंभाराचं रूप घेऊन काकांना मदत करायला आलेल्या विठ्ठलानं बनवल्याची घट्ट श्रध्दा काकांच्या भक्तांमध्ये आहे.

गोरोबा काकांना पांडुरंगाचं वरदान होतं की त्यांनी बनवलेली एकही वीट पाण्यामध्ये बुडू शकली नाही. अशा अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. तेरला येणारे अनेक भक्त गोरोबा काकांच्या पायाखाली तुडवलेल्या चिखलानं तयार झालेली वीट म्हणून तरंगणारी वीट भाळी लावतात. अनेक भक्तांनी या विटा मोठ्या श्रध्देनं घरी नेऊन देव्हार्‍यात पूजेला ठेवल्या आहेत.

मात्र, आज इतिहास आणि विज्ञानाचा विचार करता काकांच्या जीवनाशी या विटेशी थेट संबंध जोडता येणार नाही. या विटा गोरोबा काकांच्या काळात नाही, तर त्याआधीच्या अधिक प्राचीन काळात तयार झाल्याचं लक्षात येतं.

तेरच्या परिसरात अनेक धार्मिक स्थळं आणि प्राचीन वास्तू उभारलेल्या आढळतात. अगदी गावातील सध्याचा बाजार भरतो, त्या मध्यवर्ती भागाजवळ असलेल्या उत्तरेश्वर मंदिराची रचना पाण्यावर तरंगणार्‍या या विटांनीच झालेली आहे. हे मंदिर सुमारे चौथ्या शतकातले आहे. गावातच त्रिविक्रम मंदिर आहे. या मंदिराच्या पूर्व दिशेच्या भिंतीला तरंगणार्‍याच विटा आहेत. हे मंदिर सातव्या शतकातलं असल्याचं सांगितलं जातं.

पुरातत्व खात्याचे माजी संचालक मोरेश्वर दीक्षित यांनी तेरमध्ये १९६६ आणि १९६७मध्ये तेरमध्ये उत्खनन केलं. तेव्हा अशा प्रकारच्या विटा आणि मातीची अनेकविध भांडी आढळली. वीट पाण्यावर तरंगते कशी, याची उत्सुकता प्रत्येकालाच होती. मात्र दीक्षित यांनीही या विटा गोरोबांच्या काळापेक्षा शेकडो वर्ष जुन्या असल्याचं निरीक्षण नोंदवलंय.

जाणकारांच्या म्हणण्यानुसार पाण्यावर तरंगणारी वीट वजनानं हलकी असते. मात्र कमालीची मजबूत असून, ती शेकडो वर्ष टिकून राहते. अशी वीट बनवण्यासाठी मातीत तुस (गवत किंवा भरडलेल्या पिकांचा भुसा) मिसळून वीट उच्च तापमानात भाजली जाते. मातीवरील तूस किंवा भुसा जळून गेल्यानंतर सच्छिद्र पोकळ्या असलेली हलक्या वजनाची वीट तयार होते. वास्तविक पाहता अशा विटा केवळ तेरमध्येच आढळतात, असं नाही. तर राज्यातील अन्य भागातही प्राचीन बांधकामात अशा विटा आढळल्यात. गोळेगाव, जुन्नर येथील खोदकामात तर अशा विटा कुणीही जाऊन पाहू शकतं. त्यामुळे पूर्वी अशा विटांवर बांधकामं मोठ्या प्रमाणावर होत असावीत, हे स्पष्टच आहे.

इतिहासकारांच्या आणि पुरातत्त्व अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार एखाद्या वास्तूचं विशेषत: मंदिराचं बांधकाम करण्यासाठी अशा विटांचा अधिक वापर होत होता. मंदिराला आकर्षक आकार देण्यासाठी हलक्या वजनाच्या विटांची गरज असायची. विशेषत: शिखर बांधकामासाठी हलक्या विटांचा वापर प्रामुख्यानं व्हायचा. तेरमधील उत्तरेश्वर मंदिराच्या शिखराची आकर्षक रचना न्याहळताना कौशल्यपूर्ण वास्तूकलेची प्रचिती येते.

या विटांवर वैयक्तिक स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीनं संशोधन झालं असलं तरी त्या दाव्यांवर गहन स्वरूपात किंवा जाहीर चर्चा झालेली नाही. मात्र, या विटांचा अभ्यास करून अशाच पद्धतीच्या विटा तयार करण्यासाठी ५० वर्षांपूर्वी केंद्र शासनानं तेरमधून ३ ते ४ पोती विटा दिल्लीला नेल्या होत्या. समुद्रावर बांधकाम करण्यासाठी त्याचा वापर करण्याचा विचार होता. मात्र नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यानं आता त्या संशोधनाला अर्थ उरलेला नसावा.

आज रामलिंग अप्पा लामतुरे यांनी उभारलेल्या पुरातन वस्तुसंग्रहालयात जवळपास २२ हजार वस्तूंमध्ये तरंगणार्‍या विटा हेच प्रमुख आकर्षण आहे. त्यांनाही गोरोबा काकांच्या भक्तीतूनच काकांच्या गावचा प्राचीन ठेवा जपण्याची प्रेरणा मिळाली होती.

0 Shares
महाराष्ट्राचा वारसा मन संसारी लागत न्हाई