महाराष्ट्राचा वारसा

रवींद्र केसकर

रामलिंगअप्पा लामतुरे या एका साध्या माणसाने तेरचा इतिहास जपून ठेवलाय. त्यांच्या संग्रहाचं आता म्युझियम झालंय. त्यात गोरोबांनी घडवलेला एखादा आकार जतन होत असेल कदाचित.

मानवी समूहाच्या इतिहासाची जिज्ञासा सर्वांनाच असते. लाखो वर्षांत माणूस कसा राहिला, त्यानं आपला समूह उन्नत करण्यासाठी कोणत्या सामग्रीचा वापर केला. त्यातून कोणती संस्कृती जन्माला आली, अशा कितीतरी बाबी जाणून घेण्याची उत्स्फूर्त उत्सुकता आजही पूर्णतः शमलेली नाही. त्यामुळं इतिहासाचा वारसा जपण्याची गरज आहे. असाच एक वारसा सुमारे अडीच हजार वर्षांच्या काळाचा लेखाजोखा आपल्या उदरात सामावून आजही जिवंत आहे. हा वारसा आपल्याशी संवाद साधताना शेकडो शतकांच्या समृद्ध घडामोडींची जणू साक्षच देत राहतो. आजच्या आधुनिक जगाला इसवी सन पूर्व दुसर्‍या, तिसर्‍या शतकाशी जोडणारा हा दुर्मिळ वारसा तेर इथल्या श्री रामलिंगअप्पा लामतुरे वस्तुसंग्रहालयाच्या रूपानं आजही आपल्याशी संवाद साधतो आहे.

हे म्युझियम मागील सुमारे अडीच हजार वर्षांचा चालताबोलता इतिहास अंगाखांद्यावर मोठ्या दिमाखात मिरवत आहे. जगभरातील अनेक संशोधक, अभ्यासक तेर मधल्या या वस्तुसंग्रहालयास भेट देऊन दोन हजार वर्षांपूर्वी जागतिक कीर्तीची व्यापारीपेठ म्हणून उदयास आलेल्या या भागाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करतात. अपार कष्टातून गोळा केलेला हा सुमारे २३ हजार वस्तूंचा प्राचीन वारसा पडद्याआड गेलेला काळ अधिक ठळकपणे जाणून घेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतोय.

तेर इथले रहिवासी असलेले रामलिंगअप्पा लामतुरे अत्यंत बारकाईनं प्राचीन काळातील छोट्या-मोठ्या वस्तूंच्या संकलनाकडे लक्ष देत होते. तेर आणि परिसराचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील अनेक संशोधक आणि अभ्यासक तेर इथं येत. त्या काळात अनेक संशोधक आणि अभ्यासक यांच्याबरोबर रामलिंगअप्पा लामतुरे यांनी स्वतः भ्रमंती केली. तेर परिसरातील पांढरीच्या टेकड्या फिरताना त्यांना त्याठिकाणी काही खापरं, प्राचीन वस्तू आढळून आल्या. त्यातूनच एका नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. लामतुरे यांना पुरातत्त्वशास्त्राची आवड निर्माण झाली.

त्यानंतर त्यांनी प्रसंगी स्वत: जवळची रक्कम देऊ करून तेर आणि परिसरातील नागरिकांकडून त्या प्राचीन वस्तू विकत घेतल्या. असं करता करता जवळपास २३ हजार वस्तू संग्रहित झाल्या. स्वतः अपार परिश्रम घेऊन जमा केलेला हा ऐतिहासिक दस्तऐवज त्यांनी महाराष्ट्र सरकारला विनामूल्य बहाल केला. त्यानंतर त्या वस्तूंचंच हे संग्रहालय स्थापन करण्यात आलं. शासनानं तेर इथं संग्रहालयासाठी स्वतंत्र इमारत बांधून त्या वस्तू नागरिकांना अभ्यासासाठी उपलब्ध करून दिल्या. लोकांना कायमस्वरूपी पाहण्यासाठी संग्रहालय १९७९पासून सुरू झालं आहे. शिक्षण इयत्ता तिसरीच असूनही एक सुसंस्कारित व्यक्ती काय करू शकते, हे रामलिंगअप्पा लामतुरे यांनी अत्यंत सचोटीनं सिद्ध करून दाखवलं. त्यामुळंच या वस्तुसंग्रहालयाचं नाव ‘श्री. रामलिंगअप्पा लामतुरे वस्तुसंग्रहालय’ असं ठेवण्यात आलं. या संग्रहालयात एकूण तीन मोठी दालनं आहेत. त्या दालनात आकर्षक पद्धतीनं मागील अडीच हजार वर्षांची साक्ष देणार्‍या २३ हजार वस्तू मांडण्यात आल्या आहेत.

असा वस्तूसंग्रह करण्याची कल्पना जगात प्राचीन काळी ग्रीस देशात उदय पावली. इसवीसनपूर्व २८० या वर्षी पहिल्या टोलेमीनं इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाच्या शहरात पहिलं वस्तूसंग्रहालय स्थापन केलं. भारतातलं पहिलं संग्रहालय डॉ. वॉलिस या डॅनिश शास्त्रज्ञाच्या प्रेरणेमुळं स्थापन झालं. वेगवेगळ्या वस्तूंचं जतन आणि संवर्धन व्हावं, यासाठी महाराष्ट्रातही हे काम सुरू झालं. राज्यात शासकीय मालकीची एकूण १३ वस्तुसंग्रहालयं आहेत. त्यापैकी तेर इथलं रामलिंगअप्पा लामतुरे हे एक महत्त्वपूर्ण मानलं जातं हे विशेष!

तेर इथल्या प्राचीन अवशेषांच्या माहितीचा पहिला अहवाल १९०३ साली प्रकाशित झाला. हेन्नी कझीन्स या संशोधकानं १९०१ साली या अवशेषांची पहिल्यांदा सविस्तर पाहणी केली असल्याचं त्यात नमूद आहे. उत्खननामुळं तेर या शहराचं प्राचीनत्व आणखी ठळकपणे जगासमोर येऊ शकलं. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी या भूभागाची ओळख ‘तगर’ या नावानं सुपरिचित असल्याचे अनेक संदर्भ उजेडात आले आहेत. तत्कालीन ग्रीक खलाशांनी केलेले उल्लेख ग्रंथरूपानं आजही अस्तित्वात आहेत. सातवाहनकाळात आणि त्यानंतर सातव्या ते आठव्या शतकापर्यंत तेर हे शहर एक जागतिक कीर्तीची व्यापारपेठ म्हणून जगभरात ओळखलं जात होतं.

१९३० साली निजाम सरकारनंदेखील त्यांच्या पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून इथल्या मंदिरांची पाहणी केल्याचं आढळून आलं आहे. त्यानंतर अनेक संशोधक मोठ्या जिद्दीनं तेर आणि परिसरात आपलं कौशल्य पणाला लावून काम करू लागले. प्रत्येक टप्प्यात झालेलं उत्खनन पडद्याआड दडलेल्या काळाचे नवनवे संदर्भ ताजेतवाने करू लागले. अनेक वस्तू, शिल्प, दाग-दागिने, मूर्ती, धनधान्य, धान्यांची कोठारं, लाकडाच्या कोरीव वस्तू भाजलेल्या मातीची भांडी असा कितीतरी मोठा दस्तऐवज इतिहासाच्या पोटातून बाहेर येऊ लागला आणि त्यामुळं काळाच्या ओघात लुप्त झालेला भारतीय परंपरेच्या नावलौकिकात भर टाकेल असा एक समृद्ध वारसा उजेडात आला.

हस्तिदंतांवर कोरलेल्या स्त्री-पुरुषांच्या मूर्ती, शंखापासून तयार केलेल्या बांगड्या, मणी आदी अंगभूषणे, हाडापासून तयार केलेल्या वस्तू, लज्जागौरी, कामवासनादेवी यासह स्त्री आणि पुरुषांच्या आकर्षक मूर्ती, भाजलेल्या मातीपासून तयार केलेली आणि आजही चकाकी कायम असलेली मातीची भांडी, दगडाच्या वस्तू, लाकडाच्या कोरीव आणि पाहताच लुभावणार्‍या आकर्षक वस्तू असा कितीतरी मोठा खजिना काळाच्या उदरातून बाहेर येऊन आपल्या समृद्ध आणि सांस्कृतिक इतिहासाची ठळकपणे ओळख पटवून देत आहे.

निरागस नजर आणि जिज्ञासूमन घेऊन या संग्रहालयात गेलेल्याप्रत्येकासोबत हा वारसा अगदी मनमोकळेपणानं संवाद साधतो. त्यासाठी किमान एकदा भव्यदिव्य इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्या अंतरंगातसामावून उभारलेल्या रामलिंगअप्पा लामतुरे वस्तुसंग्रहालयास किमान एकदा तरी आवर्जून भेट द्यायला हवी.

0 Shares
टोपलीतला नैवेद्य आणि पालखीचा आडमार्ग तेरमधल्या विटा का तरंगतात?