एक नवी आख्यायिका

संतोष पद्माकर

संत गोरा कुंभारांची कहाणी ऐकल्यावर-वाचल्यावर मनाशी प्रश्न जमा होतात. या प्रश्नांची उत्तरं कुणाला विचारायची, तर थेट गोरोबांना! एका नव्या पिढीच्या कवीनं गोरोबांशी थेट साधलेला हा संवाद आहे, स्वतःचा आतला आवाज कळण्यासाठी.

अहो काका
हा काय नुसता
चिखलच बसला तुडवत
तुमचे लेकरू मेले तरी
नाही तुम्हाला रडवत

हा पृथ्वीचा चेंदामेंदा
कुठून आणले पाणी
कुठले गाढव-घोडे देऊन गेले लिद
ही किती जन्माची घुसळण काका
ही किती युगाची घोळवण

हा पायाखालचा लगदा
नुसताच किती घोळणार?
पटाक पटाक किती वेळा
पाय त्यात फसवणार?

काका हो काका
तुमचा पाय बघा ना चिखलात
नाही जराही माखत
दरवेळी वर काढतानी
दिसतो बाळंतिणीसारखा स्वच्छ
या चिखलाचा एकही कण नाही
तुमच्या पायाला लागत
ही कुठली मळवण म्हणायची
ही कुठली तुडवण म्हणायची

ही कुठली माती
आणि हे कुठले पाणी
अहो पाऊस पडल्या रानात नांगर लगेच नाही चालत
तुम्ही सोडले
वंजुळभर पाणी अन्
बसला सारी दुनिया कालवत
हा कुठला भुस्सा काका?
ए-हवी कुणी ठेवला असता का?
तुम्ही घातला की हो इथं
कालवणात भाकर कुस्करतात तसा

आणि हे तयार चिखलाचे
किती डोंगर काका रचलेत गावोगावी
या भक्तीच्या गोळ्यांना तुम्ही
वर कळस लावाल
तर खाली पांडुरंगाचं मंदिर फुटंल आपोआप
गाभार्‍यात तिथं देव आपसूक येईल
पेक्षा तुमच्या पायाखाली यायचं बघंल
तो आधी
त्याचं अंग तुडवून घ्यायचं असंल त्याला
लक्ष्मीपण थकलीचहे त्याचे पाय चेपचेपू

आणि नुसतेच पाय काय
काका तुम्ही रगडाल त्याचे सर्वांग चिखलागत
मग देवही दिसल खरोखर देव असल्यागत

पायी तुडविल्याबिगर मोठेपणा
कुणाला मिळाला?
हे त्याचे गणित तोच पाहिल आज उलटे तपासून
किंवा देव आकाशीचा पतंगासारखा वरवर राहणारा
घ्या खाली एकदाचा हापसून

आणि नुसतेच चिखलाचे डोंगर कशाला ठेवता मळून?
एखाद दिवशी जातील सारे वाळून
पण नाही
तुमच्या पायाखाली यायची
सूर्याला भीती वाटंल
म्हणून तो
वार्‍याला दिशा बदलायला लावंल
आणि सोता डोळे झाकंल

ये बात सलामत तो
डोंगर पचास!
काका
आपला कारखाना कधी सुरू करायचा
मडकी घडू सुगडी रचू
माठ करू आवे लावू
संक्रातीला सुगडी
आखाजीला करा-केळी
श्रावणात बैलगायी
भादव्याला गणपती

हे सालभरचं गाडं काका
गुरुगुरु चालवायचं
पण सांगा सांगा नुसतं
चिखल मळणं कधी सोडायचं?

डोक्यावरचा पटका हातानं सावरीत
काळेकुळे काका बोलले मिशी चाचपीत

लेकरा गाडगी मडकी
कुणी पण घडंल
चिखल आधी मळला पाहिजे
असला मळला पाहिजे
असला मळला पाहिजे
हातात गोळा घेताच
आतला आकार कळला पाहिजे

मी आयत्या पीठावरचा नागोबा चितारेल
सर्द झालो काकांना ऐकून
पाण्याने ढेकूळ विरघळावे
तसा गेलो विरघळून
काकांच्या पायाखालची
माती गेलो होऊन

(‘पिढीपेस्तर प्यादेमात’ या पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या कवितासंग्रहातून साभार)

0 Shares
तुझे रूप चित्ती राहो गोरोबांच्या संदर्भखुणा