गोरोबांचे अभ्यासक

अभिजित सोनावणे

गोरोबांचं एकूण संत परंपरेतलं स्थान अधोरेखित करण्यात अभ्यासकांचा मोठा वाटा आहे. गोरोबांचे अभ्यासक खूप आहेत. पण स्वतंत्रपणे पुस्तक लिहून, संशोधन करून ज्यांनी गोरोबांची मांडणी केली आणि गोरोबांबद्दलच्या अभ्यासाची वाट पुढं नेली, त्यातले हे शिलेदार.

डॉ. प्रकाश कुंभार

प्रकाश कुंभार यांचं ‘संत गोरा कुंभार चरित्र’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. गोरा कुंभार यांच्या आयुष्यातील घटनांमधल्या नेमक्या अर्थापर्यंत पोचता यावं आणि वाचकांना नवी दृष्टी मिळावी हा प्रयत्न प्रकाश कुंभार यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. २००७मध्ये हे पुस्तक प्रसिद्ध झालं. गोरा कुंभारांसह भारतभरात कुंभार समाजात २१ संत प्रसिद्ध आहेत. त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याचंही महत्त्वाचं काम प्रकाश कुंभार यांनी केलं आहे. ‘कुंभार समाज : इतिहास आणि परंपरा’ या पुस्तकात हा विषय त्यांनी हाताळला आहे.

 

 

वेदकुमार वेदालंकार

वेदकुमार वेदालंकार हे हिंदीचे प्राध्यापक. रामकृष्ण परमानंद महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचं काम केलं आहे. गोरा कुंभार यांचं जीवनचरित्र, तेरचा इतिहास, वारकरी परंपरेची माहिती देणारं वेदकुमार वेदालंकार यांचं ‘म्हणे गोरा कुंभार’ हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या निर्मितीची कहाणी रंजक आहे. उस्मानाबादहून दरवर्षी गोरा कुंभार यांची पालखी जाते. या पालखीचं स्वागत करण्याची परंपरा नव्हती. पण रामानंद तिवारी जिल्हाधिकारी असताना त्यांनी ठरवलं की पालखी आणि दिंड्यांच्या स्वागताची एक चांगली परंपरा आपण सुरू करूयात. ही परंपरा सुरू होताना गोरा कुंभारांवर एखादी पुस्तिका प्रकाशित करावी, असं त्यांना वाटलं आणि त्यांनी ती जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि हे पुस्तक जन्माला आलं. गोरा कुंभारांचे अभंग आणि त्याचा भावार्थ असं या पुस्तकाचं स्वरूप आहे.

 

 

दीपक खरात

गोरोबा काका यांच्या तेर या जन्मभूमीत जन्मलेले दीपक खरात हे गोरोबा काकांच्या सेवेत अगदी लहानपणापासूनच आहेत, असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. आत्या एस. बी. खरात यांच्यामुळं वारकरी संप्रदायाची ओळख झाली. तेरमध्ये वाढल्यामुळं गोरोबांसह सर्वच संतांच्या विचारांचा जवळून परिचय झाला. शालेय जीवनापासूनच कीर्तन, प्रवचन द्यायला दीपक खरात यांनी सुरवात केली. योगायोग असा की त्यांचं पहिलं कीर्तन हे गोरोबा काकांच्या समाधी मंदिरातच झालं. महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांत खरात यांनी कीर्तनं, प्रवचनं आणि व्याख्यानं दिली आहेत. कीर्तन, प्रवचनाला जोडूनच समांतरपणे त्यांच्या लिखाणाचीही वाटचाल सुरू झाली. विद्यापीठीय शिक्षण घेत असताना ‘एवढ्या मोठ्या संताचं तुमचं गाव पण एकही पुस्तक गोरोबांवर मिळत नाही.’ असं वाक्य त्यांच्या अनेकदा कानी पडायचं. त्याबद्दल खंतही वाटायची. ही उणीव भरून काढावी या दृष्टीनं गोरोबांवर अभ्यास सुरू झाला. २००३मध्ये ‘वैराग्यमहामेरू’ या ध्वनिमुद्रिकेच्या रूपानं पहिल्यांदा गोरोबा काका हा विषय प्रकाशित केला. त्यानंतर ‘वैराग्यमहामेरू’ ही गोरोबांवर आधारित चरित्रात्मक कादंबरीही प्रकाशित झाली. पाठोपाठ उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रासाठी श्री वैराग्यमहामेरू हे ऑडिओ बुकही त्यांचं प्रकाशित झालं. प्राचीन तेरचा इतिहास सांगणारं पुस्तक ई-बुक स्वरूपात ‘तगर ते तेर’ या नावानं प्रकाशित झालं. संत गोरोबांबद्दल संत मंडळींनी लिहिलेल्या अभंगांवर ‘अभंगरूप संत परीक्षक गोरोबा काका’ हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालं. खरात यांनी केलेल्या एकूण प्रकल्पांपैकी १३ प्रकल्प हे गोरोबा काकांशी संबंधित आहेत. गोरोबांवर अधिकाधिक लिखाण करणारे ते महाराष्ट्रातील कदाचित एकमेव लेखक-संशोधक असावेत. ‘श्रीसंत गोराबा काका अभंग भावदर्शन’ या कार्यक्रमातून ते गोरोबांच्या चरित्राची मांडणी खेडोपाडी करत आहेत. संत परंपरा हा जरी त्यांच्या सगळ्या मांडणीचा केंद्रबिंदू असला तरीही तेर या गावचे असल्यामुळं गोरोबांबद्दलची अधिकची आस्था त्यांच्या मनात आहे. संत वाङ्मयाचा आजच्या आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे आणि त्यातून काय शिकायचं, काय बोध घ्यायचा हेच त्यांच्या मांडणीचं आशय केंद्र राहिलं आहे.

विलास तुळे

विलास तुळे हे मूळचे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातले. काठापूर हे त्यांचं गाव. सध्या ते श्रीरामपूर इथल्या रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आश्रमशाळा (मोखाडा) इथं मराठी विषयाचं अध्यापन करतात. त्यांचं पदव्युत्तर शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालं. त्यानंतर त्यांनी त्यांचं एम.फिल. पूर्ण केलं. ‘संत गोरा कुंभार : व्यक्ती आणि वाङ्मय’ हा त्यांचा एमफिलचा विषय होता. विशेष म्हणजे संत गोरा कुंभार यांच्यावर एम.फिल.ची पदवी घेणारे ते पहिलेच विद्यार्थी आहेत. तुळे यांचा जन्म कुंभार समाजात झाला. त्यांच्या घरी कुंभारकाम व्हायचं. परिस्थिती अत्यंत गरीब. पण शिक्षण घेण्याची त्यांची धडपड पाहून गृहउद्योग लिज्जत पापडचे संचालक सुरेश कोते यांनी त्यांना आधार दिला. त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलून कुंभार समाजातल्या या संशोधकाला पुढं आणलं. अठरापगड जातीतल्या संतांवर लेखन-संशोधन झाल्याचं तुळे यांचं निरीक्षण होतं. पण त्यात गोरा कुंभार यांच्या वाङ्मयावर अशा पद्धतीचं काम यापूर्वी झालं नव्हतं. ही उणीव भरून काढण्यासाठी डॉ. आनंद घातुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुळे यांनी आपलं संशोधन पूर्ण केलं. गोरा कुंभार यांच्यावर पहिल्यांदाच संशोधन होत असल्यानं संदर्भ मिळवणं तुळे यांना अवघड गेलं. पण डॉ. र. बा. मंचरकर, डॉ. आनंद यादव,  आळंदीचे कुंभार गुरुजी, डॉ. बाबुराव उपाध्ये यांची या कामी मोलाची मदत झाली. १९९९ मध्ये ‘अ’ श्रेणीसह त्यांचं एम.फिल. पूर्ण झालं. या प्रबंधिकेत काही मजकुराची भर टाकून त्याचं पुस्तक ते लवकरच प्रसिद्ध करणार आहेत. गोरोबांच्या वाङ्मयावर संशोधनात्मक काम करता आलं, याचं आत्मिक समाधान त्यांना आहे.

प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये

मूळचे कोपरगावातल्या आँचलगावचे असणारे आणि सध्या श्रीरामपूरमध्ये स्थायिक असलेल्या डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी लिहिलेल्या बहुतेक साहित्यकृतींचं केंद्रस्थान हे कुंभार समाज हेच आहे. ‘संत गोरा कुंभार : वाङ्मय दर्शन’ ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमातील आवश्यक संदर्भ ग्रंथांच्या यादीतही या पुस्तकाचा समावेश करण्यात आलेला आहे. गोरा कुंभार यांचं संत मंडळींमध्ये महत्त्वाचं स्थान असूनही वाङमयात त्यांचं दर्शन फारसं झालेलं नाही. तसंच कुंभार समाजाच्या वाट्याला दारिद्र्य आणि दुर्लक्षितपणा सातत्यानं येत गेलं आहे. गोरा कुंभारांच्या संदर्भातील तेर आणि ढोकी ही दोन तीर्थस्थानं दुर्लक्षित राहिली. शासनानं अलीकडेच निधी मंजूर करून काही कामं या भागात सुरू केली आहेत. पण गोरा कुंभार हा विषय मागे पडत असल्यानं ही अनास्था असल्याचं त्यांचं निरीक्षण आहे. त्यामुळंच गोरा कुंभार, कुंभार समाज आणि त्यांचं जगणं हे विषय हाताळण्याला उपाध्ये यांनी प्राधान्य दिलं. पोरका हे आत्मचरित्र, काळोखातील दिवे, परवड या दोन कादंब-या, कुंभारवाड्यातील कविता, निवडुंगाची फुलं, कष्टाची फळं या आणि अन्य कवितासंग्रहातून कुंभार समाजाचं चित्रण त्यांनी केलं आहे. तसंच विविध नियतकालिकांतूनही त्यांनी गोरा कुंभार आणि कुंभार समाजाबद्दल लिखाण केलं आहे. करत आहेत. कुंभार समाजातील नवी मंडळीही कुंभारांचं जगणं व्यक्त करू लागली आहेत. सगळ्यात पहिल्यांदा कादंबरी रूपात कुंभार समाजाचं चित्रण ग. दि. माडगूळकर यांनी ‘आकाशाची फळं’ या पुस्तकातून केलं होतं. पण अलीकडे कुंभार समाजातील नवी मंडळीही कादंबरीतून कुंभार समाजाचं चित्रण करत आहेत. रामकृष्ण जगताप यांची ‘पोरका बापू’ ही आत्मकथनात्मक कादंबरी त्याचंच उदाहरण आहे. असं असलं तरीही कुंभार समाजाच्या लिहित्या मंडळींना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं उपाध्ये म्हणतात. शेवगाव तालुक्यातल्या राजेंद्र काळे या कवीनं दहा वर्षांपूर्वी ‘कुंभार समाजाचं जगणं’ हा कवितासंग्रह लिहिला. मात्र आर्थिक पाठबळाअभावी तो अजूनही प्रकाशित होऊ शकला नाही. याबाबत खंत ते व्यक्त करतात.

भक्ती, शक्ती आणि कर्म याचं प्रतीक म्हणजे गोरा कुंभारांसह अन्य कुंभार समाजातील संत. या सर्व संतांचा आढावा घेणारं ‘भारतीय कुंभार समाजातील संत’ हे उपाध्ये यांचं पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

कुंभश्री, कुंभकार मित्र, कुंभकार दर्शन, कुंभकार भारत, कुंभार दीप ही कुंभार समाजाची नियतकालिकं. पण आर्थिक पाठबळाअभावी पुण्यातून निघणारं ‘कुंभश्री’ सोडलं तर यातील बाकी नियतकालिकं बंद पडली आहेत किंवा कसे याची नेमकी माहिती मिळत नाही, असंही उपाध्ये यांनी सांगितलं.

विलास राजे

परिवर्तनवादी विचारांचे अभ्यासक, विचारवंत आणि उत्तम वक्ता अशी विलास राजे यांची ओळख आहे. त्यांच्यात असलेल्या वक्तृत्वाच्या गुणामुळंच त्यांनी गोरा कुंभार यांच्यावर लिहिलेल्या ‘जीवनमुक्त’ या कादंबरीचा जन्म झाला. ते स्वतः कुंभार समाजाचे असल्यामुळं गोरा कुंभार यांच्याबद्दलची माहिती त्यांना होतीच. पुण्यात त्यांना अनेक ठिकाणी कीर्तन ऐकण्याची संधी मिळाली. कीर्तनातून गोराबा काका कळल्यावर त्यांच्याबद्दलची उत्सुकता मनात जागृत झाली. त्याच दरम्यान प्रजापतींच्या एका कार्यक्रमात त्यांना भाषण करण्याची संधी मिळाली. त्यांचं वक्तृत्व ऐकून त्यांच्या मित्रानं हिंदीमध्ये गोरोबा मांडण्याचा प्रस्ताव ठेवला. गोरोबांचा अभ्यास झपाट्यानं सुरू केला. संदर्भ जमवले आणि हिंदीतून गोरोबा मांडायला सुरुवात केली. पण हिंदीतून गोरोबा आकार घेत नव्हते. त्यामुळं त्यांना वाटलं मराठीतून लिहूया. जमलं. आणि ३००हून अधिक पृष्ठांची ‘जीवनमुक्त’ कादंबरी साकार झाली. ही कादंबरी लिहिल्यानंतर कथा, ललित, कादंबरी, पुण्याचा इतिहास या पद्धतीच्या लिखाणात विलास राजे रमले. आता त्यांना पुन्हा गोरोबा खुणावत आहेत. गुजरात, राजस्थानसह अन्य हिंदी भाषिकांसाठी ५०-६० पृष्ठांचं संक्षिप्त चरित्र ते सध्या लिहीत आहेत. तसंच ‘जीवनमुक्त’ कादंबरीचा हिंदी अनुवादही पूर्ण झाला असून, ते चांगल्या प्रकाशकाच्या शोधात आहेत. गोरोबांच्या अभंगांवर सध्या ते विस्तृतपणे अभ्यास करत आहेत. गोरोबांसह अन्य वारकरी संतांनी अभंगरचनांमधून जे विचार मांडले त्यातलं साम्यपण नेमकं काय आहे, याचा शोध ते सध्या घेत आहेत.

प्रा. डॉ. धों. दो. कुंभार

‘विठ्ठलाच्या संत मेळाव्यात श्री संत गोरा कुंभार’ हे प्रा. डॉ. धोंडिराम कुंभार यांचं पुस्तक. या पुस्तकात अकरा प्रकरणं आहेत. गोरोबा कुंभारांचे थोडेच अभंग उपलब्ध आहेत. पण त्यात आत्मसाक्षात्कार, योग सामर्थ्य असे अनुभूतीचे विषय हाताळले आहेत. त्यांच्या अनुभूतीच्या अभिव्यक्तीचा आविष्कार म्हणजे हे अभंग. या अभंगांचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रा. डॉ. धोंडिराम कुंभार यांनी या पुस्तकातून घेतला आहे.

 

 

 

रामलिंग कुंभार

रामलिंग कुंभार हे मूळचे सांगलीचे. नंतर मुंबईत स्थायिक झाले. ते शासनाच्या गॅझेटिअर विभागात संशोधन अधिकारी होते. इतिहास आणि संशोधनाची त्यांना मुळातच आवड. नोकरी करताना अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांत त्यांनी मोलाचं योगदान दिलं. निवृत्तीनंतर मात्र ते आपल्या आवडीच्या लेखनाकडे वळले. कुंभार समाजाचा इतिहास, प्राचीन तेर आणि संतश्रेष्ठ गोरा कुंभार, दे. भ. रत्नप्पा कुंभार यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, भारतातील मुस्लिम कुंभार अशा कुंभार समाजातील महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी आपल्या संशोधक वृत्तीनं प्रकाश टाकला. सौंदतीची यल्लम्मारेणुका, गोरा कुंभार, धांडोळा : कुंभारांचा भाग १ व २, देशभक्त रत्नाप्पा, मराठ्यांचं आरमार ही पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. २०१३मध्ये त्यांचं निधन झालं.

0 Shares
वेदांपेक्षा जुनं कुंभारकाम ओढ काकांच्या यात्रेची