ओढ काकांच्या यात्रेची

धनंजय झोंबाडे

चैत्र महिन्यातल्या वद्य एकादशीला गोरोबा काकांची तेरला यात्रा भरते. यात्रेचं आधीचं हवंहवंसं वाटणारं स्वरूप काही वर्षांत बरंच बदललंय. पण काकांकडे धाव घेणारं मन मात्र अजूनही शाबूत आहे.

माझं गाव सांज. तेर पासून हे गाव दहा किलोमीटर अंतरावर आहे. असं असलं तरीही तेर हे गाव आम्हाला सगळ्यात जवळचं. या गावाचं आणि आमचं एक नातंच जुळलं आहे. ते जोडणारा दुवा म्हणजे तेरची यात्रा. चैत्र महिन्यातल्या वद्य एकादशीला ही यात्रा नित्यनेमानं वर्षानुवर्ष भरते आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून भाविक येतात.

गोरोबा काकांचा स्पर्श तेर गावाला झाल्यानं हे गाव त्यांच्या संदर्भानंच आज ओळखलं जातं. त्यासाठीच लोक या गावाकडं ओढीनं धाव घेतात. जुने लोक आणि काही दस्तऐवज सांगतात, निजामाच्या काळात तेरला मोठी बाजारपेठ भरायची. या बाजारपेठेच्या आसपास बारा वाड्या होत्या. ही तेरावी वाडी म्हणून या गावाचं नाव, तेर.

गोरोबा काकांच्या आध्यात्मिक परंपरेशी मी वर्षातून दोनदा जोडला जातो. पहिलं म्हणजे तेरच्या यात्रेत आमचे उत्तमी इथले काका पांडुरंग यांच्या भोजनाची पंगत असते. दुसरं म्हणजे गोरोबा काकांची तेर ते पंढरपूर ही पालखी आमच्या गावातून जाते. परतीच्या प्रवासातला एक मुक्काम आमच्या गावात असतो. तेरची यात्रा आणि पालखी असा वर्षातून दोन वेळा काकांच्या आध्यात्मिक परंपरेशी मी जोडला गेलो आहे.

तेरच्या यात्रेला एक परंपरा आहे. इतिहास आहे. वारसा आहे आणि वयलही आहे. त्यात श्रद्धा, भक्ती याबरोबरच बरंच काही आहे. तेरमध्ये गोरोबाकाकांचं मोठं मंदिर आहे. या मंदिराच्या समोर मोकळ्या जागेत आणि मोकळ्या जागेला लागूनच असणार्‍या एका शेतकर्‍याच्या शेतात ही यात्रा भरते.

या यात्रेच्या खूप आठवणी आहेत. माझ्या लहानपणीची म्हणजे फार जुनी नाही तर पंचवीसेक वर्षांपूर्वीची यात्रा वेगळी होती. गावोगावी जत्रेला जाणार्‍या मंडळींची लगबग असते तशी आमच्या गावातही या यात्रेच्या निमित्तानं असायची. काही माणसं सायकलनं जायची, काही एसटीनं, काही बैलगाडीनं तर काही पायीही! आम्ही मात्र चालतच यात्रेला जायचो. बैलगाडीत बसायला गेलं की वयस्कर मंडळी म्हणायची, ‘तुमचं वय चालायचं हाय, अजून पाच मैल तर हाय जत्रा. चाला गपगुमान’.मग माझ्याबरोबर असणारा अमल्या, इज्या, शख्या, बुब्या, सोम्या, सम्या, भाव्या, बबल्या, दिल्या, बाल्या, सुध्या, जिब्या अशी आमची बटालियन झपझप पावलं टाकत तेरच्या दिशेनं चालू लागायची. तेरला पोचायचो तेव्हा दिवस मावळतीकडं गेलेला असायचा.

यात्रा संध्याकाळी ऐन रंगात आलेली असायची. मग आमच्या मित्रमंडळीत वाद सुरू व्हायचा की अगोदर जायचं कुठं? कुणी म्हणायचं, खाऊच्या गल्लीकडे. कुणी म्हणायचं, खेळण्याच्या गल्लीकडे. कुणी कापडं मिळतात तिथं तर कुणी कुणी पेढा, गारेगार, पुंगी असं काय काय मिळतं तिथं जाऊया म्हणायचे. सगळ्यांचं मत विचार घेऊन आमचं तंबूतल्या पिच्चरकडे जाऊया यावर एकमत व्हायचं. एकाच वेळी १४ ते १६ पिच्चर सुरू असल्यानं गरम भजी, गारेगार, पेढा असं खाणं घेऊन आवडीचा पिच्चर ज्या तंबूत लागला आहे, तिथं प्रत्येकजण वळायचा. बाहेर आल्यावर मात्र शेव चिवडावाल्या अनिताच्या दुकानासमोर भेटायचं, अशी खूण ठरलेली असायची. त्यावेळच्या तंबूंमध्ये व्यवस्था फारशी नसायची. पिच्चरचा पडदा तेवढा सुरक्षित असायचा. बाकी मातीच्या ढेकळातच बसून पिच्चर पाहावा लागायचा. ढेकळाची जागा पार सपाट होऊन जायची, इतकी गर्दी व्हायची. याच तंबूत आम्ही दादा कोंडके, निळू फुले, अलका कुबल, अशोक सराफ, धर्मेंद्र, विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, जयाप्रदा, मिथुन चक्रवर्ती, नाना पाटेकर यांचे सिनेमे पाहिलेत.

पिच्चर पाहून मग जेवणासाठी ‘मोफत अन्नदान’ असलेल्या ठिकाणी जायचं. जेवण झालं की पुन्हा तंबूतला पिच्चर. रात्री मिळेल तिथं विश्रांती घ्यायची. सकाळी उठल्यावरही जत्रेत फिरणं वगैरे व्हायचं. पण त्यातही तंबूतला पिच्चर बघायचं नियोजन असायचंच. पण परतीची वेळ झाली की मग काकांचं दर्शन घ्यायचं. नारळ फोडायचा. प्रसादाचे पेढे घ्यायचे. भावा-बहिणीनं सांगितलेलं खेळणं घ्यायचं आणि गावाकडं आमची पदयात्रा निघायची.

या यात्रेची मजाच वेगळी असायची. पोतराज, जादूगार, गारेगारवाले, प्रतिष्ठित मंडळी, भाविक, बायाबापड्या, लेकरं-पोरं पोरी अशा सगळ्यांनी मैदान गच्च भरून जायचं. मंडप, गाणी, स्पीकर्स यांचीही त्यात भर असायची. ही यात्रा पंधरा दिवस असायची. कुस्त्यांचे फड रंगायचे. त्यासाठी राज्यभरातले मल्ल यायचे. ही तेरची यात्रा अनेकांच्या जीवनात वेगवेगळ्या अर्थानं आनंद देणारी आहे. यात्रेनं सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पाऊलखुणा निर्माण केल्या आहेत. काहींच्या जीवनात आनंदाचं, प्रबोधनाचं, उत्साहाचं आणि खेळीमेळीचं वातावरण तयार करण्यास ही यात्रा कारणीभूत ठरली आहे.

परतीचा प्रवासही रम्य असायचा. मज्जा, धमाल, बत्तासे, बुंदी, भजी, कलिंगडाचा रस अशा यात्रेतल्या गोष्टी आठवत आणि पुढच्या वर्षी यात्रेत काय काय धमाल करायची अशी चर्चा रंगवत आम्ही गावात पोचायचो.

या यात्रेबद्दलचं कुतूहल आजही कायम आहे. त्यामुळंच या यात्रेत आजही कधीतरी जाणं होतं. तीस वर्षांनंतर तेरच्या यात्रेचं आजचं चित्रं पूर्ण बदललं आहे. जागतिकीकरण, उदारीकरण आणि तंत्रज्ञानाचा प्रभाव या यात्रेवर पडला आहे. मनोरंजनाची साधनं आता मोबाईलद्वारे थेट हातात आल्यानं यात्रेकडे येणारा लोकांचा कल काहीसा कमी झालाय. यात्रा अनुभवायला पूर्वी संपूर्ण कुटुंब सहभागी व्हायचं आता मात्र कुटुंबातला एखादा सदस्यच हजेरी लावतो. तोही दर्शन घेतो. नारळ फोडतो. थोडीशी खरेदी करतो आणि दुपारच्या एसटीनं घरी परततो. यात्रेत एखादाच पिच्चरचा तंबू हजर असतो. खाऊची दुकानंही कमी. पदार्थही बदलले आहेत. काकांच्या समोर उभं राहिलं की अगदी दोन मिनिटात फोटो काढून देणारे फोटोग्राफर आता दिसत नाहीत. त्याची जागा मोबाईलच्या सेल्फीनं घेतलीय. गारेगारची जागा आईस्क्रिमनं, जुन्या खेळण्यांची जागा चायनीज खेळण्यांनी, साखरी पेढ्याची जागा कंदी पेढ्यानं, बर्फीची जागा सोनपापडीनं, बैलगाडीची जागा स्कॉर्पिओ-इनोव्हा-बुलेटनं घेतली आहे. सध्याचा काळ जाहिरातींचा आहे, त्यामुळं फ्लेक्समधून शुभेच्छांचा आणि स्वागताचा वर्षाव होतो. ते लावण्यावरून हमरीतुमरीही होत आहे. अन्नदान कोणाकडून हे सांगणारेही फ्लेक्स उभे राहत आहेत. ‘चोरांपासून सावध राहा’, ‘आपलं सामान सांभाळा’, ‘दर्शनासाठी रांगेत या’ असं सांगणारे सरकारी फ्लेक्स अलीकडेच दिसू लागले आहेत. मंदिराच्या विकासासाठी सढळ हातानं मदत करा, असं सांगणारा आणि देणग्या स्वीकारणारा टेबल काल होता, तसा आजही पाहायला मिळत आहे. पण मंदिराचा विकास हरवल्यासारखी अवस्था आहे.

पंधरा दिवसांची यात्रा आता केवळ चार दिवसांवर आलीय. काल्याचं कीर्तन संपल्यावर काला म्हणजे प्रसाद वाटला जातो आणि यात्रा पांगते. आपल्या सवडीनुसार लोकं येतात. जो ज्या दिवशी येतो त्याच दिवशी त्याची यात्रा. मोबाईलवर काढलेले सेल्फी कुणी व्हॉट्सअ‍ॅप कुणी फेसबुकला शेअर करतो. आणि यात्रा पसरत जाते.

यात्रेची परंपरा आणि होत गेलेले बदल समजावून घेण्यासाठी अनेकांना भेटलो. शिक्षक खंडू क्षीरसागर, पानवाडीचे पोलीस पाटील आणि पत्रकार सुभाष कदम, दै. संघर्षचे सहसंपादक शाम गंगावणे, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, नियमित वारीला जाणार्‍या विमलबाई चांदणे, न चुकता यात्रेला जाणारे साहेबराव चांदणे, यात्रेत वर्षानुवर्ष खाऊचे दुकान लावणारे हनुमंत रसाळ, गारेगारवाले दादा रसाळ, भोजनाची पंगत दरवर्षी करणारे पांडुरंग जाधव, यात्रा काळात पाणी वाटणारे अमोल चिलवंत, मिरवणुकीचं संरक्षण करणारे नानासाहेब भक्ते, आनंदानं स्वच्छता करणारे रणसम्राट ग्रुपचे नवनाथ नाईकवाडी अशा वेगवेगळ्या स्तरातील लोकांनी सध्याच्या यात्रेच्या स्वरूपाबद्दल सुधारणाच सुचवल्या.

स्थानिक गावकर्‍यांनी काकांच्या मंदिराकडं जाताना असलेल्या दोन दारूच्या दुकानांवर बोट ठेवलं तर या यात्रेत येणार्‍या भाविकांची राहण्याची सोय व्हावी, यासाठी एकही लॉज आणि जेवणासाठी प्रशस्त हॉटेल नसल्याचं नजरेस आणून दिलं. हे सोडा पण साध्या सार्वजनिक शौचालयाचीही व्यवस्था नसल्याचं गावकर्‍यांनी सांगितलं. यात्रा आयोजित करण्याची जबाबदारी याच मंदिर देवस्थान समितीकडे आणि ग्रामपंचायतीच्या यात्रा व्यवस्थापन समितीकडे असते. पण त्यांच्या कामाबद्दल आणि एकूण नियोजनाबद्दल जनमानसांत नाराजी दिसली.आध्यात्मिक ठिकाणी मटका, दारू, जुगार, पाकुळी असे धंदेकशाला हवेत? अशी व्यथा प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या तानाजी पिंगळे यांनी वारंवार बोलून दाखवली.

यात्रा अंतर्बाह्य बदलली असली तरीही या यात्रेत येण्याची, गोरोबांना भेटण्याची भाविकांची ओढ जराही कमी झालेली नाही. तुळजापूर, लातूर, कळंब, बीड, उदगीर, उमरगा, औसा, परंडा, वाशी, भूम यासह बर्‍याच ठिकाणांहून यात्रेसाठी ‘स्पेशल बस’ सोडल्या जातात. यात्रा काळात या बसेस भरून गर्दी यात्रेसाठी ये-जा करते. ही गर्दी पाहिली की मन मी अनुभवलेल्या जुन्या काळातल्या यात्रेपाशी जातं. आजचं बदललेलं चित्र वास्तव असलं तरीही ते आभासी वाटत राहतं. बदललेली यात्रा पाहताना शाळेच्या अभ्यासक्रमात वाचलेली कवी दासू वैद्य यांची कविता आठवते,

आता जत्रा फारशी भरतच नाही,

भरलीच तर मुलं पुंग्या विकत घेत नाहीत

मुलं घेतात प्रकाशमान होताना धडाडणारी बंदूक.

0 Shares
गोरोबांचे अभ्यासक कैवल्याचं चांदणं