कैवल्याचं चांदणं

नामदेव अंजना

संत गोरा कुंभारांची जीवन कहाणी संगीत नाटकातून गुंफणं अवघड. पण हे आव्हान पेलून ‘संगीत संत गोरा कुंभार’ हे नाटक गाजलं. अशोकजी परांजपे, जितेंद्र अभिषेकी, फैय्याज, दिलीप कोल्हटकर, बाबा पार्सेकर या मोठ्या नाट्यकर्मींनी साकारलेलं हे नाटक मैलाचा दगड ठरलं.

‘संगीत संत गोरा कुंभार’ असं नाटकाचं पूर्ण नाव. नुसतं नाटक नाही तर संगीत नाटक. ४० वर्षांपूर्वी म्हणजे १९७८ साली हे नाटक रंगमंचावर अवतरलं. या नाटकाबद्दल गुगल महाराजांनाही फार काही माहीत नव्हतं.

नाटक म्हटलं की सर्वात आधी लेखक आणि दिग्दर्शक शोधून काढावे लागतात. मीही तेच केलं. दिलीप कोल्हटकर हे दिग्दर्शक आणि अशोकजी परांजपे हे लेखक होते. अशोक परांजपे जाऊन काही वर्ष लोटली होती आणि दिलीप कोल्हटकर यांचं तर हा लेख लिहायला घेण्याच्या अगदी दोन महिन्यांपूर्वीच निधन झालं होतं. नाटकात काम केलेल्यांपैकी फैय्याजना भेटण्याचं नक्की केलं. नाटकाचे सुरुवातीचे काही प्रयोग साहित्य संघानं केले होते. थेट गिरगावात साहित्य संघ गाठलं. तिथं नाट्यशाखा आहे. त्यांच्याकडे नाटकांचा इतिहास जपला जातो. मात्र तिथंही नाटकाविषयी फार काही गवसलं नाही. त्यामुळं सारी भिस्त फैय्याज यांच्या मुलाखतीवरच येऊन पडली.

याच काळात प्रमोद पवार आणि संदीप राऊत असे दोन आणखी संदर्भ हाती लागले. आधी प्रमोद पवार, नंतर संदीप राऊत यांनी ‘संत गोरा कुंभार’ या मूळ नाटकाला पुनर्जीवित केलं. त्यांच्याशी फोनवर बोललो. नंतर प्रत्यक्ष भेटलोही. गोरा कुंभारांबद्दल त्यांना खूप काही सांगायचं होतं. नाटकाचे मूळ नेपथ्यकार बाबा पार्सेकरांशीही बोललो. असे एकेक संदर्भ सापडत गेले आणि ‘गोरा कुंभार नाटका’ची माझी शोधयात्रा सुरू झाली.

यात्रेची सुरुवात अर्थातच नाटककार अशोकजी परांजपेंपासून. माझ्या मनात अनेक प्रश्न होते. इतर अनेक संत असताना, गोरा कुंभारच का? याच संतावर नाटक का लिहावं वाटलं असावं? तत्काळ अशोकजी परांजपे यांच्याबद्दल माहिती मिळवायला सुरुवात केली. पुन्हा गुगल. कळलं, त्यांनी २००९ साली औरंगाबादेत आत्महत्या केली. मला धक्का बसला. माझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर मी त्यांच्या कारकिर्दीत शोधू लागलो.

अशोकजी परांजपे मूळचे सांगलीतील हरिपूरचे. मात्र त्यांची कारकीर्द मुंबईतलीच. त्यांची नाळ ग्रामीण भागाशी जोडली गेली होती. त्यांना कायमच शेतावरची बाभळीची सावलीच अधिक गारेगार वाटायची. लोकसंस्कृती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. आपल्या वस्तीबाहेरही न पडू शकलेल्या असंख्य लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी अशोकजी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात फिरायचे. लोककला जागती ठेवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. ते ‘ग्रामसंस्कृती आणि नागरसंस्कृती’, ‘लोकरंगभूमी आणि नागर रंगभूमी’ यांच्या मधला दुवा होते. खरं तर अशोकजींचा पिंड गीतकाराचा. त्यांनी भावगीत, अंगाईगीत, भक्तीगीत, गण-गवळण, नाट्यगीत, नाटक असं सगळं लिहिलं. त्यांच्या प्रतिभेला बांध मान्य नव्हता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ते गोष्टीवेल्हाळ होते. ऐकणार्‍यानं तल्लीन व्हावं अशा रसाळ भाषेत ते गोष्टी सांगत. त्यांच्या नाट्यलेखकाचं मूळ इथं असावं.

लोकसंस्कृतीविषयी आत्मीयता, अध्यात्माची ओढ, गोष्टी वेल्हाळ स्वभाव यात ‘संत गोरा कुंभार’ हे संगीत नाटक लिहिण्यामागची प्रेरणा असावी. गोरोबांनी आपल्या कामात विठ्ठल शोधला. ते अशोकजींना अधिक भावलं असावं. असं त्यांच्या जवळची मंडळी सांगतात. आपल्या कामावर निस्सीम प्रेम करणार्‍या अशोकजींबाबत ते अगदी खरं वाटतं.

हे नाटक प्रत्यक्ष रंगमंचावर आणलं दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांनी. नाटक म्हटल्यावर इम्प्रूव्हायझेशनला अत्यंत महत्त्व. त्यामुळं कोल्हटकरांनी मूळ संहितेत नाटकाला आवश्यक अनेक बारीक सारीक बदल केले. अर्थात, त्या बदलांना अशोकजींची सहमती होतीच. कोल्हटकर अभ्यासू दिग्दर्शक म्हणून ओळखले जात. विजया मेहतांसोबतत्यांनी साहाय्यक दिग्दर्शकम्हणूनकाम केलं होतं. नाटक उभंराहण्याआधीच नाटकाचंचित्र त्यांच्याडोळ्यांसमोर तयार असे.दुर्दैवानं हा लेख लिहायला घेण्याच्या दोनच महिनेआधी त्यांचं निधन झालं.

मूळ नाटकाची निर्मिती बी. एन. पालांडे आणि त्यांची पत्नी साधना पालांडे यांनी केली होती. पालांडे दाम्पत्य कालांतरानं गोव्यात स्थायिक झालं.त्यांच्याविषयी कोणतीही माहिती आता उपलब्ध नाही.

या नाटकाला चार चाँद लागले, ते पंडितजितेंद्रअभिषेकीयांच्यासंगीतामुळं अभिषेकीबुवा म्हणजे संगीताच्या दुनियेतलं एक अपूर्व मायाजाल. त्यांनी या नाटकातल्या अभंगांना अतिशय गाडे आणि उठावदार चाली दिल्या. ‘निर्गुणाचा संग’, ‘अवघे गर्जे पंढरपूर’, ‘कैवल्याच्या चांदण्याला’, ‘पाहू द्या रे मज’, ‘केशवाचे भेटी’ अशी एकाहून एक सरस गाणी त्यांनीबांधली. ‘उगी उगी बाळा’ ही अंगाईआणि‘पूर्व दिशा उजळली’ ही भूपाळी अशी दोन्ही गीतंरसिकांना आवडली.

यात गोरोबांचे दोन आणि संतनामदेवांचा एक अभंग आहे. इतर सगळी गीतंस्वत: अशोकजीपरांजपे यांनी लिहिलीत. इतर गाण्यांची जन्मकथा सापडली नसली, तरी ज्या गाण्यानंनाटकाचा शेवट होतो,त्या ‘कैवल्याच्या चांदण्याला’ गाण्याची जन्मकथा रंजक आहे.अशोकपरांजपेंनी रचलेली ही विराणी पंडितजितेंद्रअभिषेकींच्यारचनेमुळे अजरामर झाली. या गीताची जन्मकथा अशोकजींच्या नातेवाईकमंजिरी तिक्का यांनीलिहून ठेवलीयं.

नाटक लिहीत असताना अशोकजी लोणावळा इथल्या अभिषेकींच्या बंगल्यावर होते. तिथं त्यांच्यात गप्पांची बैठक जमली होती. त्यावेळी अभिषेकी म्हणाले, नाटकाचा शेवट अशा गीतानं व्हावा की श्रोते शब्दांत आणि सुरांत भारावून नाट्यगृहातून बाहेर पडले पाहिजेत. त्याने अशोकजींच्या प्रतिभेचं चक्र सुरू झालं. गोरोबांना सगळं ऐहिक प्राप्त झालं होतं. त्याच्यासारखा मुळातच विरक्त असलेला माणूस देवाकडे काय मागेल? तर फक्त मोक्ष म्हणजे कैवल्य. हे कैवल्याचं चांदणं देणारा चंद्र हा प्रत्यक्ष पांडुरंगच असला पाहिजे. मग मनात पक्कं झालं की जीव चकोर आहे. तो चांदण्यासाठी भुकेला आहे.

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्रभाव पांडुरंगा मन करा थोर

आपल्या आवाजानं आणि संगीतानं रसिकांना मंत्रमुग्ध करणार्‍या अभिषेकी बुवांच्या उपस्थितीत एखाद्या गाण्यानं जन्म घ्यावा! काय हवंय शब्दांना आणखी?

नाटकातील कलाकार मंडळीही एकास एक सरस होती. सगळीच संगीत गायन क्षेत्रातील जाणकार होती. मुळात कलाकारांची निवड करताना गायन हाच महत्त्वाचा निकष होता. गोरा कुंभाराची भूमिका प्रकाश घांग्रेकर यांनी केली. तर गोरोबांच्या पत्नीची संतीची भूमिका फैय्याज यांनी केली. अजित कडकडे यांनी नामदेवांची तर रामीची भूमिका साधना पालांडे यांनी केली. नारायण बोडस हे नकारात्मक भूमिकेत होते. एकंदरीत संगीत नाटकाला शोभावी अशी उत्तम ‘स्टारकास्ट’ या नाटकात होती.

तो सारा माहौल समजून घेण्यासाठी फैय्याजना भेटण्याशिवाय पर्याय नव्हता. फैय्याज मनापासून बोलल्या. आजच्या पिढीला या नाटकाविषयी जाणून घ्यायचंय याचा त्यांना आनंद होता.

साहित्य संघात नाटकाची तालीम असायची. दिलीप कोल्हटकर बँकेतून सुटल्यानंतर संध्याकाळी तालीम घेत. त्याच वेळेस फैय्याज विजया मेहता दिग्दर्शित ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकाच्या तालमीतही होत्या. अशोक सराफ बँकेत असल्यामुळं त्याची तालीम सकाळी लवकर व्हायची. त्यानंतर दुपारी बारा वाजता संगीताच्या तालमीसाठी वाट पाहायचे. त्यामुळं सकाळपासून संध्याकाळपर्यंत फैय्याज यांची प्रचंड तारांबळ व्हायची. एकदा त्यांनी हे अभिषेकी बुवांना सांगितलं. अभिषेकी बुवांनी त्यांना अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं, हमीदाबाईची कोठीसारखं नाटक पुन्हा तुला मिळेलही. मात्र या संगीत नाटकातली चार गाणी तुझ्या गळ्यावर एकदा कोरली गेली, तर मराठी रसिक तुला आयुष्यभर गायला सांगतील. ते पुढं खरंही ठरलं. या गाण्यांनी त्यांच्या कारकीर्दीत अत्यंत महत्त्वाचं स्थान मिळवलं. अभिषेकीबुवांच्या दूरदृष्टीची फैय्याज अजूनही आठवण काढतात. मात्र ‘हमीदाबाईची कोठी’ नाटकात काम न केल्याची खंतही त्यांना आहे.

या नाटकात बुवांचे शिष्य पं. अजित कडकडे यांनी संत नामदेवांची भूमिका केली होती. त्यांच्या निवडीची एक आठवण याच नाटकाचे नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांनी सांगितली. कडकडे गाणं शिकण्यासाठी गोव्याहून मुंबईत अभिषेकी बुवांकडे आले होते. तेव्हा नाटकासाठी कलाकारांची शोधाशोध सुरू होती. नामदेवांची भूमिका छोटी असल्यामुळं त्यासाठी कुणी सापडत नव्हतं. कोल्हटकरांनी विचारल्यावर बुवांनी आपल्या शिष्याचं नाव सुचवलं. पण टक्कल करावं लागेल म्हणून कडकडेंनी नकार दिला. विग लावला तरी चालेल अशी समजूत काढल्यामुळं ते तयार झाले. या नाटकात कडकडेंनी गायलेलं नाट्यगीत ‘पाहू द्या रे मज’ आजही त्यांना प्रत्येक मैफलीत गावं लागतं.

नाटकाचं बाबा पार्सेकर यांनी केलेलं नेपथ्यही गाजलं. अनेक दशकांची कारकीर्द असूनही अत्यंत डाऊन टू अर्थ असणारा हा माणूस ‘संत गोरा कुंभार’ नाटकाबद्दलही भरभरून बोलला. गोरोबांच्या काळाला शोभावं असं नेपथ्य असावं, म्हणून पार्सेकरांनी नाटकासाठी खास अभ्यास केला. पाहताक्षणी प्रेक्षकांना गोरोबाचं घर वाटलं पाहिजे, यासाठी त्यांचा आग्रह होता. गावाकडचं घर, मातीचा ढिगारा, रचून ठेवलेली मडकी, चाक, तुळशीचं वृंदावन इत्यादी गोष्टी यात होत्या. ट्रिक सीनसाठी फार टेक्नॉलॉजी तेव्हा नव्हती. विजेच्या मदतीनं जो काही जुगाड करता यायचा तेवढाच.

विठ्ठलभक्तीत तल्लीन झालेल्या गोरोबांनी रांगत रांगत येऊन चिखलात पडलेल्या आपल्या मुलालाही पायानं तुडवलं. त्यानंतर मुलाचा आक्रोशही भान हरपलेल्या गोरोबांना ऐकू आला नाही. हा सीन दाखवण्यासाठी ट्रिक वापरण्यात आल्या. यासाठी पार्सेकरांनीच ट्रिक सीनसाठी प्रसिद्ध असणारे नानासाहेब शिरगोपीकर यांना पुण्याहून आणलं. सुरुवातीच्या काही प्रयोगांसाठी शिरगोपीकरांनी ट्रिक सीन केले, नंतर पार्सेकरांनी ते पुढं सुरू ठेवलं. प्रेक्षकांना ट्रिक सीन खूप आवडत, अशा आठवणी बाबा पार्सेकर सांगतात.

१९७८ साली रंगमंचावर आलेल्या या नाटकाचे पहिले तिन्ही प्रयोग मुंबईतच झाले. पहिला प्रयोग साहित्य संघात, दुसरा शिवाजी नाट्य मंदिर आणि तिसरा रवींद्र नाट्य मंदिरला झाला. हे तिन्ही प्रयोग हाऊसफुल्ल झाले. नंतर त्याचे जवळपास साडेतीनशे प्रयोग झाले. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राभर नाटक गाजलं. गोव्यातही त्याला प्रचंड गर्दी व्हायची. हैदराबादलाही प्रयोग झाला.

फैय्याज सांगतात, हाऊसफुल्ल झाल्यामुळं प्रेक्षकांना परत जावं लागायचं. महाराष्ट्रात ७, १०, १५, २०असे तिकीट दर होते. हेच दर गोव्यात १५, २०, ४०, ५०असे असायचे. तरीही गोव्यात सर्व प्रयोग हाऊसफुल्ल झाले. जास्त पैसे देऊन प्रेक्षक नाटकासाठी थिएटरमध्ये येऊ देण्यासाठी विणवण्या करत. कोकण आणि गोवा ही संगीत नाटकांची पंढरी होती. वारकरी संप्रदायाबाबत महाराष्ट्राला असलेली ओढ आणि त्यात संत गोरा कुंभार यांच्यावर पहिल्यांदाच अशा प्रकारे कलाकृती होत होती. त्यामुळं नाटकाविषयी उत्सुकता होती.

मूळ नाटकाचे जवळपास ३५० प्रयोग झाल्यानंतर प्रभाकर पणशीकरांच्या ‘नाट्यसंपदा’ संस्थेनं त्याच कलाकारांना घेऊन सुमारे ४० ते ५० प्रयोग केले. मात्र त्यानंतर त्यांनीही प्रयोग थांबवले. पुढं मुंबई मराठी साहित्य संघानं २००७ साली हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणलं. त्यात गायक अमोल बावडेकर यांनी गोरा कुंभाराची, अपर्णा अपराजित यांनी संतीची भूमिका साकारली होती. प्रमोद पवार यांनी नाटक दिग्दर्शित केले होते. बाबा पार्सेकरांनीच याही नाटकाचं नेपथ्य केलं होतं. सुमारे सहा वर्ष या पुनर्जीवित नाटकाचे जवळपास २५० प्रयोग महाराष्ट्र आणि गोव्यात केले. त्याविषयी प्रमोद पवार सांगतात, ‘जग कितीही पुढं सरकलं, तरी जुनं ते सोनंच. तरुण पिढीही वारकरी संप्रदायाशी जोडली जातेय. त्यामुळं हे विचार कधीच कालबाह्य ठरू शकत नाहीत.’

२०१६ साली कल्याणच्या आर्यादुर्गा क्रिएशन्सनं हे नाटक पुन्हा पुनर्जीवित केलं. सुनील जोशी यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात शास्त्रीय गायक संदीप राऊत यांनी गोरा कुंभाराची भूमिका साकारली. संदीप राऊत हे वारकरी संप्रदायातले असून कुंभार समाजातले आहेत. त्यामुळं लहानपणापासूनच त्यांच्या घरात संत गोरा कुंभार यांच्या भावभक्तीचं वातावरण होतं. इकॉनॉमिक्समध्ये एमए केलेल्या संदीप राऊत यांनी शास्त्रीय संगीतात गायन विशारद पदवीही मिळवलीय. गोरोबाकाकांवर आपण काहीतरी करायचं ही इच्छा त्यांना पहिल्यापासूनच होती. मूळ नाटकाबद्दल कळल्यानंतर त्यांनी सुनील जोशींच्या सहकार्यानं साहित्य संघाकडून एका वर्षासाठी नाटकाचे अधिकार मिळवले आणि महाराष्ट्रभरात जवळपास पन्नास प्रयोग केले. पुन्हा प्रयोगाचे अधिकार मिळाले, तर आणखी प्रयोग करण्याची इच्छा असल्याचंही राऊत यांनी सांगितलं. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत.

गेली चाळीस वर्ष हे नाटक इतिहास रचतंय. संतविचार आवडणार्‍या, नाटक आवडणार्‍या आणि गाणं आवडणार्‍या रसिकांनी चकोर बनून या नाटकातून कैवल्याच्या चांदण्याचा आनंद घेतलाय.

0 Shares
ओढ काकांच्या यात्रेची गोरोबा सिनेमाज्