गोरोबा सिनेमाज्

हर्षल लोहकरे

अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड शहरात संत गोरा कुंभारांच्या नावानं एक सिनेमाचं थिएटरही आहे.

महाराष्ट्र ही संतांची भूमी. या संतांच्या मांदियाळीत संत गोरा कुंभार हे अधिकारानं आणि वयानं सगळ्यात ज्येष्ठ. म्हणूनच त्यांना गोरोबा काका असं म्हटलं जात. या संतांच्या मांदियाळीनं प्रबोधनाची एक परंपरा या भूमीत सुरू केली. चित्रपट हे देखील समाज प्रबोधनाचंच माध्यम आहे. सकारात्मक दृष्टीनं पाहिल्यास हा प्रबोधनाचा विचार, वारसा ‘श्री गोरोबा कुंभार चित्र मंदिर, जामखेड’ जोपासत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरातलं हे टॉकिज या नावानं सुरू झालं, 3 जुलै 1985 ला. अलीकडे हे नाव बदलून ‘गोरोबा सिनेमाज्’ असं करण्यात आलं आहे. गेल्या 33 वर्षांपासून गोरोबांच्या नावानं सुरू केलेल्या या टॉकिजला प्रेक्षकांचं सुरुवातीपासूनच प्रचंड प्रेम आणि प्रतिसाद लाभला आहे.

या टॉकिजचे महेश राऊत सांगतात, ‘श्री संत शिरोमणी गोरोबाकाका कुंभार हे आमचं आराध्य दैवत! कुंभारकाम, वीटभट्टी, किराणा, कोळसा वितरण हे आमचे सर्व व्यवसाय हे संत गोरोबाकाकांच्या नावानंच आहेत. त्यामुळं गोरोबा हेच नाव आम्ही टॉकिजलाही दिलं आहे. या माध्यमातून आम्ही एका वेगळ्या क्षेत्रात वाटचाल सुरू केली आहे. संतांचं नाव टॉकिजला असल्यामुळं कुटुंबातील महिलांसह सर्वजण चित्रपट पाहायला बिनधास्त येतात. तसंच गोरोबांच्या कार्याबद्दल आपुलकीनं विचारतात. त्यावेळी आपण ज्या हेतूनं ही टॉकिज सुरू केली, तो हेतू साध्य झाल्याचा अभिमान वाटतो.’

0 Shares
कैवल्याचं चांदणं तुझे रूप चित्ती राहो