माटी कहे कुम्हारसे

रंगनाथ तिवारी

माती सगळीकडेच. मातीच आपला आधार. मातीतूनच जग आकार घेतं. मातीतच विरून जातं. विठोबा उभा आहे ती वीटही मातीचीच. गोरोबा घडवायचे ती मडकीही मातीचीच. ती माती आपल्याशीही बोलतेय. ऐकताय ना!

‘माटी कहे कुम्हारसे’. कहे म्हणजे बोले. म्हणजे माती बोलते का? का नाही बोलत? माती चांगली चालते. धावते. मग बोलू का शकणार नाही? मातीची भिंत कशी चालली? भिंत चाललेली चालते, मग माती बोललेली का नाही चालत? एका एका काळाची भाषा असते. निकड असते. मग मातीची भिंत पण चालते आणि रेडा पण वेदमंत्र म्हणतो. काशी विश्वेश्वरासमोरचा दगडी नंदीबैल पण वैरण खातो. दळण कांडण करायला विठू धावूनयेतो. यात नवल वगैरे काही नसतं. सगळं सहज. त्या काळाची भाषा, संवेदना जाणता मात्र आली पाहिजे. नसता उगीचच गॅलिलिओचा जीव घेत बसाल.

चमत्कार असतात आणि होतातही. म्हणून तर फासावर खिळे ठोकून मारून टाकलेला येशू ख्रिस्त तीन दिवसांनी परत जिवंत होऊन आपल्या शिष्यांबरोबर संवाद करू लागतो. आज आपल्याला नवल वाटतं. अशक्य वाटतं. खोटं आणि अवैज्ञानिक पण वाटतं. म्हणून ‘माटी कहे कुम्हारसे’ अलंकारिक आणि अशक्य वाटतं.

माटी कहे कुम्हारसे तू क्या रौंदे मोहे?
इक दिन ऐसा आयेगा मैं रौंदूँगी तोहे

पण गोरा कुंभारांना मातीची भाषा कळत होती आणि त्यामुळं ते तिच्याशी बोलण्यात गुंग होऊन जायचे. मग आपल्या पायात आपलंच लेकरू आलं आहे आणि ते मातीबरोबर तुडवलं जात आहे, याचं भान गोरा कुंभारांना राहत नाही. विठ्ठलाच्या भजनात अशी ही आत्मविस्मृती. विठ्ठलमय विश्वाची भाषा. या विश्वाचा आधार मातीचाच. म्हणायला पंच महाभूतं. पण ती सगळी आधारलेली असतात मातीवरच आणि मातीच्या आश्रयानंच त्यांना अस्तित्व प्राप्त होतं. असा आहे मातीचा महिमा. म्हणून तर बुल्लेशाह म्हणतात,

माटी खुदही करेंदी या।
माटी जोड़ा (पोशाख), माटी घोड़ा, माटीदा असवार
माटी माटीनू मारन लागी, माटीदा हथियार
जिस माटीपर बहुती माटी, तिस माटी हंकार
माटी बाग बगीचा माटी, माटीदी गुलजार
माटी माटीनू देखन आयी, है माटीदी बहार
हँस खेल फिर माटी होई, पौंदी पाँव पसार
बुल्लेशाह बुझारत बूझी, लाई सिरोंदा भार
माटीदी बहार!

हसा, खेळा आणि शेवटी माती होऊन मातीतच पसरून जा. मातीचा हा शाश्वत संदेश आहे. आपला हंकार, अहंकार बाजूला ठेवा.

गोरा कुंभारांना ही मातीची भाषा समजत होती. म्हणून ते ‘वैराग्याचा मेरू’

वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार।
तोडीयले कर आणेसाठी॥
महाद्वारी कथा श्रवण करीता।
टाळी वाजविता निघती नवे॥

स्मशान वैराग्य तर आम्हालाही दिवसातून दहा वेळा येतं. काही खरं नाही. सगळं झूठ. कुणी कुणाचं नाही. सगळं सोडून निघून जावं? पण जाणार कुठं? असलं वैराग्य नाही. तर शाश्वत वैराग्य. स्थायी वैराग्य. दोषातीत. स्वाभाविक. माती आणा. पाणी आणा. चिखल करा. तो तुडवा. मग त्याची भाजणं करून भाजा. बाजारात जाऊन विका. मिळेल त्या पैशात भागवा. भाजीभाकरी खाऊन विठ्ठलाचं नामस्मरण करा. माझा एक विठू. तो माझा सर्वस्व. त्याची आण घ्यायची नाही. त्याची आण तोडायची नाही. आईची आण तर आम्ही घासागणिक तोडत असतो. पण गोरा कुंभार वैराग्याचे मेरूमणी. त्यांनी आण घेतली. तिच्या पालनासाठी दोन्ही हात मनगटापासून तोडून टाकले. थोटा झाला तर त्याचंही दुःख नाही. पण त्यांना गुरूस्थानी मानणार्‍या भक्तराज नामदेवांना हे कसं सहन होणार? भजन करताना भक्तांची मांदियाळी हात उंचावून टाळी वाजवणार आणि गोरा कुंभार थोट्या हातानं टाळी कशी वाजवणार? त्यांची टाळी वाजली पाहिजे. जेव म्हटलं की विठ्ठल निमूट तोंड उघडून जेवणार. मग गोरोबा काकांची टाळी कशी वाजणार नाही? हे कसं चालणार?

आता माझी लाज राखे पंढरीनाथा ।
तुजवीण अनंता आणिक नाही ॥
अनाथांचा नाथ, दीनांचा कैवारी ।
पाव झडकरी आपल्या दासा ॥
गोरियाचे हात आले तत्क्षणी ।
नामा कीर्ती वर्णी विठोबाची ॥

नामा काहीही करू शकतो. तरी पण त्यांचं मडकं कच्चंच आहे. हा निवाडा परत गोरोबा काकांनीच दिला. गुरू हवाच. ‘गुरूबिन कौन बतावे बाट?’ परीक्षागुरू गोरोबांसारखा हवा. उगीच उठसूठ ग्रेस मार्क देऊन पास करणारा गुरू काय कामाचा?

पावन मनाच्या योग्याला ताटी उघडायला भाग पाडणारी मुक्ताई गोरोबा काकांना कामाला लावते. विठ्ठल विठ्ठल तर सगळेच म्हणतात; पण खरोखर विठ्ठलाचं मर्म जाणणारे आणि न जाणणारे किती याची परीक्षा अनुभवी वैराग्याचे मेरू गोरोबा काकांनी करायची. मातीची मडकी भाजणारे गोरोबा काका हेच मडकं भाजलं आहे की अजून कच्चं आहे ते सांगणार. लहानग्या मुलीचा हट्ट पुरवण्यासाठी आणि योगिनी मुक्ताईची आज्ञा पाळण्यासाठी गोरोबा काका एकेका संतांचं मडकं म्हणजेच डोकं थापट्यानं थापटून तपासू लागतात.

प्रथम थापटलं निवृत्तीनाथांचं डोकं. ते तर परब्रह्म. पूर्णत्वाचे पूर्णत्व म्हणजे निवृत्तीनाथ. जिथं वृत्तीच शेष होते, ती वृत्ती म्हणजे निवृत्ती. तिथं काय तपासणार? जिथं काही असतं तिथं तपासता येतं. पण जिथं काहीच नाही, तिथं काय तपासणार? डेरा जाहला निका परब्रह्म. मग ज्ञानेश्वरांचा नंबर. ते तर ज्ञानियांचे गुरू. या ज्ञानगुरूंसाठी मेलेले सच्चिदानंद बाबा तर ताटीवर उठून बसले.

बाबा कुठं निघालात? थांबा!

कशासाठी थांबा?

इतकी घाई काय आहे?

घाई म्हणजे, काम झालं की जायचं – करायला काही काम नाही तर मग थांबून काय करू?

काम मी देतो ना तर मग थांबतो.

सच्चिदानंद बाबा थांबले. आता हा चमत्कारच की नाही. पण असे चमत्कार होतच असायचे. त्यात आश्चर्य काय? सच्चिदानंद बाबा लेखकू होऊन भावार्थ दीपिका पूर्ण करून मगच गेले. काम झालं की माणसानं थांबू नये, जावं. नाहीतर नसती विटंबना होते. हे ज्ञानियांच्या राजाला ठाऊक होतं. म्हणून मग संजीवन समाधी!

सोपान, मुक्ता, जना, चोखा, नरहरी सगळे झाले. मग नामदेवांची बारी. गोरोबा काकांनी नामदेवांचं डोकं थापटलं. तर नामदेव लागले रडायला. थापटल्यावर दुखतं ना.

गोरा म्हणे कोरा राहिला गं बाई

शून्य भार नाही भाजियेला

सर्वस्व सोडून शून्यरूप व्हावं, तेव्हा कुठं भाजण्याची क्रिया संपूर्ण होते. सांसारिकतेतून सुटका होते. षडरिपूतून मुक्तता मिळते, ती संजीवनी भक्ती.

गोरोबा काकांच्या परीक्षेतून थोडंसंही हिणकस सुटणार नाही. नामदेवांना मोठा अहंकार. मी देवाच्या जवळ राहतो. त्याच्याशी बोलतो. त्यामुळं मी मोठा सर्वांपेक्षा. हे नाही चालणार. जा औंढ्याला विसोबा खेचरांना भेटा आणि त्यांच्याकडून ट्यूशन घ्या. गुरुपदेश घ्या आणि मग परत या. आणि हा गुरू कसला?तर –

देवावरी पाय ठेवूनी खेचर
निजेला परीकर निवांतची

देवावर पाय ठेवायचा? नाही तर मग कुठं ठेवायचा? देवावीण ठाव रिता कोठे? गुरुजींचे पाय उचलून जिकडं करावे तिकडं शिवलिंग. नामदेव महाराज हैराण झाले. असे हे संत. एकापेक्षा एक वरचढ. गोरोबा काका तर सगळ्यांपेक्षा वरचढ.

नेणवेची बाळ की हे मृत्तिका
मन गुंतलेसे देखा पांडुरंगी
मृत्तिकेसम जाहला असे गोळा
बाळ मिसळला मृत्तिकेत

असले कसले हे विठ्ठलाचे पिसे? हे पिसे लागले की आत्मविस्मृती होते. आता ही खरंतर आत्मविस्मृती म्हणावी की आत्मजागृती? या आत्मजागृतीच्या तीव्रतेनं मातीत तुडवलं गेलेलं बाळ मातीतूनच रांगत येतं आणि थोट्या हाताला नव्यानं बोटं फुटतात. ती विठूच्या गजरात टाळ्या पिटू लागतात. आत्मतत्त्वाचा हा परमोच्च साक्षात्कार. जडावर चैतन्यानं केलेली मात. मुळात जड असं काही नसतं. सर्वत्र चैतन्याचा विस्तार आहे. कुठं व्यक्त रूपात तर कुठं अव्यक्त रूपात. अव्यक्तालाच रहस्य म्हणायचं. जगण्याच्या आणि भक्तीच्या सोळा कला संपल्यावर एक सतरावी कला पण असते.

म्हणे गोरा कुंभार सतरावीचे नीर ।
सेवी निरंतर नामदेवा ॥

ही सतरावी कला जनाबाईंना पण माहीत असते. ही सतरावी कला म्हणजे झनकट असते. सर्वांचं विस्मरण व्हावं झनकट फू. द्वैत काय, अद्वैत काय! चिखल काय, पाणी काय आणि पोर काय! पण हे सतराव्या कलेचं पान करावं, बा नामदेवा. या सगळ्यांना झपाटणार्‍या झनकटचे अनहद नाद ऐकू तरी कसे येतात आणि त्या झनकटचे रस पिऊन ते उन्मत्त तरी कसे होतात, याची समीकरणं कुणी मांडावी? आणि त्याची उकल तरी कुणी करावी, अशी आत्मस्थिती देही बोलता गोरोबांना लाज वाटते.

कैसे बोलणे कैसे चालणे ।
परब्रह्मी राहणे अरे नाम्या ॥

आनंदी आनंद गिळून जीवनमुक्त व्हावं. मौनसुख घ्यावे आणि त्यावर जीवन ओवाळून टाकावे. निर्वासना बुद्धीवर, नाही रूपरेखा हाच तर सुखाचा सागर. स्थूल जेव्हा सूक्ष्म होतं तेव्हाच मन महासुखात बुडतं. मग ‘मी गोरा’, ‘तू नाम्या’ हा आपला भेद. हा प्रकारच उरत नाही. भेटायचं ते केशवाला. त्याच्या भेटीचे पिसे लागले की देहभान हरपतं. मग जे दिसतं ते सर्वच चिद्रूप. कोणी नाही दुजे विश्वरूप सर्वत्र.

निर्गुण रूपडे सगुणांचे बुंथी. निर्गुणाचे रूपडे थोरच. पण त्याच्या प्राप्तीसाठी आधी सगुणाचं रूपडं जाणून घ्यावं लागतं. विठ्ठलात प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीचा संगम आहे. या संगमाच्या एका तीरावर निर्गुण आहे तर दुसर्‍या काठावर सगुण. विठ्ठलाच्या व्हायटॅलिटीमध्ये वर्ज्यावर्ज्य काहीच नाही. वर्ज्यावर्ज्य या भावाच्या पलीकडं गेलेल्या भावभक्तीचा सारभूत पुंज म्हणजे विठ्ठल. या सारभूत पुंजाचा लखलखाट. लखलखाट जाहला, लखलखाट जाहला.

लखलखाटात जे दिसतं, ते असतंच असं नाही. जे नसतं ते दिसणारच नाही असंही नाही. लखलखाटाची दुनियाच जगावेगळी. हा तर सायक्लोरामा. क्षणात हे तर क्षणात ते. दोन्ही खरं. दोन्ही खोटं. दोन्ही भासरूप सत्य हेच खरं. या भासरूपाचं सत्य जगाच्या माथी एकदा जे काही मारलं ते सरता सरत नाही. घारीची पिल्लं हत्तीएवढी होतात आणि ती कासवीला लुचू लागतात. मुंगी मुखातून जग निर्माण होतं. मुंगीतर अणूपेक्षा खूप मोठी असणार. तिच्यात प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन पण असणार. यांची सांगड म्हणजे ज्ञान, विज्ञान आणि दोघांना मुठीत धरणारं अध्यात्म. जीवनाची सार्थकता म्हणजे या रहस्याची उकल. ती करण्यासाठी ऑर्थर कॉनन डायलला एखाद्या नवीन शेरलॉक होम्सची निर्मिती करायला सांगायचं.

म्हणे गोरा कुंभार खूप जाणतो भला
तोचि जन्मा आला सार्थक त्याचे

गोरा कुंभारांना जन्माचं सार्थक माहीत असावं. पण ते आम्हाला कुठं माहीत आहे? गुरुत्वाकर्षण न्यूटननं सांगितलं. क्रियेची प्रतिक्रिया होते. पण ती का होते? परत ती तितकीच आणि विरुद्ध दिशेनंच का होते? हे कोण सांगणार? गुरुत्वाकर्षण आणि विद्युत चुंबकत्व दोन्ही रहस्यच. परत अणूचा सिद्धांत मांडणारा आइन्स्टाईन म्हणणार अणू पदार्थ नाही. ती एक शक्ती आहे. आणि ती तत्त्वतः मानस ऊर्जा आहे. ज्ञानाचा प्रवाह मंत्रविहीन सत्याकडे धावतो आहे आणि तो मानसिक उर्जेची अभिव्यक्ती आहे. हे ज्याला कळतं तो सिद्ध. गोरोबांच्या काळात अशा सिद्धांची संख्या खूप मोठी असणार. सिद्ध आणि तेही सिद्धीयुक्त. पण त्यांनी सिद्धी त्याज्य मानली आणि विठ्ठलभक्तीच्या सर्वस्व समर्पणाचा स्वीकार केला. विठ्ठलापेक्षा मोठी सिद्धी नाही. त्याला सर्वभावे शरण जावं आणि भजावं म्हणजे दिव्यत्व आपल्यात आणि सर्व माणसात जागृत होईल. माणूस देव नाही हे खरं. पण देवत्वही माणसाच्या आश्रयानं जगत असतं.

आदमको खुदा मत कहो,आदम खुदा नही
लेकिन खुदाके नूरसे आदम जुदा नही

या खुदाच्या नूरच्या दिव्यत्वाची अहोरात्र प्रचिती घेत माती तुडवत जाणं आणि मातीतल्या दिव्यत्वाला जागृत करणं हे कुंभाराचं काम आणि ते त्यानं जीवेभावे करावं. त्यात प्रपंचाचा अडसर नको. अडसर आलाच तर तो छाटून टाकता आला पाहिजे. हाताचं काय, ते आहेत. अजून येतील, न येतील. पण आलेल्या दिव्य अनुभूतीची बूज राखता आली पाहिजे. ती दुरावली नाही पाहिजे. तो क्षण असतो, धरता आला पाहिजे. धरता आला की मग परत धरण्यासारखं धरतीवर काहीच उरत नाही. धरती म्हणजे माती. तिची हाक ऐकताच तिला प्रतिसाद देता आला पाहिजे. कारण त्यातच जीवनाचे जीव सार्थकी लागणार असतात. माती सर्वत्र आहे. कुठं काळी, कुठं पांढरी, कुठं धुरकट, कुठं लाल, कुठं पिवळी. सत्तेची, संपत्तीची हृदयहीन क्रौर्याची हाव. मातीत तिला तुडवून सत्यरूपी विठ्ठलाच्या कीर्तनात दंग होऊन टाळी वाजवण्याचं भाग्य मिळण्याचा ध्यास घेता येतो का, याचा वेध घेत राहणं म्हणजे जगणं.

तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम!

———————–

एक अभंग मातीचा या लेखासाठी रेखाटनं तयार करताना लेखक-चित्रकार सुनील यावलीकर यांना सुचलेली कविता.

आपट थापट
आव्यात भाजले
तरीही टिचले
मडके गा

राहिलेच कसे
मडके हे कच्चे
कोणी कसे सच्चे
आढळेना

तरीही बराच
मातीचाच खेळ
खोट्याचा हा मेळ
कशासाठी

मातीत चालती
मातीचेच पाय
माती होऊ जाय
आपलीच

अशा मातीतच
सदा अंकुरावे
आणि सारवावे
स्वतःलागी

0 Shares
वर्क इज वर्शिप गोरोबांचा महाराष्ट्रधर्म