भिडे गुरुजी, वारीत तुमचं स्वागत आहे!

Ringan

डिअर संभाजी भिडे गुरुजी,

तुम्हाला माहीत नसेलच. गेल्याच वर्षी ‘रिंगण’च्या संपादकीयात ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ चोपदार यांना थँक्यू म्हटलं होतं. कारण स्पष्ट होतं. त्यांनी तुम्हाला आणि तुमच्या धारकर्‍यांना सोहळ्यातून हाकलवून लावलं. माऊलींच्या रथासमोर तलवारी नाचवण्याचा उद्धटपणा करण्यापासून रोखलं. आता तुम्हालाही थँक्यू, गेल्या वर्षी म्हटलेलं थँक्यू किती सार्थक आहे, हे तुम्ही यावर्षी सिद्ध केलंय.

मनू हा आमच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पुढे आहे, अशी मुक्ताफळं तुम्ही उधळलीत. त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. तुमचं मत तसं असू शकतं. तुम्ही तुमची मतं बाळगण्यास मोकळे आहात. पण तुम्हाला नाही वाटत की हे अतीच झालं. माऊलींच्या पालखीत यायचं. वर माऊली कुणाच्या पुढं आहेत आणि कुणाच्या मागे आहेत, अशी अक्कल पाजळायची. तुम्ही कुणीही असा, तुम्हाला असा अधिकार कुणीही दिलेला नाही. खरंतर असं बोलल्यानं ना आम्हाला फरक पडत, ना संतांना. म्हातारी मेल्याचं दुःख नाहीच. काळ सोकावतोना म्हणून लिहावंसं वाटलं.

ऐका गुर्जी, आम्ही माऊलींची माणसं. आम्हाला तुमच्याशी काहीही घेणंदेणं नाही. तुमचं नाव संभाजी आहे की मनोहर? तुम्ही शास्त्रज्ञ होतात की नाही? तुमच्या नावावर कित्येक एकर जमीन होती की नव्हती? तुम्ही एकशे आठ सूर्यनमस्कार घालता की नाही घालत? आम्ही कधीही यात पडलो नाही. पण तुम्हाला कुठं येऊन काय बोलावं याचं साधं तारतम्य नसेल, तर नम्रपणे इतकंच सांगायचंय, तुमच्या या मोठमोठ्या गोष्टी काय चाटायच्यात?

हे बघा, एकदम सोपं आहे सगळं. तुम्हाला मनू माऊलींपेक्षा पुढचा वाटतो. हरकत नाही. मग कशाला माऊलींच्या पालखीत येता? असेल हिंमत तर काढा मनूची पालखी. मनुस्मृतीची पारायणं करा. मनूच्या नावानं सप्ताह घ्या. बेट लावतो, कुत्रंही येणार नाही. तुम्ही इतकी वर्ष आमच्या छत्रपती शिवरायांच्या नावानं, शंभूराजांच्या नावानं गळे काढले. तुमच्या डोक्यातलं मनुस्मृतीचं विष आमच्या पोरांच्या डोक्यात भिनवलं. त्यांची आयुष्य भेगाळली. त्यांच्या हातून दंगली घडवल्या. तेवढ्यानं भागलं नाही म्हणून आता संतांच्या पालखी सोहळ्यात येताय. आम्ही भोळे वाटलो, तरी तुमच्या मनातलं पाप समजण्याइतके दूधखुळे नक्कीच नाही.

मनूबद्दलही आमची काही तक्रार नाही. आमच्या संतांनी त्याच्याबद्दल चांगलंच लिहिलंय. पण तो खरंच होता की तो फक्त चांगलं काही शिकवण्यासाठी पुराणांनी घडवलेलं पात्रं आहे, हेही कुणाला माहीत नाही. पण मनुस्मृती मात्र होती. हिंदू धर्म, अध्यात्म, भारतीय दर्शन यापैकी कुठंच स्मृतींना फारशी किंमत नाही. काळाबरोबर त्या टाकावूच होतात. तरीही या मनुस्मृतीच्या नावानंच आमच्या डोक्यावर पिढ्यान्पिढ्या वरवंटा फिरला. हीच मनुस्मृती दाखवत मूठभरांनी देशाला गुलामासारखं वागवलं. शिकू दिलं नाही. मान वर करू दिली नाही. आमच्या देवांनाही आमच्यापासून तोडलं. पुरुषांचा बायकांकडे आणि बायकांचा पुरुषांकडे बघायचा दृष्टिकोन सडवला. अख्खा समाजच बर्बाद करून टाकला. हा देश आजही त्याची फळं भोगतोय.

संतांनी त्याच्याच विरुद्ध विद्रोह केला. माफ करा गुरुजी, पण तुम्हाला ते कळणार नाही. तुम्हाला वाटतं तलवारी फिरवून क्रांत्या होतात. आमच्या संतांची क्रांती ऑपरेशन करणार्‍या सर्जनसारखी असते. छोट्याशा ब्लेडने शरीराचा नको तो भाग काढून टाकते. ती खळांना म्हणजे वाईट माणसांना संपवत नाही. तर व्यंकटी म्हणजे वाईटपणा संपवते. त्यामुळं आम्हाला कोण पुढं आणि कोण मागं हे शिकवायच्या भानगडीत पडू नका. तुमच्या डोक्यातल्या मनूची आमच्या माऊलींशी तुलनाच होऊ शकत नाही. तुमच्या मनूपेक्षा आमच्या माऊली कित्येक प्रकाशवर्ष पुढं आहे. तुम्ही चांगले आहात तर आम्ही गांडीची लंगोटीही काढून देऊ. नाही तर नाठाळाच्या माथ्याचं काय करायचं, हे विष्णुदासांना तुकोबारायांनी सांगून ठेवलंच आहे.

याच तुकोबारायांच्या काही वंशजांनी तुम्हाला तुकोबांच्या पालखीच्या रथात बसवलं. दोन वर्ष तुमची मिरवणूक काढली. पत्रं लिहून तुम्हाला सर्टिफिकेटं दिली. पण त्यांना हे कळत नाहीय, ते आमच्या तुकोबारायांच्या विचारांचा अपमान करत आहेत. ते तुकोबारायांच्या कुळात जन्मले म्हणून आजही आम्ही त्यांच्या पायावर नाक घासतोच. मरेपर्यंत घासत राहू. पण ते करतानाही अध्यात्म वारसाहक्कानं मिळत नाही, हे आम्हाला माहीत असतंच. यांच्या करंटेपणामुळं तुकोबांचा एक जरी वारकरी तुमचा धारकरी झाला तर ती तुकोबारायांशी गद्दारी असेल. आणि संतांशी गद्दारीइतकं महापाप आमच्यासाठी दुसरं नाही.

गुरुजी, इतकं सगळं असलं तरी तुम्ही वारीत येऊ नका, असं म्हणायची चूक मी तरी करणार नाही. तुम्ही याच. माणूस कितीही नालायक असला तरी संतांच्या सहवासानं तो बदलतोच, यावर आमचा भक्कम भरवसा आहे. संतांना बोल लावल्यामुळं वाघोलीच्या रामेश्वर भटासारखीच तुमच्याही तनामनाची लाही लाही होईल. तुम्हालाही अनगडशाह बाबाच्या हौदात प्रायश्चित्त घ्यावं लागेल. याची मला तरी खात्री आहे.

म्हणून हक्कानं सांगतोय. प्रिय भिडे गुरुजी, वारीत तुमचं स्वागत आहे. पालखीत येत राहा. माऊलींच्या पादुकांवर डोकं घासा. त्यांच्याकडे डोकं बदलायची जादू आहे. आमचे गोरोबा काका अनुभवाचं थापटणं घेऊन प्रत्येकाचं डोकं तपासत असतातच. त्यांना भेटाच तुम्ही. ते लखलखाट करून टाकतात डोक्यात. आणि हो, चांगदेव महाराजांनाही न विसरता गाठा. ते तुम्हाला अनुभवाचे बोल सांगू शकतील. मिशा कितीही पांढर्‍या झाल्या. त्यागाची तपश्चर्या कितीही झाली. हजारो काय, लाखो अनुयायी झाले. तरी मेंदूत कचराच भरलेला असू शकतो. त्यासाठी चांगदेवांनी केलं ते करायला हवं. उगाच माऊलींची कुणाशी तरी तुलना करायची फाल्तूगिरी बंद करा. तुमचं डोकं संतांपाशी सोपवून तर बघा. तुमच्या डोक्याचं नक्की सोनं होईल.

आम्ही सगळे त्या दिवसाची वाट पाहतोय.

आपला,

सचिन परब,

संपादक, ‘रिंगण’

0 Shares
विसोबांचा वारसा कलबुर्गी युरेका, युरेका