विसोबांचा वारसा कलबुर्गी

राजा शिरगुप्पे

डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचा खून करण्यात आला, त्याला आता दोन वर्ष होतील. त्यांना मारण्यात आलं कारण महात्मा बसवेश्व रांचा विचार नेमका काय होता, हे ते शोधून मांडत होते. तोच विचार लुप्त होण्याची शक्यता दिसताच विसोबांनी नामदेवांच्या मनात नव्यानं रूजवला होता.

आपल्या शालेय पाठ्यपुस्तकातील पहिल्याच पानावरच्या प्रतिज्ञेत आपल्याला आवडणारं एक वाक्य आपण नेहमीच वाचलं आहे, ‘माझा देश विविध परंपरांनी नटलेला आहे.’ या पुढचं कंसातील वाक्य असं असू शकेल की, माझ्या देशाचा इतिहास विविध गोंधळांनी भरलेला आहे, हा गोंधळ अनवधानानं नाही तर, हेतुपूर्वक केलेला आहे. भारतीय संस्कृतीची ओळख करून देताना ती नेहमीच एकांगी आणि अनैतिहासिक पद्धतीनं करून दिली जाते. हा देश विविध परंपरांचा आहे, हे खरंच. पण, या परंपरा परस्परविरोधीही आहेत, हे जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलं जातं. ज्या परंपरेनं शतकानुशतकं राजकीय सत्तेच्या मदतीनं सांस्कृतिक सत्ता गाजवण्याचा प्रयत्न केला, तिलाच महान भारतीय संस्कृती म्हणून समोर आणलं जातं.

आपल्या देशाचा इतिहास मुख्य दोन परंपरांत विभागता येईल. वैदिक आणि अवैदिक असे दोन प्रवाह या देशात प्राचीन काळापासून आजतागायत अस्तित्वात आहेत. वेदप्रामाण्य मानणारी किंवा अधिक स्पष्ट शब्दात ब्राह्मणी परंपरा आणि दुसरी वेदांना नाकारणारी अब्राह्मणी परंपरा, यांचा नीट अर्थ समजून घेतला पाहिजे. आज या दोन्ही परंपरांतील मिसळीला हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्म म्हणून संबोधलं जातं. परंतु ऐतिहासिक सत्य असं नाही. अद्वैत म्हणजे स्वतःमधील आणि सृष्टीतील चैतन्य एकच आहे, ते ब्रह्मस्वरूप आहे. बाकी सर्व अनुभवाला येणारं जग हे केवळ भासमय आहे, अशा प्रकारची तात्त्विक मांडणी करणारी वैदिक परंपरा. दुसरी या तात्त्विक मांडणीला विरोध करणारी, अनुभवाला येणारं सारं भवताल हे एक वास्तव सत्य आहे, ही भूमिका घेऊन उभी राहणारी अवैदिक परंपरा. भारताचा संपूर्ण इतिहास हा या दोन परंपरांच्या संघर्षावरती उभा आहे.

वैदिक परंपरेतील वास्तव जगाचं वास्तवपण नाकारणारं हे तत्त्वज्ञान आजतागायत सत्ता म्हणून टिकून राहिलं, कारण शोषक शासन व्यवस्थेला टिकून राहण्यासाठी या तत्त्वज्ञानानं पाया पुरवला. या तत्त्वज्ञानाला विरोध करून जगाची वास्तवता आणि श्रमाची निर्माणशीलता याचं भान चार्वाकांपासून बुद्धांपर्यंत, बुद्धांपासून भक्ती चळवळी आणि महानुभाव, शीख, लिंगायत या अवैदिक धर्मांनी केलं. वैदिक परंपरेनं सर्वसामान्य कष्टकरी वर्गाच्या जातिव्यवस्थेच्या नावाखाली चिरफाळ्या उडवल्या. उलट अवैदिक परंपरांनी अशा शोषणव्यवस्थेला नकार देऊन मानवी सामाजिकतेचं आणि सामाजिक विकासाचं तत्त्वज्ञान दिलं. त्यांचा विरोध दडपण्यासाठी वैदिक परंपरेनं आमिषांपासून कत्तलीपर्यंत सर्व मार्ग अंगीकारलेले दिसतात. समता, सहकार, सहानुभाव, स्वातंत्र्याचा आदर ही अवैदिक परंपरेची मुख्य वैशिष्ट्यं होती. जेव्हा भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्यं सांगायची वेळ येते, तेव्हा आपलं मोठेपण सांभाळण्यासाठी या अवैदिक परंपरेच्या मूल्यांना आंजारून गोंजारून सांगितलं जातं. पण प्रत्यक्ष व्यवहारात मात्र आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी वैदिक परंपरेची शोषणमूल्यंच धर्मश्रद्धेच्या नावाखाली सांभाळली जातात. भारताचा इतिहास तपासताना हे नीट समजावून घेऊन नीरक्षिर विवेकानं आपण सगळ्या घडामोडींकडे पाहिलं नाही तर, या देशातील नेमक्या पुरोगामी परंपरांचा आणि त्यांना भोगाव्या लागलेल्या हिंसेचा आपल्याला योग्य पद्धतीनं बोध होणार नाही.

आठव्या- नवव्या शतकापासून वैदिक परंपरेला गरज असणारी जातिव्यवस्था अधिकाधिक भीषण आणि क्रूर होत चालली. अकराव्या शतकापासून तिनं एक अक्राळविक्राळ टोक गाठलं. याच काळात याला प्रतिरोध म्हणून भारतात विविध ठिकाणी अनेक पंथ आणि धर्म चळवळ म्हणून उभे राहिले. आजच्या उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्राच्या परिसरावर अकराव्या शतकात देवगिरीचे यादव आणि दुसर्‍या बाजूला बदामीचे चालुक्य यांच्या सत्ता होत्या. दोन्हीही राजसत्तांचा वैदिक परंपरेला आश्रय होता. त्याचे भीषण परिणाम इथल्या जातिव्यवस्थेनं शूद्र ठरवला गेलेला कष्टकरी वर्ग भोगत होता.

बाराव्या शतकात आजच्या बागलकोट जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथील ब्राह्मणपुर्‍यात, तेही ब्राह्मण अग्रहार प्रमुखाच्या घरात बसवण्णा नावाचा एक महामानव जन्माला आला. मुळातच संवेदनशील असलेल्या या महामानवानं शोषिकांच्या उच्चस्थानी राहूनही या शोषण व्यवस्थेची भीषणता पाहिली. त्याची धर्मग्रंथातून केलेली समर्थनंही अभ्यासली. एका नैसर्गिक चिकित्सक वृत्तीनं त्यांनी या सार्‍याची चिकित्साही केली असावी. कारण नंतर त्यांनी या सर्व गोष्टी नाकारलेल्या आहेत. हे नाकारताना त्यांच्या चिकित्सक बुद्धीला आधीची अवैदिक परंपरा मदतीला आली असावी. चार्वाकाच्या लोकायतीक विचारांपासून बौद्ध विचारांपर्यत आणि नुकत्याच मध्य आशियातून मुस्लिम परंपरेतील एकेश्‍वरवाद घेऊन भारतात आलेल्या सुफी परंपरेपर्यंतचे विचारही बसवण्णांना सहाय्यभूत झाले असावेत, असं ऐतिहासिक संदर्भावरून खात्रीपूर्वक सांगता येईल.

बसवण्णा चालुक्याचा मांडलिक राजा बिज्जळाचे दरबारी मंत्री होते. त्यामुळं सुरुवातीचा काही काळ त्यांना आपले विचार कृतीत आणण्यासाठी त्यांच्या राजकीय स्थानाचाही उपयोग झाला. राजसत्तेच्या जेव्हा लक्षात हे आलं तेव्हा त्यांनी बसवण्णा विरोधी पवित्रा घेतला. त्यांच्या आधीच्या इतिहासाप्रमाणे इथंही त्यांनी बसवण्णा आणि त्यांच्या सहकार्‍यांची म्हणजे शरणांची कत्तल केली. त्यांनी निर्माण केलेल्या वचन साहित्याचा विध्वंस सुरू केला. पुष्यशृंग मित्रानं केलेल्या बौद्ध भिक्खूंच्या भीषण कत्तलीनंतरची ही बाराव्या शतकात झालेली दुसरी भीषण कत्तल होय. शरणांनी आपलं लिखित वचन साहित्य घेऊन कल्याणमधून दुसर्‍या सुरक्षित राज्यात प्रस्थान केलं. प्रसंगी हाती हत्यार घेतलं. संपूर्ण जगाच्या इतिहासात, संपत्तीसाठी नव्हे तर आपल्या विचारधनाच्या संरक्षणार्थ घडून आलेलं कदाचित हे पहिलंच युद्ध असेल. पण या भीषण संघर्षाचे परिणाम पुढं बराच काळ, म्हणजे शतकं राहिलेले दिसतात. मानवी समतेचं आणि श्रमाचं मोल जपणारं हे वचन साहित्य दीर्घकाळ अक्षरशः अंधारात गेलेलं दिसतं.

बसवण्णांच्या विचारांकडे आकृष्ट होऊन बसव कल्याणच्या उत्तरेकडे असलेले म्हणजे सोलापूर येथील सिद्धयोगी किंवा नाथपंथी सिद्धरामय्या यांची नाथ परंपरा लोकायतीक परंपरेला जवळची होती. ते बसवण्णांचे अनुयायी झालेच होते. बसव कल्याणच्या दक्षिणेकडील भागातून म्हणजे आत्ताच्या तेलंगणातील मल्लिकार्जुन पंडिताराध्य श्रीशैलहून बसवण्णांना भेटण्यासाठी निघाले पण त्यांची भेट घडली नाही. हे आराध्य शैव ब्राह्मण होते. आपलं ब्राह्मण्य शाबूत ठेवून त्यांनी बसवण्णांच्या शरण आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यांच्या उदारमतवादामुळे त्यांना आंध्रचे बसवण्णा म्हटलं जातं. ते मोठे मठाधीश असूनही बसवण्णांच्या विचारांकडे आकर्षित झाले होते. शरण परंपरेत स्वतःच्या आचार्य परंपरेचं विलिनीकरण करण्यासाठी ते बसवण्णांना भेटायलाही निघाले होते. पण या भेटीआधीच आठ दिवस बसवण्णांचा करुण अंत झाला. त्यामुळं त्यांची भेट होऊ शकली नाही. पण त्याचे विपरित परिणाम मात्र पुढे बसवण्णांच्या पुरोगामी धर्मपरंपरेवर झालेले दिसतात.

शुद्धशैव ही ब्राह्मणी आचार्य परंपरा मल्लिकार्जुन पंडिताराध्यांच्या बसवभक्तीमुळे लिंगायत धर्मामध्ये आली. नंतर आपली ब्राह्मणी परंपरा कायम ठेवण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी बसवण्णांच्या लिंगायत परंपरेचं वीरशैवीकरण म्हणजे ब्राह्मणीकरण केलं. ब्राह्मणी व्यवस्थेनुसार या नव्या व्यवस्थेतही स्वतःला उच्चस्थानी ठेवण्याचं काम केलं. त्यामुळं मूळच्या बसवण्णांच्या अवैदिक धर्मव्यवस्थेला आज विकृत स्वरूपाच्या ब्राह्मणी व्यवस्थेचं रूप आलेलं दिसतं. नाथ परंपरा, शरण परंपरा आणि आचार्य परंपरा या तीन परंपरांच्या मिसळीमध्ये नंतरच्या काळात आचार्य परंपरा प्रभुत्व गाजवताना दिसते. त्यामुळंच बसवण्णांच्या एकूण पुरोगामी विचार परंपरेबद्दल गैरसमज पसरवले जाताना दिसताहेत. या पार्श्‍वभूमीवर बसवण्णांच्या शरण परंपरेला खंबीर बळ पुरवणार्‍या सिद्धयोगी किंवा नाथपरंपरेचा गंभीरपणे विचार करायला हवा.

शरण परंपरेतल्या मानवतावादी विचारांना शास्त्रीय भौतिक पाया नाथपंथी परंपरेनं पुरवला. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे नाथपरंपरा हा शरण परंपरेला वारकरी परंपरेशी जोडणारा एक सशक्त दुवा आहे. हा दुवा विसोबा खेचर या नावानं अधोरेखित होतो. विसोबा खेचर संत नामदेवांचे गुरू मानले जातात. विसोबा खेचर हे स्वतः योगतज्ज्ञ, तांत्रिक सिद्ध होते. त्यांचं खेचर हे पदनामच त्यांची सिद्धपंथातील तज्ज्ञता आणि उच्चता दाखवून देतं. संपूर्ण विश्‍व सूक्ष्म दृष्टीनं विहरण्याची क्षमता प्राप्त झालेली आहे, त्याला खेचरी म्हणतात. म्हणजेच खेचर पद प्राप्त झालेल्या साधकाकडे अनंत भासणार्‍या विश्‍वाचा अतिशय तर्कशुद्ध आणि वस्तुनिष्ठ कार्यकारण तत्त्वातून अर्थ लावण्याची क्षमता असते. विसोबा खेचरांचं चरित्र फारसं उपलब्ध नाही. पण भक्तीविजयमध्ये महिपतीबुवांनी चमत्कारांच्या कथा सांगितल्या आहेत. त्यातून सापडणार्‍या त्रोटक चरित्रावरची चमत्काराची पुटं काढून टाकली तर थोडंफार चरित्र हाती लागतं. त्यांचा जन्मकाळ आणि जन्मस्थान कुठले हे विवादास्पद आहे. पण ते मध्य महाराष्ट्रातले असावेत आणि पूर्णतः मराठी भाषिक असावेत. विसोबा खेचर हे नाथपंथ या अवैदिक परंपरेचे कट्टर अनुयायी होते. त्यांचं ते कट्टरपण हास्यास्पद करण्यासाठी त्यांना यजुर्वेदी ब्राह्मण ठरवणं किंवा ज्ञानेश्‍वरांची पाठीवर मांडे भाजण्याची कथा रंगवण्याचे ऐतिहासिक घोळ घातले गेले असतील. मात्र विसोबांच्या शडुस्थळ ग्रंथात त्यांची गुरू परंपरा असल्यामुळं त्यांचं नाथपंथी असणं कोणी नाकारू शकत नाही. ती परंपरा थेट गोरक्षनाथांपासून वटेश्‍वर चांगदेव ते कृष्णनाथांपर्यंत आहे. पण या शडुस्थळ ग्रंथाची सुद्धा एक गंमत आहे. या ग्रंथाचं नाव शडुस्थळ असं असलं तरी त्याचं मूळ संस्कृत रूप षट्स्थल आहे. पण शैवागमातील षट्स्थल, चन्नबसवण्णा प्रणीत षट्स्थल आणि विसोबा खेचर प्रणीत षडूस्थळी या नामसाधर्म्याखेरीज अन्य कोणतंही साम्य नाही.

षट्स्थल या लिंगायत परंपरेतील आध्यात्मिक प्रगतीतील सहा पायर्‍या आहेत. पण लिंगायतांचं मुक्तीचं तत्त्वज्ञान हे वैदिकांच्याप्रमाणं केवळ स्वतःच्या मुक्तीचं नाही. एकूणच निरामय म्हणजे विकल्परहित, शोषणरहित सर्वांच्या सुख-दुःखाची काळजी घेणारी समाजव्यवस्था निर्माण करणं, असं हे सामाजिक तत्त्वज्ञान आहे. लिंगायत परंपरेमध्ये सामाजिक मुक्तीला सर्वश्रेष्ठ महत्त्व आहे. त्या दिशेनं नेणार्‍या भक्तीस्थल, महेशस्थल, प्रसादीस्थल, प्राणलिंगीस्थल, शरणस्थल आणि ऐक्यस्थल या सहा पायर्‍या आहेत. मानवी आध्यात्मिक प्रगतीमध्ये अशा प्रकारे सहा पायर्‍या केवळ आणि केवळ सिद्धयोगी आणि शरण परंपरेच्या एकत्रिकरणातूनच शोधल्या गेलेल्या आहेत. कारण वैदिक तत्त्वज्ञानात मोक्षाची कल्पना ही समष्टीला तोडून व्यक्तिगत पातळीवर केलेली आहे. शरण परंपरेत अशा प्रकारची मोक्षकल्पना पूर्णपणे नाकारली आहे. ती समष्टीसहित आहे. पण विसोबा खेचरांच्या नावावर दिसणार्‍या या ग्रंथात मात्र नाव वगळता या बाबतीत काही फारसं दिसत नाही. हा ग्रंथच मुळी मूळ स्वरूपात उपलब्ध झालेला नाही. त्यावर काहीजणांच्या प्रक्रिया झालेल्या आहेत. विसोबा खेचरांचे ज्ञानेश्‍वरादी चारही भावंडं त्यांचे कशी गुरू दिसतील अशा प्रकारच्या ओव्या त्यात घुसडल्या गेलेल्या दिसताहेत, ज्या संशयास्पद आहेत. शिवाय त्यांच्या मूळ लोकायतीक भौतिकवादी सिद्ध परंपरेशी त्यांची नाळ तोडून ज्ञानेश्‍वरांच्या प्रभावामुळं एक सुधारलेला ब्राह्मण अशी त्यांची प्रतिमा करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झालेला आहे, असं म्हणण्याइतपत या सार्‍यांमध्ये गोंधळ दिसतो.

असं असलं तरी विसोबा खेचर हे संत नामदेवांचे नक्कीच गुरू असावेत. हे नामदेव आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या लेखनातून स्पष्टपणे जाणवतं. नामदेव हे मराठी भक्तीपरंपरेचे म्हणजे वारकरी पंथाची पायाभरणी करणारे भारतीय पातळीवरचे नेते. विसोबा आणि नामदेव यांच्या संबंधातील कथा सगळीकडे समान आहेत. शिवाय संत नामदेवांचं आजोळ कल्याण म्हणजे बसवण्णांची कर्मभूमी. बसवण्णांच्या मृत्यूनंतर पन्नास वर्षांनी नामदेवांचा जन्म कल्याण येथेच झाला. आणि बरेचसं बालपणही इथंच गेलं असण्याची शक्यता आहे.  शरणांची वाताहत झाली असली तरी त्या विचारांचं वातावरण आणि वर्तन त्यांच्या आसपास नक्कीच असणार. शिवाय विसोबा खेचरांसारखा शरण परंपरेला जवळ असणारा नाथपंथी गुरू. एकूणच नामदेव आणि त्यांच्या सहकार्‍यांवर शरण परंपरेत वचन साहित्यातील विचारांचा अतिशय गडद प्रभाव आहे. तो फक्त अभंगरचनेवरच नाही तर वारकर्‍यांच्या व्यवहारावरही आहे. कित्येक वारकरी अभंगरचना कन्नड वचनांचं शब्दशः भाषांतर केल्यासारख्या वाटाव्यात इतक्या सारख्या आहेत.

अर्थात यावर अधिक सखोल संशोधन आणि चिंतन होण्याची गरज आहे. कारण लोकायतीक आणि बौद्ध तत्त्वज्ञानानं शरण विचारांना पाया दिला. सुफी परंपरेनं सर्वसत्ताधीश परमेश्‍वराला सामान्यांचा प्रेमळ सखा म्हणून दिशा दिली. हे सगळे प्रभाव शरण परंपरेतून वारकरी परंपरेत झिरपलेले दिसतात. वारकरी परंपरेत नंतरच्या काळात एक सुरक्षित सावधपण दिसतं. त्याचं कारण शरण परंपरेनं भीषण दमन अनुभवलं आणि त्यातून नष्टप्राय होण्याची वेळ आली, तेही नंतरच्या पिढ्यांनी ध्यानात ठेवलं असावं. त्यामुळं मूळ वचन साहित्य सुरक्षित असूनही दुर्लक्षित राहिलं. विसोबा खेचरांच्या निमित्तानं आणि त्यांच्या पूर्व परंपरांचा नीट शोध घेऊन शरण आणि वारकरी पंथातील हे अतूट असे आंतर संबंध नीट समजून घेतले पाहिजेत. त्यानंतरच शरणांनी समानतेच्या पातळीवरची ‘शरणू शरणार्थी’ म्हणत एकमेकांला नमस्कार करणं आणि वारकर्‍यांचं लहान मोठा न बघता एकमेकाला लोटांगण घालणं, यातला नेमका अन्वयार्थ कळू शकेल. आपलं भाग्य की तेलंगणातून आलेल्या आचार्य परंपरेनं शरण परंपरेला आज विकृत केलेलं दिसत असलं तरी मूळ शरण परंपरेचा स्पर्श झालेल्या नाथ परंपरेनं विसोबा खेचरांच्या रूपानं वारकरी परंपरेला सशक्त पुरोगामी ठेवलं.

विसोबा खेचरांचा समाधी काळ साधारणपणे चौदाव्या शतकाच्या अतिपूर्वार्ध काळात असावा. पण त्यांच्या स्पर्शानं आणि नामदेव, ज्ञाननाथ यांच्या उत्तुंगतेनं वारकरी परंपरेनं मराठी संस्कृतीत जोमदार मूळ धरलं. पण कल्याणमध्ये झालेल्या शरणांच्या भीषण रक्तरंजित कत्तलीमुळे कन्नड, तेलगू प्रांतात मूळ शरण परंपरा निद्रिस्त झाली. बसव कल्याणमधून बाहेर पडलेलं वचन साहित्य, सुरक्षिततेसाठी घरांच्या भिंतीतून किंवा जमिनीखाली पुरून ठेवण्यात आलं आणि नंतरच्या पिढ्यांसाठी त्या फक्त नमस्काराच्या पवित्र जागा झाल्या. याचा अर्थ असा नव्हे की पूर्णच लिंगायत परंपरा संपली. कष्टकरी वर्गाच्या आचार-विचारांतून क्षीणपणे तिचं वहन चालूच होतं. पण आधी सांगितल्याप्रमाणं आचार्य परंपरेच्या पुरोहितशाही प्रभुत्ववादानं तिचं वैदिक परंपरेला सोयीचं असं स्वरूप होऊ लागलं. ज्याच्यामुळं मुळात वैदिक परंपरेच्या विरोधात असलेली अतिशय कठोर अशी शरण परंपरा आणि तिचं पुरोगामी तत्त्वज्ञान जवळपास सात-आठ शतकं झाकोळलं गेलं. शरणांच्या झालेल्या कत्तलींपासून बोध घेऊन वारकरी परंपरेनं त्यांच्याइतकी कृतिशील आक्रमकता न स्वीकारता स्वतःला सुरक्षित ठेवत अवैदिकच असलेल्या पण तथाकथित अध्यात्म क्षेत्रापुरतं समतावादी वातावरण राखण्याचं धोरण स्वीकारलं. आपल्या सामाजिक व्यवहारातूनही जातिव्यवस्थेला थेट नकार न देता तिचा बडीवार नाकारला.

शरण परंपरेची दुरवस्था झाली तरी ब्रिटिशांच्या आगमनानंतर पुन्हा एकदा प्रबोधनाची आणि इतिहासाचं सत्यान्वेषी संशोधन करण्याची पाश्‍चात्य परंपरा इथं सुरू झाली. विसाव्या शतकातील नवशिक्षित वर्ग या पाश्‍चात्य संशोधन पद्धतीनं भारावून जाऊन आपल्याही परंपरांचा शोध घेऊ लागला. शरण परंपरेसाठी असं पहिलं अधिकृत शास्त्रशुद्ध संशोधनाचे श्रेय श्री. आर नृसिंहचार्य यांना जातं. त्यानंतर विजापूरच्या डॉ. फ. गु. हळकट्टी यांनी वचन साहित्याच्या संकलनाचे आणि संपादनाचं काम केले, ते अफाट आणि अरभाटच म्हणता येईल. पूर्ण कर्नाटक आणि आंध्र फिरून या ज्ञानपिपासू माणसानं गावोगाव मौखिक परंपरेतून आलेली वचन संपदा आणि जमिनीत गाडून ठेवलेलं, भिंतीत चिणून ठेवलेलं वचन साहित्य शोधून काढलं. त्यातून शरण परंपरा पुन्हा एकदा विसाव्या शतकात उजागर झाली. पहिलं वचन साहित्य संपादन आणि संकलन त्यांच्याच नावावर जमा आहे. त्यानंतर आर. आर. दिवाकर, शि. शि. बसवनाळ यांचंही थोडंसं योगदान या कामी आहे.

त्यानंतरच्या पिढीत डॉ. आर. सी. हिरेमठ आणि डॉ. एल. बसवराजू यांच्या संशोधनामुळं त्यांचा काळ कन्नड साहित्याच्या इतिहासात वचन साहित्य संपादनाचा सुगीचा काळ ठरला. यांचाच आदर्श पुढे ठेवून मग आणखी एक महत्त्वाची पिढी आली. त्यात सन. सी. भुसनूरमठ, उत्तंगी चेन्नप्पा, एस. एस. हुनशाळ, डॉ. व्ही. शिवानंद, डॉ. एस. विद्याशंकर, पी. एम. गिरीराजू इत्यादी प्रमुख होते. त्यांनी वचन साहित्याकडे अत्यंत आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टीनं पाहिलं. या पिढीतील सर्वात प्रभावी असं वचन संशोधक विद्वान म्हणजे डॉ. एम. एम. ऊर्फ मल्लेशप्पा मडिवाळप्पा कलबुर्गी. डॉ. फ. गु. हळकट्टींना वचन साहित्य संपादनाचे पितामह म्हटलं जाते तर डॉ. एम. एम. कुलबुर्गींना वचन साहित्याचा संशोधक शिरोमणी म्हणता येईल. कारण त्यांनी बाराव्या शतकातील शरण परंपरेवर पुढच्या शतकात अयोग्य परंपरांनी चढवलेली पुटं खरवडून त्यातील अस्सल शरण विचार तिच्यातील वैज्ञानिकतेसह वर्तनाशी सुसंगतरीत्या सादर केला. म्हणजे एक प्रकारे मूळ शरण परंपरेचे अधिकृत प्रवक्ते म्हणून कलबुर्गी सरांचंच एकमेव नाव घ्यावं लागेल. या काळात अनेकांनी कन्नड संस्कृतीमधील वचन प्रभावाचा अभ्यास केवळ साहित्यिक अंगांनी केला. त्याला सर्वश्रेष्ठ साहित्याचा दर्जा दिला. पण वचन म्हणजे केवळ साहित्यिक रचना नाही. तर ती सुंदर आचरणाच्या लोकांनी केलेली सुंदर रचना आहे. वचनांचा नेमका सामाजिक संदर्भ कलबुर्गी सरांनी ओळखून त्या पद्धतीनं आपलं सत्यान्वंयी संशोधन आधुनिक जगासमोर आणलं. त्यांची संशोधक म्हणून एक भूमिका स्पष्ट होती, की संशोधकापेक्षा सत्य हे अधिक श्रेष्ठ असतं. कुठलंही संशोधन हा स्वल्पविराम असतो; पूर्णविराम कधीच नसतो. महात्मा गांधी स्वतःला वेळोवेळी दुरुस्त करत नव्यानं कळलेल्या सत्याचा स्वीकार करत राहिले, अगदी तसंच कलबुर्गी सरांमधील संशोधकाचंही होतं.

इतिहासाचा हा प्राध्यापक इतिहासाचं नेमकं महत्त्व ओळखून त्यांच्या सत्यान्वेषणात रमला होता. कारण इतिहासाच्या पायावर आजचं वर्तन उभं आहे. आजच्या वर्तनावर उद्याचा भविष्यकाळ आहे, याचंही त्यांना नेमकं भान होतं. म्हणून ‘संशोधनासाठी म्हणून संशोधन करणं नव्हे, तर समाजाच्या प्रगतीस कारणीभूत ठरणं ही संशोधनाची जबाबदारी असावी’, असा त्यांचा आग्रह होता. पण सत्य राजकीय किंवा सांस्कृतिक सत्ताधार्‍यांच्या सोयीचं असतंच असं नाही. अशा वेळी अशा सत्य सांगणार्‍याचा आवाज सर्व मार्ग वापरून बंद करण्याचा प्रयत्न असतो. बाराव्या शतकात अतिशय कठोरपणे ज्या परंपरेनं ब्राह्मणी परंपरेला विरोध केला तिच्यावरच काजळी चढवण्यात इथली ब्राह्मणी परंपरा यशस्वी झाली होती. ती काजळी ते पुसून काढण्याचा  प्रयत्न करत होते, हाच कलबुर्गी सरांना विरोध करणार्‍यांना त्रास होता. लिंगायतांचं झालेलं वीरशैवीकरण आणि आचार्य परंपरेतून आलेले चतुराचार्य किंवा पंचाचार्य यांचे कुटिल डावपेच ते सत्य साधनांच्या आधारे उघड करून दाखवत होते. त्यामुळं विसोबा खेचरांना नाथ परंपरेपासून तोडून तो कसा एक मुर्ख ब्राह्मण होता आणि ज्ञानेश्‍वरांच्या प्रभावानंच शहाणा झाला, असं दाखवण्याचा ब्राह्मणी डावपेच आहे, तसाच डावपेच कलबुर्गी सरांच्या बाबतीतही या वीरशैव व्यवस्थेनं केला. त्यांना मूर्ख म्हणण्यापासून ते लिंगायत धर्म विरोधक म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्याचं पर्यवसन कलबुर्गी सरांच्या हौतात्म्यात झालं.

‘मार्ग’ या त्यांच्या सप्तखंडात्मक लेखसंग्रहात एखाद्या परंपरेचा शास्त्रशुद्ध अभ्यास कसा करावा, याचा एक अक्षर परिपाठच त्यांनी घालून दिला आहे. शरण किंवा लिंगायत परंपरेचं नेमकं क्रांतिकारत्व काय आहे आणि लोकायतापासून बौद्ध, सुफी परंपरेचा वारसा शरणांपर्यंत कसा आला आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. महाराष्ट्र सारस्वतकार म्हणून वि. ल. भावे नावाच्या गृहस्थांना गौरवलं जातं. त्यांनी आपल्या ग्रंथात एक थोर विधान केलं आहे,  लिंगायत पंथाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात वारकरी पंथ आणि रामदासी पंथ अस्तित्वात आले. अशी अनैतिहासिक आणि हास्यास्पद खोटारडी विधानं करण्याची आपल्याकडे मोठीच परंपरा आहे.

पण विसोबा खेचरांमुळे शरण परंपरा ही वारकरी परंपरेची आधीची दिशादर्शक आहे, हे कळतं. त्या अर्थानं या दोन परंपरांचा दुवा विसोबा खेचर आहेत. शरण परंपरा नेमकी काय आहे हे केवळ कन्नड भाषिकांनाच नव्हे तर शरण विचाराच्या सर्वच जगभरातील अभ्यासकांना अधिक स्पष्टपणे सांगण्याचं मोठं श्रेय हे डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचं आहे. त्या अर्थानं ते बारावं शतक आणि आधुनिक जग यांच्यातला महत्त्वाचा दुवा आहेत. त्याच अर्थानं कलबुर्गी सर हे आजचे विसोबा खेचर आहेत.

0 Shares
चळवळीचा ‘गुगल मॅप’ भिडे गुरुजी, वारीत तुमचं स्वागत आहे!