जनीमय झेलम

भाग्यश्री वंजारी

संत जनाबाईंचा एखादा अभंग एखाद्यानं वाचला की, जनाबाई त्याला सोडत नाहीत. त्याचं संपूर्ण भावविश्वी व्यापून टाकतात. अशीच अवस्था प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना झेलम परांजपे यांची झाली. सुरुवातीला उत्सुकता म्हणून जनाबाईंचे अभंग वाचणार्याझ झेलमताई आता जनीमय झाल्या आहेत. ‘जनी म्हणे...’ या कार्यक्रमातून आता त्या जनाबाईंना सर्वत्र पोचवत आहेत.

स्वेटर, मफलर, टोपी, शाल असा चिलखती बंदोबस्त करूनही कुडकुडी थंडी पाठ सोडत नव्हती. हात चोळत ऊब मिळण्याचा प्रयत्न करणारे दिल्लीकर समोरच्या सांस्कृतिक कार्यक्रमात जीव रमवण्याचा प्रयत्न करत होते. २०१२च्या नोव्हेंबरमधील एक सायंकाळ होती ती. देशातील स्त्री संतांवर आधारीत त्या सांस्कृतिक महोत्सवात देशभरातील निवडक कलाकार कला सादर करत होते. काही वेळात एका ओडिसी नृत्याची घोषणा होते. पाचूहिरवा शालू, खणाची चोळी, चेहर्‍यावर अष्टसात्विक भाव… नृत्यांगना वाद्यांच्या लयीत पावलं टाकत येते अन् श्रोते सावरून बसतात. ‘हात निढळावरी ठेवुनि| वाट पाहे चक्रपाणी॥’ हे मंगलाचरण ऐकता ऐकता प्रेक्षकांना समोर पुरीच्या जगन्नाथाच्या रूपात हळूहळू पंढरीचा विठोबा दिसू लागतो. १३व्या शतकातल्या महाराष्ट्रातील संत कवयित्री जनाबाईंच्या या अभंगरचना सादर करत असतात, प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना झेलम परांजपे. झेलमताई प्रेक्षकांना हळुवारपणे जनाबाईंच्या विश्‍वात घेऊन जातात. जनी उकलिते वेणी तुळशीचे बनी.., जनी जाये पाणीयासी मागे धावी ह्रषिकेशी… नकळत प्रेक्षकांचे डोळे पाझरू लागतात…

हा अनुभव जनाबाईंना साकार करणार्‍या झेलमताईंचा पिच्छा सोडत नाही. जनाबाई त्यांना दिवसेंदिवस वेडच लावत जातात. त्यातूनच तयार होतो, ‘जनी म्हणे…’ हा कार्यक्रम. २०१३च्या मार्च महिन्यात झेलमताईंनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनाबाई पुन्हा साकार केली. अर्थात त्यावेळी निमित्त होतं, ८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाचं. मुंबईतल्या स्मितालय या त्यांच्या संस्थेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दिल्लीत अर्ध्या तासात आटोपलेला हा कार्यक्रम इथं जवळपास सव्वा तास रंगला. संत जनाबाईंच्या निवडक अभंगरचना झेलमताईंनी पाच महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये सादर केल्या.

झेलमताई जनाबाईंच्या अभंगांच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता हा ओडिसी नृत्याविष्कार सादर करतात. या नृत्याची सुरुवात ‘मंगलाचरण’ने आणि शेवट ‘मोक्ष’ या प्रकारानं होते. दिल्ली आणि मुंबईच्या कार्यक्रमात गायिका ऊर्मीला कुलकर्णी, मर्दलवादक रोहन डहाळे, बासरीवादक किरण हेगडे, सतारवादक अपर्णा देवधर आणि व्हायोलीनवादक सिद्धार्थ सरकार यांनी झेलमताईंना साथसंगत केली.

कार्यक्रमातील मंगलाचरण म्हणजे ईश्‍वर प्रार्थना. झेलमताईंनी त्यासाठी हात निढळावरी ठेवुनि वाट पाहे चक्रपाणी| हा अभंग निवडला. या अभंगातूनच झेलमताई विष्णूचे दशावतार सादर करतात. तूच कर्ता, तूच करविता आहेस. तूच आम्हाला मार्ग दाखव, अशा आशयानं हा अभंग प्रेक्षकांसमोर सादर होतो.

दुसर्‍या टप्प्यामध्ये जनाबाईंचं बालपण आणि पौगंडावस्था मांडली जाते. अजूनही आपल्याकडं अनेक ठिकाणी मासिक पाळीच्या काळात मुली, महिलांना घराबाहेर ठेवतात. झेलमताई सांगतात, ‘जनाबाईंनाही अशाच काळात घराबाहेर बसावे लागले असणार. त्यातूनच

जनी उकलिते वेणी तुळशीचे बनी|
हाती घेऊनिया लोणी डोई चोळे चक्रपाणी॥

हा अभंग जन्माला आला असणार. पांडुरंग स्वत: या काळात जनाबाईंना पित्याच्या मायेनं न्हाऊ घालतो. या अनाथ जनाबाईंना कुणीच मायेचं नाही, म्हणून पांडुरंगच पिता बनून त्यांची काळजी घेतो. समाजानं स्त्रीला कितीही नीतीनियम घालून दिले असले, तरी परमेश्‍वराला ती सर्वकाळ प्रिय आहे, हाच संदेश जनाबाईंनी या अभंगातून दिला आहे.’ हे सांगत असताना झेलमताई अगदी जनीमय झालेल्या असतात. त्यांना जनाबाईंचे अनुभव आपले अनुभव वाटतात. लग्नाआधी आपण वर्दे कुटुंबात अत्यंत मोकळ्या वातावरणात वाढलो, पण लग्नानंतर आपणालाही सासरी परांजपेंच्या घरी ‘ते दिवस’ घराबाहेर काढावे लागले, असा कटू अनुभवही त्या सांगतात.

कार्यक्रमाच्या तिसर्‍या टप्प्यात श्रीकृष्ण जनाबाईंचा सखा बनून येतो. जनी जाये पाणीयासी मागे धावी ह्रषिकेशी| या अभंगातून नदीवर पाणी भरायला जाणार्‍या जनाबाईंसोबत सखा हृषिकेशही जातो. त्यांना पाणी भरू लागतो. धुणे धुऊ लागतो. ही रचना प्रेक्षकांसमोर मांडताना झेलमताई जनाबाईंसोबतच श्रीकृष्णाचंही रूप सादर करतात.

चौथ्या टप्प्यामध्ये हा श्रीकृष्ण जनाबाईंचा प्रियकर बनतो. आपल्या या प्रियकराच्या प्रेमात ही प्रेयसी स्वत:ला हरवून बसली आहे. तिला कशाचंही भान नाही. अगदी डोईवरून ढळून खांद्यावर आलेल्या पदराचीही तिला पर्वा नाही. डोईचा पदर आला खांद्यावरी| भरल्या बाजारी जाईन मी॥ या अभंगात जनाबाई स्वत:ला वेश्या म्हणवतात. हा मुद्दा स्पष्ट करताना झेलमताई सुमारे तेराव्या शतकाच्या सुमारास होऊन गेलेल्या लाल देद या काश्मिरी स्त्री संत कवयित्रीचा उल्लेख करतात. या लाल देदवर आधारित एक हिंदी नाटक झेलमताईंनी पाहिलं होतं. हिंदीतली प्रसिद्ध अभिनेत्री आणि झेलमताईंची शिष्या मिता वसिष्ठनं या नाटकात लाल देदची भूमिका साकारली होती. हे नाटक पाहताना झेलमताईंना संत जनाबाई आणि संत लाल देद यांच्यात साधर्म्य दिसलं. ‘सगळं काही विसरून, मोह माया सोडून परमेश्‍वराच्या अधीन होणं, ही अवस्था किंवा हे वेड या दोघींमध्येही दिसतं’, असं झेलमताई नमूद करतात.

जनाबाई स्वत:च अभंगांमधून आपले अनुभव सांगतात, म्हणून या कार्यक्रमाचं नाव ‘जनी म्हणे..’ ठेवल्याचं झेलमताई आवर्जून सांगतात. या कार्यक्रमाचा शेवट म्हणजे ‘मोक्ष’! प्रत्येक ओडिसी नृत्याविष्काराचा शेवट या परमात्म्याशी एकरूप होणार्‍या ‘मोक्ष’ने होतो. इथे झेलमताई सुमारे दहा मिनिटं ‘मोक्ष’ सादर करतात. त्यात त्या कृष्णाचं ‘तारणहार रूप’ मांडतात.

हा अभंग सादर करत असताना द्रौपदी वस्त्रहरण, गजेंद्रमोक्ष यांसारख्या पौराणिक कथांचा संदर्भ देतात. द्रौपदी वस्त्रहरणाचा जनाबाईंनी अभंगातून वर्णन केलेला प्रसंग सादर करताना झेलमताई द्रौपदी, दु:शासन, कृष्ण अशी विविध रूपं प्रेक्षकांसमोर उभी करतात. विशेष म्हणजे जनाबाईंचे दोन वेगवेगळे अभंग एकत्र आणून त्या ‘मोक्ष’ सादर करतात. मोक्ष म्हणजे परमात्म्याशी एकरूप होणं. ‘जनी म्हणे..’ कार्यक्रमाचा शेवटही झेलमताई ‘मोक्ष’ने करतात. अर्थात त्यासाठी त्या ‘नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे|’ हा जनाबाईंचा अभंग सादर करतात.

झेलमताई सांगतात, ‘एका बाजूला जनाबाईंचे मराठी भाषेतले अभंग आणि दुसर्‍या बाजूला ओडिसी नृत्यशैली. या परस्पर भिन्न गोष्टी एकत्र आणणं हे मोठं आव्हान होतं. ओडिसी नृत्यप्रकारात बासरी, मर्दल आणि व्हायोलीन यांचा वापर केला जातो. आमच्या गायक, वादकांनी दिलेल्या उत्तम साथीमुळं हा कार्यक्रम यशस्वी झाली, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. वर नमूद केलेल्या अभंगांना मूळ संगीत यशवंत देवांचं होतं, ते तसंच ठेवलं. तर ‘जनी जाय पाणीयासी…’ या मूळ किशोरीताईंनी गायलेल्या अभंगाची चालही तशीच ठेवून त्यात कार्यक्रमाच्या गरजेनुसार थोडे बदल केले.’

कार्यक्रमाच्या तालमींबाबतची एक वेगळी आठवण झेलमताई सांगतात. ‘ओडिसी नृत्यामध्ये मर्दल आणि बासरीवादन हे महत्त्वाचं. तालमीच्या एका दिवशी ‘मोक्ष’ सादर करताना बासरीवादक किरण हेगडे याला सूरच पकडता येत नव्हते. मला अजूनही आठवतंय माझ्या नृत्यातून मी तो परमोच्च बिंदू गाठायचा प्रयत्न करत होते, पण वाद्याच्या साथीअभावी मला ते काही जमेना. शेवटी मी किरणला सांगितलं की, नुसती लय समजून घेऊ नकोस तर जनाबाईंच्या काव्यातली उत्कटता समजून घे. विचार कर, प्रत्यक्ष आयुष्यात जर तुझ्या आई किंवा बहिणीला द्रौपदी वस्त्रहरण सारख्या निंदनीय अनुभवाला समोर जावं लागलं तर तुझी अवस्था काय असेल, …आणि त्यानंतर किरणनं जे बासरीवादन केलं ते अद्वितीय होतं…’

अर्थात स्वत: झेलमताईंनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट घेतलेत, अभ्यास केलाय. संगीतकार यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेले संत जनाबाईंचे अभंग ऐकले. जनाबाईंचे अभंग आणि त्यांच्यावर लिहिण्यात आलेलं साहित्य अभ्यासलं. मुळात ओडिसी नृत्यशैलीतील जगन्नाथ आणि जनाबाईंची विठ्ठलरूपी कृष्णभक्ती हीच हा कार्यक्रम करण्यामागची प्रेरणा असल्याचं झेलमताई सांगतात.

अशा प्रकारे सामाजिक आशय असणारे कार्यक्रम सादर करणं झेलमताईंना नवं नाही. त्यांनी यापूर्वी ‘हुंडा बळी, मुलगी झाली’, ‘लीलावती’ या गणिती ग्रंथावर नृत्यनाटिका, ‘नर्मदा बचाव’वरील नृत्यनाटिका, सावित्रीबाई फुले यांच्या कवितांवर आधारीत ‘सावित्री वदते’ ही नृत्यनाटिका, याशिवाय संत चोखामेळा यांच्यावरील ‘चोखा’ हा कार्यक्रमही त्यांनी सादर केला आहे. त्यांना ही सर्व जाण आणि भान आले ते, आईवडिलांच्या समाजवादी संस्कारांमुळे. त्यांचे आईवडील सदानंद आणि सुधा वर्दे राष्ट्र सेवादलाच्या कलापथकात होते. विविध सामाजिक विषयांवर कार्यक्रम करत ते देशभर फिरले. खुद्द झेलमताईंनीही वसंत बापटांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र दर्शन’, ‘भारत दर्शन’, ‘आजादी की जंग’ आदी कार्यक्रम केले. त्यातूनच त्या ओडिसी नृत्यप्रकाराकडे वळल्या. अर्थात ‘जनी म्हणे’ हा झेलमताईंसाठी वेगळा अनुभव ठरतो, कारण यात त्या एकट्याच ‘परफॉर्म’ करतात. साठी ओलांडलेल्या झेलमताईंना आता पुन्हा जनाबाई खुणावताहेत. त्यांना जनाबाईंचे ते विठ्ठलमय भावविश्‍व पुन्हा पुन्हा अनुभवायचं आहे.

0 Shares
नामयाची दासी जना जगण्याचा आधार